Saturday, June 27, 2020

हे घ्या अस्सल पुरावे- बाबासाहेबांनी चीन, कम्युनिझम आणि माऒ यांचे काढलेले वाभाडे - प्रा. हरी नरके


















माझा "बाबासाहेब आणि चीन" हा १४ एप्रिल २०२० चा लेख तुफान गाजल्याने आता अडीच महिन्यांनी या लेखामुळे अडचणीत आलेल्या काही डाव्या मित्रांनी " बाबासाहेब असे बोललेच नव्हते, हरी नरकेंनी बाबासाहेबांच्या तोंडी खोटी वाक्ये टाकली" असा धादांत खोटा प्रचार सुरू केलेला आहे.

विचारांचे विश्लेषण करताना त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मतभेद होऊ शकतात. पण मूळ कोटेशन्समध्ये बदल होऊ शकत नाही. मी गेली ४० वर्षे लेखन-संशेधनाच्या क्षेत्रात आहे. वैचारिक मतभेद असण्यात गैर काहीच नाही. पण बाबासाहेब असे म्हणालेच नव्हते असे सांगणे हा प्रकार अक्षम्य आहे. मुद्दा विश्वासार्हतेचा आहे.

खाली मी बाबासाहेबांच्या पुस्तकांमधले संबंधित उतारे दिलेले आहेत. हे मोजकेच आहेत. हा फक्त एक नमुना आहे. डाव्यांची जर इच्छाच असेल तर वर्षभर दररोज मी बाबासाहेबांच्या पुस्तकामधले "असे" उतारे टाकू शकेन.

मी बाबासाहेबांच्या चीन, कम्युनिझम, माऒ, पंचशील विषयक मताचा सारांश पुढीलप्रमाणे सांगितला होता.

साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे असा परखड इशारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट्र निती या विषयावर बोलत होते.

"बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे खंड १५ मधले काही उतारे आहेत तर काही खंड १८ भाग २ मधले आहेत.
"बाबासाहेबांना चीनबद्दल प्रेम होते" असा प्रचार हे फेसबुकवर करीत आहेत.

मी कम्युनिस्टांना शत्रू मानत नाही. वैचारिक मतभेद जरूर आहेत. वैचारिक टिकेचे मी स्वागत करतो, मात्र व्यक्तीगत बदनामी, टोकाची वैयक्तिक शेरेबाजी, चारित्र्यहनन कराल तर मग मला गप्प बसता येणार नाही.

निदान सध्याच्या भारतीय राजकीय वातावरणात तरी मला कम्युनिस्टांशी भांडण करायचे नव्हते, नाही. शहीद कॉ. गोविंद पानसरे हे माझे मार्गदर्शक होते. आज या चळवळीत असलेल्या इतर अनेक मान्यवरांना मी अतिशय मानतो. आमच्या छावण्या  भल्या वेगवेगळ्या असतील पण अनेक मुद्यांवर आम्ही सोबत होतो. राहू.   पण कोणी अर्धवट डावे जर माझ्यावर भांडण लादणारच असतील तर मग माझाही नाईलाज होईल... लक्षात ठेवा, " ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी." तुर्तास समजनेवालों कों इतना इशारा काफी हैं....

- प्रा. हरी नरके,
२७/६/२०२०

(संदर्भासाठी पाहा - १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड,१८ वा, भाग २, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२, पृ. ५८३ ते ५८६ )

No comments:

Post a Comment