तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित करता तेव्हा तुम्हाला सदर कार्यक्रमासाठी १. हॉलभाडे, २. लाऊडस्पीकर, ३. हारतुरे, ४. निमंत्रणपत्रिका, ५. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी ठिकठिकाणी लावायचे बॅनर्स, ६. स्टेजवरील बॅनर, ७. पाहुण्यांना चहापाणी, ८. फोटोग्राफर, असा बराच खर्च करावा लागतो. आता हा सगळा खर्च करावाच लागतो. त्यात क्वचितच सूट मिळते.
मग मुद्दा येतो वक्त्याचा, प्रवासखर्च आणि मानधन यांचा. वरिल खर्च ज्यांच्या भाषणासाठी करायचा त्याने मात्र फुकटात यावे अशी अपेक्षा का? काही संयोजक निमंत्रण देताना सुरूवातच अशी करतात, "तुमचे मानधन किती असेल?" त्यावर बोलवायचे की नाही ते ठरणार. मी उलटे करतो. संयोजकांचा हेतू, तारीख, वेळ, विषय जुळला तरच पुढची बोलणी. आधी कशाला ना? बहुतांश संयोजक ठरलेले मानधन देतात. काही संस्था गरिब असतात, त्यांची विषयाबद्दलची कळकळ आणि आस्था बघून वक्तेही मानधनात भरिव सूट देतात किंवा कार्यक्रमाचे मानधन घेत नाहीत. निदान मी तरी असे करतो. किंवा दिलेले मानधन त्याच संस्थेला देणगी म्हणून परत करतो.
पण काही आयोजक मात्र मानधनाचा बाऊ करताना दिसतात. त्यावर आक्षेप घेतला जातो, टिकेची झोड उठवली जाते. (काही व्यावसायिक वक्ते मानधनाच्या नावाखाली संयोजकांची लूट करतात हेही वाईटच.) संयोजकांची ऎपत व कार्यक्रमाचा हेतू बघून मानधन घ्यावे किंवा नाही हे ठरवावे. मात्र हा कायम टिकेचा विषय कशाला?
आम्ही तुम्हाला स्टेज देतो, प्रसिद्धी देतो, मग कशाला हवे मानधन? असाही काहीजण प्रश्न विचारतात. तुम्ही आमच्या जीवावर मोठे झालात असेही ऎकवले जाते. प्रसंगी वक्त्याची हेटाळणीही केली जाते. अर्थात माझे कार्यक्रमांचे बहुतांश अनुभव चांगलेच आहेत. काही आंबटगोड तर काही सालटी काढणारे. काही वक्ते पिण्याखाण्यासाठी संयोजकांना अतोनात खर्चात पाडतात, हेही निषेधार्हच होय...माझ्यापुरते सांगायचे तर मला चहा व मिळेल ते जेवन यावर माझे भागते. राहायची व्यवस्था हॉटेलातच हवी असेही नसते. कार्यकर्त्याच्या घरीही माझे छान जुळते.
वर्षातले निम्मे कार्यक्रम मी विनामानधन करतो. ज्या संस्था खूपच गरिब आहेत त्यांच्याकडून प्रवासखर्चही घेत नाही. ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत त्यांनी प्रवासखर्च व मानधन द्यायला हवे असे मला वाटते. काही संस्था किंवा संयोजक पदरमोड करून कार्यक्रम घेतात, ते जे देतील ते मी स्विकारतो. काहीजण ठरलेले नसतानाही देतात हेही खरे आहे. मात्र कोणाला अर्धी वा १००% सूट द्यायची आणि कोणाकडून पुर्ण मानधन घ्यायचे हा माझा निर्णय असतो. संयोजकांनी ते ठरवू नये असे मला वाटते.. " हे वक्ते मानधन घेत नाहीत म्हणूनच ह्यांना बोलावले किंवा खूप कमी मानधनात येतात म्हणून तर यांची निवड केली" असेही काही संयोजक जाहीरपणे स्वागतभाषणात सांगतात. ते निमुटपणे ऎकून घ्यावे लागते.
मानधन तुम्ही ठरवा असे म्हटले की दहा टक्के लोक सन्मानपुर्वक मानधन देतात मात्र साधारणपणे नव्वद टक्के संयोजकांचे लगेच रडगाणे सुरू होते. फुकट काही मिळते म्हटले की त्याची किंमत राहात नाही. काही संयोजक तर पाचदहा रूपयाचेही बार्गेनिंग करायला बघतात.
काही संयोजक इतर वक्त्यांना दुप्पटतिप्पट मानधन देतात, आम्हाला मात्र परवडत नाही असे ऎकवतात. संयोजकही वक्त्यांचा ब्रॅण्ड /प्रसिद्धी/ कंटॆण्ट बघूनच बोलावतात.
निदान मी तरी आयुष्यात एकदाही मला बोलवा असे कोणालाही सांगायला गेलेलो नाही. श्रीमंत राजकारणी आयोजक कबुल केलेल्या मानधनात फसवणूक करणारात अग्रेसर असतात. ९९% श्रीमंत राजकारणी आयोजक फसवणारे असतात असा माझा तरी अनुभव आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हे प्रमाण कमी आहे. मात्र आहे.
वक्त्यांनाही घरदार, संसार, तहानभुक असते. त्यांनी विनामानधन बेघर होऊन, लाचार होऊन दारोदार भीक मागत फिरावं का? म्हणजे मग तुम्ही त्यांना क्रांतिकारक प्रबोधनकार म्हणणार का?
असल्या लाचार, परावलंबी त्यागाचं कवतिक करणारे दांभिक नाहीत? वक्त्यांनी फुकट घसा ताणून जगण्यासाठी धुणंभांडी करावीत अशी अपेक्षा आहे का या त्यागी मंडळींची? बरं पटत नाही, तर बोलवूच नये, हा पर्याय आहे ना तुमच्याकडे!... वक्त्यांवर उठसूठ चिखलफेक कशाला? वक्ते, कलाकार, कार्यकर्ते सन्मानाने जगले पाहिजेत! ते चळवळीचं बळ वाढवतात असं तुम्हाला वाटत नाही काय?
माझे त्यातलेच काही कडूगोड अनुभव यानिमित्ताने नमूद करतो.
१. फार जुनी गोष्टय. औरंगाबादला विद्यापीठाने मला बोलावले होते. विद्यापीठाचा प्रमुख कार्यक्रम होता. मी मानधनाबद्दल काही बोललो नाही. तरिही आयोजकांनी आम्ही विद्यापीठ नियमाप्रमाणे प्रवासखर्च व अमूकइतके मानधन देऊ असे सांगितले. मी होकार दिला. कार्यक्रम फारच उत्तम झाला. संयोजकांनी व्यवस्था चांगलीच ठेवली होती.
त्यांनी मानधनाचे पाकीट दिले. व्हॉऊचरवर सही करताना माझ्या लक्षात आले की त्यांनी जेव्हढे मानधन देऊ म्हणुन मला फोनवर सांगितले होते त्याच्या दुप्पट रक्कम त्यांनी मला दिलेली होती. ठरलेले गाडीभाडेही अदा केलेले होते. मी सदर रक्कम ठरल्यापेक्षा जास्त आहे, असे त्यांच्या निदर्शनाला आणले तेव्हा संयोजक मला म्हणाले, " आम्ही विद्यापीठाचे मागील रेकॉर्ड चेक केले तेव्हा असे आढळले की आमची पद्धत आहे त्याच्या निम्मीच रक्कम तुम्हाला सांगितली गेलीय, म्हणुन नियमाप्रमाणे जी रक्कम याआधीच्या वक्त्यांना दिलीय तीच तुम्हालाही दिलीय." ठरल्याच्या दुप्पट मानधन मिळाल्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिला आणि आजवर तरी शेवटचा अनुभव होता हा. संयोजक होते, प्रा. डॉ. सुधीर गव्हाणेसर.
२. जुनीच गोष्टय. मला सांगलीच्या एका संस्थेचे निमंत्रण आले. तारिख, विषय, वेळ सगळे ठरले. तुम्ही रेल्वेचे तिकीट काढून मला पाठवा असे मी म्हटल्यावर संयोजक, जे एक नामांकित डॉक्टर होते, मला म्हणाले, आम्ही यावर बैठक घेतो आणि जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवतो. चार दिवसांनी त्यांचा फोन आला. म्हणाले, " याविषयावर आमच्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची तीन तास मिटींग झाली. आम्ही सगळे नामांकित वकील, डॉक्टर्स, सी.ए. पत्रकार, उद्योगपती आहोत.
तेव्हा असे ठरले की वक्त्याला कळवावे, आम्ही कार्यक्रम घेऊन तुम्हाला स्टेज, प्रसिद्धी, भाषणाची संधी देतोय, मात्र प्रवासखर्च द्यायला आमचा तात्विक विरोध आहे."
मी त्यांना म्हणालो की "तुमच्या संस्थेची आर्थिक कुवत नाही, किंवा काही अडचण आहे म्हणून प्रवासखर्च न देणं मी समजू शकतो. पण आर्थिक सुबत्ता असूनही मानधन नाहीच, प्रवासखर्चालाही तात्विक विरोध असेल तर माझा निर्णय ऎका, असे फुकट कार्यक्रम करायला माझाही तात्विक विरोध आहे." मी त्यांचे आभार मानले आणि फोन ठेवला.
३. मुंबईला माटुंगा लेबर कॅंपमध्ये कार्यक्रम होता. प्रवासखर्च, मानधनाचे स्पष्ट बोलणे झालेले होते. मी पुण्याहून कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रम चांगला झाला. स्टेजवरून खाली येताच चहाही न विचारता आयोजकांनी टॅक्सी मागवली. मला टॅक्सीत कोंबले. हातात एक पाकीट दिले आणि निरोप दिला. टॅक्सीचे बिल देताना दादर रेल्वे स्टेशनजवळील एशियाडच्या स्थानकावर मी पाकीट फोडले.
त्यात एक चिठ्ठी होती. " वर्गणी कमी जमल्यामुळे तुम्हाला प्रवासखर्च मानधन काहीही देता येत नाहीये. क्षमस्व." टॅक्सीचे बिल दिल्यावर माझ्याकडे परतीच्या तिकीटाइतकेही पैसे नव्हते. विनातिकीट रेल्वेने पुण्याला जाण्याची हिम्मतही नव्हती. बसने वरळीला गेलो. ओळखींच्याकडून उसने पैसे घेतले आणि पुण्याला आलो.
अगदी असेच नाहीत पण याच्या कमीअधिक किंवा जवळपासचे म्हणता येतील असे किमान दहाबारा तरी अनुभव पुढे यायचे होते. चालायचेच. संयोजकही माणसे आहेत, माणसांसारखेच वागणार!
४. एका शैक्षणिक संस्थेने कार्यक्रमाला दादरला बोलावले. माझा दुसर्या दिवशी सकाळी नाशिकला दिव्य मराठीचा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम असल्याने दादरचा कार्यक्रम संपताच मला नाशिकला लगेच निघावे लागणार होते. मी एशियाडने पुण्याहून दादरला गेलो. फ्रेश होण्यासाठी काही व्यवस्था आहे का असे मी विचारल्यावर ( संयोजक जे माझ्या ओळखीचे होते, त्यांनी सांगितले ) दोन तासांनी थेट हॉलवरच या, तिकडे बेस्ट कॉमन टॉयलेट आहे, तिकडेच फ्रेश व्हा.
मी दोन तास प्लाझा सिनेमाच्या समोरच्या बागेत वाचत बसलो. दोन तासांनी संध्याकळी ६ वाजता सभागृहावर पोचलो. कॉमन टॉयलेटमध्ये तोंड धुवून कपडे बदलले आणि सभागृहात गेलो. उपस्थिती खूपच लिंबूटिंबू होती. माझ्याबरोबरच बरेच वक्ते/पाहुणे बोलावलेले होते, ते मुंबईतलेच असल्याने कुणीही आलेले नव्हते. त्यामुळे ठरल्याच्या तीन तास उशीरा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान संयोजकांनी मी आल्यापासून तीनतासात साधा चहाही विचारलेला नव्हता. कार्यक्रम दोन अडीच तास चालला. बरा झाला. मी निघतो म्हणालो, तर संयोजक ठीकाय म्हणाले.
हॉलच्या बाहेर एक जुना मित्र भेटला. त्याने हॉटेलात नेले आस्थेने वडापाव खाऊ घातला. मी गाडी पकडली आणि नाशिकला निघालो. मध्यरात्र असल्याने रस्त्यावर खायला काहीही मिळाले नाही. नाशिकला पहाटे पोचलो. राहण्याचे हॉटेल चांगले होते पण पहाटे किचन बंद होते.
सकाळीच नास्ता मिळेल असे सांगण्यात आले. मी घड्याळावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले की मी पुण्यावरून मुंबईला निघालो त्याला आता १८ तास झालेले होते. दादरला मित्राने वडापाव खाऊ घातला नसता तर एक मस्त निर्जळी उपवास तरी घडला असता. तब्बेतीसाठी तो बरा असतो म्हणतात.
५. तेव्हा मोबाईल फोन नव्हते. महाडजवळ कार्यक्रम होता. लॅंडलाईनवरून निमंत्रण मिळाले. मी स्विकारले. मी एसटीने पुण्याहून महाडला जायचे तिकडे संयोजक बसस्टॅंडवर मला घ्यायला येणार होते. तेच कार्यक्रमस्थळी घेऊन जाणार व परत बसस्टॅंडवर सोडणार होते. तसा मी महाडला पोचलो. संयोजक आलेले नव्हते.
तासभर वाट बघून त्यांच्या घरी फोन केला तर त्यांची बायको म्हणाली, सकाळी नऊ वाजताच ते कार्यक्रमाच्या गावी गेलेत. आता उद्याच परत येतील. कार्यक्रमाच्या गावचा कुणाचाही फोननंबर त्यांच्याकडे नव्हता. गावाचे नाव तेव्हढे त्यांना माहित होते ही मेहरबानीच म्हणायची... ते गाव महाडपासून अठरा किलोमीटरवर होते.
वडापवाला मला मुख्य रस्त्यावर सोडतो म्हणाला. साधारण ज्या प्रवाशीगाडीत सहा प्रवासी बसतात, त्या गाडीत त्याने माझ्यासह १६ प्रवाशी कोंबले होते. जिथे त्याने मला उतरवले तिकडून चालत अवघे नऊ किलोमीटरवर डोंगरात खाली गाव होते. जायला फक्त पायवाट होती.
मी जंगलातून चालत साधारणपणे चार तासांनी त्या गावात पोचलो. तर मला घ्यायला येणार होते तेच गृहस्थ एकदम पुढे आले व मी विसरलोच तुम्हाला न्यायला यायला असं म्हणू लागले. यावर काय बोलणार? संयोजक माझी वाटच बघत होते. चहा झाल्यावर लगेच कार्यक्रम सुरू झाला. उपस्थिती मोठी होती.
कार्यक्रम बेस्ट झाला. आग्रहाचे जेवन दिल्यावर त्यांनी मला महाडला बसस्टॅंडवर सोडायला एक मोटर सायकलवाला बरोबर दिला. आम्ही रात्री साडॆबाराला तिकडे पोचलो तेव्हा शेवटची पुणेगाडी गेलेली होती. पुढची एसटी उद्या सकाळीच होती. बसस्टॅंडवर झोपू नका असे तिकडचा वहातूकनियंत्रक म्हणाला.
महाडच्या रेस्ट हाऊसला गेलो तर ते फुल्ल होते. किचनमध्ये डायनिंग टेबलवर बॅगेतील लुंगी अंथरली आणि पडलो. तर मच्छरांचा हल्ला झाला. सरकारी पंखा फक्त आवाज करीत होता. फिरत मात्र नव्हता.
सकाळी तीनतास आधीच महाड बसस्टॅंडवर पोचलो.
६. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना नाशिकच्या द्राक्षे व वाईन उत्पादकांनी मला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या एका कार्यक्रमाला बोलावले. मला निमंत्रण द्यायला विसेकजण नाशिकहून पाचसहा मर्सिडिजने माझ्या कोथरूडच्या घरी आलेले. कालिदासमध्ये कार्यक्रम होता.
राहायची व्यवस्था एका मोठ्या हॉटेलात होती. वर्तमानपत्रातील जाहीरातींवर, मंत्र्यांचे व संयोजकांचे फोटो यावर किमान चार लाख रूपये खर्च केलेले अतिश्रीमंत संयोजक होते. कार्यक्रम स्थळाची सजावट, कमानी, बॅनर्स, बॅंड यावर दोनेक लाख खर्च झाला असावा. स्वागत गीतवाल्यानेच पंधरा हजार घेतलेले होते.
कार्यक्रमात माझे मुख्य भाषण होते. बरेच मंत्री उपस्थित असले तरी ते मोजकेच बोलले. कार्यक्रमानंतर आता उद्या सकाळी भेटू असे सांगून संयोजक मला हॉटेलवर सोडून निघुन गेले. दुसर्या दिवशी सकाळी माझ्या एस.टी.ची वेळ होत आली तरी संयोजकांचा पत्ता नव्हता. मी त्यांच्या घरी फोन केला तर ते दमल्याने झोपलेले होते. उठल्यावर मला म्हणाले, " खूप दमलोय. आता मी येत नाही निरोप द्यायला. तेव्हढे हॉटेलचे बिल द्या आणि तुम्ही जा, आम्ही तुम्हाला तो खर्च, मानधन व प्रवासखर्च पाठवतो."
माझ्या रूममध्ये जे दुसरे एक निमंत्रित उद्योगपती होते ते स्वत:च्या कारने पहाटेच फलटणला निघून गेलेले होते. मात्र त्यांच्या ट्रंककॉलचे बिल दोनेक हजार रुपये झालेले होते. रुमचे भाडे, दोघांचे जेवन, नास्ता, चहा यांचेही तितकेच झालेले. एव्हढे सगळे पेमेंट करण्याएव्हढे पैसे माझ्याकडे नव्हते. मी संयोजकांना पुन्हा फोन केला व माझी अडचण सांगितली. मग ते हॉटेल मॅनेजरशी बोलले. तेव्हा कुठे माझी सुटका झाली.
मी पुण्याला परत आलो. संयोजकांना मी नंतर मानधन-प्रवासखर्चासाठी खुपदा फोन केले, पत्रे लिहिली, निरोप दिले. त्यांनी दादच दिली नाही. त्यांचे म्हणणे असे की, " मी दुसर्याही एका शैक्षणिक कार्यक्रमाला वेळ दिलेला होता, त्या संस्थेने पुणे-नाशिक-पुणे साध्या एसटीचे भाडे मला दिलेले होते. सामाजिक कार्यक्रमाचे मानधन कसले मागता?"
मग मी तक्रार दाखल करतो म्हणालो. तेव्हा कुठे ते नरमले. शेवटी मी सुचवलेल्या एका सामाजिक संस्थेला त्यांनी अगदी अल्पशी देणगी दिली व फुल ना फुलाची पाकळी गोड मानून घ्या असं मला म्हणाले. असे हे कोट्याधिश की कोत्याधिश!!
७. पुण्याच्या एका प्राध्यापक मित्राच्या आग्रहावरून संगमनेरचा कार्यक्रम घेतलेला. तेव्हा मी टेल्कोत नोकरी करायचो. शिफ्ट करून लाल डब्याने रात्री अकरा वाजता संगमनेरला बसस्टँडवर आम्ही दोघे पोचलो. माझ्यासोबत पुण्याचे प्राध्यापकमित्र होते. त्यांची बहिण संगमनेरला राहत असल्याने ते तिच्याकडे राहायला गेले.
माझी सोय रेस्ट हाऊसमध्ये केल्याचे समजले. रेस्ट हाऊस बसस्टॅंडला लागूनच आहे. तिकडे गेलो तर संयोजकांनी रूम बुक केली होती, मात्र नुकतेच एक तासापुर्वी त्यांनी स्वत: येऊन रिझर्व्हेशन कॅन्सल केले होते. कारण अज्ञात होते. दरम्यान रात्रीचे बारा वाजलेले होते.
मी शेवटचा पर्याय म्हणून प्रा. रावसाहेब कसब्यांच्या घरी फोन केला. दुसर्याच बेलला फोन उचलला गेला. वहिनी म्हणाल्या, " कसबेसर एका कार्यक्रमाला बाहेरगावी गेलेत. आत्ता पोचतीलच घरी. तुम्ही राहायलाच घरी या."
गेलो. सर आले. आयोजक कसबे सरांच्या परिचयाचे होते. सर म्हणाले, "झोप आता. सकाळी बघू."
सकाळी कसबेसरांनी संयोजकांच्या घरी फोन केला तर ते बाहेरगावी गेल्याचे समजले. कार्यक्रमाचे काय तर, पुरेशी वर्गणी न जमल्याने तो रद्द झाल्याचे संयोजकपत्नी म्हणाल्या. रेस्ट हाऊसचे रिझर्व्हेशन का रद्द केले, कार्यक्रम रद्द झाल्याचे वक्त्यांना पुण्याला का कळवले नाही?" यावर बाईंचे उत्तर होते, " कळवायचे काय त्यात, तसेही आल्यावर कळेलच की.
राहण्याच्या रूमचे रिझर्व्हेशन अशासाठी रद्द केले की वक्ते संगमनेरला आल्यापावली पुण्याला परत जाऊ शकतील! त्यांचा वेळ फुकट जायला नको....."
घ्या कपाळावर मारून!
८. दापोली माझे आवडते गाव आहे. तिथल्या संयोजकांचा कार्यक्रमासाठी माझ्या घरी पुण्याला फोन आला तेव्हा मी मुंबईत के.ई.एम. हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होतो. खूप आजारी होतो. अंगात ताप होता. खूप अशक्तपणाही होता. डॉक्टरांनी नकार दिला तरी संयोजकांनी घ्यायला गाडीसह माणूसच पाठवला. सोबत माझ्या पत्नीला व मुलीलाही यायचा त्यांनी आग्रह केला.
शेवटी आग्रहाला बळी पडून आम्ही तिघे त्यांच्यासोबत दापोलीला गेलो. कार्यक्रमाला मंत्री रामदास आठवलेसाहेब आलेले होते. कार्यक्रम जोरदार झाला. आमची राहायची व्यवस्था कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसवर होती. मुक्काम करून सकाळी पुण्याला निघायचे ठरले होते. घ्यायला आलेल्यांच्या घरी सकाळी मी फोन केला तर ते थकून झोपलेले होते. त्यांच्या पत्नी म्हणाल्या, " साह्येब झोपलेत. उठवू नका असा मला दम दिलेला आहे त्यांनी. गाडी तिकडेच आहे, तिने जा तुम्ही पुण्याला!"
गाडी व ड्रायव्हरची मी चौकशी केली तेव्हा समजले कारवाला पुण्याचा होता. रात्रीच त्याला संयोजकांनी पेमेंट केले व तो न थांबता पुण्याला परत एमप्टी निघुन गेलाय. परत मुख्य संयोजकांकडे फोन केला तर ते मुंबईला गेल्याचे समजले.
सगळेच्या सगळे आयोजक नॉट रिचेबल होते. शेवटी फणफणत्या तापात बायको-मुलीसह बसस्टॅंडवर गेलो. सगळ्या गाड्या फुल्ल होत्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे उभे राहायलाही गाडीत जागा नव्हती. शेवटी दोनतीन तास वाट बघून डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे जावई अनीस पटवर्धन यांना फोन केला. त्यांनी धावपळ करून कुठून तरी एक कार मॅनेज केली. अनीसमुळे निदान पुण्याला तरी कसेबसे पोचलो.
वर्षभरात संयोजकांनी कधीही माझे फोन घेतले नाहीत.
मात्र पुढच्यावर्षी त्यांचा पुन्हा मला निमंत्रणाचा फोन आला. म्हणतात कसे, " तुमचे भाषण लोकांना खूप आवडलेय. तुमची खूप डिमांड आहे. यावेळी मागच्यासारखा त्रास होणार नाही. माझा शब्दाय. तुम्ही आलेच पाहिजे. माणूस पाठवतो घ्यायला. आठवलेसाहेबांचा फार आग्रह आहे....!"
असे किंवा यापेक्षाही चित्रशैलीतील अनुभव!!! भरमसाठ आहेत. पुन्हा कधी त्यांच्याबद्दल.... पुण्यातल्या एक नामवंत महाविद्यालयाने मला व्याख्यानाला बोलावले. तिथल्या प्राध्यापक मित्राच्या लुनावरून डबलसीट खडकवासल्याला भाषणाला गेलो. तिकडे महाविद्यालयाचा कॅंप गेलेला होता. मजा आली. परतल्यावर संयोजकांनी मानधनाचे पाकीट दिले. पाहिले तर त्यात पाच रूपये होते! अर्थात वीस वर्षांपुर्वीचे ५ रुपये म्हणजे आजचे निदान ५० रूपये झाले. भरपुर झाले ना?
९. हो, तारखा शिल्लक नाहीत किंवा तारखा जुळत नाहीत म्हणून मला शेकडो कार्यक्रम घेता आले नाहीत, त्यामुळे असंख्य लोक नाराजही झाले. चिडले. संतापले. कायमचे तुटलेही.
मात्र मानधन कमीय म्हणून मी आजवर कार्यक्रम नाकारलेला नाही. पस्तीस वर्षे मी एस.टी. बसने वा एशियाडने प्रवास केला. अलिकडे स्पॉन्डीलिसिसमुळे एसटीच्या लाल डब्याने जाण्याऎवजी रेल्वेने, कारने, सुमोने, जीपने जावे लागते. त्याचा संयोजकांवर भार पडतो याचाही मला गिल्ट वाटतो....
संयोजकांनी वक्त्यांचा प्रवासखर्च करायला हवा. आमच्यासारख्या ज्यांनी टेल्कोसारखी नोकरी फुले-आंबेडकर साहित्याच्या प्रकाशनासाठी स्वेच्छेने सोडली व ज्यांना उदरनिर्वाहाचे दुसरे काहीच साधन नाही त्यांना शक्य असेल तेव्हढे मानधनही संयोजकांनी द्यावे, असे मला तरी वाटते.
मी ठरलेली तारीख देऊन गेलो नाही असे कधीही झालेले नाही. अधिक मानधनाचे आमिष असतानाही आधी ज्यांना शब्द दिलाय त्यांच्या तारखेत वा कार्यक्रमात मी कधीही बदल केलेला नाही, वा त्यांच्याकडून ऎनवेळी मानधनही वाढवून मागितलेले नाही. अनेकांनी कमी दिले तरी ते स्विकारले. नंतर पाठवले तेही मान्य केले.
अर्थात ही माझी बाजू झाली.
संयोजकांचीही काही एक बाजू असेलच.
कार्यक्रमाचे फोटो, बातम्यांची कात्रणे पाठवा असे विनवूनही २ ते ३ टक्के संयोजकच फोटो,कात्रणे पाठवतात. अनेकांचा कार्यक्रम संपला की गरज सरो, वैद्य मरो असाच अनुभव असतो.
चालायचेच. माणसेच ती. अशीच वागणार!
१०. मला आज सुमारे ४० वर्षांच्या अनुभवानंतरही मानधन याविषयावर बोलताना खुप संकोच वाटतो.
मला निदान २५ संस्था/व्यक्ती अशाही माहित आहेत ज्यांनी मला न विचारताच माझे नाव छापले. वर्गण्या जमा केल्या. रेल्वे स्टेशनवर पोस्टरमध्ये माझे नाव वाचून मी स्वत: त्यांना संपर्क केला
तेव्हा त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळले. काहीजण थेटच म्हणतात, " तुमची फक्त संमती द्या, आम्ही तुमचं नाव छापतो. तुम्ही येऊ नका." काही संमती घेतात आणि नंतर काहीच कळवत नाहीत. आपण तरिही गेलो तर त्यांना अवघडल्यासारखे होते. आम्हाला वाटलं, ज्याअर्थी आम्ही नंतर तुम्हाला काही कळवलं नाही त्याअर्थी तुम्ही येणार नाही. ठीकाय. आता आलाच आहात तर जेवा आणि परत जा. आणि असे सांगणारे कोणी सामान्य नाहीत, द. महाराष्ट्रातील एका मोठ्या साखर कारखान्याचे संस्थापक-चेयरमन, स्वातंत्र्य चळवळीतले थोर नेते, प्रचंड आदरणीय सामाजिक नेते. मोठाच माणूस. असो. शेवटी कोणीही असला तरी माणूसच तो.
सामान्य लोक खूप जीव लावतात. अमाप प्रेम करतात. आणखी काय हवे?
-प्रा. हरी नरके, ९/६/२०२०
No comments:
Post a Comment