Wednesday, June 10, 2020

बौद्ध युवकाची पुण्यात हत्त्या, पुरोगामी विचारांना मूठमाती : प्रा. हरी नरके

विराज विलास जगताप या बौद्ध युवकाची पुण्यात हत्त्या, शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती : प्रा. हरी नरके

विराज विलास जगताप, वय २० वर्षे, रा. जगतापनगर, बुद्धविहाराजवळ, पिंपळे सौदागर, पुणे यांची तथाकथित उच्च जातीय मुलीवर प्रेम केले म्हणून ७ जून २०२० रोजी रा. १० वा. काटे कुटुंबियांकडून अमाणूष हत्त्या,
आरोपी : हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे यांनी एकत्रितपणे मिळून आधी टेम्पोने विराजच्या टू व्हीलरला धडक दिली, खाली पडलेल्या विराजला लोखंडी रॉडने व दगडांनी ठेचून अमाणूषपणे मारहाण करीत हत्त्या केली. मारताना आमच्या मुलीवर प्रेम करतो काय अशी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून हत्त्या केली.


सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद झालेली आहे.
एफ. आय. आर. ३०६/२०२०, भा. दं. वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, अनुसुचित जातीजमाती कायदा २०१५ चे कलम, १८८९, ३ (१) ( आर) ( एस) ३ (२ ) (व्हीए) ३ (२) (व्ही) ६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५


कोणतीही हत्त्या हा गंभीर गुन्हाच. तथाकथित वरच्या जातीच्या मुलीवर प्रेम करतो म्हणून जातीभेदापोटी सहाजणांनी रानटीपणाने कोवळ्या युवकाला ठार मारणे हा तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा गुन्हा.

जग कुठे चाललेय आणि ही तथाकथित उच्चजातीय मानसिकतेतली माथेफिरू माणसं प्रेम केलं म्हणुन हत्त्या करतात? महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह झालेले आहेत. महात्मा फुल्यांचा दत्तक पुत्र यशवंतचे लग्न आंतरजातीय होते. राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या बहीणीचा विवाह आंतरजातीय केलेला होता. स्वत: बाबासाहेबांचा शारदा कबीर यांच्याशी झालेला विवाह आंतरजातीय होता.


या पुरोगामी राज्यात आंतरजातीय विवाह करण्यात सर्वाधिक पुढे असलेल्या समाजापैंकी पहिले तीन समाज आहेत, मराठा, बौद्ध आणि ब्राह्मण. असे असताना पुण्यासारख्या शहरात हे घडावे याची शरम वाटते. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती देणार्‍या या कृतीचा मी तीव्र धिक्कार करतो. आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करतो.

राज्यातला सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.

-प्रा. हरी नरके, १०/६/२०२०

No comments:

Post a Comment