Friday, June 19, 2020

चीन हा लोकशाही जाळणारा वणवा : भारताला चीनच्या आक्रमणाचा धोका- प्रा. हरी नरके












साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे, असा परखड इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी दिला होता.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. १९६२ साली ज्या गलवान खोर्‍यावरून चीनने आक्रमण केले होते तोच मुद्दा पुढे करून चीनने आपल्या २० बहादूर जवानांचे लाखमोलाचे जीव घेतलेले आहेत. सीमेवर पेट्रोलिंग करताना शस्त्र सोबत असले तरी फायरिंग करायची नाही म्हणुन आपल्या जवानांनी गोळीबार केला नाही असे परराष्ट्रमंत्री म्हणतात. कुणाचा जीव घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी स्वसंरक्षणार्थ एखाद्याचा जीव घ्यावा लागला तर तो क्षम्य असतो, मग चीनचे जवान आपल्या सैनिकांवर दगडगोटे, तीक्ष्ण हत्त्यारे, यांचा मारा करीत असताना त्यांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करता आला असता, मग त्यांना कोणी रोखले याचे उत्तर मिळालेले नाही. राज्यसभेत परराष्ट्रनीतीवर बोलत असताना बाबासाहेबांनी काढलेले उद्गार सुरूवातीला मी दिलेले आहेत. पंतप्रधान नेहरू बाबासाहेबांचे भाषण काळजीपूर्वक ऐकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणला असता अध्यक्षांनी त्या सदस्याला फटकारले.


आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर गेला आहे. बाबासाहेबांची भाषा वापरून सांगायचे, तर या वणव्यात सारे जग होरपळत असून, चीनच्या चुकीची शिक्षा भारतासह साऱ्या जगाला भोगावी लागते आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला, की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोहोचवला, यावर आरोपप्रत्यारोप होत आहेत. चीनने लादलेल्या या जैविक महायुद्धामुळे सारे जग पोळून निघाले आहे.


चीनचे लालभाई सत्ताधीश अतिमहत्त्वाकांक्षी, हुकूमशाही वृत्तीचे आणि आक्रमक आहेत, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या लाखो तरुणांना रणगाड्यांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीश क्रूरकर्मा आणि रानटी आहेत, हे वेगळे सांगायला नको. आज गलवान खोर्‍यावर कब्जा करायला पुढे सरसावलेला चीन अतिदुष्ट साम्राज्यवादी आहे हे अनेकवार सिद्ध झालेले आहे. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनीती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार (व्हेटो), हे सारे बघितले की चीन शेजारी देशांवर आक्रमण करू शकतो हे सिद्ध होते. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात.


जगातील सगळी प्रगत राष्ट्रे आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनीतीही असू शकते.


डॉ. बाबासाहेबांचा द्रष्टेपणा असा, की त्यांनी साडेसहा दशकांपूर्वीच भारताला याबाबत जागे केले. 'साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते. त्यांना नीतीमत्ताही नको असते.


माओ हा चीनमध्ये तिथल्या बौद्धांना जी अमानुष वागणूक देत आहे, ती पाहता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे, हे उघडच दिसते. भारताने चीनशी मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी,' असेही बाबासाहेब म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, 'साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱ्यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी, हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली, तरी माओचा पंचशिलावर विश्वास नाही.

चिनी राजनीतीची दोन तत्त्वे आहेत. पहिले, त्यांची राजनीती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे, त्यांच्या जगात कोणत्याही नीतीला मुळी जागाच नसते. आजची नीती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झाला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्वीकारतात, त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे.'

नेहरू सरकारमधील कायदेमंत्रिपदाचा १९५१ साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली,

त्यातले एक म्हणजे नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनीती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले, तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळ्याआड होता कामा नये.

बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते, की चीन आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार. भविष्यात भारताला या दोघांपासून धोका आहे, असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकर खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर अतोनात खर्च करावा लागतो आहे. याबाबतही बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली होती.

संरक्षण धोरणात भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौद्धबहुल तिबेटची जी ससेहोलपट केली, त्यावरही बाबासाहेब अतिशय नाराज होते. खरे तर चीन व भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभला आहे. चीनशी आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध आहेत. रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नीतीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो, असे बाबासाहेब सांगतात.

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले उच्च शिक्षण घेताना, बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्या काळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. पुढील काळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले, तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्या करण्यात आली, त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले.


१९५४ साली मुंबईत 'आपण महात्मा फुल्यांना कधीही सोडणार नाही,' असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडत असल्याचे जाहीरपणे सांगितले.

बाबासाहेबांनी 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची १९३६ साली स्थापना केली. त्यावेळी काही कम्युनिस्ट मित्रांशी त्यांची जवळीक होती; मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले.

१९५२च्या लोकसभा निवडणुकीत मते कुजवा; पण बाबासाहेबांना पराभूत करा, हा कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला.
कोणताही विधीनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जातिप्रश्नावर मात्र मौन बाळगत असे. स्त्रीप्रश्न हाही त्यांना अग्रक्रमाचा नव्हता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी 'बुद्ध की मार्क्स?' या प्रश्नावर जाहीरपणे 'मार्क्स नाही, तर बुद्धच आपला मार्गदाता' असल्याचे घोषित केले.
मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झाली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला, तरी कम्युनिस्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने आणि भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे, हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.
बाबासाहेबांच्या दृष्टीने देश सर्वप्रथम होता. या  हिंसक आणि हुकूमशाही वृत्तीच्या चिनीच्या वागण्याचे कुणीही समर्थन करणार नाही.


-प्रा. हरी नरके,@Hari Narke

(लेखक समाजशास्त्रांचे संशोधक असून ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँज स्पीचेस' या ग्रंथमालेचे संपादक होते.)

दि. १४ एप्रिल २०२० रोजी म.टा.मध्ये प्रकाशित झालेला माझा हा लेख किंचित भर घालून रिपोस्ट केला आहे.


(संदर्भासाठी पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ. विजय खरे, सुगावा प्रकाशन,पुणे,२०१०)

No comments:

Post a Comment