Thursday, June 18, 2020

विवेकवादी गोपाळ गणेश आगरकरांचा १२५ वा स्मृतीदिन : प्रा. हरी नरके









वयाच्या अवघ्या ३९ व्या  वर्षी  अकाली वारलेल्या गोपाळराव आगरकरांना जाऊन काल १२५ वर्षे झाली.          (जन्म, टेंभू, सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : पुणे, १७ जून १८९५)  कोरोना आणि एकुणच मराठी समाजाचा आगरकरांबद्दलचा थंडपणा यामुळे त्यांचे स्मरण फारसे कोणाला झाले नाही. हेही आपल्या रितीला धरूनच झाले म्हणा! आगरकरांनी ज्या मध्यमवर्गीयांच्या सुधारणेसाठी आपली हयात घालवली त्यांनी आगरकरांचा विचार स्विकारला, त्यानुसार उच्चशिक्षण घेतले, आधुनिक राहणीमान, जीवनमान स्विकारले पण आगरकारांचं नाव मात्र टाकून दिलं. विचारसुद्धा सगळा नाही घेतला. सोयीचा तेव्हढा घेतला. त्यांचा ध्येयवाद, त्यांचे समर्पण नाही घेतले. त्यांचा सुधारणावाद, बुद्धीप्रामाण्यवाद नाही घेतला. त्यांच्या विवेकनिष्ठेऎवजी त्यांच्या विरोधकांचा धार्मिक उन्माद आणि तुच्छतावाद मात्र आवर्जून घेतला. विज्ञाननिष्ठा नाकारली आणि पुरोहितशाहीची  मानसिकता घेतली.

अशा आप्पलपोट्यांसाठी आगरकर हकनाकच गेले म्हणायचे. आगरकर विवेकवादी होते. ते गरिबीतून कष्टाने शिकले. उत्तम सरकारी नोकरी आणि छान कमाई झाली असती तर तिच्यावर पाणी सोडून मध्यमवर्गीयांच्या अंधश्रद्धा दुर व्हाव्यात, स्त्रियांनी आधुनिक केशभुषा, वेशभुशा स्विकारावी, भरपूर शिकावे, कर्तबगारी गाजवावी, बालविवाह करू नयेत, विधवांचे पुनर्विवाह सन्मानाने व्हावेत, विधवांचे केशवपन करू नये, सती जाण्याची गरज नाही हे विचार लेखनाद्वारे मांडीत राहिले.  त्यावरून टिळकांशी मतभेद झाल्यावर आपला स्वत:चा "सुधारक" हा पेपर काढून विचारकलहाला घाबरू नका, चर्चेमुळे, वादविवादामुळे समाज समृद्ध होतो, मराठी माणूस हा मुलत: कलहशील आहे. कळवंड करणारा, भांडकुदळ आहे, त्याला चेतवित राहिले. जागवित राहिले.

"सुधारक" या पेपरला ब्राह्मणवाद्यांचा किती विरोध असावा? पुढे फाशी गेलेल्या चाफेकर बंधूंनी सुधारकाच्या संपादकाला अंधारात गाठून मारहाण करण्यासाठी तरूण हवेत अशी जाहीरातच वर्तमानपत्रात दिलेली होती.

ते आधी केसरी, मराठाचे व नंतर सुधारकाचे संपादक असताना लोकशिक्षण, लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकरंजन हे सुत्र उराशी बाळगून लिहित राहिले. कोल्हापूरच्या शिवाजीराजांना ब्राह्मण दिवाण बर्वे त्रास देत होते. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी अग्रलेख लिहिले. बर्व्यांनी अब्रुनुकसानीचा खटला भरला. ब्रिटीश कोर्टाने दहा हजार रुपयांचा जामीन मागितला. त्याकाळचे (१८८०-८१) दहा हजार रुपये म्हणजे आजचे सुमारे दहा कोटी रुपये. अशा संकटाच्या घडीला त्यांनी रात्री अकरा वाजता तार केली. मदत मागितली. महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावले. सत्यशोधक समाजाचे खजिनदार रा. बा. उरवणे यांनी रोख दहा हजार रुपये मुंबईला कोर्टात पोचते केले. पुढे टिळक-आगरकरांना न्यायालयाने साडेतीन महिन्यांची शिक्षा सुनावली. ते सुटले तेव्हा जोतीरावांच्या सुचनेवरून सत्यशोधकांनी डोंगरीच्या तुरूंगाबाहेर जल्लोश केला. एका रथातून त्यांची मिरवणूक काढली. त्यांचा जंगी सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. हे सगळे खुद्द टिळकांनीच पुढे केसरीत लिहिलेय. तिथूनच मी हे उद्धृत करतोय. (पाहा: केसरी, ३ ऑक्टोबर १८८२)

जोतीरावांनी त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद असतानाही कायम त्यांना पाठींबा दिला, सहकार्य केले. विवेकवादी असूनही आगरकरांची वैचारिक भुमिका  ही होती की, "जे काही करणे ते मूळ आर्यत्व न सांडता करावे," याच्याउलट फुले आर्यत्वाचे कणखर विरोधक होते.

लोकहितवदी, न्या.रानडे, आगरकर, कर्वे ही भलीच माणसं होती. पण महापुरूषांनाही मर्यादा असतातच. काही काळाच्या, काही स्वत:च्या. आगरकरांनी ज्या कुटुंबसुधारणेचा ध्यास घेतला होता ती आता बर्‍यापैकी साध्य झालेली आहे. लोकहितवादी आयुष्यभर लोकहितार्थ झटले. पण त्यांची लोकांची कल्पना बघितली तर ती सर्वसमावेशक दिसत नाही. ती लोक म्हणजे अभिजन अशी मर्यादित दिसते, अशी टिका ख्यातनाम इतिहासकार अरविंद देशपांडे यांनी केलेली आहे. (पाहा: महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, १९९८, पृ. ५ ) न्या. रानडे प्रकांडपंडीत होते. सुधारक होते. पण व्यक्तीगत जीवनात सुधारणा करताना पाय मागे घेणारे होते असे त्यांचे चरित्रकार न.र.फाटक सांगतात. ( पहिली बायको वारल्यावर विधवेशी लग्न करण्याऎवजी ९ वर्षांच्या मुलीशी जिल्हा न्यायाधिश असलेल्या ३२ वर्षांच्या रानड्यांनी लग्न केले.) कर्व्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी काम केले पण फक्त ब्राह्मण विधवांसाठीच ते काम करीत राहिले.

या पार्श्वभुमीवर जोतीराव फुले यांची समाजक्रांतीची भुमिका या समकालिनांना पेलवली नाही. या विवेकी माणसाने जोतीराव वारले तेव्हा ती बातमीही दिली नाही. टिळकांनी दिली नाहीच पण आगरकरांनीही सुधारकात ती दिली नाही याबद्दल इतिहासकार य. दि. फडके यांनी खेद व्यक्त केलेला आहे. जोतीराव धर्मांतर करून कधीही ख्रिस्ती झाले नाहीत. त्यांनी "सत्यधर्मा"ची मांडणी केली. तरिही आगरकर त्यांना "रेव्हरंड जोतिबा" असे हिनवतात. आगरकरांचे भावविश्व शहरी होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात शेती, शेतकी, शेतकरीजगत यावर फारसे काही लिहिलेले आढळत नाही.


सामाजिक समता, स्त्री-पुरुषसमता आणि विज्ञान‌निष्ठा‌ ही आगरकरांची जीवनमुल्ये होती.  ते बाळ गंगाधर टिळकांचे समकालीन, आधी मित्र आणि नंतर कट्टर विरोधकही. ते केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टिळक व आगरकर एकत्र आले. दिनांक १ जानेवारी १८८० रोजी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाली. आगरकर १८८१ मध्ये एम.ए. झाल्यावर या शाळेत शिकवू लागले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. पुढे  टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

ते थोर प्रबोधनकार होते. भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मुल्यांवर आधारलेला मराठी समाज उभा राहावा यासाठी ते झुंजले. महाराष्ट्रसमाजाला समाजपरिवर्तन, विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देण्यासाठी ते बोलत-लिहित राहिले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळावी या कारणे त्यांनी देह झिजवला. आपल्या समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यावा, ग्रंथप्रामाण्य नष्ट व्हावे, बुद्धीला पटेल तेच स्वीकारले जावे, केवळ अंधानुकरण करीत रूढीवादी जीवन जगु नये असा प्रचार ते करीत राहिले. रुढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशी समाजधारणा बनावी हे त्यांचे स्वप्न होते. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत, आधुनिक पादत्राणे वापरली पाहिजेत, स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरीने काम करावे हे आज सहज स्विकारले गेलेले विचार ज्याकाळात समाज नाकारीत होता तेव्हा आगरकर भांडत होते. ज्यांच्यासाठी ते भांडत होते त्यातल्या ९९ टक्क्यांना मात्र याची आज जाणीवसुद्धा नाही. आठवणीचा मुद्दाच नाही.

आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा? या वादात ते आधी समाजसुधारणा या मताचे होते. त्यांचे सुधारक हे वर्तमानपत्र इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काहीकाळ ना. गो.कृ. गोखले यांनी सांभाळली होती.

बुद्धीला जे पटेल ते बोलणार व शक्य ते आचरणात आणणार हा त्यांचा बाणा होता. " विचारकलह" हा समाजस्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे ह्याचे ते पुरस्कर्ते होते. त्यावेळी सनातनी आजच्यासारखेच आक्रमक होते. संघटित होते. हिंसकही होते. ब्रिटीश राज्य असले तरी सामाजिक जीवनात अजूनही पेशवाईच होती. त्यामुळे पुण्यातल्या सनातन्यांनी सर्व सुधारकांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.

वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी आगरकर गेले.

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात १९३४ मध्ये आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

आज त्यांच्या नावे काही पुरस्कारही दिले जातात. साहित्य संस्कृती मंडळाने तीन खंडात आगरकर-वाङ्मय प्रकाशित केलेले आहे. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे) त्यातल्या निवडक लेखांचा संग्रह प्रा. ग.प्र. प्रधान यांनी संपादित केलेला असून त्याचे प्रकाशन साहित्य अकादमीतर्फे झालेले आहे. "शोध बाळगोपाळांचा" हे य.दि.फडके यांचे पुस्तक व विश्राम बेडेकरांचे "टिळक-आगरकर" हे नाटक प्रसिद्ध आहे. "डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस", हे आगरकरांचे स्वत:चे अनुभवकथन व त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत केलेले भाषांतर ’विकार विलसित’ वाचनीय आहे.

या विवेकपुरूषाला विनम्र आदरांजली.

- प्रा. हरी नरके, १८/६/२०२०



No comments:

Post a Comment