Monday, June 29, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके



" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) ...............................

शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,

No comments:

Post a Comment