फेसबुकपोस्टच्या चोर्यामार्यांचे प्रमाण अलिकडे फारच वाढल्याचे आढळते. मित्रमैत्रिणींच्या चांगल्या पोस्ट ढापायच्या आणि स्वत:च्या नावाने स्वत:च्या भिंतीवर चिकटवायच्या हा प्रकार बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. याचे काही उपप्रकारही आढळतात.
उदा.
१ ) मूळ लेखकाचे नाव डिलीट करायचे आणि त्यात किरकोळ फेरबदल करून लेख स्वत:च्या नावावर खपवायचा.
२) मूळ लेखकाचे नाव काढून टाकून लेख आपल्या भिंतीवर प्रकाशित करायचा. मूळ लेखकाचे नाव नसल्याने व लेख तुमच्या भिंतीवर प्रकाशित झाल्याने सामान्य वाचकांचा असाच समज होतो की लेख तुमचाच आहे. मग लोक तुमच्या कौतुकाच्या कमेंट करतात, त्यांना लाईक मारायचे. जर कुणी मूळ लेखकाचे नाव कमेंटमध्ये लिहिलेच तर त्या उडवायच्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे.
३) यदाकदाचित चोरी पकडली गेलीच, माझा लेख माझे नाव गाळून का प्रकाशित केला अशी मूळ लेखकाकडुन विचारणा झालीच तर मला हा लेख मला बिननावाचाच मिळाला होता अशी सारवासरव करून आपली लबाडी झाकायची. समजा तुम्हाला हा लेख बिननावाचा मिळाला होता तर तुम्ही तो लेख आपल्या भिंतीवर टाकताना "लेखक अज्ञात, किंवा लेखक माहित नाही" असे का लिहिले नाही?
कपिल सरोदे नावाचे एक वकील आहेत. त्यांनी माझा " डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि करोना" हा लेख स्वत:च्या भिंतीवर माझे नाव वगळून टाकला. हा लेख भीमजयंतीच्या निमित्ताने मी १४ एप्रिल २०२० रोजी लिहिलेला होता व तो महाराष्ट्र टाइम्स, सामना, बहुजन शासक या व इतर अनेक दैनिकांनी प्रकाशित केलेला होता. आंबेडकरी डॉट कॉम व इतर काही वेबसाईटवरही तो आलेला होता. शिवाय माझ्या तिन्ही फेबु खात्यांवर, पेजवर व ब्लॉगवर ही तो टाकलेला होता. ही दोनच महिन्यापुर्वीची ताजी घटना आहे. वकील असल्यामुळे सरोदे यांना असे करणे हा बौद्धिक सम्पदा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे माहित आहे.
माझ्या काही मित्रांनी ही गोष्ट माझ्या निदर्शनाला आणून दिली. मी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर दिलगिरी राहिली बाजूला त्यांनी माझ्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या. कपिल सरोदेंचा अजब खुलासा पुढीलप्रमाणे "किती मरता नावासाठी. मला नावच जर टाकायचे असते तर मि माझे नाव नसते का टाकले, तुमच्या सारखे नावसाठी मारणारे लोकच जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वतःच्या नावाने छापतात तेव्हा बरे वाटते का तूम्हाला, माझी प्रतेक पोस्ट चेक करा मि माझे नाव टाकल्याशिवय शेर करत नाही, आणि जी पोस्ट मि शेर केली जी तुमही तुमची आहे असे बोलता, त्यात 90 % विचार बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. मग तुम्हीं इतके विद्वान झाले का बाबसाहेबांचे विचार स्वतःच्या नावाने खपवायला?" ते पुढे असेही म्हणतात, " आपला काही तरि गैरसमज होतोय, पहिला विषय तर तो लेख मला जसा मिळाला तसा मि माझ्या वॉलवर टाकला आहे, त्यात तुमचे नाव नव्हते. मला तो लेख तुमच्या नावाविनाच मिळाला होता, यातील दूसरा विषय, म्हणजे तुमच वाङ्गमय वैगेरे हे तुमच्या ठिकाणी राहुदया मला तो लेख माझ्या नावाने टाकायचा असता तर मि त्यात माझे नाव स्पष्ठ शब्दात टाकले असते. मि तुमच्या सारखा नावसाठी हापापलेला नाही. आणि हो मा. नरके आपन त्या लेखात जे विचार लिहिले आहेत ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तुमच्याकडे मकतेदारी कुणी दिली?" त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, " अरे रे रे नरके तुमच्या बुद्धिची कीव येते राव! "
त्यांचा खुलासा अजिबात पटण्याजोगा यासाठी नाही की त्यांच्या कमेंटमध्ये त्यांना Sandip Khillare, योगेश वाघमारे, Kunal Gajghate, Sachin Kalambe, Atul Gawali, Mangesh Sasane, Kuldeep Ramteke अशा अनेकांनी लिहिले होते की हा लेख प्रा. हरी नरके यांचा आहे, तुम्ही मान्य करा आणि विषय संपवा, पण तरिही त्यांनी तशी दुरुस्ती केली नाही, की मान्य केले नाही. उलट त्यांनी तिकडे साफ दुर्लक्षच केले. त्यांना तेव्हाच आजचा खुलासा करता आला असता.
माझे नाव वगळुन टाकल्यामुळे लेख त्यांचा स्वत:चा असल्याचा भास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. हे कायद्यात बसते?
हा लेख चांगला आहे, कुणाचा आहे अशी काहींनी त्यांचाकडे कमेंटमध्ये विचारणा केली तेव्हाही ते गप्प बसले. अनेकांनी त्या लेखाबद्दल सरोदेंचे कौतुक केले त्यांना सरोदेंनी लाइकही केले.
शेवटी मीच त्यांना हा लेख माझा आहे असे लिहिल्यावर मात्र त्यांचे उत्तर आले. दिलगिरी सोडा उलट अरेरावी आणि मूळ लेखकावरच / माझ्यावरच त्यांनी दोषारोप केले. आताही एव्हढे सगळे खुलासे-प्रतिखुलासे झाल्यावर अजूनही त्यांनी लेखावर माझे नाव टाकलेलेच नाही.
असे बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्य करणार्या लोकांना खंतखेद तर वाटतच नाही, ते नैतिकतेवरची प्रवचने चालूच ठेवतात हे जास्त त्रासदायक आहे.
आपले काही मित्रही या कृत्याचा निषेध करण्याऎवजी दुर्लक्ष करा हो, असा आपल्यालाच सल्ला देतात हे तर जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे. काय दुर्लक्ष करा? समोर माणूस वाड्मयचौर्य करतोय आणि तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा असे सांगताय म्हणजे तुम्ही चोरीला मदत करताय, प्रोत्साहन देताय असे वाटत नाही तुम्हाला?
-प्रा. हरी नरके,
२१/६/२०२०
Ref: कपिल सरोदे - https://www.facebook.com/Kapil-Sarode-112733103738395/
No comments:
Post a Comment