ही पृथ्वी फक्त माणसासाठी बनलेली नाही. तिच्यावर सृष्टीतील लक्षावधी सजिवांचा माणसाइतकाच हक्क आहे. आजकाल माणूस स्वार्थीपणाने निसर्गाचा विध्वंस करतोय. त्याला अक्षरश: ओरबाडतोय. त्याविरूद्धची निसर्गाकडून प्रतिक्रियाही उमटतेय. माणसाच्या विकासाचा इतिहास म्हणजे माणूस आणि निसर्ग यांच्या संघर्षाचाच इतिहास आहे. मानवाने निसर्गावर विजय मिळवल्याची बरीच उदाहरणे असली तरी निसर्गानेही माणसाला धडा शिकवल्याची काही उदाहरणे आहेतच. निसर्गाबाबत शहरी, सुशिक्षित, बुद्धीजिवी बरेच जागृक असतात. मात्र तितकी जागृती सामाजिक पर्यावरणाबद्दल दिसत नाही. असा दुजाभाव का? कारण निसर्गाविषयीच्या बोलण्या, लिहिण्याला, लढण्याला जगभर प्रतिष्ठा आहे. प्रसिद्धी आहे. पुरस्कार आहेत. याउलट सामाजिक पर्यावरणविषयक बोलणे, लिहिणे, त्याची चर्चा करणे हे बुद्धीजिवींमध्ये तुच्छतेचे, हिनकसपणाचे आणि टिंगलटवाळीचे विषय आहेत. पुरोगामी भारताच्या काही बुद्धीजिवी वर्तुळांमध्ये एससी,एसटी, मायनॉरिटीविषयक बोलण्या लिहिण्याला ग्लॅमर आहे.
ओबीसी म्हणजे शूद्र. मराठा, कुणबी, माळी, तेली, आग्री, भंडारी, धनगर, वंजारी, कुंभार, सुतार, नाव्ही, साळी,.... अशा कष्टकर्यांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. त्यामुळे त्यांच्या जगण्या मरण्यालाही किंमत नाही. त्यांच्याबद्दल लिहिणे, बोलणे हे मिेडीयाच्या दृष्टीने डाऊन मार्केट. राजकारण्यांना ओबीसींची मतं हवी असतात, पण त्यांच्या समस्या, दुखणी, व्यथा, वेदना ह्याची वास्तापूस त्यांना नको असते. महाराष्ट्रातला कोणताही राजकीय पक्ष ओबीसींचे प्रश्न ऎरणीवर आणायला तयार नसतो. त्यांच्यासाठी ओबीसीसेल निर्माण करण्या इतपतच त्याला महत्व असते.
लोकशाहीमध्ये डोकी महत्वाची असूनही ओबीसींना मात्र किंमत शून्य, असं का?
जे स्वत: जन्मओबीसी असतात, त्यातल्या बर्याचजणांना आपण ओबीसी आहोत हे सांगायची लाज वाटत असते. गेल्या बर्याच वर्षातले ओबीसी पर्यावरणाबद्दलचे माझे निरिक्षण पु्ढीलप्रमाणे आहे -
खरं तर कारू नारू, बलुतेदार, अलुतेदार हा निर्माणकर्ता समाज आहे. त्यांच्या हातात कौशल्ये आहेत. सृजनशीलता आहे. व्यावसायिक ज्ञान आणि अनुभव आहे. निर्मितीची सगळी जादू ठासून भरलेला हा समाज देशावरचा बोजा नाही. ओबीसी चोर किंवा भिकारी नाहीत. ते देशाची अॅसेट आहेत. मग एव्हढा अभिमानास्पद वारसा असताना " ओबीसी ओळख" हा टवाळीचा विषय का? ओबीसी अस्मितेला हिन का मानलं जातं?
ओबीसीतले बुद्धीजिवी ओबीसींबद्दलच्या समाजमाध्यमांवरील अशा पोस्टना कधीही कमेंट, लाईक देत नाहीत. कारण आपण ओळखले जाऊ, त्यामुळे आपली बुद्धिजिवी वर्तुळातली प्रतिष्ठा कमी होईल अशी भिती त्यामागे असते.( यालाही अपवाद आहेत, असतात..)
उच्च अधिकारी, वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, संपादक असलेले बहुतांश ओबीसी खाजगीत आपण ओबीसी आहोत असं आम्हाला सांगतात. त्यांच्यावर अन्याय झाला की " मी ओबीसी असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला" अशी ओरडही ते करतात. एरवी मात्र त्यांना उघडपणे ओबीसीची ओळख सांगाविशी वाटत नाही. उलट ती दडवाविशीच वाटते. हा वर्ग अत्यंत कोत्या मनोवृत्तीचा, कोडगा आणि बेईमान आहे. कृतघ्न आहे.
गावकुसाबाहेरून आलेली आमची नवजागृत भावंडं ओबीसींबद्दल कायम तक्रारीच्या सुरात बोलत असतात. ओबीसी असे आहेत, नी तसे आहेत असा तुच्छतावादी सूर कायम बहुतांशांकडून येत असतो. ओबीसी जातीग्रस्त आहेत, रूढीवादी आहेत, तेच बर्याचदा दलित अत्त्याचारात पुढे असतात, मान्यच आहे. पण तरिही त्यांचे प्रबोधन न करता, त्यांना प्रतिगामी छावणीत ढकलून, त्यांच्यापासून फटकून राहून समाजपरिवर्तन कसं करणार आहात राजेहो?
सर्वसामान्य ओबीसी देव, धर्म, देश, ब्राह्मण, रूढी, परंपरा, संघ, मोदी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अ.भा.वि.प, समरसता मंच यांच्याबद्दल गर्व बाळगणारा असतो. त्यांच्यावर टिका करणारे, त्यांची चिकित्सा करणारे, त्यांना प्रश्न विचारणारे, बोलणारे, लिहिणारे आमच्यासारखे लोक ह्या ओबीसींना आपले शत्रू वाटतात. आमच्या अंगावर पहिलं कोण धावून कोण येतं? तर अभिजनांचे हे ओबीसी पोपट, वेठबिगार, गुलाम, वरच्यांनी ठेवलेले ओबीसी रंडवे, भडवे आणि दलालच. तरिही त्यांच्याकडे क्षमाशीलतेनं बघत शिक्षणाचं, प्रबोधनाचं, जागृतीचं काम चालूच ठेवावं लागतं.
एक गंमत म्हणजे ओबीसींना स्वत:ला काही व्यक्तीगत मदत हवी असली तर ते प्रथम आमच्याकडॆच धाव घेतात बरंका! ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली, ओबीसींच्या स्कॉलरशिप बंद झाल्या, ओबीसींच्या अॅडमिशन, क्रिमी लेयर, जात प्रमाणपत्रं, कास्ट व्हॅलिडिटी असा कुठलाही प्रश्न, मुद्दा आला की त्यांना पहिली आठवण आमची येते.
परवाच एका प्राध्यापकाचा मेल आला होता. " अर्जंट फोन नंबर पाठवा. तातडीचे बोलायचेय." मी कळवलं, " माझा फोन बहुधा बंद असतो. इमेलवरून कळवा." त्यांचा अर्जंट मुद्दा काय असावा? "अमूक तमूक मॅनेजमेंट महाविद्यालयात माझ्या मुलीला एमबीएला प्रवेश हवाय. त्यांच्याकडे ओबीसी महिला आरक्षण का नाही? तुम्ही चौकशी करुन मला ताबडतोब कळवा." जणू हरी नरके हा त्यांचा खाजगी नोकरच आहे. मी त्यांना कळवलं, " तुम्ही प्राध्यापक आहात ना? मग तुम्ही का चौकशी करीत नाही? मी तुम्हाला याबाबत काहीही मदत करू शकणार नाही. तुमचे हातपाय तुम्हीच हलवा."
मागे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाला, तर एक ओबीसी संपादक माझ्या मित्राला म्हणाले, " हरी नरके काय करताहेत?" हे बरं आहे, शिव्या तुम्हीच खा. मार तुम्हीच खा. अडीअडचणीला रात्रंदिन धावूनही जा, आणि तरिही तुम्ही विचारणार तुम्ही ओबीसींसाठी काय केलं? काय कर्ताय?
कुठेयत ओबीसींचे नेते? ओबीसी बॅकलॉग, ओबीसी जनगणना, बजेट, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, प्रमोशन व उच्च शिक्षणात आरक्षण, सर्व स्थरांवर संरक्षण, कडक अंमलबजावणी या ओबीसींच्या प्रश्नावर देशभर रान पेटवलं म्हणून छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडॆंना किती मोठी किंमत मोजावी लागली! त्यांच्या थिंक टॅंकला किती छळ सोसावा लागला!
बहितांश ओबीसी समाजाने प्रत्येक समस्येची पिशवी अडकवण्याची हक्काची खुंटी म्हणजे हरी नरके, अॅड. बी.एल.सगर किल्लारीकर, मृणाल ढोलेपाटील, संजय सोनवणी, मंगेश ससाणे, श्रावण देवरे, कमलाकर दरवडे, चंद्रकांत बावकर, प्रदीप ढोबळे, प्रकाश खेडकर, राम वाडीभष्मे,..... असं ठरवूनच टाकलंय. म्हणजे ते स्वत: काहीही करणार नाहीत, लढणारही नाहीत, खाजगीतही मदत करणार नाहीत, उलट जमेल तसं मदत करणारालाच फैलावर घेतील, शिव्याही घालतील आणि तरीही तुम्ही लढलं पाहिजे. हा धंदा खोटा. दमवणारा. थॅंकलेस. मनस्ताप देणारा.
मी तर राजकारणीही नाही. मला तुमची मतं नकोत. ओबीसी प्रश्न हा माझ्या करियरचा विषय नाही. केलं तेव्हढं भरपूर झालं. यापुढे तळमळीने नव्या पिढीतलं कुणी काही करील तर त्यांना मार्गदर्शन नक्की करू. मात्र रात्रंदिन ओबीसींसाठी सगळी शक्ती पणाला लावणं हा उद्योग म्हणजे टांगा पलटी घोडे फरार असला धंदा आहे.
मी व्यक्तीश: आयुष्यात कधीही कसलंही आरक्षण घेतलेलं नाही. घेणारही नाही. मात्र १९८० पासून मी गेली ४० वर्षे आरक्षण समर्थनार्थ लढलोय. लढतोय. आता हाच खेळ पुढे चालूसाठी एनर्जी आणायची कुठून?
ग्रामपंचायतीपासून न.पा. मनपा, न.प. तालुका पंचायत, जिल्हा परिषद या पातळीवरच्या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेले एकट्या महाराष्ट्रात सुमारे ६ लाख लोक आहेत. यातले किती लढायला पुढे येतात? ( यालाही अपवाद आहेत, असतात..) हे लाभार्थीच जर शेपूट घालून बसणार असतील तर लढायचं कुणासाठी आणि का?
अज्ञानमग्न ओबीसींसाठी लढणं म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्यांसाठी ढोल वाजवित राहणं, यश येईल का? आलं तर कधी? काहीच माहित नाही. त्यासाठी आपल्या हाताने बुद्धीजिवी वर्तुळातून बहिष्कृत व्हा, शिव्या खा, मनस्ताप सोसा. एव्हढंही करून ओबीसी पर्यावरणाला पुरोगामी बुद्धिजिवींच्या चर्चाविश्वात स्थान, सन्मान मिळेल का? बहुधा नाहीच. तरिही लढलं तर पाहिजेच.
का?
( अ ) फुले- शाहू - आंबेडकरांच्या उपकारातून अंशत:तरी मुक्त होण्यासाठी,
( ब ) अगदीच बुडती हे जन देखवेना डोळा.. असं नव्हे पण, नाही बघवत, नाही स्वस्थ बसवत म्हणून, ऎशी कळवळ्याची जाती... हा स्वभाव आहे म्हणून,
( क ) जो वारसा आधीच्यांनी आमच्या हातात दिला त्यची जनुकं पुढच्यांच्या हाती सोपवण्यासाठी,
( ड ) पुढच्या पिढ्यांना थोडे तरी बरे दिवस यावेत म्हणून,
लढल्याशिवाय कोणालाही हक्क मिळालेले नाहीत म्हणून.
चला आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढाई बुलंद करू यात. तुम्ही मात्र वाचा आणि विसरून जा...
-प्रा. हरी नरके, ५/६/२०२०
No comments:
Post a Comment