लागोपाठच्या जातीअत्त्याचारांनी, हत्त्यांनी जातीचा विषय पुन्हा एकदा ऎरणीवर आलाय. चर्चाविषय बनलाय. जातीव्यवस्था ही एक मानसिकता आहे आणि भौतिक व्यवस्थासुद्धा. ती माणसांच्या तनामनात खोलवर रूजलेली आहे. अगदी अबोध मनावरही तिचीच सत्ता आहे. बलदंड ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य पुरूष हे तिचे लाभार्थी आहेत. सर्व स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र हे तिचे बळी आहेत. हे लाभार्थी शतकानुशतके जातीचे हितसंबंध जपण्यासाठी राबत असतात. जातीचा प्रचार, पगडा, दरारा कायम ठेवण्यासाठी ते सदैव झटत असतात. वर्षभर झोपा काढून एका दिवसापुरते नाचत नसतात.जातपिडीत एकमेकांबद्द्ल संशय घेत, परस्परांना शिव्या घालीत अधिक एकटे पडत जातात. तिकडे तथाकथित उच्चजातीय-उच्चवर्णिय संघटित असतात. त्यांच्यात पोलादी ऎक्य असते. ते जागृत आणि प्रबळ असतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, प्रचाराची यंत्रणा आहे. त्यांच्याकडे बळकट साधनसंपत्ती आहे. सरकार, (शासन व्यवस्था) मिडीया, अर्थसत्ता, धर्मसत्ता आणि न्यायव्यवस्थासुद्धा त्यांच्याच ताब्यात असल्याने त्यांच्या शब्दांना सामाजिक प्रतिष्ठा असते. तथाकथित खालच्या जातींचे लोकसुद्धा आपापल्या वा अधिक खालच्या जातीच्या विचारवंतांचे फारसे मनावर घेत नाहीत. त्यांना " वरचे" काय म्हणतात हे महत्वाचे वाटते. वरच्यांची मान्यता मिळावी, वरच्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी यासाठी आटापिटा करीत असतात.
या तथाकथित वरच्यांच्या शब्दाला अधिक विश्वासार्हता असते, तिच्यासाठी खालचेही जीव टाकीत असतात. पाटलाचं घोडं आणि **** भूषण! ही म्हणच आहे. यामुळे जातबळींना न्याय मिळणे दुरापास्त ठरते. गरिब माणसं सहज विकली जातात. बळाच्या जोरावर फोडता येतात. कुर्हाडीचे दांडे गोतास काळ ठरतात. भारतात २६ जाने. १९५० ला संविधान आलं पण संविधानाची मानसिकता आली नाही.
मानसिकता आजही जातीची, सरंजामी, सामंती, भांडवली आणि धार्मिक उन्मादाचीच आहे. शहरीकरण, महानगरीकरण, शिक्षण, आरक्षण आणि औद्योगिकरण यामुळे सुबत्ता आली. उंच इमारती वाढल्या. मोबाईल्स, इंटरनेट आले. शेकडो चॅनेल्स आले. मनोरंजन आणि चंगळवाद यांचा पगडा वाढला. त्या गतीनं प्रबोधनाचा वारसा या नवशहरी वर्गात, नवमध्यमवर्गात, नवशहरी भागात विस्तारला नाही. उलट देवदेव वाढला. रूढी, परंपरा, नारायण नागबळी, जातीचा माज वाढत गेला.
"बघतोस काय रागानं, **** आणलंय वाघानं," ही जुन्या सरंजामी पीळाला अधिक सुदृढता देणारी व्यवस्था जोडीला आली. जमिनीला सोन्याचे भाव आले. गुंठेवारीचा पैसा आला. सुयोग्य गुंतवणीचे शिक्षणच नसल्याने तो लग्न, देवकार्यावर, चैनीवर उधळला जाऊ लागला. श्रीमंती आली म्हणजे सुजाणता येतेच असे नाही. अडाणीपणा जातोच असेही नाही. तोही भुमितीश्रेणीत वाढतो. ही सगळी जातअहंकाराची जळमटं आणि सरंजामीवृत्ती सहजासहजी जाणार नाही. ती घालवण्यासाठी प्रबोधन करावेच लागेल. जातीनिर्मुलनाचा अजेंडा राबवावा लागेल. पर्यायी संस्कृती विकसित करावी लागेल. तसे फारसे न करता " जातीयता ही एक अंधश्रद्धा आहे," " जातीचा अभिमान असलाच पाहिजे," "दुसर्या जातीचा द्वेश करू नका, पण आपल्या जातीचा गर्व बाळगा", "एक *** लाख ***" असली सुभाषितं तोंडावर फेकली जातात.
भलेभले सुशिक्षित, उच्चपदस्थ ही सुभाषिते, हे नॅरेटिव्ह वापरतात. कळत नकळत रूजवतात. त्याच्या जोडीला "जी जात नाही ती जात" ही शिवाजीराव भोसलेटाईप वाक्ये लोकप्रिय केली जातात. रा.स्व.संघ व सावरकरवादी हे अस्पृश्यता, जातीभेद नको म्हणतात. मात्र ते जातीनिर्मुलनाचे आंदोलन चालवित नाहीत. त्यांचा जातीभेदाला तेव्हढा विरोध आहे. जातींना नाही. जाती राहाव्यात फक्त भेद तेव्हढे जावेत ही भुमिका वरवर बघता, प्रथमदर्शनी बरोबरही वाटते.
मात्र संघ-सावरकर व फुले - आंबेडकर यांच्या भुमिकांमध्ये मुलभूत फरक आहे. एक भूतदयेवर, वरच्यांच्या मेहरबानीवर जगायला सांगते तर दुसरी सर्वांना समान मानवी अधिकार हवेत, असे सांगते. फुले -आंबेडकर म्हणतात, जातीच नकोत, जातीनिर्मुलन झाले पाहिजे असे ते सांगतात. कारण जातीयता ही पायर्यापायर्यांची, श्रेणीबद्ध विषमतेची व्यवस्था आहे. ती राहू द्या असे म्हणणे म्हणजे जातीय हितसंबंध, अहंकार, श्रेणी कायम ठेवा असेच म्हणणे होय. जात राहणार तर जातीय द्वेश, विखार, पायरीने राहा ही वृत्ती राहणारच. सर्व जाती एका पातळीवर नाहीत. त्या एकाखाली एक किंवा एकावर एक अशा उभ्या आहेत.
जाती राहणार असतील तर अन्याय, पक्षपात, भेदभाव राहणारच. तेव्हा जातच गेली पाहिजे. स्वत:च्या जातीचा गर्व, अभिमान बाळगणे म्हणजेच दुसर्या जातींचा द्वेश करणे होय. तथाकथित वरच्या जातींना मागासांची प्रगती का बघवत नाही, माजलेत असे का वाटते, कारण त्यांनी आपल्या पायरीने राहावे, गुलाम राहावे, स्वाभिमानाने जगू नये असे वाटते म्हणून. मित्रहो, आपला अजेंडा जातीभेद निर्मुलनाचा नसून जातीनिर्मुलनाचा आहे. हा फरक नीट लक्षात घ्या. समरसतावाद्यांना ह्यातला फरक कळणार नाही. कळला तरी वळणार नाही. कारण ते जातीव्यवस्थेचे लाभार्थी आहेत. आपण पिडीत आहोत. आपण त्यांचे गुलाम राहण्यात त्यांचा फायदा असला तरी आपला त्यात काय लाभ आहे? काहीच नाही. जातीव्यवस्था मान्य करणे म्हणजेच उच्चनिचता, श्रेष्ठकनिष्ठता, मालक-गुलाम ही मानसिकता स्विकारणे होय हे नीट समजून घ्या.
जातीव्यवस्था माणसाने निर्माण केलीय. जी गोष्ट अनित्य आहे, ती जातेय. ती जाणार. जातीव्यवस्था आज खिळीखिळी होत आलीय. प्रतिगामी शक्तींनी तिला बळकट करण्यासाठी बुस्टर दिलाय खरा. पण तरीही ती जाणारेय.मात्र ती आपोआप जाणार नाही. त्यासाठी तुम्हालामला एकजुटीने काम करावे लागणार आहे. जगातील ८०० कोटी लोकांपैकी अवघ्या १५० कोटींमध्ये जातीव्यवस्था आहे. उरलेल्या ६५० कोटींमध्ये वर्णभेद, वंशभेद, भाषाभेद, राष्ट्रभेद असतीलही पण हे आणि जातीव्यवस्था या वेगळया बाबी आहेत. त्यांच्यात गल्लत करू नका. परत सांगतो, जात ही व्यवस्था आहे. मानसिकता आहे. भौतिक आधारावर ती पोसली गेलीय. तिला अर्थसत्ता, धर्मसत्ता, कुटुंबसत्ता, शिक्षणसत्ता यांचा आधार असल्याने ती अधिक किचकट, गुंतागुंतीची, चिवट, सबळ आणि भयंकर आहे. पाताळयंत्री आहे.
"आरक्षणामुळे जातीयता वाढली," "शाळेच्या दाखल्यावरून जात काढली की जात आपोआप जाईल," "मनुस्मृती कुणी वाचलीय? कशाला मनूला बिचार्याला दोष देता?" " समान नागरी कायदा आणा, " असले युक्तीवाद भलेभले करीत असतात. हे युक्तीवाद पोरकट, विक्षिप्त, अगदी बालीश, भ्रामक, भंपक आणि मुर्खपणाचे आहेत. जातीयतेने शूद्र-अतिशूद्रांवर अन्याय केला त्याची भरपाई म्हणून आरक्षण आलेय. जात समाजात शेकडो वर्षे होती म्हणूनच आरक्षण द्यावे लागलेय.
आरक्षणाने जातीयता आलेली नाही. समाजात जातीची मानसिकता होतीच, आजही आहे, म्हणून जात शाळेच्या दाखल्यावर आलीय. दाखल्यावर आल्यामुळे समाजाला ती कळलेली नाही. ती आधीच होती. नोंदवली नाही की ती जाईल असे म्हणणे म्हणजे कोरोना टेस्ट करू नका, उपचारही करू नका, कोरोना नाहीच असे म्हणा, थाळ्या, टाळ्या वाजगा, गो कोरोना गो म्हणा, की गेला कोरोना, असली अडाणचोट वृत्ती आहे ही.
मनुस्मृती वाचलीय की नाही हा मुद्दाच नाहीये. भारतात वाचनसंस्कृती फारशी नव्हती. नाही. कथनसंस्कृती, वाणीसंस्कृती होती. आहे. म्हणून तर आजही साहित्य यापेक्षा वाड्मय हा शब्द अधिक प्रचलित आहे. वाणीद्वारे जे सांगितले गेले ते वाड्मय. ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा ह्या सांगितल्या गेल्या. त्या कुणीतरी लिहून घेतल्या. आजही लाखो बुवा, बापू, महाराज, ह.भ.प., साधू, संन्याशी, गोसावी, गुरू, किर्तन, प्रवचन, सत्संग याद्वारे लक्षावधींच्या जमावांना मनुमहात्म्य सांगत असतात. आंबाभुर्जीवाले बहुजन तरूणांना सांगत असतात, " मनु हा संताच्या चार पावले पुढे होता. " तेव्हा वाचायची काय गरज आहे. हे कथन इथे रुजलेले आहे. रुतलेले आहे. मनामनावर कोरलेले आहे.
दुसरा एक मुद्दा, मनुस्मृती हा धार्मिक आणि कायद्याचा ग्रंथ होता. कायद्याचे मुख्य तत्व हे आहे की, कायदा सर्वांना माहितच असतो हे गृहित धरावे लागते. नाहीतर प्रत्येक आरोपी असा बचाव करील की मला हा कायदा माहितच नव्हता, म्हणुन मला शिक्षा करू नका. हे चालत नाही. वेद, गीता, उपनिषदे, पुराणे, महाभारत, रामायण, कुणी वाचलेय? पण म्हणून त्यांचे महात्म्य भारतीयांना माहित नाही काय? तेव्हा मनुस्मृती न वाचल्याचा ब्राह्मणी युक्तीवाद भाकड आहे. भुक्कडपणाचा आहे. ह्या पुराणकथा इथल्या प्रत्येकाच्या हाडीमाशी भिनलेल्या आहेत. मठ, मंदिर, धर्माचार्य त्यांना जोपासत आहेत.
जातीव्यवस्था निर्मुलनाची जादूची कांडी कुणालाही सापडलेली नाही. अगदी फुले-शाहू-आगरकर-आंबेडकरांनासुद्धा नाही. जातीनिर्मुलनाला शॉंर्टकट नाही. जाती घालवण्याची पंचसुत्री फुले-शाहू-आंबेडकरांनी जरूर दिलेली आहे. मुळात भारतात शोषण, पक्षपात, भेदभावाची ३ केंद्रे आहेत. (१) जात, (२) आर्थिक वर्ग, (३)लिंगभाव, स्त्री-पुरूष विषमता.
या तिन्हींवर एकत्रित मारा करण्यासाठीच हे पंचशील आहे. ही विषयपत्रिका अतिशय प्रभावी आहे. (१) सर्वांना शिक्षण, ज्ञाननिर्मिती, कौशल्यांचे संवर्धन (२) स्त्री-पुरूष समता, (३) आंतरजातीय विवाह, (४) संसाधनांचे फेरवाटप, (५) वादविवाद, विचारकलह, संवाद, टिकाटिप्पणी, धर्म चिकित्सा, सामाजिक प्रबोधन याच रस्त्याने आपल्याला जावे लागेल. जातीनिर्मुलनाला दुसरा रस्ता नाही.
त्यावर फोकस करायला हवा. झोकून देऊन काम करायला हवे. ही मानसिकता घालवण्याचे अभियान संघटन, प्रशिक्षण, डावपेच (स्ट्रॅटेजी) आणि परिवर्तनवादी तत्वज्ञान यांच्याद्वारेच उभे करता येईल. प्रतिक्रियावाद, अत्त्याचारविरोध, आरक्षण आणि अनुदानात अडकलेली आपली सामाजिक चळवळ आज गोल्गोल फिरतेय. आपण एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसलो आहोत. बहुजनातील मानसिक दुरावा दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नाही? की फक्त स्पर्धाभावना, एकमेकांबद्दलचा संशय, आकस, परस्परद्वेश आणि सर्वज्ञभावना, मीच एकमेव क्रांतिकारक असल्याचा दावा याने समग्र परिवर्तन साधणार आहे?
कोणीही शेंबडं पोरगं उठतं आणि सुरू होतं, " आता आ. ह. साळुंखे का बोलत नाहीत? आता अमुकने का लिहिले नाही? तमुकने लिहिले तर एव्हढेच का लिहिले? ह्याला एव्हढ्या उशीरा का जाग आली? आम्ही यांना मोठे केले, आमच्या मदतीला कोणीच येत नाही? आम्ही समर्थ आहोत, आम्हाला कोणाचीच गरज नाही. कोणावर अन्याय झाल्यावर आम्हीच लढायला जातो, आता इतरांवर अन्याय झाल्यावर आम्ही का म्हणून जावे? हरी नरके, आम्हाला आंबेडकर सांगू नका, तो आमच्या रक्तात आहे, तुम्ही तिकडे बहुजन समाजात जाऊन प्रबोधन करा, आम्हाला अक्कल शिकवू नका, आम्ही प्रबुद्धच आहोत," हा सगळा युक्तीवाद पोकळ आहे. बोलबच्चन, बाष्कळ आणि तकलादू आहे. अरे बाबांनो, सगळं आयुष्य ज्यांनी चळवळीला वाहिलं त्यांना प्रश्न करण्यापुर्वी जरा स्वत:च्या लायकीचाही विचार करा. कोण आपण, काय आपली कुवत? साळुंखेसरांची जेव्हढी पुस्तकं आहेत ना तेव्हढं तर तुझं वयही नाही. तुझा अभ्यास किती? तू बोलतोस किती?
" तुम्ही माळ्यांना, मराठ्यांना, ब्राह्मणांना त्यांच्या वस्तीत जाऊन का सांगत नाही? आम्हाला बाबासाहेब माहितच आहेत, ते तुम्ही सांगायची गरजच नाही, आम्हालाच कशाला परत सांगताय?" हा प्रश्न, हा दावाही, जातीय दर्प आणि अर्धवट शिक्षणाच्या अहंकारातून आलेला आहे. एव्हढा अहंकार बरा नाही. जन्माच्या अपघाताने जे आंबेडकरवादी आहेत त्यांच्यापेक्षा बाय चॉईस ज्यांनी बुद्ध-आंबेडकर स्विकारलेत ते साळुंखेसर फार मोठे आहेत. त्यांच्याबद्दल शंका घेता आणि हा माझा समाजबांधव, तो माझा रक्तबांधव असली भाषा जी फुले-आंबेडकरवादाला काळीमा फासणरी जातीय किड आहे तिला जोपासता?
प्रबोधनाची गरज सगळ्यांनाच आहे. आपल्या सर्वांनाच एकमेकांची गरज आहे. आपण सगळ्यांनीच गोळ्यामेळ्यांनी राहायला हवेय. आम्ही सगळ्यांनाच शिवराय, फुले, शाहू, आगरकर, आंबेडकर, साने, शिंदे, गांधी सांगतो आहोत. सांगत राहणार आहोत. प्रस्थापित व्यवस्था अतिशय धुर्त, लबाड, दुटप्पी, नीच आणि चलाख आहे. तिच्याशी लढायचे काम एकट्यादुकट्याचे नाहीच. आपल्यात फूट पडावी, आपण एकमेकांचे गळे पकडावेत हेच तर त्यांना हवेय. परजातींबद्दल संशयी वृत्ती हीच तर जातीयता आहे. आम्ही जर रक्ताचे नाते मानत असू तर तो बुद्ध-बाबासाहेबांचा पराभव आहे. शुद्ध रक्ताचा दावा हा प्रचंड मोठा फ्रॉड आहे. जातीचे रक्त ही संकल्पनाच भंकस आहे. रक्ताला जात नसते. रक्ताला गट असतो. ए, बी, ओ, एबी, +, - असा.
बाबासाहेब म्हणाले, "मला जातीचे नको, विचारांचे बहुमत हवेय." ज्ञानसूर्य बाबासाहेबसुद्धा असे कधी म्हणाले नाहीत, की मला कोणाचीच गरज नाही. माझा मी समर्थ आहे. त्यांनीसुद्धा, बुद्ध, कबीर, फुले यांना गुरू मानले. त्यांनी जातीतला गुरू नाही केला. करता आला असता. त्यांनी "महार महासंघ किंवा सेवा संघ" नाही काढला. "महारनायक" नाही चालवला. बहिष्कृत भारत, हितकारीणी सभा, मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत, स्वतंत्र मजूर पक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन पार्टी, सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद कॅंपस यातनं काही संदेश घ्यायचा की नाही? तुम्हाला केवळ जातीचं काम करायचं असेल तर जरूर करा. पण मग बुद्ध, बाबासाहेबांची नावं घेऊ नका. फुल्यांनीही "माळी समाज महासंघ" नाही चालवला. ओठात फुले-आंबेडकर आणि पोटात जातीयता, जातसंघ, जातीचं रक्त हे शोभत नाही.
मी गेली ४० वर्षे शिवराय,फुले-शाहू, शिंदे, आगरकर, गांधी, साने, आंबेडकर अत्र, तत्र, सर्वत्र मांडतोय. माफ करा स्वत:ला ज्ञानी समजणार्या थोर्थोर विद्वानांनाही ५, १० टक्क्यांच्या पलिकडचे फुले, शाहू, बाबासाहेब माहित नाहीत. जे माहिती आहेत तेही वरवरचे आणि तकलादू स्वरूपात. पोपटपंची करण्यापुरते. जातीच्या टोळ्याटोळ्यांनी रहायचे तर जरूर राहा. पण हाच तर मनुवाद आहे, हीच तर जातगुलामी आहे.
" जातीसाठी खावी माती" हा फुले-आंबेडकरवाद नाही. " जी जात नाही ती जात" हा विचार परिवर्तनवादी विचार नाही. तो प्रस्थापितांचे हात बळकट करणारा विचार आहे. असा विचार करा आणि मरा. अशामुळे मनुवादी हिंदुत्ववादाला, जातीव्यवस्थेला अजून बळकटी मिळेल हे लक्षात ठेवा. सत्तेसाठी धार्मिक व जातीय तेढ वाढवण्यासाठी संघपरिवार कोणत्याही थराला जायला तयार आहे. बहुजनात वाढणारी तेढ, आपसातला संशयवाद हाच हिंदुत्ववादी शक्तींना बळ देत असतो. त्यांना विविधता, समावेशकता नकोय. त्यांना सगळीच कळसुत्री बाहुली हवीयत. आदेशावर चालणारी. ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करणारी. तिच्याशी आयुष्यभर लढणारे फार कमी आहेत. त्या मोजक्यांना गमावू नका. मन मोठं करा. चार बुकं वाचली म्हणजे अक्कल आली हा अहंकार सोडा.
इथली कुठलीही एक जात "एकसंघ" नाही. तेव्हा सब घोडे बारा टक्के करू नका. अत्याचार करणारा भले माळी, मराठा, वंजारी, आग्री, भंडारी, ब्राह्मण, राजपूत, ठाकूर, बनिया, कुणबी कुणीही असेल पण म्हणून बुद्ध, फुले, शाहू, सयाजीराव, विठ्ठल रामजी, साने गुरूजी यांनाही त्यांच्या गोटात ढकलणार आहात काय? गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र अख्ख्या समाजाला टार्गेट करू नका. जातीपातीचा विखार कोण वाढवतंय? भटके, विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, अल्पसंख्याक समाजाविरूद्ध सवर्णांना कोण पेटवतंय? कोण द्वेशाग्नी भडकवतंय? हा हिंसावादी मेंदू कोण पोसतंय? जरा शोध तर घ्याल.
जागतिकीकरणामुळे प्रत्येक जातीत नवे वर्ग तयार झालेले आहेत. हे वर्गीय हितसंबंधाचे ताणेबाणे, राजकीय सत्तेचे आकर्षण आणि अप्पलपोटेपणा यातली गुंतागुंत विसरून सुलभीकरण करणारी मांडणी करण्याच्या नादात आजवरची सामाजिक पुण्याई मातीत घालवू नका. आम्हीच बोलावतो, आम्हीच मानधन देऊन पोसतो, मोठे करतो, ह्या गमजा सोडा. असं उगीच कुणीही कुणालाही बोलवित नसतं. आम्हाला बोलवा असा कुणी अर्ज केला होता का? नका बोलवू ना मग. हिनवणं सोडा. बोलावण्याची भिक नको पण उपकाराचे कुत्रे आवरा.
लक्षात ठेवा, वक्त्यांचा व्यासंग, परिणामकारकता, उपयुक्ततता, त्याग आणि कळवळा यांनाही काही मार्क द्यावे लागतात. वक्त्याचा ब्रॅंड एका दिवसात तयार होत नसतो. त्यासाठीची साधना अणि पायपीट यांना कवडीमोल ठरवू नका. प्रा. रावसाहेब कसबे, उत्तमराव कांबळे, प्रा. भालचंद्र मुणगेकर यांना सगळेच समाज बोलावतात, ते का? शोध घ्या. याच्या उलट काहींना आपला म्हणवणारा समाजही वार्याला उभं का करीत नाही? शोधा म्हणजे सापडेल.....हा लेख व इतर ८००+ पोस्ट तुम्ही माझ्या ब्लॉग/ फेसबुक पेजवर पाहू शकता. संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.....https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR38LDRzVM_XdR2JvWeIhR7r1RUWHpp5dZAnCISJaRzDVpLLBM8pw-NIfKQ
क्रमश:
- प्रा. हरी नरके, ११/६/२०२०
No comments:
Post a Comment