कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या नावाखाली मोदी सरकारने ज्या प्रकारचे जातीय अत्त्याचार केलेत त्याला जगात तोड सापडणार नाही. लॉकडाऊनच्या नावाखाली गरिब, दलित कष्टकर्यांची ज्याप्रकारे नाकाबंदी करण्यात आली, त्यातून त्यांच्या जगण्याच्या हक्कावरच आघात करण्यात आला. या अभावग्रस्त, वंचित, उपेक्षित समुहांची राजरोसपणे जणू कत्तलच करण्यात आली. हा अत्त्याचार का?
कोणतीही पुर्वतयारी न करता अवघ्या चार तासात करण्यात आलेले लॉकडाऊन हे जातीय अत्त्याचाराचेच एक उदाहरण म्हणायला हवे. का करावा लागला लॉकडाऊन? कारण जे उच्चवर्णिय हवाई श्रीमंत मोदीकृपेने परदेशातून भारतात आले त्यांचे जर वेळीच आयसोलेशन केले असते, सगळे विमानतळ वेळीच सील केले असते तर १३५ कोटी भारतीयांची ही ससेहोलपट टाळता आली असती. गरिबांचे मृत्य़ू रोखता आले असते.
लॉकडाऊनद्वारे स्थानबद्धता लादल्यामुळे जे गरिब उपासमारीने मेले, रेल्वे प्रवासात मेले त्यांच्या सदोष मनुष्य हत्त्येला मोदी सरकारच जबाबदार आहे. एव्हढेच नाही तर जे भारतीय नागरिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले त्यांच्याही मृत्यूचे पाप केंद्र सरकारचेच आहे.
आजही भारताच्या धोरणनिर्मितीवर, माध्यमांवर, न्यायव्यवस्थेवर आणि बौद्धिक जगतावर उच्चवर्णियांचेच वर्चस्व आहे. त्यांनी " प्रवासी मजूर," "सोशल डिस्टंसिंग" असले शब्दप्रयोग वापरून जातीय मानसिकतेचाच प्रभाव दाखवलेला आहे.
देशाची शेती, कारखाने, छोटेमोठे उद्योगधंदे, बांधकामं इथं राबणारे कोण आहेत? कोण आहेत मोलकरणी आणि घरगडी? कोण करतं शहरांची सफाई? कोण सांभाळतं श्रीमंतांच्या पोराबाळांना? कोण आहेत चतुर्थश्रेणी कर्मचारी? यातले बहुतेक सगळे हे सर्वधर्मीय दलित, आदीवासी किंवा ओबीसीच आहेत. यातले २० जण रेल्वेखाली चिरडून मेले औरंगाबदजवळ. ८० जण रेल्वेप्रवासात खपले. त्याच्याबद्दल उच्चवर्णियांच्या केंद्र सरकारला ना खंत ना खेद. खरंतर यासाठी जबाबदार असलेल्यांनी राजीनामे द्यायला हवे होते.
आधीच जागतिकीकरणाच्या नावाखाली या गरिबांचे शिक्षण, आरोग्य, निवारा, रोजगार हिरावले गेलेच होते, बचेकुचे कोरोनातील सरकारी धोरणामुळे सम्पले. भारतातले १०% लोक अधिक श्रीमंत व्हावेत म्हणुन उर्वरित ९०% लोक राबराब राबतात. देशाच्या १% अतिश्रीमंत लोकांकडे ७० टक्के संपत्ती आहे.
भाजपा हा उच्चवर्णियांचा पक्ष आहे. अटलबिहारींचे शायनिंग इंडीया डुबले. मग मोदींना पुढे करण्यात आले. त्यांना लोकांनी दोनवेळा निवडून दिल्याचे दिसते खरे. पण मोदींना पक्षासाठी मुबलक पैसा कोण पुरवते? बडे उद्योगपतीच ना? मोदी त्यांचे मित्र आणि ते मोदींचे! राष्ट्रवादाच्या पोकळ गप्पा मारणार्या मोदींनी गरिबांच्या कल्याणकारी योजनांची नरडी पिळलेली आहेत.
रेल्वे स्टेशनवर मृत पावलेल्या आईच्या प्रेतावरील कापडाशी खेळत असलेले निरागस लहान मूल याचे भीषण छायाचित्र ही खरी कमाई आहे मोदी सरकारची!
लॉकडाऊनद्वारे मोदी सरकारने तमाम कष्टकरी, कामगार, गरिब, दलित, आदीवासी, ओबीसी, महिला आणि अल्पसंख्यांकांना रासरोसपणे मृत्यूच्या सापळ्यात ढकलले. कामगार चळवळीने १५० वर्षे लढून जे हक्क, कायदे आणि संरक्षण मिळवले ते सारे कोरोना साथीच्या संकटाचे निमित्त करून मोदी सरकार काढून घेत आहे. कामाचे तास कमी व्हावेत, ते ८ तास व्हावेत ह्यासाठी श्रमिक १०० वर्षे लढले.
त्या ८ चे १२ तास मात्र एका रात्रीत झाले. कुठे आहे ती जगातली सर्वात मोठी लोकशाही? कुठे आहे ते वेलफेयर स्टॆट? हे सरकार गरिबांच्या मुळावर का उठलेय? कोरोना ही सरकारला सुवर्णसंधीच मिळाली म्हणायचे गरिबांच्या कत्तली करण्यासाठी!
( चित्रांगदा चौधरी व अनिकेत आगा यांनी एनडीटिव्ही.कॉम वर लिहिलेल्या लेखाच्या आशयाचा स्वैर आणि सारांशरूप मराठी अनुवाद- प्रा.हरी नरके )
प्रा.हरी नरके, २/६/२०२०
No comments:
Post a Comment