Tuesday, June 23, 2020

"बाबासाहेब आणि चीन" या लेखावरची एका चीनप्रेमीची पोटदुखी आणि जळफळाट - प्रा. हरी नरके


१. हरी नरके यांच्या "बाबासाहेब आणि चीन" या लेखाला एव्हढी भरमसाठ प्रसिद्धी कशाला? सध्या त्याचीच सगळीकडे धूम आहे. मोबाइलवर ओव्हरसबस्क्राईड.

२. लेख वाचण्यापुर्वीच मला तो लेख खोटा असणार अशी शंका होती. एका मित्राने मला विचारले, " हे खरे आहे काय?" मी तेव्हाच म्हणालो, "वाटत नाही."

कारण ५४ ला चीन केवळ पाच वर्षाचा होता. १९४९ ला चीनला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्यावर कशाला बाबासाहेब बोलतील? हरी नरके खोटे लिहित असणार.

३. हरी नरकेंनी ज्याच्या आधारे लिहिलेय तो "बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचा खंड १५ वा" मी वाचलेला नाही.

४. पण मी एका लेखकाचे दुसरे पुस्तक वाचलेय.

५. त्यानुसार बाबासाहेबांनी त्या भाषणात रशियाचा उल्लेख जास्त वेळा केलाय. चीनचा कमी वेळा केलाय. मग हरी नरके रशियावर का लिहित नाहीत?

६. बाबासाहेब चीन, माओ, कम्युनिझमवर बोललेत. पण कमी बोललेत.

७. परिस्थितीजन्य हंगाम येतात, जातात, प्रसिद्धि येते, अन जातेही.

८. हरी नरकेंना एव्हढी जास्त प्रसिद्धी मिळतेच कशी? काहीतरी लबाडी असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? आम्ही इतके दिवस लिहितोय, आमचे लेखन का गाजत नाही? आम्हाला प्रसिद्धी का मिळत नाही? हरी नरकेचे का गाजते? कारण वाचक मुर्ख आहेत आणि हरी नरके खोटे लिहितात म्हणून ते गाजते. जे गाजते ते खोटेच असते.

९. हरी नरकेचा हा लेख वाचू नका. तो चीनवर आहे. त्याला सांगा रशियावर लिही. चीन मला आवडतो.


-प्रा. हरी नरके,
२३/६/२०२०

टीप- बाबासाहेबांचे संसदेतले २६ ऑगस्ट १९५४ चे ते भाषण २ तासांचे प्रदीर्घ, अभ्यासपुर्ण आणि द्रष्टे विचार मांडणारे मौलिक भाषण आहे. त्यात जागतिक प्रश्नांवरचे चिंतन आहे. चीन, रशियापासून अगदी पोर्तुगिजांच्या ताब्यातील गोवा, निजामाच्या ताब्यातील विदर्भ  असे अनेक विषय त्यात आहेत. एकुण छापील १३ पानांचा मजकूर आहे. मला एका पानाचा लेख लिहायचा होता. पुस्तक नव्हते लिहायचे.
माझा मुद्दा हा आहे की कोरोना कुठून आला? भारतावर हल्ला कुणी केलाय? चीन. सध्या चर्चेचा मुद्दा कोणता आहे? चीन. म्हणून मी जर चीन, कम्युनिझम आणि बाबासाहेब हा विषय प्रासंगिक विषय निवडलेला आहे. मी त्या लेखात आणखी याच्यावर का लिहिले नाही, त्याच्यावर का लिहिले नाही असले प्रश्न अनावश्यक आहेत - प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment