Friday, August 31, 2018

"भेटलं मांग फिटलं पांग" मध्ये दाहक वास्तवाचं अंगावर येणारं चित्रण


प्रा.मिलिंद कांबळे यांची नवी कादंबरी "भेटलं मांग फिटलं पांग" वाचून संपली तरी डोक्यातून ती जात नाही. ती वाचकाला प्रचंड अस्वस्थ करते. उद्विग्न आणि निराश करते. अशी पुस्तकं वाचणं हे एका अर्थानं वाचकानं स्वत:ला मारून घेतलेले फटके असतात. वाचताना जर आपल्याला एव्हढा त्रास होतो तर ती लिहिताना कादंबरीकाराचा किती मानसिक छळ झाला असेल.
ही कादंबरी प्रामुख्याने तीन पातळ्यांवरचं वास्तव टिपते. एक आहे, समकालीन विद्यापीठीय शिक्षणाची भयावह दशा. दुसरी आहे दलित समाजातल्या उच्चशिक्षित, नेट, सेट,पास पीएच.डी. झालेल्या युवकांची आरक्षण असूनही भीषण बेकारी आणि त्यांची जात, गरीबी यांच्यामुळे होणारी ससेहोलपट. आणि तिसरी आहे दलित समाजातील मांग आणि महार या दोन जातींमधली सामाजिक तेढ. अगदी मातंग समाजातले भ्रष्ट नेते, लुटारू राजकारणी आणि नायकाचे अहंकारी सोयरेसुद्धा, या सार्‍यांचे बुरखे लेखक टराटरा फाडतो. दुसरीकडे सवर्ण अणि बौद्ध समाजातले  मोजकेच पण भले लोक नायकाचे जिवलग मित्रही असतात.


जात, वर्ग, लिंगभाव विषयक विषमता आणि त्यातलं तीव्र शोषण हे भारतीय प्रश्न आहेत. या तिन्हीलाही कादंबरीकार केवळ स्पर्शच करीत नाही तर त्यातले असंख्य पापुद्रे तो उलगडत जातो. त्यातले अंतर्विरोध तो आपल्याला विश्वासात घेऊन दाखवून देतो. कादंबरीतले अनेक प्रसंग वाचकाला भिडतात. डोळ्यातून पाणी काढतात.

ही कादंबरी आहे असं लेखक आणि प्रकाशक म्हणत असले तरी मुलत: हे एका दलित, उच्चशिक्षित, मातंग युवकाचं आत्मकथन आहे. पुस्तकाचा सूर स्वभावत:च खूप चढा आहे. कारण त्यातली वेदनेची ठसठसच तीव्र आहे. टोकदार आहे. वाचकाला भोवंडून टाकणारी आहे.

जातीव्यवस्थेने फक्त दलित आणि सवर्ण एव्हढीच विभागणी केलेली नाही तर ती मुलत: सर्व जातींची एक उतरंड आहे, श्रेणीबद्ध विषमता निर्माण करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे तळाशी असलेल्या पुर्वास्पृश्य जातींपैकी गावगाड्याबाहेरच्या २ प्रमुख जाती म्हणजे मांग आणि महार. दोन्हीही वंचित, उपेक्षित, शोषित. तरीही या दोन जातींमधून विस्तवही जात नाही अशी कायम तेढ त्यांच्यात असते असं लेखक सांगतो.

कादंबरीच्या नायकाचं नाव आहे, सिद्धार्थ कांबळे. तो आहे मातंग. तो अभिमानाने जयभीम म्हणत असतो. पण त्यामुळे मातंग त्याला दूर लोटतात. त्याच्या या नावावरून सगळ्यांची अशी फसगत होते की तो पुर्वाश्रमीचा महार असणार. विद्यमान बौद्ध असणार.

त्यामुळे त्याची खरी जात कळल्यावर सवर्ण तर त्याच्याशी वाईट वागतातच पण बहुसंख्य बौद्धसुद्धा त्याचा तिरस्कार करतात. मुलगा बुद्धीमान आहे. नेट, सेट पहिल्याच प्रयत्नात झालेला आहे. तो नोकरीच्या शोधात आहे. तुम्ही आरक्षित गटातले म्हणून जागा ओपन असेल तर संस्थाचालक त्याला तिथून कितीही हुशार असला तरी सरळ हुसकून लावतात नी जागा आरक्षित असली तरी तीव्र अंतर्गत स्पर्धा आणि ३० ते ३५ लाख रूपयांची लाच तो संस्थाचालकांना देऊ शकत नसल्याने तिथूनही तो हुसकला जातो.

वर्षानुवर्षे तो मुलाखती देत फिरतोय. नोकरी काही मिळत नाही. पीएच.डी. करायला जातो तर मार्गदर्शक २ लाख लाच मागतात. शिफारशीमुळे एक बौद्ध मार्गदर्शक त्याला मिळतात, पण त्यांना जेव्हा त्याची जात कळते तेव्हा ते त्याला खूप छळतात. हाकलतात. शेवटी तो दुसरा गाईड कसा मिळवतो, पीएच.डी. कसा होतो, हे वाचताना उच्चशिक्षण क्षेत्राचा हा भयावह चेहरा हादरवून सोडतो.


मध्यमवर्गाची आणि माध्यमांची अशी धारणा बनलीय की बेकारी फक्त सवर्णांमध्येच आहे. आरक्षणामुळे दलितांना लायकी असो की नसो लगेच नोकर्‍या मिळतात. वास्तव याच्या नेमकं उलटं आहे. आरक्षण असूनही लाखो उच्चशिक्षित दलित युवक आज बेकारीच्या खाईत होरपळत आहेत. कारण नोकर्‍या आहेत कुठे? असलेल्या सर्व ठिकाणी लाखोंची आणि कोटींची लाचेची मागणी केली जाते, हातावर पोट असलेले हे युवक इतके पैसे आणणार कुठून? उच्चशिक्षित असूनही बेरोजगार असल्याने दलित मुलांची ३२-३५ वर्षांची वयं झाली तरी लग्नं होत नाहीत. कोण देणार बेकारांना मुली? बहुतेक सर्व शिक्षण संस्थाचे प्रमुख हे प्रबळ, सत्ताधारी आणि बहुजन म्हणवणारे. त्यांचे शिक्षण क्षेत्रातले वर्तन माफियांसारखे असते.

या कादंबरीत आपल्याला एक युवक असा भेटतो जो सर्वोच्च पदव्या मिळवूनही गेली २० वर्षे मुलाखती देत फिरत असतो. त्याने आजवर १४० महाविद्यालयांमध्ये मुलाखती दिलेल्या असतात. त्याच्या मनात सतत आत्महत्त्येचे विचार येत असतात. दलित बेरोजगारांचे हे तांडेच्या तांडे बघताना वाचक कोलमडून जातो.

आरक्षणाचं मृगजळ आज कोट्यावधींना खुणावत असताना, मागासपणाचे डोहाळे सर्वांना लागलेले असताना ही कादंबरी लिहून कांबळेंनी फार मोठं सामाजिक काम केलंय. आपल्या राज्यातलं विद्यापीठीय शिक्षणक्षेत्र किती किडलेलं, सडलेलं आणि नीच पातळीवर पोचलेलं आहे ते ज्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी ही कादंबरी अवश्य वाचावी.

जातीव्यवस्थेतले अंतर्गत ताणेबाणे, विखार आणि अंतर्विरोध काय असतात हे ही कादंबरी लख्खपणे दाखवते.
नायकाचे विचार क्रांतीकारी आहेत. त्याला विज्ञानवादी जाणीवा, वेदना, विद्रोह, सामाजिक परिवर्तन यांची अपार ओढ आहे. पण त्याला क्षणाक्षणाला कसे फटके आणि झटके बसतात ते वाचणं, खरंच सून्न करून टाकतं.

ही कादंबरी वाचताना अनेकदा डोळ्यात पाणी येतं. सामाजिक-शैक्षणिक पातळीवरची निराशा दाटून येते. आशेचा किरण दूरदूरपर्यंत दिसतच नाही. वास्तव विश्वास बसू नये इतके भयंकर आहे.

उपेक्षित समाजात भुकेचा प्रश्नच इतका भयावह आहे की निसर्गचित्रण, युवा अवस्थेतलं भिन्नलिंगी नैसर्गिक प्रेमजीवन यांना कादंबरीत फारशी जागा मिळत नाही. स्त्रियांना दारूडे नवरे भीषण मारहाण करणारे आहेत. नवरा वारलेल्या, विद्यापीठात नोकरी करणार्‍या गरीब बाईचे शोषण, शिवरायांच्या बंदीस्त पुतळ्याच्या आसर्‍याला बसलेल्या वेडीवर होणारा अमाणूस बलात्कार नी तिची हत्या हे सगळं असह्य होत जातं

कादंबरी तशी एकपदरी आहे. लेखकाची ही दुसरीच कादंबरी असल्यानं नवखेपणाच्या बर्‍याच खुणा लेखणात दिसतात. बरीचशी व्यक्तीचित्रणं काळ्यापांढर्‍या रंगात आलीयत.
प्रकाशकानं एखाद्या उत्तम संपादकाचं सहकार्य घेतलं असतं तर हीच कादंबरी खूप वरच्या पातळीवर, उंचीवर गेली असती.

या लेखकामध्ये खूप क्षमता आहेत.

मात्र त्याला एकहाती लेखन करण्याऎवजी पुन्हापुन्हा फेरलेखन करण्याकडे वळायला हवे. पुनरूक्तीवर कठोरपणे काट मारणं, सतत काळापांढरा रंग वापरण्याचा मोह टाळून, करडा, सौम्य करडा याच्याशीही दोस्ती करणं आवश्यक आहे.

साक्षेपी संपादन करणं आणि कादंबरी या फॉर्मची बहुपदरी विण समजून घेत अधिक परिपक्व, प्रगल्भ चित्रणाकडं जाणं गरजेचं आहे. ते शक्यही आहे.

त्या क्षमता कादंबरीकारात आहेत.

तसं ते करतील तर श्रीलाल शुक्ल यांची रागदरबारी, शंकरची जनअरण्य, उद्धव शेळके यांची धग, बाबूराव बागूल यांची कोंडी,

नेमाडॆंच्या बिढार, हूल, झूल आणि जरीला, रवींद्र पांढरे यांची पोटमारा या अभिजात दालनात मिलिंद कांबळे जाऊ शकतील.

जाती आणि शिक्षणव्यवस्थेचे ज्याप्रकारे त्यांनी उभे आडवे छेद घेतलेत ते मोठं धाडशी काम आहे. ही कादंबरी दाहक समकालीन वास्तवाचं अंगावर येणारं चित्रण करते. तिचा अवाका फार मोठा आहे.

- प्रा.हरी नरके, ३१ ऑगष्ट २०१८

ISBN 978-81-921756-4-9
सुविद्या प्रकाशन, ३७४ उत्तर कसबा, सोलापूर, ४१३ ००७, पृष्ठे, २९०, किं. २५०/- रूपये.
पुस्तकासाठी संपर्क- प्रा.मिलिंद कांबळे,९७६ ५७६ ८८ ३२

No comments:

Post a Comment