Saturday, August 4, 2018

मराठी भाषेची इंग्रजीतली मंगळागौर -


" मी मराठी भाषेचा शिवाजी आहे," अशी घोषणा 150 वर्षांपुर्वी पुण्यातल्या एका सनातनी शास्त्रीबुवांनी केली होती. त्यांचे मराठी इथल्या सामान्य माणसाच्या समजण्यापलिकडचे होते. त्यांनी आयुष्यभरात शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्या प्रश्नांवर ब्र शब्द उच्चारला नाही. तरिही या शास्त्रीबुवांचा जयजयकार मराठी भाषेचे शिवाजी म्हणून केला गेला.
अभ्यासक्रमातून तो लादला गेला.

शिवाजी महाराज हे रयतेचे राजे. त्यांचे अपहरण करण्याची सुरूवात इथूनच झाली.

मराठी ग्रंथांची छपाई 1806 ला सुरू झाली. ज्या महात्मा जोतीराव फुल्यांनी मराठीतले पहिले पोवाडारूपी शिवचरित्र लिहून जून 1869 ला प्रकाशित केले त्यांच्या ह्या कार्याची दखल घ्यायचे सोडा, शास्त्रीबुवांनी त्यांच्या व्याकरणात कशा चुका आहेत याचा हिशेब मांडण्यावर भर दिला. 1876 च्या भीषण दुष्काळात लाखो भारतीय मेले त्याबद्दल अवाक्षर न लिहिता शास्त्रीबुवा मराठी व्याकरणावर लेख लिहित राहिले. फुल्यांवर त्यांनी आयुष्यभर गलिच्छ टिका केली. गरळ ओकले.
विनोद म्हणजे या मराठी भाषेच्या शिवाजीने ही घोषणा चक्क इंग्रजीत केली होती. "आय एम दि शिवाजी ऑफ मराठी लॅंग्वेज"

हे आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यातले जे मराठी विचारवंत कायम सामान्य माणसांशी एकरूप झालेले होते, त्यांच्या नावे काल पुण्यात एक व्याख्यान झाले. संयोजक मराठी, वक्त्या मराठी, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यान ते मराठी, विषय मराठी भाषेचा, पण व्याख्यान सामान्य मराठी माणसांना समजू नये म्हणून इंग्रजीत!

वर्तमानपत्रांनी बातम्या देताना काय लिहावे?

म्हणे बुद्धीवंतांनी व्याख्यानाला गर्दी केली होती!

यातले 95% तथाकथित "बुद्धीवंत!" म्हणजे मराठीला कायम नाकं मुरडणारे, मूळचे मराठीच पण इंग्रजी मिडीयममधून मराठी शिकलेले, धड मराठी न येणारे, तरीही मराठीचे तज्ज्ञ म्हणून मिरवणारे.

हे लोक मराठीचे संरक्षक-अभ्यासक आहेत की "तेव्हढेच ज्ञानप्रकाशात" म्हणून चमकून घेणारे?

-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment