अनंत पैलूंचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - प्रा.हरी नरके
[13 ऑगष्ट 1898 - 13 जून 1969]
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे एक अफाट व्यक्तीमत्व होते. मुळचे शिक्षक. पुढे वक्ता, विनोदकार, पत्रकार, संपादक, राजकारणी, कादंबरीकार, व्यंगकवी, [ विडंबनकार ] नाटककार, प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, अनंत पैलू.
साने गुरूजींच्या "श्यामची आई" वर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णकमळ मिळाले. त्यावेळी परीक्षक मंडळात एकही मराठी माणूस नव्हता. निव्वळ चित्रभाषेच्या ताकदीवर सुवर्णकमळ मिळवलं अत्र्यांनी.
मराठी परीक्षक नसल्यामुळेच कदाचित त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला असेल. मराठी परीक्षक असता तर त्याने नक्कीच टांग आडवी घातली असती.
"महात्मा फुले" यांच्यावरचा त्यांनी निर्माण केलेला बायोपिक आजवरचा सर्वोत्कृष्ठ मराठी बायोपिक आहे. त्यालाही राष्ट्रपतींचे रजत कमळ मिळाले. पण तो फारसा चालला नाही.
अत्रे महामिश्किल. ते म्हणाले, "त्याचं कायय की, एका ब्राह्मणेतरावरचा चित्रपट म्हणून सनातनी ब्राह्मणांनी पाहिला नाही. आणि एका ब्राह्मणाने काढलेला चित्रपट म्हणून बहुजनांनी बघितला नाही. एकुण काय तिकीटबारीवर सरासरी शून्य!"
अगदी दहाएक वर्षांपुर्वीपर्यंत मराठी रंगभुमीवर एकाच वेळी अत्र्यांची तो मी नव्हेच, मोरूची मावशी, अशी अनेक नाटकं गाजत होती.
"मी कसा झालो?" हे त्यांचे संक्षिप्त आणि "कर्हेचे पाणी" हे सहा खंडातले आत्मचरित्र केवळ अफलातून.
पुण्याच्या रे मार्केटला त्यांनीच "महात्मा फुले मंडई" हे नाव दिले.
तिथली जागा अपुरी पडते म्हणून जेव्हा गुलटेकडीला विस्तारित मंडई बांधण्यात आली आणि या मंडईचे स्थलांतर करण्यात आले तेव्हा अत्रे हयात नव्हते. त्यामुळेच बहुधा नव्या मंडईचे नाव बदलण्यात आले. हा बदल करणारे ब्राह्मण नव्हते. तथाकथित बहुजन वगैरेच होते.
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यायला आणि विद्यापीठात महात्मा फुले यांचा पुतळा बसवायला कोणा बहुजनांनी विरोध केला ते सर्वांना माहितच आहे.
बहिणाबाईंच्या कवितेवर अपार जीव असलेल्या अत्र्यांनी अनेक नव्या लोकांना प्रकाशात आणले. अत्रे मर्ढेकरांना मात्र समजून घेऊ शकले नाहीत. त्यांना वासुनाकावाले भाऊ पाध्येही कळले नाहीत. अत्रे अफाट होते, स्वागतशील होते पण त्यांच्या व्यक्तीमत्वात अनेकविध कुरूपता होत्या. ते अनेकदा खोटेही लिहित असत. गलिच्छही लिहित असत.
चालायचेच. माणूस म्हटला की विकार आलेच. विसंगती आल्याच. सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्वं फक्त सिनेमा-कादंबर्यात असतात. वास्तवातली माणसं हाडामांसाचीच असतात.
अत्रे यांच्या तोडीचा दणकट लेखक, नाटककार, वक्ता, संपादक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही. पुढच्या दहा हजार वर्षात होणार नाही.
- प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment