Wednesday, August 1, 2018

निमित्त - लो. टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती -


पुर्वार्ध

लोकमान्य टिळक अखिल भारताचे पहिले नेते. झुंजार पत्रकार. साक्षेपी संपादक. अनेकदा तुरूंगवास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक. गीतारहस्य या मौलिक ग्रंथाचे लेखक. महात्मा फुल्यांनी सुरू केलेला शिवजयंतीचा सोहळा देशभर पोचवणारे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक. विचारवंत. खर्‍या अर्थाने लोकमान्य!
त्यांना जाऊन आज 98 वर्षे झाली.
आजही आपण टिळक पगडी की फुले पगडी यावरून एकमेकांची डोकी फोडलीच पाहिजेत का? कोण चुकले नी कोण बरोबर होते याच्या किर्द वह्या-चोपड्या आणखी किती काळ आपण डोक्यावर मिरवायच्या? ही जुनी वैरं आणखी किती काळ आजच्या पिढ्यांनी वागवायची?
प्रतिकात अडकायचं की विचारांचा वारसा घ्यायचा?

1.
कोल्हापूरच्या छत्रपतींच्या वंशजांचा छळ केल्याबद्दल दिवाण बर्वे यांच्यावर केसरी-मराठा मध्ये  टिळक आगरकरांनी टिकेचे आसूड ओढले. बर्व्यांनी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला भरला. या दोघांना अटक झाली. त्यांना मुंबईत डोंगरीच्या तुरूंगात ठेवले होते. ब्रिटीश कोर्टाने त्यांच्याकडे दहा हजार रूपयांचा जामीन मागितला. [ज्या काळात सोन्याचा तोळ्याचा भाव पंधरा रूपये होता तेव्हाचे दहा हजार रूपये म्हणजे आजचे किती झाले? सुमारे दहा कोटी रूपये? ]

महात्मा फुले आणि टिळक-आगरकरांचे वैचारिक मतभेद होते. तरिही टिळकांची तार मिळताच
रातोरात जोतीराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेट बापूशेट उरवणे यांना दहा हजार सुरती रूपये घेऊन मुंबईला पाठवले. टिळक-आगरकरांच्या जामीनाची सोय केली. पुढे टिळक-आगरकर तुरूंगातून सुटल्यावर त्यांची मिरवणूक काढून त्यांचा जाहीर सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. स्वत: टिळकांनी त्याबद्दल आपल्या वर्तमानपत्रातून फुल्यांना जाहीरपणे धन्यवाद दिले. [केसरी, दि. 3 आक्टोबर 1882]

पुढे फुले वारल्यावर टिळक-आगरकरांनी त्यांच्या निधनाची एका ओळीचीसुद्धा बातमी दिली नाही.


2.
1 ऑगष्ट 1920 ला टिळक गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायकचे संपादक होते. त्यांनी बातमी दिली. पण एका ओळीची. "कळवण्यास दु:ख वाटते की काल पुण्याचे बा.गं. टिळक यांचे सरदार गृहात निधन झाले."
टिळक अनुयायी संतापले. त्यांनी बाबासाहेबांना घेरले. बाबासाहेब म्हणाले, "त्यांनी फुल्यांची बातमीसुद्धा दिली नव्हती. आम्ही दिली.
आम्ही मूकनायक काढला तेव्हा केसरीला विनंती केली की हा पेपर सुरू झाल्याची बातमी तुम्ही छापल्यास लोकांना या पेपरची माहिती होईल. पण त्यांनी बातमी दिली नाही.
आमच्या पेपरची जाहीरात छापा, आम्ही त्याचे पैसे देतो असे आम्ही सांगितले तर केसरीने कळवले, "जागा नाही."
त्याचकाळात केसरीतल्या जाहीराती कोणत्या होत्या? तर "लोकमान्य जोडा" चपलेच्या दुकानाच्या जाहीराती."

3.
महात्मा गांधीजी लोकमान्यांना आणि गोखल्यांना गुरूस्थानी मानायचे. लोकमान्य गेले तेव्हा गांधीजींना अंत्ययात्रेत त्यांच्या तिरडीला खांदा द्यायचा होता.
गांधीजी हलक्या जातीचे आहेत असे सांगून टिळक अनुयायांनी त्यांना नकार दिला. टिळक अनुयायी कमालीचे सनातनी. संकुचित. आजही त्यांच्यात फारसा फरक पडायला तयार नाही.

4.
टिळकांनी छत्रपती शाहूंच्या वेदोक्त प्रकरणात सनातन्यांची बाजू घेतली. शाहूराजे दुखावले गेले.
ताईमहाराज प्रकरणात टिळकांवर बलात्काराचा खटला भरला गेला. टिळक न्यायालयात निर्दोष ठरले.
शाहूंनी ताईमहाराजांची बाजू घेतली होती हे टिळक कधीही विसरले नाहीत. या दोघांच्या चुकांची किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागली. लागतेय.

5.
अण्णाभाऊ कम्युनिस्ट. अण्णाभाऊ, अमर शेख, गव्हाणकर हे तिघे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार-शाहीर. श्रीपाद अमृत डांगे त्यांचे नेते. डांगे कट्टर टिळकभक्त. त्यांना फुले शाहूंची अ‍ॅलर्जी. त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचा महात्मा फुले विशेषांक काढावा यासाठी त्यांच्या संपादकांनी हट्ट धरला. डांगे तयार नव्हते. शेवटी त्यांनी राजीनाम दिला तेव्हा डांगे तयार झाले. अण्णाभाऊंनी आपली "फकीरा" कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली.
"जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव," हे त्यांनी लिहिलं हे पक्षातल्या अनेकांना खटकलं.
अण्णाभाऊंनी आपला पोवाडा मायभू, शिवराय नी लोकमान्य टिळक यांच्या चरणी अर्पण केलेला.
अण्णाभाऊंची अपार उपेक्षा झाली. एक महान कादंबरीकार, जागतिक किर्तीचा साहित्यसम्राट, लोकशाहीर, लोकनाट्यकार, पण दलित.
ते गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला खुप कमी लोक हजर होते. आज त्यांचे कोट्यावधी रूपयांचे पुतळे राहाताहेत पण अण्णाभाऊ गेले तेव्हा उपाशीपोटी गेले होते.

6.
गुरूवर्य य.दि,फडकेसरांनी त्यांचा पहिला वैचारिक ग्रंथ टिळक-आगरकरांवर लिहिला. सर मूळचे रहस्यकथा लेखक. त्यांनी पुस्तकाला नाव दिलं "शोध बाळगोपाळांचा."
तर एका संस्थेने या पुस्तकाला बाल वाड्मयाचा पुरस्कार दिलेला.
त्यांनी वाचायचे सोडा पुस्तक चाळलेही नसणार!

7.
मी संपादित केलेला "आम्ही पाहिलेले फुले" हा ग्रंथ एका बहुजन महाविद्यालयातील बहुजन ग्रंथपालांनी बॉटनी विभागात ठेवलेला आढळला. आम्ही "पाहिलेली" फुले=फ्लाॅवर्स, असे समजून.

8.
पुण्यात ब्रिटीशांनी भाजी मंडई बांधायला काढली. त्याला दोघांनी कसून विरोध केला. एक फुले नी दुसरे टिळक. कारणं वेगळी पण विरोध पक्का.
पण मंडई उभी राहिलीच. पुढे आचार्य अत्र्यांनी त्या मंडईला महात्मा फुल्यांचे नाव दिले आणि पुणेकरांनी त्या मंडईत लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा केला.
.........................

उत्तरार्ध

टिळक सनातनी नव्हते, प्रागतिक होते अशी मांडणी करणारांसाठी काही प्रश्न आहेत-
"ईश्वर जर अस्पृश्यता मानत असेल तर मी असला ईश्वर मानत नाही. त्याला मी अरबी समुद्रात बुडवीन" असं टिळक म्हणाले हे खरंच आहे. ते विधान धाडसाचेच होते.
पण त्याबद्दल 2 प्रश्न आहेत.

1. त्याच परिषदेत महर्षि वि.रा.शिंदे यांनी "आजपासून मे माझ्या खाजगी जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही," अशा प्रतिज्ञावर टिळकांना सही करायची विनंती केली. टिळकांनी सही केली नाही. टिळक त्यांना म्हणाले, "सही करण्यापुर्वी मला माझ्या अनुयायांशी सल्लामसलत करायला लागेल." खाजगी जीवनाशी अनुयायांचा काय संबंध?

2. हे स्वत:चे भाषण टिळकांनी लंडनच्या टाइम्समध्ये छापून आणले. परंतु टिळक संपादक असलेल्या केसरीत मात्र त्याची एकही ओळ छापली जाणार नाही याची दक्षता घेतली असे का? म्हणजे हे भाषण राणा भीमदेवी, लंडनमध्ये आपली प्रागतिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी केलेले होते हे खरे नाही काय?

3. महर्षि कर्वेंच्या महिलांना विद्यापिठीय शिक्षण देण्याच्या उपक्रमाला टिळकांनी जाहीरपणे विरोध केला, असे का?

4. स्वत:च्या मुलीला त्यांनी शिकवलं, हे खरंय. ही मोठीच गोष्टाय. पण त्याच मुलीने मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे असा आग्रह धरणार्‍या मोर्च्यात भाग घेतला आणि आपल्या वडीलांची याबाबतची सनातनी मतं आपल्याला मान्य नाहीत असं भाषण केलं ते का?

5. त्यांच्या मुलाने श्रीधरने महाड सत्याग्रहाला जाहीरपणे पाठींबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना टिळक वाड्यात बोलावून त्यांचा सत्कार केला. पण याच मुलाला केसरी ट्रस्टच्या सदस्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली.  त्यानं शेवटचं पत्र बाबासाहेबांना लिहिलं.
पण टिळकांनी तर बाबासाहेबांच्या मूकनायकची जाहीरातही छापली नाही. महात्मा फुले गेल्याची साधी बातमीही दिली नाही. हे पत्रकारिता धर्मात बसते?

6.छत्रपती शाहूंना वेदोक्त अधिकार नाकारणार्‍या राजोपाध्यांची बाजू टिळकांनी घेतली हा त्यांचा सनातनीपणा नव्हता?

7. गीतारहस्यात ज्यांनी शूद्रांना पापयोनी ठरवले ते टिळक सनातनी नव्हते काय?

1 ऑगष्ट 1920- लोकमान्य गेले. अण्णाभाऊ जन्मले.
दोघांना विनम्र आदरांजली.
-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment