करूणानिधींनी संस्कृतला अभिजात दर्जा मिळवून दिला. देशभर सध्या प्रसिद्ध असलेल्या 69% आरक्षणाच्या/सामाजिक न्यायाच्या पॅटर्नचे निर्माते होते करूणानिधी.
तामिळनाडू हेच शक्तीस्थान आणि तीच त्यांची मर्यादा होती.
2004 साली केंद्रात काँग्रेसचे सरकार आले. डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान झाले. करूणानिधींनी ह्या सरकारला पाठींबा दिला. त्यांनी केंद्र सरकारला प्रमुख अट घातली की आमच्या तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे.
केंद्र सरकारने ती तात्काळ मान्य केली.
तामिळ ही भारतातील सर्वात प्राचीन आणि श्रेष्ठ भाषांमधली एक प्रमुख भाषा आहे. तिला अभिजात दर्जा मिळाला. हा दर्जा मिळवणारी पहिली भारतीय भाषा तामिळ आहे. जगातल्या सगळ्या भाषा संस्कृतपासून निर्माण झाल्या असा अवाजवी, असत्य आणि वर्चस्ववादी दावा करणारांना ही मोठी चपराक होती.
आमची भाषा अभिजात आहे असे करूणानिधी आणि तमाम तामिळी लोक अभिमानाने सांगू लागले. तामिळ आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाला पन्नास लाख लोक जमतात आणि खर्च असतो तीस ते पन्नास कोटी रूपये. या संपुर्ण साहित्य संमेलनाचे विविध वाहिन्यांवरून जगभर प्रसारण होते.
संस्कृत भाषेची देशभरात किमान 25 विद्यापीठे आहेत. खाजगी संस्था किमान 2 हजार आहेत. त्यांनी कुणीही संस्कृतला अभिजात दर्जा द्या असा प्रस्ताव सादर केला नाही तर तो केला करूणानिधींनी. संस्कृत भाषा अभिजात आहेच. संस्कृतमध्ये श्रेष्ठ काव्य, साहित्य, विचार, तत्वज्ञान असल्याने तिला तो दर्जा मिळणे आवश्यकच होते. संस्कृतला हा दर्जा मिळवून दिला तो करूणानिधींनी.
तामिळनाडू हे राज्य आज देशात जीडीपी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, मानव विकास, या सार्यात आघाडीवर असण्याचे श्रेय चार जणांना जाते. रामास्वामी नायकार, अण्णा दुराई, करूणानिधी आणि एम.जी.रामचंद्रन.
औद्योगिक विकासात देशात तामिळनाडू क्र. 1 वर असून महाराष्ट्र क्र. 2 वर आहे.
मानव विकास निर्देशांकात देशातील मोठ्या राज्यांमध्ये पंजाब, महाराष्ट्र आणि तामिळनाडू ही राज्ये पहिल्या तीनमध्ये आहेत.
शिक्षणात मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर असून तामिळनाडू क्रमांक 2 वर आहे.
राज्य आरोग्यासाठी प्रतिनागरिक [दरडोई] किती खर्च करते याचा विचार केला तर तामिळनाडू मोठ्या राज्यांमध्ये दुसर्या तर महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. बालमृत्यूच्या प्रमाणाचा विचार करता सर्वात कमी बालमृत्यू होणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसर्या तर तामिळनाडू तिसर्या क्रमांकावर आहे.
जीडीपीनुसार देशात महाराष्ट्र क्र. 1 वर आहे तर तामिळनाडू क्र. 2 वर आहे.
राज्य भाषेचा [तामिळ] आग्रह, विकास, प्रचार आणि प्रसार यांत तामिळनाडू देशात प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र [मराठीबाबत] देशात शेवटून पहिले [म्हणजे एकुणात 36 वे] राज्य.
करुणानिधी विद्यार्थी चळवळीतून पुढे आले. तामिळ फिल्म इंडस्ट्रीत पटकथाकार म्हणून त्यांचे स्थान अव्वल राहिले. तामिळ समाजकारण, संस्कृतीकारण,राजकारण यांचा पडदा सिनेमासृष्टीने व्यापून टाकलेला आहे.
महान वक्ता, संघटक, संपादक, मुत्सद्दी, द्रष्टा, 24*365 राजकारणी, खरा जाणता राजा, साहित्यिक म्हणजे करूणानिधी. देशभर सध्या प्रसिद्ध असलेल्या 69% आरक्षणाच्या/सामाजिक न्यायाच्या पॅटर्नचे निर्माते होते करूणानिधी.
त्यांनी तामिळींसाठी केलेल्या कल्याणकारी योजनांची यादी फार मोठी आहे.
पण तरीही त्यांनी या लोकांना जातीनिर्मुलनाकडे नेले नाही. अनुसुचित जाती-ओबीसींमध्ये सोयरिक निर्माण केली नाही. त्यांनी राज्याबाहेरच्या ओबीसींसाठी काहीही केले नाही.
जणू राज्याबाहेरचे जग त्यांच्यासाठी नव्हतेच. त्यांनी मनावर घेतले असते तर ते अनु.जाती,जमाती, ओबीसींसाठी खूप काही करू शकले असते.
तामिळनाडू हेच शक्तीस्थान आणि तीच त्यांची मर्यादा होती.
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment