Sunday, August 12, 2018

अशी कंची घटना घडली?



संविधान साक्षरता अभियानाअंतर्गत 500 व्याख्याने द्यायचे ठरवून मी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात फिरत असतानाचे काही अनुभव-

1. गावातला कार्यक्रम संपवून मी एस.टी.ची वाट पहात स्टॅंडवर उभा होतो. संयोजकांबरोबर कार्यक्रमाबद्दल गप्पा चालू होत्या. आमच्या मागे उभी असलेली धोतर, टोपी घातलेली 50 च्या पुढच्या वयाची एक व्यक्ती आमच्या गप्पा लक्ष देऊन ऎकत होती.

ते मला म्हणाले, " सर, अशी कंची घटना घडली की तुम्ही परेशान होऊ लाले? मी ऎकू लालो तुम्ही दरघडी घटना, घटना करू लाले?"
मी त्यांना सांगितलं, मी घडलेल्या घटनेबद्दल बोलत नसून मी देशाच्या राज्यघटनेबद्दल बोलतोय.
ते पटकन म्हणाले, " राज्यघटना बघता येते काहो आमच्या सारख्या गरिबाला? लईच मोठ्ठी आहे म्हणतात आपली राज्यघटना."
मी म्हणालो, नक्कीच बघता येते. कोणत्याही सरकारी पुस्तक दुकानात फक्त 90 रूपयाला तर मिळते राज्यघटना. [ तेव्हाची किंमत ]

कुतुहल म्हणून मी विचारलं, तुम्ही काय करता?
ते म्हणाले, " शिक्षक आहो ना सर, झेडपी शाळेत!"
तेव्हापसून मी माझ्या शबनममध्ये राज्यघटना बरोबर नेऊ लागलो. ती कार्यक्रमात दाखवून त्यातला सरनामा वाचून दाखवून कार्यक्रमाची सुरूवात करू लागलो.

2. एका महाविद्यालयात माझे भाषण चालू होते. युवावर्ग उत्तम दाद देत होता. कार्यक्रम छानच रंगला होता.
बोलता बोलता मी उपस्थितांना अधूनमधून काही प्रश्नही विचारत होतो.
पहिल्या रांगेत बसलेल्या एका सिनियर प्राध्यापकांना मी म्हणालो, "काय सर, तुम्ही वाचलेलीच असणार राज्यघटना, हो ना?"
ते म्हणाले, "नाही."
मी म्हटलं, "काहो? का नाही वाचली?"
ते अतिशय चढ्या आवाजात म्हणाले, " वाचायची गरजच काय? ती तर आमच्या रक्तातच हाये! "
मी निरूत्तर. कपाळात *ट्या!

3. आमचे एक मित्र सार्वजनिक कार्यक्रमात कोणताही फोटो न लावता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते घटनेच्या प्रतीला हार घालून कार्यक्रमाला सुरूवात करतात.

4. व्याख्यानांना इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की दीड वर्षात 500 व्याख्याने पुर्ण झाली.
तेव्हा असे लक्षात आले की भल्याभल्या उच्च शिक्षित मंडळींपैकी 85 ते 90 टक्के विद्वानांनी वाचायची सोडा राज्यघटना साधी बघितलेलीसुद्धा नाहीये.

5. एक प्राध्यापक म्हणाले, " आपल्या देशात एव्हढी खेडी आहेत, निरक्षरता आहे, अशा स्थितीत एव्हढ्या किचकट, तांत्रिक भाषेत घटना कशाला लिहिली असेल? सोप्या भाषेत लिहायची होती ना!"
मी म्हटलं, "सर, घटना म्हणजे कायद्यांचा कायदा. न्यायालयात त्यातल्या प्रत्येक शब्दांचे किस पाडले जातात. कायद्याची भाषा तांत्रिक असणे अपरिहार्यच नाही का?"
तर ते म्हणाले, "किस म्हणजे काय?"
मी म्हटलं, "माझं कप्पाळ!"
तेव्हा कुठे ते हसायला लागले.

आपला देश, आपली माणसं केवळ अगम्य!
-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment