" आम्ही भारताचे लोक " या शब्दांनी भारतीय संविधानाची सुरूवात होते. सर्व भारतीय नागरिकांचा गौरव आणि सन्मान ग्रंथ म्हणजे संविधान. संविधान आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते.
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या आधुनिक वैश्विक मुल्यांच्या पायावर आपले संविधान उभे आहे. सामान्य भारतीयांवर हजारो वर्षे लादण्यात आलेली राजेशाही, गुलामी, वेठबिगारी संपवणारा आणि लोकशाही, मुलभूत मानवी अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा मौलिक दस्तावेज म्हणजे आपली राज्यघटना.
आपला राष्ट्रध्वज, आपले राष्ट्रगीत आणि आपले संविधान हे आपले सर्वांचे तीन मानबिंदू.
हे संविधान तयार करण्यात तुमच्या माझ्या आजी-आजोबांचा थेट सहभाग होता. 26 फेब्रूवारी 1948 ला संविधानाचा पहिला मसुदा "गॅझेट ऑफ इंडीया" या भारतीय राजपत्रात प्रकाशित करण्यात आला. तो वाचून सर्व भारतीय नागरिकांनी आपापल्या सुचना पाठवाव्यात असे जाहीर आवाहन करण्यात आले. अक्षरश: हजारो सुचना आल्या. त्यातल्या असंख्य स्विकारल्याही गेल्या. बघा, जे संविधान तुमच्या माझ्या पुर्वजांनी बनवले त्याचा अपमान हा आपला अपमान नाही?
भारतीय संविधान लिहिताना प्रमुख शिल्पकारांच्या समोर 5 आधार होते.
1. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत लाखो जण तुरूंगात गेले. काळ्या पाण्यावर गेले. अनेकजण शहीद झाले. स्वातंत्र्यासाठी हजारोंनी आपले रक्त सांडले. घाम गाळला. या चळवळीच्या अनेक दशकांच्या वाटचालीत स्वातंत्र्याबद्दल सामान्यांच्या आशा-आकांक्षा तयार झाल्या. लोकांनी स्वप्नं पाहिली. त्या भावना जाहीरपणे व्यक्तही झाल्या. त्या स्वप्नांना, त्या भावनांना लिखित स्वरूपात व्यक्त करणारा दस्तऎवज म्हणजे संविधान. त्याचा अपमान म्हणजे शहीदांचा अपमान.
2. घटना परिषदेचे सल्लागार सर बी.एन.राव यांनी लिहिलेला एक कच्चा मसुदा होता, त्याची छाननी करून त्यातलं आवश्यक ते घ्यायचं होतं. घटनाकार हे दोन समित्यांचे अध्यक्ष होते. [1] मसुदा लेखन समिती, [2] छाननी समिती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली विवेकबुद्धी, व्यासंग, द्रष्टेपणा, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी यांचा अर्क ओतून ही घटना तयार केली.
3. घटना समितीवर निवडून गेलेले 300 मान्यवर लोक विद्वान होते. त्यातले शंभर तर बॅरिस्टर होते. महात्मा गांधी, पंडीत नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद हे पाचही श्रेष्ठी बॅरिस्टर होते. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते. पुण्यातून घटनासभेवर निवडून गेलेले बॅ. बाबासाहेब जयकर, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे ही फार मोठी माणसं होती. त्यांनी चर्चेतून शेकडो मुद्दे पुढे आणले. त्यातले खूप काही घटनेत घेतले गेले. घटनासभेच्या इतिवृत्ताचे लोकसभा सचिवालयाने प्रकाशित केलेल्या CAD चे बारा खंड आहेत.
संविधान सभेतले 90% सदस्य सवर्ण समाजाचे होते. अवघे 10% अनु. जाती, जमातीचे, ओबीसींचे, अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी होते.
4. घटना सभेने वेगवेगळ्या उपसमित्या स्थापन केल्या होत्या. मुलभूत अधिकार उपसमिती, राष्ट्रध्वज उपसमिती, राष्ट्रभाषा उपसमिती, इ.इ. त्यांनी दिलेल्या लेखी शिफारशी घटनाकारांना विचारात घ्याव्या लागल्या.
5. साऊथबरो कमिशन, सायमन कमिशन, मोर्ले मिंटो सुधारणा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, गोलमेज परिषदा या सगळ्यांतून 1935 चा कायदा तयार झालेला होता. त्याचा आधार घटना लिहिताना घेतला गेला.
घटना या सगळ्यातून तयार झाली.
हे सारे नाकारायचे?
जे आपल्या पुर्वजांचे उपकारच नाकारतात, त्या कृतघ्न लोकांना भवितव्य कसे असेल?
"संविधान जलाओ, संविधान मुर्दाबाद, आंबेडकर जलावो, मनूवाद लावो " या राष्ट्रद्रोही घोषणा तुम्हाला मान्य आहेत?
घटना तयार करण्यात कोट्यावधी भारतीयांचे हातभार लागलेले आहेत. त्यातून एक महान, उज्ज्वल, भविष्यवेधी, अभिमानास्पद आराखडा तयार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांना पाठींबा देणारे 300 सदस्य, त्यांना निवडून देणारे आणि लेखी सुचना पाठवणारे तुमचे माझे पुर्वज यांच्याशी आपले काहीच नाते नाही?
आहे ना? मग चला उठा तर, संविधान साक्षरता अभियान राबवूया. संविधान जागृती, संविधान वाचन, संविधान संरक्षण यासाठी झटूयात. मग कामाला कधी लागताय?
आम्ही भारताचे लोक अशी सुरूवात असलेली राज्यघटना जाळणारे लोक अभारतीय झाले. मग या अभारतीयांना, भारतद्रोह्यांना सरकार शिक्षा कधी करनार?
- प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment