Thursday, August 16, 2018

अटलजींचे महाप्रस्थान -







अटलजींचे महानिर्वाण - प्रा. हरी नरके
[ 25 डिसेंबर 1924- 16 ऑगष्ट 2018 ]

माजी पंतप्रधान भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे आज दु:खद निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. ते अविवाहीत होते. ज्यांच्या जाण्याने उजव्यांना दु:खाचा धक्का बसला अन डावेही ज्यांच्या जाण्याने मनापासून हळहळले असा एक दुर्मिळ राजकीय नेता म्हणजे अटलजी. मृत्यू कोणालाच चुकलेला नाही. पण ज्यांच्या जाण्याने सारे भारतीय जनमाणस खोलवर हलले असा एक महान नेता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे.

आयुष्यात तीनदा ते पंतप्रधान झाले. सुमारे सहा वर्षांचा कार्यकाळ त्यांना मिळाला. त्याआधी जनता पक्षाच्या राजवटीत ते देशाचे परराष्ट्र मंत्री होते. सुमारे पन्नास वर्षे ते संसदेत होते. विद्यमान सरकारने त्यांना भारत रत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल केलेला होता. गेली चार वर्षे ते आजारपणामुळे सक्रीय राजकारणापासून दूर होते.

त्यांच्या वक्तृत्वशैलीचे लाखो फॅन होते. त्यांनी विपुल कविताही लिहिलेल्या आहेत. राजकारणी आणि कवी अशी फार दुर्मिळ प्रजाती होते ते! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातला एक उदारमतवादी नेता अशी त्यांची प्रतिमा होती. ते उमद्या मनाचे असल्याने पत्रकार आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग होता.

ते संघाचा चेहरा नसून केवळ एक मुखवटा आहेत असं त्यांच्याच एका सहकार्‍याने जाहीरपणे संगितलेही होते. वाजपेयी चांगले आहेत पण त्यांचा पक्ष, त्यांचा सांस्कृतिक-राजकीय परिवार मात्र आम्हाला मान्य नाही, असं म्हणणार्‍या पत्रकार आणि विरोधकांना त्यांनी संसदेत स्पष्टपणे सुनावले होते, आम्ही दोघे एकच आहोत.

कुणीही भलाबुरा माणूस गेला की आपल्या समाजात आरत्या ओवाळण्याची फार मोठी साथ येते. वाजपेयी राजकारणी असूनही भले माणूस होते यात शंकाच नाही. त्यांचा त्याग मोठा होता. त्यांच्या जाण्याचे कोट्यावधींना मनोमन दु:ख झालेले आहे.

ते अजातशत्रू होते, ते राजकारणातले आदर्श व्यक्तीमत्व होते असे सांगायची आता चढाओढ सुरू होईल. ज्यांना गेल्या चार वर्षात त्यांची फारशी आठवणही झाली नाही तेच आता मक्राश्रू ढाळू लागतील.

दुसरीकडे विरोधक त्यांनी राजधर्माची कशी आठवण करून दिली होती याच्या आठवणी आता काढू लागतील. हो ते राजधर्माबद्दल बोलले होते. ते बोलणे महत्वाचेच होते. पण ते देशाचे पंतप्रधान होते, त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते होते, त्यांनी राजधर्माची आठवण करून देण्यापलिकडे काही ठोस कृती केली का? तर नाही.

1992 साली बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतरच्या दंगलींमध्ये हजारोंच्या हत्त्या झाल्या. ते मशीद पाडण्यात पुढे नसतीलही पण त्यांनी पाडणारांना रोखलेही नाही.

 370, एकरूप नागरी संहिता, राम मंदिर असे मुद्दे त्यांच्या सरकारने घेतले नाहीत हे खरेय पण त्यांना बहुमत नव्हते म्हणून आपण ते विषय घेतलेले नाहीत असे त्यांनी संसदेला बजावलेही होते.

पोखरण अणु चाचणी, कारगील विजय यांचे ते शिल्पकार जसे होते तसेच विमानाचे अपहरण करणार्‍या अतिरेक्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना सोडायला देशाचे परराष्ट्रमंत्री सोबत गेले होते तेव्हा पंतप्रधान अटलजीच होते. त्यांनी राजधर्म पाळला हे खरेय पण न्या. वेंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटना पुनर्विलोकन समितीही त्यांनीच नेमली होती.

दोनदा त्यांचा सहवास अतिशय जवळून अनुभवता आला. शरद पवारांच्या 61 च्या समारंभाला ते देशाचे पंतप्रधान म्हणून उपस्थित होते. मुंबईत रेसकोर्स मैदानावर हा भव्य सोहळा झाला होता. मी संपादित केलेल्या ’जनस्पंदन’ या गौरवग्रंथाचे अटलजींच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यांनी पुस्तकाचे मनापासून कौतुक केले.
त्याच्या दुसर्‍याच दिवशी संसदेवर अतिरेकी हल्ला झाला होता.

संसदेच्या प्रांगणात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ते पंतप्रधान असताना झाले. त्यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आयोजित केलेल्या प्रदर्शनाची सविस्तर माहिती त्यांना मला देता आली. रात्रीची वेळ होती. ते खूप दमलेले वाटत होते. हा कवी मनाचा मुरब्बी राजकारणी त्या प्रदर्शनात फारसा रमला नाही. सोनिया गांधींनी मात्र हे प्रदर्शन अतिशय आत्मियतेने बघितले.असंख्य प्रश्न विचारून माहिती घेतली.

अटलजींचे जाणे सर्वांनाच चटका लाऊन गेले. त्यांच्यासारख्या उमद्या माणसांची भारतीय राजकारणाला जेव्हा सर्वाधिक गरज आहे, तेव्हाच त्यांनी आपल्यातून निघून जावे हे फारच दु:खद आहे.
विनम्र आदरांजली.
- प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment