शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, आरक्षण, सामाजिक न्याय, संविधान कोणत्याही विषयावर पोस्ट टाकली की एका पगारी सेनेतले काही टोळभैरव तात्काळ प्रतिक्रिया देतात.
"एव्हढं वाचायला आम्हाला वेळ नाय. समान नागरी करा. फुल अॅंड फायनल."
या झुंडीतल्या सुडक्यांना "समान नागरी कायदा" या तीन शब्दांचा अर्थही नीट माहित नाही. त्यांची डोकी बधीर करणार्या भिकारबुद्धीने त्यांना काहीबाही पढवलेले असते.
त्यांना वाटते, " विद्यमान आरक्षण पद्धतीला विरोध म्हणजे समान नागरी कायदा."
मुळात भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 44 मध्ये हा विषय आलेला आहे.
घटनाकारांनी पुढीलप्रमाणे शब्दरचना केलेली आहे.
"The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India."
"नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहिल."
गेल्या 70 वर्षात त्यादिशेने प्रामाणिक प्रयत्न झाले का? नाही.
या कामात आजवर अक्षम्य हलगर्जीपणा झालेला आहे हे खरेच आहे.
मात्र यात आवर्जून लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे इंग्रजीत "uniform" तर मराठीत "एकरूप " हा शब्द घटनाकारांनी वापरलेला आहे.
माध्यमांमध्ये सर्रास "समान = Common" हे चुकीचे शब्द वापरले जातात.
समान आणि एकरूप यात खूप फरक आहे.
उदा. पुर्वी वाड्यांमध्ये कॉमन नळ असे. कॉमन संडास असे. त्याचा अर्थ एकच वस्तू सगळे सामायिकरित्या वापरीत असत.
आजसुद्धा अनेक कार्यालयांमध्ये, व्यावसायिक वापराच्या इमारतींमध्ये पुरूषांसाठी एक कॉमन स्वच्छतागृह तर स्त्रियांसाठी दुसरे कॉमन स्वच्छतागृह असते.
सैनिक, पोलीस, ड्रायव्हर, कंडक्टर, शालेय विद्यार्थी आदींना युनिफॉर्म असतो. युनिफॉर्म याचा अर्थ सगळेजण एकच वस्तू वापरीत नाहीत तर प्रत्येकजण आपल्या आपल्या मापाचा ड्रेस घालतो. त्यांचा सर्वांचा रंग, साधारण आकारमान आदी एकसारखे असतात. मात्र ते वेगवेगळे असतात.
"समान नागरी कायदा" याचा अर्थ एकच कायदा सर्वांना लागू असेल.
तर "एकरूप नागरी संहिता" म्हणजे देशात एकसारख्या पण वेगवेगळ्या नागरी कायद्यांच्या संहिता / व्यवस्था असतील.
आपल्या देशात आज क्रिमिनल प्रोसिजर कोड - गुन्हेविषयक कायदे सर्वांना एकच आहेत.
नागरी कायद्यांमध्ये मात्र थोडा फरक आहे. मुख्यत: लग्न, घटस्फोट आणि दत्तक या तीन नागरी गोष्टींबाबतचे कायदे धर्मनिहाय वेगवेगळे आहेत.
जगातील 222 देशांमध्ये बारा धर्मांचे लोक राहतात. भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव देश असाय की जिथे 12 च्या 12 धर्मांचे लोक राहतात. ही विविधता इतर देशांमध्ये नसल्याने त्यांच्यासमोर ही समस्या नाही.
हिंदू 80% तर इतर धर्माचे लोक 20% आहेत. इंडोनेशियानंतरची सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या भारतीय आहे. आजच्या भारतीय मुस्लीमातले 99% लोक धर्मांतरीत आहेत. ते बाहेरून आलेले नाहीत. मुस्लीम धर्माला जाती मान्य नाहीत. परंतु मुस्लीम समाजात जाती आहेत. हिंदूंप्रमाणेच तिकडॆही 4 सामाजिक गट आहेत. त्यात बाहेरून आलेले मोगल,पठाण, सय्यद, नबब हे स्वत:ला कुलीन, उच्च समजतात.ते अश्रफ - अ- आहेत. जे हिंदूंमधल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांमधून धर्मांतरीत झाले तेही स्वत:ला अश्रफ -ब- समजतात. ते सुमारे 2% आहेत.
जे इथल्या बलुतेदार, अलुतेदारांमधून मुस्लीम झाले ते "अजलफ" आहेत नी जे अनु.जाती, जमातीतून मुस्लीम झाले ते "अर्जल" आहेत. या दोघांची लोकसंख्या 97% आहे. मात्र मुस्लीम समाजाचे बहुतेक सगळे नेते [ सर्वपक्षीय नेते ] अश्रफ अ किंवा ब मधले आहेत. त्यांना हे नेतृत्व स्वत:च्या हातात ठेवण्यासाठी मुस्लीमांनी कायम कडवे राहायला हवेय. त्यामुळे दोन्ही धर्मातले कडवे-सनातनी लोक मागून हातमिळवणी केलेले असतात.
त्यांना भ्रामक प्रश्नांवर लोकांना झुंजवायचे असते. खरे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार, कुटुंब नियोजन, गरीबी, स्त्री-पुरूष समता यवर ते बोलतच नाहीत.
बरं हे हिंदूतर लोक कालपरवा इथे आलेले नाहीत. इस्लामला मानणारे 1400 वर्षांपुर्वी भारतात आलेत. ख्रिश्चन धर्माचे लोक 2000 वर्षांपुर्वी तर पारशी 1200 वर्षांपुर्वी इथे आलेत. नंतरही येत राहिलेत. यातल्या काहींनी तर इथे शतकानुशतके राज्यंही केलीयत.
पहिल्यंदा लबाडी केली ती इंग्रजांनी. त्यांनी भारतीय इतिहासाचे वर्गीकरण करताना हिंदू पिरियड, मुस्लीम पिरियड असे केल्यानंतर तिसरा कालखंड मात्र ब्रिटीश पिरियड असा नोंदवला.
तो ख्रिश्चन पिरियड का नाही?
भारतीय संस्कृती ही गंगाजमुना तहजीब आहे. सुफी संगिताचा सर्वांवर प्रभाव आहे. खाद्यपदार्थ, बांधकाम शैली, भाषा, कला अशा कित्येक गोष्टी एकसारख्या/एकरूप आहेत. गावच्या पिराच्या जत्रा हिंदू करतात तर मुस्लीमही ग्रामदेवतेला मानतात.
हिंदुमुस्लीम दंगली, फाळणीच्या जखमांनी, सांडल्या गेलेल्या रक्ताने, अतिरेकी कारवायांनी मानसिक पातळीवर खूप कटूता आली. ते सतत वाढती राहील अशी व्यवस्था दोन्ही धर्मातल्या सनातन्यांनी केली.
आजही तिला खतपाणी घालणारे अतिरेकी पाकीस्थानच्या दुष्टाव्यामुळे सातत्याने कार्यरत असतात. त्यामुळे सामाजिक दरी वाढतच जाते. काही फुटीरतावादी नतद्रष्ट संघटना ह्याच उद्योगाच्या आधारे मोठ्या झाल्यात. द्वेषाच्या वखारी चालवणारे हे राजकीय व्यापारी. सांस्कृतिक ठेकेदार.
गोव्यात पोर्तुगिजांचे राज्य होते. त्यांनी तिथे एकरूप नागरी संहिता लागू केलेली आहे.
उर्वरित भारतातही ती लवकरात लवकरात यायला हवी. पण तिच्यासाठी लोकशिक्षण, प्रबोधन करायला हवे. बळजोरी हा मार्ग नव्हे.
मुख्य म्हणजे ते करताना बहुसंख्यांकांच्या धर्माचे कायदे सर्वांवर लादणे हा मार्ग नव्हे.
स्त्रियांच्या नजरेने न्याय कायदे बनवणे हा मार्ग आहे.
हिंदू सनातनी बोलताना काय म्हणतात? "त्यांना चारचार बायका करायची परवानगी, पण आम्हाला मात्र....." याचा अर्थ त्यांना तो हिंदू पुरूषांवरचा अन्याय वाटतो. मुळात तो मुस्लीम स्त्रीवरचा अन्याय आहे. मुस्लीमांना कुटुंब नियोजनाला प्रवृत करण्याऎवजी हिंदू बुवाबाज हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालावीत असं सांगतात. का तर जास्त मुलं म्हणजे जास्त मागासलेपणा. जास्त मागासलेपणा म्हणजे सनातन्यांची मागासांवर जास्त पकड. समाजाचे ,देशाचे भले गेले खड्यात, त्यांना आपली पकड मजबूत करायचीय. देश नी समाज गेला खड्ड्यात. जास्त मुलं जन्माला घाला हे सांगणारे नतद्रष्ट लोक देशद्रोहीच आहेत.
तर एकरूप नागरी संहितेचा आणि आरक्षणाचा काडीमात्र संबंध नाही.
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment