१९७० च्या दशकातली आठवण आहे. मला बाबांच्या नाना पेठेतील घरी काही पुस्तकं द्यायला जायचं होतं. बाबांना फोनवर पत्ता विचारला तर म्हणाले, "तू एक काम कर, नाना पेठेत आलास की प्रकाश ऑईल मिल कोणालाही विचार. प्रकाशच्या बरोबर समोरचं घर माझं." मी सायकलवर नाना पेठेत पोहचलो. एका चौकात ट्रॅफिक हवालदाराला विचारलं, "प्रकाश ऑईल मिल कुठेय?" तो म्हणाला, " सरळ जा. डॉ. बाबा आढावांचं घर विचारा. कोणीही सांगेल. त्यांच्या घरासमोरच आहे प्रकाश मिल."
बरंच पुढे गेल्यावर पुन्हा एकदा खात्री करावी म्हणून एका दुकानदाराला विचारलं तर त्यानंही त्याच शब्दात सांगितलं. जवळ पोचल्यावर चौकात एका हमालाला विचारलं तर तो म्हणाला, " पाव्हनं, तुम्ही परकाश मिल नका इचरू. ती नाय माहित कुनाला. तुम्ही आप्लं बाबांचं घर इचारा बगा. कोनीपण आंदळा सांगतोय बगा!"
खूप लहानपणी आम्ही काही दुखलं खुपलं तर हडपसरच्या साने गुरूजी रूग्णालयात जायचो. पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा चौकशी करताना एका हॉटेलवाल्याला विचारलं, तर तो म्हणला, " साणे गुर्जी काय आप्ल्यावाल्याला माहित नाय ब्वॉ. पण पुढच्या चौकात बाबा आढवांचा दवाखाना आहे. तिकडं जा. १०० टक्के गुण येतोय बगा. मोक्कार पैसं कशाला घालवताय? बाबांच्यात २ रुपयात काम होतंय बगा." दवाखान्यावर साने गुरुजी रुग्णालय असाच बोर्ड होता. मात्र पंचक्रोशीत तो फेमस होता आढवांचा दवाखाना म्हणूनच. वैद्यकीय क्षेत्रात इतकं उत्तम काम बाबांनी केलेलं होतं.
माझ्या एका सदाशिव पेठी मित्राच्या घरी सगळं काही चितळेंचं हवं असायचं, दुध, बाकरवडी, श्रीखंड. पण त्यांना भजी मात्र हमाल पंचायतीचीच हवी असायची. का? तर तशी चव पुण्यातल्या इतर कुठल्याही हॉटेलात मिळायची नाही. हमालांना नेमकं माहित असतं उत्तम बेसन कोणतं, शुद्ध तेल कोणतं? बनवणार्या हमाल कष्टकरी महिलांच्या हाताला छान चव असल्याने ही भजी अख्ख्या होल पुण्यात फेमस. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफ्रेशर कोर्सच्या सगळ्या प्राध्यापकांना हमाल पंचायतीचं जेवन दिलं होतं, त्याची आठवण आजही प्राध्यापक काढतात.
व्ही.पी.सिंग पुण्यात आले की ही भजी खायला हमाल पंचायतीवर यायचे. एकदा तर त्यांना मी बाबांच्या स्कूटरवर मागे बसून बंडगार्डनला जाऊन ही भजी खाताना बघितलंय. व्हीपी राजघराण्यातले होते, पण बाबांशी त्यांचं छान जमायचं. सगळा जामानिमा, प्रोटोकॉल गुंडाळून ते बाबांच्या स्कूटरवर बसायचे. फिरायचे. ते जास्त काळ पंतप्रधानपदी टिकले असते तर हमाल, कष्टकरी, अंगमेहनती, असंघटितांसाठी त्यांनी फार भरीव काम केलं असतं. त्यांनी मंडल आयोग लागू केला त्यामागे बाबांचीच प्रेरणा होती.
बाबांना राजकारण आणि राजकारणी यांच्याबद्दल तीव्र नफरत आहे. त्यांची ही अढी कमालीची धारदार आहे. महात्मा फुले स्मारकाचा राष्ट्रार्पण सोहळा आम्ही तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते केला होता. त्या कार्यक्रमात बाबांचा राष्ट्रपतींच्या हस्ते भव्य सत्कार करावा अशी सुचना मी मांडली. छगन भुजबळांनी ती मान्य केली. मात्र बाबा होकार देतील का अशी त्यांना शंका होती. त्याला कारणही तसेच होते. या स्मारकावर मी भुजबळांना सर्वप्रथम घेऊन आलो.
ह्या कामाची स्थानिक जबाबदारी मीच पाहात होतो. भुजबळांमुळे एका विशिष्ट समाजाचे या कामाभोवती कोंडाळे जमू लागले. या कामात बाबांचा सल्ला घ्यावा असं मी खूपदा सुचवलं. पण भुजबळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले असल्याने बहुधा त्यांच्या मनात समाजवाद्यांबद्दल अढी होती. ते टाळाटाळ करू लागले.
मग मी बेरकीपणा केला. माझ्या एका पत्रकार मित्राकरवी मी एक बातमी छापून आणली. महात्मा फुले स्मारकाला अमूकतमूक जातीचे कुंपण अशी. जादूची कांडी फिरावी तसे भुजबळ बदलले. बाबांना भेटूया का म्हटल्यावर तात्काळ हो म्हणाले. आत्ताच जाऊ या म्हणाले.
मी बाबांच्या घरी फोन केला आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री भुजबळ, फुले स्मारकाबद्दल चर्चा करायला, तुमचे मार्गदर्शन घ्यायला अर्ध्या तासात तुमच्या भेटीला येत आहेत असे कळवले. आम्ही बाबांच्या घरी गेलो. मी दोघांना बोलते करायचा अटोकाट प्रयत्न केला. पण बाबाच ते. ते भुजबळांशी डायरेक्ट अवाक्षरही बोलेले नाहीत. बाबा मला उद्देशून बोलायचे. " हरी, असं करायला हवं, तसं करायला हवं."
घरी आलेल्या मंत्री भुजबळांचा त्यांनी मान ठेवला नाही याचा मला राग आला. भुजबळही माझ्यावर नाराज झाले. त्यामुळे सत्काराला बाबांची पुर्वसंमती घे असे त्यांनी मला बजाऊन सांगितले. मी बाबांना राष्ट्रपतीच्या सत्काराला नाही म्हणू नका अशी गळच घातली. आठवडाभर विचार केल्यावर मगच त्यांनी लेखी होकार दिला. या कार्यक्रम पत्रिकेला राष्ट्रपती कार्यालयाची मंजूरीही मिळाली. मात्र कार्यक्रम दोन दिवसावर आलेला असताना बाबांनी अचानक घुमजाव केले. आपण हा सत्कार स्विकारणार नाही असे पत्रक काढून त्यांनी घोषित केले. मी मात्र तोंडघशी पडलो. पुढे बाबांना आम्ही महात्मा फुले समता पुरस्कार द्यायचे ठरवले. परत भुजबळांनी मला आखरी वॉर्निंग दिली. यावेळी जर बाबा आले नाहीत तर परत कधीही त्यांना बोलवायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. पण बाबांनी माझी लाज राखली. ते आले. पुरस्कार स्विकारला. पुरस्काराची रक्कम रू. एक लाख स्विकारून त्यांनी स्वत:चे पंचवीस हजार त्यात घातले. ती रक्कम त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देऊन टाकली..
बाबांना मी पितृतुल्य मानतो. त्यामुळे त्यांच्या स्वभावदोषांकडे, त्यांच्या खोडीलपणाकडे दुर्लक्ष करायची मला सवय झालेली आहे.
किती दिवस स्कूटरवर फिरणार? त्यांनी आता फोरव्हीलर घ्यावी असे मला खूप दिवस वाटत होते. हमाल पंचायतीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना तसा आग्रह केल्यावर बाबा तयार झाले. मला म्हणाले, " तू टेल्कोत आहेस तर टाटांशी बोलून ते हमाल पंचायतीला डिलर्स कमिशनएव्हढी रक्कम कमी करतील असं बघ." मी सगळी उस्तवारी केली. त्याकाळात २५ हजार रूपये कमी किंमतीत टाटा सुमो बाबांना मिळणार याची व्यवस्था केली.
पण पुन्हा बाबांनी मला तोंडघशी पाडले. सार्वजनिक पैशाचा वापर काटेकोरपणे करण्याबद्दल बाबा अतिदक्ष असतात. त्यांनी ऎनवेळी टाटा सुमो न घेता दुसरर्याच कंपनीची गाडी घेतली. का? तर ती १३०० रुपये कमी किमतीत मिळाली म्हणून. आमचे वरिष्ठ, रावळसाहेब माझ्यावर नाराज झाले, म्हणाले, " बाबा भला माणस छे! त्यांना पैशाची अडचण होती तर मी स्वत: माझ्या खिशातले दहा हजार रुपये भरले असते."
बाबांमुळे मला बालवयातच महात्मा फुले भेटले. त्यांचं बोट धरूनच मी शाळकरीवयात पहिल्यांदा फुले वाड्यावर गेलो. त्यांच्या गाडीतूनच मी पहिल्यांदा मुंबईल गेलो. खाडीपुलावर गाडी थांबवून बाबांनी असा असतो समुद्र हरी, असं मला सांगितलं. त्यांच्यामुळेच मी मंडल आयोग चळवळ, नामांतर आंदोलन, विषमता निर्मुलन शिबीर, भटक्यांची चळवळ अशा शेकडो उपक्रमात भाग घेतला. त्यांच्यासोबत मी लाल डब्यातून म्हणजे एसटीतूनही खूप फिरलोय. लहान वयात ज्यांनी मला बोटाला धरून महाराष्ट्र दाखवला त्यात डॉ. बाबा आढाव आणि डॉ. नीलम गोर्हे यांचा नंबर पहिला-दुसरा आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचं काम मी करायला लागलो. दर सोमवारच्या मिटींगला मी न चुकता जायचो. समता व्याख्यानमालेतलं प्रत्येक व्याख्यान मी राहायला हडपसरला असो की पिंपरीला, सायकलवरून जाऊन ऎकायचो. माझ्या जडणघडणीत बाबांचा सर्वाधिक वाटा आहे.
एकदा माझ्या टेल्कोतील एक अधिकारी बाबांना माझ्याबद्दल सांगायला लागले तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, " निर्मल, तुम्ही मला हरीबद्दल काहीही सांगू नका. त्याची चुंगी बोटभर होती तेव्हापासून म्हणजे तो बाळुत्यावर, पाळण्यात होता तेव्हापासून मी त्याला ओळखतो. तो माझा बालपणापासूनचा पेशंट आणि पोरगा आहे." निर्मल खजील झाले. बाबा गेल्यावर ते मला विचारीत होते, बाबा म्हणाले, ती चुंगी काय असते? तू कसा काय जकात नाक्यावर असायचास?
बाबांचा स्वभाव अतिशय मिश्किल आणि रसिक आहे. चळवळीची गाणी, महात्मा फुल्यांचे अखंड, शेरोशायरी याचा त्यांना नाद आहे. त्यांच्यासोबतचा प्रवास कधीच बोअर होत नाही. त्यांचा खळाळता झरा अखंड वाहतच असतो. चुटके सांगणे, नकला करणे, मध्येच ड्रायव्हरला स्पीड, ब्रेक, क्लचबाबतच्या सुचना देणे असे अव्याहत चालू असते. बाबांची झोप हुकमी आहे. मनात आणले की त्यांचा तात्काळ डोळा लागतो. दहापंधरा मिनिटात ते पुन्हा फ्रेश होतात. लोणावळा, शिरवळ, सरदवाडी इथं त्यांच्या मित्रांची/चाहत्यांची हॉटेल्स आहेत. तिकडे पाचदहा मिनिटे थांबून चहा, वडापाव, मिसळ किंवा कोरडी भेळ असं खाणं झालं की निघाली गाडी पुढे. रस्त्यात स्वागताला हमाल येतात. पंचायतीच्या कष्टाच्या भाकर केंद्रावर नेतात, तिकडची पिठलं भाकरी हातावर घेऊन खाताखाता बाबा मिटींग करतात की निघाले पुढे. बाबांचा कामाचा उरक अफाट आहे. ( बाबांसोबत केलेले दौरे यावर स्वतंत्रपणे लिहायला हवे.)
माझ्या लग्नात बाबाच वरबाप होते. तेच साक्षीदार म्हणून पहिली सही करणारे होते. खिश्यातली सोनचाफ्याची फुलं सगळ्यांना प्रेमानं वाटणं हा त्यांचा नित्यपरिपाठ आहे. बाबांना चहा सोडला तर इतर कसलंही व्यसन नाही. त्यांचं अक्षर मोत्यासारखं आहे. बाळ गांगल यांनी जेव्हा महात्मा फुले यांच्यावर गरळ ओकले तेव्हा मी त्यांना सप्रमाण दिलेलं पहिले उत्तर बाबांनी वाचले आणि त्यांच्या देखण्या हस्ताक्षरात मला ते लिहून दिले.
आम्ही सारे १ जूनवाले. आमच्या शिक्षकांनी आम्हाला जन्मतारखा दिलेल्या. त्या काळात शाळा १ जूनला सुरू व्हायच्या म्हणून आमचे सगळ्यांचे जन्म एकाच दिवशी झालेले दिसतात. वर्षं तेव्हढी वेगळी. तारखा मात्र १ जून.
एकदा बाबा टिळक रोडवरून स्कूटरवरून जात होते. मी टिळक स्मारकाच्या गेटवर उभा होते. त्यांनी मला बघितलं. स्कूटर थांबवली. माझ्याजवळ आले नी म्हणाले, " अरे हरी, आज तुझा वाढदिवस ना! चल तुला मिसळ खायला घालतो. त्यांनी खिश्यात हात घातला आणि दीडरूपया खिश्यातून काढला व माझ्या हातावर ठेवला. तो माझा आयुष्यातला साजरा झालेला पहिला वाढदिवस आणि ते मला मिळालेलं पहिलं प्रेझेंट होय. तेव्हा मी २० वर्षंचा होते. बाबा स्कूटरवर बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज त्यांचाही वाढदिवस आहे. मी त्यांना थांबवलं आणि समोरच्या फुलवाल्याकडून एक गुलाब घेऊन त्यांना दिला. त्यांचा चेहरा उजळला. बाबा फार मधाळ हसतात. ते हसले आणि त्यांनी स्कूटरला किक मारली
उद्या बाबा आयुष्याची नव्वदी पुर्ण करून ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. बाबांनी त्यांच्या आयुष्यातली ९० पैकी ७५ वर्षे चळवळीत खर्ची घातली. त्यांची ना कुणी ५० साजरी केली, ना षष्ठब्धी, ना पंच्याहत्तरी, ना सहस्त्र चंददर्शन! अगदी साधी साधी माणसंही असे सत्कार करतात/करवतात. पण बाबांचा अशा सत्कारांना स्पष्ट विरोध असल्याने त्यांनी असल्या सत्कारांना/कार्यक्रमांना कधीही संमती दिली नाही. बाबांना सत्कार, सन्मान यांचा एकुण तिटकाराच आहे.
बाबा १९६२ ते १९७१ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. नागरी आघाडीतर्फे बाबांनी नाना पेठेचे प्रतिनिधीत्व केले. दोन्ही वेळेस ते याच वार्डातून निवडून गेले. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, काँग्रेसचे नेते शिवाजीरीव ढेरे, नामदेवराव काची, नामदेवराव मते असे मान्यवर त्यांचे पालिकेतील सहकारी होते. बाबा राजकारणातच राहते तर आपल्या गुणवत्तेवर ते महापौर, आमदार, मंत्री नक्कीच झाले असते. बाबा कुणबी मराठा असूनही राजकारणात रमले नाहीत. त्यांनी मराठ्यांच्या जातजाणिवांवर कडाडून हल्ला करणार्या पुस्तिका लिहिल्या. स्वजातीवर जाहीर टिका करणारे, हे तर शेटजीभटजीचे गुलाम/दास म्हणून बरसणारे बाबा हे मी ऎकलेले पहिले वक्ते आहेत. बाबांचं वक्तृत्व अस्सल आहे. ते कणवेनं बोलतात. अपार कळवळ्याने बोलतात. असा दुसरा वक्ता मी ऎकलेला नाही. ते कष्टकर्यांच्या भाषेत बोलतात. छोटीछोटी वाक्यं, बोलकी उदाहरणं, आजचे संदर्भ आणि कष्टकर्यांच्या घामाचा वास त्यांच्या शब्दांना असतो.
आणीबाणीत बाबा १९ महिने तुरूंगात होते. त्यावेळी त्यांचा आरएसएस सुप्रिमो बाळासाहेब देवरस यांच्याशी संबंध आला. त्यांच्याशी व इतर स्वयंसेवकांशी तुरूंगात झालेल्या चर्चांवरून त्यांनी रा.स्व.संघाच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेचे वाभाडे काढणार्या २ पुस्तिका लिहिल्या. संघाचे दांभिक रूप उलगडवून दाखवणारे पहिले मराठी लेखक बाबा आहेत.
जातीय दंगली रोखण्यासाठी बाबांनी राष्ट्रीय एकात्मता परिषद आयोजित केली. उद्घाटन पु. ल. देशपांडे यांनी केले. संघावर ताशेरे ओढताना पुल कडाडले, अर्ध्या चड्ड्या घालून काठ्या फिरवित केलेल्या कवायतींवर ते म्हणाले, " मला फाजील शिस्तीचं कौतुक काय सांगताय? अहो, त्या चिमुकल्या मुंग्यासुद्धा एका रांगेत चालतात. वांझोट्या कवायतींनी ताकद दिसते, सामाजिक परिवर्तन होते का? अजिबात नाही."
बाबांनी पायाभरणी केलेल्या चळवळींची, विधायक उपक्रमांची यादी शतकाधिक आहे. एक गाव एक पाणवठा, एक गाव एक मसणवटा, सामाजिक कृतज्ञता निधी, हमाल पंचायत, कष्टाची भाकर, कागद काच पत्रा पंचायत, रिक्षा पंचायत, धरण ग्रस्तांच्या पुनर्वसनाची चळवळ, भटक्यांची चळवळ ही यादी अशीच वाढते आहे. आज नव्वदीतही बाबा अनेक पातळ्यांवर झुंजताहेत.
बाबा उत्तम लेखक आहेत. त्यांचं "एक गाव एक पाणवठा" हे पुस्तक मौज प्रकाशनानं काढलंय. "सुंबरान " मेहतांनी काढलंय तर इतर अनेक पुस्तकं नविन इंदलकर व श्रीविद्या प्रकाशन आणि म.फु.समता प्रतिष्ठाननं काढलीयत.
बाबा गेली ५० वर्षे प्रतिष्ठानचं पुरोगामी सत्यशोधक हे मासिक चालवतात.
त्याचे य. दि. फडके, सीताराम रायकर, अनिल अवचट, किशोर बेडकीहाळ आदींनी संपादित केलेले विशेषांक मौलिक होते. दत्ता काळबेरे आणि बापू विरूळे त्यांना गेली ५० वर्षे संपादन सहाय्य करतात.
देशातल्या ५० कोटी असंघटितांसाठी बाबांनी मनमोहन सिंगांच्या काळात अपार झुंजून अंब्रेला कायदा मिळवला. १९६९ पासून झालेले हमाल, माथाडी कायदे हे बाबांच्या लढ्याचेच फलित आहेत.
बाबा हे महात्मा फुले यांचे खरे वारस आहेत. फुले यांचे सहकारी गोपाळबाबा वलंगकर, ना.मे. लोखंडॆ, कृ.पां. भालेकर, जागृतीकार पाळेकर, नंतरचे नेते जेधे, जवळकर आदींचे साहित्य आणि चरित्रे यांच्या प्रकाशनात बाबांचा पुढाकार होता. आहे. ते संशोधक नसले तरी समता प्रतिष्ठानचा संशोधन विभाग हे बाबांचे मोठे काम आहे.
काल एबीपी माझा वाहिनीच्या कट्ट्यावर बाबांची मुलाखत झाली. राजीव खांडेकर, प्रसन्ना जोशी आणि सहकार्यांनी बाबांना बोलते केले. एक तास भुर्कन संपला. बाबांना नेतृत्वची दुसरी पिढी का घडवता आली नाही या प्रश्नावर बाबा प्रांजळपणे म्हणाले, "मीही माणूसच आहे. माझ्या स्वभावात काही दोष आहेत. त्यामुळे माझ्याकडून काही उणीवा राहिल्या हे मी कबुल करतो."
बाबांना मी अनेक वर्षे अतिशय जवळून बघितल्याने माझ्या हे लक्षात आलेय की बाबा इतर कुणाच्याही हाताखाली किंवा सोबत काम करू शकत नाहीत. ते एकांडे शिलेदार आहेत. त्यामुळे त्यांच्या सगळ्या उपक्रमात तेच एकखांबी तंबू असतात. इतरांनी विशेषत: त्यांच्या पुर्वीच्या सहकारी, कार्यकर्ते, अनुयायांनी स्वतंत्रपणे केलेल्या लेखनाला, कार्यक्रमांना, उपक्रमांना बाबा कधीही मान्यता देत नाहीत.
माझीच दोन उदाहरणं सांगतो. महात्मा जोतीरावांनी लिहिलेले अखंड आकाशवाणीवर गायले जावेत ही बाबांची जुनी इच्छा. मी आणि सुषमा देशपांडेने खूप मेहनतीने " गीतफुले" ही ध्वनीफित बनवली.
देवदत्त साबळेचे अप्रतिम संगीत, शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप, रवींद्र साठे, रंजना जोगळेकर, शरद जांभेकर आदींचे अनवट स्वर अशी छान कॅसेट बनवली. बाबांना तिची प्रत दिली. त्यांनी ती ऎकली. त्यांना ती आवडलीही असावी. पण त्यांनी तसे कधीही बोलून दाखवले नाही. उलट असे काम झालेलेच नाही अशाच पद्धतीने ते पुढेही कायम बोलत राहिले.
"महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन" हे बाळ गांगलना दिलेले उत्तराचे माझे पुस्तक खूप गाजले. त्याला अनेक पुरस्कार मिळाले. बाबांना मी पुस्तकाची प्रत दिली. त्यांनी रागाने पुस्तक घेतले आणि दूर भिरकाऊन दिले. मी हादरलोच. ते चिडलेले होते. काहीतरी पुटपुटत होते. त्या पुस्तकात त्यांचा सहभाग नव्हता याचा त्यांना राग आलेला असावा.
सावित्रीबाई फुले यांच्या अस्सल छायाचित्रावरून रंगीत तैलचित्र करवून घेऊन मी छगन भुजबळांच्या माध्यमातून शासनातर्फे ते प्रकाशित करवले. ते राष्ट्रीय महापुरूषांच्या मालिकेत समाविष्ट करायला लावले. नायगावला सावित्रीबाईंचे स्मारक आणि शिल्पसृष्टी यांची उभारणी भुजबळांच्या माध्यमातून करवली. प्रत्यक्ष फिल्डवर महिनोन महिने त्यासाठी काम केले.
पुढे तशी बातमी एका वर्तमानपत्राने दिली असता बाबांनी त्यांच्या पीएमार्फत खुलासा प्रकाशित करायला लावला आणि ते काम त्यांनी केल्याचा दावा केला. मला वाईट वाटले. खरे तर त्या छायाचित्रावरून कोणकोणा चित्रकारांकडून मी पोर्ट्रेटस बनवून घेतली, ती कुठे आणि कशी छापली याचा बाबांना पत्ताही नव्हता, आजही नाही. असो. मोठ्या माणसांच्या या छोट्याछोट्या खोडी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवे. बाबांचे माझ्यावर इतके उपकार आहेत की या बाबी छटाकभरसुद्धा भरणार नाहीत. कायम लक्षात आहे ते त्यांचे देणे. शिकवणे.
विद्यापीठ नामांतर हा बाबांचा ध्यास होता. बाबांनी त्यासाठी अनेकदा कारावासही भोगलेला होता. त्यातल्या एका कारावासात तर मीही त्यांच्यासोबत होतो. बाबा अतिशय स्वाभिमानी आहेत. मुळात बहुतेक सर्व राजकारण्यांबद्दल बाबांच्या मनात अढी आहे हे मी आधी नमूद केलेलेच आहे. त्याला तशीच काही कारणेही आहेत म्हणा.
१४ जाने. १९९४ ला शरद पवारांनी नामांतर केले याचा बाबांना फार आनंद झाला. ते पवारांचे अभिनंदन करायला, पुष्पगुच्छ घेऊन गेले. त्यांचे पवारांकडे इतर कसलेही काम नव्हते. पवारांनी त्यांना मुद्दाम ताटकळत बसवून ठेवले. दोनेक तासांनी बाबांना अतिशय मानणारे एक ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री तिकडे आले. त्यांनी बाबांना असे बसलेले पाहिले. त्यांनी बाबांना हाताला धरून आत नेले. बाबा नकोनको म्हणत होते, पण मंत्र्यांनी ऎकलेच नाही. ते पवारांना आवडले नाही. पवार अतिशय कर्टली म्हणाले, " बाबा बाहेर थांबा, मी बोलावतो तुम्हाला." या घटनेला आज २७ वर्षे झाली तरी हा अपमान बाबा विसरलेले नाहीत. अशा गोष्टी त्यांच्या जिव्हारी लागतात.
व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवनातील लख्ख चारित्र्य, सार्वजनिक पैशांबाबतची साधनसुचिता, कष्टकर्यांविषयीचा अपार कळवळा याबद्दल बाबांना १०० पैकी १०० गुण द्यावे लागतील.
महात्मा फुले हा बाबांचा विक पॉईंट आहे. आज बाबा नसते तर महात्मा फुले विसरले गेले असते असे म्हणता येईल इतके मोठे काम त्यांनी केलेले आहे. एक आठवण आहे. सारस बागेसमोर सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा आहे. त्याला फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून कोप्च्यात टाकले होते. फुलवंताबाई झोडगे, बाबा यांच्यासोबत आम्ही महापौरांना भेटायला गेलो होतो. महापौर बाबांच्या दूरच्या नात्यातलेच होते. ते या कामाबद्दल टाळाटाळ करताहेत म्हटल्यावर बाबांचा पारा चढला. तर ते महापौर म्हणाले, " बाबा आपल्याला काय करायचेय, बघतील सावित्रीबाईंचे जातवाले."
बाबा कडाडले, "महापौर, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. सावित्रीबाई झाल्या नसत्या तर तुमचे आजी-आजोबा, आई-बाप शिकले नसते आणि आज तुम्ही या पदावर पोचू शकला नसतात हे विसरू नका. आज नैतिकतेचा कोणताही ’अंकुश’ तुमच्यावर नसल्यानेच तुम्ही मस्तवाल झालेले आहात. तुम्ही आधी माफी मागा!"
बाबांचा नैतिक दरारा असा होता, आहे की महापौरांनी तात्काळ माफी मागितली.
त्यांनी एका सहआयुक्तांना बोलवून घेतले. बाबांनी त्यांना कामाचे स्वरूप सांगितले. आश्चर्य म्हणजे ते सहआयुक्तही नेमके तसेच बोलले जे आधी महापौर बोलले होते. बाबा इतके संतापले की त्यांना शब्दच सुचेनात. ते सहआयुक्त ओबीसी होते. बाबा त्यांना म्हणाले, " तुम्ही आज अधिकारी कोणामुळे झालात? तुम्हाला या मनपा भवनमध्ये भिक मागायला तरी कोणी येऊ दिले असते का? ही कृतघ्नता मी खपवून घेणार नाही. मी गेटबाहेर सत्याग्रह सुरू करतोय. जोवर हे काम होणार नाही तोवर मी अन्नपाणी घेणार नाही." ते अधिकारी चपापले, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि ताबडतोब काम सुरू केले. अतिक्रमणे एका दिवसात हटवली गेली.
- प्रा. हरी नरके, ३१/५/२०२०