Showing posts with label गरिबी. Show all posts
Showing posts with label गरिबी. Show all posts

Monday, June 17, 2019

जिगरबाज किर्तीला पुरस्कार








२० फेब्रुवारी २०१९ रोजी मी जिगरबाज किर्ती अशी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती.
ती वाचून अनेकांनी किर्तीच्या शिक्षणाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मात्र किर्तीने मला तुमच्या शुभेच्छा हव्यात, आशीर्वाद हवेत, आर्थिक मदत नको, अशी भुमिका घेतली.
कोल्हापूरच्या स्वयंसिद्धाच्या तारा दिवेकर यांनी किर्तीला तिच्या जिद्दीला पुरस्कार द्यायचे ठरवले.
परवा तो कार्यक्रम झाला.

फेसबुकच्या पोस्टचा असाही उपयोग झाल्याचे बघून आनंद वाटतो.
अभिनंदन, किर्ती.
...................................
जिगरबाज किर्ती- प्रा.हरी नरके
रात्री साडेसातची वेळ. चिपळूण रत्नागिरी हायवे. विशीतली दोघं भावंडं गावाकडं, घराकडं निघालीयत. एका भरधाव एस.टी.बसनं दोघांनाही उडवलं आणि ती बेदरकारपणे निघून गेली. बहीण थोड्या वेळानं शुद्धीवर आली. भाऊ रक्तानं माखलेला होता. ती हायवेवरून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांना मदतीसाठी विनंती करीत होती. जिवाच्या आकांतानं ती मदतीसाठी रडत-ओरडत होती. तासाभरात किमान पन्नास गाड्या तिथून आल्या - गेल्या. पण कोणीही थांबलं नाही. तासाभरानं भावानं प्राण सोडला.
त्यानंतर एकानं गाडी थांबवली. त्या दोघा बहीणभावंडांना आरवलीत आणून सोडलं. एकुलता एक मुलगा गेल्याचं बघून आई वडीलांनी, आजी आजोबांनी हंबरडा फोडला. आजोबांचा नातवावर फार जीव होता. आजोबा हाय खाऊन आजारी पडले आणि त्यातच ते गेले.
वडील हायवेवर चहाची एक टपरी चालवत होते. रस्ता चौपदरी होणार होता. शेजारच्या दोघा टपरीधारकांनी आपल्या टपर्‍यांचं मुल्यांकन करून घेतलं. प्रत्येकाला सतरा लाख रुपये भरपाई मिळाली. वडीलांना निरक्षरतेमुळं यातलं काहीच माहित नव्हतं. जेव्हा कळलं तोवर उशीर झालाय असं अधिकारी म्हणाले. गेली १८ वर्षे त्यांची चहाची टपरी आहे. ग्रामपंचायतीच्या तश्या नोंदीही आहेत. पण शून्य रुपये शून्य पैसे भरपाई मिळणार असं सांगितलं गेलं. हाताशी आलेला मुलगा नुकताच अपघातात गेलेला. घरात आई,पत्नी आणि मुलीसह खाणारी चार माणसं. त्यांनी धसका घेतला. ते हार्टॲटॅक येऊन गेले. निरक्षर कुणब्यांची परवड काही थांबत नाही.
आजीची मुलावर आणि नातवावर आभाळमाया. ती उदास झाली. खचली. पंधरा दिवसात आजीही गेली.
दरम्यान मावशी आणि काकाही वारल्याचं कळलं.
मायलेकी तशाही आघातांमध्ये पाय रोऊन उभ्या होत्या. झुंजत होत्या. पण आई गेलेल्यांसाठी झुरतही होती. वर्षभरात तीही गेली.
किर्तीनं एका वर्षात जवळचे, मायेचे, आतड्याचे एकुण सातजण गमावलेले होते.
नियती इतकी क्रूर कशी काय असते?
किर्ती सध्या चिपळूणला एम.ए.च्या प्रथम वर्षात शिकतेय.
चहाची टपरी चालवतेय. काल संगमेश्वरला शिवजयंतीला माझं भाषण ऎकायला आली होती.
पोरगी खरंच जिगरबाज आहे.
प्रा. हरी नरके,२० फेब्रुवारी २०१९

Friday, August 31, 2018

तीस लाख एक वार, पस्तीस लाख तीन वार -







समाजभूषण महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापकाची एक जागा भरायची होती.
जाहीराती वाचून अर्ज केलेले, महाविद्यालयाचे
कॉल लेटर मिळालेले १८७ उमेदवार मुलाखतीला आलेले होते.

संस्थेचे चेअरमन एकदम साधे होते. गरिबांचे कनवाळू. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. मुलगा मागच्या सरकारमध्ये मंत्री होता. जावई या सरकारमध्ये राज्यमंत्री आहे. हे झेड.पी.अध्यक्ष होते. त्यांच्या अंगावर अवघं शंभरेक तोळे साधं सोनं होतं. हातांच्या आठही बोटांमध्ये हिर्‍याच्या साध्या अंगठ्या होत्या. अगदी साध्या बीएमडब्ल्यूमधून ते महाविद्यालयात मुलाखती घ्यायला आले होते. ते गेली २२ वर्षे आमदारही होते. त्यांच्या मुलाची चौथी टर्म चालू आहे. एकदम साधे, आरपार समाजसेवक घराणे. गरिबांबद्दल, समाजाबद्दल मुबलक आस्था असलेले.

मुलाखतीला जमलेली ह्ही गर्दी बघितली आणि त्यांचं हळवं काळीज भरून आलं. ते कळवळले.
गाडीतून उतरले आणि थेट गर्दीमध्ये घुसले.

त्यांचा गळा भरून आला होता. म्हणाले, " तुम्ही लोकं लांबलांबून आलेले हायेत. सकाळधरनं उपाशीतापाशी हायेत. आम्ही मानुस्की असलेले, सकारात्मक विचार करणारे हावोत. आधी चहा नास्ता करा. फिरेश व्हा. समदे पैशे कॉलीज देईल असा आम्ही निकाल घेतलेलाय. माणुसकी हाये आमच्याकडं." त्यांनी तीनचार शिपायांना पिटाळलं. दोनतीन पोती भेळ आणली. बटाटेवडे आणले. २०० कप चहा मागवला.

मुलाखतीला आलेले सगळे भावी प्राध्यापक भाराऊन गेले. आजवर इतक्या ठिकाणी मुलाखतीला गेलो पण चहा सोडा, साधं पाणीही कुणी विचारलं नाही. यांनी तर चहा-नास्ता सारं काही दिलं. घरंदाज वळण असणार. दिलदार माणसं. एकदम खानदानी.

इंटरव्ह्यूची तयारी झाली. सगळे उमेदवार एका रांगेत बसले.

परत चेअरमन बाहेर आले. त्यांनी समद्यास्नी कालीजकी बात केली.

म्हणाले, " तुम्हाला मायंदाळ कामं हायत. आम्हाला पण हायकमांडला भेटायला जायाचं हाय. निवडणुकांच्या तयारीला लागायचंय. टायमाची खोट कशाला करा म्हन्तो मी?

" आता तुम्हालाबी माहितहाय. सार्‍या जगालाबी माहितहाय. ताकाला जाऊन भांडं लपवा कशाला? शिक्षणाचं पवित्र कामाय. जन्तेची सेवा कर्ण्यासाठीच आमचा जन्माय.
भौजन समाजाचं शिक्षाण म्हणजे देवी सरस्वतीची पूजा. आज आमचा कडकडीत उपासाय. फकस्त लिंबूपानी घेणार.

तुमचे समद्यांचे इंटरव्ह्यू म्हण्जे सोपं कामाय का? दोनतीन दिवस तर सहज मोडतील. मी गेली ४० वर्षे या संस्थेचा फौंडर- पेरसीडेंड असल्यानं मी टाईम वाचवण्याचा निकाल घेतल्याला हाय.
आपुण दहा मिन्टात काम संपवू. पटापट. आमच्या ह्या पवित्र विचारान्ला, उपस्थित सचिव, प्राचार्य, व्हीसी नामिनी, बीसी नामिनी, सब्जेट एसकपरट या समद्यांचा पाठींबाय. काय मंडळी, बरोबर हाय ना? आपण लोकशाहीवादी हावोत.

" आयडीयाची कल्पना सिंपल हाये.  की ब्ब्वा, मी एकवार, दोनवार, तीनवार बोल्तो.
तीस लाखापासून सुरू कर्तो.

" तुम्ही मंडळींनी टेन्शानची काळजी कराची नाय. तसलं अज्याबात काम नाय. आम्ही कॅश बंद केलेलीया. ज्यांच्याकडं एव्हढं मट्रील नसल त्यांची पण काळ्जी आम्हाला हायेच. तसं पाह्यलं तर आपल्या हिंदू धर्मात तसं म्हनलंच हाये. तुम्ही झाले तरी अम्चे बंधूच बघा. तुमचा आमचा आत्मा एकचाय. झालंच तर त्यो जयशीरी राम बघतोच हाय. तुमच्याकडं एकरदोन एकर जमीन असंल तर ती आमचे वाईस चेरमन, कमिटी मेम्बरं, खजिनदार कोणीपण इकत घेतीला. जमीन नसंल तर सोननाणं चालंल. तेही नसंल तर घरदार इका. आमचे दयाळू कॅशियर समदी व्येवस्था करतील.

"मायला कायच नाय म्हंता? आप्ला भौजन समाज लईच गरीबाय.

"चिंता करायची गरज नाय. आमची मॅनेजमेंट सकारात्मक इचार करनारीय. समद्या गोरगरीबांचं कल्यान झालं पायजेलाय. आपला समाज गरीबाय याची आमाला जानीवाय.
" आमच्या को आपरेटिव्ह बॅंकेचं तुम्हाला मेंबर करून घेऊ. 30-35 लाख कर्ज तात्काळमंदे मंजूर करू. पगारातनं फेडा आरामात. हाय काय आन नाय काय?

" मुख्य म्हंजे, आमच्या कालीजात शिकवायचं टेन्शान नाय घ्यायचं. परीक्षेला १००% कापीची सोय केल्याली अस्तीया. तुम्ही समद्या पोरास्नी काप्या पुर्वायच्या. पारचार्य, मॅनेजमेंट, पोलीस सम्दे तुम्हाला सहकार्य करतील. एक्मेका साय्य करू, अवघे धरू सुपंत. आपुन सम्दे सौंस्कारवाले लोकं. लई इस्ट्रिक कामाय आपलं, मेरीट पायजेलाय, काय पायजेलाय १०० परशेंट मेरीट! नॅकला ए पलस मिळायला पायजे. काही लोकांनी आपल्या भौजन समाजाला हाजारो वर्षे शिकू दिलं नाय. आम्ही ही इद्येची पानपोई खोल्ल्याली हाये. मायंदाळ सिका मायला.ऎश करा.

आमच्च्या निवडणूकीत तेव्हढा डोर टू डोर परचार करायचा. वर्षभर फुकाट पगार खायचा. शेती करा. वडाप चालवा. हाटेल, दुकान काडा. टुशन करा.
"आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा एज्युकेसनल उद्धार कराचा हाये. तुमच्यात जे कोणी आमचे समाजबंधू आसतील त्यांना साडेतीन हजाराचा घसघसीत डिस्काऊंट बी मिळ्णारेय. आमचा समाज लई गरीबाय. लयच अन्न्याव झालेला हाये. अगदी दलित -आदीवाशीं, ओबीसीपेंक्शा मागासलेला. त्याला डिस्काऊंट मिळायलाच पाज्येलहाय.

"झालंच तर आपुन अव्वल देशभक्त हाओत. सैनिक कल्याण पोग्रामला दायेक हजार पाठवू. वनवाशी परकल्पाला देणारोत. तालुक्यातल्या अनाथ आस्रमाला पाच हजार. गावच्या मरियाईच्या जागृत देवस्थानाला वीस हजार. सौंस्कारवाल्या मिशिवाल्या गुर्जीन्ला पन्नास हजार द्यायचेत. जयंत्या, मयंत्या हायेतच. गावचा उरूसाय. मोर्चे हायत.

गो साळेला दहा ठरलेत. गनपतीची वरागणी पंचिस, नवरात पंचिस, लई खर्च अस्तोय बाबा. आनी त्ये पोर्टेक्शन मणी, पार्टी फंड, शिक्षाणमंत्री, जाईंट डीई, मिडीयावाले, आरटीआयवाले, .... ये सब करणा पडताय बाबा! लई खर्च अस्तोया. पण तुम्ही चिंता म्हणून कराची नाय.

आपला माहारास्ट्र लई मोठ्या लोकांचा. महाराना परताप, थोरलं छ्त्रपती महाराज, चवाण सायेब, कर्मवीर आण्णा, फुले, शाऊमहाराज, टिळकसायेब, सावरकर, अन्ना हजारे, अन्नाबौ, आंबेडकरबाबा, भगतसिंग, तुकाराम महाराज लई मोठ्ठी माणसं. आपुण त्यांना लय मान्तो. कडक भक्ताय आपुन. आपण तसा परमपूज्य साणे गुर्जी ते शीरी गुर्जी, समद्यान्ल्ला मान्तो. सर्कार कुणाचंबी अस्लं तरी आपलं समद्यान्सी संमद बेस्ट हायत. आसं समजा आमच्या गावात आमीच सरकार.

" तसं पाह्यलं तर आमच्या वाट्याला कायच उरत नाय बघा. एक सांगतो. या धंद्यात आजकाल कायच सुटत नाय. उगा आमच्या सुटलेल्या पोटावर जाऊ नका. समाजशेवा म्हणून आमचा हा कालीज चालवण्याचा पोग्राम हाये. मी चेर्मन झाल्यापासून परचारयान्ला दम दिलेला हाय. मी खानार नाय. तुमाला खाऊ देणार नाय. लई इस्ट्रिक कामाय आपलं. तशे सौंस्कारच हायेत आपल्यावर. म्या उपासतापास कर्णारा मानूसाय.

"बोल्न्यात येळ कायले घालवायला लागले? नाय. नाय. टाइम लई म्हत्वाचा हाय. शिक्सान परमेश्वरी कामाय. तुमच्यासारख्या इद्वान मान्सान्ला ताटकळत ठुयाचे संस्कार नाहीएत आमचे.

"तर मी ईसटार्ट करतो. तीस लाख एक वार...तीस लाख एकवार.. बस्तीस लाख दोन वार, पस्तीस लाख तीन वार...."
बोला आप्ला भौजन समाज जिंदाबाद. सिक्षान जिंदाबाद.
इंटर्यू खतम. बाकीचे निघा आता.

फायनल सिलेक्शान झालेलं हाय.

बोला सर, तुमचं नाव काय?
-प्रा. हरी नरके, ३१ ऑगष्ट २०१८


Wednesday, August 15, 2018

मी बायको शहीदाची -



म्हातारीनं त्याचं पाय धरलं, विनवणी करीत म्हणाली " लेकरा, अरं, सरकार ज्यांचं हे स्मारक बांधतंया त्या शहीदाची मी बायको हायं रं!"....
कामेरी - पुणे कोल्हापूर महामार्गावरचं गाव. ते सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं संपन्न गाव आहे. इस्लामपूरपासून 7 कि.मी. तर कोल्हापूरपासून 40 कि.मी.वर ते वसलेलं आहे. बागायती शेती करणार्‍या कष्टाळू लोकांचं गाव. आणि "लढावू" लोकांचंही गाव.

दिवंगत अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1980 साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारकं उभारण्याचं ठरवलं.

कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू झालं.

कंत्राटदारानं काही मजूर कामावर लावलेले होते.

एक म्हातारी मजूर आजारी होती. तिच्या अंगात खूप ताप होता. तिच्याच्यानं घमेली उचलण्याचं काम होत नव्हतं. कंत्राटदारानं घरी जाऊन आराम करा, दवापाणी घ्या असं तिला सांगितलं.

म्हातारी म्हणाली, "बाबा, दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी माझी चुल पेटंल. मी आज काम केलं नाही तर खाऊ काय? मला काम करू दे बाबा, मी पाया पडते तुझ्या."

म्हातारीचा तोल जात होता. दोनदा तिनदा ती पडतापडता वाचली.

म्हातारी काम करताना पडली तर अपघात होईल आणि आपल्या डोक्याला विनाकारण ताप व्हायचा, म्हणून कंत्राटदार चिडला आणि त्यानं तिला हाताला धरून कामावरून बाहेर काढलं.

म्हातारीनं त्याचं पाय धरलं, विनवणी करीत म्हणाली " लेकरा, अरं, सरकार ज्यांचं हे स्मारक बांधतंया त्या शहीदाची मी बायको हायं रं!"

कंत्राटदार चरकला. म्हातारीला घेऊन तो दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी म्हातारीला तपासलं. औषधं दिली. कंत्राटदाराला सांगितलं, आजार खूप गंभीर आहे. म्हातारी चार दिवसांचीच सोबतीन आहे. त्याच आजारात बाई गेल्या. स्मारक पुर्ण झालेलं त्या बघू शकल्या नाहीत.

होय, त्या कामेरीचे स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या विष्णू भाऊ बारप्टे यांच्या वृद्ध पत्नी होत्या.

अन्नाला मोताद झालेल्या. आयुष्यभर मोलमजुरी करून पोट भरणार्‍या.

9 ऑगष्ट 1942 ला महात्मा गांधीजींचा "चले जाव" चा नारा आला. कामेरीच्या तरूणांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन "वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद, ब्रिटीशराज चले जाव" अशा घोषणा देत पोलीस चौकीवर मोर्चा काढला. त्या मोर्च्याचा नेता होते, तरूण विष्णू भाऊ बारप्टे. त्यांनी पोलीसचौकीवर चढून तिरंगा लावला. "वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद" चे नारे लावले.

तिथला ब्रिटीश पोलीस अधिकारी जनरल डायरचाच भाऊबंध होता. तो भडकला. तुम्हाला काय पायजे? असं त्यानं विष्णूला विचारलं. निधड्या छातीचे विष्णू भाऊ बारप्टे म्हणाले,         "आझादी पाहिजे."
हे घे, असं म्हणत त्यानं थेट विष्णूच्या छातीत गोळी झाडली. विष्णू भाऊ बारप्टे जागेवरच शहीद झाले.
त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. माहेरातून कामेरीला आलेली त्यांची तरूण पत्नी विधवा झाली.

ब्रिटीश पोलीसांनी तिचाही अपार छळ केला. बाई काही काळ गाव सोडून परागंदा झाल्या. पुढं स्वातंत्र्य मिळालं. बाई गावी परत आल्या. मजुरी करून जगू लागल्या.

स्वातंत्र्य सैनिकांना सरकारनं ताम्रपट दिले. मानधन सुरू केलं. "आपलं माणूस राहिलं नाही, आता त्या ताम्रपटाचा काय उपयोग? फुकटचं मानधन मला नको" म्हणून बाणेदार बाई, मजुरी करून पोट भरायच्या. बाईंनी आयुष्यभर विधवापण सोसलं. अंगावर निभावलं. जवानी जाळीत निभावलं. ती शहीदाची बायको होती.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या लढाऊ, झुंझार शहिदपत्नी, स्मृतीशेष बायजाबाई विष्णू बारप्टेंना विनम्र अभिवादन. कृतज्ञ वंदन!
-प्रा.हरी नरके

Saturday, August 4, 2018

हा शहरी भारत तुमच्या ओळखीचा आहे का?-





शहरांमध्ये राहणार्‍या भारतीयांची आर्थिक- सामाजिक- शैक्षणिक- जातवार जनगणना 2018

गेले दोन दिवस आपण जनगणनेचे चित्र पाहिले ते प्रामुख्याने ग्रामीण भारताचे होते. आज आपण शहरी भारत बघूयात.
शहरांमध्ये राहणार्‍या 66 लाख लोकांच्या घरात कायम अंधार असतो. त्या घरात कसलाच दिवा नसतो. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात ते जगतात. त्या घरातील मुले आजही रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास करतात.
भारततल्या शहरांमधल्या फुटपाथवर 10 लाख लोक राहतात तर 61 लाख लोक एका लहानखोलीपेक्षाही छोट्याशा जागेत राहतात. शहरांमधली 39 लाख मुलं अनाथ आहेत.

शहरी भारतातील 57.57% लोकांना कोणत्याही प्रकारचे नियमित उत्पन्न मिळत नाही.
07.60% लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ते फार लांबून आणावे लागते.
भारतातील 27.20% शहरी लोक अशिक्षित किंवा अत्यल्पशिक्षित आहेत.
शहरांमध्ये राहणार्‍या 09.54% लोकांचे पोट हातावर असते. [ ते दररोज कमावतात तेव्हाच त्यांची चूल पेटते]
शहरी भागात 30.93% लोक खुल्या गटारांच्या काठी राहतात आणि 12.96 % लोकांकडे कसलीच सांडपाणी व्यवस्था नाही.
शहरात राहणार्‍या 08.27% लोकांकडे चारचाकी वाहने आहेत तर 54.06 % लोकांकडे कोणतेही वाहन नाही. ते सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर अवलंबून असतात.
शहरी भारतातील 13.29 % घरं स्त्रिया चालवतात. महाराष्ट्र राज्यातील 24.27% जनता झोपडपट्टीत राहते.
महाराष्ट्रात 1 लाख 64 हजार 374 लोक विभक्त होऊन राहतात तर त्याचवेळी 84 हजार 779 जण घटस्फोटीत आहेत.
महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक प्रगत राज्यातील शहरी भागातील लोकांमध्ये 67.47% लोकांकडे स्वतंत्र स्वयंपाकच घर नाही.
शहरी भारतात पदवीधर किंवा उच्च शिक्षित अवघे 13.06% आहेत.

शहरांमध्ये राहणार्‍या भारतीयांची एकुण लोकसंख्या - 29.99 कोटी आहे.
त्यात पुरूषांची संख्या - 52.19% असून स्त्रियांची संख्या- 47.79% आहे.
उभयलिंगी असलेले लोक - 00.01% आहेत.

देशातील शहरी शिक्षण चित्र पुढीलप्रमाणे आहे-
27.20% लोक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहेत.
57.88% लोक प्राथमिक-माध्यमिक शिक्षित आहेत.
देशात पदवीधर किंवा उच्च शिक्षित अवघे 13.06% पदवीधर/उच्च शिक्षित
01.85% इतर शिक्षण घेतलेले आहेत.

आर्थिक चित्र-
 09.54% हातावर पोट असलेले [दररोज कमावतात तेव्हा चूल पेटते]
02.31% आठवड्याला पगार मिळणारे
19.18 महिन्याला पगार मिळणारे नोकरदार
03.76% अनियमित कमाई
शहरी भारतातले 20.30% झोपडपट्टीत राहणारे आहेत तर उर्वरित 79. 70% झोपडपट्टीबाहेर राहणारे आहेत.

शहरी भारतातले 15 लाख लोक भिक मागून जगणारे आहेत तर 10 लाख लोक कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतात.
सर्व शहरांमध्ये 60.20 लाख मोलकरणी/घरगडी म्हणून कार्यरत आहेत.
बांधकाम कामगारांची संख्या 01.89 कोटी आहे.
68 लाख लोक घरगुती उद्योग करणारे आहेत तर  74 लाख लोक दुकानात काम करणारे/सहाय्यक आहेत.
19.42% लोक इतर कामात गुंतलेले आहेत. 06% लोक निवृत्तीवेतन धारक [पेन्शनर] आहेत.
शहरी भारतातील 57.57% लोकांना कोणत्याही प्रकारचे नियमित उत्पन्न मिळत नाही.
74% मालकीच्य घरात राहतात तर 22% लोक भाड्याच्या घरात राहतात.

शहरांमधल्या फुटपाथवर 10 लाख लोक राहतात तर 61 लाख लोक एका लहानखोलीपेक्षाही छोट्याशा जागेत राहतात.

24.46% लोक एका खोलीच्या घरात राहतात आणि 34.87% दोन खोल्यांच्या घरात राहतात.
20.92% लोकांकडे तीन खोल्यांची घरं आहेत तर 18.64% लोकांकडे तीनपेक्षा जास्त खोल्यांची घरं आहेत.

 72.11%  घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ आहे तर 20.27 % घरांजवळ सार्वजनिक नळ आहेत.
07.60% लोकांना पिण्याचे पाणी लांबून आणावे लागते.

94.85 % लोकांच्या घरात वीज आहे. 03.51% लोक आजही विजेअभावी रॉकेलचे दिवे वापरतात
66 लाख लोकांच्या घरात कायम अंधार असतो. त्या घरात कसलाच दिवा नसतो. रस्त्यावरच्या लाईटच्या उजेडात ते जगतात.

56.17% लोकांकडे सांडपाणी व्यवस्था आहे तर 30.93% खुल्या गटारांच्या काठी राहतात.
12.96 % लोकांकडे कसलीच सांडपाणी व्यवस्था नाही.

48.34 % लोकांकडे फ्रीज आहे. 02.09 % लोकांकडे घरचा फोन आहे.
79.70% लोकांकडे मोबाईल आहे. 09.70 % लोकांकडे कसलाही फोन नाही.
09.57 लोकांकडे इंटरनेटसह संगणक/लॅपटॉप. 06.36% लोकांकडे इंटरनेटविरहीत संगणक/लॅपटॉप

36.25% लोकांकडे दुचाकी वाहन आहे. 01.42 % लोकांकडे तीनचाकी वाहन आहे. 08.27% लोक चारचाकी वाहनधारक आहे.
मात्र 54.06 % कोणतेही वाहन नाही.

09.65% लोकांकडे ए.सी. असून 24.64 % लोकांकडे वॉशिंग मशिन आहे.

86.29% घरांमध्ये पुरूष कर्ता आहे. 13.29 % घरं स्त्रिया चालवतात.
39 लाख मुलं अनाथ आहेत.

महाराष्ट्र : -
महाराष्ट्र राज्यातील 4 कोटी 12 लाख 79 हजार 12 लोक शहरात राहतात. त्यातले 43.38% लोक अविवाहीत आहेत. [ यातले अनेकजण विवाहयोग्य वयातले नाहीत.] 47.98 % लोकं नवविवाहीत आहेत. 04.08 % विधवा/विधूर आहेत. 1 लाख 64 हजार 374 विभक्त झालेले आहेत.84 हजार 779 जण घटस्फोटीत आहेत.
राज्यातील शहरी भागातील लोकांमध्ये 67.47% लोकांकडे स्वतंत्र स्वयंपाक घर नाही. 32.52% लोकांकडे स्वतंत्र स्वयंपाक घर आहे.

राज्यातील 24.27% जनता झोपडपट्टीत राहते. 75. 73% लोक झोपडपट्टीत राहत नाही.
महाराष्ट्र राज्यातील 56% शहरी लोकांकडे फ्रीज आहे.
राज्यातील 22 % शहरी लोकांकडे संगणक/लॅपटॉप आहे.

देशातील शहरांमध्ये 12.35% अनु.जातीचे लोक राहतात तर 02.55% अनु.जमातींचे राहात आहेत.
-प्रा.हरी नरके, पोस्ट क्र.2

Saturday, July 28, 2018

भारतीय संविधानाने गरिबांना वार्‍यावर सोडले आहे काय?






भारतीय संविधानाच्या शिल्पकारांना कलम 12 ते 51 ह्या सर्व तरतुदी मुलभूत अधिकारात आणायच्या होत्या. तथापि घटना समितीतील बहुसंख्य सभासदांचे
आणि काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींचे आवश्यक ते सहकार्य न मिळाल्याने कलम 12 ते 35 हे मुलभूत अधिकार आणि कलम 36 ते 51 ही मार्गदर्शक तत्वे अशी रचना करावी लागली.

सरकार, कायदा, राज्यप्रशासन यांच्या दृष्टीने या दोन्हीत फारसा फरक नाही. एकच वेगळेपणा म्हणजे कलम 12 ते 35 चे पालन झाले नाही, किंवा भंग झाला तर नागरिकाला न्यायालयात जाऊन सरकारविरुद्ध दाद मागता येते.
कलम 36 ते 51 मध्ये असलेली ही सर्व मार्गदर्शक तत्वे लवकरात लवकर मुलभूत अधिकारात घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही त्यांची अपेक्षा होती. त्यानुसार कलम 45 जे शिक्षणाबाबत होते, ते 2009 पासून 21 अ मध्ये घालण्यात आले. उरलेली मात्र अद्याप मार्गदर्शक तत्वं म्हणूनच राहिलेली आहेत.
कलम 36 ते51 च्या बाबतीत न्यायव्यवस्थेकडे जाता येत नाही. आंदोलनं आणि जागृतीच्या जोरावर ती अंमलात आणणे सरकारला भाग पाडावे लागते.
तशीही न्यायव्यवस्था सध्या इतकी महाग झालीय की न्यायालयात जाण्याचा विचार करण्यापेक्षा निमुटपणे अन्याय सहन केलेला बरा असा सामान्य माणूस विचार करतो, चरफडतो आणि निमूटपणे गप्प बसतो.

संविधान म्हणते, "ही मार्गदर्शक तत्वे देशाच्या शासनव्यवहाराच्या दृष्टीने मुलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे सरकारचे कर्तव्य असेल."

कलम 38, 39, 41, 46 आणि 47 ही सर्व धर्म-जातीतील गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीने संविधानात घालण्यात आलेली आहेत.

कलम 38-राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था तयार करणे-
कलम 39- लोककल्याणासाठी राज्याने इतर धोरणे आणि तत्वे-

कलम 41- रोजगाराचा आणि शिक्षणाचा हक्क-

कलम 46- दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन-
कलम 47- गरिबांचे पोषणमान व राहणीमान उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे सरकारचे कर्तव्य आहे-

यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण आग्रही राहायला हवे.

कलम 38-
सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रातील सर्व समाज घटकांमध्ये सरकार प्रेरणा निर्माण करून लोककल्याणासाठी प्रयत्नशील राहील.
देशातील नागरिकांच्या उत्पन्नामध्ये असलेली तफावत व विषमता दूर करण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करील. दर्जा, सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता सरकार नाहीशी करील.

कलम 39-
उपजिविकेचे पुरेसे साधन मिळविण्याचा हक्क स्त्री व पुरूष यांना समान हवा.
राष्टाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण सामुहिक हिताला उपकारक हवे.
आर्थिक यंत्रणा राबवताना संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संचय श्रीमंतांकडे होणार नाही व गरिब जनतेचे सामुहिक हित साधले जाईल हे सरकारकडून पाहिले जाईल.
स्त्री-पुरूषांना समान कामाला समान पगार मिळेल.

स्त्री-पुरूष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरूपयोग करता येणार नाही.
बालकांना निरामय व मुक्त तसेच प्रतिष्ठापुर्ण जीवन मिळायला हवे. बालक व युवक यांना शोषणमुक्त नैतिक व भौतिक संरक्षण पुरवले जाईल.
सर्वांना समान न्याय व गरिबांना कायदेविषयक मोफत सहाय्य पुरवले जाईल.

कलम 41- हालाखीचे जीवन जगणार्‍या लोकांना शासकीय सहाय्याचा हक्क असेल. सर्वांना कामाचा व शिक्षणाचा हक्क असेल. बेकारी, म्हातारपण, अपंगत्व यामुळे बाधित असलेल्यांना सरकार सहाय्य करील.

कलम 46- जनतेतील दुर्बल घटक, अ.जा, अ.ज. यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपुर्वक केले जाईल. सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपसून सरकार त्यांचे रक्षण करील.

कलम 47- सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे की गरिब जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावले पाहिजे. गरिबांचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकार कर्तव्य भावनेने काम करील.

भारतीय संविधानाने गरिबांना वार्‍यावर सोडले आहे काय?
या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.

तथापि सर्वच राजकारण्यांनी आपले अपयश लपवण्यासाठी या घटनात्मक तरतुदींची कधी चर्चाच केलेली नाही.
पैसा, स्पर्धा आणि टिआरपी यात मश्गुल असलेली माध्यमे या चर्चेत कशाला पडतील?
प्रभावशाली जातीसंघटना यासाठी झगडण्याऎवजी थेट आरक्षणच मागण्यात गुंतलेल्या आहेत.
घटनेतल्या कलम 38, 39, 41, 46 आणि 47 ची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी कोणालाच लढायचे नाहीये.

सर्वांनाच शॉर्टकट हवाय. धन्य आहे हा देश. धन्य आहेत राज्यकर्ते आणि धन्य आहेत या देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स व थिंक टॅंकमधील श्रेष्ठी.

-प्रा.हरी नरके

Wednesday, March 8, 2017

"त्या शहीदाची मी बायको हायं रं!"


पुणे कोल्हापूर महामार्गावर कामेरी नावाचं गाव लागतं. बागायती शेती करणार्‍या कष्टाळू आणि झुंजार लोकांचं गाव.
अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1980 साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारकं उभारण्याचं ठरवलं.
कामेरीत स्मारकाचं काम सुरू झालं.
कंत्राटदारानं काही मजूर कामावर लावलेले होते.
एक म्हातारी आजारी वाटत होती. अंगात खूप ताप होता. तिच्याच्यानं काम होत नव्हतं. तिला त्यानं घरी जाऊन आराम करा, दवापाणी घ्या असं सांगितलं.
म्हातारी म्हणाली, "बाबा दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी माझी चुल पेटंल. मी आज काम केलं नाही तर खाऊ काय? मला काम करू दे बाबा, मी पाया पडते तुझ्या."
म्हातारीचे झोकांडे जात होते. दोनतिनदा ती पडतापडता वाचली.
म्हातारी काम करताना पडली तर अपघात होईल आणि आपल्या डोक्याला विनाकारण ताप व्हायचा, म्हणून कंत्राटदार चिडला आणि त्यानं तिला हात धरून कामावरून बाहेर काढलं.
म्हातारीनं त्याचं पाय धरलं, विनवणी करीत म्हणाली " लेकरा, अरं, सरकार ज्यांचं स्मारक बांधतंया त्या शहीदाची मी बायको हायं रं!"
कंत्राटदार चरकला.
त्याच आजारात बाई लवकरच गेल्या. स्मारक पुर्ण झालेलं त्या बघू शकल्या नाहीत.
होय, त्या शहीद विष्णू भाऊ बारप्टे यांच्या वृद्ध पत्नी होत्या. अन्नाला मोताद झालेल्या. मजुरीवर पोट भरणार्‍या.
9 आगष्ट 1942 ला महात्मा गांधीजींचा "चले जाव" चा नारा आला. कामेरीच्या तरूणांनी हातात तिरंगा घेऊन "वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद, ब्रिटीशराज चले जाव" अशा घोषणा देत पोलीस चौकीवर मोर्चा काढला. नेता होते, तरूण विष्णू भाऊ बारप्टे. ब्रिटीश पोलीस अधिकारी जनरल डायरचा भाऊबंध होता. तो भडकला. तुम्हाला काय पायजे? असं त्यानं विचारलं. विष्णू भाऊ म्हणाले, "तिरंगा आणि आझादी." हे घे, म्हणत त्यानं गोळी झाडली. विष्णू भाऊ जागेवरच शहीद झाले. तरूण पत्नी विधवा झाली.
पोलीसांनी तिचाही अपार छळ केला. बाई काही काळ गाव सोडून परागंदा झाल्या. पुढं स्वातंत्र्य मिळालं. बाई गावी परत आल्या. मजुरी करू जगू लागल्या.
स्वातंत्र्य सैनिकांना सरकारनं ताम्रपट दिले. मानधन दिलं. "आपलं माणूस नाही राहिलं, आता त्या ताम्रपटाचा काय उपयोग? फुकटचं मानधन मला नको" म्हणून बाणेदार बाई, मजुरी करून पोट भरायच्या. बाईंनी आयुष्यभर विधवापण सोसलं. अंगावर निभावलं. जवानी जाळीत निभावलं. ती शहीदाची बायको होती.
आजच्या महिला दिनी अशा लढाऊ, झुंझार शहिदपत्नी बायजाबाई बारप्टेंना वंदन!