Showing posts with label शिक्षक. Show all posts
Showing posts with label शिक्षक. Show all posts

Saturday, October 19, 2019

पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर





पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर- प्रा.हरी नरके
४० वर्षांपुर्वी धडफळेसरांची ओळख झाली. त्यांची थोरली मुलगी श्रुती आमच्या दर्पण या ग्रुपमध्ये होती. मंदार आमचा नेता. त्यांच्या दोन्ही मुली श्रुती आणि ऋतावरी ह्या बुद्धीमान आणि गुणी.

तेव्हा हे कुटुंब कसब्यात राहायचे. एकदा त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलावले. जेवताना धडफळेसर आम्हाला नानाविध किस्से सांगून हसवत होते. इतक्या प्रसन्न आणि खेळकर वातावरणातले ते जेवन ४० वर्षे झाली तरी आजही मला लख्ख आठवते. सर अतिशय व्यासंगी, निर्भीड आणि वाकपटू होते. तेव्हा बोलताना एका सनातनी आणि कर्मठ विचाराच्या संघटनेचा विषय निघाला. धडफळे सर स्वच्छ प्रागतिक असल्याने, ते म्हणाले, " माझे असे प्रामाणिक मत आहे की प्रत्येक लहान मुलाला या संघटनेत पाठवावे."

मी अवाक झालो. आणि सरांनी पुढे षटकार ठोकला. " जी मुलं बुद्धीमान आणि कर्तृत्ववान असतात ती वयात येताच ही संघटना सोडतात. आणि जे वयात येऊनही तिथेच राहतात ते त्याच [सुमार] कुवतीचे असतात." आमच्या ग्रुपमध्ये एकजण तिथे जाणारा होता. तो अगदी गोरामोरा झाला. आजही ह्या संघटनेकडे बुद्धीमान लोकांची वाणवा आहे. आहेत ते बहुतेक सारे आदेशावर चालणारे भक्त.

सर आम्हाला उत्तमोत्तम ग्रंथ वाचायची शिफारस करायचे. घरातली पुस्तकं वाचायला द्यायचे. श्रुती माझी मैत्रिण असल्याने जरी मी धडफळे कुटुंबाशी जोडला गेलो होतो तरी माझी सरांशी खास गट्टी जमलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये अनेकजण होते. त्यांच्या सर्वांच्या घरी मी जायचो. पण त्या मित्रमैत्रिणींच्या वडीलांशी एव्हढी दोस्ती जमली नाही. जशी आणि जितकी धडफळेसरांशी जमली होती. त्यांच्याशी मैत्र जडले त्याचं कारण सरांचा दिलखुलास, उमदा आणि हजरजबाबी स्वभाव.

१० ऑगस्ट १९३७ साली जन्म झालेल्या धडफळे यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर अध्यापनाचे कार्य हाती घेतले. प्राचीन भाषा आणि विशेषतः पाली भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दिवंगत संशोधक लेखक धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर पाली आणि बौद्ध संस्कृतीवर संशोधन करून लेखन करणारे मो. गो. धडफळे एकमेव मानले जातात. त्यांचा महाभारतावरही गाढा अभ्यास होता.

प्रदीर्घ काळ भाषासंशोधनामध्ये काम करत असताना धडफळे यांना देशातील, परदेशातील अनेक संस्था, विद्यापीठांनी सन्मानीत केले. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राचीन भाषांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सात प्रबंध आणि असंख्य शोधनिबंध आहेत. त्यांच्या परदेशातील व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. भाषेमध्ये संशोधन करणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले. ते देशविदेशात संशोधनाचे कार्य करत आहेत.

त्यांची कथनशैली लख्ख चित्रशैली होती. ते विद्वान असूनही अतिशय सोपं बोलत. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्वानांना विनोदाचे वावडे असते. धडफळेसरांची मात्र विनोदावर हुकुमत होती.
त्यामुळेच त्यांची जशी लक्ष्मणशास्त्री जोशींशी मैत्री होती तितकीच घट्ट मैत्री पु. ल. देशपांडे यांच्याशी होती.
श्रुती-मंदारच्या लग्नाल त्यामुळे हे दोघेही घरचे कार्य समजून आवर्जून उपस्थित राहिलेले होते.

मी प्राध्यापक व्हावे ही सरांचीच इच्छा. बहुजनांबद्दल सरांना विशेष आत्मियता होती. सरांनी मला भांडारकर संस्थेशी जोडले. प्रा. आ.ह.साळुंखे, सदानंद मोरे आणि माझी राज्य सरकारने भांडारकर संस्थेवर नियुक्ती केली. तेव्हा धडफळेसर बोरीचे मानद सचिव होते. सरांनी या संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. अनेक वर्षे त्यांनी या संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. धडफळे-भाटे वाद गाजले. ते लढवय्ये असल्याने कोणालाही वादात ओढायला ते घाबरत नसत.

ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरीही होते.
त्यांची " पाली भाषेतील बौद्धसंत साहित्य" आणि इतर पुस्तकं, विद्वत्ता, संशोधन आणि मौलिकता यांचा मानदंड ठरावीत.

भांडारकरमध्ये त्यांच्यासोबत काम करता आले, त्यांच्याकडून संशोधनाची शिस्त, व्यासंग आणि निकोप-निरामय संशोधनवृत्ती यांचे धडे घेता आले.

अभिजात मराठीबाबत मी रंगनाथ पठारेसरांना घेऊन त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर सलग तीनतास आमच्याशी बोलत होते. त्यात शेकडो संदर्भ, युक्तीवाद आणि भाषक प्रवासाचे नमुने होते. वयोपरत्वे अलिकडे ते बोलताना सहजपणे इतर विषयात शिरायचे आणि तिथेही रमायचे. नानाविध विषयांचा ज्ञानकोश म्हणजे धडफळे सर. अतिशय चैतन्यदायी, उर्जादायी विद्वत्ता.

सर बोलायला जसे विनोदी होते तसेच ते कायम निर्भिड आणि टोकदारही होते. भांडारकरच्या एका बैठकीत बोलताबोलता त्यांनी एका भांडकुदळ सदस्याला सणसणीत चपराक लगावली होती. ते म्हणाले, " आपल्या संस्थेचे अध्यक्ष सकाळी जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा कुत्रा आणि आणि *** असतात. [***संबंधित सदस्याचे नाव]

ते सदस्य इतके भडकले की त्यांना बोलताच येईना. धडफळेसर पुढे म्हणाले, " माझे हे म्हणणे खोटे असेल तर मी प्रत्यक्षदर्शींची साक्ष काढतो. काढू का?" ते सद्गृहस्थ निरूत्तर झालेले.

अलिकडेच त्यांनी अभिजात मराठीबाबत एक लेख लिहिला होता. त्यांच्या या बदलत्या भुमिकेबाबत त्यांच्याशी मला चर्चा करायची होती. पण आता ती कशी करणार?

सर, तुम्ही आम्हाला हवे होतात.

विनम्र आदरांजली.

प्रा.हरी नरके, १९ ऑक्टोबर २०१९

Thursday, September 5, 2019

राधाकृष्णन भांडारकरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते






५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता.
आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला.

त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त केले गेले. वेदांतावरचे वलयांकित विचारवंत असल्याने त्यांना हे सन्मान दिले गेले. त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान "भारत रत्न " ही दिला गेलेला आहे.विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला गेला तेव्हा ते तो देणार्‍या पदावर कार्यरत होते. देणाराने स्वत:लाच पुरस्कार घ्यावा हे ग्रेट आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशात सर्वोच्च पद आहे. त्या पदावर असताना स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून सुरू करा असा आदेश देणारे सर्वपल्ली राढाकृष्णन मला अतिशय थोर वाटतात. शिक्षणाने / शिक्षकाने बालकांच्या मनावर चारित्र्याचे संस्कार करणे अभिप्रेत असते. डॉ. राधाकृष्णन यांच्या चारित्र्याचे जे वाभाडे त्यांच्याच मुलाने [ थोर विद्वान प्रो.गोपाल यांनी ] काढलेले आहेत ते वाचनीय आहेत.


ज्या अर्थी त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळली जाते त्या अर्थी त्यांनी शिक्षक म्हणून काहीतरी असाधारण काम केलेले असणार. तथापि ते काम कोणते याबद्दल मी आजवर असंख्य शिक्षकांना विचारले असता त्याचे नेमके उत्तर एकही शिक्षक देऊ शकला नाही.

त्यांनी शिक्षण क्षेत्राला काहीतरी महत्वाचे योगदान दिलेले असेल या दृष्टीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता परदेशात ते प्राध्यापक होते हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले गेले. त्यांनी शिक्षणशास्त्राला काहीतरी भरिव दिले असेल असे म्हणावे तर ना त्यांनी कोणतीही शिक्षणविषयक थिएरी मांडली ना ते शिक्षणशास्त्राचे शिक्षक, प्राध्यापक होते. ना त्या विषयावर त्यांनी काही लेखन केले.

ते धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे लेखन वेदांतावर आहे. ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते म्हणून त्यांच्या नावे शिक्षक दिन होत असेल असे म्हणावे तर आजवर डझनावारी लोक या पदांवर बसून गेलेत.

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा मात्र त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते. विशेष म्हणजे तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते आणि तरिही भांडारकरच्या निवडणुकीत ते हारले होते. उपराष्ट्रपती या पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याचाच नावे जमा आहे.

ज्या अर्थी त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्या अर्थी त्यांचे शिक्षक म्हणून देशाला काहीतरी अभुतपुर्व योगदान असणारच. ते नेमके कोणते यावर कोणी प्रकाश टाकील काय?

-प्रा. हरी नरके, ५ सप्टेंबर २०१९

Monday, June 10, 2019

तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण?




तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण? -प्रा.हरी नरके
"आमची घरची खूप गरिबी होती. जगन्नाथ शंकरशेट यांच्या शाळेत माझ्या मोफत शिक्षणाची सोय झाली होती. या शाळेत केशवराव नावाचे एक शिक्षक होते. ते ब्राह्मण होते. मला मोफत शिक्षण मिळत असे याचे त्यांना वैशम्य वाटे. " मोफत शिक्षण फक्त ब्राह्मण मुलांनाच मिळावे, इतरांना नाही" असे ते म्हणत असत. मी आजारी पडल्याने माझा पहिल्या पाचातला नंबर खाली गेला. तेव्हा ते म्हणाले, " फी भर नाही तर शाळा सोड."
दुसर्‍या दिवशी माझे वडील त्यांना भेटले. खुप गयावया करून ते म्हणाले, " माझा मुलगा हुशार आहे, त्याला पुढे शिकू द्या,मी तुमच्या पाया पडतो."
केशवराव फार कठोर होते. ते म्हणाले, "जमणार नाही. तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण? चालते व्हा. कसलातरी धंदा शिका."
माझ्या वडीलांच्या डोळ्यात आसवे आली. पण केशवराव नरम झाले नाहीत.
वडील मला घेऊन हेडमास्तरांना भेटले. ते थोर मनाचे होते. त्यांनी केशवरावांना बोलवून घेतले आणि सांगितले, " मी या मुलाच्या वर्गावर अनेकदा गेलो आहे. वर्गातला तो सर्वात हुशार मुलगा आहे. आजारपणामुळे तो या महिन्यात मागे पडला. त्याला वर्गात बसू द्या. शिकू द्या.हा माझा आदेश आहे." तेव्हा त्यांचा निरूपाय झाला.
ते थोर मनाचे मुख्याध्यापक म्हणजे कृष्णशास्त्री गोडबोले.."
-गुरुवर्य कृष्णराव अर्जून केळूसकर, आत्मचरित्र आणि चरित्र, [ लेखनकाळ- १९३४] संपादक, धनंजय कीर, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, १९६१, दुसरी आवृत्ती २०१४, पृ. २८/२९
-प्रा.हरी नरके, १० जून २०१९

Tuesday, September 18, 2018

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेवाले चिपळूणकर गेले --




श्री वि वि चिपळूणकरसर राज्याचे शिक्षण संचालक असताना मी १९७८ साली त्यांना प्रथम भेटलो.
तेव्हा मी नवव्या इयत्तेत शिकत होतो. आमच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रथेप्रमाणे मी "पुणे दर्शन" नावाचा प्रबंध लिहिला होता.
त्यासाठी मी सहा महिने प्रवास, संशोधन केलेले होते. सरांनी त्यांच्या लेटरहेडवर पानभरून कौतुक करणारे पत्र मला पाठवले.
राज्याच्या शिक्षण संचालकाने एका शालेय विद्यार्थ्याचे एव्हढे कौतुक करण्याचा हा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.

१९७९ साली मी टेल्कोच्या वसतीगृहात राहात होतो. तिथे एक गटई कामगार [चर्मकार] चप्पल दुरूस्तीचे काम करीत असे. त्याचा मुलगा तिथेच खेळत असे. त्याला शाळेत का घालत नाही? असं मी विचारल्यावर तो म्हणाला, "गुर्जी म्हनूलाले, गावाकडनं पोराच्या जल्माचा दाखला आणा म्हणुनश्यानी. गावाला गेल्तो तर तलाठी म्हण्ला, सोधायला येळ लागल. पुन्यांदा ये. आता म्या हाव अमदपूरचा. त्या तिकूडल्या मराटवाड्यातला. दाकल्यासाटी खर्च करायची आप्ली ऎपत नाय बगा."

गुरूवारी आम्हाला साप्ताहिक सुट्टी असायची. मी स्वत: मुख्याध्यापकांना जाऊन भेटलो. पण ते म्हणाले, " जन्मदाखला आणला तरच प्रवेश मिळेल."

मी सेंट्रल बिल्डींगमध्ये जाऊन शिक्षणसंचालक असलेल्या चिपळूणकरांना भेटलो. त्यांनी सर्वच शाळांसाठी परिपत्रक काढले. ज्यांचे पालक निरक्षर असतील, स्थलांतरीत असतील अशा मुलांसाठी जन्मदाखल्याची अट शिथिल करण्यात येत आहे."
तो चर्मकार मुलगा शिकू लागला. पुढे इंजिनियर झाला. सध्या तो टेल्कोत [ टाटा मोटर्समध्ये] अधिकारी आहे.

सरांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी गुणवत्ता अभियान सुरू केले. मी त्यात अनेकदा व्याख्याने देत असे.
सरांनी नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी त्यांची जयंती सुरू केली. कित्येकदा आम्ही सोबत जात असू.
पुढे सावित्रीबाईंचे भव्य स्मारक उभे करण्याच्या कामाची माझी प्रेरणा चिपळूणकरसरच होते.
सरांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू केली. हजारो गरिब,होतकरू, गरजू मुलींच्या शिक्षणाला त्यातनं चालना मिळाली.

एकदा एका मदरशात सरांसोबत कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे संयोजकांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या सभेत चक्क "दत्ताचा" फोटो लावलेला होता. भगवान दत्ता पालक योजना असा त्यांचा समज होता.

आम्ही खूप हसलो. सरांनी तिथे मला सावित्रीबाईंवर बोलायला लावले.
सरांमुळेच मी सावित्रीबाईंचे चरित्र लिहिले. त्याचा इंग्रजी अनुवाद दिल्लीच्या एन.सी.ए.आर.टी.ने प्रकाशित केला.

मी त्यांना गंमतीने म्हणायचो, "सर, तुम्ही चिपळूणकर असूनही सावित्रीबाईंचा वारसा कसा सांगता?"
सर हसायचे आणि म्हणायचे, " अरे मी, विष्णूशास्त्रींच्या छावणीतला नाही बाबा. माझा वारसा त्यांच्या वडीलांचा म्हणजे जोतीरावांचे मित्र असलेल्या कृष्णशास्त्रींचा आहे. बेटेसे बाप सवाई होता.
सावित्रीबाईंना शाळा चालवायला आपल्या वाड्यातली जागा देणार्‍या शनिवार पेठेतल्या अण्णासाहेब चिपळूणकरांचा माझा वारसा आहे.  सावित्रीबाई न होत्या तर माझी आई ना शिकती. माझी आई ना शिकती तर मी कसला इथवर येतो? हे सारे त्यांचे उपकार आहेत."

आज सकाळी सरांचे दु:खद निधन झाले. विनम्र आदरांजली.
-प्रा.हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

Wednesday, September 5, 2018

२०० आदिवासी राजपत्रित अधिकारी घडवणारे जाधवगुरूजी -



मुंजवाड ता. सटाणा, जि.नाशिक येथील एक शिक्षक निंबा मुका जाधव,
त्यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला पंचक्रोशीतून हजारो लोक आले होते.

मी बघत होतो, त्यात किमान २०० तरी राजपत्रित अधिकारी होते. ते मंत्रालयातून, विविध जिल्ह्यातून या कार्यक्रमाला आले होते. आख्खं गाव सजलं होतं.
एका सामान्य शिक्षकाच्या अमृतमहोत्सवी सत्काराला एव्हढी प्रचंड उपस्थिती, एव्हढा अमाप उत्साह, सुमारे १० ते १२ हजार लोक हे मला एक कोडंच वाटत होतं.

आयुष्यातली सुमारे ३५ वर्षे जाधवगुरूजी नित्यनेमानं दररोज पहाटे घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना झोपेतून जागं करायचे, त्यांना शाळेत घेऊन यायचे. पहाटेच्या प्रसन्न वेळी त्यांचा अभ्यास घ्यायचे. सकाळी ८ वाजता मुलं आपापल्या घरी जाऊन अंघोळ, नास्ता करून परत ९ वाजता शाळेत यायची. प्रत्येकाला अवघड वाटणारा विषय सर त्यांना सोपा करून समजावून सांगायचे. शंकानिरसन करायचे. अभ्यासाची भिती गेली पाहिजे, पुस्तकांशी आणि  निसर्गाशी दोस्ती झाली पाहिजे हे सरांचे सुत्र.

दुपारी ११ ते ५ शाळा भरायची. जाधवगुरूजी गुणी शिक्षक होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. शिस्तीला करडे पण अतिशय मायाळू.

परत संध्याकाळी तासभर खेळ आणि ३ तास ज्यादा अभ्यास सर करून घ्यायचे.

गोरगरिब आदीवासी मुलांची उत्तम तयारी व्हायची. सर पुढं मुलांना स्पर्धा परीक्षेला बसवायचे. त्यांची सर्व तयारी करून घ्यायचे.

पगाराव्यतिरिक्त सर एक पैसाही कोणाकडून घ्यायचे नाहीत.

३५ वर्षात सरांची २०० पेक्षा अधिक मुलं राजपत्रित अधिकारी झाली.
मी सरांना विचारलं, "सर, ही प्रेरणा कोणाची?"

ते हसत म्हणाले, "ही प्रेरणा माझ्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची. अहो, ही गोरगरीब आदीवासी मुलं. अतिशय मेहनती आणि बुद्धीमान. परंतु तांत्रिक सराव कमी पडायचा, अभ्यासाची गोडी नसायची आणि ती नापास व्हायची.
मी ठरवलं, आपण सावित्रीबाई, महात्मा फुले, कर्मवीर, बाबासाहेब यांचं नाव घेतो. मग त्यांना अभिप्रेत असलेलं काम आपण का करू नये?"

त्यांचा सत्कार करताना मला भरून आलं. त्यांना सत्काराला मंत्री, राजकीय नेते, सेलीब्रिटी कोणालाही बोलावणं सहज शक्य होतं. त्यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला.

होय, या महाराष्ट्रात असेही शिक्षक आहेत. ऎशी कळवळ्याची जाती! करी लाभाविन प्रीती!

त्यांच्या नातवाची विद्यापिठाच्या एका कार्यक्रमात भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की गुरूजींचं मध्यंतरी निधन झालं.
अशा प्रतिभावंत आणि व्रतस्थ शिक्षकांनीच हा प्रगतीशील महाराष्ट्र घडवलेला आहे.
दिवंगत निंबा मुका जाधवसरांना विनम्र श्रद्धांजली.
-- प्रा.हरी नरके, पुन:प्रकाशित, ५ सप्टेंबर, २०१८

आणि उपराष्ट्रपती पुण्याच्या संस्थेच्या निवडणूकीत पराभूत झाले -


प्रा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे उपराष्ट्रपती असताना पुण्यातल्या एका संशोधन संस्थेच्या निवडणुकीला उभे होते.
ते निवडणुकीत चक्क पराभूत झाले.
त्यांना फार मोठा धक्का बसला.

एका आंतरराष्ट्रीय सेमिनारच्या निमित्ताने त्यांनी संस्थेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना दिल्लीला निमंत्रित केले.

रात्री उपराष्ट्रपती बंगल्यावर स्वागत समारंभाचे आयोजन करून सर्व उपस्थितांना भोजनाला बोलावले.

जेवन झाल्यावर अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडे निवडणुकीतील पराभवाचा विषय काढला.

पदाधिकारी म्हणाले, "तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु तुम्ही देशाचे उपराष्ट्रपती आहात. राज्यसभेच्या कामांमध्ये व्यस्त असाल. तुम्ही आमच्या संस्थेला वेळ देऊ शकणार नाही. आम्हाला संस्थेच्या कामांसाठी पूर्णवेळ देणारा पदाधिकारी हवाय.

तुम्ही निवृत्त झाल्यावर अवश्य पुन्हा निवडणूक लढवा. आम्ही तुम्हाला बहुमताने निवडून देऊ. मात्र तेव्हा तुम्ही संस्थेला तुमचा वेळ द्यायला हवा."

उपराष्ट्रपतींना हे खडे बोल सुनावणारे ते पदाधिकारी सत्शील होते. जागतिक किर्तीचे महान संशोधक होते. त्यांचा नैतिक दबदबा एव्हढा होता की दस्तूरखुद्द उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनासुद्धा त्यांचे म्हणणे मान्यच करावे लागले.

-प्रा.हरी नरके, ५ सप्टेंबर २०१८

जि.प. शिक्षक - प्रा.हरी नरके



यवतमाळ जिल्ह्यातील एका जि.प. शाळेला तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी भेट दिली. शिक्षण अधिकारी व इतरही सोबत होते. शाळा सुरू होऊन अडीचतीन तास उलटलेले असताना एक मुलगा शाळेत आलेला त्यांना दिसला. ते त्या मुलावर रागावले. "शाळेत यायची ही वेळ आहे का?" असं त्यांनी त्याला विचारलं.
तो मुलगा अतिशय घाबरला आणि रडू लागला. तो म्हणाला, " सर, मला आज शाळेत यायला खूप उशीर झाला याबद्दल सॉरी. आज पहाटे माझे वडील वारले. मी मोठा मुलगा असल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी मला थांबावं लागलं. उशीर झाला सर. हवं तर तुम्ही माझ्या शेजारी राहणार्‍या वर्गातल्या या मुलांना विचारा."

तीनचार मुलं स्वत:हून म्हणाली, "होय, गुरूजी, आम्ही सकाळी बघितलं होतं त्याचे वडील वारलेले."

शिक्षणमंत्री व अधिकारी चरकले. म्हणाले, " अरे बाळा, मग आजचा दिवस नसता आलास शाळेत तरी चाललं असतं. जा तू घरी."
तो मुलगा म्हणाला, "नाही जाणार. आज शेवटचा तास हराळगुरूजींचा असतो. ते इतकं मस्त शिकवतात की मी आजवर त्यांचा एकही तास बुडवलेला नाही सर, मी त्यांच्या तासासाठीच आलोय."

[ संदर्भ- श्री. हेरंब कुलकर्णी ]


२.
दिवंगत नामदार विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी ५ सप्टेंबरच्या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात जाहीरपणे सांगितलेला अनुभव.
एका जिल्ह्यातल्या जि.प. शाळांबद्दल बर्‍याच तक्रारी आल्या होत्या. शिक्षणमंत्र्यांना दोनतीनदा लक्ष घालायला सांगूनही फारसा फरक पडलेला नव्हता. मुख्यमंत्री त्या जिल्ह्याच्या दौर्‍यावर गेलेले असताना त्यांना एक पालक भेटले. ते विलासरावांचे जुने मित्रच होते. त्यांनी जि.प.शाळांच्या गैरव्यवस्थेबद्दल विलासरावांना ऎकवलं.

विलासरावांनी नियोजित कार्यक्रमांत थोडा बदल करून एक तास आरक्षित ठेवला.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक या सर्वांना त्यांनी आपण एका खाजगी भेटीवर जात असल्याचं सांगितलं. कोणीही सोबत येऊ नका असंही बजावलं.

सुरक्षा यंत्रणेलाही एक तासासाठी सुट्टी दिली.

फक्त एकच बॉडीगार्ड आणि जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा दोघांनाच सोबत घेऊन ते निघाले. खाजगी इनोव्हा घेऊन ते स्वत: गाडी चालवत निघाले होते. गाडीचा लाल दिवा काढून ठेवलेला होता.
शहराबाहेर पडल्यावर मगच त्यांनी मु.का.अ. यांना आपण शाळा भेटीवर जात असल्याचं सांगितलं. त्यांनी लगेच सर्व अधिकार्‍यांना मेसेज टाकला.

रस्त्याने त्यांना पांढर्‍या कपड्यातले तीन लोक पायी चाललेले दिसले. सी.एम.नी गाडी थांबवली.
मंडळींची विचारपूस केली. "काय मंडळी, दुपारच्या इतक्या उन्हात कुठं निघालात म्हणायचं?"
त्यांनी सांगितलं की ते जि.प.शिक्षक आहेत नी आपापल्या शाळांवर निघालेत.
विलासरावांचा अंदाज बरोबर निघाला.
ते म्हणाले, "आज काय विशेष काढलं शाळेवर?"


" अहो, कसलं डोंबलाचं विशेष आलंया! आत्ताच शिक्षण अधिकार्‍यांचे मोबाईल आलेयत. सीएम जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. ते शाळा भेटीवर निघालेत. कदाचित आमच्या शाळेवरपण येऊ शकतात. तयार राहा. म्हणूनशान अटेंन्शन! दुसरं काय? आयला त्यान्ला तिकडं कामधंदा नाय, चालले शाळा तपासायला. जो ऊठतो तो प्राथमिक शिक्षकांवर सुटतो."


विलासराव म्हणाले, "मग बसा गाडीत. आम्ही सोडतो तुम्हाला. आम्ही याच रस्त्यानं पुढच्या गावाला निघालोत."
ते तिघं गाडीत बसले. विलासरावांनी इकडच्या तिकडच्या पिकपाण्याच्या गप्पा सुरू केल्या. त्या तिघांशी चांगली गट्टी जमली.
एकजण म्हणाला," सर, तुमचा चेहरा अगदी डिट्टो सीएमसाहेबांसारखा दिसतो."
विलासराव हसले. म्हणाले, " अहो, ते कुठं मी कुठं. सीएम असे स्वत: गाडी चालवतात का कधी? त्यांचा कन्व्हाय, लाल बत्ती, बंदोबस्त, अधिकार्‍यांचा ताफा घेतल्याशिवाय ते कधीतरी बाहेर पडतात का?"
" हा तेबी बरोबर हाय म्हणा." तिघंही एकदम उद्गारले.
विलासरावांनी हळूच विचारलं, "मग पोर्शन कुठवर आलाय?"

पहिला म्हणाला, "कसला पोर्शन घेऊन बसलात. आपण जि.प. अध्यक्षाच्या घरी पी.ए. म्हणून काम करतो. शाळेत जायचं कामच नाय."
दुसरा म्हणाला, "मला स्थानिक आमदार ****यांनी त्यांच्या शेतावर मुकादमाचं काम दिलेलं आहे. शाळेचा पगार घरपोच येतो. शाळेत जायचं कश्याला?"
तिसरा म्हणाला, "शिक्षण सभापती आपले पाव्हणे आहेत. मी त्यांना भाषणं लिहून देतो. त्यांच्या हॉटेलमध्ये गल्ल्यावर बसतो. म्हशीचं, दुधाचं बघतो. अधिकारीच घरी येऊन पगार देतात मला. शाळेचं तोंड काळं का गोरं तेच माहित नाय बघा."

" मग तुम्हाला आम्ही सोडायचं कुठं आता ?"

"तोच तर प्राॅब्लेम हाये नव्हं का? शाळाच सापडून नाय राह्यल्या बघा आमच्यावाल्या."
जि.प. मु.का.अ. म्हणाले, "साहेब जिल्ह्यातले ५८ शिक्षक पगार तर घेताहेत पण शाळेवर जातच नाहीत. सगळे पदाधिका‍र्‍यांचे लोक आहेत. काय करायचं ते तुम्हीच सांगा?"

-प्रा.हरी नरके, ५ सप्टेंबर २०१८