Showing posts with label प्रा.हरी नरके. Show all posts
Showing posts with label प्रा.हरी नरके. Show all posts

Sunday, July 5, 2020

अमेरिका, दिल्ली, मुंबईहून आंबेडकरी विचारवंत, स्कॉलर्स, अधिकारी, नेते लिहितात-








सर , जयभीम !

आपली चूक नसतानाही चळवळीच्या भल्याचा विचार करुन आपण समंजसपणाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही आणखी मोठे व्हाल व तुमची विश्वासार्हतादेखील वाढेल.
तथाकथित आपल्या जातीची माणसे ब्राह्मण्यग्रस्त संघटना तसेच गैर फुले - आंबेडकरवादी संघटनांसोबत असताना त्यांबाबत सोईस्कर मौन बाळगणारे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला उत्साहाने पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.


आमच्या नात्यांत तसेच परिचितांमध्ये व्यसनाधीन पती व त्यांचा कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. मुंबईत आम्ही आदर्श जयंती अभियान चालवताना प्रत्येक वस्तीत व्यसनाचा मुद्दा हमखास चर्चेला येतो. काही मंडळांना तर ‘दारु पिणाऱ्यांना जयंती मिरवणुकीत स्थान नाही ‘ असे जाहिर करावे लागते ! यांवरुन हा दारुचा रोग व त्याचे दुष्परिणाम यांची तीव्रता समजून येते.  रोगाचे अस्तित्व नाकारणे वेगळे व रोगावर उपाय करणे वेगळे ! जे रोगाचे अस्तित्वच नाकारतात त्यांच्याकडून उपायांची अपेक्षा ती काय करणार ? असो.


शेवटी प्रामाणिक प्रश्नांना सहज उत्तरे देता येतात. परंतु हितसंबंधी व्यक्तींचे प्रश्न वेगळे असतात व कितीही तर्कशुद्ध उत्तर दिले तरी त्यांचे समाधान होत नसते !

भविष्यात अशा व्यक्तींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे उचित राहिल, असे वाटते.

एकाच वेळेस आपण सर्वांचे समाधान करु शकत नाही.

शेवटी तथागत सम्यक संबुद्ध यांची अनित्यता आपणांस देखील लागू आहेच !

आम्ही आपल्या सोबत आहोत.

आपले,

१- शुद्धोदन आहेर.

२- संजय गायधनी.

३ - वैशाली गेडाम (पीएच.डी. स्कॉलर, अमेरिका)

४ - अशोक अंकुश.

५ - डॉ. हेमलता माहिश्वर, नवी दिल्ली.

६- उपाली जी उर्फ एस एस धवराळ.

७- संदीप हिरे.

८- दिपक गांगुर्डे.


Thursday, July 2, 2020

प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी, उभारला भव्य बुद्धविहार









हिंगोलीच्या पिंपळदरीत उभारला भव्य बुद्धविहार, प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी

मराठवाड्यातील हिंगोलीच्या बर्‍याच गावांना विद्यापीठाच्या नामांतरविरोधी दंगलीची झळ बसलेली होती. त्यातून सावरण्यासाठी कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी संघटना उभारण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.


यावेळी २००३ साली सर्व तरूणांना प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान ऎकवण्यात आले. त्यांच्या व्याख्यानाने तरूण इतके भारावुन गेले की विहारासाठी उत्स्फुर्तपणे वर्गणी जमू लागली. तरूणांनी केलेल्या श्रमदानातून व स्वत:च्या वर्गणीतून अतिशय भव्य बुद्धविहार उभा राहिला. असा बुद्धविहार की ज्याची किर्ती जगातल्या १६ देशात पोचलेली आहे.

या उपक्रमाला सर्व स्थानिक नागरिक व जयाजीराव पाईकराव, साहेबराव कांबळे, न्या.एम.एल.भगत व इतरांचा हातभार लागला. गावातील गरिब महिला शांताबाई महादू खिल्लारे यांनी आपले मंगळसुत्र विकुन विहाराच्या बांधकामाला देणगी दिली.

Saturday, June 27, 2020

हे घ्या अस्सल पुरावे- बाबासाहेबांनी चीन, कम्युनिझम आणि माऒ यांचे काढलेले वाभाडे - प्रा. हरी नरके


















माझा "बाबासाहेब आणि चीन" हा १४ एप्रिल २०२० चा लेख तुफान गाजल्याने आता अडीच महिन्यांनी या लेखामुळे अडचणीत आलेल्या काही डाव्या मित्रांनी " बाबासाहेब असे बोललेच नव्हते, हरी नरकेंनी बाबासाहेबांच्या तोंडी खोटी वाक्ये टाकली" असा धादांत खोटा प्रचार सुरू केलेला आहे.

विचारांचे विश्लेषण करताना त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मतभेद होऊ शकतात. पण मूळ कोटेशन्समध्ये बदल होऊ शकत नाही. मी गेली ४० वर्षे लेखन-संशेधनाच्या क्षेत्रात आहे. वैचारिक मतभेद असण्यात गैर काहीच नाही. पण बाबासाहेब असे म्हणालेच नव्हते असे सांगणे हा प्रकार अक्षम्य आहे. मुद्दा विश्वासार्हतेचा आहे.

खाली मी बाबासाहेबांच्या पुस्तकांमधले संबंधित उतारे दिलेले आहेत. हे मोजकेच आहेत. हा फक्त एक नमुना आहे. डाव्यांची जर इच्छाच असेल तर वर्षभर दररोज मी बाबासाहेबांच्या पुस्तकामधले "असे" उतारे टाकू शकेन.

मी बाबासाहेबांच्या चीन, कम्युनिझम, माऒ, पंचशील विषयक मताचा सारांश पुढीलप्रमाणे सांगितला होता.

साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे असा परखड इशारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट्र निती या विषयावर बोलत होते.

"बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे खंड १५ मधले काही उतारे आहेत तर काही खंड १८ भाग २ मधले आहेत.
"बाबासाहेबांना चीनबद्दल प्रेम होते" असा प्रचार हे फेसबुकवर करीत आहेत.

मी कम्युनिस्टांना शत्रू मानत नाही. वैचारिक मतभेद जरूर आहेत. वैचारिक टिकेचे मी स्वागत करतो, मात्र व्यक्तीगत बदनामी, टोकाची वैयक्तिक शेरेबाजी, चारित्र्यहनन कराल तर मग मला गप्प बसता येणार नाही.

निदान सध्याच्या भारतीय राजकीय वातावरणात तरी मला कम्युनिस्टांशी भांडण करायचे नव्हते, नाही. शहीद कॉ. गोविंद पानसरे हे माझे मार्गदर्शक होते. आज या चळवळीत असलेल्या इतर अनेक मान्यवरांना मी अतिशय मानतो. आमच्या छावण्या  भल्या वेगवेगळ्या असतील पण अनेक मुद्यांवर आम्ही सोबत होतो. राहू.   पण कोणी अर्धवट डावे जर माझ्यावर भांडण लादणारच असतील तर मग माझाही नाईलाज होईल... लक्षात ठेवा, " ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी." तुर्तास समजनेवालों कों इतना इशारा काफी हैं....

- प्रा. हरी नरके,
२७/६/२०२०

(संदर्भासाठी पाहा - १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड,१८ वा, भाग २, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२, पृ. ५८३ ते ५८६ )

Tuesday, June 23, 2020

"बाबासाहेब आणि चीन" या लेखावरची एका चीनप्रेमीची पोटदुखी आणि जळफळाट - प्रा. हरी नरके


१. हरी नरके यांच्या "बाबासाहेब आणि चीन" या लेखाला एव्हढी भरमसाठ प्रसिद्धी कशाला? सध्या त्याचीच सगळीकडे धूम आहे. मोबाइलवर ओव्हरसबस्क्राईड.

२. लेख वाचण्यापुर्वीच मला तो लेख खोटा असणार अशी शंका होती. एका मित्राने मला विचारले, " हे खरे आहे काय?" मी तेव्हाच म्हणालो, "वाटत नाही."

कारण ५४ ला चीन केवळ पाच वर्षाचा होता. १९४९ ला चीनला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्यावर कशाला बाबासाहेब बोलतील? हरी नरके खोटे लिहित असणार.

३. हरी नरकेंनी ज्याच्या आधारे लिहिलेय तो "बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचा खंड १५ वा" मी वाचलेला नाही.

४. पण मी एका लेखकाचे दुसरे पुस्तक वाचलेय.

५. त्यानुसार बाबासाहेबांनी त्या भाषणात रशियाचा उल्लेख जास्त वेळा केलाय. चीनचा कमी वेळा केलाय. मग हरी नरके रशियावर का लिहित नाहीत?

६. बाबासाहेब चीन, माओ, कम्युनिझमवर बोललेत. पण कमी बोललेत.

७. परिस्थितीजन्य हंगाम येतात, जातात, प्रसिद्धि येते, अन जातेही.

८. हरी नरकेंना एव्हढी जास्त प्रसिद्धी मिळतेच कशी? काहीतरी लबाडी असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? आम्ही इतके दिवस लिहितोय, आमचे लेखन का गाजत नाही? आम्हाला प्रसिद्धी का मिळत नाही? हरी नरकेचे का गाजते? कारण वाचक मुर्ख आहेत आणि हरी नरके खोटे लिहितात म्हणून ते गाजते. जे गाजते ते खोटेच असते.

९. हरी नरकेचा हा लेख वाचू नका. तो चीनवर आहे. त्याला सांगा रशियावर लिही. चीन मला आवडतो.


-प्रा. हरी नरके,
२३/६/२०२०

टीप- बाबासाहेबांचे संसदेतले २६ ऑगस्ट १९५४ चे ते भाषण २ तासांचे प्रदीर्घ, अभ्यासपुर्ण आणि द्रष्टे विचार मांडणारे मौलिक भाषण आहे. त्यात जागतिक प्रश्नांवरचे चिंतन आहे. चीन, रशियापासून अगदी पोर्तुगिजांच्या ताब्यातील गोवा, निजामाच्या ताब्यातील विदर्भ  असे अनेक विषय त्यात आहेत. एकुण छापील १३ पानांचा मजकूर आहे. मला एका पानाचा लेख लिहायचा होता. पुस्तक नव्हते लिहायचे.
माझा मुद्दा हा आहे की कोरोना कुठून आला? भारतावर हल्ला कुणी केलाय? चीन. सध्या चर्चेचा मुद्दा कोणता आहे? चीन. म्हणून मी जर चीन, कम्युनिझम आणि बाबासाहेब हा विषय प्रासंगिक विषय निवडलेला आहे. मी त्या लेखात आणखी याच्यावर का लिहिले नाही, त्याच्यावर का लिहिले नाही असले प्रश्न अनावश्यक आहेत - प्रा. हरी नरके

Monday, June 22, 2020

गौतम वाव्हळ यांच्या भिंतीवरून साभार-


प्रा. हरी नरके सर हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले या सूर्याची किरणं प्राशन केलेला, क्रांतीज्योती सावित्रीच्या कुशीत जन्मलेला, छत्रपती शाहू महाराजांच्या छत्रछायेखाली वाढलेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी हाती धरून समाजातील जातीभेद, विषमता यावर आसूड ओढणारा एक व्यासंगी लेखक, वक्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या खंडाचे संपादन करण्यामध्ये मोलाची कामगिरी पार पाडणारा, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर यांचे जीवनकार्य व विचार यांचा इत्यंभूत शोध घेऊन, संशोधन करून ते ग्रंथबद्ध करून ही शिदोरी आम्हां बहुजनांच्या पुढ्यात मांडणारा एक सच्चा फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणारा खंदा कार्यकर्ता आज आपल्यामध्ये आहे. त्यांच्याबद्दल काही नाठाळ व उपटसुंभ लोक सोसियल मीडियावर गरळ ओकताना दिसतात, त्यांचे लेख चोरून शेअर करून वरून शिरजोरी करून त्यांना असभ्य भाषा वापरताना दिसतात. ही अंडफळ आम्ही फोडून काढू. बावळटांनो थोडी तरी अक्कल शाबूत राहुद्यात. आपण कोणाशी बोलतोय ? काय बोलतोय ? आपली लायकी काय ? पंधरा ओळींचा निबंध लिहिताना गांडीला घाम फुटत असेल, सोसियल मीडियावर स्वतः ला तत्त्ववेत्ते म्हणऊन घ्यायचेच असेल तर प्रथमतः पुरेपूर शिक्षण घ्या, चौफेर वाचन वाढवा, व्यासंगी बना, लेखक बना, विचारवंत बना. कोणाचेही विचार वा लेखन कॉपी करा, शेअर करा परंतु ते त्याच्या नावानिशी करा. त्याचे विचार शेअर करावे तर वाटतात मग त्याचा नावाचा तिटकारा का असतो. ही नकारात्मक पिल्लावळ तयार करणारे खेटरखाऊ केडर बंद पाडली पाहिजेत. हे असले आडमुठे, मुजोर आणि शिवराळ व गावंढळ डोळ्यावर ढापणे लावलेले बैलांचे अंड मला चांगले ठेसता येतात. आदरणीय नरके दादा तुम्ही तर तुमच्या शब्दांनीच या नीचांना योग्य रस्ता दाखवलेला आहे उरला सुरला आम्ही त्यांना ठेसून दाखवू.
- गौतम वाव्हळ
https://www.facebook.com/profile.php?id=100049258984302&__xts__[0]=68.ARC02QOeUyYqPYTq7FSQL1tOWEJco5LPKPOK46JM_82Y3aG-qEXfNqfKPQ3hDMCaXSIytNftYQO__HNF6ap5v2MK_7JvEP2M58uryMGEjlOquQY_tcVb0heT1bBGa-ouIIZ5l5nAGtqoZjkkh4Af9z_K1aq7JRt8L54tEQobqFFHCk_aMhz8TKb0jj8QGkocn3uwJT0DCO0fdsl3flXnF3qEmqAG75urxqphFqKt4Kqe67XYjnvWoZhb7fzPH06xHTtGSEPL8gIrlVjxryXKpEF2Vza021-6P7Ka2UYHb6wzSRgoG2B-cneLr9wi5S2m89Ln8Q&__tn__=HH-R-R

Sunday, June 21, 2020

फेसबुकवरील वाड्मयचौर्य - प्रा. हरी नरके












फेसबुकपोस्टच्या चोर्‍यामार्‍यांचे प्रमाण अलिकडे फारच वाढल्याचे आढळते. मित्रमैत्रिणींच्या चांगल्या पोस्ट ढापायच्या आणि स्वत:च्या नावाने स्वत:च्या भिंतीवर चिकटवायच्या हा प्रकार बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. याचे काही उपप्रकारही आढळतात.
उदा.

१ ) मूळ लेखकाचे नाव डिलीट करायचे आणि त्यात किरकोळ फेरबदल करून लेख स्वत:च्या नावावर खपवायचा.

२) मूळ लेखकाचे नाव काढून टाकून लेख आपल्या भिंतीवर प्रकाशित करायचा. मूळ लेखकाचे नाव नसल्याने व लेख तुमच्या भिंतीवर प्रकाशित झाल्याने सामान्य वाचकांचा असाच समज होतो की लेख तुमचाच आहे. मग लोक तुमच्या कौतुकाच्या कमेंट करतात, त्यांना लाईक मारायचे. जर कुणी मूळ लेखकाचे नाव कमेंटमध्ये लिहिलेच तर त्या उडवायच्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे.


३) यदाकदाचित चोरी पकडली गेलीच, माझा लेख माझे नाव गाळून का प्रकाशित केला अशी मूळ लेखकाकडुन विचारणा झालीच तर मला हा लेख मला बिननावाचाच मिळाला होता अशी सारवासरव करून आपली लबाडी झाकायची. समजा तुम्हाला हा लेख बिननावाचा मिळाला होता तर तुम्ही तो लेख आपल्या भिंतीवर टाकताना "लेखक अज्ञात, किंवा लेखक माहित नाही" असे का लिहिले नाही?

कपिल सरोदे नावाचे एक वकील आहेत. त्यांनी माझा " डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि करोना" हा लेख स्वत:च्या भिंतीवर माझे नाव वगळून टाकला. हा लेख भीमजयंतीच्या निमित्ताने मी १४ एप्रिल २०२० रोजी लिहिलेला होता व तो महाराष्ट्र टाइम्स, सामना, बहुजन शासक या व इतर अनेक दैनिकांनी प्रकाशित केलेला होता. आंबेडकरी डॉट कॉम व इतर काही वेबसाईटवरही तो आलेला होता. शिवाय माझ्या तिन्ही फेबु खात्यांवर, पेजवर व ब्लॉगवर ही तो टाकलेला होता. ही दोनच महिन्यापुर्वीची ताजी घटना आहे. वकील असल्यामुळे सरोदे यांना असे करणे हा बौद्धिक सम्पदा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे माहित आहे.

माझ्या काही मित्रांनी ही गोष्ट माझ्या निदर्शनाला आणून दिली. मी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर दिलगिरी राहिली बाजूला त्यांनी माझ्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या. कपिल सरोदेंचा अजब खुलासा पुढीलप्रमाणे "किती मरता नावासाठी. मला नावच जर टाकायचे असते तर मि माझे नाव नसते का टाकले, तुमच्या सारखे नावसाठी मारणारे लोकच जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वतःच्या नावाने छापतात तेव्हा बरे वाटते का तूम्हाला, माझी प्रतेक पोस्ट चेक करा मि माझे नाव टाकल्याशिवय शेर करत नाही, आणि जी पोस्ट मि शेर केली जी तुमही तुमची आहे असे बोलता, त्यात 90 % विचार बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. मग तुम्हीं इतके विद्वान झाले का बाबसाहेबांचे विचार स्वतःच्या नावाने खपवायला?" ते पुढे असेही म्हणतात, " आपला काही तरि गैरसमज होतोय, पहिला विषय तर तो लेख मला जसा मिळाला तसा मि माझ्या वॉलवर टाकला आहे, त्यात तुमचे नाव नव्हते. मला तो लेख तुमच्या नावाविनाच मिळाला होता, यातील दूसरा विषय, म्हणजे तुमच वाङ्गमय वैगेरे हे तुमच्या ठिकाणी राहुदया मला तो लेख माझ्या नावाने टाकायचा असता तर मि त्यात माझे नाव स्पष्ठ शब्दात टाकले असते. मि तुमच्या सारखा नावसाठी हापापलेला नाही. आणि हो मा. नरके आपन त्या लेखात जे विचार लिहिले आहेत ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तुमच्याकडे मकतेदारी कुणी दिली?" त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, " अरे रे रे नरके तुमच्या बुद्धिची कीव येते राव! "


त्यांचा खुलासा अजिबात पटण्याजोगा यासाठी नाही की त्यांच्या कमेंटमध्ये त्यांना Sandip Khillare, योगेश वाघमारे, Kunal Gajghate, Sachin Kalambe, Atul Gawali, Mangesh Sasane, Kuldeep Ramteke अशा अनेकांनी लिहिले होते की हा लेख प्रा. हरी नरके यांचा आहे, तुम्ही मान्य करा आणि विषय संपवा, पण तरिही त्यांनी तशी दुरुस्ती केली नाही, की मान्य केले नाही. उलट त्यांनी तिकडे साफ दुर्लक्षच केले. त्यांना तेव्हाच आजचा खुलासा करता आला असता.

माझे नाव वगळुन टाकल्यामुळे लेख त्यांचा स्वत:चा असल्याचा भास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. हे कायद्यात बसते?


हा लेख चांगला आहे, कुणाचा आहे अशी काहींनी त्यांचाकडे कमेंटमध्ये विचारणा केली तेव्हाही ते गप्प बसले. अनेकांनी त्या लेखाबद्दल सरोदेंचे कौतुक केले त्यांना सरोदेंनी लाइकही केले.


शेवटी मीच त्यांना हा लेख माझा आहे असे लिहिल्यावर मात्र त्यांचे उत्तर आले. दिलगिरी सोडा उलट अरेरावी आणि मूळ लेखकावरच / माझ्यावरच त्यांनी दोषारोप केले. आताही एव्हढे सगळे खुलासे-प्रतिखुलासे झाल्यावर अजूनही त्यांनी लेखावर माझे नाव टाकलेलेच नाही.


असे बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्य करणार्‍या लोकांना खंतखेद तर वाटतच नाही, ते नैतिकतेवरची प्रवचने चालूच ठेवतात हे जास्त त्रासदायक आहे.


आपले काही मित्रही या कृत्याचा निषेध करण्याऎवजी दुर्लक्ष करा हो, असा आपल्यालाच सल्ला देतात हे तर जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे. काय दुर्लक्ष करा? समोर माणूस वाड्मयचौर्य करतोय आणि तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा असे सांगताय म्हणजे तुम्ही चोरीला मदत करताय, प्रोत्साहन देताय असे वाटत नाही तुम्हाला?


-प्रा. हरी नरके,
२१/६/२०२०


Ref: कपिल सरोदे - https://www.facebook.com/Kapil-Sarode-112733103738395/ 

Tuesday, June 9, 2020

मानधनाची गोष्ट - प्रा. हरी नरके









तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित करता तेव्हा तुम्हाला सदर कार्यक्रमासाठी १. हॉलभाडे, २. लाऊडस्पीकर, ३. हारतुरे, ४. निमंत्रणपत्रिका, ५. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी ठिकठिकाणी लावायचे बॅनर्स, ६. स्टेजवरील बॅनर, ७. पाहुण्यांना चहापाणी, ८. फोटोग्राफर,  असा बराच खर्च करावा लागतो. आता हा सगळा खर्च करावाच लागतो. त्यात क्वचितच सूट मिळते.

मग मुद्दा येतो वक्त्याचा, प्रवासखर्च आणि मानधन यांचा. वरिल खर्च ज्यांच्या भाषणासाठी करायचा त्याने मात्र फुकटात यावे अशी अपेक्षा का? काही संयोजक निमंत्रण देताना सुरूवातच अशी करतात, "तुमचे मानधन किती असेल?" त्यावर बोलवायचे की नाही ते ठरणार. मी उलटे करतो. संयोजकांचा हेतू, तारीख, वेळ, विषय जुळला तरच पुढची बोलणी. आधी कशाला ना? बहुतांश संयोजक ठरलेले मानधन देतात. काही संस्था गरिब असतात, त्यांची विषयाबद्दलची कळकळ आणि आस्था बघून वक्तेही मानधनात भरिव सूट देतात किंवा कार्यक्रमाचे मानधन घेत नाहीत. निदान मी तरी असे करतो. किंवा दिलेले मानधन त्याच संस्थेला देणगी म्हणून परत करतो.

पण काही आयोजक मात्र मानधनाचा बाऊ करताना दिसतात. त्यावर आक्षेप घेतला जातो, टिकेची झोड उठवली जाते. (काही व्यावसायिक वक्ते मानधनाच्या नावाखाली संयोजकांची लूट करतात हेही वाईटच.) संयोजकांची ऎपत व कार्यक्रमाचा हेतू बघून मानधन घ्यावे किंवा नाही हे ठरवावे. मात्र हा कायम टिकेचा विषय कशाला?

आम्ही तुम्हाला स्टेज देतो, प्रसिद्धी देतो, मग कशाला हवे मानधन? असाही काहीजण प्रश्न विचारतात. तुम्ही आमच्या जीवावर मोठे झालात असेही ऎकवले जाते. प्रसंगी वक्त्याची हेटाळणीही केली जाते. अर्थात माझे कार्यक्रमांचे बहुतांश अनुभव चांगलेच आहेत. काही आंबटगोड तर काही सालटी काढणारे. काही वक्ते पिण्याखाण्यासाठी संयोजकांना अतोनात खर्चात पाडतात, हेही निषेधार्हच होय...माझ्यापुरते सांगायचे तर मला चहा व मिळेल ते जेवन यावर माझे भागते. राहायची व्यवस्था हॉटेलातच हवी असेही नसते. कार्यकर्त्याच्या घरीही माझे छान जुळते.

वर्षातले निम्मे कार्यक्रम मी विनामानधन करतो. ज्या संस्था खूपच गरिब आहेत त्यांच्याकडून प्रवासखर्चही घेत नाही. ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत त्यांनी प्रवासखर्च व मानधन द्यायला हवे असे मला वाटते. काही संस्था किंवा संयोजक पदरमोड करून कार्यक्रम घेतात, ते जे देतील ते मी स्विकारतो. काहीजण ठरलेले नसतानाही देतात हेही खरे आहे. मात्र कोणाला अर्धी वा १००% सूट द्यायची आणि कोणाकडून पुर्ण मानधन घ्यायचे हा माझा निर्णय असतो. संयोजकांनी ते ठरवू नये असे मला वाटते.. " हे वक्ते मानधन घेत नाहीत म्हणूनच ह्यांना बोलावले किंवा खूप कमी मानधनात येतात म्हणून तर यांची निवड केली" असेही काही संयोजक जाहीरपणे स्वागतभाषणात सांगतात. ते निमुटपणे ऎकून घ्यावे लागते.

मानधन तुम्ही ठरवा असे म्हटले की दहा टक्के लोक सन्मानपुर्वक मानधन देतात मात्र साधारणपणे नव्वद टक्के संयोजकांचे लगेच रडगाणे सुरू होते. फुकट काही मिळते म्हटले की त्याची किंमत राहात नाही. काही संयोजक तर पाचदहा रूपयाचेही बार्गेनिंग करायला बघतात.


काही संयोजक इतर वक्त्यांना दुप्पटतिप्पट मानधन देतात, आम्हाला मात्र परवडत नाही असे ऎकवतात. संयोजकही वक्त्यांचा ब्रॅण्ड /प्रसिद्धी/ कंटॆण्ट बघूनच बोलावतात.

निदान मी तरी आयुष्यात एकदाही मला बोलवा असे कोणालाही सांगायला गेलेलो नाही. श्रीमंत राजकारणी आयोजक कबुल केलेल्या मानधनात फसवणूक करणारात अग्रेसर असतात. ९९% श्रीमंत राजकारणी आयोजक फसवणारे असतात असा माझा तरी अनुभव आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हे प्रमाण कमी आहे. मात्र आहे.

वक्त्यांनाही घरदार, संसार, तहानभुक असते. त्यांनी विनामानधन बेघर होऊन, लाचार होऊन दारोदार भीक मागत फिरावं का? म्हणजे मग तुम्ही त्यांना क्रांतिकारक प्रबोधनकार म्हणणार का?
असल्या लाचार, परावलंबी त्यागाचं कवतिक करणारे दांभिक नाहीत? वक्त्यांनी फुकट घसा ताणून जगण्यासाठी धुणंभांडी करावीत अशी अपेक्षा आहे का या त्यागी मंडळींची? बरं पटत नाही, तर बोलवूच नये, हा पर्याय आहे ना तुमच्याकडे!... वक्त्यांवर उठसूठ चिखलफेक कशाला? वक्ते, कलाकार, कार्यकर्ते सन्मानाने जगले पाहिजेत! ते चळवळीचं बळ वाढवतात असं तुम्हाला वाटत नाही काय?

माझे त्यातलेच काही कडूगोड अनुभव यानिमित्ताने नमूद करतो.

१. फार जुनी गोष्टय. औरंगाबादला विद्यापीठाने मला बोलावले होते. विद्यापीठाचा प्रमुख कार्यक्रम होता. मी मानधनाबद्दल काही बोललो नाही. तरिही आयोजकांनी आम्ही विद्यापीठ नियमाप्रमाणे प्रवासखर्च व अमूकइतके मानधन देऊ असे सांगितले. मी होकार दिला. कार्यक्रम फारच उत्तम झाला. संयोजकांनी व्यवस्था चांगलीच ठेवली होती.

त्यांनी मानधनाचे पाकीट दिले. व्हॉऊचरवर सही करताना माझ्या लक्षात आले की त्यांनी जेव्हढे मानधन देऊ म्हणुन मला फोनवर सांगितले होते त्याच्या दुप्पट रक्कम त्यांनी मला दिलेली होती. ठरलेले गाडीभाडेही अदा केलेले होते. मी सदर रक्कम ठरल्यापेक्षा जास्त आहे, असे त्यांच्या निदर्शनाला आणले तेव्हा संयोजक मला म्हणाले, " आम्ही विद्यापीठाचे मागील रेकॉर्ड चेक केले तेव्हा असे आढळले की आमची पद्धत आहे त्याच्या निम्मीच रक्कम तुम्हाला सांगितली गेलीय, म्हणुन नियमाप्रमाणे जी रक्कम याआधीच्या वक्त्यांना दिलीय तीच तुम्हालाही दिलीय." ठरल्याच्या दुप्पट मानधन मिळाल्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिला आणि आजवर तरी शेवटचा अनुभव होता हा. संयोजक होते, प्रा. डॉ. सुधीर गव्हाणेसर.

२. जुनीच गोष्टय. मला सांगलीच्या एका संस्थेचे निमंत्रण आले. तारिख, विषय, वेळ सगळे ठरले. तुम्ही रेल्वेचे तिकीट काढून मला पाठवा असे मी म्हटल्यावर संयोजक, जे एक नामांकित डॉक्टर होते, मला म्हणाले, आम्ही यावर बैठक घेतो आणि जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवतो. चार दिवसांनी त्यांचा फोन आला. म्हणाले, " याविषयावर आमच्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची तीन तास मिटींग झाली. आम्ही सगळे नामांकित वकील, डॉक्टर्स, सी.ए. पत्रकार, उद्योगपती आहोत.

तेव्हा असे ठरले की वक्त्याला कळवावे, आम्ही कार्यक्रम घेऊन तुम्हाला स्टेज, प्रसिद्धी, भाषणाची संधी देतोय, मात्र प्रवासखर्च द्यायला आमचा तात्विक विरोध आहे."

मी त्यांना म्हणालो की "तुमच्या संस्थेची आर्थिक कुवत नाही, किंवा काही अडचण आहे म्हणून प्रवासखर्च न देणं मी समजू शकतो. पण आर्थिक सुबत्ता असूनही मानधन नाहीच, प्रवासखर्चालाही तात्विक विरोध असेल तर माझा निर्णय ऎका, असे फुकट कार्यक्रम करायला माझाही तात्विक विरोध आहे." मी त्यांचे आभार मानले आणि फोन ठेवला.

३. मुंबईला माटुंगा लेबर कॅंपमध्ये कार्यक्रम होता. प्रवासखर्च, मानधनाचे स्पष्ट बोलणे झालेले होते. मी पुण्याहून कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रम चांगला झाला. स्टेजवरून खाली येताच चहाही न विचारता आयोजकांनी टॅक्सी मागवली. मला टॅक्सीत कोंबले. हातात एक पाकीट दिले आणि निरोप दिला. टॅक्सीचे बिल देताना दादर रेल्वे स्टेशनजवळील एशियाडच्या स्थानकावर मी पाकीट फोडले.

त्यात एक चिठ्ठी होती. " वर्गणी कमी जमल्यामुळे तुम्हाला प्रवासखर्च मानधन काहीही देता येत नाहीये. क्षमस्व."  टॅक्सीचे बिल दिल्यावर माझ्याकडे परतीच्या तिकीटाइतकेही पैसे नव्हते. विनातिकीट रेल्वेने पुण्याला जाण्याची हिम्मतही नव्हती. बसने वरळीला गेलो. ओळखींच्याकडून उसने पैसे घेतले आणि पुण्याला आलो.

अगदी असेच नाहीत पण याच्या कमीअधिक किंवा जवळपासचे म्हणता येतील असे किमान दहाबारा तरी अनुभव पुढे यायचे होते. चालायचेच. संयोजकही माणसे आहेत, माणसांसारखेच वागणार!

४. एका शैक्षणिक संस्थेने कार्यक्रमाला दादरला बोलावले. माझा दुसर्‍या दिवशी सकाळी नाशिकला दिव्य मराठीचा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम असल्याने दादरचा कार्यक्रम संपताच मला नाशिकला लगेच निघावे लागणार होते. मी एशियाडने पुण्याहून दादरला गेलो. फ्रेश होण्यासाठी काही व्यवस्था आहे का असे मी विचारल्यावर ( संयोजक जे माझ्या ओळखीचे होते, त्यांनी सांगितले ) दोन तासांनी थेट हॉलवरच या, तिकडे बेस्ट कॉमन टॉयलेट आहे, तिकडेच फ्रेश व्हा.

मी दोन तास प्लाझा सिनेमाच्या समोरच्या बागेत वाचत बसलो. दोन तासांनी संध्याकळी ६ वाजता सभागृहावर पोचलो. कॉमन टॉयलेटमध्ये तोंड धुवून कपडे बदलले आणि सभागृहात गेलो. उपस्थिती खूपच लिंबूटिंबू होती. माझ्याबरोबरच बरेच वक्ते/पाहुणे बोलावलेले होते, ते मुंबईतलेच असल्याने कुणीही आलेले नव्हते. त्यामुळे ठरल्याच्या तीन तास उशीरा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान संयोजकांनी मी आल्यापासून तीनतासात साधा चहाही विचारलेला नव्हता. कार्यक्रम दोन अडीच तास चालला. बरा झाला. मी निघतो म्हणालो, तर संयोजक ठीकाय म्हणाले.

हॉलच्या बाहेर एक जुना मित्र भेटला. त्याने हॉटेलात नेले आस्थेने वडापाव खाऊ घातला. मी गाडी पकडली आणि नाशिकला निघालो. मध्यरात्र असल्याने रस्त्यावर खायला काहीही मिळाले नाही. नाशिकला पहाटे पोचलो. राहण्याचे हॉटेल चांगले होते पण पहाटे किचन बंद होते.

सकाळीच नास्ता मिळेल असे सांगण्यात आले. मी घड्याळावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले की मी पुण्यावरून मुंबईला निघालो त्याला आता १८ तास झालेले होते. दादरला मित्राने वडापाव खाऊ घातला नसता तर एक मस्त निर्जळी उपवास तरी घडला असता. तब्बेतीसाठी तो बरा असतो म्हणतात.

५. तेव्हा मोबाईल फोन नव्हते. महाडजवळ कार्यक्रम होता. लॅंडलाईनवरून निमंत्रण मिळाले. मी स्विकारले. मी एसटीने पुण्याहून महाडला जायचे तिकडे संयोजक बसस्टॅंडवर मला घ्यायला येणार होते. तेच कार्यक्रमस्थळी घेऊन जाणार व परत बसस्टॅंडवर सोडणार होते. तसा मी महाडला पोचलो. संयोजक आलेले नव्हते.

तासभर वाट बघून त्यांच्या घरी फोन केला तर त्यांची बायको म्हणाली, सकाळी नऊ वाजताच ते कार्यक्रमाच्या गावी गेलेत. आता उद्याच परत येतील. कार्यक्रमाच्या गावचा कुणाचाही फोननंबर त्यांच्याकडे नव्हता. गावाचे नाव तेव्हढे त्यांना माहित होते ही मेहरबानीच म्हणायची... ते गाव महाडपासून अठरा किलोमीटरवर होते.

वडापवाला मला मुख्य रस्त्यावर सोडतो म्हणाला. साधारण ज्या प्रवाशीगाडीत सहा प्रवासी बसतात, त्या गाडीत त्याने माझ्यासह १६ प्रवाशी कोंबले होते. जिथे त्याने मला उतरवले तिकडून चालत अवघे नऊ किलोमीटरवर डोंगरात खाली गाव होते. जायला फक्त पायवाट होती.

मी जंगलातून चालत साधारणपणे चार तासांनी त्या गावात पोचलो. तर मला घ्यायला येणार होते तेच गृहस्थ एकदम पुढे आले व मी विसरलोच तुम्हाला न्यायला यायला असं म्हणू लागले. यावर काय बोलणार? संयोजक माझी वाटच बघत होते. चहा झाल्यावर लगेच कार्यक्रम सुरू झाला. उपस्थिती मोठी होती.

कार्यक्रम बेस्ट झाला. आग्रहाचे जेवन दिल्यावर त्यांनी मला महाडला बसस्टॅंडवर सोडायला एक मोटर सायकलवाला बरोबर दिला. आम्ही रात्री साडॆबाराला तिकडे पोचलो तेव्हा शेवटची पुणेगाडी गेलेली होती. पुढची एसटी उद्या सकाळीच होती. बसस्टॅंडवर झोपू नका असे तिकडचा वहातूकनियंत्रक म्हणाला.

महाडच्या रेस्ट हाऊसला गेलो तर ते फुल्ल होते. किचनमध्ये डायनिंग टेबलवर बॅगेतील लुंगी अंथरली आणि पडलो. तर मच्छरांचा हल्ला झाला. सरकारी पंखा फक्त आवाज करीत होता. फिरत मात्र नव्हता.
सकाळी तीनतास आधीच महाड बसस्टॅंडवर पोचलो.

६. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना नाशिकच्या द्राक्षे व वाईन उत्पादकांनी मला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या एका कार्यक्रमाला बोलावले. मला निमंत्रण द्यायला विसेकजण नाशिकहून पाचसहा मर्सिडिजने माझ्या कोथरूडच्या घरी आलेले. कालिदासमध्ये कार्यक्रम होता.

राहायची व्यवस्था एका मोठ्या हॉटेलात होती. वर्तमानपत्रातील जाहीरातींवर, मंत्र्यांचे व संयोजकांचे फोटो यावर किमान चार लाख रूपये खर्च केलेले अतिश्रीमंत संयोजक होते. कार्यक्रम स्थळाची सजावट, कमानी, बॅनर्स, बॅंड यावर दोनेक लाख खर्च झाला असावा. स्वागत गीतवाल्यानेच पंधरा हजार घेतलेले होते.

कार्यक्रमात माझे मुख्य भाषण होते. बरेच मंत्री उपस्थित असले तरी ते मोजकेच बोलले. कार्यक्रमानंतर आता उद्या सकाळी भेटू असे सांगून संयोजक मला हॉटेलवर सोडून निघुन गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी माझ्या एस.टी.ची वेळ होत आली तरी संयोजकांचा पत्ता नव्हता. मी त्यांच्या घरी फोन केला तर ते दमल्याने झोपलेले होते. उठल्यावर मला म्हणाले, " खूप दमलोय. आता मी येत नाही निरोप द्यायला. तेव्हढे हॉटेलचे बिल द्या आणि तुम्ही जा, आम्ही तुम्हाला तो खर्च, मानधन व प्रवासखर्च पाठवतो."

माझ्या रूममध्ये जे दुसरे एक निमंत्रित उद्योगपती होते ते स्वत:च्या कारने पहाटेच फलटणला निघून गेलेले होते. मात्र त्यांच्या ट्रंककॉलचे बिल दोनेक हजार रुपये झालेले होते. रुमचे भाडे, दोघांचे जेवन, नास्ता, चहा यांचेही तितकेच झालेले. एव्हढे सगळे पेमेंट करण्याएव्हढे पैसे माझ्याकडे नव्हते. मी संयोजकांना पुन्हा फोन केला व माझी अडचण सांगितली. मग ते हॉटेल मॅनेजरशी बोलले. तेव्हा कुठे माझी सुटका झाली.

मी पुण्याला परत आलो. संयोजकांना मी नंतर मानधन-प्रवासखर्चासाठी खुपदा फोन केले, पत्रे लिहिली, निरोप दिले. त्यांनी दादच दिली नाही. त्यांचे म्हणणे असे की, " मी दुसर्‍याही एका शैक्षणिक कार्यक्रमाला वेळ दिलेला होता, त्या संस्थेने पुणे-नाशिक-पुणे साध्या एसटीचे भाडे मला दिलेले होते. सामाजिक कार्यक्रमाचे मानधन कसले मागता?"

मग मी तक्रार दाखल करतो म्हणालो. तेव्हा कुठे ते नरमले. शेवटी मी सुचवलेल्या एका सामाजिक संस्थेला त्यांनी अगदी अल्पशी देणगी दिली व फुल ना फुलाची पाकळी गोड मानून घ्या असं मला म्हणाले. असे हे कोट्याधिश की कोत्याधिश!!

७. पुण्याच्या एका प्राध्यापक मित्राच्या आग्रहावरून संगमनेरचा कार्यक्रम घेतलेला. तेव्हा मी टेल्कोत नोकरी करायचो. शिफ्ट करून लाल डब्याने रात्री अकरा वाजता संगमनेरला बसस्टँडवर आम्ही दोघे पोचलो. माझ्यासोबत पुण्याचे प्राध्यापकमित्र होते. त्यांची बहिण संगमनेरला राहत असल्याने ते तिच्याकडे राहायला गेले.

माझी सोय रेस्ट हाऊसमध्ये केल्याचे समजले. रेस्ट हाऊस बसस्टॅंडला लागूनच आहे. तिकडे गेलो तर संयोजकांनी रूम बुक केली होती, मात्र नुकतेच एक तासापुर्वी त्यांनी स्वत: येऊन रिझर्व्हेशन कॅन्सल केले होते. कारण अज्ञात होते. दरम्यान रात्रीचे बारा वाजलेले होते.

मी शेवटचा पर्याय म्हणून प्रा. रावसाहेब कसब्यांच्या घरी फोन केला. दुसर्‍याच बेलला फोन उचलला गेला. वहिनी म्हणाल्या, " कसबेसर एका कार्यक्रमाला बाहेरगावी गेलेत. आत्ता पोचतीलच घरी. तुम्ही राहायलाच घरी या."

गेलो. सर आले. आयोजक कसबे सरांच्या परिचयाचे होते. सर म्हणाले, "झोप आता. सकाळी बघू."

सकाळी कसबेसरांनी संयोजकांच्या घरी फोन केला तर ते बाहेरगावी गेल्याचे समजले. कार्यक्रमाचे काय तर, पुरेशी वर्गणी न जमल्याने तो रद्द झाल्याचे संयोजकपत्नी म्हणाल्या. रेस्ट हाऊसचे रिझर्व्हेशन का रद्द केले, कार्यक्रम रद्द झाल्याचे वक्त्यांना पुण्याला का कळवले नाही?" यावर बाईंचे उत्तर होते, " कळवायचे काय त्यात, तसेही आल्यावर कळेलच की.

राहण्याच्या रूमचे रिझर्व्हेशन अशासाठी रद्द केले की वक्ते संगमनेरला आल्यापावली पुण्याला परत जाऊ शकतील! त्यांचा वेळ फुकट जायला नको....."
घ्या कपाळावर मारून!

८. दापोली माझे आवडते गाव आहे. तिथल्या संयोजकांचा कार्यक्रमासाठी माझ्या घरी पुण्याला फोन आला तेव्हा मी मुंबईत के.ई.एम. हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट होतो. खूप आजारी होतो. अंगात ताप होता. खूप अशक्तपणाही होता. डॉक्टरांनी नकार दिला तरी संयोजकांनी घ्यायला गाडीसह माणूसच पाठवला. सोबत माझ्या पत्नीला व मुलीलाही यायचा त्यांनी आग्रह केला.

शेवटी आग्रहाला बळी पडून आम्ही तिघे त्यांच्यासोबत दापोलीला गेलो. कार्यक्रमाला मंत्री रामदास आठवलेसाहेब आलेले होते. कार्यक्रम जोरदार झाला. आमची राहायची व्यवस्था कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसवर होती. मुक्काम करून सकाळी पुण्याला निघायचे ठरले होते. घ्यायला आलेल्यांच्या घरी सकाळी मी फोन केला तर ते थकून झोपलेले होते. त्यांच्या पत्नी म्हणाल्या, " साह्येब झोपलेत. उठवू नका असा मला दम दिलेला आहे त्यांनी. गाडी तिकडेच आहे, तिने जा तुम्ही पुण्याला!"

गाडी व ड्रायव्हरची मी चौकशी केली तेव्हा समजले कारवाला पुण्याचा होता. रात्रीच त्याला संयोजकांनी पेमेंट केले व तो न थांबता पुण्याला परत एमप्टी निघुन गेलाय. परत मुख्य संयोजकांकडे फोन केला तर ते मुंबईला गेल्याचे समजले.

सगळेच्या सगळे आयोजक नॉट रिचेबल होते. शेवटी फणफणत्या तापात बायको-मुलीसह बसस्टॅंडवर गेलो. सगळ्या गाड्या फुल्ल होत्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे उभे राहायलाही गाडीत जागा नव्हती. शेवटी दोनतीन तास वाट बघून डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे जावई अनीस पटवर्धन यांना  फोन केला. त्यांनी धावपळ करून कुठून तरी एक कार मॅनेज केली. अनीसमुळे निदान पुण्याला तरी कसेबसे पोचलो.

वर्षभरात संयोजकांनी कधीही माझे फोन घेतले नाहीत.

मात्र पुढच्यावर्षी त्यांचा पुन्हा मला निमंत्रणाचा फोन आला. म्हणतात कसे, " तुमचे भाषण लोकांना खूप आवडलेय. तुमची खूप डिमांड आहे. यावेळी मागच्यासारखा त्रास होणार नाही. माझा शब्दाय. तुम्ही आलेच पाहिजे. माणूस पाठवतो घ्यायला. आठवलेसाहेबांचा फार आग्रह आहे....!"

असे किंवा यापेक्षाही चित्रशैलीतील अनुभव!!! भरमसाठ आहेत. पुन्हा कधी त्यांच्याबद्दल.... पुण्यातल्या एक नामवंत महाविद्यालयाने मला व्याख्यानाला बोलावले. तिथल्या प्राध्यापक मित्राच्या लुनावरून डबलसीट खडकवासल्याला भाषणाला गेलो. तिकडे महाविद्यालयाचा कॅंप गेलेला होता. मजा आली. परतल्यावर संयोजकांनी मानधनाचे पाकीट दिले. पाहिले तर त्यात पाच रूपये होते! अर्थात वीस वर्षांपुर्वीचे ५ रुपये म्हणजे आजचे निदान ५० रूपये झाले. भरपुर झाले ना?

९. हो, तारखा शिल्लक नाहीत किंवा तारखा जुळत नाहीत म्हणून मला शेकडो कार्यक्रम घेता आले नाहीत, त्यामुळे असंख्य लोक नाराजही झाले. चिडले. संतापले. कायमचे तुटलेही.

मात्र मानधन कमीय म्हणून मी आजवर कार्यक्रम नाकारलेला नाही. पस्तीस वर्षे मी एस.टी. बसने वा एशियाडने प्रवास केला. अलिकडे स्पॉन्डीलिसिसमुळे एसटीच्या लाल डब्याने जाण्याऎवजी रेल्वेने, कारने, सुमोने, जीपने जावे लागते. त्याचा संयोजकांवर भार पडतो याचाही मला गिल्ट वाटतो....

संयोजकांनी वक्त्यांचा प्रवासखर्च करायला हवा. आमच्यासारख्या ज्यांनी टेल्कोसारखी नोकरी फुले-आंबेडकर साहित्याच्या प्रकाशनासाठी स्वेच्छेने सोडली व ज्यांना उदरनिर्वाहाचे दुसरे काहीच साधन नाही त्यांना शक्य असेल तेव्हढे मानधनही संयोजकांनी द्यावे, असे मला तरी वाटते.

मी ठरलेली तारीख देऊन गेलो नाही असे कधीही झालेले नाही. अधिक मानधनाचे आमिष असतानाही आधी ज्यांना शब्द दिलाय त्यांच्या तारखेत वा कार्यक्रमात मी कधीही बदल केलेला नाही, वा त्यांच्याकडून ऎनवेळी मानधनही वाढवून मागितलेले नाही. अनेकांनी कमी दिले तरी ते स्विकारले. नंतर पाठवले तेही मान्य केले.
अर्थात ही माझी बाजू झाली.

संयोजकांचीही काही एक बाजू असेलच.

कार्यक्रमाचे फोटो, बातम्यांची कात्रणे पाठवा असे विनवूनही २ ते ३ टक्के संयोजकच फोटो,कात्रणे पाठवतात. अनेकांचा कार्यक्रम संपला की गरज सरो, वैद्य मरो असाच अनुभव असतो.

चालायचेच. माणसेच ती. अशीच वागणार!

१०. मला आज सुमारे ४० वर्षांच्या अनुभवानंतरही मानधन याविषयावर बोलताना खुप संकोच वाटतो.
मला निदान २५ संस्था/व्यक्ती अशाही माहित आहेत ज्यांनी मला न विचारताच माझे नाव छापले. वर्गण्या जमा केल्या. रेल्वे स्टेशनवर पोस्टरमध्ये माझे नाव वाचून मी स्वत: त्यांना संपर्क केला
तेव्हा त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळले. काहीजण थेटच म्हणतात, " तुमची फक्त संमती द्या, आम्ही तुमचं नाव छापतो. तुम्ही येऊ नका." काही संमती घेतात आणि नंतर काहीच कळवत नाहीत. आपण तरिही गेलो तर त्यांना अवघडल्यासारखे होते. आम्हाला वाटलं, ज्याअर्थी आम्ही नंतर तुम्हाला काही कळवलं नाही त्याअर्थी तुम्ही येणार नाही. ठीकाय. आता आलाच आहात  तर जेवा आणि परत जा. आणि असे सांगणारे कोणी सामान्य नाहीत, द. महाराष्ट्रातील एका मोठ्या साखर कारखान्याचे संस्थापक-चेयरमन, स्वातंत्र्य चळवळीतले थोर नेते, प्रचंड आदरणीय सामाजिक नेते. मोठाच माणूस. असो. शेवटी कोणीही असला तरी माणूसच तो.

पण असे असले तरी माझा एकुण अनुभव जास्तकरून चांगलाच आहे. त्याच्याबद्दलही पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहितो. हजारो भल्या संयोजकांना मन:पुर्वक धन्यवाद.
सामान्य लोक खूप जीव लावतात. अमाप प्रेम करतात. आणखी काय हवे?

-प्रा. हरी नरके, ९/६/२०२०

Thursday, May 14, 2020

एम.ए.एंटायर पॉलिटिक्सवालोंसे मुझे बहोत डर लगता हैं- प्रा. हरी नरके


एम.ए.एंटायर पॉलिटिक्सवाल्यांची मला फार भिती वाटते बुवा. मग ते दिल्ली विद्यापीठातले असोत की पुणे. भयावह विद्वत्ता! एका मिनीटाच्या मुद्द्याला ३४ मिनिटांचे भाषण ठोकणार!  आणि मुद्याचं नाहीच सांगणार. "गांधी, नेहरू, आंबेडकर" या मित्रवर्य संजय आवटेंच्या पोस्टवर मी केलेल्या कमेंटवर एका एम.ए. एंटायर पॉलिटिक्सवाल्यांची मुक्ताफळं वाचून मी खतरनाक हादरलो. हे विद्वान, युपीएससी, एमपीएससीच्या, स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या नावावर गरिब विद्यार्थ्यांना लाखो रूपयांना गंडा घालणार्‍या पुण्यातल्या एका व्यापारी संस्थेत काम करतात म्हणे! एकदम ’ युनिक’ काम! त्यांचे म्हणणे असे की तथ्यांना [फॅक्ट्सना] काडीचेही महत्व नाही. सत्य भले काहीही असेल त्यांना त्याच्याशी घेणेदेणे नाही.


त्यांनी टाकलेल्या आणखी काही पिंका पुढीलप्रमाणे- "[हरी नरकेला] फक्त फॅक्ट दाखवता येतात. किंवा फॅक्टचे खेळ मांडता येतात. आपल्या माणसावर [बाबासाहेब] आपलीच मालकी असावी दुसऱ्यांनी कोणी त्यात लुडबूड करू नये अशी त्याची अपेक्षा. प्रक्रिया कशाशी खातात हे त्याला माहिती नसते. विचार-दृष्टिकोन हे तर खूपच लांबचे झाले. मला अशा लोकांची शंका आल्याने मी ऐतिहासिक घटनांमध्ये पडतच नाही. आमचा माणूस मोठा की तुमचा माणूस मोठा, आमचा चुकला का तुमचा चुकला याचेच रिंगण हा नरके घालत बसणार. अशा लोकांना काळ आणि विचार त्यांच्यातलं नातं कसं समजणार? त्यातून एक अखंड अशी प्रक्रिया जन्माला येते आणि त्या प्रक्रियेला पुढे दिशा देण्याचे, त्यास वाहते करण्याचे काम हे त्या त्या पिढीला करावे लागते. प्रक्रियेतून बघण्यामुळे कोणत्याही घटनेचा अभ्यास सुटासुटा करता येत नाही हे यांच्या गावीही नसते."


खरंय शेठ तुमचं. आम्ही काय बेअकली. आम्हा अडाण्यांना काय कळणार काळ, विचार, प्रक्रिया, त्यांचं नातं? आमच्या झोपडीत फक्त गावठीपणा सापडणार. विद्वत्ता ही फक्त तुमच्याच बापजाद्यांची खाजगी मालमत्ता. ज्ञानाच्या किल्ल्या तुमच्याच कंबरेला असं दस्तुरखुद्द तुमचे आजोबा, विष्णूशास्त्री चिपळूणकरच सांगून गेलेत ना. आम्हाला त्यातलं काय कळणार? विद्वत्ता फक्त तुमच्याच कोठीवर विकायला ठेवलेली चीजवस्तू! 

किती अहंकार असावा या  एम.ए. एंटायर पॉलिटिक्सवाल्यांना? 

हे म्हणजे तुम्ही कसे पास होता, कॉपी करून की नकली माणूस परिक्षेला बसवून ते महत्वाचे नाही, महत्वाचे आहे ते फक्त पास होणे. ट्यूशनचा धंदा करणारे दुसरे काय सांगणार म्हणा?

राज्यशास्त्रातले अनेक दिग्गज माझे गुरू. प्रा. य. दि. फडके, प्रा. राम बापट, प्रा. राजेंद्र व्होरा, प्रा. यशवंत सुमंत, प्रा.रावसाहेब कसबे हे माझे मार्गदर्शक. पण त्यांना विद्वत्तेचा असा गर्व नव्हता. नाही. त्यांनी आम्हाला शिकवलं तथ्यं [ फॅक्ट्स ] चुकता कामा नयेत. मग त्यावर काय प्रक्रिया आणि सिद्धांतन करायचं ते करा.
इथे हे सोलापूर चादरीवाले मला सांगतात, तथ्यं गेली खड्ड्यात! असल्या भंपक आणि चंपथ भाडेवारांनी आमच्या वाट्याला न गेलेलेच बरे! 

मी टेल्कोची रात्रपाळीची नोकरी करून चळवळीतील काम आणि वादविवाद स्पर्धा करीत बी.ए. आणि एम.ए. मराठीच्या परीक्षांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सुवर्णपदके मिळवलेली आहेत. तुमच्या बाजारू दुकानातली नाहीत. तुमच्याकडून प्रक्रिया, काळ आणि विचार शिकायची माझ्यावर वेळ आलेली नाही. मला शिकवायची तुमची अवकाद नाही. तुम्ही ज्या विद्यापीठात शिकलात तिथल्याच महात्मा फुले अध्यासनाचा मी दहा वर्षे प्रोफेसर आणि हेड होतो. आजवर माझी संशोधनपर ५४ पुस्तकं प्रकाशित झालीत. तुमच्यासारखी नवनीतसदृश्य फडतूस गायडं लिहून मी पोट भरीत नाही. तेव्हा भाडेवार, आपल्या मापात राहायचं.

-प्रा. हरी नरके, १३/५/२०२०

Wednesday, April 29, 2020

संघाची लबाडी - संघाने उभे केले महात्मा फुले यांचे नकली / डमी वंशज- प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 14












सुमारे साडेचार वर्षांपुर्वी संघाने पुण्याजवळ एक मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. तेव्हा गोदीमिडीयाला हाताशी धरून खोट्या बातम्यांचा पाऊस पाडण्यात आला. त्यातली एक फुसकी म्हणजे अर्धी चड्डी घातलेल्या काही बनावट लोकांचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्यात आले. ते महात्मा फुल्यांचे वंशज असल्याची दवंडी पिटण्यात आली. स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच असे लिहून ठेवले होते की " हे लोक आपले वारस नाहीत, " अशांच्याच पुढच्या पिढ्यांना भजनी लावून ते जोतीरावांचे वारस असल्याची प्रसिद्धी संघ देत आहे. महात्मा फुल्यांचे अपहरण करण्याचा हा बनाव साडेचार वर्षांपुर्वी मी उधळून लावला होता.


पुण्याचे एक पत्रकार शैलेंद्र परांजपे यांना यासाठी हाताशी धरण्यात आले. ते आमच्याशी खाजगीत बोलताना संघाची टर उडवायचे. वर्षानुवर्षांची ओळख. पण त्यांनी कधी कळूच दिले नाही की ते संघवाले आहेत. जशी मोदीफडणविसांची सत्ता आली तसे यांचे खरे रूप उघडे पडले. परांजपे चक्क संघाची तळी उचलून धरायला लागले.

त्यांनी डी.एन.ए.मध्ये ही बातमी दिली. मी तात्काळ खुलासा केला, बातमी खोटी आहे. महात्मा फुल्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता. त्याला मुलगा झाला नाही. त्यामुळे फुले आडनावाचे कोणीही फुले वंशज शिल्लकच नाहीत. केवळ आडनाव हा पुरावा मानायचा तर प्रत्येक भोसले आडनावाचा माणूस छत्रपती शिवरायांचा वंशज मानावा लागेल. महात्मा फुले यांच्या हयातीतच काही भाऊबंद, फुले मंडळी, जमिन आणि घरदाराच्या लोभाने, पिढीजात वादांमुळे किंवा सनातन्यांचे हस्तक म्हणून जोतीराव -सावित्रीबाईंच्या विरोधात गेलेले होते. क्रांतिकारक विचार पेलायला काळीजही मोठे लागते. छटाकभर काळजाचे लोक सनातन्यांचे हस्तक बनू शकतात. क्रांतिकारक नाही. त्यातल्या काही बुटक्या लोकांना हाताशी धरून संघ हाच फुले विचार चालवतो असं वदवणं हे किळसवाणं होतं. ज्यांनी महात्मा फुले वाचले नाहीत, त्यांचे पुस्तकही हातात धरलेले नाही असे लोक टिव्हीवर येऊन फुलेविचार आणि संघ किती जवळचे आहेत यावर पोपटपंची करीत होते.  पढवलेले सुमार लोक दुसरं काय करणार?

स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच आपल्या मृत्यूपत्रात स्पष्ट केलेले आहे, की आपले कोणीही भाऊबंद हे आपले वारस नाहीत, अशांच्याच पुढच्या पिढ्यांना संघ फुलेवारस म्हणून प्रसिद्ध देत होता. आजही हे कारस्थान चालूच आहे.

डी.एन.ए.चे संपादक उदय निरगुडकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझा खुलासा संपादित स्वरूपात प्रकाशित केला. [पाहा-परिशिष्ट १]

अशाच खोट्या बातम्या लोकमत दैनिकातही झळकळ्या होत्या. लोकमतचे मुख्य संपादक दिनकर रायकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर लोकमतनेही माझा खुलासा छापला. [पाहा-परिशिष्ट २]

ह्याच खोडसाळ बातम्या ए.बी.पी. माझा वाहिनीवरही देण्यात आल्या होत्या. तिकडेही संपादक श्री राजीव खांडेकर यांच्याकडे मी पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझ्या खुलाशाचा बाईट बातम्यांमध्ये दाखवला. मात्र तो ऑनलाईनवर ठेवण्यात आला नसल्याने त्याची लिंक उपलब्ध नाही.

त्यावेळी आय.बी.एन. लोकमतवर यानिमित्ताने संपादक मंदार फणसे यांनी एक "बेधडक" चर्चा घेतली होती. तिच्यामध्ये मी सहभागी झालेलो होतो. त्या चर्चेत मी संघाचा खोटेपणा सप्रमाण उघडा पाडला होता. [ पाहा- परिशिष्ट ३]

यावेळी संघाची असत्यकथन, सत्यापलाप आणि खोटा इतिहास रचण्याची साखळी उघडी पाडणारा ब्लॉगही मी लिहिला होता. [ पाहा-परिशिष्ट-४ ]

" Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage " असा लेख मुंबई मिरर [ दि. 12 january 2016, mumbai mirror] या इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यात मिररच्या प्रतिनिधी अलका धुपकर यांनी माझा दावा नोंदवला होता. [ पाहा परिशिष्ट-५] 


लोकमतने माझे म्हणणे विस्ताराने छापले होते, " राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:

१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.

४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.

५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.

६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिले होते, 

" स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डॉक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे सच्चे वैचारिक वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव, ना.मे.लोखंडे आणि केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत हे हास्यास्पद आहे. रा.स्व.संघाला अशा बनावट आणि तकलादू मना्च्या श्लोकांची रचना करावी लागावी हे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे. 

विद्यमान फुले मंडळींनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. ते महात्मा फुल्यांचे वारसदार असल्याचा नकली दावा करीत आहेत. फुलेविचारांच्या बोगस प्रमाणपत्रांचे वाटप ते करू शकत नाहीत. तो नैतिक अधिकार महात्मा फुले व सावित्रीबाईंचा ध्येयवाद सच्चेपणाने पुढे नेणारांनाच आहे. इतर लांडग्यांना नाही.

संघाच्या घृणास्पद वर्तनाचे असे कितीतरी पुरावे देता येतील. 
तेव्हा बलाढ्य रा.स्व. संघाला माझ्यामुळे [मी त्यांचा खोटापणा सिद्ध केल्याने] माघार घ्यावी लागल्याने संघ संतापणे स्वाभाविक आहे. संघ तोंडघशी पडला तो माझ्यामुळे नाही,त्यांच्या लबाडीमुळे. असत्याचा सहारा  घेतल्याने. महात्मा फुले सत्यमेव जयते चे पुरस्कर्ते होते. संघाने तेव्हापासून आपल्या चेल्याचपाट्यांकरवी अफवा पसरावायला सुरूवात केली. तेच ते त्यांचे गेल्य ९५ वर्षांचे जन्मापासूनचे अफवातंत्र. 

अहो, कळलं का, हरी नरके तर आमचेच आहेत. अरे लबाडांनो, मी तुमचा होतो म्हणून तुमचा खोटारडेपणा जगाच्या वेशीवर टांगला काय? जो सज्जड पुराव्यांनिशी तुम्हाला उघडं पाडतो, तुम्हाला जाहीरपणे चॅलेंज करतो तो तुमचा असतो म्हणून काय? मी संघाला गेल्या ३२ वर्षात अनेकवेळा उघडं पाडलं पण संघाच्या लबाड्या काही थांबत नाहीत. उद्या संघाच्या आणखी एका लबाडीबद्दल वाचा- 

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.https://harinarke.blogspot.com/


प्रा. हरी नरके, ३०/४/२०२०



....................................
परिशिष्ट १-

Thursday, January 21, 2016
Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
http://www.dnaindia.com/mumbai/report-morally-improper-to-call-rajaram-s-descendants-as-mahatma-phule-s-prof-hari-narke-2167460
DNA,Online, 21 Jan.2016

Morally improper to call Rajaram's descendants as Mahatma Phule's: Prof Hari Narke
dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3.
Researcher on Mahatma Phule's life and works prof Hari Narke has said it is not morally proper to project the Rajaram Phule's descendants as those of Mahatma Phule as the latter gave importance to ideological inclination than biological lineage. Narke pointed out that Mahatma Phule himself had disowned his elder brother Rajaram by registering his will.

dna had published a report on January 11 on the descendants of Rajaram Phule participating in an RSS event of Shiv Shakti Sangam at Marunji village on the outskirts of Pune on January 3. Narke said the report headline said three members of the Phule family, who are descendants of Mahatma Phule, had attended the event, which is far from reality as, Narke said, they are in no way descendants of Mahatma Phule.

He added that Mahatma Phule and his wife Savitribai had adopted the son of a Brahmin widow, who went on to become a doctor. While adopting the boy, Phule had put the condition that if the boy did not adhere to Satyashodhak Samaj principles, his wife should look for another one to adopt, Narke said, reiterating the fact that Mahatma Phule gave importance to ideological inclination rather than biological lineage.
The professor also said that Mahatma Phule's will had clearly mentioned that neither his elder brother Rajaram nor his son Ganpat could have any share in his property. "So when Mahatma Phule himself had disowned his brother, how can his brother's descendants claim to be Mahatma Phule's?" he asked.

Morally Improper To Call Rajaram's Descendants As Mahatma Phule's: Prof Hari Narke...
.............................................

परिशिष्ट -२
Monday, January 18, 2016
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच

http://m.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11284626
ऑनलाइन लोकमत, सोमवार, दि.18 जानेवारी, 2016.First Published: 18-January-2016 : 13:25:00
Last Updated at: 18-January-2016 : 13:54:11
RSS च्या व्यासपीठावरील 'ते' फुल्यांचे वंशज नव्हेतच - हरी नरके
पुणे, दि १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ' शिवशक्ती संगम' कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे.
प्रा नरके म्हणतात, ' प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.' नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.
२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.
४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले: समग्र वाड्मय" या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.
५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.
६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

uesday, January 12, 2016
ते फुल्यांचे वारस नव्हेत!....
............................................

परिशिष्ट ३
आय.बी.एन.लोकमतवरील बेधडक कार्यक्रमाची लिंक-
https://www.youtube.com/watch?v=NjL7LqCqBzE
bedhadak 12 Jan 16 on Mahatma Phule family's 4th, 5th generation and RSS show
News18 Lokmat
23 K views 4 years ago

......................................................................

परिशिष्ट-४
माझा त्यावेळी लिहिलेला ब्लॉग-
1. स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डॉक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे वैचारिक वारसदार डा. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू, कर्मवीर भाऊराव आणि ना.म.लोखंडे, केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार,य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत.

त्यांनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण ते फुल्यांचे वारसदार म्हणुन प्रमाणपत्रांचे वाटप करू शकत नाहीत एव्हढेच.
.......................................

परिशिष्ट -५
मुंबई मिरर मधील लेख-
Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage
12 january 2016 mumbai mirror

Read more at:

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppsthttps://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/is-rss-trying-to-cash-in-on-jyotiba-phules-legacy-using-wrong-lineage/articleshow/50541087.cms
................................................

Saturday, April 25, 2020

संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी - रा.स्व.संघ 8







संघकृत बुद्धीभेद आणि फुले-आंबेडकरांची बदनामी - प्रा. हरी नरके , द वायर, मराठी 

सारे जग कोरोनाच्या दु:खात असताना काही चतुर मंडळींनी हीच वेळ साधायचे ठरवले. लोक जेव्हा चिंतेत असतात, दु:खात आणि तणावाखाली असतात, तेव्हा त्यांच्या त्या बेसावधपणाचा वापर करून आपला अजेंडा चतुरपणे पुढे रेटणे ही हिटलरची खासीयत होती. आपल्या देशातल्या गावठी हिटलरची चाल पण तशीच !


अरूण आनंद नावाचं एक उच्चभ्रू प्रस्थ आहे. ते ‘इंद्रप्रस्थ’ नावाची एनजीओ चालवतात. तिचे ते सीईओ आहेत. ते पत्रकारही आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा वरच्या वर्तुळात वावर असतो. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२९ वी जयंती होती. देशभरातील लॉकडाऊनमुळे ती लोकांनी घरातच साजरी केली. तर आनंद यांनी त्यानिमित्त एक व्हीडीओ प्रसारित केला व एक लेखही प्रकाशित केला. विषय – डा.आंबेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशंसक होते, त्यांचे इतके प्रेम होते, की ते म्हणाले, संघ वाढवा, तुमच्याबरोबर मी निवडणुक युती करतो. संघाचे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचे जीव की प्राण. त्यातल्या एकाला तर त्यांनी आपल्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, या पक्षाचे सचिव, निवडणूक प्रमुख आणि प्रवक्ता नेमले. संघाचे सुप्रिमो गोळवलकरगुरूजी आणि डॉ. बाबासाहेब यांच्या भेटीगाठींमध्ये खलबते होत असत. रणनिती ठरे. बाबासाहेब पुन्हापुन्हा संघाच्या शिबिरांना भेटी देत असत. संघाचे कौतुक करीत असत. त्यामुळे संघाचे लाडके बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा लाडका संघ असे घट्ट नाते होते. हे चित्र असे काही रंगवले गेले की आता बाबासाहेब हे संघाचे स्वयंसेवक होते, एव्हढेच सांगायचे बाकी राहिले.

संघाची एक कार्यपद्धती आहे. एकाचवेळी संघ अनेक आघाड्यांवर कार्यरत असतो. म्हणजे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक बाळ गांगल, भिडेगुरूजी, अरूण शौरी हे महात्मा फुले व बाबासाहेबांची बदनामी करीत असतात. त्याचवेळेला दत्तोपंत ठेंगडी, भिकुजी इदाते, रमेश पतंगे संघ समरसतेच्या मनाचे श्लोक लिहित असताना बाबासाहेब आणि फुले यांच्या आरत्याही करीत असतात. त्याद्वारे त्यांना फुले-आंबेडकरांचे अपहरण करायचे असते. तिसरीकडे अफवा पसरवून घराघरात त्यांच्याबद्दल विद्वेशही पेरला जात असतो. अंगलट आलेच तर आम्ही तर त्यांची नावे प्रात:स्मरणीय म्हणून घेत असतो, असे सांगून सारवासारवही केली जाते.

३२ वर्षांपुर्वी बाळ गांगलांनी महात्मा फुल्यांवर गरळ ओकली. महाराष्ट्र संतापला. संघाने गांगलांचा आपला संबंध नाही, असे घोषित करून टाकले. माझ्या पहिल्या पुस्तकात मी गांगलांची मुलाखत छापलीय. तुम्ही फुल्यावर एव्हढे का संतापलात असे मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, वयाच्या ५ व्या वर्षापासून मी स्वयंसेवक आहे. फुले हा हिंदूराष्ट्राच्या स्थापनेतला मुख्य अडथळा आहे, त्यांच्यामुळे ब्राह्मणांचे पावित्र्य, महात्म्य, गारूड धोक्यात आले, हे संघाने मला पटवले, तेव्हापासून मी फुल्यांना शत्रू क्रमांक एक मानतो. भिडेगुरूजी म्हणतात फुले देशद्रोही होते. म्हणजे ज्याने ब्राह्मण्यावर टिका केली, तो देशद्रोही. एका वाहिनीवर बोलताना जाहीरपणे ते म्हणाले, ‘बाबासाहेब मनूला मानणारे होते. मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला बाबासाहेब जयपूरला स्वत: हजर होते.’ हा पुतळा जयपूरच्या उच्च न्यायालयात बसला १९८९ ला. डॉ. बाबासाहेब त्यापुर्वी ३३ वर्षे आधीच निधन पावलेले. इतके तर बुद्धीमान हे आंबापुत्र भिडेगुरूजी!

अरुण आनंद म्हणाले, ‘बाबासाहेब संघाचे प्रशंसक होते.’ बाबासाहेब संसदेत बोलताना १४ मे १९५१ रोजी आर.एस.एस. बद्दल बोलताना काय म्हणाले, ते संसदेच्या दप्तरात उपलब्ध आहे. [ पाहा. संसदेतील चर्चेचे खंड, ११ वा, भाग, २, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार, नवी दिल्ली, पृष्ठ ८६८७-९० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड, १५, महाराष्ट्र सरकार, मुंबई, १९९७, पृ. ५६०]
” May I mention the R.S.S. and Akali Dal? Some of them are very Dangerous Associations. “[ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Edited by Vasant Moon, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.560] [Parliament Debates, Vol.11, Part Two, 14 th May 1951,pp.8687-90]
“मी आता आर.एस.एस आणि अकाली दलाचा उल्लेख करतो. ह्या अत्यंत धोकादायक संघटना आहेत.”  हे संसदेतल्या अधिकृत भाषणातले बाबासाहेबांचे उद्गार आहेत. हे आर.एस.एस.चे कौतुक आहे का?

आनंद म्हणाले, ‘बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाची १९५२ च्या निवडणुकीत मध्यप्रदेशात संघाचे पिल्लू असलेल्या जनसंघाबरोबर युती केली होती.’ १९५२ सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेब काय म्हणतात ते बघा-
“As regards other Political Parties, the Scheduled Caste Federation’s attitude can be easily defined. The Scheduled Caste Federation will not have any alliance with any reactionary Party such as the Hindu Mahasabha or the R.S.S.” [ Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.17, Part ONE, Edited by Prof Hari Narke and others, Govt of Maharashtra, Mumbai, 2003, pp.402]

“इतर राजकीय पक्षांच्या संदर्भात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा निर्णय स्पष्टपणे अधोरेखित करता येईल. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन प्रतिक्रियावादी [विघटनवादी] असलेल्या हिंदु महासभा किंवा आर.एस.एस. बरोबर कदापिही युती करणार नाही.” तेंव्हा जनसंघाबरोबर युतीचा प्रश्नच उद्भवत नाही.

आता ही सगळी अस्सल आणि छापील साधने आहेत म्हणून तरी बरे, नाहीतर या लोकांनी काय हैदोस घातला असता माहित नाही.

आनंद यांनी दावा केला, की संघाचे दत्तोपंत ठेंगडी बाबासाहेबांचे लाडके होते. त्यांना बाबासाहेबांनी स्वत:च्या पक्षाचे सचिव नेमले. प्रचारप्रमुख नेमले. प्रवक्ता नेमले. आता आनंद यांनी एव्हढेच सांगायचे बाकी ठेवले की बाबासाहेबांनी ठेंगडींना आपला सर्वोच नेताच [बॉस] मानले.

शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) या पक्षाची घटना छापील आहे. ती आम्ही "डॉबाआंलेभा" मालिकेच्या १७ व्या खंडाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित केलेली आहे. या घटनेनुसार तीच व्यक्ती पक्षाचा सदस्य वा पदधिकारी होऊ शकते, जी अनुसुचित जातीची आहे. ठेंगडी काही अनुसुचित जातीचे नव्हते. शिवाय दुसर्‍या संघटनेचे सभासद असलेल्या व्यक्तीला ‘शेकाफे’चे दरवाजे बंद होते. ठेंगडी या काळात संघाचे, इंटक व रेल्वे व पोस्टल युनियन [कम्युनिस्ट] यांचे पदाधिकारी होते. आता अशा माणसाला नियमाप्रमाणे मुदलात ‘शेकाफे’चा सदस्यच होता येत नव्हते. पदाधिकारी तर फार दूरची बात.

आनंद म्हणतात, ‘बाबासाहेबांनी संघाच्या पुण्यातील शिबिरांना दोनदा भेटी दिल्या, तिकडे बाबासाहेब जेवले, त्यांनी संघाचे कौतुकही केले. इ. इ.’ बाबासाहेबांच्या या भेटीची छायाचित्रे, पत्र्यव्यवहार, त्याच्या बातम्या यांची कात्रणे यातले काहीही संघातर्फे पुरावा म्हणून दिले गेलेले नाही. १९२७ पासून बाबासाहेब जिथे जिथे जात तिथल्या बातम्या त्यांच्या ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये छापल्या जात. संघाच्या शिबिरांना बाबासाहेबांनी जर खर्‍याच भेटी दिल्या असत्या, तर त्याच्या बातम्या निदान ‘बहिष्कृत भारत’ व ‘जनता’मध्ये तरी आल्याच असत्या ना? अशी कोणतीही बातमी आलेली नाही. संघाचे आणि केसरीचे गुळपीठ होते. बाबासाहेब याच काळात लोकमान्य टिळकांच्या मुलाला श्रीधरला भेटत असत. त्यांचा पत्र्यव्यवहार आहे, बातम्या आहेत, मग संघाच्या भेटीच्या बातम्या निदान केसरीत तरी यायला हव्या होत्या. संघाला मानणारी या काळात निदान डझनभरतरी पुणेरी वर्तमानपत्रे होती. त्यातही खबरबात नाही, असे का? संघाने या भेटींचे पुरावे द्यावेत, ते तपासून ठरवू.

आनंद म्हणतात, ‘संघसुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले आणि त्यांना बाबासाहेब म्हणाले संघ वाढवा.’ प्रत्यक्षात काय घडले होते?

मराठ्यांना रोखण्यासाठी मदत मागायला आर. एस. एस. सुप्रिमो गोळवलकरगुरूजी बाबासाहेबांना भेटले होते हे खरे आहे. बाबासाहेब तेंव्हा देशाचे कायदा मंत्री होते. मंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. गुरूजी भेटले. त्यांनी मदत मागितली, सहकार्य मागितले, पण रा.स्व. संघ हा " विषवृक्ष" आहे असे, सांगत बाबासाहेबांनी सहकार्य नाकारले.

मराठा समाजाचा सामना करण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आम्हा ब्राह्मणांना मदत करा, नाहीतर मराठे आपल्या सर्वांनाच संपवतील, आपण सारे मराठेतर एकत्र येऊन मराठ्यांचा बंदोबस्त करू असा प्रस्ताव घेऊन ते बाबासाहेबांना ७ सप्टेंबर १९४९ ला दिल्लीत जाऊन भेटले होते.

बाबासाहेबांनी त्यांना कठोरपणे खडे बोल सुनावले. “पेशवाईत तुम्ही लोकांनी आमच्यावर कितीतरी अत्याचार केले, हे मी कसे विसरू? तुम्ही पुन्हा पेशवाईची स्वप्नं बघता आहात. त्यासाठी तुम्ही रा.स्व.संघाच्या रूपात ब्राह्मण महासंघ सुरू केलेला आहे. तुमच्या संघात सारे ब्राह्मणच तर आहेत. तिथे ना मराठे आहेत, ना महार. तुमचा संघ हा विषवृक्ष आहे. त्याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. तुम्हाला संघटनाच बनवायची असेल तर ती जातीनिर्मुलनासाठी आणि चातुर्वण्यव्यवस्थेचा नाश करण्यासाठी सुरू करा. पेशवाईतील पापांपासून तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जुन्या चुका सुधारा. ब्राह्मण राज्याची स्वप्नं विसरा. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही,” अशा कठोर शब्दात बाबासाहेबांनी गोळवलकरगुरूजींना फटकारले. बाबासाहेबांच्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. चडफडत ते तिथून निघून गेले.

बाबासाहेब – गोळवलकर यांच्या भेटीचा हा तपशीलवार वृत्तांत लिहिणारे सोहनलाल शास्त्री, हे दिल्लीतले मोठे विद्वान होते. ते या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर होते. ते बाबासाहेबांकडे नेहमी जात-येत असत. गोळवलकरांबद्दल सोहनलाल शास्त्रींना माहिती देताना बाबासाहेब म्हणाले, “हे ब्राहमण गृहस्थ, हिंदूंचे पोप आहेत. असे सनातनी विचारांचे धर्मगुरू जिथे आहेत तिथल्या लोकांचे कधीही भले होणार नाही!” { पाहा: बाबासाहेब डा. अम्बेडकर के सम्पर्क में २५ वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली, १९७५, पृ. ५४/५५} या भेटीची जनतामध्ये बातमीही प्रकाशित झाली होती.

चातुर्वर्ण्याची प्रस्थापना आणि संवर्धन करणार्‍या संघटनेच्या कामावर बाबासाहेब कसे खूश होऊ शकतील? दोघांची विचारधारा, कार्यप्रणाली, विषय पत्रिका सगळेच विरोधी असताना बाबासाहेब त्यांचे कौतुक कसे आणि का करतील?

बरं याच काळात संघाचे काय उद्योग चालले होते, तर संघ कार्यकर्ते ३ जानेवारी १९४९ ला राज्यघटना सभेचे कामकाज उधळायला संसदेत घुसले होते.

शिस्तीत घटनासभा बंद पाडून भारताचे संविधान लिहिण्याच्या कामात मोडता घालून, हे लोक संविधानाला पाठींबा देत होते का? यालाच हे संविधानाचा आणि संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब यांचा ते सन्मान करीत होते असे म्हणतात का?

(वाचा-) “संविधान सभेचे उपाध्यक्ष डॉ. एच. सी. मुखर्जी यांनी सदस्यांना सांगितले, की आपले कामकाज उधळण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी काल आर.एस.एस.चे कार्यकर्ते सभागृहाच्या लॉबीत घुसले होते. सिक्युरिटीने त्यांचा वेळीच बंदोबस्त केल्याने अनावस्था प्रसंग टळला. तरी यापुढे सदस्यांनी फक्त ओळखीच्याच कार्यकर्त्यांना प्रवेश पत्रिका द्याव्यात.” (संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, ७वा, पृ. १२३३, दि. ४ जाने. १९४९ CAD7/1233, ४ जाने.१९४९)

सुर्यवंशी नावाच्या एका संघ स्वयंसेवकाने लिहिले आहे, की बाबासाहेब घटना सभेत निवडून यावेत यासाठी जनसंघाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि तिथून बाबासाहेबांना निवडून आणले. किती सराईतपणे खोटे बोलतात हे संघीय. मुदलात श्यामाप्रसाद यांनाच काँग्रेसने निवडून आणले होते. त्यांचा अन्य कुणीही सदस्य नव्हता. बाबासाहेब प्रथम निवडून आले, ते बंगालमधून. जोगेंद्रप्रसाद मंडल हे बाबासाहेबांचे तिथले आमदार होते. त्यांनी बाबासाहेबांना घटना परिषदेवर निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. पुढे बाबासाहेबांचा हा मतदार संघ पाकीस्तानात गेल्याने बाबासाहेबांचे सदस्यत्व गेले. पण पुण्याचे बॅ. जयकर हे काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेबांनी उभे राहावे अशी विनंती राजेंद्र प्रसाद व वल्लभभाईंनी त्यांना केली. याकाळातील सगळा पत्र्यव्यवहार उपलब्ध आहे. ही गोष्ट आहे, जुलै १९४७ ची. तेंव्हा जनसंघ नव्हताच, आणि त्यामुळे त्यांचा कोणी सदस्यही नव्हता.

खुद्द माझ्याबद्दलसुद्धा या सूर्यवंशींनी काही भन्नाट शोध लावलेत, म्हणे मी संघाच्या कार्यक्रमांना गेलो आणि तिथे संघाचा गौरव केला. साफ खोटे. मी आजवर संघाच्या एकाही कार्यक्रमाला गेलेलो नाही. गौरवाचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही.

माझे महात्मा फुल्यांवरील [ संघाच्या बाळ गांगलचा प्रतिवाद करणारे ] पहिले पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मला माझ्या पिंपरीच्या घरी नवले नावाचे एक गृहस्थ भेटायला आले. ते म्हणाले, महात्मा फुले शताब्दी निमित्त आम्ही मुंबईत एक वैचारिक चर्चासत्र घेतोय, तुम्ही फुल्यांवर पेपर वाचा. मी गेलो. पेपर वाचला. आयोजक संस्थेचे नावही तोवर मी ऎकलेले नव्हते. त्यांनी त्याची पुस्तिकाही छापली आहे. माझा पेपरही त्यात आहे. पुढे त्यांनी असेच दुसरे चर्चासत्र नाशिकला घेतले. तिथेही मला बोलावले. मी म. फुल्यांवर बोललो. मात्र तेंव्हा मला संशय आला. मी खोदून खोदून माहिती काढल्यावर कळले, की ‘समरसता मंच’, या नावाने वावरणारी ही मंडळी संघाशी संबंधित आहेत. माझ्यापासून खरी माहिती दडवून ठेऊन माझी फसवणूक केल्याबद्दल मी त्यांना फटकारले आणि त्याउप्पर त्यांना माझ्या दारातही उभे केले नाही, या गोष्टी फुले शताब्दी वर्षातल्या म्हणजे ३० वर्षांपुर्वीच्या आहेत.

आता तर हे लोक माझ्याच तोंडात संघाचे मी कौतुक केल्याचे शब्द घुसवू लागलेत! या खोटारडॆपणाचा, बुद्धीभेद अभियानाचा आणि फुले-आंबेडकरांचे अपहरण करण्याच्या प्रवृत्तीचा मी तीव्र निषेध करतो. मी संघाशी संबंधित असतो, तर संघाचे सरकार महाराष्ट्रात असताना राज्य शासनाच्या मागासवर्ग आयोग, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती, भाषा सल्लागार समिती, बालभारती, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महात्मा फुले अध्यासन, या सर्व संस्थामधून देवेंद्र फडणवीस सरकारने मला काढून टाकले असते काय?

प्रा. हरी नरके, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’, या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.

रविवार विशेष  April 26, 2020 12:43 am

https://marathi.thewire.in/rss-fake-story-and-dr-babasaheb-ambedkar

Thursday, September 26, 2019

माझ्या भाषणांची ५० वर्षे- प्रा.हरी नरके




















२ आक्टोबर १९६९ ला मी पहिले जाहीर भाषण केले होते. त्याला या आठवड्यात ५० वर्षे पुर्ण होतील. तेव्हा मी इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत होतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा बोललो होतो. पुणे महानगर पालिकेच्या मुंढव्याच्या माझ्या शाळा क्रमांक ५३ मध्ये हा मोठा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला शाळेतले सगळे शिक्षक, सुमारे आठशे विद्यार्थी आणि शंभरेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

भाषणाच्या शेवटी झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाची झिंग गेल्या ५० वर्षात किंचितही कमी झालेली नाही. भाषणांचे गारूड उतरायलाच तयार नाही. तेव्हापासून माझं प्रत्येक भाषण मी मनापासून एंजॉय करतो.
गेल्या ५० वर्षात मी किमान विसेक हजार भाषणं दिलीत. त्यात वर्गात घेतलेल्या लेक्चर्सचा समावेश केलेला नाही. माझा पाठांतरावर विश्वास नाही. मुद्दे काढणे, ते लक्षात ठेवणं, उत्स्फुर्तपणे बोलणं हीच माझी आवडती पद्धती. एकाच विषयावर एकापेक्षा जास्त भाषणं केली तरी ती दरवेळी वेगवेगळी असतात. भाषणांच्या पाठांतराचे कार्यक्रम सादर करणे, हुकमी कॅसेट बनवणं हा प्रकार मला आवडत नाही.

इयत्ता दहावीपर्यंत शालेय भाषणे, विविध स्पर्धांमधली भाषणे, निवडणुकीतली भाषणे, धार्मिक विषयावरील प्रवचने- भाषणे, सामाजिक चळवळीतील भाषणे यावर भर होता. याकाळात मी रजनीश, [ ओशो ] रावसाहेब कसबे, नरहर कुरूंदकर, पु.ल. देशपांडे, नरेंद्र दाभोळकर आदींची शेकडो भाषणं ऎकली. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, नाथ पै यांच्या भाषणांच्या ध्वनीफिती ऎकण्यातनं माझी वाढ झाली. ज्यांचं अनुकरण फार मोठ्या प्रमाणात केलं जातं, अशा धंदेवाईक वक्त्यांना, वक्तृत्वाच्या व्यावसायिक मठांना मी कधीही प्रमाण मानलं नाही.

प्रामुख्याने दहावीनंतर जाहीर भाषणांची निमंत्रणे वाढत गेली, त्यालाही आता ४० वर्षे झाली.  "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर [१९८९] गेल्या तीस वर्षात तर निमंत्रणांचा भडीमार सुरू झाला. दरवर्षी जेव्हढी निमंत्रणे स्विकारता येतात त्याच्या किमान पाचपट निमंत्रणे नाकारावी लागतात. लोक नाराज होतात. रागावतात. कधीकधी खुन्नसही ठेवतात.

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ३६ जिल्हे भाषणांच्या निमित्ताने फिरता आले. गावोगाव जिव्हाळ्याची- सोयरे म्हणता येतील अशी हजारो घरं जोडता आली. अमाप प्रेम मिळालं. भाषणांच्या निमित्ताने वाचन, अभ्यास, चिंतन, चर्चा करता आल्या, त्यातनं जगण्याला बर्‍यापैकी आकार येत गेला. सुरूवात केली होती तेव्हा सोबतीला फारसं काही नव्हतं. आज मी जे काही आहे ती सारी पुण्याई भाषणांची आहे. देशविदेश, ३६ राज्ये आणि केंद्रशाषित प्रदेश पाहता आले. या पन्नास वर्षात भाषणं ऎकणं, भाषणं करणं हेच माझं पहिलं प्रेम राहिलं.

एक तोटा मात्र झाला. जे व्यक्त करायचं असतं ते बोलून करता येतं. लिहायला उर्जाच शिल्लक राहत नाही. लिहायचा जाम कंटाळा येतो.

भाषणं वाहून जातात, पुस्तकं जास्त टिकतात, असं जाणकार म्हणतात.

गोविंद तळवलकर यांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं. ते म्हणायचे भाषणं बंद कर. त्यांचं मी ऎकलं नाही म्हणून ते संतापलेही. म.टा.मध्ये माझं तोंडभरून कौतुक करणार्‍या त्यांनी भाषणांमुळे माझी सालटंही काढली. आज वाटतं, त्यांचं ऎकायला हवं होतं. किमान भाषणं आणि पुस्तकं यांचा समतोल राखायला हवा होता.

प्रा. हरी नरके, २६ सप्टेंबर २०१९