Showing posts with label डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा. Show all posts
Showing posts with label डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा. Show all posts

Thursday, October 22, 2020

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-



सुप्रसिद्ध लेखक, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आय.ए.एस. अधिकारी (निवृत्त) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेबद्दल लिहितात-

हरी नरके जी, ही मालिका मी पूर्ण एकही भाग न चुकवता पाहिली.. कारण ती जवळपास परिपूर्ण- near perfect होती. बाबासाहेबांचे वैयक्तिक जीवन खूपच भावस्पर्शी पद्धतीने दाखवले, पण मला महत्वाचे वाटले ते या मालिकेने डॉ आंबेडकरांचे वैचारिक व्यक्तीमत्व, सामाजिक, राजकीय व संसदीय कार्य, त्यांचा संघर्ष आणि अखंड अभ्यास हे पैलू फारच सामर्थ्याने दाखवले आहेत. मुख्य म्हणजे या अलौकिक महापुरुषांची मालिका कुठेही प्रचारकी होत नाही,तरिही रंजक राहते .बाबाबासाहेबांचे व रमाई चे काम सागर देशमुख व शिवानी रांगोळे यांनी जणू परकाय प्रवेश करून काम केले व त्यांना पडद्यावर जिवंत केले. त्यांच्यापर्यंत माझे अभिनंदन कळवा. तुम्ही मालिकेचे संशोधक- सल्लागार असल्यामुळे कोणतीही ऐतिहासिक चूक हुडकली तरी सापडणार नाही, हे फार मोठे अवघड काम हरी जी तुम्ही समर्थपणे पार पाडले,त्याबद्दल तुमचे अभिनंदन!

आता मालिका संपली, काय नवीन एवढेच सुंदर पहायचे हा प्रश्न आहे. आणि या प्रशनातच मालिकेचे यश दडलेले आहे!

- Laxmikant Deshmukh लक्ष्मीकांत देशामुख

Wednesday, October 21, 2020

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले

 







स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दशमी क्रियेशनची आपली मालिका फार लवकर संपली, अशी हळहळ अनेकांनी व्यक्त केली. काही कृतक मालिका इतक्या बोअर मारतात की प्रेक्षक आता यांना आवरा, यांच्यापासून आम्हाला वाचवा असा धावा बोलतात. अशा पार्श्वभुमीवर ही मालिका आणखी हवी असे वाटत असतानाच ती संपलीसुद्धा.

हजारो चाहत्यांनी मालिकेबद्दल समाधान व्यक्त केले. एकदोघांनी अ, ब, क यांना तुम्ही मालिकेत का दाखवले नाही? अशा विचारणाही केल्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एव्हरेस्टच्या उंचीचे व्यक्तीमत्व. त्यांच्या अवतीभोवती उत्तम काम करणारे हजारो नेतेलोक होते. त्यातल्या सगळ्यांना मालिकेत आणणे केवळ अशक्य होते. मी पहिल्या एपिसोडपासून ३४३ व्या एपिसोडपर्यंत सहज मोजदाद केली तेव्हा लक्षात आले की ( मालिकेतल्या सभेत/गर्दीत उपस्थित असलेले एक्स्ट्रालोक सोडून ) ज्यांना मालिकेत कोणतेतरी छोटेमोठे व्यक्तीमत्व साकारायचे होते, किंवा संवाद बोलायचे होते, अशी एकुण १२०० पेक्षा अधिक कॅरेक्टर्स आम्ही दाखवली. तरीही काही नेते राहिले हे खरेय. आम्हाला त्यांनाही मालिकेत दाखवायचे होते. पण नाही जमले ही खंत आहेच... 

एका मित्रांने अशा भावना व्यक्त केल्या की "बाबासाहेबांच्या मालिकेला न्याय देण्यासाठी रिचर्ड अ‍ॅटनबरोच हवे होते." रिचर्ड अ‍ॅटनबरो महानच होते! पण त्यांनी " गांधी " चित्रपटात बाबासाहेबांना किती स्थान दिलेले होते याचा एकदा शोध घ्या. आम्हीही घेतो.

असो. व्यक्ती तितक्या प्रकृती.    

आम्ही या मालिकेद्वारे आमचे कर्तव्य केले. तुम्हाला ती आवडली याचा आम्हाला जरूर आनंद आहे. खरंतर आम्हाला अशा आणि एव्हढ्या कौतुकाची खरंच अपेक्षा नव्हती. टिकेला सामोरं जाण्याचीच आम्ही तयारी ठेवलेली होती. पण एकही वादंग न होता ही मालिका सुरळीतपणे पार पडली. आता हे सामाजिक दस्तावेजीकरण/चित्रीकरण पुढची किमान शंभर वर्षे नव्या पिढ्यांना बघायला हॉटस्टारवर उपलब्ध असेल. तुमच्या नानाविध अपेक्षा, तुम्ही केलेली सकारात्मक किंवा नकारात्मक टिका, तुमच्या अगदी प्रत्येक प्रतिक्रियेची आम्ही विधायक नोंद घेतलेली आहे. तुम्ही हजारोंनी मालिकेचे तोंड भरून कौतुक केलेत, एकदोघांनी मालिकेतल्या उणीवा, त्रुटी, दोष दाखवलेत आणि मालिकेची दखल घेतलीत याचाच आम्हाला आनंद आहे. या प्रतिक्रियांचा उपयोग आम्हाला यापुढचे काम करताना नक्कीच होईल. या अनुभवाच्या प्रकाशात नव्या प्रकल्पांमध्ये आपण भेटतच राहणार आहोत. एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो अशी गावाकडे म्हण आहे. एका मालिकेने थांबून आपल्याला कसे चालेल? ही बाबासाहेबांवरची पहिली मालिका आहे, शेवटची नाही.

असाच लोभ कायम असावा.

स्नेहांकित,

हरी नरके

Sunday, October 18, 2020

मालिका संपते आणि इतिहास सुरू होतो....

 Shilpa Kamble- मालिका संपते आणि इतिहास सुरू होतो....

डाँ.भीमराव आंबेडकर --एक गौरवगाथा या मालिकेचा आज शेवटचा एपिसोड पाहिला.डोळ्यात अश्रू तराळले. श्वेत रंगाची उधळण होत धम्मक्रांतीची सुरूवात झाली.तो सोहळा या प्रत्यक्ष अनुभवला.धम्मरसात न्हावून निघाले.

या  प्रकारची मालिका इडियट बाँक्सवर आली ही एका क्रांतीची सुरूवात झालीय.. दशमी प्राँडक्शन व स्टार टीवी यांना आंबेडकरी जनतेचे लाखो करोडो धन्यवाद. आजपर्यंत कोणत्याही चँनलने जो विषय हातळला नव्हता, त्या विषयावर मालिका करण्याचे धाडस स्टार टीवीने दाखवले. दशमीच्या पदाधिकाऱ्यांना सलाम. त्यांचा इतक्या वर्षाचा टीवी इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव पणाला लावून त्यांनी ही सिरीयल बनवली. 

   सुरूवातीपासून या कामाचा भाग होते, अपार कष्ट केले. थकले,थांबले,... परत लिहीत राहिले. अपर्णा पाडगावकर यांनी या लेखनप्रवासात दिलेली साथ लक्षात राहीन. हरि नरके सर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.पण त्यांचा व्यासंग,त्यांची आंबेडकरी विचांरावरची निष्ठा आणि त्यांची कामाबद्दलची लवचिकता या सर्व गोष्टींचा जवळून परिचय झाला. अभिजीत खाडे हा स्टारचा क्रिएटीव ड्रायरेक्टर ,एरवी त्यांच्याशी कधी भेट झाली असती की नाही माहीत नाही.पण या निमित्ताने सख्य जुळले. अभिजीतने या प्रोजेक्टला यशस्वी करण्यासाठी जी जिद्द दाखवली आहे ,त्याला तोड नाही. अक्षय पाटील या गोड हसणाऱ्या मुलाला विसरणे शक्य नाही. त्याने माझ्या लेखनावर सुरूवातीपासून शेवटपर्यंत विश्वास दाखवला.

        या मालिकेतील संवाद लेखक चिन्मय ,हितेश यांनी ऐतिहासिक ,माहीतीपर भाषा योग्य प्रकारे योजली. अमित हा चुणचुणीत मुलगा ,पटकन ऐतिहासिक सामग्री पुरवायचा....अनेक लोकांची मोलाची मदत या मालिकेसाठी झालीय.

  मालिकेमधील सगळे कलाकार कसलेले होते, लेखक लिहतो पण कलाकार त्या निर्जीव मुर्तीत जीव ओततो. रामजी,मीरा, केळुस्कर गुरूजी, भीमराव, रमा,मीरा,शंकर मामा,यशंवत ,नामा,मुकुंदा,बाजी ,शिवतरकर,दामू,देवकर, बाळादादा, लक्ष्मी....किती नावे घ्यावीत सगळ्यांनी भूमिकेला न्याय दिला.

    बाबासाहेबांची भूमिका करणारे सागर देशमुख यांनी तर कमाल केली . तरूण भीमराव ते वयस्क बाबासाहेब या साऱ्या छटा त्यांनी लीलया पेलल्या आहेत. त्यांनी या भूमिकेत अक्षरश जीव ओतला आहे. छोटीशी आठवण सांगते. एका प्रसंगात बाबासाहेब लंडनला आहेत आणि चंद्राकडे पाहतात, असा सीन होता. सागर यांनी थंडी वाजण्याची जबरदस्त अदाकारी करून तो सीन केलाय. त्यांचे बोलणे,देहबोली, मुद्राभिनय...सगळेच बाबासाहेबांशी तंतोतत जुळणारे...तुफान एनर्जीचे. त्यांनी शेवटी शेवटी तर अक्षरशः एकट्याच्या खांद्यावर ही मालिका तोलली होती.त्यांचे शतशः आभार.

    पाच वर्षापूर्वी मी कम्युनिटी मिडीया असा कोर्स केला होता. अँडमिशन घ्यायला पैसे नव्हते. मैत्रीणीकडून उधारी करून ,अनेक अडचणी सोसून हा कोर्स केला होता. मी हा  कोर्स का करतेय ,असे प्रश्न  मला इंटरव्यूह घेतांना विचारले होते. मी उत्तर दिले होते.मला आमचा कंटेट घेवून मिडीयात जायचे आहे.... तेव्हां माझे स्वप्न पुर्ण होईन असे मला वाटले नव्हते.पण ते स्वप्न पुर्ण झाले.

     स्क्रीनवर बुद्ध शरमं गच्छामी ऐकतांना....डोळ्यात पाणी तराळले. माझ्या मुलाने संपूर्ण सिरीयल रात्री जागरणे करून पाहिलय.ही जगातील अशी एकमेव सिरीयल असेन की जी पाहण्यासाठी आई वडिल त्यांच्या लहानग्यांना झोपेतून उठवत असतील...

  ही मालिका...   भारतीय समाजाला जागे करण्यासाठी निर्माण झाली होती. मालिका संपली पण आपण आता जागे व्हायचे आहे. डाँ.भीमराव आंबेडकर यांनी दाखविलेल्या रस्त्यावरून  भारताला चालायचे आहे. इतिहासातून प्रेरणा घेवून इतिहास रचायचा आहे.

जयभीम..                                

                                                             शिल्पा कांबळे

महामानवाच्या कार्याला दशमी परिवाराकडून मानवंदना

 Ninad Vaidya - सर्व प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार,

महामानवाची गौरवगाथा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या मालिकेने आज सर्वांचा निरोप घेतला. १८ मे २०१९ रोजी स्टार प्रवाह वर सुरू झालेला आपला प्रवास १७ ऑक्टोबर २०२० रोजी येऊन थांबला आहे.

मालिका सुरू होण्याआधी मनात अनेक प्रकारच्या भावना होत्या. आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या महासूर्याची गोष्ट आपल्याला सांगायची आहे. त्यासाठी डोंगराएवढं धाडस असणे आवश्यक होते. ते धाडस एकट्याने पूर्ण कदापी शक्य नव्हते. त्यातही बाबासाहेबांचा जीवनप्रवास, त्यांचे क्रांतिकारक कार्य इतके रॅडिकल होते की आताच्या काळात कोणता टीव्ही समुह ते दाखवण्याचे धाडस करेल याबद्दल मनात प्रचंड काळजी होती. पण अशा वेळेतही कोणत्याही राजकीय, सामाजिक दबावाला बळी न पडता स्टार प्रवाह या धाडसासाठी तयार झाले. धार्मिक सुधारणांच्या कार्याला दाखवताना आपण कोणत्याही प्रकारे हात आखडता घ्यायचा नाही या म्यूच्युअल अंडरस्टँडिंगवर स्टार प्रवाह आणि दशमी क्रिएशन अगदी ठाम होते. 

मी लहानाचा मोठा झालो तो शिवाजी पार्क, दादर परिसरात. घरात लहानपणापासून आंबेडकरी चळवळीतील कार्य़कर्त्यांचा राबता असायचा. ६ डिसेंबर रोजी लागणाऱ्या पुस्तकांच्या स्टॉल साठी लागणारे साहित्य, पुस्तके आणि इतर गोष्टींचा रतीब २६ नोव्हेंबर पासूनच घरात असायचा. सर्वच मातब्बर कार्यकर्ते मंडळी यांचा सहवास लहानपणापासूनचा. त्यामुळे बाबासाहेबांचं व्यक्तीमत्त्वाचं कुतूहूल हे कायम मनात घर करून होतं. 

आमच्या कुटूंबाची वेल ही थेट सुरू होते कोकणातून. सुरबानाना टिपणीसांपासून. एक प्रकारे बाबासाहेबांशी असलेलं आमचं नातं आमच्या पणजोबांच्या पीढीपासून. त्यामुळे ही गोष्ट सांगण्याची जेवढी एक्साईटमेंट होती त्याहून मोठी जबाबदारी आपण खांद्यावर घेतोय याचेही भान होतेच.

स्टार प्रवाहच्या एका मिटिंग दरम्यान सतीश राजवाडे यांनी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर काही शक्य आहे का अशी विचारणा केली. आणि, नितीन वैद्य सरांनी पुढच्या क्षणाला आमचा याच विषयावर अभ्यास सुरू आहे, जर तुम्ही तयार असाल तर आम्ही नक्कीच उत्तम मालिका बनवू शकतो असं ठामपणे सांगितलं. 

प्रचंड मेहनतीनंतर मालिकेसाठी लागणारी टीम बनवली गेली. बेस्ट ऑफ द बेस्ट लोकं निवडण्यात आली. लेखक संशोधकांनी अपार मेहनतीने मालिकेचा क्राफ्ट तयार केला. प्रत्येक घटना, सणावळ्या यांच्या सत्यतेबद्दल प्रा. हरी नरके सरांनी अतिशय मेहनतीने काम केले. दशमीच्या क्रिएटिव प्रोड्युसर आणि मालिकेच्या स्टोरी रायटर अपर्णा पाडगावर यांच्यावर मात्र आता मोठी जबाबदारी येऊन पडली होती. अख्खं राजकीय, सामाजिक आयुष्य टिव्ही ऑडियंससाठी दाखवताना त्याचं फिक्शनमध्ये रुपांतरण कसं करावं यासाठी जीवतोड मेहनत घेतली. त्यात स्क्रीनप्लेसाठी शिल्पा कांबळे यांची साथ लाभली. 

संवादलेखनाची बाजू आधी चिन्मय केळकर नंतर हितेश पोरजे

यांनी उत्तम सांभाळली. प्रत्येक एक्झुक्यूशनसाठी क्रिएटिव टिम मध्ये अक्षय पाटील, किरण आणि प्रोडक्शन टीम मधून दादा गोडकर यांनी जीव ओतून ही मालिका उभी केली. 

नितीन वैद्य यांनी मालिकेचा प्रत्येक भाग आधी स्वतः पाहून छोटे छोटे बारकावे आणि कंटेट मध्ये सुचना करत फायनल केल्या. त्यातूनच साकारली महामानवाची गौरवगाथा. 

सुरूवातीला फक्त २०० च भाग करायचे असा मानस घेऊन उतरलेलो आम्ही आज साडे तीनशे भागांवर येऊन पोहोचलो. हे करताना प्रोडक्शन कॉस्टबद्दल कसलीच तमा बाळगायची नाही यावर आम्ही सर्वच सुरूवातीपासून ठाम होतो. मग बाबासाहेबांचा लंडन, अमेरिकेतील प्रवास असो किंवा त्यांची आंदोलने असोत. महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन, नाशिकच्या काळाराम मंदिराचे आंदोलन, मनूस्मृती दहन आंदोलन हे छोट्या पडद्यावर शेकडो कलाकारांसोबत दाखवणे प्रचंड खार्चिक काम. जितके कलाकार शक्य झाले त्या सर्वांसोबत चित्रित करून प्रत्येक ऐतिहासिक घटना लार्जर दॅन लाईफ करण्याचे प्रयत्न मनापासून केले. 

मग आला राजगृहचा टप्पा. मला खुप कौतुक वाटतं. लोकं राहण्यासाठी घर बांधतात. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. मग ते असं वर वर दाखवणं योग्य ठरलं नसतं. म्हणून राजगृहचा आलीशान सेट उभा केला गेला. बाबासाहेबांसारखंच राजगृह देखील देखणं आणि आलिशान दिसलंच पाहीजे हा आमचा हट्ट होताच शिवाय आमची कमिटमेंट देखील. आपणा सर्वांना तो भाग खुप आवडला...

आणि, मालिकेच्या शीर्षकगीताला विसरून कसं चालेल बरं. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. आज कुठेही शाळा, कॉलेजात, गॅदरिंगला हे गाणं वाजलं नाही, सादरीकरण झालं नाही असा प्रसंगच विरळा. ठिकठिकाणाहून निरोप येत होते. मुलं मालिका पाहतायेत. आम्हाला भिवा बनायचं म्हणतायेत. भिवा सारखाच अभ्यास करायचा आहे असा निश्चय करतायेत. काही पुस्तकांच्या दुकानातून तर नेपोलियनच्या पुस्तकाच्या प्रती अचानक संपून गेल्याचे निरोप आले. खैरमोडे लिखित ग्रंथांची आवृत्तीही संपली. त्यासाठी त्यांनी मालिकेला धन्यवाद दिले. खुप आनंदाचा क्षण होता.

चांगदेव खैरमोडे यांचे पुत्र अरविंद खैरमोडे यांनी मालिकेचे एकेक पात्र उभे करताना आम्हाला जे मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळेच कास्टिंग परफेक्ट होऊ शकलं. कास्टिंग बद्दल बोलायला आपण नवीन पोस्ट घेऊयात. कारण तो एक स्वतंत्र विषय आहे. 

आज हे सर्व लिहीताना मन भरून येतंय. बाबासाहेबांनंतर सावित्रीजोती मालिकेचा प्रवासही असाच घडत आला आहे. त्यावरही लिहीनच. पण गौरवगाथा मालिकेला ज्या हजारो लोकांचे हात, बुद्धी आणि श्रम लागले आहेत त्यांचे मोल करणं खुप कठिण आहे. 

आणि तुम्ही प्रेक्षकांनी जी साथ दिलीत, जे प्रेम दिलंत त्याचे मोल कशातही करता येणारे नाही. मी तुम्हा सर्वांचा कोटी कोटी ऋणी आहे. महामानवाची गौरवगाथा आमच्या तुमच्या हातून घडली हीच त्या महामानवाच्या कार्याला दशमी परिवाराकडून एक छोटीशी मानवंदना. Special Thanks to Vaibhav Chhaya Sameer Shinde

आपलाच

Ninad Vaidya


आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला न्याय देणारी महामालिका


Arun B.khore - महामानवाची गौरव गाथा : आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला न्याय देणारी महामालिका-

विसाव्या शतकातील मानवी हक्कांचे अग्रणी नेते आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील 'महामानवाची गौरव गाथा ',ही स्टार प्रवाह वाहिनीवरील टीव्ही मालिका शनिवार १७ ऑक्टो. २०२०रोजी  ३४३व्या भागाबरोबर संपणार आहे. मे २०१९ मध्ये ही मालिका सुरू झाली. यावर्षी लॉकडाऊनचा काही काळ वगळता ती नियमितपणे सुरू होती.

बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणातील आणि विद्यार्थी दशेतील त्यांना बसलेल्या अस्पृश्यतेच्या जातीय चटक्यांची तपशीलवार कहाणी या मालिकेतून महाराष्ट्राला आणि मराठी भाषिक असलेल्या जगातील सर्वच लोकांना ज्ञात झाली असेल यात शंका नाही.

आंबेडकरांची शिक्षणातील ओढ,  ज्ञानार्जनाचे त्यांचे विलक्षण भान आणि त्यानंतर या देशातील अस्पृश्य समाजाला सामाजिक न्याय देण्याची  त्यांची राजकीय भूमिका या सगळ्यांचा एक अतिशय सुंदर असा पट या मालिकेच्या निमित्ताने आपल्या समोर आला.

ही मालिका निर्माण करणारे दशमी क्रिएशनचे सर्व निर्माते-दिग्दर्शक, ही मालिका लिहिणारा लेखक वर्ग, यातील सर्व कलावंत या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आपण केले पाहिजे.

टीव्ही वाहिन्यांच्या अलीकडच्या काळात एखाद्या महापुरुषाची इतकी तपशीलवार चित्रण करणारी मालिका ह्या निमित्ताने पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे, यासाठी देखील निर्माता-दिग्दर्शक लेखकांचे मी अभिनंदन करेन.

आपल्याकडे प्राचीन  इतिहासातील आणि मध्ययुगीन इतिहासातील अनेक महान व्यक्तींवर मालिका निर्माण झाल्या  आहेत. काही महिन्यांपूर्वी संपलेली  संभाजी महाराजांवरील मालिका ही  यातील एक अशीच विशेष महत्त्वाची होती, असे मला वाटते. त्यापूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांवर देखील अशीच एक  महान मालिका निर्माण केली होती.

या दरम्यानच्या काळात संत तुकाराम चरित्रावरही एक मालिका आपण पाहिली आहे. अर्वाचीन काळातील महान व्यक्तिमत्वावर चित्रपट किंवा अशा दीर्घ टीव्ही मालिका निर्माण करणे तसे सोपे नाही. तरीही आपल्याकडे काही चित्रपट निर्माण झाले आहेत.

महात्मा गांधी यांच्यावर निर्माण केलेला रिचर्ड अटनबरो यांचा 'गांधी',हा  साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

यानंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधीही असा एखादा पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण झाला पाहिजे, अशी मागणी केली  गेली. यातूनच डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी आणि इंग्रजीमध्ये असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट निर्माण झाला. यात बाबासाहेबांची भूमिका करणाऱ्या मामुटी या दाक्षिणात्य अभिनेत्याचे विशेष कौतुक झाले आणि ते यथायोग्य होते.

बाबासाहेबांच्या भूमिकेचे आव्हान स्वीकारणे आणि त्या भूमिकेत शिरून ही व्यक्तिरेखा साकारणे हे खरोखर अवघड काम आहे. मामुटी या अभिनेत्याने तो ठसा निश्चित उमटवला.

काही वर्षांपूर्वी राज्यसभा टीव्हीने  विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याकडून 'संविधान',ही मालिका तयार करून घेतली होती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची एकूण प्रक्रिया याचा लेखाजोखा मांडणारी ही एकूण दहा भागातील मालिका राज्यसभा टीव्हीवर  प्रसारित झाली  होती. या मालिकेत बेनेगल यांचे दिग्दर्शकीय कौशल्य अतिशय वेगळेपणाने आपल्यासमोर येते. ही मालिका हिंदी आणि इंग्रजीमध्ये होती. आंबेडकरांची भूमिका सचिन खेडेकर यांनी केली होती. माझ्या दृष्टीने एखाद्या सक्षम अभिनेत्याने बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला इतका सुंदर न्याय त्यापूर्वी कधी दिला, असे म्हणता येत नाही. या मालिकेतील सगळीच व्यक्तिमत्वे ही  भारताचा इतिहास घडवणारी होती. त्यात राजेंद्रप्रसाद होते, नेहरू होते, पटेल होते आणि  गांधीजी तर होतेच होते! शिवाय के एम मुनशी होते,राजकुमारी अमृत कौर होत्या, दुर्गाबाई देशमुख होत्या. अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाने  ही संविधान सभा भरलेली होती. या संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो ठसा ही मालिका पाहताना आपल्या मनावर उमटतो, तो केवळ अपूर्व आणि असाधारण असाच होता! सचिन खेडेकरने अप्रतिम अशी भूमिका साकार करून आंबेडकरांच्या बौद्धिक कौशल्याचे सगळे तेज या व्यक्तिरेखेत ओतले होते.

या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचे  चरित्रकार असलेले चांगदेव भवानराव खैरमोडे यांच्या बारा खंडीय अशा आंबेडकर चरित्राच्या आधारे साकार होणारी ही मालिका पाहण्याची उत्सुकता होती. 

फुले-आंबेडकर चरित्राचे संशोधक अभ्यासक हरी नरके यांच्या संशोधनाच्या आधारे या मालिकेला आणखी एक परिमाण लाभले होते. आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणांच्या विविध खंडातील अनेक संदर्भ त्यांच्यामुळे या मालिकेच्या तपशिलात जोडता आले.

अपर्णा पाडगावकर, शिल्पा कांबळे यांचे लेखन, आनंद शिंदे यांचा बाबासाहेबांचा गौरव करणारा पहाडी स्वर, अतिशय सुंदर अशी नेपथ्य रचना, वेशभूषा आणि या सर्वांना उत्कृष्ट न्याय देणाऱ्या व्यक्तिरेखा साकारणारे सर्व कलावंत यामुळे  अतिशय सुंदर अशी ही मालिका निर्माण निर्माण होऊ शकली.

चांगदेव खैरमोडे यांनी बाबासाहेबांच्या चरित्राचे काही खंड बाबासाहेब आहे तसाच गेले होते हयात असतानाच केले होते लिहिले होते त्यासंबंधी ते बाबासाहेबांची बोलले होते या बारा खंडातून बाबासाहेबांच्या स्वभावांची वेगळे वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात त्याचे अनेक पैलू या मालिकेतील त्यामुळे आपल्याला दिसू शकतात खैरमोडे यांनी लिहून ठेवले आहे थंड लिहून ठेवले होते ते पण त्यांच्या हयातीत आरंभीचे दोन खंड प्रकाशित झाले त्यानंतरच्या काळात त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी उर्वरित खंड प्रकाशित केले बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी त्यांच्या ज्ञानू साधनेचा बैल समजण्यासाठी पहिले समजण्यासाठी खैरमोडे यांचे हे चरित्र खंड वाचायलाच पाहिजेत असे आहेत आंबेडकर महामालिका निर्माण करताना निर्माता-दिग्दर्शकांनी या खंडांचा आधार घेऊन, आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला अतिशय सुयोग्य असा न्याय दिला आहे असे मी म्हणेन.

या मालिकेच्या निमित्ताने काही ठळक गोष्टी सांगायला पाहिजेत. एक म्हणजे, बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचे बाबासाहेबांच्या जडण-घडण यातील योगदान. त्याबरोबरच रामजीच्या भगिनी मीराताई यांनी छोट्या भिवाला वाढवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याच्या शिक्षणासाठी असलेली त्यांची ओढ या गोष्टी हे पैलू प्रकर्षाने अधोरेखित झाले आहेत. रामजी सुभेदाराची भूमिका करणारे मिलिंद अधिकारी आणि मीरा आत्याची भूमिका करणाऱ्या पूजा नायक या दोन्ही कलावंतांनी अनेक प्रसंगात आपले डोळे ओले  केले आहेत. अतिशय समर्थपणे या भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या अंतकरणातही घर केले.

बाबासाहेबांचे लग्न रमाबाईंशी झाले. या रमाबाईंची भूमिका शिवानी रांगोळ  या अभिनेत्रीने अतिशय सक्षमपणे साकार  केली. बाबासाहेबांच्या ज्ञानसाधनेच्या काळात, ते अमेरिकेला शिक्षणासाठी तीन वर्षे वास्तव्याला असताना रमाबाईंनी जे सोसले त्याची  किंचितही तमा न बाळगता आपल्या बाबासाहेबांसाठी त्या काम  करत राहिल्या, त्याचे मोल हे खूप मोठे आहे आणि आणि शब्दांच्या पलीकडचे! रमाबाईंच्या जीवनातील ताणतणाव आणि कुचंबणा याचे याचे अतिशय संयमित आणि बोलके असे भावदर्शन शिवानीने ही व्यक्तिरेखा साकारताना घडवले, त्याबाबतीत तिचे विशेष कौतुक केले पाहिजे.

या मालिकेला " माझा भीमराया", हे शीर्षक गीत देणारे आनंद शिंदे,उत्कर्ष शिंदे या दोन्ही प्रतिभावान बंधूंचे मुद्दाम अभिनंदन करायला हवे.आनंद  शिंद्यांचा पहाडी सुर बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाची उंची आपल्यासमोर जणू उभी करतो. या मालिकेतील संवाद लेखक हे अनेक जरी असले तरी एकूण लेखन आणि संवाद यांचे धागेदोरे जोडलेले राहतील, याची दक्षता घेतली गेली आहे. 

बाबासाहेबांचे जीवन हे  कोलंबिया विद्यापीठातून भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वरूपाचे झालेले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणातील विविध संदर्भ, विविध समित्यासमोर त्यांनी मांडलेले मुद्दे, गांधीजी आणि नेहरू यांच्याशी त्यांची होणारी चर्चा आणि वादविवाद या सर्व गोष्टी कंटाळवाण्या न होता त्याला संवादी सूर असला पाहिजे, ही  काळजी या मालिकेच्या लेखकांनी खूप चांगली घेतली आहे. भारताच्या विसाव्या शतकातील सामाजिक क्रांती घडवणारा एक महापुरुष म्हणजे डॉ.आंबेडकर आणि त्यामुळे या मालिकेलाही एका  सामाजिक संदर्भाचे मोल आपोआप प्राप्त झाले आहे. त्याचे खरे बळ या संवादलेखन आणि मालिकेच्या एकूण सादरीकरणातही आपल्याला जाणवते.

बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिरेखा साकारणारे तरुण अभिनेते सागर देशमुख यांनी मात्र या मालिकेतील भावपूर्ण अभिनयाचा उत्तुंग बिंदू गाठून साऱ्या प्रेक्षकांच्या मनात बाबासाहेबांची एक प्रतिमा निर्माण केली आहे. सर्वांना ठाऊकच आहे की, या सागर देशमुखने दोन वर्षापूर्वी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा भाई या  चरित्रपटात साकार केली होती. तोच का हा सागर देशमुख; इतके भूमिकेचे परकाया प्रवेशाचे रूप या मालिकेत सागरने  साकारलेल्या आंबेडकर यांच्या भूमिकेत दिसते. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात अखंड अभ्यास करणारे बाबासाहेब, त्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर संस्थानात अपमान सोसून आपले जीवन जगणारे आंबेडकर आणि नंतर शोषित वंचितांच्या लढाईत मूकनायक ,माणगाव परिषद या माध्यमातून आपले जीवितकार्य शेवटपर्यंत पुढे नेणारे बाबासाहेब असेच सगळे टप्पे आपल्या भूमिकेतून आणि विशेषत: मुद्रभिनयाच्या समर्थ आविष्कारातून सागर देशमुख यांनी सादर केले. खरोखर काळजाला पीळ पडावा असेच त्यांचे या मालिकेतील अखेरच्या काही भागातील व्यक्तित्वदर्शन घडत होते.

अलीकडच्या काही वर्षात आपल्या अंत:करणात ठसा उमटेल अशी बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमिका सागर देशमुखने सादर करून मोठे योगदान दिले आहे. ही मालिका संपत असताना आपल्या अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या या  मालिकेतील विविध अभिनेत्यांच्या, विविध प्रसंगातील भूमिका आपल्याला आंबेडकरांच्या प्रेरणादायी गौरवगाथेची नेहमीच आठवण करून देत राहतील. 

या मालिकेची निर्मिती करणे हे खरोखर अवघड आणि आव्हानात्मक असेच काम होते. दशमी क्रिएशन्सचे  नितीन वैद्य आणि त्यांचे सहकारी, विविध भागांचे दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि अर्थातच कलावंत या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सागर देशमुख याला आंबेडकरांच्या भूमिकेसाठी नजीकच्या काळात विविध पुरस्कारांनी गौरवले गेले तर आश्चर्य वाटणार नाही. आंबेडकरांचे या मालिकेतील संदर्भ आता डिजिटल स्वरूपात आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी कायम राहतील, हा याचा फार मोठा सामाजिक असा लाभ आहे हेही यानिमित्ताने नमूद करू इच्छितो.

अरुण खोरे (दलित चळवळींचे अभ्यासक आणि लेखक),पुणे. संपादक : लोकशाहीसाठी समंजस संवाद,पुणे.

(शनिवार, दि.१७ ऑक्टोबर २०२०)

मित्रांनो, डॉ. आंबेडकर यांच्यावरील महामालिका काल संपली,३४३ व्या भागाबरोबरच.या निमित्ताने एक लेख लिहिला होता, तो अक्षरनामा या पोर्टलवर  प्रसारित झाला. तो येथे पोस्ट करत आहे.

(रविवार, दि.१८ ऑक्टोबर २०२०)


Saturday, October 17, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचा आज शेवटचा भाग - प्रा. हरी नरके

स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री १०.३० वाजता दाखवण्यात येणारी ही मालिका आज संपणार आहे. लॉकडाऊनचे काही महिने वगळता ही मालिका बुद्धजयंती २०१९ (१७ मे २०१९ ते १७ ऑक्टोबर २०२०) ते आजपर्यंत सादर करण्यात आली. इ.स. १८९१ ते १९५६ चा इतिहासकाळ आणि त्याचा पडदा व्यापून असलेले महानायक बाबासाहेब यांचे जीवनकार्य मराठी मालिकेच्या माध्यमातून साकार करणे हे महाकाय आव्हान होते. ते या मालिकेच्या टिमला कितपत पेलवले? या टिमचा एक भाग असल्याने याबाबत मी लिहिण्याऎवजी तुम्ही प्रेक्षकांनीच सांगायला हवे.

स्टार प्रवाह वाहिनीचे सर्व अधिकारी, दशमी क्रिएशन या निर्मितीसंस्थेचे संचालक व कर्मचारी, मालिकेत विविध भुमिका साकार करणारे कलावंत, सर्व तंत्रज्ञ, पडद्यामागचे सर्व श्रमिक या सर्वांचे मी मन:पुर्वक आभार मानतो.

ही मालिका सुरू झाली तेव्हा जी वाहिनी टि.आर.पी मध्ये अग्रभागी नव्हती ती आज रोजी मनोरंजन वाहिन्यांमध्ये मराठीत नंबर एकवर आलेली आहे याचा आनंद वाटतो. स्टार प्रवाह वाहिनीला एक नवा प्रेक्षकवर्ग या मालिकेने मिळवून दिला याचेही मला समाधान वाटते. टि.आर.पी मध्ये मालिकेची लोकप्रियता सलग काही महिने चढती होती. काही क्षण तर असेही होते की चारपाच कोटी लोक ही मालिका बघत होते. लॉकडाऊननंतर अनेक कारणांनी सर्वच मालिकांचे प्रेक्षक दुसरीकडे वळले. त्यात या मालिकेची रात्री ९ ची वेळही बदलण्यात आली. आज मालिका संपताना टि.आर.पी.मध्ये जिथून मालिकेने सुरूवात केली होती त्या टी.आर.पी.वर ती पुन्हा आलीय. 

आज मराठीत सर्व मनोरंजन वाहिन्यांवर प्रचंड स्पर्धा आहे. सगळ्या मिळून दररोज किमान ४० ते ५० मालिका दाखवल्या जातात. याचवेळी रा. १०.३० ते ११ वाजताही किमान पाच मराठी मालिका चालू असतात. त्यात आवर्जून हीच मालिका बघणारेही काही कोटी प्रेक्षक असणं ही कामगिरीही मला मोलाची वाटते. आमच्या सगळ्या टिमची अपार मेहनत आणि प्रामाणिकपणा याला तुम्ही किती मार्क द्याल ते जाणून घ्यायला मला आवडेल. 

मालिकेतल्या उणीवा, त्रुटी, असलेच तर काही दोष वेळोवेळी निदर्शनाला आणून देणारांचेही मी आभार मानतो.

मालिकेकडून आपल्या अनेक अपेक्षा असू शकतात पण तुमची अपेक्षापुर्ती न करणे यालाच मालिकेतले ठळक दोष मानण्याची पद्धत योग्य नव्हे. प्रगल्भ आणि सुजाण प्रेक्षक माझ्याशी सहमत होतील अशी अपेक्षा आहे. शेवटी ही एक एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, तिचे एक अर्थकारण असते. निखळ समाजप्रबोधन, शिक्षण, समाजकार्य या वेगळ्या गोष्टी आहेत. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची सारी गणितं जुळवून आपल्यापरीने मनोरंजनाच्या माध्यमातून जमेल तेव्हढे समाजप्रबोधन, शिक्षण, समाजकार्य करण्याचा आमचा हा प्रयत्न कितपत सफल झाला की फसला यावर तुम्ही द्याल तो निकाल आम्हाला मान्य असेल. शेवटी कोणत्याही उद्योगात प्रेक्षक ( ग्राहक) हाच पहिला आणि शेवटचा सार्वभौम आधार असतो.

-प्रा. हरी नरके 

१७/१०/२०२०



Tuesday, September 29, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : गौरवगाथा मालिका निरोपाच्या वळणावर - प्रा. हरी नरके


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, साहित्य आणि जीवन म्हणजे धगधगता अंगार. ते एकमेव असे महापुरूष आहेत की ज्यांच्या वाट्याला कोट्यावधी सामान्य लोकांचे तुफान प्रेम आलेले आहे, पण त्याचवेळेला त्यांच्याबद्दलची अढी मनात असलेलाही फार मोठा जनसमुदाय अस्तित्वात आहे. मालिकेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणार्‍या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : गौरवगाथा महामानवाची" या लोकप्रिय मालिकेचे (बायोपिकचे) बघताबघता ३२५ एपिसोड पुर्ण झाले. विविध सामाजिक स्तरातील  (लिंगभाव, वर्ग व जातीय भेदभाव विसरून) प्रेक्षकांचे अमाप प्रेम या मालिकेला लाभले याचा मालिकेचा प्रमुख संशोधन सल्लागार म्हणून मला आनंद आणि अभिमान वाटतो. यापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळालेल्या काही मराठी मालिका असतील. याच्यापेक्षाही जास्त समाजमान्यता  मिळालेल्या काही मोजक्या बायोपिकही असू शकतील. 


टिपीकल मध्यमवर्गीय सासूसुनेचा विषय नाही, कटकारस्थाने, निर्बुद्ध करमणूक नाही, टिव्हीच्या मुख्य प्रवाहाला सुखावणारी, तिचा दळभद्री अनुनय करणारी मांडणी नाही तरिही लोकप्रियता, समाज प्रबोधन, विद्वतमान्यता आणि वादंगरहितता यात अव्वल असलेली आजवरची एकमेव मराठी मालिका असावी गौरवगाथा.


दशमी क्रिएशनचे मित्रवर्य नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांनी या विषयावर मालिका करण्याचे ठरवले तेव्हा अनेक जाणत्यांनी अशा अस्मितापुर्ण, ज्वलंत किंबहुना सदास्फोटक विषयावर कशाला हात पोळून घेताय असा सज्जड इशारा दिलेला होता. कितीही अडचणी आल्या तरी मालिका पुर्ण करायचीच असा आमचा गौरवगाथा टिमचा निर्धार होता. तो आज सफल होतोय याचे नक्कीच समाधान आहे. बाबासाहेब हा महाकाव्याचा विषय आहे. यावर चारपाच वर्षे चालेल अशीही मालिका करणे शक्य आहे. नव्हे सोयीचेही आहे. मात्र तरिही अतिशय गोळीबंद अशी फक्त २०० एपिसोडचीच मालिका करायची असे ठरवून आम्ही कामाला सुरूवात केली. चां.भ.खैरमोडे यांनी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या  चरित्राच्या १२ खंडांवर प्रामुख्याने ही मालिका आधारित असली तरी  बाबासाहेबांच्या साहित्य व भाषणांचे २२ खंड आणि बाबासाहेबांवर लिहिली गेलेली किमान १५०० पुस्तके आम्ही या मालिकेसाठी धुंडाळली. या रिसर्चचा सुयोग्य वापर केला. या सार्‍या साहित्यावर आधारलेला हा मालिकामय महाप्रकल्प आज शेवटाच्या जवळ पोचला आहे. आजवर अनेक स्पीडब्रेकर आले.  कारणपरत्वे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, संवादलेखक आणि इतर अनेकांमध्ये बदल झाले.  मात्र दशमीची वरील त्रिमुर्ती, अक्षय पाटील, सोहम देवधर, पटकथाकार शिल्पा कांबळे, प्रसिद्धीप्रमुख वैभव छाया, स्टार प्रवाह वाहिनीचे सतिश राजवाडे, अभिजीत खाडे, नरेंद्र मुधोळकर आणि मालिकेचा प्रमुख संशोधन सल्लागार म्हणून मी, ३२५ एपिसोड सोबत होतो. आहोत. मालिका संपेपर्यंत राहू.

मालिका म्हटले की वेळेची लगीनघाई असते. रविवार वगळता सोमवार ते शनिवार दररोज एपिसोड सादर व्हायलाच हवा असा दट्ट्या असल्याने इच्छा असूनही परिपुर्ती साधता येत नाही. सादरीकरणात काही उणीवा, त्रुटी, काही दोष राहून जातात. कोणतीही मालिका ही पब्लिक प्रॉपर्टी असते. त्यामुळे तिच्यावर बोलण्याचा, लिहीण्याचा, टिका करण्याचा प्रत्येक प्रेक्षकाला/नागरिकाला अधिकार असतो. तो अधिकार काहींनी अवश्य बजावला, त्यासाठी त्यांचे मन:पुर्वक आभार मानतो. त्यातनं आम्हाला अधिकाधिक सुधारणा करता आल्या.

कोणतेही मोठे वादंग (कॉन्ट्रोव्हर्सी) न होता ही मालिका शेवटाजवळ पोचली, या मालिकेने इतर भाषांमधील बाबासाहेबांवरील मालिकांचे दरवाजे उघडले, एका मौलिक तथापि उपेक्षित/वर्जित विषयाकडे जाणत्यांचे लक्ष वेधले, एक दर्जेदार मालिका यावर होऊ शकते याचे तगडे प्रात्यक्षिक सादर केले याचे सार्थक शब्दात न मावणारे आहे.

१७ मे २०१९ ला बुद्धजयंतीच्या दिवशी ही मालिका सुरू झाली. लॉकडाऊनचा चार महिन्याचा काळ वगळता २०२०च्या ऑक्टोबर मध्यापर्यंत (धम्मचक्र प्रवर्तनदिनापर्यंत) ही मालिका चालेल असा अंदाज आहे. 


बाबासाहेबांच्या साहित्य आणि लेखणाचे खंड प्रकाशित करायला वसंत मून यांच्या निधनानंतर कोणीही पुढे यायला तयार नसताना, वीस वर्षांपुर्वी त्याकामासाठी मी माझी टेल्कोतली भरपूर पगाराची आणि प्रतिष्ठेची नोकरी सोडून मंत्रालयात गेलो. सरकार मला त्या कामाचे दरमहा रुपये दोन हजार एव्हढे मानधन देत असे. बाबासाहेबांच्या लेखण आणि भाषणांचे खंड १७ ते २२ चे अकरा ग्रंथ तसेच आवृत्ती संपलेले आणखी बारा ग्रंथ मी प्रकाशित करू शकलो, गौरवगाथा या महामालिकेच्या माध्यमातून मराठी भाषक महिला, ओबीसी, अल्पसंख्यक, शेतकरी, कामगार, बहुजन, श्रमिक आणि बुद्धीजिवी अभिजन या संमिश्र वर्गापर्यंत बाबासाहेबांचे जीवनकार्य आमच्या तोकड्या कुवतीनुसार आम्ही पोचवू शकलो याचे अतिव समाधान वाटते.

- प्रा. हरी नरके, 

२९/९/२०२०

Monday, March 16, 2020

मालिका पुढे चालू ठेवायची असेल तर -- प्रा.हरी नरके





डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही स्टार प्रवाहवरील मालिका बंद करू नका, तिचे भाग वाढवा, आम्हाला मालिका बघायची आहे, अशी एकमुखी मागणी माझ्या परवाच्या पोस्टवर करण्यात आली. धन्यवाद.ही मालिका वाढवावी अशी तुमची खरीच इच्छा असेल तर तुम्हाला विश्वासात घेऊन काही गोपनीय गोष्टी उघड करतो.
१. मालिकेला पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद असला तरी आणखी खूप जास्त प्रतिसाद मिळाला तरच यापुढे ही मालिका चालू ठेवणे व्यवहार्य ठरेल.
२. शेवटी सगळी सोंगं करता येतात, पैशाचे सोंग आणता येत नाही. ही मालिका बायोपिक असल्याने, तो काळ उभा करण्यासाठी, नेहमीच्या मालिकांपेक्षा जास्त पैसा खर्चावा लागतो.
३. तितका रिटर्न जर होत नसेल तर मग वाहिनीने काय करावे असे तुम्हाला वाटते? कुठलीही वाहिनी आतबट्ट्याचा व्यवहार करू शकत नाही.
४. ही मालिका सुरू झाली तेव्हापासून तिचा प्रेक्षकवर्ग टिकून राहिलेला आहे, एपिसोडपरत्वे छोटीमोठी वाढ / घट होत राहिली, मात्र मुख्य लोकप्रियता कायम राहिली. म्हणुन ठरलेले २०० एपिसोड संपल्यावरही मालिकेला ४०% मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळेच मालिका पुढे चालु राहिली.
५. अर्थात आता पुन्हा मुदतवाढ मागायची/ द्यायची असेल तर खूप जास्त प्रतिसाद वाढेल याची हमी कोण देणार? तुम्हाला खालील गोष्टी अग्रक्रमाने कराव्या लागतील.
६. रात्री ह्याच वेळी दुसर्‍या एका वाहिनीवर एक ऎतिहासिक विषयावरील चरित्र मालिका चालू होती. ती बघायची असल्याने आमची इच्छा असूनही आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका बघू शकत नसल्याचे अनेक लोक आम्हाला सांगत असत. ती मालिका बंद होऊनही या मालिकेच्या प्रेक्षकसंख्येत भरिव वाढ का झाली नाही?
७. आज दहा महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका चालूय. मालिका उत्तम आहे, आम्ही एकही भाग चुकवत नाही असे लक्षावधी लोकांचे अभिप्राय आम्हाला मिळतात मात्र हे लोक वाचकांच्या पत्रव्यवहारात या मालिकेबद्दल का लिहित नाहीत?
८. अपवाद वगळता समाज माध्यमांवरही [ फेसबुक/ ट्विटर/ व्हॉटसप] तुम्ही का लिहित नाही?
९. तुम्ही रोज बघता तर मग इतरांना बघायला का प्रवृत्त करीत नाही?
१०. एका अतिरेकी मानसिकतेच्या छोट्या वर्गाने या मालिकेवर सतत दुषित पुर्वग्रहातून हल्ले केले, त्याला उत्तर द्यावे असे तुम्हाला का वाटले नाही?
११. आंबेडकरी समाजातला एक छोटा आत्मकेंद्रीत वर्ग ह्या मालिकेवर पहिल्या दिवसापासून बहिष्कार घालून बसलेला आहे. त्याला फक्त नाकं मुरडण्याचा कार्यक्रम माहित आहे. आम्ही काही विधायक करणार नाही, इतरांनाही करू देणार नाही, अशी ही आडमुठी भुमिका तुम्हाला पटते का?
१२. समाजात असा एक सनातनी वर्ग आहे की ज्याच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जन्मजात अढी आहे. त्यांची संख्या मूठभरच आहे.
प्रागतिक विचाराचे सर्व जाती-धर्मातील लोक ही मालिका बघतात. आंबेडकरी समाजापेक्षाही ही प्रेक्षकसंख्या अधिक आहे. आंबेडकरी समाजातील मूठभरांनी आत्मघातकी वृत्ती सोडून ही मालिक यापुढे बघावी, इतर समाजातील प्रेक्षकांनाही इकडं वळवावं असं तुम्हाला वाटत नाही काय?
१३. आम्ही कायम समतोल मांडणी करीत आलोय. आंबेडकरी समाजातल्या उच्च बुद्धीजिवींनाही माहित नसलेल्या असंख्य गोष्टी या मालिकेने प्रथमच उजेडात आणल्या. तरिही जे फक्त टिकाच करतात, त्यांच्यामागे उभं राहायचं की मालिकेच्या मागे याचा निर्णय तुम्ही सुबुद्ध प्रेक्षकांनी घ्यायचाय.
१४. तुमचे वाढीव सहकार्य मिळणार नसेल तर ही मालिका फार लवकरच आपला निरोप घेईल.
१५. जगातले नंबर एक विद्वान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील गुणवत्तासंपन्न मालिका मराठी वाहिन्यांवरील नंबर एकची मालिका व्हावी असं तुम्हाला वाटत नाही काय? किमान पहिल्या दहामध्ये ती यावी यासाठी तुम्ही काहीच करणार नसाल तर मग आमचाही नाईलाज होईल.
१६. आम्ही आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सोडणार नाही. पण उगीच मालिका अर्ध्यावर आलीय असा खोटाखोटा दिलासाही देणार नाही. तुमच्या वाढीव सहकार्याशिवाय ह्या मालिकेला यापुढे पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणं खरंच कठीण वाटतंय.
निर्णय आता तुमच्या हातात आहे.
-प्रा.हरी नरके, १६ मार्च २०२०
https://www.facebook.com/Mahamanvachi.Gauravgatha.FC/videos/841247446347731/

* अधिकारों सें इन्सान ग्यानी नही बनता. आप के पास सिर्फ अधिकार होना काफी नही हैं. क्यों की ग्यान अधिकारो से नही पढने से मिलता हैं. ग्यान से व्यक्ती दूरदर्शिता और मुत्सद्दीपण पा सकता हैं, जो व्यक्ती, समाज और देशके विकास के लिए आवश्यक होता हैं.   
* देशके भविष्य के निर्माण में नेता, पार्टी और उनकी प्रतिष्ठा का कोई स्थान नही होता हैं. देश का भविष्य इनके सर्वोपरी होता हैं. बल प्रयोग के आधारपर राष्ट्र की एकता या विकास का माहौल नही बनाया जा सकता हैं. उसके लिए दूरदर्शिता और भाईचाराही जरूरी हैं.

Saturday, March 14, 2020

गौरवगाथा २५० नाबाद- मालिका निरोपाच्या जवळ आलीय


























डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेचे काल २५० भाग पूर्ण झाले. रसिक प्रेक्षक, जाहीरातदार, स्टार प्रवाह वाहिनी आणि दशमी क्रिएशन यांचे हार्दीक आभार.

सर्व थरातील प्रेक्षकांनी ही मालिका उचलून धरली. सर्वच जात- धर्म- पंथ- प्रदेश- वयोगट यातल्या प्रेक्षकांचा दणकट प्रतिसाद मिळाला नसता तर ही मालिका फार पुर्वीच गुंडाळली गेली असती.

गेल्या अनेक वर्षात कोणत्याही खाजगी वाहिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मालिका करण्याची हिम्मत दाखवली नव्हती. दशमीचे नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांनी हे धाडस केले. स्टार प्रवाहचे सतिश राजवाडे, अभिजीत खाडे आणि सर्व टीम यांनी ही कल्पना उचलून धरली. सुरुवातीला २०० भागांना मान्यता देण्यात आलेली होती. मध्यंतरी त्यात थोडी वाढ करण्यात आली. १८ मे २०१९ पासून गेली दहा महिने स्टार प्रवाह वर रात्री ९ वाजता ही मालिका प्रक्षेपित होते.

मात्र आता मालिका शेवटाच्या जवळ पोचलेली आहे. तुमचं सर्वांचं प्रेम शेवटपर्यंत कायम राहिल असा विश्वास वाटतो.

हा अनुभव व्यक्तीश: मला खूप काही शिकवून समृद्ध करणारा होता. धन्यवाद नितीनसर. कोट्यावधी प्रेक्षकांच्या या ताकदीकडे सामाजिक चळवळीने संपुर्ण दुर्लक्ष करून हे कुरण सनातनी विचारांच्या कंपूला बहाल केलेले आहे.

आपले बहुतेक विचारवंत आणि साहित्यिक यांना निष्क्रीयता व आत्मकेंद्रीतता यामुळे मालिकाविश्व, त्याची परिणामकारकता, कोट्यावधींपर्यंत पोचण्याची क्षमता याची जाणीव झालेली नाही. ते सामान्य माणसाच्या जगण्याशी, त्याच्या आवडीनिवडीशी नाळ जोडू शकलेले नाहीत. ते बहुधा कालबाह्य झालेले आहेत. जे सामान्य जनतेपासून फटकून राहतात ते फुले-शाहू-आंबेडकरवादी कसे काय असू शकतात? आणि म्हणे हे परिवर्तनवादी. नेमकं कसलं परिवर्तन करणारेत हे? कशाच्या आणि कुणाच्या जोरावर? हे क्रांती करणार पण तिही स्वत:पुरती. मनातल्या मनात. त्यांच्या या तुसड्या आणि आत्मसंतुष्ट मानसिकतेमुळेच बहुधा प्रतिगामी शक्ती वेगाने वाढत आहेत. प्रबोधन चळवळी माना टाकीत आहेत. मला याची जाणीव आहे की मालिकांना अनेक मर्यादा असतात. बर्‍याच तडजोडी कराव्या लागतात. मालिकांमुळे क्रांती होणार नाही. मात्र अनुकूल मानसिकता नक्कीच घडवता येईल.

या यशाचे शिल्पकार असलेल्या खालील मान्यवरांचे मी कृतज्ञतापुर्वक आभार मानतो. ही नामावली प्रातिनिधिक आहे. प्रत्यक्षात या यशात आणखी खूप मान्यवरांचा सहभाग आहे.

नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर, सागर देशमुख, सतिश राजवाडे, शिल्पा कांबळे, अभिजीत खाडे, चिन्मय केळकर, शिवानी रांगोळे, वैभव छाया, अक्षय पाटील, अजय मयेकर, गणेश रासने, दीपक प्रभाकर  नलावडे, अमृत गायकवाड, चिन्मयी सुमीत, पूजा नायक, मिलिंद अधिकारी, संकेत कोर्लेकर, पुष्कर सरद, मृण्मयी सुपल, आदर्श शिंदे, सोहम देवधर, किरण शिंगाडे, अमित ढेकळे,निनाद लिमये, दादा गोडकर, पवन झा,पद्मनाभ बिंड, अजित दांडेकर, नरेंद्र मुधोळकर

-प्रा.हरी नरके, १३ मार्च २०२०

Friday, January 17, 2020

डॉ. बाबासाहेबांनी कशी जिंकली चवदार तळ्याची केस?

डॉ. बाबासाहेबांनी कशी जिंकली चवदार तळ्याची केस?- प्रा.हरी नरके

" डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा " ही मालिका सध्या एका रहस्यकथेसारखी पकड घेत आहे. आज मालिकेचा २११ वा भाग आम्ही सादर केला. महाडच्या चवदार तळ्याची केस बाबासाहेबांनी कशी जिंकली त्याचा उलगडा आजच्या भागात प्रेक्षकांना झाला असेल. ज्यांनी आजचा भाग बघितला नसेल त्यांनी तो हॉटस्टार वर अवश्य बघावा. टिम गौरवगाथाने, विशेषत: दशमी आणि स्टार प्रवाहच्या मंडळींनी, कलाकार, लेखक, दिग्दर्शक व सर्व संबंधितांनी अपार मेहनत घेऊन ही अभिनव मालिका आपल्यासमोर सादर केलेली आहे. या मालिकेने टेलिव्हीजन इंडस्ट्रीत प्रथमच एक नवा ट्रेंड निर्माण होत आहे.

बॅरिस्टर डॉ. आंबेडकरांचे युक्तीवाद कौशल्य, त्यावेळच्या नामवंत वकीलांपैंकी जे तोवर एकही केस हरले नव्हते अशा अ‍ॅड. ल.ब. भोपटकरांना बाबासाहेबांनी पराभूत करणे, सुरबानानांनी जिवावर उदार होऊन पुरावे जमा करणे, तोवर अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाने चळवळीच्या जोरावर कायदेशीर मार्गाने ब्रिटीश कोर्टात प्रथमच विजय मिळवणे हे मालिकेतले भाग आपल्याला कसे वाटले?

२११ भाग झाले तरी बुद्धीवंतांपैकी काहीजण या मालिकेबाबत मौनाच कट करून बसलेत. सामान्य प्रेक्षक मात्र प्रचंड प्रतिसाद देताहेत. मला या मालिकेच्या टिमचा एक प्रमुख सदस्य या नात्याने तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की,

तुमच्यापैकी किती लोकांना फत्तेखान देशमुख आणि केस जिंकण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी सुरबानानांमार्फत मिळवलेले सरकारी पुरावे याबाबत आधी माहित होते? कृपया कमेंटमध्ये लिहा.

-प्रा.हरी नरके, १७ जानेवारी २०२०

सुचना - उद्यापासून यापुढे शनिवारी ही मालिका नसेल. फक्त सोम ते शुक्र असेल.

Friday, November 1, 2019

शेतीला उद्योगाचा दर्जा, बाजारभाव मिळावा- डॉ. आंबेडकर, १९१८ : प्रा.हरी नरके


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिंतनामध्ये शंभर वर्षांपुर्वी जे जे विषय होते त्यातला अग्रक्रमाचा विषय शेती, शेतीसमस्या आणि शेतकर्‍यांचे प्रश्न हा होता. याबाबत चळवळीत, अभ्यासकांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये घोर अज्ञान आहे. त्याबाबत का बोलले/लिहिले जात नाही हे मला कायमच पडलेले कोडे आहे.
"Small Holdings in India and their remedies [ समॉल होल्डींग्ज इन इंडीया ॲण्ड देअर रेमेडिज"] हा बाबासाहेबांचा ग्रंथ शेती आणि शेतकरी यांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना यावर आहे. तो त्यांनी १०० वर्षांपुर्वी १९१८ ला लिहिला.  हा ग्रंथ "बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" मालिकेच्या पहिला खंडात प्रकाशित केलेला आहे.

या ग्रंथातील महत्वाचे मुद्दे-

१. शेती हा सर्वात प्राचीन उद्योग आहे. भारतात ८५ टक्के लोक शेतीवर उपजिविका करतात.

शेतकर्‍यांनी कुटुंबनियोजन करावे, त्यांना जास्त मुलं असल्यानं व ती सर्वच शेतीवर अवलंबून असल्यानं शेतीचे सतत तुकडे पडतात. ती नफ्यात राहात नाही.

२. शेतीवरील अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍याने एकाच मुलीला/मुलाला शेतात ठेवावे, बाकीच्यांना उद्योग, व्यापारात घालावे,

३. शेतीचे तुकडे जोडून जमिनीचे एकत्रिकरण करावे, शेताच्या त्या एकत्रित तुकड्याला आर्थिक युनिट मानावे.

४. शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, त्यामुळे सरकारी मदत शेतकर्‍याला मिळेल.

५. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य बाजारभाव मिळावा,

६. शेतीला सिंचनसुविधा पुरवाव्यात,

७. फक्त शेतीवर सर्वस्वी अवलंबून राहणे हे आत्मघातकी ठरेल.

८. वरील उपाययोजना तातडीने केल्या नाहीत तर शेती व शेतकरी संकटात सापडेल.

याचा अर्थ बाबासाहेबांनी १०० वर्षांपुर्वी शेतकरी आत्महत्त्यांचा इशारा  दिलेला होता.

प्रा. हरी नरके, १/११/२०१९

Monday, September 9, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथेची उद्या सेंच्युरी- प्रा.हरी नरके













आजकाल अनेक वाहिन्यांवर मालिकांची भाऊगर्दी असते. त्यातल्या पाचपन्नासांनी शेकडो भाग पुर्ण केलेले असतात. अशा स्थितीत गौरवगाथेची सेंच्युरी होणं ही काही फार मोठी अपुर्वाई नसावी.

आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आजवर कोणत्याही भाषेत, कोणत्याही वाहिनीने मालिका केलेली नाही. अशास्थितीत मराठी मालिका तयार करण्याचा धाडशी निर्णय दशमी आणि स्टार प्रवाहने घेतला. मराठी भाषकांची लोकसंख्या सुमारे दहा कोटी आहे. त्यातल्या निम्म्या लोकांपर्यंत ही मालिका आजच पोचली आहे. जिथे जिथे मराठी माणसं राहतात तिथे तिथे ही मालिका आवर्जून बघितली जाते. गेल्या १७ आठवड्यात ही मालिका बघणारांची संख्या सातत्याने वाढते आहे. मालिकेचे एकुण २०० भाग असणार आहेत. उद्या मालिकेचा अर्धा टप्पा पुर्ण होईल.


अतिशय संवेदनाशील आणि आव्हानात्मक विषयाला भिडताना दशमी या निर्मिती संस्थेने आणि स्टार प्रवाह या वाहिनीने सर्व प्रकारची दक्षता घेतलेली आहे असे तुम्हाला नक्कीच जाणवत असणार.

या मालिकेला आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग मानणारे कोट्यावधी प्रेक्षक मिळणे हीच आम्हाला सर्वात मोठी दाद वाटते. बाबासाहेबांची सम्यक ओळख करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही रसिकांनी उचलून धरला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

इतर मालिका आणि स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गौरवगाथा यात तुम्हाला खरंच काही फरक वाटतो काय?  असल्यास नेमका कोणत्या प्रकारचा फरक वाटतो? दशमी क्रिएशनची ही निर्मिती हटके आहे असे तुम्हाला जाणवते काय? यातील कथाविस्तार, पटकथा, संवाद, संशोधन यावर विशेष मेहनत घेतल्याचे तुम्हाला मालिकेद्वारे प्रतित होते काय?

ही मालिका तुम्हाला थेटपणे भिडते काय? या मालिकेचे सादरीकरण, लेखन, दिग्दर्शन, छायाचित्रण, नेपथ्य, संकलन, संगीत अशी एकुणच सर्व निर्मिती तुम्हाला भावतेय काय?  या मालिकेतील विविध भुमिकांसाठी अभिनेते/अभिनेत्री यांची केलेली निवड तुम्हाला कशी वाटते? ते आपल्या भुमिकांना न्याय देताहेत असे तुम्हाला वाटते ना? आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.


दररोज दाखवण्याची एखादी मालिका बनवायची म्हटले की तिला वेळेची मर्यादा असते. वेळेबरोबरच इतरही अनेक बाबींची कमतरता असते. अशा स्थितीत विषयाशी प्रामाणिक राहून मालिका बनवणे ही एक मोठी कसरतच असते.

बाबासाहेबांसारखा हिमालयाच्या उंचीचा महापुरूष आणि त्यांचा १८९१ ते १९५६ हा काळ यावरील बायोपिक तयार करण्याचे आव्हान किती मोठे आहे हे त्यातल्या जाणकारांनाच समजू शकेल.

यानिमित्ताने या मालिकेच्या निर्मिती आणि यशासाठी झटणार्‍या सर्व चमुंचे हार्दीक अभिनंदन. जाणत्या प्रेक्षकांचे मन:पुर्वक आभार. असाच स्नेह कायम ठेवावा ही विनंती.

- प्रा.हरी नरके, १० सप्टेंबर २०१९

Monday, August 26, 2019

आंबेडकरी प्रतिभावंताची गौरवगाथेला दाद








आंबेडकरी प्रतिभावंताची गौरवगाथेला दाद- प्रा.हरी नरके

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा" या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेचे आज ८५ एपिसोड पुर्ण झाले. आजवर जाणते प्रेक्षक आणि सर्व स्तरातील जनतेचे अमाप प्रेम लाभलेल्या या मालिकेला आंबेडकरी प्रतिभावंतानी मनापासून दाद दिलीय. आज या मालिकेत मोठ्या भीमरावांचा [ सागर देशमुख ] प्रवेश होत आहे. तो प्रोमो पाहताना [कडूबाई खरातांचा काळीज चिरणारा आवाज आणि दृश्य परिणाम बघून] छान वाटले असे ते आमच्या एका टिममेंबरला म्हणाले.

आंबेडकरी समाज हा प्रबुद्ध समाज आहे. प्रतिभावंत, बुद्धीवादी, नेते, कलावंत, साहित्यिक यांची संख्या मोठी आहे. भारतातील एकुणच बुद्धीवादी वर्ग टिव्हीवरील मालिकांकडे मनोरंजन म्हणून पाहतो. एकतर काही मालिका खरंच सुमार असतात. शिवाय हा वर्ग आपापल्या मौलिक निर्मितीमध्ये व्यस्त असल्याने त्याला मालिका बघायला वेळही मिळत नाही. जर आपण मालिका पाहिल्या तर बुद्धीवादी जगात आपली प्रतिष्ठा कमी होईल असेही वाटत असेल.

संस्कृतीकरण सिद्धांतानुसार वरच्या वर्गात जाण्याची प्रेरणा असते. त्यामुळे ज्याला सांस्कृतिक क्षेत्रात फारशी प्रतिष्ठा नाही त्यापासून चार हात दूर राहायचे असाच बहुतेकांचा खाक्या असतो. हाच प्रतिष्ठीत वर्ग आजकाल नेटफ्लिक्सची मात्र तोंड फाटेस्तोवर स्तुती करीत असतो.

बुद्धजयंतीला १८ मे २०१९ रोजी आपली "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा" ही मालिका सुरू झाली. अनेकांनी आम्हाला मौलिक सुचना केल्या. सुधारणा सुचवल्या. आम्ही त्या अमलात आणल्या. पुढेही आणू. आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

आजवर तमाम प्रबुद्ध जनतेने आणि जाणत्यांनी कोटींच्या संख्येने या मालिकेला भरभरून दाद दिलेली आहे.
टिव्हीवरील कोणतीही मालिका न बघणारे एक आंबेडकरी प्रतिभावंत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" बघून आनंदित झाले आणि त्यांनी आपल्या टिमचे कौतुक केले. ही दाद आमच्यासाठी मोलाची आहे. आमचा हुरूप वाढवणारी आहे.

आपली तमाम मराठी माणसांची अभिरूची अतिशय उच्च दर्जाची असते. त्यामुळे टिकाकारांची गरजच नसते. आपल्या अनेक मित्रांना सामान्य जनतेपासून फटकून राहण्याची सवय लागलेली असते. जे जे लोकप्रिय ते ते टाकाऊ असं काही मानतात. जनता बालीश असते असे ते समजतात. त्यांचे काम तेव्हढे मोलाचे बाकी सब दुय्यम असा पुर्वग्रहही असतो.

सामुहिक शहाणपणाला सार्वभौम मानणारे तथागत बुद्ध आम्हाला प्रेरणापुरूष वाटतात. आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या प्रत्येक घरात पोचावेत हा आमचा ध्यास आहे.

बाबासाहेबांना जाऊन ६३ वर्षे झाली. खाजगी वाहिन्या येऊन २५ वर्षे झालीत. आणि तरिही आजवर कोणत्याही भाषेतील कोणत्याही वाहिनीला ह्या विषयावर मालिका करावीशी वाटली नाही. ज्यांना गौरवगाथा आवडत असेल किंवा नसेल त्यांनी यापेक्षा अधिक धारदार, भव्य आणि अचूक तपशीलांची मालिका अवश्य कराव्यात. आमच्या त्यांना सर्व शुभेच्छा आहेत. ही पहिली मालिका असली तरी ती शेवटची नक्कीच नाही. उलट ती एक सुरूवात ठरावी. शेकडो मालिका, नाटकं आणि चित्रपट या विषयावर यावेत असेच आम्हाला वाटते.
माझ्या कोंबड्याने उगवत नसेल तर सूर्यच उगवता कामा नये ही नकारात्मक मानसिकता समाजाला पुढे नेत नसते असे आम्ही मानतो.

जगभरात जिथेजिथे मराठी माणसं आहेत तिथं तिथं ही मालिका बघितली जाते. आजवर कधीही टिव्ही मालिका न बघणारा मोठा वर्ग आवर्जून ही मालिका बघू लागला. अवघ्या पंच्याऎंशी भागात या मालिकेने टी आर पी चे नवे उच्चांक गाठले. नुकत्याच दाखवण्यात आलेल्या बाबासाहेब-रमाईंचा विवाह ह्या एपिसोडला पाच कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांची पसंती लाभली. अर्थातच ही लोकप्रियता, ही कमाई आमची नसून ती बाबासाहेबांची आहे. ही पुण्याई बाबासाहेबांच्या बावन्नकशी जीवनगाथेची आहे. त्यांच्या संघर्षाची आहे. त्यांच्या जीवनातच एवढे नाट्य आहे की ते प्रामाणिकपणे दाखवावे एव्हढीच आमची मर्यादित भुमिका होती. आहे. राहिल. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. यात जे काही चांगले आहे ते बाबासाहेबांचे आहे. उणीवांची जबाबदारी मात्र आमची आहे हे नम्रपणे नमूद करायला हवे.

मालिकेबाबत आम्ही मनमोकळ्या टिकेचे, सुचनांचे, उणीवा, त्रुटी दाखवणारांचे मन:पुर्वक स्वागत करतो.

ही मालिका आहे. हा अनुबोधपट [ डॉक्युमेंटरी ] नाही. मालिकेला अनेक मर्यादा असतात याची आम्हाला नम्र जाणीव आहे. मालिका चारपाच कोटींपर्यत थेट पोचते. चळवळीचे काम मोलाचेच आहे. पण तिच्या पोचण्याला मर्यादा असते. या फिक्शनची, या माध्यमाची ताकद प्रतिगाम्यांना कळली. आम्ही मात्र त्यात मागे राहिलो. आज जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर कोण मागे पडलंय आणि कोणाची सरशी होतेय ते दिसतेच आहे.

बाबासाहेबांचे जीवन अथांग आहे. त्याचा तळ सापडणे केवळ अशक्य आहे. तरिही आपल्या पाठींब्यावर गौरवगाथा टिमने हे धाडस केलेले आहे.

तुमचा प्रचंड प्रतिसाद आमचे मनोबल वाढवित आहे. आम्ही आपले कृतज्ञ आहोत.
- प्रा. हरी नरके, २६ ऑगष्ट २०१९

छायाचित्र- टिम गौरवगाथा - डावीकडून उजवीकडे- अभिजित खाडे, शिल्पा कांबळे,  नरेंद्र मुधोळकर, हरी नरके, अपर्णा पाडगावकर, नितिन वैद्य, अक्षय पाटील, निनाद वैद्य, अमित ढेकळे

Sunday, August 4, 2019

गौरवगाथा मालिकेद्वारे राष्ट्रीय कार्य -


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारलेली प्रदीर्घ अशी दूरदर्शन मालिका बनवून व प्रसारित करून 'स्टार प्रवाह' ही वाहिनी एक महत्त्वपूर्ण असे राष्ट्रीय कार्य निभावत आहे, असे माझे मत आहे. प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेने माणसातील 'माणूस' मारून टाकला होता. माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची दृष्टीच हरवून गेली होती. त्यामुळे बाबासाहेबांचा जिवंतपणी आणि महापरिनिर्वाणानंतरही प्रचंड मोठा द्वेष केला गेला.

हा द्वेष अज्ञानापोटी आणि एका रोगट मानसिकतेतून केला जात होता. 'स्टार प्रवाह' ही वाहिनी सध्या बाबासाहेबांवरील जी मालिका प्रसारित करत आहे, ती मालिका जो कोणी नियमितपणे बघेल त्याच्यातला 'माणूस' नक्कीच जागा होईल. बाबासाहेब हा त्याच्या जीवनाचा आदर्श बनेल. 'स्टार प्रवाह'ने बनवलेली ही मालिका अत्यंत जिवंत आणि प्रत्ययकारी बनलेली आहे. यामधील प्रत्येक कलावंताने आपली भूमिका उत्तम रीत्या साकार केली आहे.

त्यातही बाबासाहेबांच्या आत्याची भूमिका ज्या अभिनेत्रीने साकार केलेली आहे, ती तर फारच उत्तम झालेली आहे.बाबासाहेबांची वेगवेगळ्या वयातली चार रूपं या मालिकेत दाखवलेली दिसतात. बाबासाहेबांचे बाल रूप, किशोर वयातील रूप, तरुणपणातील रूप आणि प्रौढपणातील रूप ही सारीच रूपं त्या-त्या कलावंतांनी जीव ओतून साकार केलेली दिसतात.

त्यातही बाल भिवाचे रूप मनाला फार भावलं. किशोर वयात विहिरीचे पाणी पिले म्हणून मारहाण करणाऱ्या लोकांवर भिवाने उगारलेला धोंडा फार महत्त्वाचा वाटला. संवाद अत्यंत सुंदर आहेत. त्याला संगीताचीही उत्तम साथ मिळाली आहे.

बाबासाहेबांचा बाळा दादा हा भाऊ बँड वाजावण्याची नोकरी करण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही. त्याबद्दल मालिका काहीच बोलत नाही. आनंदाचं लग्न झालं, पण बाळादादाचं लग्न झालं का? तो घरी परत कधीच का येत नाही?

बाबासाहेबांच्या चरित्रातील त्यांचे कर्तृत्व सिद्ध होऊ लागल्या नंतरच्या गोष्टी बहुतांश जणांना माहीत असतात; परंतु त्यांचे बालपण, तरुणपण, त्यांचे बालपणातील व तरुणपणातील सवंगडी, त्यांच्या बहिणी, त्यांची नंतरही आई, त्यांचे मुंबईतले शिक्षक,यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते.

बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनातील अत्यंत महत्त्वाची माहिती, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग आपल्या वहिनीने जिवंत केले आहेत. आपल्या वाहिनीवरील ही मालिका एका राष्ट्र जाणिवेची आणि संवैधानिक मूल्यांची पेरणी करत आहे. ही पेरणी करत असल्याबद्दल मी 'स्टार प्रवाह' या वाहिनीचे अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो.

मी ही मालिका रोज नियमीतपणे पाहतो. सर्वांनीच बघावी अशी ही उत्तम दर्जाची दूरदर्शन मालिका आहे.
by Prof. Anant Raut- प्रा.अनंत राऊत [ प्रख्यात लेखक-नांदेड ] डॉ. अनंत राऊत
प्रमुख, मराठी विभाग पीपल्स कॉलेज नांदेड.
अध्यक्ष,
युवा प्रबोधन मंच प्रणित संविधान जागरण समिती
भ्र. ध्व - 98 60 52 55 88
ई मेल पत्ता - anantraut65@gmail.com