Showing posts with label फुले-आंबेडकर. Show all posts
Showing posts with label फुले-आंबेडकर. Show all posts

Wednesday, July 1, 2020

मी कृतज्ञ आहे--दिलगिरी

सप्रेम जयभीम. नमो बुद्धाय.
गेल्या ४० वर्षात आंबेडकरी बौद्ध चळवळीतील भावांनी व बहिनींनी मला अमाप प्रेम, आपुलकी, मानसन्मान दिला. त्यांनीच मला मोठे केले.
या प्रबोधनाच्या चळवळीतून मला खूप काही शिकता आले. मी नामांतर आंदोलनात तुरूंगवास भोगला होता याला आता ३८ वर्षे झाली. मी या माझ्या भावंडांचा तसेच वडीलधार्‍यांचा कृतज्ञ आहे.
माझ्या २६ जून २०२० च्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांवरील लेखातील दहाव्या मुद्द्यात मी व्यसनाधिनता, घरेलू महिला कामगारांच्या हिंसाचाराचे दु:ख आणि इतर मुद्दे उपस्थित केले होते.
मी ते सर्व मुद्दे मागे घेत असून माझ्या सर्व प्रिय बौद्ध बांधवांची दिलगिरी व्यक्त करीत आहे.
भवतु सब्ब मंगलम!
- प्रा. हरी नरके

Thursday, May 28, 2020

काळीज पिळवटून टाकणारे मजूरांचे लोंढे - प्रा. हरी नरके












गेला महिनाभर प्रवासी मजूरांचे होत असलेले हाल बघताना काळीज पिळवटून जाते. किती भयंकर यातनांमधून जाताहेत हे बांधव. खरं तर ज्यांना ज्यांना काळीज आणि मेंदू आहेत त्या सर्वांनी अस्वस्थ व्हावं असं हे भयकारी वास्तव आहे. पण एन.डी.टि.व्ही.चा अपवाद वगळता इतर वाहिन्यांना हे हाल, हे जगणं का दिसत नाहीत? का भिडत नाही? तो बातम्यांचा ठळक आणि मुख्य विषय का होत नाही? भारतीय माध्यमांचा हा बधीरपणा संतापजनक आहे. लाजिरवाणा आहे. माध्यमांचा इतका सरकारधार्जिणेपणा तर १९७५ च्या आणीबाणीतही नव्हता.


दुसरीकडे सामान्य माणसाला दहशत बसावी, रोज धडकीच भरावी अशा बेजबाबदार पद्धतीनं याच वाहिन्या कोरोनाच्या बातम्या दाखवत आहेत. बातम्या देणारांचे किंचाळणारे आवाज जणू काही तरी वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा भास निर्माण करताहेत. इतका बथ्थडपणा का? यांना कुणालाच संवेदना नाहीत? हे अपार हाल सोसणारे, तडफडून मरणारे लोक यांचे कुणीच नाहीत? यात ह्युमन व्हॅल्यू असलेले बातमीमूल्य नाही? सरकारचे व भारतीय माध्यमांचे हे संवेदनाशून्य वर्तन बघताना शरम वाटते. त्यांना असे वाटते की हे मजूरलोक भारतीय नाहीतच. कुठून आणत असतील हे सरकारी दलाल एव्हढे बधीरपण?

हे सरकार गरिबांचे कधीच नव्हते. ज्या तुघलखी बाण्याने नोटाबंदी, जीएसटी आणि कोणतेही नियोजन न करता अचानक केलेला लॉकडाऊन हे गरिबविरोधी निर्णय घेतले गेले त्यावरून सरकारचे वर्तन माणूसघाणे आणि निर्दयपणाचेच ठरते. सरकारला आणि त्यांच्या मातृसंघटनेला फक्त उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अब्जाधीश यांचेच हित बघायचे आहे. कारण तेच त्यांचे लोक आहेत. गरिबांचे कर्दनकाळ म्हणूनच या तथाकथित ५६ इंचाची नोंद इतिहासाला करावी लागेल.

एकाचढ एक माथेफिरू भरलेत युपी, एम.पी. बिहार राज्यात आणि पीएमओ, रेल्वे आणि अर्थखात्यात. इतके लोभस आणि खोटे चित्र रंगवतात हे नीच ट्विटरवर! कुठे फेडाल ही पापं? गरिबांची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही मुर्दाडांनो.

रस्त्यावरील भिकार्‍यांचे पुनर्वसन करणार्‍या डॉ. सोनावणे यांची मुलाखत बघत होतो. ते म्हणाले, भिकार्‍यांमध्ये दोन प्रकारचे गट कार्यरत आहेत. एक ज्यांना कामधंदा न करता आयते खायची सवय लागलेली आहे, असे सराईत, धंदेवाईक, जातीगत भिकारी आणि दुसरा ज्यांना वृद्धत्व, अपंगत्व किंवा गंभीरस्वरूपाचे आजारपण यांच्यामुळे काम करणे शक्य होत नाही असे मजबूर लोक.

मला यातली पहिल्या प्रकारची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची वाटते. दुसर्‍या प्रकारातील लोकांसाठी कल्याणकारी भुमिकेतून समाज आणि सरकारने काम करायला हवेच. मात्र पहिल्या प्रकारच्या लोकांना ठोकून काढून सक्तीने कामाला जुंपले पाहिजे.

आपल्या देशात भिक मागण्याचेही धार्मिक उदात्तीकरण केले गेलेले आहे. कधी ते भिक्षुकीच्या तर कधी दक्षिणेच्या नावावर. लक्षावधी साधू, संन्याशी, मठपती यांचे त्यामुळेच तर फावले असून भिकारचाळे करणारे हे लोक ही त्यांचीच निर्मिती आहे. शारिरिक वा बौद्धिक श्रम न करता निव्वळ आयते खाणारे लोक हे देशावरचा बोजा आहेत. असे समुहच्या समुह असणे हे देशावरचे संकट मानायला हवे. का पोसायचे या बाजारबुणग्यांना? असे कोट्यावधी वळू पोसणारा देश कसा प्रगती करणार?

मी स्वत: झोपडपट्टीतून आलोय. बालमजुरी करीत शिकलोय. टोकाची गरिबी मी अनुभवलीय. कोणतीही शासकीय सवलत न घेता मी इथवर आलोय. मला गरिबांविषयी, श्रमिकांविषयी कळवळा वाटतो. पण तो आंधळा नाही.

त्यामुळे काही गरिबांची खटकणारी एक गोष्ट नोंदवायलाच हवी. शंभर वर्षे झाली, र.धों.कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे. आर. डी. टाटा यांनी कुटुंब नियोजनाचे महत्व सांगून. भयावह गरिबी असताना २०२० मध्येही जेव्हा पोराबाळांचे लेंढार वाढवणारे काही लोक मला दिसतात तेव्हा डोक्यात तिडीक उठते. आणीबाणीत कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम बूमरॅंग झाला आणि १९७७ पासून लहान कुटुंबाचा बोजवारा उडाला.


झोपडपट्टीत राहणारी, फूटपाथवर राहणारी ही कोट्यावधी गरिब जनता कधीतरी स्वत:च्या उत्कर्षासाठी कुटुंबनियोजनाकडे वळणार की नाही? छोटे कुटुंब हा पॅटर्न आजही का आपलासा होत नाही? जन्माला येणारे प्रत्येक गरिब मूल बाळूत्यावरून ( पाळण्यातून ) उठते आणि थेट बालकामगार बनते. कमावता हात बनते. हे कधीतरी थांबल्याशिवाय ही उपासमार, हे हालाखीचे दिवस, कसे टळणार?

सावित्रीबाईंनी - जोतीरावांनी मुलींच्या, मागासवर्गियांच्या, बहुजनांच्या शिक्षणाचे काम सुरू केले त्याला पाऊणेदोन शतके उलटली. छ. शाहू, सयाजीराव, कर्मवीर भाऊराव, बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व आमच्या कानीकपाळी ओरडून सांगितले. तरिही अद्याप आमच्यात ज्ञानाची आच निर्माण होत नसेल तर कसे थांबणार आमचे हे नष्टचर्य?

राज्यकर्त्यांच्या नियोजनशून्यतेवर जरूर बोललेच पाहिजे.आसूडा मारलेच पाहिजेत. पण आमच्या गरिबांच्या चुकांचेही आत्मपरीक्षण केले तरच या आपत्तीमधून आम्ही काही तरी शिकलो असे म्हणता येईल. येरे माझ्या मागल्या आणि पुढले पाढे पंचावन्न!

- प्रा. हरी नरके, २८/५/२०२०

Friday, April 10, 2020

महात्मा फुले यांच्या जन्मतारखेचा शोध आणि जयंती उत्सव--प्रा. हरी नरके









लहानपणी शाळकरी वयात मी राष्ट्र सेवा दल, महात्मा फुले समता प्रतिष्ठान व डॉ. बाबा आढाव यांच्यामुळे २८ नोव्हेंबरला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीला गंज पेठेतील फुले वाड्यावर जायचो. तिथं आम्ही इतके कमी लोक असायचो की सगळे मिळून २५ लोकही नसायचे. पुणेकरांना स्मृतीदिनीही जोतीरावांची आठवण होऊ नये याचं मनस्वी दु:ख व्हायचं. हे चित्र आपण बदललं पाहिजे असं वाटत राहायचं. मुंबईला चैत्यभुमीवर ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी उसळलेला जनसागर बघून खूप बरं वाटायचं. नागपूरलाही दिक्षाभुमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनी अशीच गर्दी ओसंडून वाहायची. १४ एप्रिलला पुणे स्टेशनला असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती थवेच्या थवे असायचे. मग फुले वाड्याच्या बाबतीतच उदासिनता का? असा प्रश्न पडायचा. आज मी किमान एव्हढं तरी सांगू शकतो की महात्मा फुले समता परिषदेच्या नेत्यांना मी २७ वर्षांपुर्वी पहिल्यांदा फुले वाड्यावर घेऊन गेलो आणि त्यानंतर दरवर्षी ही उपस्थिती वाढते आहे. आता पुरोगामी चळवळीतल्या बर्‍याच नेत्यांना वाड्यावर जाऊन यायला हवं असं वाटू लागलंय. आज २८ नोव्हेंबरला काही हजार लोक वाड्यावर अभिवादनाला येत असतात. फुले यांची जयंती का होत नाही हाही प्रश्न मला छळायचा. ३० वर्षांपुर्वी तुमच्यापैकी कोणाला महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम झाल्याचे आठवतेय? नाही ना? अहो, होतच नव्हती तर आठवणार कुठून?

ही प्रथा आधी नव्हती. महात्मा फुले जयंती साजरी करण्याची ही पद्धत अगदी अलिकडे निर्माण केलेली आहे. हा स्फुर्तीदायक उपक्रम सुरू करण्यासाठी गेली ३० वर्षे केलेली धडपड फळाला आलेली बघताना मनस्वी आनंद होतो.

पण त्यासाठी किती रक्त आटवावं लागलं माहितीय? आपल्या देशात एखादी चांगली गोष्टही रुजवायला किती काळ जावा लागतो! त्यासाठी धडपडणारी व्यक्ती अगदी थकून जाते. बर्‍याचदा नाउमेद होते. निराश होते. पण चिकाटी असेल तर यश मिळतेच.

महात्मा जोतीराव फुले यांच्या महत्वाच्या चरित्रकारांपैकी म्हणजे, पंढरीनाथ सीतराम पाटील, धनंजय कीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा.गं.बा.सरदार, प्रा.भा.ल. भोळे, प्रा.य.दि. फडके, प्रा.मा.गो. माळी, बा.ग. पवार, प्रा. गजमल माळी यातल्या कोणाच्याही पुस्तकात महात्मा फुलेंची जन्मतारीख दिलेली नाही. त्यांचं १८२७ हे जन्मवर्ष फक्त माहित होतं. तारीख सापडतच नव्हती.

महात्मा फुले यांची जन्मतारीख माहितच नसल्यानं ती पुस्तकात लिहिणार तरी कशी? आणि कुठून?
या महात्म्याचं महापरिनिर्वाण २८ नोव्हेंबर १८९० ला झालं. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी किंवा स्मृतीदिन २८ नोव्हेंबरला गंभीरपणे पाळला जायचा. जिभेला, लेखणीला वळण पडल्यामुळे पत्रकार मित्र स्मृतीदिवस साजरा झाला असं लिहीतात, म्हणतात, जे चुकीचं आहे. स्मृतीदिवस हा दु:खाचा, शोकाचा असतो तो साजरा कसा करणार? तो गंभीरपणे पाळला जातो. असो.

     १९६९ साली महात्मा फुले समग्र वाड्मयाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर आणि प्रा. स.गं. मालसे यांनी महात्मा फुल्यांच्या जन्माची एक आठवण नमूद केलेली होती. शनिवारवाड्याला लागलेली आग या घटनेच्या आधारे त्यांनी फुले यांचा जन्म २० फेब्रुवारी १८२८ ला झाला असावा अशी एक शक्यता वर्तवून ठेवली होती. त्याबाबत मी त्या दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चाही केलेली होती. तथापि यात एक अडचण होती. फुल्यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले यांचे जन्मवर्ष १८२७ दिलेले असल्यानं १८२८ ची ही नोंद सदोष वाटत होती. पटत नव्हती.

माझं "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक मार्च १९८९ मध्ये पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशित झालं. त्यातून सत्यशोधक कमलताई विचारे यांच्याशी माझा परिचय झाला. थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरूजी यांच्या त्या सुनबाई. केशवराव सत्यशोधक समाजाचे महाध्यक्ष होते. मी त्यांचं समग्र साहित्य प्रकाशित केलेलं आहे. त्यांनी दुर्मिळ पुस्तकांचा मोठा संग्रह केलेला होता. त्यात आणि इतर असंख्य पुस्तकात मी जोतीराव फुले यांच्या जन्मतारखेचा शोध घेत होतो. अर्काइव्हज, [पुराभिलेखागार], सगळी महत्वाची ग्रंथालये, प्राचीन दस्तावेजांचे संग्रह पालथे घालूनही हाती काही मिळत नव्हतं. मात्र शेवटी विचार्‍यांच्या कागदपत्रांमध्ये कित्येक महिने शोध घेतल्यानंतर मला हा खजिना सापडला.

१८९१ साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे पहिलं चरित्र मला त्यात मिळालं.

स्मृतीशेष कॉ. गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र. ते जोतीरावांचे निकटचे मित्र, सहकारी आणि मित्र होते. त्यामुळे हे पुस्तक अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
पानसर्‍यांच्या  हस्ताक्षरातील काही पत्रंही मिळाली. ते आपलं नाव भलं मोठं लांबलचक लिहित असत. " महाधट नारायण बाबाजी पानसरे पाटील."

तर या फुले चरित्रात पानसरेंनी महात्मा फुले यांची जन्मतारीख ११ एप्रिल १८२७ ही दिलेली सापडली. महात्मा फुले यांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली तो क्षण माझ्यासाठी अक्षरश: युरेका ! युरेका! असं ओरडण्याचा सुवर्णक्षण होता. आता जयंती सुरू करायची आणि ती रुजवायची, तिला खतपाणी घालून ती वाढवायची असा मनाशी निश्चय केला. कामाला लागलो.

गुरूवर्य डॅा. य. दि. फडकेसर, डॅा. बाबा आढाव, डॅा. भा. ल. भोळेसर, प्रा.गो.पु. देशपांडे या सार्‍यांशी त्याबाबत बोललो. खात्री करून झाल्यावर त्यांची मान्यता, पाठींबा मिळवला आणि मगच तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांना मी पत्र लिहिलं. सातत्यानं त्याचा पाठपुरावा करावा लागला. शासकीय खातरजमा करण्यात बराच वेळ गेला.

महात्मा फुले यांच्या या जन्मतारखेबाबत मी म. टा., तरूण भारत आणि इतर अनेक वर्तमानपत्रांमध्ये
डझनावरी लेख लिहिले. व्याख्याने व भाषणांमधून या जन्मतारखेबद्दल बोलत राहिलो. एकच ध्यास फुले जयंती रूजली पाहिजे.

या जन्मतारखेबाबत शासकीय समितीच्या मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेतली. शासकीय मान्यता मिळवली.

मग तातडीनं सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात ही जन्मतारीख नोंदवली. मुख्य म्हणजे विधानभवनातील महात्मा फुले पुतळ्याखाली ही नोंद करून घेतली. फुल्यांच्या राज्यभरातील सर्वच पुतळ्यांखाली फुल्यांची ही जन्मतारीख लिहिली जाईल यासाठी प्रयत्न केले.

महात्मा फुले यांची शासनस्तरावर तोपर्यंत मान्यता पावलेली रंगीत तैलचित्रं चुकीची होती. भडक होती.
गोपीनाथराव पालकर, डॅा. बाबा आढाव आणि विजय व सरोजा परूळकर यांच्या सहकार्यानं महात्मा फुले यांचा १८८४ चा फोटो मिळवण्यात आला. हा फोटो १९२७ पासून लोकांना माहित होता पण त्यात चित्रकाराच्या चुकीनं फुल्यांना दाढी चिकटवण्यात आलेली होती. पालकरांकडील काचेच्या अस्सल निगेटिव्हवरून त्यांचा अस्सल कृष्णधवल फोटो उत्तमप्रकारे विकसित करण्यात आम्हाला यश आलं. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं. विशेषत: प्रा. गजानन शेपाळ आणि शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे व्यवस्थापक सय्यदसाहेब यांचा नामोल्लेख करायला हवा. त्या फोटोला शासनाची मान्यत मिळवण्याच्या कामी श्री छगन भुजबळ यांचे सहाय्य झाले. २८ नोव्हेंबर १९९३ ला शासनातर्फे या अस्सल कृष्णधवल छायाचित्राचे प्रकाशन करून त्यावर ही तारीख नोंदवली.

सदर फोटो हजारोपट मोठा करून आम्ही महात्मा फुलेवाड्यात बसवला. त्याच्या आधारे दर्जेदार तैलचित्रे बनवून घेऊन ती फुलेवाडा व नायगावला सावित्रीबाईंच्या स्मारकात लावली.

सातत्याने गेली ३० वर्षे चिकाटीनं पाठपुरावा आणि धडपड, प्रयत्न केल्यानंतर आता कुठं महात्मा फुले जयंती बर्‍याच ठिकाणी साजरी होऊ लागलेली आहे. ती गावपातळीवर रूजायला हवी.           

यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे आपल्याला सर्वांना ती घरातच साजरी करायची आहे. १८९७ च्या प्लेगच्या साथीत रूग्णांना औषधोपचार करताना सावित्रीबाई शहीद झाल्या होत्या. त्या साथीतील शासकीय उपचार कार्याचे छायाचित्र फे.बु. वर अलिकडॆच उपलब्ध झालेले असून ते सोबत जोडलेले आहे.

फुले जयंती धांगडधिंगा, नाचगाणी, फ्लेक्स, डि.जे., उन्मादी जल्लोश, नाचतमाशे असल्या ओंगळवाण्या पद्धतीनं होऊ नये. ज्ञानार्जन, शैक्षणिक उपक्रम, प्रबोधन, संवाद, जनजागरण, साहित्य, कला यांच्या माध्यमातून ही जयंती जनसामान्यांसाठी एक राष्ट्रीय सणउत्सव म्हणून संस्मरणीय व्हायला हवी अशी तीव्र इच्छा आहे. ११ एप्रिल महात्मा फुले जयंती व १४ एप्रिल डॉ. बाबासाहेबांची जयंती संयुक्तरित्या रूजवण्याच्या कामी माझे सन्मित्र डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यामाध्यमातून आम्ही प्रयत्न केले. ते यवतमाळचे जिल्हाधिकारी असताना समतापर्व म्हणून ११ ते १४ एप्रिल आम्ही साजरा करू लागलो. हे समतापर्वही आता तिकडे रूजले आहे.

एकुण काय? बहुजन समाजात एखादं चांगलं काम रुजायलाही खुप काळ लोटावा लागतो. खुप पाठपुरावा करावा लागतो. न थकता चिकाटीनं, चिवटपणानं ते करावं लागतं. पण होतं.

आज आपण पाहतोय की प्रतिगामी शक्ती नानाविध अंधश्रद्धा, रूढी, व्रतवैकल्यं, जयंत्या, पुण्यतिथ्या, पुजा, यात्रा, यज्ञ यांच्याद्वारे बहुजन समाजाला गुंगीचं औषद देत आहेत. बलुतेदार - अलुतेदारांना वापरून घेत अहेत. वापरून नंतर फेकूनही देत आहेत. त्यांना माहित आहे की त्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी ही उपक्रमशीलता अत्यावश्यक आहे. त्यासाठी ते प्रचार, प्रसार, इव्हेंट, पीआर २४ बाय ३६५ राबवत असतात. त्या छावणीत वर्णवर्चस्वावर आधारित उतरंड असते. आदेशावर चालणारे नंदीबैल असतात. स्वकीय, स्वजात, स्वधर्म आणि वरिष्ठ यांच्यासाठी सर्वप्रकारचा त्याग करायची सराईत मानसिकता त्यांनी घटऊन, बिंबवून घेतलेली असते. शेतकरी बैलांचा आंड ठेचतात तशी यांची विवेकबुद्धी ठेचलेली असते. स्त्रिया, अल्पसंख्याक आणि मागास जनसमुह यांच्याप्रती नफरत, देव, धर्म, देश आणि आपदधर्माच्या नावावर सर्व प्रकारचे गुन्हे करायची तयारी, धादांत खोटे बोलण्याचे प्रशिक्षण आणि कावेबाजपणा यांच्या जोरावर हे विषाणू फोफावत असतात. नासक्या आंब्यातले रेशीमकिडे सर्व मोक्याच्या जागा अडऊन बसलेले असल्याने त्यांची बाजू असत्याची, अन्यायाची, कालबाह्य असूनही त्यांचीच सरशी होताना दिसते आहे.

आमच्या पुरोगामी छावणीत बुद्धीमान नेते आहेत. तळमळीचे कार्यकर्ते आहेत. या बाजूला विचार आहे, सत्य आहे, अनुकूल काळही आहे. पुर्वजांचा अतुलनीय त्याग आहे. एव्हढं सारं असूनही पुरोगामी शक्तींची पिछेहाट का होतेय? आम्ही कळकळ, चिवटपणा, सातत्य यात कमी पडतोय का?

माझ्या एका दिवंगत मित्रानं कठोर, कटू आणि अप्रिय वाटेल असं भाष्य पुरोगामी चळवळीवर केलं होतं. तो म्हणतो, " या समतावादी छावणीतील नेत्यांचे इगो आणि त्यांची तत्वनिष्ठा भीषण टोकदार असल्यानं प्रत्येकाला स्वत: सॊडून बाकी सारे तत्वभ्रष्ट वाटतात. उगवलं तर माझ्याच कोंबड्यानं उगवावं, सारं श्रेय मला एकट्याला मिळावं. तसं होणार नसेल तर मग अंधारच राहिलेला बरा. स्वकीय छावणीतील एकमेकांविषयीचा अविश्वास, स्वजनांवरच आगपाखड करणारी मनोवृत्ती, एकीऎवजी फुटीकडेच जास्त कल, लढण्याच्या कोरड्या वल्गना, फक्त गमजा, आणि भाबड्या चर्चा यांनी प्रागतिक छावणी बरबटलेली आहे. या चळवळीतही "डिकास्ट !"  झालेली जातीची उतरंड आहे. उच्च जातीतले बुद्धीवादी, नेते इतके आढ्यताखोर असतात की त्यांना वाटते मी खालच्यांना दाद दिली, त्यांच्या कामाची दखल घेतली तर ते शेफारतील, वाया जातील. त्यामुळे मी त्यांच्यावर सतत हल्लेच करायला हवेत, त्यांना मी नाक मुरडतच राहाणं गरजेचं आहे. ते इतके आत्मकेंद्रीत असतात की फेसबुकवरसुद्धा ते खालच्यांची दखल घेणं हराम मानतात.( यालाही अपवाद आहेत, असतात..)" मला ही टिका अतिशयोक्त वाटते. काही प्रमाणात अन्यायकारकही वाटते.   पण ती तथ्यहीन नक्कीच नाही. आम्ही आत्मपरीक्षण करायलं हवं.

आमजनता पोकळीत जगू शकत नाही. तिला भरीव असे समतावादी पर्याय द्यावे लागतात. शिव-फुले-शाहू-आंबेडकर जयंत्या, स्मृतीदिन हे प्रागतिक उपक्रम आहेत. दुर्दैवाने काही मोजक्यांचा अपवाद वगळता आम्हा पुरोगाम्यांकडॆ आहे अतोनात निष्क्रियता. त्यामुळेच आम्ही उपदेशाचे डोस पाजतो, टिकेच्या पिचकार्‍या उडवतो आणि आत्मनाशाची ओढ असल्यानं दिवसेंदिवस निष्प्रभ होत जातो.

-प्रा. हरी नरके, १० एप्रिल २०२०
............................................
संदर्भ सुची :
*** महात्मा जोतीराव फुले यांचे १८८४ सालच्या अस्सल निगेटिव्हवरून विकसित केलेले कृष्णधवल छायाचित्र
१. महाधट नारायण बाबाजी पानसरे पाटील, महात्मा फुले यांचे अमर जीवन,१८९१, हे पुस्तक आम्ही, संपादक-प्रा हरी नरके, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३, २०१९ यात समाविष्ट करून अभ्यासकांना उपलब्ध करून दिलेले आहे.
२. संपादक- प्रा हरी नरके, महात्मा फुले - समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३
३. संपादक- प्रा हरी नरके, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८
४. संपा. प्रा. हरी नरके-प्रा. य. दि. फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३,२००६,
५. संपादक-प्रा हरी नरके, महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००६, २०१९
६. पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७

Wednesday, January 29, 2020

निमित्त- मूकनायक शताब्दी, कुठे आहे फुले - आंबेडकरी पत्रकारिता ?






निमित्त- मूकनायक शताब्दी, कुठे आहे फुले - आंबेडकरी पत्रकारिता ? - प्रा.हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षापुर्वी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले. लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागरण आणि जातीनिर्मुलन ही उद्दिष्टे गाठण्यात त्याला फार मोठे यश आले. त्याकाळात मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्र म्हणजे केसरी. तो सनातन्यांच्या हातात होता. मूकनायकाची जाहीरातसुद्धा छापायला केसरीने नकार दिला होता. पहिल्या अंकात  बाबासाहेब लिहितात,
"हिंदू धर्म तीन गटात विभागला गेलेला आहे.
१. ब्राह्मण,
२. ब्राह्मणेतर,
३. बहिष्कृत

ब्राहमण व इतर उच्चवर्णिय हे जातीव्यवस्थेचे लाभार्थी असल्याने जात टिकावी यासाठी ते झटतात.
सत्ता व ज्ञान नसल्याने ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नती खुंटली. मात्र ते कारागिर वा शेतकरी असल्याने चरितार्थ चालवू शकले.

दुर्बलता, दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात अफाट बहिष्कृत समाज नागवला गेला. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास,तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्‍या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भुमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातींच्या हितांची त्यांना परवा नसते.इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.

दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. मात्र बहिष्कृतांच्या प्रश्नांना पुरेशी जागा मिळत नाही.
तेव्हा बहिष्कृतांच्या प्रश्नाला वाहिलेले स्वतंत्र पत्र हवे म्हणून मूकनायकचा जन्म आहे. यापुर्वी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक, बहिष्कृत भारत निघाली आणि बंदही पडली. तेव्हा स्वजनोद्धारासाठी मूकनायक जगायला हवा.

बाबासाहेबांनी वर उल्लेख केलेले एकही वर्तमानपत्र आज चालू नाही.

केसरी निघतो,पण तो कोणीही वाचत नाहीत...एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेले हे वर्तमानपत्र आज लोकप्रियता आणि खप याबाबतीत पहिल्या हजारातही नाही. काळ सगळ्यांची मस्ती  उतरवतो.

आज खपाच्या व प्रभावाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पहिली १० वर्तमानपत्रे बघितली तर त्यातल्या ४० टक्क्यांचे मालक जैन मारवाडी आहेत, ४० टक्क्यांचे मालक मराठा आहेत आणि २० टक्क्यांचे मालक इतर उच्चवर्णिय आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.

अनु. जाती/जमाती/ओबीसीचे यात एकही नाही. पहिल्या २०० तही यातल्या कोणाचा नंबर लागत नाही. काही सटरफटर, लंगोटी पत्रे स्वत:ला नायक, राजा, सम्राट, बादशहा म्हणवतात,पण ते म्हणजे पोतराजा किंवा वासुदेवातले राजे, सम्राट असतात..

समाज माध्यमं सर्वांना खुली असली तरी अनु. जाती/जमाती/ओबीसीचे बहुसंख्य लोक त्यांचा वापर वाढदिवस, सणसमारंभ आणि धार्मिक कार्ये असल्या भुरट्या गोष्टींसाठी करताना दिसतात.

लिंगभाव, जात, वर्गीय विषमता, धार्मिक भेदभाव आणि असहिष्णूता यांच्यावर अचूक मारा करणारे मुद्रीत वा इलेक्ट्रॉनिक माध्यम आज बलुतेदार, अलुतेदार, ओबीसी वा बहिष्कृतांकडे नाही, शिक्षण,  ज्ञाननिर्मिती,  जातीनिर्मुलन, स्त्रीपुरूष समता, संवादातून विद्रोह आणि चिकित्सेकडे, संसाधनांचे फेरवाटप, या फुले- आंबेडकरी मुल्यांना वाहिलेले एकही वर्तमानपत्र आज दिसत नाही.

जात टिकवण्यासाठी सत्ताधारी जाती, करोडपती आणि निवडणुका जिंकणारे अभिजन जिवापाड झटताहेत. विषमतेचे बळी मात्र घोर निद्रेत आहेत.

१०० वर्षांने ही स्थिती आहे. आणखी १०० वर्षांनी काय असेल?

मूकनायक स्थापना ३१ जानेवारी १९२०, वार्षिक वर्गणी अडीच रूपये, संपादक- पी.एन.भटकर व ज्ञानदेव घोलप, प्रकाशक- डॉ. भीमराव आंबेडकर

-प्रा.हरी नरके, २९ जानेवारी २०२०

Friday, December 7, 2018

संतती नियमनाच्या लोक चळवळीचे पहिले प्रवर्तक




देशाच्या खांद्यावर लोकसंख्येचे अवजड ओझे - एकाच अपत्यावर थांबा असे डॉ. बाबासाहेबांनी 1938 मध्येच सांगितले होते.
आज रोजी भारताची लोकसंख्या 135 कोटी 42 लक्ष 94 हजार 272 आहे. जगातली अवघी 2 टक्के भुमी असलेल्या भारतात जगातली 18 टक्के लोकसंख्या राहते. हे असेच चालू राहिले तर हा देश नजिकच्या भविष्यात कोलमडून पडेल. 1930 च्या दशकात लोकसंख्येच्या विस्फोटाचा हा धोका ओळखून संतती नियमनाची लोक चळवळ देशात सर्वप्रथम उभी करणारे पहिले नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.
1937 सालच्या ब्रिटीश भारतातील "स्वतंत्र मजूर पक्षाच्या" निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेबांनी संतती नियमनाच्या कायद्याचे अभिवचन दिले होते.
ते त्यांनी 10 नोव्हेंबर 1938 रोजी पुर्ण केले. त्यांच्या पक्षाच्या वतीने मुंबई विधीमंडळाच्या अधिवेशनात संतती नियमन विधेयक सादर करण्यात आले.
[ पाहा- मुंबई विधीमंडळ चर्चा, खंड, 4, भाग 3, पृ.4024 ते 38 ]
स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार पी.जे.रोहम यांनी सादर केलेले हे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी तयार करून दिलेले होते. रोहम यांनी केलेले भाषण मराठीत होते.
जन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा आहे.
पुरस्कार आणि शिक्षा पद्धतीद्वारे कुटूंब नियोजन मोहीम चालवा,
सरकारतर्फे सर्व विवाहीतांना कुटुंब नियोजनाची साधने मोफत पुरवा,
शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन द्या,
मुलं किती असावीत आणि कधी होऊ द्यावीत याचा निर्णय पत्नीला घेऊ द्या,
स्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्याची हमी द्या,
प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे असताना, याच वेगाने लोकसंख्या वाढली तर भारत संकटात सापडेल.
गुणवत्तापुर्ण शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, निवारा, घरं, रोजगार आणि आनंदी जीवनमान प्रत्येक मुलामुलीला मिळणं हा त्यांचा हक्क आहे.
भारतात जास्त मुलं जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा ठरवला पाहिजे,
हे बाबासाहेबांचे द्रष्टे विचार आजही कालसुसंगत नी मार्गदर्शक आहेत.
प्रगत देशातील दरडोई Consumption आणि भारतातली अपुरी उपलब्धता सांगताना डॉ. बाबासाहेब, दूध, मटण, फळं, साखर, गहू, भाजीपाला, यांची सरळ आकडेवारीच देतात.
दुर्दैवाने त्यावेळच्या हिंदू महासभा, मुस्लीम लिग, काँग्रेस, अगदी कम्युनिष्ट या सार्‍यांनीच या बिलाला विरोध केला.
परिणामी ते फेटाळले गेले.
80 वर्षांपुर्वी या बिलाचे स्वागत करणारे फक्त दोघेच द्रष्टे लोक भारतात होते.
समाजस्वास्थकार प्रा.र.धो.कर्वे आणि जे.आर.डी. टाटा. कर्व्यांनी समाजस्वास्थमधून या विषयावर जागृती चालवली होती. त्यांच्यावर सनातन्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले तेव्हा त्यांचे वकीलपत्र घेऊन बॅरिस्टर बाबासाहेब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.
कुंटुंब नियोजन बिल फेटाळले गेले तरी 10 डिसेंबरला [1938] डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत युवक परिषद घेऊन एकाच अपत्यावर थांबा असा सल्ला युवकांना दिला.
1952 सालच्या निवडणुकीतही आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी कुटूंब नियोजनाचे वचन दिलेले होते.
डॉ.बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र
शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.
1. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी अशी शेतं एकत्र करून शेतकर्‍याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.
2. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्‍या बोजाची. शेतीवर ज्याकाळात 80 टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले 60 टके लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.
3. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.
4. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.
5. शेतीला 24 तास आणि 365 दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.
6. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.
असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी 100 वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब 100 वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते.
त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्‍यांचे मोर्चे काढले.
त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली. शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले.
देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.
आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो.
डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.
- प्रा.हरी नरके
युवा किसान, गुरूवार दि. ६ डिसेंबर २०१८

Wednesday, March 15, 2017

पुतळावती

सतत भडकलेली आणि मग्रूर देहबोली!
मला व्यक्ती अभिप्रेत नसून या वृत्तीविरूद्ध माझी तक्रार आहे.
सतत मग्रूर आणि भांडकुदळपणाचे भाव चेहर्‍यावर असलेले नेते मला अजिबात आवडत नाहीत. असले सगळेच नेते डोक्यात जातात. लोकशाहीला ही वृत्ती अतिशय घातक. हिटलर ज्या पिठाच्या गिरणीतले पीठ खायचा तिथलेच पीठ ही मंडळी खात असणार. यांना मार्दव, कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा नावालाही माहित नसतो. जणु हे जुने क्रूर संस्थानिकच.
ही टिका त्यांच्या अनुयायी/भक्त /चाहत्यांना आवडणार नाही पण भारतीय संविधानाने मला दिलेल्या अधिकाराचा ती अविभाज्य अंग आहे. ही टिका व्यक्तीगत नसून विभुतीपुजा आणि हुकुमशाहीवृत्ती याविरूद्ध आहे.
आज परम आदरणीय महिला नेत्या असलेल्या एका भगिनींवर लिहायचे ठरवलेय. क्रमश: इतरांवरही लिहिणारच आहे. खरंतर एका महाप्रदेशावर यांनी अनेकवार सत्ता गाजवलीय. गरिबांच्या मसिहा म्हणुन लोक त्यांना डोक्यावर घेतात. ही कर्तबगारी त्यांची एकटीची नसून ती त्यांना वारशात मिळालीय. त्यासाठी लाखो कार्यकर्त्यांचे श्रम आहेत, अपार मेहनत आणि त्याग आहे. पण बाईंनी सिंहासनावर बसल्याबसल्या एकेका त्यागी आणि समर्पित असलेल्यांची हाकालपट्टी करून पक्ष ही खाजगी मालमत्ता बनवला.
या नेत्यांचे गुगलवर हजारो फोटो आहेत. ते बघताना हे जाणवते की त्यांची देहबोली कमालीची मग्रूर, मिजासखोर आणि सरंजामी मानसिकता दर्शवणारी आहे. त्यांच्या फोटोंमध्ये 1 टक्क्यांपेक्षाही कमीच फोटो प्रसन्न किंवा हसतमुख आहेत. बाकी सारेच समोरच्याला खाऊ की गिळू असले.
ह्या उत्तर भारतीय महिला नेत्यांचे नाव आपुलकीसुचक पण चेहर्‍यावर आपलेपणा नावापुरताही नाही. सतत भांडकुदळपणाचा भाव. आवाज कर्कश्श. सदैव भडकलेल्या पोझमध्ये.
सपाटून पराभव झाल्यानंतर सुद्धा जनतेने आपल्याला का नाकारले याचे आत्मपरिक्षण करायची काडीमात्र इच्छा नाही. या बाईंनी आयुष्यात कधी एखादे पुस्तक म्हणून हातात धरले असेल असे वाटत नाही. आजही या बाई दुसर्‍यांनी लिहून दिलेली भाषणे जाहीर सभांमधून कृत्रिमपणे वाचीत असतात. त्यात सामान्य माणसाविषयीचा कळवळा, आपुलकी, मार्दव यांचा लवलेशही नसतो.
त्यांना स्वत:चे पुतळे उभारण्याचा आणि राजमहाल / हवेल्या बांधण्याचा इतका हव्यास की सारा देश त्यांना पुतळावती म्हणूनच ओळखतो.
ही मिजास, मग्रूरी आणि एकारलेली वृत्ती कोणामध्येही असली तरी ती चुकच.
कायम तारणहार पोझ. त्यांच्यापेक्षा सर्वच बाबतीत सवाई मार्केटींगवाला निवडणुकीच्या रणमैदानात भेटल्यावर पराभव तर होणारच ना?
मागे त्यांच्या अतिशय जवळच्या एका विचारवंत नेत्याला मी महात्मा फुले, बाबासाहेब व सावित्रीबाईंबद्दल काही नवी माहिती दिली व ती संधी मिळाल्यास हायकमांडपर्यंत पोचवा असे सांगितले. ते पटकन म्हणाले, सर आमच्या नेत्यांपुढे आम्ही सारेच माना खाली घालून उभे असतो, त्या सिंहासनावर बसलेल्या असतात आणि त्यांनी जेव्हढे विचारलेय तेव्हढीच माहिती आम्ही त्यांना देतो. त्यांनी न विचारलेले काहीही बोलायची, अगदी एक शब्दसुद्धा बोलायची आम्हाला परवानगी नसते.
ही जर त्यांच्या निकटवर्तीय राष्ट्रीय नेत्याची स्थिती असेल तर मग सामान्य कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल?
मला हे माहित आहे की ही खरमरीत टिका त्यांच्या अनुयायी/ भक्त / चाहत्यांना आवडणार नाही. मला भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच मी हे लिहू शकतो. ही टिका व्यक्तीगत न घेता विभुतीपुजा आणि हुकुमशाहीवृत्ती याविरूद्धची टिका म्हणुन तिच्याकडे बघावे..

Tuesday, January 12, 2016

ते फुल्यांचे वारस नव्हेत!....







1. स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता.त्याला त्यांनी डाक्टर केले.पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते. हे लोक डा.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत. . जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून "महात्मा फुले :समग्र वाड्मयात" प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे वैचारिक वारसदार डा. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू, कर्मवीर भाऊराव आणि ना.म.लोखंडे, केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार,य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत.

त्यांनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे पण ते फुल्यांचे वारसदार म्हणुन प्रमाणपत्रांचे वाटप करू शकत नाहीत एव्हढेच.

Saturday, June 6, 2015

आत्मपरिक्षण की वितंडवाद? ... निवड आपली आहे


"भारतात प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे"... डा. बाबासाहेब आंबेडकर

भारत सरकारच्या मानववंशशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या "भारताचे लोक" या पाहणीनुसार भारतात आज रोजी एकुण ४६३५ जाती आहेत.

"जातीव्यवस्था आता कालबाह्य झालेली आहे." "जातपंचायती आणि जाती संघटना यांना थारा द्यायला नको."
"दुसर्‍या जातींचा द्वेष नको पण आपल्या जातीचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे?"
"दुबळ्या जातीतील विखुरलेल्या लोकांना संघटीत करण्यासाठी जातीसंघटनेचा आधार घ्यावा लागतो. पण प्रगत आणि प्रभावशाली जातींनी मात्र जातीच्या संघटना बनवणं चूक आहे." "आरक्षण जातीच्या आधारावर असल्याने जातीपातींना खतपाणी मिळते."
अशी काही मतं आजूबाजूला ऎकायला मिळत असतात.
त्यात कितपत तथ्य असतं?

जातीव्यवस्थेबद्दल आजवर रग्गड लिहिलं गेलय. फुले, भांडारकर, इंथोवेन, रसेल, हिरालाल, आत्रे, कालेलकर, केतकर, इरावतीबाई, घुर्ये, बाबासाहेब, श्रीनिवासन, शरद पाटील, संजय सोनवणी आदींची मांडणी महत्वपूर्ण आणि दिशादर्शक राहिलेली आहे. जातीअंतर्गत लग्न करून जाती जोपासल्या गेल्या. सांभाळल्या गेल्या. एका स्कूलच्या मते भारतात आधी वर्ण होते,सुरुवातीला दोनच वर्ण होते. नंतर तिसरा आणि पुढे चौथा वर्ण निर्माण झाला. त्यातून काळाच्या ओघात जाती बनत गेल्या. चौथ्या शतकात अस्पृश्यता निर्माण केली गेली. जाती कठोर आणि निर्दयी बनत गेल्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णाचे पुरूष हे जातीव्यवस्थेचे तीन लाभार्थी होते. तर सर्व स्त्रिया आणि शूद्र {अतिशूद्र, दलित व आदिवासी } हे जातीव्यवस्थेचे शोषित व बळी होते. राजदंडाच्या आधारे त्र्यवर्णिकांनी जुलुम केले, शोषण केले.श्रेणीबद्ध विषमता निर्माण केली गेली. तिला धर्माचा आणि सत्तेचा मुलामा दिला. हे कामाचे वाटप न राहता ते काम करणारांचे जन्मावर आधारित वाटप होते. तिने गुणवत्ता आणि समता यांची हत्या केली. कामाची, कौशल्याची आणि ज्ञानाची ताटातूट केली. भारताला दरिद्री आणि करंटे बनवले. 

मात्र दुसर्‍या स्कूलच्या मते आधी जाती नव्हत्या. वर्णही नव्हते. कामांचे कौशल्यावर आधारित खुले गट होते. ते ११-१२ व्या शतकाच्या काळात परकिय आक्रमणे, अर्थव्यवस्थेवरील अरिष्ठे, दुष्काळ,वाढती स्पर्धा आदी कारणांनी हे कामांचे गट बंदिस्त बनले. जन्मावर आधारित बनले. जातीतल्या जातीत लग्ने करून जात मजबूत केली गेली.
बंदीस्त वर्ग म्हणजे जात असं बाबासाहेब म्हणायचे. स्वातंत्र्यानंतर मात्र प्रत्येक जातीत नवे वर्ग तयार झाले आणि निवडणूक तंत्रात संख्येला महत्व आल्याने जातीच्या मतब्यांका महत्वाच्या ठरल्या. महाराष्ट्रात राजकीय सत्तेच्या नाड्या ज्यांच्या हातात गेली ५५ वर्षे एकवटलेल्या आहेत त्या स्वत:ला नैसर्गिक सत्ताधिश समजणार्‍या जाणत्या नेत्यांनी तोंडाने अहोरात्र फुले-शाहू-आंबेडकर यांचे जप करायचे, नावे घ्यायची पण त्याचवेळी आपापल्या जातीसंघटना पोसायच्या, सगळ्याच जातपंचायती जपायच्या, सर्वच जातीच्या नेत्यांना रसद पुरवायची आणि दुसर्‍यांच्या [ दलित ओबीसी भटक्यांच्या ] खांद्यांवर बंदूक ठेऊन तिसर्‍याला त्यांचा शत्रू घोषित करून ठोकायचा, त्यात राज्यकर्त्यांचे स्वत:चे अपयश चतुराईने दडवायचे, स्वत: धनदांडगे व्हायचे, पैशाच्या जोरावर आश्रित पाळायचे, पोसायचे, त्यांना आपसात भिडवायचे असा उत्तम कार्यक्रम मुत्सद्दीपणे राबवला.

स्त्रीपुरूष समता, सर्वांना शिक्षण, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह आणि धर्मचिकित्सा हा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा मूळ अजेंडा होता. फुल्यांचा विरोध प्रस्थापित नेतृत्वाला होता. त्यावेळी धर्मसत्ता, प्रशासन, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, सगळीकडेच प्रामुख्याने ब्रिटीशांच्या छत्राखाली ब्राह्मण पुरूषांचा वावर होता. त्यामुळे फुल्यांची ब्राह्मणवादावरची टिका ब्राह्मणांवरची टिका असल्याचे भासवून सत्यशोधक चळवळीचे अलगद अपहरण करून तिचे रूपांतर "ब्राह्मणेतर" चळवळीत करण्यात आले. ती सत्ताशोधक चळवळ बनवली गेली. सत्यशोधक चळवळीत सगळेच होते. ब्राह्मणही होते नी ब्राह्मणेतरही होते. सत्यशोधन हा मुख्य कार्यक्रम होता. "ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी " हा फुल्यांचा नारा होता. ब्राह्मणेतर चळवळीने आपला एकमेव शत्रू ब्राह्मणांना ठरवले.या चळवळीत असण्यासाठी सत्यशोधक असण्याची गरज नव्हती. त्यामुळे त्यात सत्यशोधक होतेच असे नाही. या चळवळीने वि.रा.शिंदे, सयाजीराव गायकवाड, राजारामशास्त्री भागवत यांना खड्यासारखे वगळले. तोंडाने फुल्यांच्या जप करीत आचरणात मात्र एकजातीय सत्ता, दाखवायला तेव्हढे दुय्यमतिय्यम पदांवर बलुतेदार असे राजकारण केले गेले.

आज सगळ्याच जातींना आरक्षण हवेय.बहुधा मागासपणाचे डोहाळे लागलेत.

आम्ही चिकित्सा करू. पण चिकित्सेचा अर्थ दुसर्‍यांवर टिका करू असा घेतला गेला. " डीकास्ट " होणे ही जातीनिर्मुलनाची पुर्वशर्त असते. आपल्या जातीवर टिका करायला कोणालाच आवडत नाही. दुसर्‍यांच्या जातींच्या नावाने पावत्या फाडणे फारच सोपे असते.

बाबासाहेबांनी १९२७ च्या महाड सत्याग्रहाच्या वेळी "तुम्ही चळवळीत ब्राह्मण घेऊ नका" ही जेधे जवळकरांची मागणी धुडकाऊन लावली आणि "माझा विरोध ब्राह्मण्याला आहे. वृत्तीला आहे. ब्राह्मण व्यक्तींना नाही. ब्राह्मण्यवृत्ती सगळ्याच जातींमध्ये असते. ती ब्राह्मणेतरातही असते. त्यामुळे ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण मला हवेत मात्र ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणॆतर मला नकोत" असे बाबासाहेबांनी सांगितले. त्याला आज ८८ वर्षे झालीत. 

त्यांनी एका ब्राह्मण डाक्टर महिलेबरोबर विवाह केला त्याला आज ७० वर्षे झालीत.

फुल्यांनी ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला. त्याला अधिकार मिळावेत यासाठी मृत्यूपत्र केले. ते सरकारदरबारी नोंदवले. त्यावर मित्रवर्य भांडारकरांची साक्षीदार म्हणून सही घेतली. शुद्रातिशूद्रांना दासानुदास मानणार्‍या आर्यभट-ब्राह्मणांची सावली माझ्या शवावर पडू देऊ नका असे त्यात नमूद केले. पण यातले शुद्रातिशूद्रांना दासानुदास मानणार्‍या हे अर्थनिर्णायक शब्द वगळून सर्वच ब्राह्मणांची सावली नको असे सांगण्याची, भडक प्रचार करण्याची पद्धत पाडण्यात आली.

या असत्यकथनामागचे राजकारण आम्हाला कळणार की नाही हा खरा सवाल आहे. आम्ही आत्मटिका करणार की फक्त वितंडवाद घालणार? हेत्वारोप करणे फारच सोपे असते.

आम्हाला आजवर वापरूण घेणारेच आमचे मित्र आहेत आणि शिळ्या कढीला उत आणून ते आम्हाला जातीय गुंगीत ठेवीत आहेत हे आमच्यावरचे उपकार आहेत असे ज्यांना वाटते त्यांचे जाऊद्या.

बदलते राजकारण, जातकारण, अर्थकारण यांचा अर्थ आम्हाला समजावून सांगणार्‍या विचारवंतावर चिडायचे नी आत्मघात करून घ्यायचा की आत्मपरिक्षण करायचे निवड आपली आहे.

Wednesday, December 25, 2013

आज २५ डिसेंबर:




आज २५ डिसेंबर:
१८७३ साली: जोतीराव सावित्रीबाईंनी या दिवशी पहिले सत्यशोधक लग्न लावले. त्यात त्यांनी हुंडा, डामडौल, अवाजवी खर्च, बालविवाह, भटजी यांना नकार दिला.वय,गुण,प्रेम व आवडीनिवडी बघून लग्न करावीत असा सल्ला दिला. स्त्रियांचे मानवी अधिकार स्थापन करण्यासाठी झटण्याची प्रतिज्ञा या लग्नात नवरा मुलगा जाहीरपणे करीत असे.
आज बहुजनांनी बडेजाव, अवाजवी खर्च, हुंडा आणि मानपानाद्वारे जोतीराव-सावित्रीबाईंचा सगळा पराभव करून टाकला आहे.तुम्हाला काय वाटते?
१९२७ साली: बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती जाळली. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सुरबा नाना टिपणीस, पोलादखान पठाण हे त्यांच्या सोबत होते. तेव्हा मनुस्मृती हे भारतीय संविधान होते. आज बाबासाहेब असते तर त्यांनी काय जाळले असते?
आजही मनुस्मृतीला आणि ब्राह्मणांना तोंडाने शिव्या देत पण ती डोक्यावर घेऊन स्वत:मध्ये उच्चनिचतावादीवृत्ती मुरवून कोण तिचे पालन करतायेत?अशाप्रकारे बहुजन आजही भारतीय संविधान पायदळी तुडवित असतील तर त्यांनी बाबासाहेबांचे नाव घ्यावे काय? तुम्हाला काय वाटते?

Sunday, December 8, 2013

फुले-आंबेडकर समकालीनच



पुढारी, रविवार, पुणे, दि.८ डिसेंबर, २०१३
Pudhari, Pune, 8 Dec.2013
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=416104&boxid=12442881&pgno=4&u_name=0