Showing posts with label महिलांचे अधिकार. Show all posts
Showing posts with label महिलांचे अधिकार. Show all posts

Friday, July 3, 2020

मुंबई, ठाणे, कल्याण व नाशिकमध्ये गरिब वस्त्यांमध्ये कार्यरत बौद्ध भगिनींचे इमेलद्वारे आलेले पत्र-










आचरणशील " आदर्श बौध्द " म्हणजे आमचे आदरणीय नरके सर !


जयभीम, नरके सर!
              चळवळीच्या अनुषंगाने आपली भाषणे ऐकण्याचा, ग्रंथसंपदा वाचण्याचा व काही प्रसंगी भेट घेण्याचाही योग आला. पुराव्यानिशी मांडलेले तुमचे तर्कशुद्ध युक्तीवाद व प्रत्यक्ष भेटीतील पारदर्शक वागणे या गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या. खरे तर तुमचे युक्तीवाद ऐकून आम्ही अनेकांना बदलवण्याचा प्रयत्न केला. त्यात कधी यश आले तर कधी अपयश, हा भाग वेगळा.

               बौद्ध समाजातील दारु पिऊन महिलांना मारहाण करणाऱ्या पुरूषांविषयी तुम्ही २६ जून २०२० च्या फेसबुक पोस्टमध्ये योग्य तेच म्हटले आहे. महिला म्हणून हे दु:ख आम्ही वर्षानुवर्षे सहन करीत आहोत. आमच्या या दु:खाची जाणीव स्वत:ला बौद्ध म्हणविणाऱ्या काही व्यक्तींना होऊ नये, याचे खूप वाईट वाटले. जे आपल्या समाजातील महिलांच्या दु:ख- वेदनांबाबत योग्य भूमिका घेऊ शकत नाहीत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही.

भले त्यांनी कितीही मोठ्याने गौतम बुद्ध, महात्मा फुले, डाॅ आंबेडकर यांच्या नावाचा गजर केला तरीही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. ज्यांना दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करावेसे वाटते त्यांना स्त्रियांना भिक्खूसंघाचे दार सताड उघडे करणाऱ्या गौतम बुद्धांचे, क्रांतीज्योती सावित्रीमाईंना घडविणाऱ्या महात्मा फुलेंचे व हिंदू कोड बिलासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या डाॅ आंबेडकरांचे अंत:करण कधीच समजू शकणार नाही.
       

नरके सर, दिलगिरी व्यक्त करुन आपण आमच्या दृष्टीने आणखी मोठे झाला आहात.                     
     

शेवटी एकच सांगावेसे वाटते. जगाला व हरी नरकेंनाही फसवणे सोपे आहे. परंतु स्वत:ला फसवणे कठीण व अयोग्यदेखील असते. ही जाणीव सर्वांना होवो, अशी मंगल कामना !

    १) रजनी कांबळे.
    २) अश्विनी मून.
    ३) शीला भगत.
    ४) शर्मिला होवाळ.
   ५) शालिनी वज्रचित्त.
    ६) राजश्री कांबळे.
    ७) निवेदिता बच्छर.

Wednesday, July 1, 2020

मी कृतज्ञ आहे--दिलगिरी

सप्रेम जयभीम. नमो बुद्धाय.
गेल्या ४० वर्षात आंबेडकरी बौद्ध चळवळीतील भावांनी व बहिनींनी मला अमाप प्रेम, आपुलकी, मानसन्मान दिला. त्यांनीच मला मोठे केले.
या प्रबोधनाच्या चळवळीतून मला खूप काही शिकता आले. मी नामांतर आंदोलनात तुरूंगवास भोगला होता याला आता ३८ वर्षे झाली. मी या माझ्या भावंडांचा तसेच वडीलधार्‍यांचा कृतज्ञ आहे.
माझ्या २६ जून २०२० च्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांवरील लेखातील दहाव्या मुद्द्यात मी व्यसनाधिनता, घरेलू महिला कामगारांच्या हिंसाचाराचे दु:ख आणि इतर मुद्दे उपस्थित केले होते.
मी ते सर्व मुद्दे मागे घेत असून माझ्या सर्व प्रिय बौद्ध बांधवांची दिलगिरी व्यक्त करीत आहे.
भवतु सब्ब मंगलम!
- प्रा. हरी नरके

Thursday, June 18, 2020

विवेकवादी गोपाळ गणेश आगरकरांचा १२५ वा स्मृतीदिन : प्रा. हरी नरके









वयाच्या अवघ्या ३९ व्या  वर्षी  अकाली वारलेल्या गोपाळराव आगरकरांना जाऊन काल १२५ वर्षे झाली.          (जन्म, टेंभू, सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : पुणे, १७ जून १८९५)  कोरोना आणि एकुणच मराठी समाजाचा आगरकरांबद्दलचा थंडपणा यामुळे त्यांचे स्मरण फारसे कोणाला झाले नाही. हेही आपल्या रितीला धरूनच झाले म्हणा! आगरकरांनी ज्या मध्यमवर्गीयांच्या सुधारणेसाठी आपली हयात घालवली त्यांनी आगरकरांचा विचार स्विकारला, त्यानुसार उच्चशिक्षण घेतले, आधुनिक राहणीमान, जीवनमान स्विकारले पण आगरकारांचं नाव मात्र टाकून दिलं. विचारसुद्धा सगळा नाही घेतला. सोयीचा तेव्हढा घेतला. त्यांचा ध्येयवाद, त्यांचे समर्पण नाही घेतले. त्यांचा सुधारणावाद, बुद्धीप्रामाण्यवाद नाही घेतला. त्यांच्या विवेकनिष्ठेऎवजी त्यांच्या विरोधकांचा धार्मिक उन्माद आणि तुच्छतावाद मात्र आवर्जून घेतला. विज्ञाननिष्ठा नाकारली आणि पुरोहितशाहीची  मानसिकता घेतली.

अशा आप्पलपोट्यांसाठी आगरकर हकनाकच गेले म्हणायचे. आगरकर विवेकवादी होते. ते गरिबीतून कष्टाने शिकले. उत्तम सरकारी नोकरी आणि छान कमाई झाली असती तर तिच्यावर पाणी सोडून मध्यमवर्गीयांच्या अंधश्रद्धा दुर व्हाव्यात, स्त्रियांनी आधुनिक केशभुषा, वेशभुशा स्विकारावी, भरपूर शिकावे, कर्तबगारी गाजवावी, बालविवाह करू नयेत, विधवांचे पुनर्विवाह सन्मानाने व्हावेत, विधवांचे केशवपन करू नये, सती जाण्याची गरज नाही हे विचार लेखनाद्वारे मांडीत राहिले.  त्यावरून टिळकांशी मतभेद झाल्यावर आपला स्वत:चा "सुधारक" हा पेपर काढून विचारकलहाला घाबरू नका, चर्चेमुळे, वादविवादामुळे समाज समृद्ध होतो, मराठी माणूस हा मुलत: कलहशील आहे. कळवंड करणारा, भांडकुदळ आहे, त्याला चेतवित राहिले. जागवित राहिले.

"सुधारक" या पेपरला ब्राह्मणवाद्यांचा किती विरोध असावा? पुढे फाशी गेलेल्या चाफेकर बंधूंनी सुधारकाच्या संपादकाला अंधारात गाठून मारहाण करण्यासाठी तरूण हवेत अशी जाहीरातच वर्तमानपत्रात दिलेली होती.

ते आधी केसरी, मराठाचे व नंतर सुधारकाचे संपादक असताना लोकशिक्षण, लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकरंजन हे सुत्र उराशी बाळगून लिहित राहिले. कोल्हापूरच्या शिवाजीराजांना ब्राह्मण दिवाण बर्वे त्रास देत होते. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी अग्रलेख लिहिले. बर्व्यांनी अब्रुनुकसानीचा खटला भरला. ब्रिटीश कोर्टाने दहा हजार रुपयांचा जामीन मागितला. त्याकाळचे (१८८०-८१) दहा हजार रुपये म्हणजे आजचे सुमारे दहा कोटी रुपये. अशा संकटाच्या घडीला त्यांनी रात्री अकरा वाजता तार केली. मदत मागितली. महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावले. सत्यशोधक समाजाचे खजिनदार रा. बा. उरवणे यांनी रोख दहा हजार रुपये मुंबईला कोर्टात पोचते केले. पुढे टिळक-आगरकरांना न्यायालयाने साडेतीन महिन्यांची शिक्षा सुनावली. ते सुटले तेव्हा जोतीरावांच्या सुचनेवरून सत्यशोधकांनी डोंगरीच्या तुरूंगाबाहेर जल्लोश केला. एका रथातून त्यांची मिरवणूक काढली. त्यांचा जंगी सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. हे सगळे खुद्द टिळकांनीच पुढे केसरीत लिहिलेय. तिथूनच मी हे उद्धृत करतोय. (पाहा: केसरी, ३ ऑक्टोबर १८८२)

जोतीरावांनी त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद असतानाही कायम त्यांना पाठींबा दिला, सहकार्य केले. विवेकवादी असूनही आगरकरांची वैचारिक भुमिका  ही होती की, "जे काही करणे ते मूळ आर्यत्व न सांडता करावे," याच्याउलट फुले आर्यत्वाचे कणखर विरोधक होते.

लोकहितवदी, न्या.रानडे, आगरकर, कर्वे ही भलीच माणसं होती. पण महापुरूषांनाही मर्यादा असतातच. काही काळाच्या, काही स्वत:च्या. आगरकरांनी ज्या कुटुंबसुधारणेचा ध्यास घेतला होता ती आता बर्‍यापैकी साध्य झालेली आहे. लोकहितवादी आयुष्यभर लोकहितार्थ झटले. पण त्यांची लोकांची कल्पना बघितली तर ती सर्वसमावेशक दिसत नाही. ती लोक म्हणजे अभिजन अशी मर्यादित दिसते, अशी टिका ख्यातनाम इतिहासकार अरविंद देशपांडे यांनी केलेली आहे. (पाहा: महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, १९९८, पृ. ५ ) न्या. रानडे प्रकांडपंडीत होते. सुधारक होते. पण व्यक्तीगत जीवनात सुधारणा करताना पाय मागे घेणारे होते असे त्यांचे चरित्रकार न.र.फाटक सांगतात. ( पहिली बायको वारल्यावर विधवेशी लग्न करण्याऎवजी ९ वर्षांच्या मुलीशी जिल्हा न्यायाधिश असलेल्या ३२ वर्षांच्या रानड्यांनी लग्न केले.) कर्व्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी काम केले पण फक्त ब्राह्मण विधवांसाठीच ते काम करीत राहिले.

या पार्श्वभुमीवर जोतीराव फुले यांची समाजक्रांतीची भुमिका या समकालिनांना पेलवली नाही. या विवेकी माणसाने जोतीराव वारले तेव्हा ती बातमीही दिली नाही. टिळकांनी दिली नाहीच पण आगरकरांनीही सुधारकात ती दिली नाही याबद्दल इतिहासकार य. दि. फडके यांनी खेद व्यक्त केलेला आहे. जोतीराव धर्मांतर करून कधीही ख्रिस्ती झाले नाहीत. त्यांनी "सत्यधर्मा"ची मांडणी केली. तरिही आगरकर त्यांना "रेव्हरंड जोतिबा" असे हिनवतात. आगरकरांचे भावविश्व शहरी होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात शेती, शेतकी, शेतकरीजगत यावर फारसे काही लिहिलेले आढळत नाही.


सामाजिक समता, स्त्री-पुरुषसमता आणि विज्ञान‌निष्ठा‌ ही आगरकरांची जीवनमुल्ये होती.  ते बाळ गंगाधर टिळकांचे समकालीन, आधी मित्र आणि नंतर कट्टर विरोधकही. ते केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टिळक व आगरकर एकत्र आले. दिनांक १ जानेवारी १८८० रोजी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाली. आगरकर १८८१ मध्ये एम.ए. झाल्यावर या शाळेत शिकवू लागले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. पुढे  टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

ते थोर प्रबोधनकार होते. भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मुल्यांवर आधारलेला मराठी समाज उभा राहावा यासाठी ते झुंजले. महाराष्ट्रसमाजाला समाजपरिवर्तन, विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देण्यासाठी ते बोलत-लिहित राहिले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळावी या कारणे त्यांनी देह झिजवला. आपल्या समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यावा, ग्रंथप्रामाण्य नष्ट व्हावे, बुद्धीला पटेल तेच स्वीकारले जावे, केवळ अंधानुकरण करीत रूढीवादी जीवन जगु नये असा प्रचार ते करीत राहिले. रुढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशी समाजधारणा बनावी हे त्यांचे स्वप्न होते. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत, आधुनिक पादत्राणे वापरली पाहिजेत, स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरीने काम करावे हे आज सहज स्विकारले गेलेले विचार ज्याकाळात समाज नाकारीत होता तेव्हा आगरकर भांडत होते. ज्यांच्यासाठी ते भांडत होते त्यातल्या ९९ टक्क्यांना मात्र याची आज जाणीवसुद्धा नाही. आठवणीचा मुद्दाच नाही.

आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा? या वादात ते आधी समाजसुधारणा या मताचे होते. त्यांचे सुधारक हे वर्तमानपत्र इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काहीकाळ ना. गो.कृ. गोखले यांनी सांभाळली होती.

बुद्धीला जे पटेल ते बोलणार व शक्य ते आचरणात आणणार हा त्यांचा बाणा होता. " विचारकलह" हा समाजस्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे ह्याचे ते पुरस्कर्ते होते. त्यावेळी सनातनी आजच्यासारखेच आक्रमक होते. संघटित होते. हिंसकही होते. ब्रिटीश राज्य असले तरी सामाजिक जीवनात अजूनही पेशवाईच होती. त्यामुळे पुण्यातल्या सनातन्यांनी सर्व सुधारकांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.

वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी आगरकर गेले.

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात १९३४ मध्ये आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

आज त्यांच्या नावे काही पुरस्कारही दिले जातात. साहित्य संस्कृती मंडळाने तीन खंडात आगरकर-वाङ्मय प्रकाशित केलेले आहे. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे) त्यातल्या निवडक लेखांचा संग्रह प्रा. ग.प्र. प्रधान यांनी संपादित केलेला असून त्याचे प्रकाशन साहित्य अकादमीतर्फे झालेले आहे. "शोध बाळगोपाळांचा" हे य.दि.फडके यांचे पुस्तक व विश्राम बेडेकरांचे "टिळक-आगरकर" हे नाटक प्रसिद्ध आहे. "डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस", हे आगरकरांचे स्वत:चे अनुभवकथन व त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत केलेले भाषांतर ’विकार विलसित’ वाचनीय आहे.

या विवेकपुरूषाला विनम्र आदरांजली.

- प्रा. हरी नरके, १८/६/२०२०



Sunday, May 3, 2020

रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू










रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू : मनू संतांच्या एक पाऊल पुढे, मनोहर भिड्यांनी संतांचा केला अपमान-प्रा.हरी नरके


महाराष्ट्राची जडणघडण करण्यामध्ये संतविचारांचा फार मोठा वाटा. न्या.रानडे ते प्रा.गंबा.सरदार यांनी संतसाहित्याची सामाजिक आणि राजकीय फलश्रुती समाजाऊन सांगितलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीची पुर्वतयारी संतांच्या प्रबोधनपर विचारांनी केली होती हे न्या.म. गो.रानडे यांनी " मराठा सत्तेचा उदय" या ग्रंथात सप्रमाण मांडलेले आहे. संघाचे चेले मनोहर भिडे उठताबसता शिवछत्रपतींचे नाव घेत असतात आणि तरीही ते संतांचा धडधडीत अपमान करतात. दोन वर्षांपुर्वी भिड्यांनी जेव्हा संतांचा अवमान करणारी मुक्ताफळं उधळली तेव्हाच मी भिड्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी देहू-आळंदीहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत पुण्यात तलवारधारी झुंडी घुसवल्या होत्या. वारकरी चळवळ ताब्यात घेण्याचा त्यांच हा डाव वारकर्‍यांनी उधळून लावला.

महाराष्ट्राला पहिल्यांदा शिवराय सांगितले फुल्यांनी .त्यांना तर भिडे देशद्रोही म्हणतात. १९०६ कुणबी मराठा कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी ६०० पृष्ठाचे मौलिक शिवचरित्र लिहिले त्याचा उल्लेखसुद्ध भिडे करीत नाहीत. भिड्यांना शिवरायांच्या नावाचा गैरवापर करून मराठा-बहुजन मुलांची टाळकी संमोहित करून पेशवाईच्या सावलीत न्यायची आहेत.

भिड्यांचे शिवराय रयतेचे राजे नाहीत, ते शेतकरी, कुणबी, मावळ्यांचे उद्धारकर्ते नाहीत तर ते गोब्राह्मण प्रतिपालक, रात्रंदिन परधर्मद्वेश शिकवणारे, युवकांची माथी भडकावणारे, आधुनिक काळातून पुन्हा विषमतावादी ब्राह्मणी, वैदीक राज्यात नेऊ पाहणारे भिडेवादी शिवराय आहेत. त्यावर सविस्तर लिहिणारच आहे. आज भिड्यांना पुजनीय असणार्‍या मनूची काही मतं बघूयात.

मनू म्हणतो,
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [ अध्याय ९ वा श्लोक १९]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9९/१५]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]
................................

"मनुस्मृती" हा संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्यात २६८४ श्लोक आहेत. हा ग्रंथ कधी लिहिला गेला यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मनू एक की अनेक यावरही वाद आहेत. मनू ही व्यक्ती होती की संस्था [मठ/परंपरा] याबद्दलही भिन्न मतं आहेत. इ.स.पुर्व १७५ ते इ.स.१७५ या साडेतीनशे वर्षात हा ग्रंथ विकसीत झाला असावा असे तज्ञ सांगतात. तशा हिंदूंना प्रमाण असलेल्या एकुण स्मृती १३७ असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदु कोड बिलाच्या चर्चेत संसदेत सांगतात. त्यात सर्वाधिक महत्वाच्या म्हणून मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृती या मानल्या जातात. मनुस्मृती ही शेकडो वर्षे भारतीय समाजाची जणू राज्यघटनाच होती. अगदी ब्रिटीश भारतातसुद्धा इंग्रज न्यायालये कौटुंबिक कलहांमध्ये   मनुस्मृतीच्या आधारेच निकाल देत असत. मनुस्मृती हा फक्त धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ होता. त्याला धर्मशास्त्र असेही म्हटले जाई. बाबासाहेब त्याचा धर्मिक व राजकीय प्रभाव सांगताना ते लिगल आणि पिनल कोड होते असे नेमके शब्द वापरतात. 

" सार्थ श्रीमनुस्मृती" हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा ग्रंथ वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा आहे. हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व समाजातील स्त्रिया आणि माळी, मराठा, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायलाच हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे. "

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत.

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत. ते मी वाचलेले आहेत. पॅट्रीक वोलिव्हेल [ Patrick Olivelle] यांनी वर्षानुवर्षे संशोधन करून मनुस्मृतीची प्रमाण [चिकित्सक] आवृ्त्ती तयार केलेली आहे. तिचे नावच "Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra," असे असून हे पुस्तक  Oxford University Press ने प्रकाशित केलेले आहे. भारतरत्न पां.वा.काणे, यांचा पाच खंडांतील, आठ भागांचा, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे 

डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. ते कार्यकर्त्यांनी वाचलेच पाहिजेत.


महामहोपाध्याय बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [२/१३]
" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [२/१५]
" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [३/८]
" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ ३/११]
" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [३/५६]

" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [४/४३]
" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [५/४७]
" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [५/४८]
" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [५/४९]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [५/१५०]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [५/१५५]
" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [५/१६२]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [५/१६६]

" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [५/१६८]

" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [६/२]
" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ ६/३]
" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [९/१३]
"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [९/१५]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [९/१८]
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [९/१९]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]

तर संघाच्या मनोहर भिड्यांना मनुस्मृतीचे असे राज्य पुन्हा हवेय. लक्षात ठेवा या राज्यात सर्व स्त्रिया आणि मराठा, माळी, साळी, कुणबी, आग्री, भंडारी, वंजारी, तेली हे सर्व बलुतेदार, शूद्र तसेच अनुसुचित जातींचे लोक यांना गुलामाचे जीवन जगावे लागेल. अंधारीगुहा आणि वेठबिगारी करावी लागेल.हवेय असे राज्य तुम्हाला? या पोस्टवर प्रतिक्रिया लिहिताना मनु वा मनोहर भिडे यांच्याबद्दल संसदीय भाषाच वापरावी. शिवीगाळ करण्यामुळे मुद्दे मागे पडतात,त्यातनं आपलंच नुकसान होतं हे लक्षात ठेवा.
विशेषत: माझ्या फेसबुक मित्रयादीतील मैत्रिणी, भगिनी, मुली, माता यांची यावर काय मतं आहेत ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. 
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR0sHk873-gdTIHynAQXFnSMvawoIdspxcQeYgXosgHDQ8gAkqOlEiycF7w


-प्रा.हरी नरके, ४/५/२०२०
[लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखात व्यक्त झालेली मतं लेखकाची व्यक्तीगत मतं आहेत.]


संदर्भ-
१. सार्थ श्रीमनुस्मृती," मराठी अनुवाद, वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट, गजानन बुक डॆपो, कबुतर खाना,दादर,मुंबई, भरत नाट्य मंदीर,पुणे
२. Olivelle, Patrick (translator) (2004), The Law Code of Manu, Oxford World's Classics, Oxford University Press, ISBN 978-0-19-280271-2
३. Olivelle, Patrick (translator) (2005), Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra, Oxford University Press, ISBN 978-0-19-517146-4
४. Olivelle, Patrick (translator) (1999), The Dharmasutras: The Law Codes of Ancient India, Oxford World's Classics, OUP Oxford, ISBN 978-0-19-283882-7
५. भारतरत्न पां.वा.काणे, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे
*** डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे            मनुस्मृतीवरचे ग्रंथ
*** मनुस्मृतीवरील मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा चौदा महापंडितांनी केलेल्या चौदा टिका, आठ खंड, भारतीय विद्या भवन, मुंबई

Wednesday, April 15, 2020

स्त्रिया, शूद्र, शेतकरी, कामगार यांना मुक्तीदाता आणि गुलाम करणारा यातला भेद कधी कळणार?,भीमजयंती 20/5








भाग ३: स्त्रिया, शूद्र, शेतकरी, कामगार यांना मुक्तीदाता आणि गुलाम करणारा यातला भेद कधी कळणार? - @Prof Hari Narke- प्रा. हरी नरके

आपल्या राज्यघटनेची सुरूवात "आम्ही भारताचे लोक" या शब्दांनी व्हायला हवी असा विचार जेव्हा बाबासाहेबांनी मांडला तेव्हा अनेक सदस्यांनी "देवाच्या नावानं" अशी संविधानाची सुरूवात करावी अशी दुरूस्ती सुचवली. काहींनी तर त्यासाठी विविध देवदेवतांची नावंही सुचवली. बाबासाहेब मात्र "लोकांवर" ठाम राहिले. ही देवलोकाची राज्यघटना नसून लोकशाही भारताची घटना असल्याचं स्पष्ट करून बाबासाहेबांनी दुरूस्ती नाकारली.

आम्ही भारताचे लोक ही बाबासाहेबांची देण-

शेवटी हा विषय मतदानाला टाकण्यात आला. आणि मतदानात लोकांचा विजय झाला. भारताच्या राज्यघटनेत काळानुरूप दुरूस्त्या करण्याची व्यवस्था आहे. मात्र अशी दुरूस्ती करताना राज्यघटनेच्या मूळ चौकटीला हात लावता येणार नाही अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती निकालात तसे स्पष्ट आदेशच दिले.  भारतातली लोकशाही नष्ट करून तिथे कधीही हुकूमशाही, राजेशाही अथवा लष्करशाही आणता येऊ शकत नाही. भारतीय राज्यघटना ही भारतीय समाजाची आधुनिकीकरणाची शक्तीशाली प्रेरणा ठरावी हा प्रमुख राजकीय उद्देश डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी संविधानाची सगळी उभारणी केली. लोकशाही जीवनपद्धती आणि सामाजिक क्रांती हे महत्वाचे धागे त्यांनी एकमेकात गुंफले. त्यासाठी लोकशाही, प्रातिनिधिक सरकार, व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्यापुढे सर्वांची समानता या गोष्टी फार क्रांतिकारी ठरल्या. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या वैश्विक मुल्यांवर आधारित नवभारताची जडणघडण करण्याची कामगिरी त्यातूनच साकारली गेली. राष्ट्रीय ऎक्य आणि एकात्मता अबाधित राखण्याचं आव्हान संविधानानं पेलल.

शूद्र पुर्वी कोण होते? ची पंच्याहत्तरी-

१९५२ च्या निवडणूक जाहीरनाम्यात ते म्हणतात, " शे.का.फेडरेशनला अनुसुचित जाती आणि इतर मागासवर्ग यांच्याबरोबर हातात हात मिळवून काम करायचे आहे. या दोघात जागृती करून त्यांना बलवान करायचे आहे. लोकांची इच्छा असेल तर आपण शे. का. फेडरेशनचे नाव बदलून अ. भा. मागासवर्गीय फेडरेशन असे करू." महात्मा फुल्यांचा देशातला पहिला पुतळा १९५१ ला त्यांनी नाशिकला उभा केला. " शूद्र पुर्वी कोण होते?" हा संशोधनपर ग्रंथ लिहून हिंदुधर्माने ओबीसी जातींवर कसा अन्याय केलेला त्याचा साधार इतिहास त्यांनी शोधून काढला. त्यात त्यांनी ओबीसी प्रवर्गाची जनगणना व्हायला हवी अशी मागणी ७४ वर्षांपुर्वी  केली होती. केंद्र सरकारने अद्यापही ही मागणी पूर्ण केलेली नाही. पंतप्रधान नावाला ओबीसी पण त्यांचा रिमोट ज्यांच्याहाती आहे त्यांना ओबीसींबद्दल घृणा असल्यानेच ते या समुहाला फक्त लुटत राहतात. धर्माच्या गुंगीत ठेवतात. या पुस्तकाला पुढच्या वर्षी ७५ वर्षे होतील. हजारो जातींमध्ये विभागला गेलेला ओबीसी जातसमुह हे पुस्तक निदान आता तरी वाचील काय?

जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता -

      २० जुलै १९४२ रोजी ते ब्रिटीश सरकारच्या मंत्रीमंडळात कामगार, सार्वजनिक बांधकाम, उर्जा आणि पाटबंधारे खात्यांचे मंत्री झाले. त्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील पंधरा धरणांच्या कामांची सुरूवात केली. त्यांच्याकाळात उभे राहिलेले हिराकुड हे धरण जगातले तेव्हाचे सर्वात जास्त लांबीचे धरण होते. देशातील मोठ्या नद्या एकमेकींना जोडण्याची योजना त्यांचीच. देशातील जनतेला पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंदे आणि जलप्रवास व जलपर्यटन यासाठी मुबलक पाणी मिळण्यासाठी त्यांनी योजना आखल्या, जल साक्षरता मोहीम चालवली. वीजनिर्मितीशिवाय उद्योगधंदे वाढू शकत नाहीत आणि शेती उत्पादनही वाढू शकत नाही म्हणून उर्जेच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला. त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्‍यांचे मोर्चे काढले.

त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली. शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.

आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो. डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.

स्त्रियांच्या प्रगतीवरून देशाची प्रगती मोजावी-

     देशाची प्रगती मोजण्याची फूटपट्टी काय असावी याबाबत आपले मत सांगताना ते म्हणाले होते, ज्या देशात स्त्रियांची प्रगती झालेली असेल तोच देश प्रगत मानला पाहिजे. बाबासाहेबांचा हा विचार १९४२ सालचा आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने बाबासाहेबांचा हा निकष स्विकारून जगातल्या देशांची पाहणी करायला इंटर पार्लमेंटरी युनियनला सांगितले. २०१२ पासून दरवर्षी हा अहवाल प्रकाशित होतो. तेव्हापासून भारत दरवर्षी या यादीत खाली चाललेला आहे. २०१२ ला तो १०५ व्या क्रमांकावर होता.

राजकारणात व पक्षसंघटनेत स्त्रियांना अग्रक्रम दिला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. बाबासाहेब पुढे म्हणतात, स्त्रियांनी पतीला सांगावे की ती त्याची मैत्रिण आहे, बरोबरीची आहे आणि गुलाम नाही.

राजकिय लोकशाहीचे आपण सामाजिक लोकशाहीत रूपांतर करायला हवे. सामाजिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाही टिकणार नाही. सामाजिक लोकशाही हा जीवनमार्ग आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जीवनमुल्यांशिवाय आपले राष्ट्रीय आरोग्य वाढीस लागणार नाही असे ते सतत सांगत असत.

बंदीस्त वर्ग म्हणजे जात-

    ३ आक्टोबर १९४५ रोजी पुण्यातील अहिल्याश्रमात "डॉ. आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स " या संस्थेचे उद्घाटन करताना ते म्हणाले होते, "व्यक्तीमात्राच्या स्वातंत्र्याचे मापन करण्याचे मुलभूत माप म्हणजे राजकारण होय." राजकीय सत्ता ही सर्व समस्या सोडवण्याची गुरूकिल्ली असल्याचे त्यांचे विधान प्रसिद्धच आहे. माणसाचा वर्ग बदलला की वर्गजाणीवही बदलते. ते म्हणत, ”राजकारण हे वर्गीय जाणिवेवरच उभे असायला हवे. वर्गीय जाणिवेशिवाय केले जाणारे राजकारण ही भोंदूगिरी आहे.

" मात्र भारतीय समाजात केवळ संपत्ती हीच सत्तेचा एकमेव स्त्रोत होऊ शकत नाही. तिच्याबरोबरच धर्म आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचाही विचार करायला हवा. जातीची नेमकी व्याख्या त्यांनी केली होती. " बंदीस्त वर्ग म्हणजे जात." असं ते म्हणतात.  मानवी प्रगतीच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीच्या आड येणारी, कार्यक्षमता मारणारी जातीव्यवस्था संपविल्याशिवाय भारत राष्ट्र म्हणुन उभे राहू शकणार नाही.

प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र असते. जात श्रेणीबद्ध विषमता निर्माण करते. ते केवळ कामाचे वाटप नसून ते काम करणारांचे जन्मावर आधारित वाटप आहे. गुणवत्ता आणि क्षमता यांना या व्यवस्थेत थारा नाही. म्हणून त्यांनी जातीनिर्मुलनासाठी स्त्रीपुरूष समता, सर्वांना शिक्षण, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह आणि धर्म चिकित्सा ही पंचसुत्री दिली. संसदीय लोकशाहीची जीवनमुल्ये जनतेने शिरोधार्य मानावीत यासाठीच त्यांनी धर्मांतर चळवळीचे जन आंदोलन उभारून सारा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प सोडला होता.

           २० मे १९५६ ला व्हाइस ऑफ अमेरिका या नभोवाणीला दिलेल्या ’भारतीय लोकशाहीचे भवितव्य” या विषयावरिल मुलाखतीत ते म्हणाले होते, " जातीव्यवस्थेचे बळी असणारांना शिक्षण आणि न्याय दिल्याशिवाय भारतीय लोकशाहीला भवितव्य असणार नाही." १२ मे १९५६ ला बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रशियन साम्यवादी शासनव्यवस्थेवर कठोर शब्दात टिका केली होती. या व्यवस्थेतील हिंसा आणि रक्तरंजित मार्ग घातक ठरतील असे ते म्हणाले होते.

प्रेम, अंधश्रद्धाविरोध आणि समता शिकवणारा बुद्धाचा मार्ग हाच यावरचा उपाय असल्याचे ते म्हणाले होते. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून ३ आक्टोबर १९५४ ला केलेल्या भाषणात त्यांनी "  स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हे तत्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांतीतून मला मिळालेले नसून मला ते बुद्ध धम्मातून मिळाले आहे," असे सांगितले. आपले राज्यकर्ते प्रामाणिक असतील तरच भारतीय संविधान यशस्वी होईल अन्यथा नाही असाही ईषारा त्यांनी दिला होता. सध्याचे दांभिक सत्ताधिश बघता देशाच्या संविधानाला कधी नव्हता एव्हढा धोका सध्या निर्माण झाल्याचे लख्ख दिसते आहे.

आहे हीच राज्यघटना कायम ठेऊन खरेदी केलेला मिडीया, मिंधे प्रशासन, लाचार लोकप्रतिनिधी आणि निवृत्तीनंतरच्या फायद्यांकडे डोळे लावून बसलेली न्यायव्यवस्थेतली निष्पृह! वगैरे जजमंडळी यांच्या मदतीने लोकशाही मोडीत काढता येऊ शकते, हे दिसतेच आहे.

या सगळ्यांमध्ये कणा मोडला जाईल तो स्त्रिया, शूद्र, शेतकरी व कामगार यांचाच. त्यांना आपले मुक्तीदाता आणि गुलाम करणारे यातला भेद कळणार आहे की नाही? ज्यांनी शतकानुशतके जनावरांसारखे वागवले त्या वामनाच्या, परशूरामाच्या आश्वासनांना, गोड बोलण्याला भुलून, त्यांच्यातल्या विषाणूवृत्तीकडे दुर्लक्ष करू नका. बळीराजाच्या पतनासाठी काम कराल तर, तर  सोडवायला पुन्हापुन्हा फुले- शाहू- आगरकर - आंबेडकर येणार नाहीत हे लक्षात ठेवा सोयर्‍यांनो!

 { भाग ३ रा समाप्त }
क्रमश:
- @Prof Hari Narke- प्रा. हरी नरके - १६/४/२०२०

[ लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत. ]
उरलेला लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/ या लिंकवर क्लीक करा.

*** छायाचित्रे सौजन्य- गणेश विसपुत्ये व Watercolor Artist Rajkumar Sthabathy


Tuesday, April 14, 2020

कुटुंबनियोजनासाठी आग्रही भारतभाग्यविधाता बाबासाहेब, भीमजयंती 20/4








भाग २ रा. कुटुंबनियोजनासाठी आग्रही भारतभाग्यविधाता बाबासाहेब : प्रा.हरी नरके

      मुंबई प्रांताचे आमदार असताना ओ.बी.एच. स्टार्ट कमिटीचे सदस्य म्हणून डॉ. बाबासाहेबांनी १९३० साली सर्वप्रथम ओबीसी प्रवर्गालाही कायदेशीर मान्यता व संरक्षण दिले जाण्याची शिफारस केली होती. अनु. जाती व जमाती यांच्यासोबतच ओबीसी हा अंगमेहनती कष्टकरी वर्ग असल्याने त्यालाही घटनात्मक सवलती द्यायला हव्यात असा त्यांनी आग्रह धरला. ओबीसींना जरी अस्पृश्य मानले गेले नसले तरी हजारो वर्षे शूद्र म्हणून अपमानित जीवन जगावे लागलेले आहे. शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता आणि मानवी अधिकार यापासून वंचित राहावे लागलेले होते. तेव्हा या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा फुल्यांनंतर झटणारे बाबासाहेबच होते.

राज्यघटनेच्या ३४० व्या कलमाच्या निर्मितीद्वारेही त्यांनी ह्या घटकाला हक्क मिळवून दिले. मात्र ओबीसी समाज अज्ञानामुळे किंवा जातीय मानसिकतेमुळे असेल पण बाबासाहेबांपासून कायम फटकून राहिला. ज्यांनी त्यांना गुलाम आणि दास मानून पायातल्या वहानेसारखे वागवले त्या त्र्यवर्णिकांची मात्र ओबीसी थुंकी झेलत राहिले. कसायाला गाय धार्जिणी असावी तसा ओबीसी आजही  शोषकांनाच सामील असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.


बाबासाहेबांचे महिला, इतर मागासवर्गिय, कामगार, शेतकरी आदींच्या मुक्तीचे राजकारण तुलनेने दुर्लक्षित राहते. त्यांनी आपला पहिला राजकिय पक्ष, " स्वतंत्र मजूर पक्ष" स्थापन केला तेव्हा तो सर्वांसाठी खुला होता. त्याला त्यांनी दलित पक्ष असे नाव दिले नाही. मूकनायक आणि बहिष्कृत भारतचा वाचकवर्ग मर्यादित असल्यामुळेच त्यांनी "जनता" हे नविन वर्तमानपत्र काढले. ते सर्वांसाठी असावे म्हणून संपादकपदी दलितेतराची नियुक्ती केली. आयुष्याच्या शेवटी त्यांना सगळ्यांसाठी असलेल्या  आर.पी.आय.ची स्थापना करायची होती. त्यांना त्यातून दलित, आदिवासी, ओबीसी, महिला यांच्या एकजुटीवर आधारलेले भारतीय राजकारण करायचे होते. ते म्हणतात, "मला जातीचे बहुमत नकोय, मला विचारांचे बहुमत हवेय."

      २७ जानेवारी १९१९ रोजी साऊथबरो आयोगासमोर आपली साक्ष नोंदवताना डॉ. बाबासाहेबांनी सर्वप्रथम सर्वच भारतीयांसाठी प्रौढ मत अधिकाराची मागणी केली. सायमन आयोग आणि गोलमेज परिषदेत त्यांनी ही मागणी लावून धरली. भारतीय संविधानात मताधिकारासाठी शिक्षणाची अट घालावी असा काही सदस्यांचा आग्रह होता. डॉ. बाबासाहेबांनी त्याला ठामपणे विरोध केला. शाळेच्या जगातील साक्षरता महत्वाची असली तरी जगाच्या शाळेतले सामान्य लोकांचे " सामुहिक शहाणपण" आणि भारतीय राजकीय साक्षरता लक्षात घेता सर्वांना मताधिकार दिला जाण्याची गरज त्यांनी लावून धरली. महत्वाचे म्हणजे महात्मा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार असावा याला त्यांचाही पाठींबा होता. दु:खाची गोष्ट म्हणजे ज्यांनी शुद्रांना शिक्षण नाही आणि गुणवत्ता नाही असे सांगून मताधिकार नाकारला होता, ज्यांनी मंडल आयोगाला कडाडून विरोध केला होता, त्याच सनातनी, जातीयवाद्यांच्या मागे ओबीसी आज उभे आहेत. " गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री!" अशी ही अवस्था आहे.

अमेरिकेसारख्या देशातही महिलांना मताधिकारासाठी खूप मोठा लढा द्यावा लागला होता. भारतीय महिलांना मताधिकार आणि समान कामाला समान दाम ही व्यवस्था बाबासाहेबांनी त्वरित केली पण म्हणून किती महिलांना याची जाणीव आहे? कितीजणी आठवणीने त्यांना अभिवादन करतात? बाबासाहेबांना विसरणं ही कृतघ्नता नाही का माताभगिनींनो???

     डॉ. आंबेडकरांनी १५ आगष्ट १९३६ रोजी मुंबईत स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. अस्पृश्यता निवारणाचा लढा जरी अस्पृश्य श्रमजिवी जनतेला स्वतंत्रपणे लढावा लागणार असला तरी आर्थिक लढ्यात मात्र स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी - कामगार वर्गाचे हितसंबंध एकजीव असल्याची पक्षाची राजकीय भुमिका होती. हा लढा लढताना जात - पात - धर्म - प्रांत हे सारे भेद मनात न आणता " मजूर तेव्हढे एक ही वर्गभावना" मनात ठसवून आपला पक्ष काम करील असे  त्यांनी जनता पत्रातून स्पष्ट केले होते.

संतती नियमनाच्या लोक चळवळीचा रात्रंदिन ध्यास-

कुटुंबनियोजनाची सर्वांनाच सक्ती करायला हवी हा निवडणूक जाहीरनामा १९३७ साली फक्त या एकाच पक्षाचा होता. सत्तेवर येता आले नाही तरी बाबासाहेबांनी कुटूंब नियोजनासाठी अशासकीय विधेयक आणले. १० नोव्हेंबर १९३८ ला त्यावर विधीमंडळात चर्चा झाली. "जन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा "असतो. लोकसंख्येचा वाढणारा भस्मासूर देशाला परवडणारा नसून भारतीय नागरिकांनी एक किंवा दोन अपत्यांवरच थांबले पाहिजे आणि मुलामुलींचे उत्तम पालनपोषण केले पाहिजे असे या विधेयकात बाबासाहेबांनी म्हटलेले होते. छोटे कुटुंब असणारांना पुरस्कार आणि सवलती दिल्या जाव्यात मात्र मुलामुलींचे लटांबर जन्माला घालणारांना तुरूंगवासाची कठोर शिक्षा करण्यात यावी असेही त्यांचे मत होते. देशात त्यावेळी दुसरा कोणताही राजकीय नेता किंवा पक्ष या विषयावर बोलायला तयार नव्हता. काँग्रेस, हिंदु महासभा, मुस्लीम लिगसह कम्युनिष्ट हे सर्वच पक्ष बाबासाहेबांचा द्रष्टेपणा ओळखायला कमी पडल्याने व त्यांनी बिलाला विरोध केल्याने हे विधेयक फेटाळले गेले. १९५२ सालच्या निवडणूकीतही बाबासाहेबांनी हा विषय त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात मांडला होता. देशाच्या खांद्यावर लोकसंख्येचे अवजड ओझे असल्याने प्रत्येक पतीपत्नीने एकाच अपत्यावर थांबायला हवे असे डॉ. बाबासाहेबांनी १९३८ मध्येच सांगितले होते.आज भारताची लोकसंख्या सुमारे १३७ कोटी आहे. जगातली अवघी २ टक्के भुमी असलेल्या भारतात जगातली १८ टक्के लोकसंख्या राहते. हे असेच चालू राहिले तर हा देश नजिकच्या भविष्यात कोलमडून पडेल. १९३० च्या दशकात लोकसंख्येच्या विस्फोटाचा हा धोका ओळखून संतती नियमनाची लोक चळवळ देशात सर्वप्रथम उभी करणारे पहिले राजकीय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.

कुटुंबनियोजनाची सक्ती हवी-

त्यांनी १० नोव्हेंबर १९३८ रोजी पक्षाच्या वतीने मुंबई विधीमंडळाच्या अधिवेशनात संतती नियमन विधेयक सादर केले. [ पाहा- मुंबई विधीमंडळ चर्चा, खंड, ४, भाग ३, पृ.४०२४ ते ३८ ]
स्वतंत्र मजूर पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातले आमदार पी. जे. रोहम यांनी सादर केलेले हे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी तयार करून दिलेले होते. रोहम यांनी केलेले भाषण मराठीत होते.
जन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा आहे. पुरस्कार आणि शिक्षा पद्धतीद्वारे कुटूंब नियोजन मोहीम चालवा, सरकारतर्फे सर्व विवाहीतांना कुटुंब नियोजनाची साधने मोफत पुरवा, शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन द्या, मुलं किती असावीत आणि कधी होऊ द्यावीत याचा निर्णय पत्नीला घेऊ द्या, स्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्याची हमी द्या, प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे असताना, याच वेगाने लोकसंख्या वाढली तर भारत संकटात सापडेल. गुणवत्तापुर्ण शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, निवारा, घरं, रोजगार आणि आनंदी जीवनमान प्रत्येक मुलामुलीला मिळणं हा त्यांचा हक्क आहे. भारतात जास्त मुलं जन्माला घालणं हा "राष्ट्रीय गुन्हा " ठरवला पाहिजे, हे बाबासाहेबांचे द्रष्टे विचार आजही कालसुसंगत नी मार्गदर्शक आहेत.

प्रगत देशातील दरडोई Consumption आणि भारतातली अपुरी उपलब्धता सांगताना डॉ. बाबासाहेब, दूध, मटण, फळं, साखर, गहू, भाजीपाला यांची सरळ आकडेवारीच देतात. हिंदू महासभा, मुस्लीम लिग, काँग्रेस, अगदी कम्युनिष्ट या सार्‍यांनीच या बिलाला विरोध केला. परिणामी ते फेटाळले गेले. ८३ वर्षांपुर्वी या बिलाचे स्वागत करणारे फक्त दोघेच द्रष्टे लोक भारतात होते. समाजस्वास्थकार प्रा. र. धो. कर्वे आणि उद्योगपती जे. आर. डी. टाटा. कर्व्यांनी समाजस्वास्थमधून या विषयावर समाजजागृती चालवली होती. त्यांच्यावर सनातन्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले तेव्हा त्यांचे वकीलपत्र घेऊन बॅरिस्टर बाबासाहेब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. कुंटुंब नियोजन बिल फेटाळले गेले तरी १० डिसेंबरला [ १९३८ ] डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत युवक परिषद घेऊन एकाच अपत्यावर थांबा असा सल्ला युवकांना दिला. १९५२ सालच्या निवडणुकीतही आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी कुटूंब नियोजनाचे वचन दिलेले होते.

डॉ. बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र-

शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर " स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया " हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.

१. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी अशी शेतं एकत्र करून शेतकर्‍याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.

२. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्‍या बोजाची. शेतीवर ज्याकाळात ८० टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले ६० टक्के लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.

३. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.

४. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.

५. शेतीला २४ तास आणि ३६५ दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.

६. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.

असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी १०२ वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब १०२ वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते.

डॉ. बाबासाहेबांच्या राजकीय योगदानाची चर्चा करताना ती दोन पातळ्यांवर करावी लागते. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी केलेले राजकारण आणि दुसर्‍या पातळीवर सर्वच भारतीयांसाठी आणि अंतिमत: मनुष्यजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजावून घ्यावे लागते.

ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अस्पृश्यतेचा प्रश्न राजकीय पातळीवर नेला आणि त्यांच्यासाठी राजकीय हक्कांची मागणी केली. संविधानात ते मिळवूनही दिले. सामाजिक न्यायासाठी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शिक्षण, सरकारी नोकर्‍या आणि पंचायत राज्य ते संसद येथे राजकीय आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे दलितांचे मुक्तीदाता हा त्यांचा पैलू अनेकदा प्रखरपणे मांडला जातो, ठळकपणे पुढे येतो.

आंबेडकरवादी जनसमुह लक्षावधींच्या संख्येने त्यांच्या अभिवादनाला पुढे येतो, मात्र मध्यमवर्गीय, पांढरपेशे, बुद्धीजिवी आणि इतर मागास जातींचे लोक बाबासाहेबांना नाकं मुरडत दूर राहतात, असे करणे ही दुटप्पीवृत्ती नाही का?

    डॉ. बाबासाहेबांना नियतीने त्यांच्यावर सोपविलेल्या व्यापक जबाबदारीची जाणीव होती. खोतीविरोधी शेतकरी परिषदेत ते म्हणाले होते, "माझा जन्म सर्व साधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठीच असावा. मीदेखील मजूरवर्गापैकी एक असून इम्प्रूमेंट ट्रस्टच्या चाळीत राहतो. इतर बॅरिस्टरांप्रमाणे मलादेखील बंगल्यात रहाता आले असते, पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधूंकरता चाळीत राहूनच काम केले पाहिजे. याबद्दल मला केव्हाही वाईट वाटत नाही."

[भाग २ रा समाप्त]
क्रमश: ....
- @Prof Hari Narke- प्रा. हरी नरके - १५/४/२०२०

[लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.]
उरलेला लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/ या लिंकवर क्लीक करा.
..................................................................................

Tuesday, March 10, 2020

पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं






पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं...हरी नरके, बीबीसी मराठीसाठी

ज्येष्ठ समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च हा स्मृतिदिन. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

मुंबई, पुण्यात 1896 आणि 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याच साथीत 9 फेब्रुवारी 1897ला कामगारांना मदत करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते खंदे नेते होते.

जोतिबांच्या विचाराने प्रेरित होऊन 'दीनबंधू' नावाचं समाज प्रबोधन नियतकालिक चालवित. लोखंडे यांनां भारतातल्या कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं.

जोतिबांचे विचार आणि कार्य ही त्यांच्या कामाची प्रेरणा होती. मुंबईत फुल्यांना महात्मा उपाधी देणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात लोखंड्यांचा पुढाकार होता. महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा ते मोठा आधारस्तंभ राहिले होते. चळवळीतला जवळचा सहकारी गेल्याने सावित्रीबाईंना मोठा धक्का बसला.

मुंबई पाठोपाठ पुण्यात साथ पसरू लागली, तशा जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. एकतर लोकांना प्लेगविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं. प्लेगवर औषधंही परिणामकारक नव्हती. त्यामुळे उपाययोजना काय करायच्या याविषयीही माहिती नव्हती. त्यात समाजामध्ये देवीचा कोप यासारख्या अंधश्रद्धा होत्या. साहजिकच प्लेगच्या आजाराने माणसं मरत होती तेव्हा ते देवीच्या कोपाने मरतायत अशी अनेकांची भावना झाली.

पुण्यात जसजसं मृत्यूचं थैमान सुरु झालं तसं लोकच नाही तर बडे राजकीय नेतेही पुणे सोडून दुसरीकडे राहायला निघून जात होते. उंदरांमार्फत प्लेगचा प्रसार होत होता, उंदीर मरून पडलेले लोकांना दिसायचे. लोक बिथरून जायचे. ताप येऊन काखेत गाठ यायची आणि माणसं कोलमडून पडायची, हे सावित्रीबाई आजूबाजूला पाहात होत्या.

यशवंतच्या मदतीनं रुग्णांवर उपचार

सावित्रीबाईंनी स्वतः आपल्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतून तार करून बोलावून घेतलं. डॉक्टर यशवंत फुले ब्रिटीश मिलिटरीमध्ये नोकरी करत होते. रजा घेऊन आलेल्या यशवंतकडून परिस्थिती समजून घेऊन सावित्रीबाईंनी कामाला सुरूवात केली.

हा संसर्गजन्य रोग जीवघेणा असल्याने आईने धोका पत्करू नये, असं डॉ. यशवंत यांचं म्हणणं होतं. पण त्यावर सावित्रीबाईंना वाटायचं आज महात्मा फुले असते तर ते परिस्थिती पाहून शांत बसले नसते. खेरीज नारायण मेघाजी लोखंडेंचा प्लेगने मृत्यू झालेला असताना आजाराच्या भीतीने त्या दूर राहू शकल्या असत्या. पण लोकांच्या दुःखापुढे त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती.


महात्मा फुलेंचं नाव घेतो तर लोकांसाठी काम केलं पाहिजे या विचारावर त्या ठाम होत्या. असं म्हणून त्या कामाला लागल्या. पुण्यात हडपसरजवळ आताच्या मोहम्मदवाडी, ससाणेनगर परिसरात यशवंत यांच्या सासऱ्यांची शेती होती.

हा भाग तेव्हा पुणे शहराच्या वेशीवर होता. इथल्या माळावर काही झोपड्या बांधल्या आणि त्यांनी दवाखाना सुरू केला. विशेषतः मुली आणि महिला घरोघरी जाऊन कोणाला ताप आला असेल किंवा प्लेगची लक्षण दिसत असतील तर त्या पेशंट्सना दवाखान्यात घेऊन येत. आणि यशवंतच्या मदतीने उपचार करत.
तेव्हा पुण्यात प्लेगची इतकी दहशत पसरली की सरकारी दफ्तरं ओस पडली होती आणि लोक उपचारासाठी आपणहून घराबाहेर कमी संख्येने बाहेर पडत होते. देवीचा कोप असेल या भीतीने घरात आजारी माणसांना दडवून ठेवलं जात होतं.

ब्रिटीश सरकारसमोर साथ आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचं मोठं आव्हान होतं. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा बडगा उगारला. त्यात रँड या ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या बडग्याने लोकांमध्ये असंतोष पसरू लागला होता.

पुणे शहरात घराघरात आरोग्यसेवा पोहचवणं जिकिरीचं होतं. भीतीमुळे लोक मदत करायलाही पुढे सरसावत नसत. गाडी-घोडे, रुग्णवाहिका, स्ट्रेचर समाजातल्या विशिष्ठ वर्णाच्या आणि प्रस्थापित वर्गासाठी प्राधान्याने मिळत. गावात आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या दलित वस्तीत कशी पोहचणार हा प्रश्न होता.
तत्कालीन परिस्थितीत जातींमध्ये भेदाभेद, अस्पृश्यता असताना वाडी वस्तीत उपचार पोहचणं दुरापस्त होतं. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतंत्रपणे तळागाळातल्या लोकांसाठी काम करायला सुरूवात केली.

रुग्णसेवा करतानाच प्लेगची लागण

सावित्रीबाईंनी पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजातल्या प्लेगच्या पेशंटला वाचवल्याची नोंद कागदोपत्री आहे. मुंढव्याच्या दलित वस्तीत पांडुरंग प्लेगने आजारी असल्याची माहिती सावित्रीबाईंना मिळाली. अकरा वर्षांच्या पांडुरंगाला त्यांनी चादरीत गुंडाळून पाठीवर घेतलं.

मुंढव्यापासून आठ किलोमीटर चालत त्यांनी ससाणेनगर गाठलं. माळावरच्या दवाखान्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. पांडुरंग वाचला खरा पण दरम्यानच्या काळात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली होती. काम करताना तापाने सावित्रीबाई फणफणल्या. अखेर 10 मार्चला त्या अविरतपणे काम करत असताना गेल्या.
सावित्रीबाईंना 1 जानेवारी 1848 साली शाळेचं पहिलं काम सुरू केलं होतं, आणि त्या गेल्या 1897 साली. जवळपास पन्नास वर्षं त्यांनी शिक्षणक्षेत्रात, सामाजिक सुधारणेसाठी आणि सेवेसाठी धडाडीने काम केलं.
शिक्षणाखेरीज समाजसेवेचं आणि लोकांना मदत करण्याचं सावित्रीबाईंचं काम पाहाताना नेहमी वाटतं, की आपल्याकडे झाशीच्या राणीने केलेल्या पराक्रमाची गोष्ट सांगितली जाते. जितकी ती शौर्यगाथा राजकीयदृष्ट्या रोमांचक आहे तितकंच तोलामोलाचं सावित्रीबाईंचं हे शौर्य आहे.

सावित्रीबाईंच्या कार्याकडे दुर्लक्ष

आपल्याला इतिहास नेहमी लढाया, पराक्रम यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. आपण सामाजिक सेवेत हौतात्म्य पत्करणाऱ्यांच्या इतिहासाकडे कमी आकर्षित होतो. जेव्हा सावित्रीबाई पांडुरंगाला पाठीवर घेऊन चालत होत्या तेव्हा एकप्रकारे त्या प्लेगशी झगडत होत्या. मृत्यूशी झुंज देणाऱ्या पाठीवरच्या पांडुरंगाला त्यांनी अखेर वाचवलं.

पुणे नगरपालिकेचा त्यावेळचा रेकॉर्ड पाहिला तर भयावह चित्र डोळ्यासमोर येतं. मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीही कर्मचारी नसायचे. त्यामुळे पालिकेत फक्त आकड्यांच्या नोंदी आहेत. 10 मार्च 1897 या दिवशी किती माणसं मरण पावली याचाच आकडा मिळतो.

एकेका दिवसाला 775, 685 असे भयंकर आकडे आहेत. त्यावेळच्या पुण्यात एका दिवसात नऊशे माणसं मरण पावली असतील तर किती हाहाकार माजला असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. नगरपालिकेच्या रेकॉर्ड्समध्ये दिड-दोन महिन्यांच्या काळात अशाच आकड्यांच्या नोंदी सापडतात.
त्या काळात माध्यमांची अस्पृश्यताही ठळकपणे दिसते. लोकमान्य टिळकांच्या केसरीने तर सावित्रीबाई फुले यांच्या निधनाची साधी बातमीही छापली नाही. खरंतर टिळक आणि आगरकरांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता तेव्हा महात्मा फुल्यांनी दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता, याची नोंद आहे. पण स्वातंत्र्यलढ्याच्या पुढील काळात टिळकांनी महात्मा फुले यांना अनुल्लेखाने इतकं टाळलं, की केसरीमध्ये महात्मा फुल्यांच्या निधनाची बातमीही सापडत नाही.

साहजिकच सावित्रीबाईंचा अनुल्लेख ओघानेच आला. पण केसरीने बातमी दिली नसली तरी दीनबंधू वर्तमानपत्राने दिली होती. बहुजन समाजात जनजागृतीच्या उद्देशाने दीनबंधू हे मराठी वर्तमानपत्र निघत असे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून येतंय याचा सारांश ब्रिटीश गव्हर्नरला पाठवला जाई. त्यात दीनबंधूच्या बातमीचा उल्लेख सापडतो.

माध्यमांनीच नव्हे तर त्यावेळच्या प्रस्थापित समाजाने आणि नेत्यांनीही सावित्रीबाईंच्या योगदानाची उपेक्षा केलेली दिसते.

पुढे 1905 मध्ये पुन्हा प्लेगच्या साथीने पसरायला सुरुवात केली. त्यावेळीही फुल्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायला उतरले. या जीवघेण्या आजारात त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच 13 ऑक्टोबर 1905 या दिवशी त्यांच्यावर मृत्यू ओढवला.

१८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ लोक या साथीच्या रोगाला बळी पडले. १९०७ मध्ये एकूण मृत्युसंख्या १३,१५,८९२ होती, ती १९५२ मध्ये १,००७ वर आली. (मराठी विश्वकोश)

(डॉ. हरी नरके हे लेखक आणि फुले यांचे विचार, साहित्य तसंच चळवळीचे अभ्यासक आहेत. वरील लेखाचे शब्दांकन आणि संपादन बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी केले आहे)

https://www.bbc.com/marathi/india-51815816?fbclid=IwAR0el49CLu8FmZNO38WoRq1sX9g2PxoMWuuWl1-VjB8t5aV6iW0xji1EkqY

Monday, March 9, 2020

१२४ वा स्मृतीदिन - शहीद सावित्रीबाईंची शौर्यगाथा - प्रा. हरी नरके






१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे...........




जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्शक शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता

मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला अपघाती निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड

१८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. मुंबईत यावर्षी झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीत जीव धोक्यात घालून सावित्रीबाईंनी शांतता प्रस्थापनेचे काम केले. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.

* २५ डिसेंबर १८७३ रोजी झालेल्या सत्यशोधक विवाहाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले.

* १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंची होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली.
त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले.

* १८७२ ते १८७६ याकाळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. जगवली. स्वत: स्वयंपाक करून त्यांना जेऊखाऊ घातलं.

* ब्राह्मण विधवांचे केशवपन करू नये म्हणून नाभिक समाजाला संघटित करून त्यांचे प्रबोधन करून विधवांचे केशवपन, मुंडन करणार नाही यासाठी त्यांचा संप घडवून आणला.

जोतिरावांच्या मृत्यूनंतर स्वत: सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. आधुनिक भारताच्या इतिहासातली अशी ही बहुधा पहिलीच घटना असावी.

सावित्रीबाई निव्वळ शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री आणि शिक्षणतज्ञही होत्या. त्यांचा काव्यफुले हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. त्यात पर्यावरण जागृती, शिक्षणाचे महत्व,
निसर्ग आणि माणसाचे नाते, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, स्त्रीपुरूष समता अशा विषयांवरच्या मौलिक कविता आहेत.

त्यांनी श्रमाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणारे कृतीशील शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षणातला गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाय सुचवले व ते अंमलात आणले.

स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, संवाद, वादविवाद, चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. आधुनिक भारताचा स्त्रीपुरूष समतेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात त्यांनी केली.
आजच्या स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्यांना उर्जा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या जीवनकार्यातून होत असते.

- प्रा. हरी नरके, १ मार्च, २०२०

संदर्भ-
प्रा. हरी नरके, सावित्रीबाई फुले चरित्र, नागानालंदा प्रकाशन, इस्लामपूर, २००५
प्रा.हरी नरके, [ संपा.] सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले गौरवग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८



[लेखक सावित्रीबाईंचे चरित्रकार असून त्यांनी महात्मा फुले समग्र वाड्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय यांचे संपादन केलेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख व प्राध्यापक राहिले असून त्यांनी राज्य शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ समितीचे सचिव म्हणून [१९९० ते २०१८] काम केलेले आहे.]







Sunday, December 8, 2019

जेव्हा बलात्कार पिडीतेचेच एनकाऊंटर केले जाते







जेव्हा बलात्कार पिडीतेचेच एनकाऊंटर केले जाते- प्रा.हरी नरके

उन्नावच्या एका बलात्कार प्रकरणात आरोपी उत्तरप्रदेशचा सत्ताधारी आमदार आहे. तो अपघाताद्वारे पिडीतेच्या नातेवाईकांची हत्त्या घडवतो. तिलाही ठार मारण्यचे प्रयत्न होतात. उ.प्र.पोलीस तर सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश  फाट्यावर मारतात. दुसर्‍या पिडीतेला पुरवलेली सुरक्षा व्यवस्था असतानाही तिला भर दिवसा जाळून मारलं जातं. योगीपुरूष राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वपक्षाच्या आमदाराला उघडपणे पाठीशी घालताना दिसतात.

एका उन्नाव बलात्कार पिडीतेचा संघर्ष आता मृत्यूमुळे थांबला आहे.

४ जून २०१७ रोजी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या कुलदीप सेंगर या आमदाराने एका मुलीवर बलात्कार केला होता.

तरिही उ.प्र. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही.

मग १७ ऑगस्ट २०१७ रोजी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर तिनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे पोलीस, मीडिया आणि कोर्टाने तिची दखल घेतली.
सेनगरवर गुन्हा दाखल झाला.

पुढे तिच्या विनंतीवरून सुप्रीम कोर्टाने हे खटले दिल्लीत हलवले.
एप्रिल २०१८ मध्ये स्वतः ५० इंची पंतप्रधानांनी या घटनेचा निषेध केला.

पण तरिही उत्तरप्रदेश पोलीस कोणाच्या मागे राहिले? पिडीतेऎवजी आरोपीच्या मागे ते उभे राहिले.

२१ नोव्हेंबर २०१८ ला पिडितेचा चुलता आणि मोठा भाऊ यांना उ.प्र. पोलिसांनी अटक केली. १८ वर्षांपूर्वी त्यांनी गोळीबार केला होता हा जावईशोध लावण्यात आला.

२८ जुलै २०१९ रोजी मुलीला कोर्टात जात असताना ट्रकने उडवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस तिच्या सुरक्षेसाठी दिलेले पोलीस गायब होते.
या अपघातातून ती कशीबशी वाचली.

परवा दुसरीचा भरदिवसा एनकाऊंटर करण्यात आला. ५ डिसेंबर २०१९ रोजी तिच्या गावात तिला जाळण्यात आलं. तेव्हाही सुरक्षेसाठी दिलेले पोलीस गायबच होते. गावातल्या, राज्यातल्या, देशातल्या कोणा पिडीतेने यापुढे तक्रार करू नये यासाठी बसवलेली ही आदर्श दहशत आहे.

निर्भया, दिशाबाबत आक्रोश करणारा 'ढोंगी' संप्रदाय आणि माध्यमं या उन्नाव पीडितेला फक्त श्रद्धांजली वाहून मोकळे होतील.
कारण ती महिला होती. गरिब होती. मागासवर्गीय होती.

आरोपी पुरूष आहेत. श्रीमंत आहेत. उच्चवर्णीय आहेत. धर्म, जात आणि राजकीय सत्ता त्यांच्यामागे आहे.

यावरून घ्यायचा बोध म्हणजे जेव्हा आरोपी संस्कारी पक्षाचे असतात तेव्हा पिडीतेचाच एनकाऊंटर केला जातो.

तिला जाळण्यात आल्यानंतर काही तासांनी हैदाबादमधील बलात्कार प्रकरणी आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार केले गेले.

हैदराबादच्या बलात्काराच्या आरोपींना ठार मारलं म्हणून देशभरात हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन केलं गेलं.
साहजिकच उन्नावची बातमी कोपऱ्यात ढकलली गेली. एकीकडे आरोपींना गोळ्या घालणाऱ्या पोलिसांवर फुलं उधळली गेली. तर ऊन्नावप्रकरणी मात्र आरोपींबाबत देशानं मौन बाळगलं. स्त्रीमुक्ती संघटना, मिडीया आणि मेनबत्तीवाले आता थोडेसे नक्राश्रू ढाळतील. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करते हे नाटक सालाबादप्रमाणे केले जाईल.

मुळात तिनं त्यांच्याविरूद्ध तक्रार केली हा तिचा पहिला गुन्हा. ती लढत राहिली हा दुसरा गुन्हा.
तेव्हा मग तिची हत्त्या करण्यात आली.

ही श्रीमंतांची, उच्चवर्णियांची, सत्ताधार्‍यांची, पुरूषसत्ताक व्यवस्था सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही. तुम्ही तिचं काय उपटणार?

थोडा तडफडाट कराल, समाजमाध्यमावर शिव्याशाप द्याल आणि मग यथावकाश थंड व्हाल.
शेकडो वर्षे फक्त असेच घडत आलेय. आता तरी दुसरे काय होणारेय?

या देशात बाई म्हणून जन्माला येणं, गरीब असणं आणि मागासवर्गीय असणं म्हणजे फक्त सोसण्याचा हक्कदार असणं. बायांनो सत्ताधार्‍यांनी बलात्कार केले तर तक्रार करण्याच्या फंदात पडू नका. नाहीतर मरावं लागेल. गप्पगुमान राहा. जमला तर बलात्काराचा चक्क उत्सव करा. तरच जिवंत राहाल. अन्यथा असं मरावं लागेल.

प्रा.हरी नरके,
०८/१२/२०१९



Saturday, December 7, 2019

जस्टीस हरिड इज जस्टीस बरीड




जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड, जस्टीस हरिड इज जस्टीस बरीड -प्रा.हरी नरके

हैद्राबादच्या एका असहाय महिलेवरचा अमाणूस अत्याचार, तिची क्रूर हत्त्या, त्यानंतर देशभर उसळलेला संताप आणि म्हणून पोलीसांनी केलेला ४ आरोपींचा एनकाऊंटर यावर समाज माध्यमात अतिशय आनंदाच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही मोजक्या लोकांनी या पद्धतीने आपण अराजकाकडे जाऊ अशीही चिंता व्यक्त केली. तथापि ट्रोलिंग करणार्‍या संतप्त जमावाने या विवेकवाद्यांची हुर्यो केली.

ज्या पोलिसांनी आधी पिडीतेच्या आईवडीलांची तक्रार दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली आणि एकप्रकारे गुन्हा घडायला आरोपींना मदत केली, देशभर संतापाची लाट उसळताच त्यांनी आरोपींचा एनकाऊंटर करताच लोकांनी त्यांच्यावर फुलं उधळली.

यात त्यांचा आधीचा कामचुकारपणा सहज झाकला गेला. पोलीस तक्रार घ्यायला टाळाटाळ का करतात हा विषय बाजूला पडला. सरकार, प्रशासन, समाज यांचा नाकर्तेपणा लोक विसरून गेले.

जनतेच्या हर्षोल्लसाच्या भावना समर्थनीय नसल्या तरी त्या समजून घ्यायला हव्यात. लोकांमध्ये हा संताप आहे तो वाढती गुन्हेगारी, ५० इंचाच्या काळातही वाढत असलेली महिलांची असुरक्षितता, पोलिस व्यवस्थेची बेपर्वाई, सरंजामी राजकीय हस्तक्षेप, महागडी आणि वर्षानुवर्षे थंड असलेली न्यायव्यवस्था या सार्‍यांबद्दलचा एकवटलेला हा संताप आहे. जनता विचारी नसेलही पण तिला या परिस्थितीत आणून सोडणारे राज्यकर्ते आणि गुन्हेगार यांच्याकडे थंडपणाने बघता येणार नाही. याला कोण जबाबदार आहे?
पोलीस नीट तपास करीत नाहीत, न्यायालयात न्याय इतका महाग मिळतो की गरिबांना तो परवडूच शकत नाही. वकील आणि न्यायालये वर्षानुवर्षे केसेस प्रलंबित ठेवतात. निकाल येईपर्यंत आणि त्याची अंमलबजावणी होईपर्यंत फिर्यादींची दमछाक झालेली असते. त्यामुळेच म्हटले जाते की "जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड."

पण हे वचन अर्धेच प्रचलित आहे.

त्याचा उत्तरार्ध आहे "जस्टीस हरिड इज जस्टीस बरीड."
प्राॅसिक्युशनची कालमर्यादा का ठरवली जात नाहीये?Judicial Standards and Accountability Bill गेली ७ वर्षे मंजूर का केले जात नाहीये?

माझे मित्र विश्वंभर चौधरी म्हणतात, " देशाला फार सोप्यासोप्या उत्तरांमधून क्रांतीचे वेध लागले आहेत. सरकार नीट चालत नाही? आपल्या देशाला हुकूमशहाच हवा! न्याय लवकर मिळत नाही? करू द्या पोलिसांना एन्काऊंटर! पेशंट मेला? जाळा दवाखाना! सोपं आहे. खरा प्रश्न आहे तो त्या गणंगांचा ज्यांना लोकांनी कायदे बनवण्यासाठी मंत्री आणि खासदार केलेलं आहे.

विदूषी मंत्री स्मृती इराणी आणि विदूषी खा. जया भादुरींचा थयथयाट पाहिलात का? नसेल तर पहा, खूपच परिणामकारक आहे. मुद्दा एवढाच आहे की त्यांना एक महत्वाची गोष्ट मंत्री आणि खासदार असून माहित नाही. (कारण दोघींनाही संसदेतला त्यांचा रोल माहित नाही.) 2012 पासून संसदेत Judicial Standards and Accountability Bill पडून आहे

स्मृतीबाई आणि जयाबाई! मोदी आणि शहांना आठवण करून द्या. हे बील आलं तर गंभीर गुन्हे एका वर्षात निकाली काढण्याची सक्ती असेल न्यायव्यवस्थेवर. तुम्हाला हे बील आहे हे तरी माहित आहे काय आणि मोदी शहांनी ते वाचलंय का? नसेल तर त्यांना वाचायला द्या. या सुधारणा कोण करणार? का तुम्हाला फक्त घटना घडून गेल्यावर ट्वीट करण्यासाठी आम्ही निवडून दिलं?

किती ट्रोलींग करायचं ते करा पण हेच सांगणार की जे घडलं ते चुकीचं आणि भयंकर आहे. क्रौर्याला क्रौयानं उत्तर हा जंगलातला नियम असतो. आपल्याला परत मध्ययुगात जायचे आहे का हा खरा प्रश्न आहे. जायचं असेल तर जे जायचं चाललंय ते उत्तम आहे. व्यवस्था म्हणून काही जगवायची असेल तर वेगळा विचार करावा लागेल.आपली न्यायव्यवस्था कुचकामी आहे. आहेच. पण प्रत्येक गावात, प्रत्येक चौकीत हुकूमशहा तयार करायचे आहेत का हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. एन्काऊंटर म्हणजे न्याय नसतो. न्याय म्हणजे मॅगी नाही जो इन्स्टंट आणि दोन मिनीटात मिळवता येतो.या देशात घटनामान्य अशी काही एक न्यायिक प्रक्रिया आहे. तिच्यात सुधारणा आवश्यक आहे. ते कठीण आणि क्लिष्ट काम आहे."

सामान्य आणि मध्यमवर्गीय भारतीय जनता सरंजामशाहीला सोकावलेली आहे. तिला सिंघम हवेयत. अवतार हवेयत. एनकाऊंटर हवेयत. तिच्यात लोकशाही मुल्ये अद्याप रुजलेली नाहीयत. राज्यकर्त्यांना तेच हवेय. विवेकवादाला मूठमाती देणार्‍या झुंडी त्यांना हव्या आहेत. त्यामुळे ते न्यायव्यवस्थेत सुधारणा करणारच नाहीत.

आरोपींना वर्षानुवर्षे शिक्षा मिळणारच नाहीत. निर्भया, उनाव, हैद्राबाद झाले की माध्यमे त्याच्या सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूज करणार, नंतर सुमडीत नव्या ब्रेकिंग न्यूजकडे वळणार, नविन अत्त्याचार होईपर्यंत आपण सारे पुन्हापुन्हा असेच वागणार. कोणालाच यातून काही शिकायचे नाहीये. हे सगळेच भयंकर आहे.
Justice delayed is justice denied,justice hurried is justice burried.
@ Prof Hari Narke- प्रा.हरी नरके  ०७ - १ २ - २०१९

Tuesday, July 9, 2019

भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची उपेक्षा का?






दररोज एका नवीन डूडलच्या माध्यमातून लोकांचा सन्मान करणाऱ्या गुगलनं १ जुलै २०१८ च्या बुधवारी मराठी मनाला एक सुखद धक्का दिला. ते होतं डॉक्टर्स डेचं डूडल रखमाबाई (सावे) राऊत यांच्या सन्मानार्थ. कोण होत्या रखमाबाई? आणि त्यांच कार्य काय होते?
गुगलनं रखमाबाईंवर डूडल बनवलं आणि अनेकांनी त्यांचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. त्या भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
१८६४ साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या.
 त्याकाळी त्यांनी नवऱ्याकडे जायला नाही म्हणणं ही खूप मोठी गोष्ट होती.
त्यानंतर रखमाबाईंच्या आईंनी पुन्हा लग्न केलं. सावत्र वडिलांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता.
त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन राऊत हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.
तसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं लवकरच निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.
बालविवाहाविरुद्ध लढा
रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपल्या बालपणी झालेला विवाह रखमाबाईंना मान्य नव्हता आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला.
ब्रिटीश न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या विरूद्ध निकाल दिला. त्यावर त्या तुरूंगात जायला तयार झाल्या. लंडनमध्ये महिलांनी त्याविरूद्ध आवाज उठवला. त्यांनी निधी जमवून रखमाबाईंच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. तत्कालीन महाराष्ट्रात या निकालावर बरीच टीका झाली. शेवटी दादाजी भिकाजी यांनी पैसे देऊन कोर्टाबाहेर तडजोड करण्यात आली.
या निकालाला आणि त्या अनुषगांने येणाऱ्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांमधलं एक प्रमुख नाव होत बाळ गंगाधर टिळक.
रखमाबाईंनी  'द हिंदू लेडी' या टोपणनावानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखही लिहीले.
एमडी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. इंग्लंडच्या कॉलेजनं त्यांना एमडी करण्याची परवानगी दिली नाही. कारण त्याकाळी इंग्लंडमध्येही स्त्रियांना एमडी करण्याची परवानगी नव्हती. त्याकरिता त्यांनी तिथंही लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. परत आल्यावर त्यांनी मुंबईचे कामा हास्पीटल, तसेच सुरत आणि राजकोटमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून आयुष्यभर काम केले. वयाच्या नव्वदीतही त्या रूग्णसेवा करीत राहिल्या.
तरीही उपेक्षा?
असं असतानाही इतिहासानं रखमाबाईंची उपेक्षा का केली? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा महाराष्ट्रातल्या थोर स्त्रियांच्या यादीत रखमाबाईंचं नाव का येत नाही?
तसं पाहिलं तर स्वातंत्र्यलढा सुरू होता तेव्हा दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचंही वारं वाहात होतं.
दोन्ही चळवळींमध्ये मोठमोठी माणसं जोमानं काम करत होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत लढणाऱ्यांचा इतिहासात प्रामुख्यानं उल्लेख झाला आणि समाजसुधारकांकडे दुर्लक्ष झालं.
रखमाबाई बहुजन समाजाच्या होत्या म्हणून त्यांच्या कार्याकडे तत्कालीन इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं का?
अभिनेते आणि दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रखमाबाईंवर चित्रपट बनवला आहे. महादेवन सांगतात, "मुळात आपल्याकडे पुरुषांनाच हिरो बनवायची पद्धत आहे. त्यांचाच उदोउदो करा. त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून पटकथा रचल्या जातात. त्यामुळे स्त्रियांचं काम मागे पडतं. त्यांना इतिहासात अनुल्लेखानं मारलं जातं."
"म्हणूनच मी त्यांच्या कामावर, त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं. रखमाबाई या पहिल्या स्त्री बंडखोर होत्या. नवऱ्याला सोडण्यासाठी कोर्टात गेलेली पहिली भारतीय बाई असेल ती. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जो लढा दिला तो खूप प्रेरणादायी आहे," असं अनंत महादेवन म्हणाले.
पण आजही कित्येक जणांना रखमाबाईंच्या कार्याविषयी माहिती नाही हे आपलं दुर्दैव आहे, असं महादेवन यांना वाटतं.
"मी चित्रपट बनवायला सुरुवात केली, तेव्हा खूप लोकांना विचारलं की, तुम्हाला माहिती आहे भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? उत्तर आलं, आनंदीबाई जोशी. तेव्हा खूप वाईट वाटलं."
"आनंदीबाईंचं कर्तृत्व मोठं आहेच, पण त्या प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत. त्यांना अकाली मरण आलं. हा मान खऱ्या अर्थानं रखमाबाईंकडे जातो."
- अनघा पाठक, बीबीसी मराठी, या लेखाचा सारांश
https://www.bbc.com/marathi/india-42076214?SThisFB&fbclid=IwAR2fUS_w_skX0FwiTUFy-nfipy6PmIi7ngPFtxCX5MV3B7bS2WNrJrxYtU0
बीबीसी मराठी Related Topics जीवन इतिहास भारत महिला हक्क महिला १ जुलै २०१९ 

Saturday, June 15, 2019

आजपासून पूजा बंद

आजपासून पूजा बंद- प्रा.हरी नरके पन्नास वर्षे संसार केल्यानंतर, नातवंडांची लग्न झाल्यानंतर माझ्या आत्याला तिच्या नवर्‍यानं सोडलं. कारण काय तर बायको मला आवडत नाय. आत्या तिच्या माहेरी म्हणजे आमच्याकडं येऊन राहू लागली. वटसावित्री पौर्णिमेला हाच नवरा सात जन्म मिळो अशी प्रार्थना करीत तिनं वडाला फेर्‍या मारल्या. त्याची मनोभावे पूजा केली. मी तिला विचारलं," अगं आत्या, त्यानं तुला सोडलं. मग कशाला हवा हाच नवरा सात जन्मं?" ती म्हणाली, " त्यानं त्याचा धर्म सोडला. म्हणून आपण आपला सोडू नये बाळा." पुढच्या वर्षी ती पुन्हा पुजेला निघाली. मी तिला म्हटलं, " अगं, त्यानं तुला सोडून दुसरी बायको केली. आता तिही सात जन्मं हाच नवरा मागणार. तुही मागणार. याचा अर्थ तुला पुढची सात जन्मं हीच सवत मिळणार. बघ बाई!" आत्यानं ताडकन हातातलं पुजेचं ताट खाली ठेवलं. म्हणाली, " मला सवत नको. आजपासून पूजा बंद." - कुमुद पावडे यांच्या "अंत:स्फोट" या आत्मकथनातून - प्रा.हरी नरके, १६ जून २०१९

Saturday, June 1, 2019

भुरटे सरकारी इतिहासकार, राष्ट्रमातेची बदनामी आणि सतिप्रथा











भुरट्या सरकारी इतिहासकार श्रीमती श्यामा घोणसे यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची बदनामी करणारी वक्तव्ये केली.

खरंतर ज्या बाईंचा इतिहासाचा काडीमात्र अभ्यास नाही त्या श्यामा घोणसे यांना विद्यापीठाने गरळ ओकणार्‍या भाषणासाठी बोलावलेच कसे? हे विद्यापीठ आहे की समरसतेचा अड्डा?

शिक्षणमंत्री विनोद तावडॆंनी तर या महामातेला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख नेमलेले आहे.

त्यांची मुक्ताफळे अशी की " अहिल्यामातेच्या कुटुंबातील सर्व पुरूष व्यसनी होते, सतीची प्रथा राजा राममोहन रॉय यांनी नाही तर समर्थ रामदास यांनी बंद केली."

माझा त्यांना सवाल आहे की काय महायोद्धा मल्हारराव होळकर व्यसनी होते?

संत रामदासांनी जर सती प्रथा बंद केली होती तर त्यांच्यासमोर छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पुतळाबाई सती कश्या काय गेल्या होत्या?

थोरले माधवराव पेशवे [माधवराव बाळाजी भट पेशवे] यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रमाबाई कशा काय सती गेल्या होत्या?

संपुर्ण भारतातल्या १८ व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक असणार्‍या अहिल्यामातेला त्यांनी आज दुषणे लावलीत.

उद्या ह्या बाई म्हणतील मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी सुरू केली नसून ती भलत्याच कुणीतरी सुरू केलेली होती.

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या या समरतेच्या भुरट्या सरकारी इतिहासकारांना त्यांची जागा आत्ताच दाखवली नाही तर हे लोक सगळाच इतिहास बदलून टाकतील.

ही प्रवृत्ती घातक आहे.

-प्रा.हरी नरके, १ जून २०१९