Showing posts with label बोधकथा. Show all posts
Showing posts with label बोधकथा. Show all posts

Friday, May 15, 2020

तुला देईन, त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्‍याला देईन

माझा एक टिकाकार मित्र एक गोष्ट सांगत असतो.

एक होता राजा.कुस्त्यांचा शौकीन.जिंकणार्‍या पहिलवानाला मागेल ते देणारा.

एकदा असेच जिंकलेल्या पहिलवानाला राजा म्हणाला, काहीही माग, जे मागशील ते मिळेल.

पहिलवान मागण्यांची यादी करायला लागला.जमीन, बंगला,गायी-म्हशी, सोनं,सम्पत्ती.....

यादी वाढतच चालली तेव्हा चतुर राजा म्हणाला, हे बघ. माझा शब्द असल्यामुळे तुला मागशील ते मिळेलच.
पण आता माझी एक अट आहे.जेव्हढे तुला देईन, त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्‍याला देईन.

पहिलवानाने मागण्यांची यादी फाडून टाकली.म्हणाला, त्याला माझ्या दुप्पट मिळणार?
मग असं करा महाराज, माझा एक डोळा फोडा!

माझा मित्र म्हणतो तो पहिलवान समाजवादी नेता असणार. हो नेताच. कारण समाजवाद्यांमध्ये प्रत्येकजण नेताच असतो. कार्यकर्ता असतो कुठे?

मला काही हे पटत नाही.

मुळात सर्व क्षेत्रात हारण्याचं, आत्मनाशाचं, स्वकीयांबद्दलच्या जळफळाटाचं, भांडकुदळपणाचं आणि दळभद्रीपणाचं वर्ल्ड रेकॉर्ड केलेले समाजवादी
कुस्ती जिंकणं शक्य आहे? जे जिंकतात, यशस्वी होतात ते कडू असतात असं जे मानतात, ते जिंकण्याचा डाग स्वत:ला लावून घेतील?
तेव्हा तो जिंकलेला पहिलवान समाजवादी असू शकत नाही.

-प्रा. हरी नरके, १५/५/२०२०

Saturday, October 6, 2018

सापात चांभार की माणसात साप ?



सत्यशोधक चळवळीने आधुनिक भारतात सर्वप्रथम जातीनिर्मुलनाचा विषय हाती घेतला. जातीव्यवस्थेचे लाभार्थी आणि शोषित अशी ही सरळ लढाई नव्हती. जातीव्यवस्थेकडून नागवले जात असूनही तिचे समर्थन करणारे लोक होते आणि जातीव्यवस्थेचे लाभ मिळत असूनही तिला विरोध करणारे विवेकी लोकही होते. असे गुंतागुंतीचे चित्र पुढे येऊ लागले.
महाडच्या सत्याग्रहातून जातीचा हा मुद्दा आणखी कणखरपणे पुढे आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रीय अंगाने जातीनिर्मुलनाची आवश्यकता प्रभावीपणे मांडीत असत.

अलिबागचे कुलाबा समाचार हे सनातन्यांचे वर्तमानपत्र होते. ते जातीव्यवस्थेचे समर्थक होते. या वर्तमानपत्राने एक खोडसाळ बातमी छापली. पेणच्या पिठ्या महाराला साप चावला असता त्याच्यावर उपचार करणार्‍या मांत्रिकाने म्हणे सांगितले की त्याला चांभार जातीचा साप चावलेला आहे. ते ही सांगोवांगी बातमी भरपूर मिठमसाला लावून छापूनच थांबले नाहीत तर त्यांनी सत्यशोधकांना सवाल केला, " जिथे सापात चांभार आहेत, तिथे माणसातल्या जाती जाणं कसं शक्यय? जी जात नाही ती जात."


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारतातून याचा खरपूस समाचार घेतला. बाबासाहेबांनी दिलेले उत्तर बिनतोड तर होतेच पण आजही ते उद्बोधक आहे. मार्गदर्शक आहे.
त्यांनी कुलाबा समाचारकर्त्यांना काही प्रश्न विचारले.

१. मुळात परळला स्थापन झालेल्या [ पुढे हाफकीन इन्स्टीट्यूट म्हणून नावाजलेल्या ] वैज्ञानिक संस्थेत हे सिद्ध झाले आहे की, सापाचे विष मंत्राने उतरत नाही. त्यासाठी डॉक्टरी इलाज करावे लागतात. तर पिठ्याला डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाकडे का नेले?

२. मांत्रिकाने अंगात आल्यावर म्हणे पिठ्याच्या अंगात आलेल्या सापाला काही प्रश्न विचारले. "तू कुठे आहेस? तू पिठ्याला का चावलास? सापा, तुझी जात कोणती?"
तर साप म्हणाला की, " मी आता जंगलात फिरतोय. पिठ्याचा मला धक्का लागला म्हणून मी चावलो. मी चांभार जातीचा साप आहे."

जर तो साप ज्यावेळी पिठ्याच्या अंगात आला होता त्याचवेळी तो जंगलातही फिरत होता, याचा अर्थ सापाला दोनदोन आत्मे असतात काय?


३. मुळात सापाला जात विचारण्याचे कारण काय? मांत्रिकाने त्याला जात विचारली यावरून जात मांत्रिकाच्या डोक्यात होती व तोच जातीग्रस्त असल्याचे सिद्ध होते.

४. जाती जर कामावरून आल्या असे जातीव्यवस्थेचे समर्थक सांगतात, म्हणजे लोखंडाचे काम करतो तो लोहार, सोन्याचे काम करणारा सोनार आणि चामड्याचे काम करणारा चांभार. तर सापाला मूळात पायच नसतात. त्यामुळे तो चप्पल, बूट, सॅंडल घालत नाही. मग सापात चांभार कसे काय असतील?

५. याचा अर्थ असाय की सापात चांभार नसतात पण माणसांमध्ये मात्र सापाच्या प्रवृत्तीचे काही लोक असतात. आणि ते सर्व जातींमध्ये असतात. जाती निसर्गाने निर्माण केलेल्या नाहीत. त्या मानवनिर्मित आहेत. जर निर्धार केला तर माणूस जाती घालवू शकतो. जातीनिर्मुलनाची खरी लढाई ही मानसिकतेविरूद्धची लढाई आहे. ती प्रवृत्तीविरूद्धची लढाई असल्याने तिच्याविरूद्ध चिवटपणे चळवळी करीत राहाव्या लागतील. जात जाईल पण त्यासाठी शिक्षण, विज्ञाननिष्ठा, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा विचार सर्वांनी स्विकारायला हवा. तो आचरणात आणायला हवा. जातीतल्या लग्नांना नकार द्यायला हवा. स्त्रीपुरूष समता, ज्ञानार्जन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा यांची कास धरावी लागेल. आपल्याला जातीच्या बहुमतावर चालणारी लोकशाही नको, आपल्याला विचारांचे बहुमत हवेय असा निर्धार करायला हवा."
{ पाहा- डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८,  [ ब.भा.१६ ऑगष्ट १९२९ ] पृ.३११}

-प्रा.हरी नरके, ६ आक्टोबर २०१८

Wednesday, September 19, 2018

आंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र


आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्या सासर्‍यानेच त्याची हत्त्या केली. त्यासाठी एक कोटी रूपयांची सुपारी दिली. पोटच्या पोरीला, गरोदर मुलीला, जातीबाहेर लग्न केल्याची शिक्षा म्हणून जावयाची हत्त्या केल्याची तेलंगणामधली ही घटना संतापजनक आहे. नवविवाहीत अमृता वार्षिणी आपला पती प्रणय याला गमावून बसली. मुलीपेक्षा जात मोठी ही काय मानसिकता आहे?

कोल्हापूरची मेघा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णीच्या हत्त्येची घटनाही फार जुनी झालेली नाही. गेल्या पाचदहा वर्षात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या हत्यांना रानटी, जातीयवादातून केलेल्या निर्घृण हत्त्या म्हणण्याऎवजी ऑनर किलिंग म्हणणे हा तर मुर्खपणाचा कळस आहे.

नागराज मंजूळेंनी सैराट या मराठी चित्रपटाचा शेवट तेलंगणा राज्यात हैदराबादला झालेला दाखवलेला आहे. असे आणखी किती सैराट आपल्या आजूबाजूला घडणारेत?

कथासाहित्याचा जन्म भारतात झालेला आहे. पुराणकथा तर अतिशय रंजक, प्रभावी आणि खोलवर संस्कार करणार्‍या असतात. पुराणातील वांगी [वाणगी] पुराणातच ठिक आहेत असे आपण म्हणत असलो तरी त्यांचा प्रभाव अबोध मनावर पिढ्यानुपिढ्या टिकून राहतो. जाती व्यवस्थेचे पाईक तर सर्वच जातीजमातींमध्ये आहेत. जातीसाठी खावी माती ही वृत्ती सर्वांच्याच हाडीमाशी भिनलेली आहे.


फार पुर्वी पुराणातली मुरलीचरित्र नावाची कथा वाचनात आली होती. जुने किर्तनकार ती कथा सांगत असत.
पैठणला एक अस्पृश्य समाजातला बुद्धीमान मुलगा राहत असतो. तो एका संस्कृत पंडीताच्या घरी गोठा स्वच्छ करण्याचे काम करीत असे. पंडित म्हणत असलेले मंत्र, श्लोक गायाबैलांचे शेण काढताना, गोठा झाडताना त्याच्या कानावर पडत असत. तो मुलगा एकपाठी होता. एकदा ऎकलेला शब्द तो कधीच विसरत नसे. अल्पावधीत त्याला असंख्य मंत्र आणि श्लोक यांचे ज्ञान झाले. तो ते घडाघडा म्हणत असे.


एके दिवशी त्याने आपला गाव सोडला. तो पायी चालत पार नाशिकला गेला. तिथे गोदातीरावर आंघोळ करीत असताना तो म्हणत असलेले मंत्र शेजारच्या भटजींच्या कानावर पडले. त्याचे त्या लहान वयातले स्वच्छ आणि लयदार उच्चार ऎकून भटजी प्रभावित झाले.
त्यांनी त्याची आपुलकीनं विचारपूस केली.

मुलाने घाबरून जाऊन आपली जात चोरली. कुल,गोत्र सारंच बनवून सांगितलं. आपण पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न अशा महामहोपाध्यायांच्या घराण्यातले असल्याचे त्याने खोटेच सांगितले. आपले आईवडील महापुरात वाहून गेल्याचेही पुढे सांगितले. भटजी त्याला आपल्या घरी घेऊन गेले. त्याला जेवायला घातले.
त्याच्या पु्ढच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मुलगा गुणी होता. बुद्धीमान आणि कर्तबगार होता. म्हणताम्हणता त्याने नाव काढले.

अल्पावधीतच तो मुलगा सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. भटजींनी त्याला आपला घरजावईच करून घेतले.

त्याची पत्नी सुशील होती. तिचे पतीवर प्रेम होते.

मला एकदा माझे सासर बघायचे आहे, मला गावी घेऊन चला असा ती हट्ट करी. तो काहीतरी सबबी सांगून वेळ मारून नेई.

एकदा मात्र त्याची पत्नी हट्टाला पेटली. तिने अन्नपाणी वर्ज्य केले. त्याचा अगदीच नाईलाज झाला.
ते दोघे त्याच्या गावी निघाले.

तो चिंतित होता. आता आपले भांडे फुटणार या भितीने घाबरला होता. त्याला काहीच सुचत नव्हते. गुन्हा कबूल करावा तर बायको अंतरेल अशी भिती वाटत होती.

घनदाट जंगलातून जात असताना त्याने एका विहीरीत बायकोला ढकलून दिले आणि तो नाशिकला परत आला.

तुमची मुलगी विहीरीत पाणी पिताना पाय घसरून पडली आणि बुडाली असे त्याने सासू-सासर्‍यांना खोटेच सांगितले.

त्यांनी अपार शोक केला.
असेच दिवस जात होते.

एके दिवशी त्याची बायको साक्षात सुखरूप हजर झाली. तिला बघून तिच्या आईवडीलांना अपार आनंद झाला. तिचा नवरा मात्र खूप घाबरला.
त्याच्या पत्नीने मात्र त्याला सावरून घेतले. माझा पाय घसरून मीच विहीरीत पडले. यांना पोहता येत नसले तरी यांनी मला वाचवायचे खूप प्रयत्न केले वगैरे कथा तिने तयार करून सांगितली.

त्याचा जीव भांड्यात पडला. तिने आपल्याला वाचवले या जाणीवेने तो भारावून गेला. विहिरीत उगवलेल्या एका पिंपळाला आपण लटकून राहिलो आणि काही दिवसांनी तिकडून जात असलेल्या सैनिकांच्या टोळीने आपल्याला कसे वाचवले याची चित्तथरारक कथा तिने त्यांना सांगितली.

रात्री एकांतात असताना त्याने तिचे पाय धरले. मी चुकलो म्हणून तिची क्षमा मागितली.
तिने नवर्‍याला माफ केले. पावसाने झोडपले आणि नवर्‍याने मारले तर तक्रार करू नये असे तिचे संस्कार सांगत होते. ती पतिव्रता असल्याने तिच्या पतीला तिच्या हत्त्येचा गुन्हा माफ वगैरे होता.

आपण तिची हत्त्या करण्याचा प्रयत्न केला तरी तिने उदार मनाने आपल्याला माफ केल्याचे बघून त्याचे डोळे पाणावले. तिला आता सगळे खरेखरे सांगून टाकावे असे त्याला वाटले. त्याला बायकोबद्दल पुर्ण विश्वास वाटू लागला. आपण जात चोरल्याचे त्याने त्याभरात तिला सांगून टाकले.

ती अंथरूणातून ताडकन उठली.

म्हणाली, "माझी हत्त्या तुम्हाला माफ आहे. पण तुम्ही जात चोरलीत हे मात्र कधीच क्षम्य नाही."

तिने नवर्‍याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला पेटवून दिले. जाळून मारले. संपवून टाकले.
पुढे तिथे उगवलेल्या बांबूंच्या मुरलीतून ही कथा चिरस्थाई झाली.

-प्रा. हरी नरके, १९ सप्टेंबर २०१८

Wednesday, August 1, 2018

मग माझा एक डोळा फोडा -





आजकालचे पहिलवान गुणवान, व्यवहारी आणि चतुर असतात.
पण ही जुन्या काळातली गोष्ट आहे. तरी ती आपल्या समकालीन मानसिकतेवर प्रकाशझोत टाकणारी आहे.

तर एक होता पैलवान. एकदम जंक्शान. जिथं जायचा तिथून जिंकूनच यायचा. पठ्ठ्या असा की प्रत्येक मैदान त्याच्या विजयाची गाणी गात होतं.
राजानं त्याला निमंत्रित केलं. देशोदेशीच्या पैलवानांना बोलावलं. जंगी कुस्त्या झाल्या. आपला पैलवान सर्वात अजिंक्य ठरला.

राजा खूश झाला. पैलवानाला म्हणाला, " मी तुझ्यावर निहायत खूशाय, माग तुला जे मागायचं असेल ते! जे जे मागशील ते ते सारं तुला मिळेल. सांग काय काय हवंय तुला?"

पैलवानानं कागद घेतला, बोरू घेतला आणि यादी करायला सुरूवात केली.
तालीम हवी. राहायला राजमहाल हवा. पाच हजार एकर जमीन हवी. शंभर बैल, दोनशे गाया, तीनशे म्हशी हव्यात.
दहा किलो सोनं हवं..... यादी काही संपतच नव्हती.

राजा उभं राहून राहून वैतागला.
पैलवानाला म्हणाला, "माझा शब्द गेलेला असल्यानं तू मागशील ते तुला नक्कीच मिळेल. पण आता माझी एक नविन अट आहे."
पैलवान घाबरला. म्हणाला, "अट? ती अन कसली?"

" अट अशीय की जेव्हढं मी तुला देणार त्याच्या दुप्पट तुझ्या शेजार्‍याला मी देणार."
पैलवान म्हणाला, "असंय काय?"

त्यानं सगळी यादी फाडून टाकली आणि राजाला म्हणाला, "असं असेल तर मग माझा एक डोळा फोडा महाराज!"
-प्रा.हरी नरके

Thursday, October 19, 2017

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर का केलं?


आम्हाला शाळेत गोखलेसर गीता शिकवायचे.एकदा ते म्हणाले, मुलांनो सांगा, संजय उवाच नं सुरू होणारी गीता संजयानं आपलं प्रतिकूल मत देताच का संपली?
आम्हाला कोणालाच उत्तर देता आलं नाही.

सर म्हणाले, गीता कुठे संपते? संजय म्हणाला, "तर धृतराष्ट्रा, ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे, ती बाजू [पांडवांची बाजू] जिंकणार असं माझं मत आहे."

मग काय झालं?

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर केलं.
" लेका, मीठ खातोस कौरवांचं नी विजय चिंततोस पांडवांना?"
त्याचा दुसरा भयंकर गुन्हा म्हणजे धृतराष्ट्रानं संजयाला ड्युटी काय सांगितली होती, तर तिकडे रणांगणावर काय चाललंय ते तेव्हढं सांगायचं. हा लेकाचा स्वत:ची मतं सांगायला लागला. तेव्हा गीता संपताना काय धडा शिकवते मुलांनो? आपण नोकरीत असताना, आपल्या मालकानं विचारलेलं नसताना, आपलं मत सांगू नये, अनाहुत सल्ला देऊ नये, खरं असलं तरी मालकाविरूद्ध बोलू नये! मात्र लगे हात उदात्तीकरण करीत राहावं."

गीतेच्या या शिकवणुकीचा फायदा आजचे सगळेच लोक्स अगदी कौरव पांडवही घेत असतात.

राज्याच्या उभारणीत त्यांचं योगदान मोलाचंच आहे. पण त्याचा दामदुप्पट परतावाही त्यांना जनतेनं एकहाती 50 वर्षे सत्ता देऊन केलेला आहे. मुद्दा एव्हढाच आहे की यशाचे मानकरी आपण असलात तर दुर्गतीचे अपश्रेयही तुम्हालाच घ्यावे लागेल ना? तुमच्या यांव केलं नी त्यांव केलं ह्या मार्केटिंगचा उबग आलाय. 80 टक्के समाजकारण नी 20% राजकारण हा तुमचा दावा. प्रत्यक्षात मात्र तुम्ही 24 बाय 365 केलंत ते  फक्त 200 टक्के राजकारण. तुमची दुसरी बाजूही कळू द्या ना जनतेला!
नरूभाऊ दाभोळकरांची अमाणूस हत्त्या झाली. तुम्ही पुण्यावर लादलेला पोळ गुन्ह्याचा तपास करायचं सोडून प्लॅंचेट लावत बसला होता. सलग 15 वर्षे गृहखाते तुमच्या हातात असूनही गुन्हेगार तुम्ही शोधलेच नाहीत. परिणामी आणखी तीन हत्त्या झाल्या.

मालक, कोणाकोणाची जात सार्वजनिक व्यासपीठावर उद्धरतात, प्राचीन साहित्य नी संशोधन संस्था जाळणारांचं औरंगाबादच्या अ.भा.म.साहित्य संमेलनात जाहीर समर्थन करतात, एखाद्याचं इतिहासलेखन पटत नसेल तर त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून त्यांना मिळालेल्या राज्य पुरस्काराचे आपल्या चंपकांमार्फत वाभाडॆ काढतात, केव्हढी ही सहिष्णुता! केव्हढं हे निकोप अभिव्यक्तीचं प्रेम.

टिकाकार आणि विरोधकांकडे बघायची मालकांची दृष्टी इतकी व्यापक की अग्रलेख लिहिला म्हणून कुमार केतकरांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या जिवलग स्वपक्षीयांना ह्यांनी शब्दानं किरकोळ विरोध करीत पण कृतीनं मात्र पक्षात बढती दिली, यालाच म्हणतात लेखन स्वातंत्र्याबद्दलचा आदर!

एका शाळकरी मुलीनं एका नेत्याबद्दल फेसबुकवर काय लिहिलं तर यांच्याच राज्यात तिला ताबडतोब अटक करण्यात आली, तिच्या मदतीसाठी यांनी सेल काढला होता काय? ती स्वजातीय-स्वचाकरीतली असती तर विचार केलाही असता म्हणा.

एक संपुर्ण समाज दंगली घडवून जाळून किंवा कापून मारा असं पुस्तक लिहिणारांचे सत्कार हे मालक स्विकारतात आणि त्यांनीच आजवर खरा इतिहास महाराष्ट्राला शिकवला असा ताम्रपटही त्यांना  बहाल करतात, किती ही वैचारिक सहिष्णुता!

हजारो निरपराध्यांचं धार्मिक हत्त्याकांड करणारांना यांनी आपली सत्ता वापरून संरक्षण पुरवलं असा आरोप यांच्यावर अनेकदा झालाय. त्याची गुरूदक्षिणा ते खातायत.

यांची सेक्युलरनिष्ठा इतकी पक्की की निवडणुकीचे निकालही लागले नव्हते तर हे सच्च्या "सेक्युलरांना!" सत्तेसाठी पाठींबा देऊन मोकळे झाले.

अशा साक्षात दंतकथाच असलेल्या इतिहासपुरूषांचं जे उदात्तीकरण करणार नाहीत ते केवळ B/W चित्रण करणारेच म्हटले पाहिजेत. हाच आवाज आहे अवघ्या महाराष्ट्राचा!
- प्रा.हरी नरके

Tuesday, May 2, 2017

भीमसेन जोशी

वसंत पोतदारांनी सांगितलेली एक हृद्य आठवण - एके काळी भीमसेन जोशी गाण्याच्या मैफली करण्यासाठी भारतभर दौरे करत होते. त्यांची ड्रायव्हिंगची आवड तर प्रसिद्धच आहे. तबले, तानपुरे घेऊन साथीदारांसह स्वत:च मैलोनमैल गाडी चालवायचे. गुलबर्ग्यात कुठंतरी त्यांचं गाणं होतं. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. लवकरच ते एका गावात शिरले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत. तेवढ्यात अण्णा म्हणाले, "आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या..!" रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली. अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा..! अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, 'काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..' अण्णा कानडीतनं बोलत होते. रामण्णाही ओळखीचं हसले..थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला.. साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला - "इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती. स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे.. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली". "उसळ-चपाती पाहिजे काय?", असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता. रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!" "घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!" "जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही. रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची?" रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते.. रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता..! --Forwarded

Tuesday, March 28, 2017

जेआरडी टाटा यांचा विमानप्रवास

जेआरडी टाटा यांचा विमानप्रवास
जेआरडी टाटा एअर इंडीयाचे चेअरमन होते. एकदा त्यांना कलकत्त्याला जायचे होते. ते बोर्डींग पास घेत असतानाच एक प्रवासी धावतपळत आला. त्याला अर्जंट कलकत्त्याला जायचं होतं. विमानात तर एकही जागा शिल्लक नव्हती. जेआरडींनी आपले तिकीट कॅन्सल केले आणि ते त्या प्रवाशाला द्यायला लावले. त्यानं जाताना जेआरडींचे खुपखुप आभार मानले.
काऊंटरवरचा कर्मचारी जेआरडींना म्हणाला, "सर, तुम्ही तिकीट रद्द करून त्यांना का दिले?"
जेआरडी म्हणाले, "अरे ते संघानिया नावाचे उद्योगपती आहेत. त्यांची आई आजारी आहे. तिला भेटायला तातडीनं कलकत्त्याला पोचणं आवश्यक होतं त्यांना. माझं काय मी नंतरच्या फ्लाईटनं गेलो तरी चालण्यासारखं आहे. शिवाय मी चेअरमन असल्यानं मला तिकीट मोफत आहे. पण ते पैसे भरणार होते. तेव्हा गरजू ग्राहकाला प्राधान्य द्यायचं हे नेहमी लक्षात ठेव."
.............
एकदा जेआरडी दिल्ली-मुंबई फ्लाईटनं प्रवास करीत होते. ते स्वच्छता गृहात जाऊन बराच वेळ झाला म्हणून हवाई सुंदरीला काळजी वाटली. चेअरमन आहेत, शिवाय म्हातारं माणूस आहेत. तेव्हा बघितलेलं बरं म्हणून तिनं जाऊन दरवाजावर टकटक केलं.
जेआरडींनी दरवाजा उघडला, तिनं पाहिलं, त्यांच्या हातात कापडाचे रूमाल होते, ते नीट लावून ठेवत होते.
ते तिला, म्हणाले, "हे बघ ग्राहकांसाठी ठेवलेले हे सगळे रूमाल खाली पडले होते. ते खराब झाले असते ना. म्हणून मी ते परत उचलून ठेवत होतो."
ती संकोचून म्हणाली, "अहो, तुम्ही कशाला असलं हलकं काम करताय? मला सांगायचंत, मी केलं नसतं का?"
जेआरडी म्हणाले," एकतर तू कामात होतीस. आणि काम कोणतंही हलकं वगैरे नसतं. मी चेअरमन असलो तरी शेवटी या कंपनीचा मीही एक भाग आहे, तेव्हा माझ्या घरचं काम करण्यात कसला आलाय कमीपणा?"
...............

दिलीपकुमारचा विमानप्रवास

सुपरस्टार दिलीपकुमारचा विमानप्रवास
अभिनेता दिलीपकुमार लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाचा काळ होता. एके दिवशी त्याला मुंबईचे शूटींग संपवून संध्याकाळच्या फ्लाईटने दिल्लीला 
जायचे होते. सामान्यपणे विमान कोणासाठीही थांबवून ठेवले जात नाही, परंतु खुद्द कॅप्टन आणि विमानातले सगळेच कर्मचारी दिलीपकुमारचे फॅन होते. आणि दिलीपकुमारची इंट्री झाली. सगळ्यच प्रवाशांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्यानं सर्वांना अभिवादन केलं.
बिझनेस क्लासमध्ये तो बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं आख्खं विमान आपल्याकडं बघतय. मात्र शेजारच्या म्हातार्‍याला त्याची काहीच खबर नव्हती. तो पेपर वाचत बसला होता.
दिलीपकुमारनं मुद्दामच उठून खाली बसताना तोल गेला असं दाखवत म्हातार्‍याला धक्का मारला. पेपरमधून डोकं बाहेर काढत म्हातारा दिलीपकुमारकडं बघून हसला आणि परत पेपर वाचू लागला. हा अपमान दिलीपकुमारला फारच झोंबला. बघून परत पेपर वाचत बसतो काय? त्यानं पुन्हा तसंच केलं. म्हातार्‍याकडं बघत सांगितलं, "मी सुपरस्टार दिलीपकुमार."
ते वृद्ध गृहस्थ अतिशय नम्रतेनं म्हणाले, " हो का. धन्यवाद. बाय दे वे काय करता आपण?"
दिलीपकुमार म्हणाला, " तुम्ही सिनेमे पाहात नाही?"
ते म्हणाले, "नाही हो, मी या वयात फक्त अठराच तास काम करू शकतो. अनेक वर्षांपुर्वी मी शाळेत असताना माझ्या आईसोबत एक बघितला होता. तोच एकमेव."
दिलीपकुमारचा इगो दुखावला गेला. " तुम्ही आहात तरी असे कोण?"
ते वृद्ध अतिशय आपुलकीनं म्हणाले, " तरूण मुला, माझं नाव जे. आर. डी. टाटा. मी एक सामान्य उद्योजक आहे."

एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो

एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो
एका राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळातील सहकार्‍यांना घेऊन गारपिटीची पाहणी करायला गेले होते. एका शेतकर्‍याची ते आस्थेवाईकपणे विचारपूस करीत असतात.
" अरे वा, छान टोमॅटो लावलाय तुम्ही. मला खुप आवडतात टोमॅटो. मी दररोज खातो. मी आता थेट अमेरिकेत टोमॅटो निर्यात करण्याचा निर्णय घेणार आहे. आपण त्याला युरिया, सुफला झालंच तर नेटवर मी बघतो आणि अधिकार्‍यांना तशा सुचना देतो, लागेल ते खत घालू, त्याच्या जोरावर ह्या झाडाला प्रत्येकी एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो येतील अशी व्यवस्था करू. कालच माझं केंद्रीय कृषीमंत्री आणि मा. पंतप्रधान यांच्याशी बोलणं झालंय. ते शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत. ते ट्रंपसाहेबांशी चर्चा करणारेत. मला सांगा, यावर तुमचं काय मत आहे?"
शेतकरी म्हणाला, " साहेब, आम्ही अडाणी माणसं, आम्हास्नी काय कळतंया? हा आता एव्हढं मात्र खरं की या झाडाला अगदी माह्यावाल्या हाडांचं जरी खत घातलं ना तरी त्याला टमाटे काय यायचं नाहीती."
"काय बोलताय? आमच्या राज्यात काय अशक्य आहे? कालच कॅबिनेटमध्ये आम्ही तसा निर्णय घेतलेला आहे, का नाही येणार टोमॅटो?"
"त्याचं कायंय की, शीएमसाह्यब, हे वांग्याचं रोपटं हाय!"
..................
ओळखा पाहू हे डिजिटल सीएम कोणत्या राज्याचे सीएम असतील?
....................
आपला देश आणि राज्य कृषीप्रधान आहे, मात्र देशाच्या आणि राज्याच्या प्रधानांना कृषीचं ज्ञान आहे का? असा प्रश्न प्रमोद महाजन विचारायचे, यानिमित्तानं त्याची आठवण झाली.
.....................

Sunday, March 19, 2017

साधूचा वेश..

राणी एकदा आजारी पडली.
राजा काळजीत पडला.
त्यानं राजवैद्याला हरप्रकारे प्रयत्न करा, राणी बरी झालीच पाहिजे असा हुकुम सोडला.
राजवैद्यानं खूप प्रयत्न केले, पण यश काही मिळत नव्हतं.
राजा चिडला.ओरडला. तुम्हाला जमत नसेल तर नोकरी सोडा म्हणाला. राजवैद्य म्हणाले महाराज एक उपाय आहे. शेजारच्या राज्यातले वैद्य अतिशय निष्णात आहेत.त्यांना पाचारण करावे.
दूत दौडले.
शेजारच्या राज्यातले राजवैद्य यांचे आगमन झाले.
त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या. म्हणाले, "आजार गंभीर आहे. आता एकच उपाय, राणीला दररोज राजहंसाचे मांस घाऊ घातल्रे तरच राणी जगेल."
राजानं हुकुम सोडला. सैनिक सरोवरावर धावले. त्यांनी राजहंस मारून आणला. राणीला मांस खाऊ घातले.
चार दिवसात सैनिक हिरमुसले होऊन रिकाम्या हातानं परतले. "महाराज, आम्हाला येताना बघितलं की राजहंस दुर पळून जातात. शिकार काही मिळत नाही."
राजानं राजपुरोहितांना बोलावलं.
सल्लामसलत केली.
नवा निर्णय झाला.
सैनिकांचा गणवेश बदलण्यात आला. सैनिकांनी साधूंचा वेश परिधान केला.
साधूच्या वेशात सैनिक निघाले.
राजहंसांनी बघितलं. म्हणाले," चिंतेचं कारण नाही.हे साधू आहेत. सर्वसंगपरित्याग केलेले. त्यांच्यापासून आपल्याला धोका नाही."
साधूनं लपवलेला धनुष्यबाण बाहेर काढला. राजहंसाची शिकार केली.
राणी राजहंसाच्या मांसावर ताव मारू लागली.