Showing posts with label सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती. Show all posts
Showing posts with label सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती. Show all posts

Sunday, December 27, 2020

चरित्र मालिकांची शोकांतिका..

 

दातृत्व हा शब्द फिका पडेल इतके काम समाजासाठी करणाऱ्या काही थोर व्यक्ती इतिहासात घडून  गेल्या आहेत. ज्यांनी स्वत:चे मीपण बाजूला सारून, देहभान विसरून, रंजल्यागांजलेल्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. समाजात समता नांदावी आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे एवढीच काय ती अपेक्षा त्यांनी केली. अशाच काही व्यक्तिरेखांवर आधारलेल्या मालिकांना करोनाकाळानंतर प्रेक्षक प्रतिसादाअभावी अर्ध्यातच निरोप घ्यावा लागला आहे.. 

टीआर कमी पडल्याने मालिका बंद होणे स्वाभाविक आहे, कारण सरतेशेवटी हा व्यवहार आहे, लोकांनीच प्रतिसाद दिला नाही तर वाहिन्या आणि निर्मिती संस्था तरी काय करणार?  या घटनेकडे बारकाईने पाहिले तर हा केवळ मालिकाच नाही तर एकूणच अभिरुचीचा मुद्दा वाटतो. कारण चरित्रात्मक पुस्तके वाचण्याचाही कल हल्ली मावळलेला जाणवतो. त्यात महापुरुषांकडे जातीय चष्म्यातून पाहणारा वर्गही अस्तित्वात आहेच. तर दुसरीकडे करोनामुळे लोकांच्या मनावर झालेले परिणाम, जगण्याचे प्रश्न यात लोकांचे प्राधान्यक्रम बदललेले दिसतात. त्यामुळे प्रतिसाद नेमका कशाने कमी झाला हा अजूनही चर्चेचा विषय ठरतो आहे. गेल्या आठवडय़ात ‘सावित्रीज्योती’ मालिका प्रेक्षक प्रतिसादाविना बंद झाली. वर्षभर अथक मेहनतीने उभा केलेला प्रपंच एकाएकी अर्ध्यावर थांबला. अर्ध्यावरच म्हणणे योग्य आहे, कारण अजून चाळीस वर्षांचा आणि महत्त्वाचा कालखंड येणे बाकी होते. सत्यशोधक समाजाची स्थापना, दलितांच्या लढय़ातील योगदान, स्त्रियांसाठी उचललेली पावले, तथाकथिक विचारांना छेद देणारे लेखन अशा नाना गोष्टी मालिकेतून निसटल्या. ज्या लोकांपर्यंत पोहोचायलाच हव्या होत्या. हीच बाब काही महिन्यांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेविषयीही झाली. कथानक नियोजित वेळेपेक्षा अधिक वेगात नेऊन संपवण्यात आले. यानिमित्ताने अनेक प्रश्न वर डोकावू पाहत आहेत, ते म्हणजे थोर व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेण्याची आपली क्षमता संपली आहे, परिस्थिती बदलली आहे की जाणिवेचा मुद्दा आहे?

अनेक चरित्र मालिका आणि चित्रपटांच्या अभ्यास मंडळावर असलेले प्रा. हरी नरके सांगतात, ही केवळ पुस्तकांवर आधारलेली मालिका नव्हती. कारण मधल्या काळात बरेच संशोधन झाले आहे. लोकांना अजूनही न समजलेल्या गोष्टी या माध्यमातून आम्ही दाखवणार होतो. आपल्याला जोतिबांनी केवळ शाळा सुरू केली एवढेच माहिती आहे. पण शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम, शेती आणि उद्योगाचे शिक्षण, शैक्षणिक गळतीचा प्रश्न, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणाची सोय, केशवपनाविरोधात नाभिकांचा संप, १८८० ला केलेला पहिला शिवजयंती उत्सव असे बहुमोलाचे कार्य फुले दाम्पत्याने केले आहे. मालिका अर्ध्यावर थांबली नसती तर तेही पोहोचवता आले असते. ‘व्याख्यानांतून, पुस्तकांतून या व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचतात, पण त्याला मर्यादा येतात. मालिकेच्या माध्यमातून त्या अधिक प्रभावी आणि सचित्र समोर उभ्या राहतात. या मालिकेला सुरुवातीला प्रतिसाद होता, परंतु दोन अडीच महिन्यांतच टाळेबंदी झाली आणि टाळेबंदीनंतर कदाचित लोकांच्या गरजा बदलल्याने प्रेक्षक पुन्हा मालिकेकडे वळला नाही. लोकांपुढे जगण्याचा प्रश्न जटिल असल्याने स्थलांतर, आर्थिक विवंचना असेही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहेत. मुळात फुलेंसारखी मंडळी भरीव कामगिरी करूनही तेव्हाही अंधारात होती आणि आजही अंधारात आहेत याचे दु:ख वाटते’, अशी खंत नरकेंनी व्यक्त केली.

ऐतिहासिकपट अभ्यासू पद्धतीने उलगडणारे दिग्पाल लांजेकर याविषयी बोलताना म्हणाले, ‘मालिका उत्तम सादर केली गेली होती. तिला प्रेक्षक प्रतिसाद का कमी पडला हा संभ्रमच आहे. उत्तम निर्मिती, उत्तम वाहिनी, हरी नरकेंसारखे अभ्यासक, भूमिकेला न्याय देणारे कलाकार सगळी भट्टी उत्तम जमली होती. परंतु प्रेक्षकांचा कल नेमका लक्षात येत नाही. म्हणजे आपण त्यांना एखादी अभिजात गोष्ट देऊ पाहतोय, पण त्यांनाच ती पाहायची नाही का असे वाटते. एखादा वेगळा विषय आणल्यानंतर त्याला तात्पुरता प्रतिसाद मिळतो, परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे नाईलाजाने वाहिन्यांनाही सासूसुनांच्या मालिकांचा पर्याय स्वीकारावा लागतो. प्रेक्षकांनी जर अशा विषयांना उचलून घेतले तर आम्हालाही नवे विषय आणायला उत्साह येईल. शेवटी प्रेक्षकच आपल्याला या दुष्टचक्रातून सोडवू शकतात’. हा करोनाचा फटका असावा असेही लांजेकर यांना वाटते. त्यांच्या मते, कारोनाकाळात लोक वैतागले आहेत. त्यामुळे प्रबोधनापेक्षा मनोरंजनाला अधिक पसंती मिळत असावी. विचार करायला लावणाऱ्या गोष्टी, डोक्यावर नको आहेत लोकांना. विशेष म्हणजे याला कोणताही जातीय रंग वाटत नाही, या मालिकांना सर्व स्तरातून प्रेक्षक पसंती मिळालेली मी पहिली आहे. अगदी मालिका बंद झाल्यानंतरही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महापुरुषांना आपण एका विशिष्ट चष्म्यातून पाहता कामा नये. सध्या निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रेक्षकांचा कल अभ्यासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘सावित्रीजोती’ या मालिकांचे निर्माते नितीन वैद्य या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, ‘‘सोनी वाहिनी सुरू झाली तेव्हा आजवर समाजासाठी झटलेल्या २६ व्यक्तिरेखा घेऊन ‘गर्जा महाराष्ट्र’ ही मालिका केली. ज्यामध्ये या सर्व थोर व्यक्तींच्या कामाला उजाळा देण्यात आला. त्यातूनच सुधारणेचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि फुले दाम्पत्याची कथा मालिकेतून मांडण्याचा विचार आला. त्याला संशोधनाची जोड देण्यात आली. या दोन्ही मालिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ बहुजनांचाच नाही तर सर्वस्तरातून मिळाला. घडलंय ते लपवायचे नाही आणि नाही ते घडवायचे नाही हे आमचे आधीच ठरले होते. दोन्ही व्यक्तिरेखांचे बालपण, जडणघडण सर्व काही पोहोचवले. जेणेकरून ती माणसे काय परिस्थितीत जगली आहेत हे लोकांसमोर येईल. आम्ही आमच्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु करोनामुळे लोकांची दैनंदिन मालिका पाहण्याची सवय मोडली. प्रतिसाद मंदावला. वाहिन्याही आर्थिक अडचणीत आल्या. त्यामुळे इच्छा असूनही पुढचे शंभर भाग करता आले नाही. पण हा अल्पविराम असेल. पुढचे कथानक आम्ही नक्कीच आणू. महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह या महत्त्वाच्या टप्प्यावर मालिका थांबवतो आहोत. परंतु याचा दुसरा भाग करण्याची प्रेरणा कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

‘त्याकाळात विधवा ब्राह्मण स्त्रियांचा कुटुंबीयांकडूनच छळ होई. त्यातून एखादी स्त्री गरोदर राहिली तर तिला आत्महत्या हा एकमेव पर्याय होता. अशा स्त्रियांच्या बाजूने ते उभे राहिले. अनाथ मुलांचा प्रश्न, मुंबईतील अनेक वास्तूंच्या उभारणीत त्यांचा वाटा, सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची सांभाळलेली धुरा, प्लेगच्या साथीतील योगदान असा बराच काळ आम्ही दाखवणार आहोत’, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले.- निलेश अडसूळ

चंगळवादाचा प्रभाव वाढल्याने लोकांना डोक्याला वैचारिक ताण नको असतो. त्यामुळे बुद्धी बाजूला ठेवून कौटुंबिक नाटय़ाला पसंती दिली जाते. आज टेलिव्हिजनचा मोठा वर्ग महिला आणि बहुजन आहेत. त्यांनाच जर आपल्या इतिहासाविषयी जाणून घ्यायचे नसेल तर खेदजनक आहे. ही बेफिकिरी आहे. बाबासाहेब म्हणाले होते, ‘ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो ते कधीही इतिहास घडवू शकत नाही.’ ही मंडळी केवळ इतिहास नाही वर्तमान आणि भविष्यात कसे वागावे याचे मूल्ये देणारी आहेत. त्यामुळे सर्वस्तरातून अशा विषयांना प्रोत्साहन मिळायला हवे.  

– प्रा. हरी नरके, अभ्यासक   

लोकसत्ता, मुंबई, पुणेसह सर्व आवृत्त्या, रविवार, दि. २७ डिसेंबर,२०२०, पृ.११ लोकसत्ता टीम | December 27, 2020 02:36 am

https://epaper.loksatta.com/2938207/loksatta-mumbai/27-12-2020#page/11/1

https://epaper.loksatta.com/2938426/loksatta-pune/27-12-2020#page/8/1

https://www.loksatta.com/manoranjan-news/savitrijoti-tv-serial-closed-due-to-low-response-from-the-audience-zws-70-2365878/

Web Title: Savitrijoti Tv Serial Closed Due To Low Response From The Audience 

Friday, December 25, 2020

सावित्रीजोती मालिकेचा आजचा शेवटचा एपिसोड चुकवू नका - प्रा. हरी नरके


सावित्रीजोती मालिकेचा आज सायं. ७.३० वा. सोनी मराठीवर सादर होणारा अखेरचा भाग ( एपिसोड ) चुकवू नका.

गेल्या साताठ दिवसात समाज माध्यमांवर तसेच प्रिंट व इलेकट्रॉनिक मिडीयावर या मालिकेला जनतेचा जो अभुतपुर्व पाठींबा मिळाला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचा राज्य शासन आणि वाहिनीला नक्कीच विचार करावा लागेल. राज्य शासनाकडून सावित्रीजोती मालिकेला अर्थसहाय्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझा असा प्रयत्न राहिल की निर्माते, वाहिनी आणि राज्यशासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणून या मालिकेचे मोजक्या आणि गोळीबंद अशा १०० भागांचे (एपिसोड) दुसरे पर्व सादर करायचे. त्यासाठीच्या पुर्वतयारीत काही दिवस जातील. आपली साथ असेल तर सिझन - २ (दुसरे पर्व) मध्ये ब्रेक के बाद नक्कीच भेटू. 

-प्रा. हरी नरके, 

शनिवार, दि.२६/१२/२०२०

Sunday, December 20, 2020

सावित्री-जोती मालिका अर्ध्यावरच बंद होणार- प्रा. हरी नरके

 








६ जाने. २०२० रोजी सुरू झालेली " सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती " ही मालिका शनि. २६ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेला सर्व स्तरातील जाणत्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि सुजाण प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ती मध्येच बंद होतेय याचे मनस्वी दु:ख आहे. खरं तर आत्ताशी कुठे गोष्टीला सुरूवात झाली होती. मालिका पकडही घेऊ लागली होती. एरवी कोणतीही मालिका न बघणारे काही जाणते लोक ही मालिका आवर्जून बघतात. एक नवा प्रेक्षकवर्ग मालिकांकडे, सोनी मराठीकडे वळू लागलेला होता. काहीलोक वेळ जुळत नसल्याने अ‍ॅपवर ही मालिका बघत होते. पण त्यांची मोजणी टीआरपीमध्ये होत नाही. टीआरपीच्या रेसमध्ये यशस्वी आणि लोकप्रिय असलेल्या सध्याच्या इतर मराठी वाहिन्या आणि मालिकांबदल माझ्या मनात किंचितही आकस नाही. उलट कुतुहलच आहे. कौतुकच आहे. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते असे मी मानतो. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्‍या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्‍या सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत. त्या मुल्यभानाची रसद आणि जगण्याचा पैस विस्तारणारी उर्जा पुरवित असतात.


सदैव इतिहासात रमलेल्या मराठी माणसांचा १९-२० व्या शतकातील  समाजसुधारणा, शिक्षण आणि परिवर्तन विचार मनोरंजनतून समजून घेण्यातला रस आटलाय का? कुठलीही कलाकृती ही त्या काळाचं अपत्य असते. प्रस्तुत काळ हा जोती-सावित्रीच्या विचारांना, प्रेरणांना, त्यागाला वा ध्येयवादाला फारसा पोषक नाही. ज्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग त्या दोघांनी केला त्या स्त्रिया आणि बहुजन समाज हेच टिव्हीच्या सर्व मालिकांचे मुख्य प्रेक्षक आहेत. तेच स्वत:च्या इतिहासाबद्दल, पुर्वजांच्या त्यागाबद्दल, वारशाबदल बेपर्वा आणि बेफिकीर आहेत? बहुजन समाजाला शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हे मला समाजद्रोहासारखे वाटते. हा आप्पलपोटेपणा, करंटेपणा मला फार बोचतो. 


दर्जेदार कंटेण्ट लोकांना हवाच असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. या मालिकेने सोनी मराठीला एक व्यापक सामाजिक पाया मिळवून दिला. सोनी मराठीचा रिच बहुजनांमध्ये वाढवला. सावित्री-जोतीची कथा सशक्त आहे. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि दशमी क्रिएशनची सर्वोत्कृष्ठ निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. ही मालिका ज्यांनी बघितली ते तिला अनेक वर्षे विसरणार नाहीत. जे लोक कोणत्याही मालिका बघत नाहीत त्यांना माझी ही पोस्ट लागू नाही.


कदाचित टिव्ही मालिका क्षेत्रातील जाणकारांना, यशस्वी मान्यवरांना माझी ही पोस्ट आवडणार नाही.  " ग्राहक नेहमीच बरोबर असतो, निवडणुकीत पराभूत होणाराने मतदारांना दोष द्यायचा नसतो," या सुभाषितांची माहिती मलाही आहे.  


उंच माझा झोका  ही उत्तम  मालिका चालते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३५ नंतर आवरती घ्यावी लागते आणि सावित्री जोती तर मध्येच गुंडाळावी लागते. अशाने या जॉनरच्या मालिका करण्याचे धाडस कोण करील? म्हातारी मेल्याचेही दु:ख आहेच, पण काळ बेदरकारपणे सोकावतोय याचे जास्त दु:ख आहे. काहीजण आम्हाला म्हणाले, "टीआरपी नसला तरी मालिका चालू ठेवा." हा भाबडेपणा झाला. व्यवहारात तो चालत नाही. कोणतीही मालिका तयार करायला पैसा लागतो, तो ज्या वाहिनीकडून दिला जातो तिला जाहीरातींद्वारे तो परत मिळत असतो. जाहीराती मिळणे न मिळणे हे सर्वस्वी टीआरपीवरच अवलंबून असते. प्रेक्षकांपासून म्हणजेच टिआरपीपासून फटकून राहून मालिका चालू शकत नाहीत ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे.


सावित्री जोती मालिकेला टिआरपी होता, पण तेव्हढा पुरेसा नव्हता. ही बायोपिक असल्याने त्यात हमखास मनोरंजनाचा तद्दन मसाला भरता येत नव्हता. १८२७ ते १८९७ हा काळ उभा करायचा असल्याने प्रवास जास्त खडतर होता. या मालिकेमागचे आमचे, दशमी व सोनी मराठीचे प्रयत्न प्रामाणिक होते. उत्तम टिम आणि ऑनेस्ट स्पिरिट असूनही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यात आणि टाईमस्पेंड वाढवण्यात आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू. 


सोनी मराठी वाहिनी, दशमी क्रिएशन ही निर्मितीसंस्था, सावित्री-जोतीची आमची सगळी टिम यांचे या ऎतिहासिक आणि दर्जेदार निर्मितीबद्दल मी मन:पुर्वक आभार मानतो. विशेषत: सोनी मराठी वाहिनीचे अजय भाळवणकर, सोहा कुलकर्णी, Sohaa D. Kulkarni, किर्तिकुमार नाईक, Kirtikumar Ojasvini, राजेश पाठक, Rajesh Pathak, दशमीचे नितीन वैद्य, Nitin Vaidya, निनाद वैद्य, Ninad Vaidya व अपर्णा पाडगावकर, दिग्दर्शक उमेश नामजोशी, प्रमुख कलावंत, ओंकार गोवर्धन, Omkar Govardhan, अश्विनी कासार, Ashwini Kasar, पूजा नायक, Pooja Nayak, मनोज कोल्हटकर, Manoj Kolhatkar, लेखक अभिजीत शेंडे, Abhijeet Shende,  प्रसाद ठोसर, Prasad Thosar, निर्मिती प्रमुख, (क्रियेटीव्ह हेड) लेखा त्रिलोक्य, Lekha Trailokya, सोहम देवधर, Soham Deodhar आणि या टिममधील पडद्यामागील सहकारी, तंत्रज्ञ या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही.


प्रत्येक कलाकृतीची एक नियती असावी. महिला, वंचित - बहुजन आणि अल्पसंख्यकांना काय वाचावं, काय बघावं, कोणत्या विचारात आपलं हित आहे, कशानं आपलं भलं होणार आहे याची जाण आजही असू नये हे वेदनादायी आहे. ५ डिसेंबरला मी या विषयावर एक पोस्ट लिहिली असताना, " आम्ही ही मालिका बघतो, ती चालू ठेवा" अशी एकमुखी मागणी तुमच्यापैकी अनेकांनी केली.  तुमच्या कॉमेंट, तुमचे फिडबॅक सांगतात की सर्व थरातील खूप लोक ही मालिका आवर्जून बघतात. तर मग तो प्रतिसाद टिआरपी मशीनवर का दिसत नाही? याचा अर्थ विद्यमान प्रतिसाद पुरेसा नाही. अजून खुप जास्त प्रतिसाद हवा होता. आम्हाला तशी अपेक्षा आणि विश्वासही होता. 


गाईने पान्हा चोरावा तशी प्रेक्षकांची या मालिकेबाबतची वागणूक राहिली. तमाम स्त्रियांना, चंगळवादी वंचित-बहुजन, अल्पसंख्यकांना आता सावित्रीबाई आणि जोतीरावांपेक्षा तुंबळ करमणूकीचा बेहद्द मारा करणार्‍या काल्पनिक मालिकांची जास्त निकड वाटत असावी. यावरून मराठी समाजाला स्वतंत्र विचार करायला लावणारे, मूल्यनिष्ठा शिकवणारे काही वाचायचे, बघायचेच नाहीये असे समजायचे काय? आजच्या बर्‍याच मालिका प्रेक्षकांना दैववाद, भ्रामक आणि खोटा इतिहास, फॉल्स ड्रामा, बेगडी कहाण्या दाखवित आहेत. अज्ञानमग्न आणि आत्मनाशउत्सुक बहुजन समाजाला ज्ञानद्रोहाचा अनेस्थेशिया देण्याचं काम त्या करीत आहेत. ( यालाही अपवाद आहेत, असतात.. काही उत्तम मालिकाही लोकांनी उचलून धरलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे.) दुसरीकडे सनातनी सत्ताधारी, समुहांना विचारहीन, एकसाची, नशेडी, उन्मादी प्राणी बनवण्यासाठीची लस रात्रंदिन टोचित आहेत. आत्ममग्न बहुजन चळवळी आपल्याच मित्रांच्या कमिटमेंट तपासण्यात मश्गुल आहेत. त्या कोमात गेल्याने त्यांना हा उलट्या पावलांचा प्रवास, हे मतलबी वारे दिसतच नाहीत. 


आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही मालिका पुढची किमान १०० वर्षे डिजिटल स्वरूपात टिकणार आहे. आज नसली तरी उद्या, कदाचित परवा पण या मालिकेची गुणवत्ता नव्या पिढीला समजेल असा मला भरवसा वाटतो. आजच्या बहुसंख्य प्रेक्षकांची इयत्ता, आवड आणि कुवत यांची सरासरी बघता ही मालिका त्यांना बहुधा झेपली नसावी. आज कोरोनाच्या दहशतीखाली जगत असताना मेंदूला झिनझिण्या आणणारी, डोक्याला खाद्य पुरवणारी, काळाच्या पुढची सावित्रीजोतीची गोष्ट त्यांना अनावश्यक वाटत असावी. 


तरिही एव्हढ्या लवकर आम्ही हार मानणार नाही. एका महाकवीनं म्हटल्याप्रमाणे, " काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे." कधीतरी समविचारी लोक आम्हाला भेटतीलच. "अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी सावित्रीजोतीची कहाणी...."  ही खंत जरूर आहे. काही गोष्टींना लोकप्रिय उत्तरं नसतात. असली तरी त्यांची जाहीर वाच्यता माध्यमांमध्ये करता येत नाही. काही गोष्टी आमच्या कक्षेबाहेरच्याही असतात. संघर्ष कुणाला चुकलाय? नजिकच्या भविष्यात कधीतरी उरलेल्या कथाभागावरही मालिका येईल अशी बुलंद आशाय. देशाच्या उज्वल भविष्यासाठी, परिवर्तनवादी विधायक कृतींसाठी आम्ही नव्या उमेदीने, अभिजात आशेने, पोलादी चिवटपणे धडपडत राहू. एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो असं ऎकतो. तोवर धडपडणं, झुंजणं चालूच राहिल. 

- प्रा. हरी नरके, 

संशोधन सल्लागार, "सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती" 

२०/१२/२०२०