Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Wednesday, April 1, 2020

सुजय डहाकेऐवजी त्याच्या आक्षेपाचा संदर्भ तपासूया का?






सुजय डहाकेऐवजी त्याच्या आक्षेपाचा संदर्भ तपासूया का?- सुरेश सावंत,
सुजय डहाके या तरुण दिग्दर्शकाने लोकसत्ता लाईव्हमधील मुलाखतीत ‘मराठी मालिकांत मुख्य भूमिकेसाठी ब्राम्हण अभिनेत्रींनाच संधी दिली जात असल्याचा’ आरोप केला आणि अपेक्षेप्रमाणे टीके-प्रतिटीकेची बरीच राळ उडाली. खुद्द सुजय डहाके तसेच मराठी मालिका यांविषयी मत देण्याइतका त्यांचा परिचय मला नाही. त्यामुळे सुजय डहाकेचा आरोप मराठी मालिकांबाबत खरा की खोटा, हे मी सांगू शकत नाही. पण व्यापक सामाजिक-आर्थिक स्थिती, माध्यमांतले त्याचे प्रतिबिंब यांविषयी जे अभ्यास व निरीक्षणे मांडली जातात, त्यांचा परिचय मला आहे. सामाजिक-राजकीय चळवळीतला वावरही काही बाबी मला लक्षात आणून देत असतो. त्याआधारे सुजय डहाकेच्या आक्षेपाचा आणि त्यावरच्या टीकेचा संदर्भ पाहता येतो. सुजय डहाकेचे व्यक्तित्व उथळ की गंभीर किंवा त्याचे टीकाकार किती प्रांजळ हा माझा प्रश्न नाही. ज्या संदर्भात हा आक्षेप व त्यावरची टीका आली आहे, तो संदर्भ निश्चित गंभीर आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
सुजयच्या आरोपानंतर त्याच्या विरोधात पहिली तोफ डागली अभिनेता शशांक केतकर याने. तो म्हणतो - “माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिनबुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे.” पुढे तो म्हणतो, “कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्यापेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?”
ब्राम्हणी वर्चस्वाच्या विरोधात बोलणाऱ्या सुजयने त्याला संधी असताना अब्राम्हण अभिनेत्रींची निवड का केली नाही? ...हा प्रश्न वकिली युक्तिवादासाठी बरोबर आहे. त्याचे उत्तर सुजयने जरुर द्यावे. वैयक्तिक वागणूक बोले तैसा चाले नसेल तर नैतिक अधिकारही कमी होतो हे खरे. पण वैयक्तिक वागणुकीवर त्या व्यक्तीने विचारलेल्या सामाजिक महत्वाच्या प्रश्नाचे महत्व कमी ठरत नाही. तो प्रश्न नाहीच म्हणून बाजूला सारता येत नाही. एखादा थोर बेवडा दारुच्या दुष्परिणामांबद्दल वस्तुनिष्ठ माहिती देत असेल, तर ती माहिती चुकीची ठरत नाही. ‘बेवडा सांगतोय...पण खरं बोलतोय’ असेच आपण म्हणू. म्हणायला हवे. तीच बाब सुजय कामाकडे लक्ष देतो की नाही यालाही लागू आहे. तो आता काहीही करत नसेल. चकाट्या पिटत असेल. त्याचे चित्रपट चालत नसतील. तरीही त्याने केलेल्या विधानाची किंमत तो खूप काम करत असताना, चित्रपट चालत असताना केलेल्या विधानापेक्षा कमी होत नाही.
शशांकचे दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत. एक, ‘आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे.’ दुसरे, ‘साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?’
शशांक केतकरने या दोन मुद्द्यांतून सांगितलेला निष्कर्ष हा कि, मराठी मालिका वा सिनेमा क्षेत्रात जातीला थारा नाही. तिथे गुणवत्ता पाहिली जाते. मंजुळे गुणवान आहे. या गुणवत्तेला सानेंनी जोखले, साथ दिली आणि उत्तम कलाकृती जन्मास आल्या.
शशांक मग सुजयला दिलेल्या उत्तरात पुढे असे का म्हणतो? - “कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे.”
साने, केतकर, मंजुळे, कांबळे यांत काहीही फरक तो मानत नाही. गुणवत्तेलाच त्याच्या क्षेत्रात किंमत आहे. कांबळे, छल्लारे, पवार हे गुणवान आहेत. अशा गुणवानांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो याचा त्याला अभिमान आहे. ...असे साधे सरळ त्याला म्हणायचे आहे का?
नाही. सुजयच्या जातिवादाच्या आक्षेपाला तो उत्तर देतो आहे. कांबळे, छल्लारे व पवार हे अब्राम्हण किंवा कथित खालच्या जातीचे असतानाही माझ्यासारखा ब्राम्हण त्यांच्या हाताखाली काम करतो. म्हणजेच मी जातिभेद मानत नाही. त्यातून येणारी श्रेणी मी मानत नाही. केवळ गुणवत्ता मानतो, हे तो यातून सांगतो आहे.
समाजात अन्यत्र असा जातिभेद केला जातो, जातींवरुन माणसाच्या श्रेणी ठरवल्या जातात, हे त्यास बहुधा कबूल आहे. मी मात्र ते मानत नाही आणि आमच्या क्षेत्रात असे काही होत नाही, यावर तो ठाम आहे.
शशांक स्वतः भेदभावाच्या या अमानवी प्रथेपासून पूर्ण अलिप्त आहे, याची ग्वाही देतो आहे. ते खरे असू शकते. पण तेवढेच. त्याच्या क्षेत्रात असा भेदभाव होत नाही, फक्त गुणवत्ताच महत्वाची मानली जाते, हे विधान त्यातून सिद्ध होत नाही. त्यासाठी कथित तळच्या, मधल्या जातींच्या कलावंतांच्या साक्षी आवश्यक आहेत. अर्थात केवळ त्याही पुरेशा नाहीत. त्यांच्यावर हेत्वारोप होऊ शकतात. एक पद्धतशीर समाजशास्त्रीय अभ्यास गरजेचा आहे.
तेजश्री प्रधान हिनेही “मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्षं माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?” अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांच्या क्षेत्रात गुणवत्तेलाच महत्व दिले जाते. ती स्वतः अब्राम्हण असूनही तिला काही त्रास होत नाही, हा तिचाही निष्कर्ष आहे.
ब्राम्हण विरुद्ध सीकेपी हा तीव्र ऐतिहासिक झगडा आहे. मात्र तो जातीय उतरंडीच्या वरच्या भागातल्या जातींच्या स्पर्धेचा आहे. सीकेपी ही मागास जात नव्हे, हे इथे जाता जाता लक्षात ठेवूया. मागास विरुद्ध वरच्या जाती या संघर्षात छावण्या कशा पडतात, ते पहावे लागते.
सौरभ गोखले यानेही सुजयची लायकी काढून त्याला कडक समज दिली आहे- “पुन्हा याप्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.”
त्याचे क्षेत्र किती नितळ, निर्मळ आहे आणि आजूबाजूची घाण इथे कशी घुसडू नये हे सौरभ इथे बजावून सांगतो आहे. श्रीमुखात भडकवण्याची भाषा हा सुजयच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला वगैरे मानूया नको. सुजयच्या त्याच्या क्षेत्रातल्या मित्राचा तो सात्विक संताप आहे, असेच तूर्त गृहीत धरुया.
या सगळ्याबाबत गिरीश दातारांची एक वेगळी प्रतिक्रिया आहे. दातार नावावरुन कळते त्याप्रमाणे ब्राम्हण असावेत. ते स्वतःला ब्राम्हण वा कुठल्याही जातीचे मानतही नसतील. पण जन्म कथित ब्राम्हण घरात झालेला असावा. ते स्वतः माध्यम क्षेत्रातलेच दिसतात. ते त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात-
“माझ्या मते सुजय डहाके कलाक्षेत्रातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादाबद्दल त्याची सल व्यक्त करतोय. आणि जे अतिशय योग्य असेच आहे. पण एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सहकलावंताला अशी सल का वाटतीये, याचा 'किमान विचारही' न करता, त्याच्या बोलण्यात तात्विक पातळीवर खरंच काही सत्य आहे का (मी तात्विक म्हणतोय. सांख्यिकी नाही. त्यामुळे मूर्खासारखे कोणत्या सिरीयल आणि सिनेमांमध्ये किती ब्राह्मणेतर कलाकारांनी कामे केलीयेत याची उदाहरणे देत बसू नये) हे तपासून पाहण्याची, त्याच्यावर मूर्खासारखी टीका करणाऱ्यांना गरजही वाटत नाही - हीच खरी सांस्कृतिक वंचना आहे.”
ब्राम्हणी वर्चस्व म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण करताना ते पुढे नोंदवतात – “काही अपवाद सोडल्यास, ब्राह्मणी चालीरीती, ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी सणवार, ब्राह्मणी पोशाख - हाच काय जणू epitome of ideal and standard culture अर्थात - भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक आदर्शाचा अत्युच्च नमुना आहे - अश्याच प्रकारे - ब्राह्मणांनी आपले सौंदर्य निकष बहुजनांवर लादणे चालवले आहे. म्हणूनच सिरीयल, सिनेमांमध्येही बहुजन पात्रेही ब्राह्मणी चालीरीती आचरताना दिसतात. (काही मोजके अपवाद वगळता).”
त्यांच्या या कलाक्षेत्रात सहकलाकारांशी व्यवहार करताना हे ब्राम्हणी वर्चस्व कसे काम करते, याचे वर्णन ते असे करतात- “ब्राह्मणी वर्चस्ववाद म्हणजे केवळ ब्राह्मण कलाकार संख्येने अधिक असणे, किंवा ब्राह्मणेतर कलाकारांची कलेच्या क्षेत्रात कमी संख्या असणे नव्हे, तर याहून अधिक व्यापक स्वरूपात याचा विचार व्हायला पाहिजे. 'न' आणि 'ण' मधल्या फरकाने आपल्या सोबत काम करणाऱ्याला हीन लेखणे, ज्यांना तसे बोलता येत नाही म्हणून - त्यांना अत्यंत कळकळीने मराठीतले मोठे कवी तू कसे वाचले पाहिजेस, ज्यामुळे तुझी भाषा कशी सुधारेल (हे सांगणे)... हे ध्यानात घेतले तर आपणही नकळत याचे वाहक कसे होत असतो, हे ध्यानात येईल.”
आपल्या सहकाऱ्याची टीका संवेदनशीलतेने ऐकून तपासण्याची गरज तसेच गुणवत्ता कशाला म्हणायचे, ब्राम्हणी वर्चस्व हे केवळ संख्येवर अवलंबून नाही तर तो धाक निर्माण करणारा एक सांस्कृतिक मापदंड असतो, असे नमूद करुन या चर्चेला प्रगल्भ आयाम दातारांनी दिले आहेत. सुजय डहाकेच्या हेतूंना वा त्याच्या मूर्खपणाला तपासण्यात वेळ घालवण्याऐवजी दातारांनी मांडलेल्या या मुद्द्यांची चर्चा शशांक, तेजश्री, सौरभ यांनी करणे गरजेचे आहे.
सांस्कृतिक वर्चस्व संख्येवर अवलंबून नसले तरी प्रत्यक्ष संख्येची अवस्था माध्यम आणि आर्थिक क्षेत्रात काय आहे आणि जातींच्या उतरंडीचा त्याच्याशी संबंध कसा आहे, हे पाहणे कमी उद्बोधक नाही. ही अवस्था स्वातंत्र्याचे आयुर्मान पाऊणशे व्हायला येत असताना असणे हे खूप गंभीर आहे.
७-८ महिन्यांपूर्वी जाहीर झालेला हा अभ्यास. ऑक्सफॅम आणि न्यूजलाँड्री यांनी केलेला. त्यात त्यांनी जातींची उतरंड माध्यमांतल्या विविध क्षेत्रात कशी आजही कायम आहे, याचे आकडे दिले आहेत. असा अभ्यास याही आधी योगेंद्र यादव वगैरे मंडळींनी केलेला आहे. त्यांचेही निष्कर्ष तेच आहेत. हे आकडे ताजे आहेत, म्हणून ते घेतले आहेत.
आधी देशातल्या लोकसंख्येची सामाजिक विभागणी कशी आहे ती पाहू.
टक्के
विभाग
२२.८
सर्वसाधारण (ब्राम्हण, कायस्थ, क्षत्रिय, बनिया आदि उच्चवर्णीय)
५२
ओबीसी (शूद्र जाती)
१६.६
अनुसूचित जाती (दलित जाती)
८.६
अनुसूचित जमाती (आदिवासी जाती)
आता माध्यमांतल्या नेतृत्वस्थानी असणाऱ्यांचे प्रमाण पाहू.
माध्यम
सर्वसाधारण (२२.८ टक्के)
ओबीसी (५२ टक्के)
अनु. जाती (१६.६ टक्के)
अनु. जमाती (८.६ टक्के)
इंग्रजी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
८९.३ टक्के
हिंदी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
१०० टक्के
इंग्रजी वर्तमानपत्रे
९१.७ टक्के
हिंदी वर्तमानपत्रे
८७.५ टक्के
डिजिटल मीडिया
८४.२ टक्के
५.३ टक्के
नियतकालिके
७२.७ टक्के
१३.६ टक्के
याचा अर्थ काय?
लोकसंख्येत २२.८ टक्के असलेल्या उच्चवर्णीयांचे जवळपास एकहाती नेतृत्व कसे काय? फक्त दोन ठिकाणी मामुली प्रमाणात ओबीसी दिसतात. दलित-आदिवासींचा तर पत्ताच नाही. (अधिक तपशीलात गेल्यास उच्चवर्णीयांतल्या श्रेणीचेही दर्शन इथे घडते.)
गुणवत्ता केवळ उच्चवर्णीयांत आहे का? ती जन्मजात आहे का? याला शशांक, सौरभ किंवा तेजश्री यांचे उत्तर नाही असेच असेल. मग आमच्या क्षेत्रात फक्त टॅलेंट पाहिले जाते, हे विधान कसे कबूल करायचे? मराठी टीव्ही किंवा मराठी सिनेमा याला अपवाद आहे का? समजा जास्त उच्चवर्णीयच प्रमुख भूमिकांत किंवा उच्च स्थानांवर असले आणि ते खरोखरच टॅलेंटमुळेच तिथे असले तरी त्यांच्यातल्याच बहुसंख्यांमध्ये हे टॅलेंट का? ...या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ व्हायला नको का? शशांकने उल्लेखिलेल्या दोन नावांबाबतच बोलायचे तर साने व मंजुळे यांपैकी किती मंजुळे सानेंच्या जागी आहेत? नसतील तर का नाहीत? या प्रश्नाने त्रास व्हायला नको का? टॅलेंट जन्मजात नाही हे कबूल असेल तर तथाकथित खालच्या जातींचे टॅलेंट पुढे न यायला काहीतरी अडथळे आहेत आणि ते शोधून दूर करायला हवेत, ही आपली भावना व खटपट असायला हवी की नको?
पैसे-संपत्ती कमाविण्याची अक्कलपण उच्चवर्णीयांतच जास्त कशी? ...योगायोगाने? अलिकडच्याच एका अभ्यासाने मांडलेली ही खालील आकडेवारी पहा.
जात/समाज विभाग
संपत्तीतला वाटा (%)
हिंदू उच्चवर्णीय
४१
हिंदू ओबीसी
३०.७
अन्य

मुस्लिम

हिंदू अनु. जाती
७.६
हिंदू अनु. जमाती
३.७
हिंदू समाजातली सामाजिक/जातीची उतरंड जशीच्या तशी आर्थिक बाबतीत दिसते. व्यवसायांतही त्याचा पडताळा येतो. सफाई कामात शतप्रतिशत दलित कसे? लोकसंख्येतले जातनिहाय प्रमाण सफाई कामगारांत का दिसत नाही?
सुजय डहाकेने हे सर्व प्रश्न विचारलेले नाहीत. पण त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे सर्व मुद्दे येतात. त्याने विचारलेल्या प्रश्नाला गैरलागू ठरवताना हे प्रश्न गैरलागू कसे ठरवणार? ते ढळढळीत समोर उभे आहेत. त्यांची उत्तरे द्यावीत लागतील.
स्वतंत्र भारतात विकास जरुर झाला. नव्या आर्थिक धोरणाने काही काळ आर्थिक उन्नतीला गती आली. पण हा विकास वा उन्नती कोणाच्या, किती व काय प्रकारे वाट्याला आली? त्याचा परिणाम काय झाला? ...हा हिशेब करायचा नाही का? प्रत्येक जातीत काहीजण सुळक्यासारखे वर आलेले दिसतात. पण त्यावर त्या जातीचे मोजमाप करुन चालणार नाही. त्याचे जातीतले प्रमाण किती ते पहावेच लागेल. नव्या आर्थिक धोरणानंतरच्या संपत्ती वितरणात दिवसेंदिवस विषमता वाढत चालली आहे, असे अभ्यासक नोंदवत आहेत. त्यावर उपाय नाही झाला तर तो असंतोष समाजात अन्य मार्गांनी उफाळून येतो. तो आपण अनुभवत आहोत. संविधानातली मानवी प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक न्याय, समता या मूल्यांच्या रुजवातीशिवाय समाजाचा निरामय विकास संभवनीय नाही, हे आपण समजून घ्यायला अजून किती उशीर करणार आहोत?
शशांक, तेजश्री, सौरभ यांच्यात जरुर टॅलेंट आहे. पण या टॅलेंटला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा वर्ग व जात यांचे कोंदण लाभलेले आहे. त्यांची इच्छा असो वा नसो. ते मागोत वा न मागोत. त्यांना ते मदत करतच असते. हे कोंदण गळून पडून खऱ्या टॅलेंटची निःपक्षपाती निवड होण्यासाठी आजची भयावह होत चाललेली सामाजिक-आर्थिक विषमता आपल्याला कमी करत न्यावी लागेल.
हे आकळले व त्याप्रति कृतिशील संवेदना जागी झाली तर शशांक, सौरभ, तेजश्री आणि सुजय या लढ्यात बहुधा एकत्रच दिसतील.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, एप्रिल २०२०)

Thursday, March 26, 2020

स्मृती आवडत्या चित्रपटांच्या - प्रा. हरी नरके


** विशेष आवडलेले चित्रपट -

मसान, पथेर पांचाली, Rashomon राशोमन, The Great Dictator दि ग्रेट डिक्टेटर, Modern Times मॉडर्न टाईम्स, City Lights, कागज के फुल, साहिब, बिबी और गुलाम, प्यासा, मंटो, निशांत, अंकुर, भुमिका, सुरज का सातवा घोडा, मम्मो, अलिफ, अर्धसत्य, ध्यास पर्व, कोर्ट, फॅंड्री, Girls of the Sun, Goliath, Daughter, गाभ्रीचा पाऊस, सामना, श्वास, देऊळ, आर्टीकल १५, जख्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, श्यामची आई, गांधी, Schindler's List, Seven Samurai,Bicycle Thieves,The Sound of Music,How Green Was My Valley हाऊ ग्रीन वाझ माय व्हॅली, A Billion Color Story, Children of Heaven,

** आवडलेले चित्रपट-

एलिझाबेथ एकादशी, मोगले आझम, दो आंखे बारह हाथ, गंगा जमुना, पाकीझा, दिवार, शोले, ज्वेल थिफ, गाईड, सरफरोश, अब तक छपन्न, जब वुई मेट, A Wednesday! वेनसडे, सत्या, लगान, मुल्क, देव, चोरी चोरी, अर्थ, सारांश, शापित, भाग मिल्खा भाग, दंगल, टायटॅनिक, जाने भी दो यारो, बॅंडीट क्वीन, मि. इंडीया, मुन्नाभाई एम.बी.बी.एस, लगे रहो मुन्नाभाई, रंग दे बसंती, पी.के., थ्री इडीयट्स, चक दे, गॅंग्ज ऑफ वासेपूर, आंधी, इजाजत, बॉम्बे, रंग दे बसंती, हजारो ख्वाईसे, जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल चाहता हैं, स्पर्श, चश्मे बद्दूर, तिसरी कसम, पेज थ्री, सैराट, कासव, कायद्याचं बोला, स्वदेश, तारे जमिन पर, दामिनी, रंगिला, बिनधास्त, तुकाराम, दोघी, बाधा, शाळा, ख्वाडा, किल्ला, आनंदी गोपाळ, उंबरठा, जोगवा, सिंहासन, नाळ, दशक्रिया, आस्था, खेल, रोजा, मासूम, उमराव जान, मंडी, बाझार, डोर, इक्बाल, उडान, कहानी, धनक, परीनिता, दि डर्टी पिक्चर, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, चुपके चुपके, चितचोर, The Legend of Bhagat Singh, दि लिजंड ऑफ भगतसिंग, रेनकोट, गंगाजल, दृश्यम, पिंक, खाकी, कभी कभी, तलवार, राझी, दिल धडकने दो, हैदर, दिल क्या करे, विकी डोनर, रोड टू संगम, हेराफेरी, रुस्तम, एक दुजे के लिए, अंकुश, प्रहार, परिंदा, वेलकम, ७२ मैल, अनारकली ऑफ आरा, ऑखों देखी, झेड प्लस, इंग्लीशविंग्लीश, यस बॉस, शूल, स्पेशल छब्बीस, अय्यारी, पिंजर, ट्रॅफिक, चलती का नाम गाडी, चांदनी बार, नटरंग, पेज थ्री, कार्पोरेट, फॅशन, लाईफ इन मेट्रो, रंगीला, न्यू दिल्ली टाइम्स, M.S. Dhoni: The Untold Story, ओ माय गॉड, फुकरे, टॅक्सी नं.९२११, मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर, मेरा साया, गोलमाल, जॉली एल.एल.बी, नॉट ओन्ली मिसेस राऊत, कळत नकळत, मुक्तीभवन, खुबसुरत, घर, हंगामा, शादी में आना जरूर, ट्रॅप, पती पत्नी और वो, एतराज, एतबार, मोह,माया,मनी, करंट, ट्रेन टु पाकीस्तान, मिर्च मसाला, माया मेमसाब, सलाम बॉम्बे, अर्थ १९४७, बनगरवाडी, ३६ चायना टाऊन, कमिने, अभिमान, मेरा नाम जोकर, आवारा, श्री ४२०, मजबूर, बादशहा, बॉर्डर, भेजाफ्राय, पार्टीशन, बेगम जान, फिर मिलेंगे, सेक्शन ३७५,


शाळकरी वयात सर्वाधिक आवडलेले सिनेमे- आक्रोश, मंथन,

माध्यमिक विद्यालयात शिकत असताना लागोपाठ दोनदा बघितलेला पहिला चित्रपट- घरौंदा

शाळकरी वयात गणेशोत्सवात रस्त्यावर बघितलेला पहिला चित्रपट- उपकार

शाळकरी वयात थिएटरमध्ये जाऊन बघितलेला पहिला चित्रपट- जय संतोषी मा

तुम्हाला सर्वाधिक आवडलेले दहा चित्रपट कोणते?

प्रा.हरी नरके, २६ मार्च, २०२०

टीप- ही यादी सर्वसमावेशक नाही. मला सहज आठवलेले हे चित्रपट आहेत. मला आवडलेल्या सर्वच चित्रपटांचा जागेअभावी यात समावेश केलेला नाही. संपुर्ण यादी खूप मोठी होईल.

Sunday, March 8, 2020

अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार-

#Vaibhav_Chhaya - या मित्राचा मालिका आणि दूरदर्शन याबद्दलची साक्षरता वाढवणारा हा महत्वाचा लेख अवश्य वाचा- अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार- वैभव छाया सगळ्या मालिकांत ब्राह्मण कॅरेक्टर का असतात? त्या निभावणाऱ्या कलाकारांची आडनावे सवर्ण जातीतीलच का असतात? तर खुप साधं गणित आहे. त्यांनी बाजारपेठेतील स्वतःचं ग्राहक म्हणून असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. गोऱ्या रंगाचं, सुडौल, शरिराचं, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं ठळकपण मार्केटमध्ये अधोरेखित केलं आहे. साहजिकच अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार.पण ही स्थिती बदलता येऊ शकते.. मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीवर जर नीट सर्वे केला तर लक्षात येईल, मुख्य चेहरे, आणि नफा कमावणारे लोक हे 80 टक्क्यांहून जास्त आहेत. जी बहुजन पोरं आहेत ती सगळी पडद्यामागची. कुणी स्पॉट तर कुणी मेकअप तर कुणी कपडे. ही स्थितीही बदलेल. आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानशाखेवरिल मक्तेदारी मोडून काढत आहे. या सर्व मागास जातींना कुणीतरी एक नायक लागतोच. टिव्ही इंडस्ट्रीतही कुणी उभारून येईलच. तिथेही आंबेडकर निर्माण होईलच. मग पाच वर्षात सगळा बॅकलॉग भरून निघेल. बीएआरसी बार्क ही जगातील सर्वात मोठी टेलिव्हीजन मेजरमेंट सायंस इंडस्ट्री बॉडी म्हणून लौकिक मिळवून आहे. आपण जे कार्यक्रम टिव्हीवर पाहतो त्याचं रेटिंग सांगणारी ही संस्था आहे. कोणता कार्यक्रम, किती व कोणत्या लोकांनी, किती वेळ पाहीला. कार्यक्रमादरम्यान किती लोकांनी पूर्ण पाहीला, जाहीराती किती टक्के लोकांनी पाहील्या, एकुण किती मिनिटे वा सेकंद किती टक्के प्रेक्षक टिव्हीसमोर होते याची इत्थंभूत माहीती बीएआरसी देत असते. यासाठी ऑडिओ वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. ज्यातून टीव्ही चॅनेल्सची व्हिवरशीप मोजता येते. यासाठी बीआयओ न्यूज ही सर्विस न्यूज चॅनेलचे रेटिंग मोजते. तर बीआयओ एडव्हिजन जाहीरातींच्या व्हिवरशीप मोजते. टीव्ही प्लस ओओएच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या टेलिव्हिजन सेट्सवरील रेटिंग काऊंट करते. असे अनेक प्रोडक्ट आणि सर्विस बीएआरसी पुरवत असते. ही मोजणी करताना दोन प्रकारांत शहरांची विभागणी केली जाते. ज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद ही पाच प्रमुख शहरे आहेत. जी पहिल्या श्रेणीत मोडतात तर ऊर्वरीत शहरे दुसऱ्या श्रेणीत येतात. जसे पिंपरी, नांदेड, कोल्हापूर, सांगली इत्यादी. जाहीरातदारांच्या दृष्टीने पहिल्या श्रेणीतील पाच शहरे महत्त्वाची असतात. कारण ती शहरेच त्यांच्या मुख्य बाजारपेठा आहेत. तिथे राहणारा वर्ग हा त्यांचा मुख्य खरेदीदार आहे. इतर शहरांत त्या तुलनेने लोकल ब्रँड्स जास्त पॉप्युलर असतात. ही आकडेवारी ठरवण्यासाठी जे सँपलिंग तयार केलं जातं त्याचे वयोगट पुढीलप्रमाणे असतात. लहान मुले 4 ते 8 वर्षे, 9 ते 14 वर्षे वयातील शाळकरी मुले, 15 ते 21 मधील तरूण, 22 ते 30 मधील युवक, 31 ते 40 हा प्रौढ गट, 41 ते 50 पूर्ण प्रौढ, 51 ते 60 प्रगल्भ गट, 61 च्या पुढे ज्येष्ठ नागरिक. यांचे मॅपिंग न्यू कंस्यूमर क्लासिफिकेशन सिस्टीम द्वारे केले जाते. ज्यास NCCS असे म्हटले जाते. बीएआरसी च्या आधी ही कामे TAM द्वारे केली जात होती. TAM मध्ये सोशिओ इकॉनॉमिक क्लासिफिकेशनचा वापर व्हायचा. ज्यास SEC म्हटले जायचे. एसईसी मध्ये घरातील कमावत्या व्यक्तीचे शिक्षण आणि उत्पन्न यांच्या आधारावर कंटेटची टेस्ट, चॉईस आणि प्लेसमेंट ठरवली जायची. परंतू NCCS मध्ये शिक्षण, उत्पन्न, वीज, उपलब्धता, शेतजमीन पासून अकरा विविध पॅरामीटर्सवर जोखूनच रेटिंग आणि त्याचे एनालिसिस केले जाते. आता येऊयात मुख्य मुद्द्यावर. जसे वर म्हटलेय तसे.. आताच्या घडीला बीएआरसी मुळे टिव्हिवर कोण कोणतं कंटेट किती वेळासाठी पाहतंय हे कळतं पण त्यासोबत कोणता वर्ग तो सामुहिक पद्धतीने पाहतोय हे देखील नीट कळू लागलं आहे. साहजिक आहे. बाजारपेठा त्याच हिशोबाने वर्कआऊट होणार. मराठी इंडस्ट्रीत झी, तेव्हाची अल्फा ही पायोनिअर कंपनी होती. पहिल्या पाच शहरांची चौकट लक्षात ठेवताना त्या शहरात राहणाऱ्या लोकांना जे कंटेट आवडेल तेच कंटेट टिव्हीवर आलं. तोच कित्ता इतर चॅनेल्सने गिरवला. भारतीय कलाक्षेत्र असंही रेसिस्ट आणि कास्टिस्ट आहेच. त्यात वाद नाही. गोऱ्या रंगापलीकडे रंग असलेल्यांना अभिनय येत असला तरी कलाकार म्हणायचं नाही याचे नीट आखीव रेखीव ठोकताळे रचून काम करणाऱ्या इंडस्ट्रीत ठराविक वर्गालाच प्रतिनिधित्व मिळेल याची सोय करून ठेवलेली होती. सिनेमा हे माध्यम सोपं नाही. सिनेमासारखं सिरिअलचं ही माध्यम निश्चित सोपे नाही. ते शिकावं लागतं. शिकण्यासाठी भली मोठी गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणूकीला आपल्या आजूबाजूच्या जगाने स्विकारार्हयता दाखवणेही तितकेच गरजेचे असते. मागासवर्गीय मुलामुलींना अभिनय शिकणं ही एकतर न परवडणारी गोष्ट असते. त्यात तंत्र शिकण्यासाठी जी गुंतवणूक करावी लागते त्याची वानवा असते. सवर्ण जातीतींल मुलांना लहानपणापासून अभिनय आणि तंत्र शिक्षणाचे जे प्रिविलेजेस मिळतात ते वाड्या वस्त्यांतील शाळांमध्ये किंवा वातावरणात कुठेच मिळत नाहीत. अभिनय, नृत्य प्रशिक्षण शाळा, शिबिरे, वर्कशॉप आयोजित होण्याचं किंवा कुणीतरी पुढे येऊन शिकवण्याचं कल्चर अजून डेवलप व्हायला वेळ लागणार आहे. पिढ्या न पिढ्यांचा बॅकलॉग आहे हा. असे कितीतरी मुद्दे आहेत जे सांगता येतील. पण ही काही प्रमुख कारणे आहेत मागासवर्गीय कलाकारांचा टक्का कमी दिसण्यामागे. मराठीने मागासवर्गीय कलाकारांना कायम साईड रोल किंवा कॉमेडिअन म्हणूनच स्विकारलेलं आहे. इंडस्ट्री सुद्धा त्यांच्यात म्हणावी तशी गुंतवणूक करत नाही. आणि हे कलाकार सुद्धा स्वतःचा सेफ झोन सांभाळून कोणतीही भूमिका न घेता कातडीबचाव वागत राहतात. आता मुद्दा दुसरा... सगळ्या मालिकांत ब्राह्मण कॅरेक्टर का असतात? त्या निभावणाऱ्या कलाकारांची आडनावे सवर्ण जातीतीलच का असतात? तर खुप साधं गणित आहे. त्यांनी बाजारपेठेतील स्वतःचं ग्राहक म्हणून असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. गोऱ्या रंगाचं, सुडौल, शरिराचं, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं ठळकपण मार्केटमध्ये अधोरेखित केलं आहे. साहजिकच अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार. पण ही स्थिती बदलता येऊ शकते.. यासाठी दोन उदाहरणे.. उत्कर्ष व आदर्श शिंदे सारखा गायकांनी त्याचं मार्केटमधील स्थान आणि डिमांड अतिशय शिताफीने प्रेझेंट केली. मार्केटला झक मारून दखल घ्यावी लागली. दुसरं उदाहरण, महामानवाची गौरवगाथा, सावित्रीजोती सिरीयल. दोन्ही सिरीयलच्या निर्मात्यांनी रिस्क घेतली. का, तर त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. त्यांना इंडस्ट्रीच्या ठोकताळ्यांना कसं बदलायचं हे ठाऊक होतं. त्यांनी इंडस्ट्री आणि रेटिंगच्या पटलावर नसलेल्या मागास जातींना अधोरेखित केलं. पण असा निर्माता एकच आहे हे ही वेगळं सांगायला नको. हे मागास समुह सुद्धा तुमचे ग्राहक आहेत हे वाढणाऱ्या रेटिंग वरून आपोआप स्वच्छ दिसू लागलं. हळूहळू जाहीरातींनी ठेवलेला अप्रत्यक्ष अस्पृश्यपणा सोडायला सुरूवात केली. आपल्याला ही कंटेटची भाषा आणि पॉलिटिक्स नीट समजून घेऊन काम करावं लागेल. नव्या गोष्टी, नव्या मंचांची निर्मिती करावी लागेल. स्वतःच्या रक्तकिंमतीवर ते मंच, गोष्टी, कलाप्रकार, कलाकार पोसावे लागतील. आणि हो सोबतीला ठासून बोलावं ही लागेल. उघड विरोध करावाच लागेल. नुसतं कलेतून बोला कलेतून बोला सारखं गांडू धोरण स्विकारून चालणार नाही. बाकी आपण सूज्ञ आहात. मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीवर जर नीट सर्वे केला तर लक्षात येईल, मुख्य चेहरे, आणि नफा कमावणारे लोक हे 80 टक्क्यांहून जास्त आहेत. जी बहुजन पोरं आहेत ती सगळी पडद्यामागची. कुणी स्पॉट तर कुणी मेकअप तर कुणी कपडे. ही स्थितीही बदलेल. आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानशाखेवरिल मक्तेदारी मोडून काढत आहे. या सर्व मागास जातींना कुणीतरी एक नायक लागतोच. टिव्ही इंडस्ट्रीतही कुणी उभारून येईलच. तिथेही आंबेडकर निर्माण होईलच. मग पाच वर्षात सगळा बॅकलॉग भरून निघेल. आणि म्हणूनच.. सुजय डहाकेच्या वक्तव्याचे मी पूर्ण समर्थन करतो आहे. टीपः कंटेटचा बिजनेस शिकणं, त्याचं कमर्शिअल आत्मसात केल्याशिवाय कंटेटला कुणी पाहणार सुद्धा नाही. BARC (Broadcast Audience Research Council) - स्थापना 2010, कार्यरत- 2015 पासून. Indian Broadcasters Foundation (IBF), Advertisers (ISA) and Advertising & Media Agencies (AAAI).

Thursday, July 4, 2019

सामाजिक विषमतेचा दाहक अनुभव-आर्टीकल १५








आर्टीकल १५ हा चित्रपट मुख्य धारेतला आजचा चित्रपट आहे. मुख्य म्हणजे हा अनुबोधपट किंवा भाषण नाही. एक क्राईम थ्रिलर वाटणारा हा चित्रपट आजच्या भारतातील जातीभेदातून येणार्‍या पक्षपात, भेदभाव शोषण आणि हिंसा यांचा जळजळीत अनुभव देतो. अनुभव सिन्हांसारखा मुख्य धारेतले मुल्कसारखे संवेदनशील विषयावरील चित्रपट बनवणारा दिग्दर्शक हा चित्रपट बनवतो आणि तरूण प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर तो पहायला गर्दी करतात हे महत्वाचे आहे.

दिग्दर्शन, अभिनय, संवाद, पटकथा, चित्रानुभव आणि परिणामकारकता यांच्याबाबतीत हा चित्रपट खूपच सरस आहे.
एक सरळमार्गी आयपीएस अधिकारी अयान रंजन [ आयुष्मान खुराणा] याची ग्रामीण भागात बदली होते. तीन दलित मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते. पोलीस तिच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात. एकेदिवशी त्यातल्या दोघींची प्रेते एका झाडाला लटकावलेली सापडतात. पोलीस अधिकारी सांगतात की त्या मुलींचे आपापसात लैंगिक संबंध असल्यानं त्यांच्या वडीलांनीच त्यांची हत्त्या केलेली आहे. त्या दृष्टीने तपास करून दोघींच्या वडिलांना अटक केली जाते, त्यांच्याकडून तसा जबाबही मिळवला जातो. तिसर्‍या बेपत्ता मुलीचा तपास करण्याची गरजही या अधिकार्‍यांना वाटत नाही. अयान रंजन मात्र याच्या तपशीलात जातो तेव्हा वास्तव काही वेगळेच असल्याचे त्याला आढळते.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सामुहीक बलात्कार आणि निर्घृण हत्त्या झाले असल्याचे आढळते.
हा रिपोर्ट बदलला जातो. सखोल तपासात रस घेणार्‍या अयान रंजनकडून ही केस काढून घेतली जाते आणि ती सीबीआयकडे सोपवली जाते. अयानला निलंबित केले जाते.

त्या तिसर्‍या मुलीचे काय होते? अयान तिचा शोध घेण्यात यशस्वी होतो का? हा अत्त्याचार दाबला जातो की त्याला वाचा फुटते? राजकीयदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होते का?
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही राज्यघटनेनुसार समतावादी आणि मनानं जातीयवादी असलेल्या भारताचा भयावह चेहरा हा चित्रपट आपल्यापुढे उघडा करतो.

महत्वाचं म्हणजे आयुष्मान खुराणा, मनोज पाहवा, इशा तलवार, कुमुद मिश्रा, सयानी गुप्ता आणि मोहम्मद झीशान अयुब यांचा अभिनय हा अफलातून अनुभव देणारा आहे. निषाद ह्या बंडखोर दलित नेत्याच्या छोट्याशा भुमिकेत मोहम्मद झीशान अयुब याने तर कमाल केलीय.

आरपार अस्वस्थ करणारा, मुळातून हलवणारा जब्राट समकालीन अनुभव हा चित्रपट देतो.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी हा चित्रपट बनवून एक फार मोठे सामाजिक काम केलेले आहे. त्यांना मन:पुर्वक सलाम. जयभीम. जयहिंद.

- प्रा.हरी नरके, ४ जुलै २०१९

Wednesday, January 16, 2019

भाई: व्यक्ती की वल्ली" एक हलकाफुलका चित्रपट






"भाई: व्यक्ती की वल्ली" एक हलकाफुलका चित्रपट -प्रा.हरी नरके

सध्या चर्चेत असलेला "भाई: व्यक्ती की वल्ली" हा चित्रपट बघितला.
ताज्या वादाच्या आणि वादंगाच्या पार्श्वभुमीवर या चित्रपटाबद्दल माझे मन साशंक झालेले होते.
तरिही मला हा चित्रपट आवडला. पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, संगीत झकास वाटले. पुलंचा देव करायची गरज नाही. ते एक रसरशीत असे प्रतिभावंत व्यक्तीमत्व होते.
सामान्य प्रेक्षक डोळ्यापुढे ठेऊन हा चित्रपट काढलेला आहे. त्यामुळे तो निव्वळ कलात्मक, दुर्बोध, अंधारातला वगैरे चित्रपट नाहीये. आणि तोच त्याचा महत्वाचा गुण आहे.
सर्वसामान्य प्रेक्षक वर्तमानपत्री समिक्षणं वाचून चित्रपट बघायला का जात नाहीत याचे उत्तर मिळाले. किंबहुना ज्या चित्रपटांची हे बुद्धीजिवी समिक्षक वाहवा करतात त्यांच्याकडे प्रेक्षक फिरकतच नाहीत. ते त्याच्याकडे नक्कीच पाठ फिरवतात. हलक्याफुलक्या, प्रसन्न करमणूकीशी या विद्वानांचे एव्हढे वाकडे का असते?

हा चित्रपट बघायला दहा हजार अपेक्षा ठेऊन जायचेच कशाला ना? मला तरी हे वादंग म्हणजे अमुक पाहिजे, तमूक पाहिजे होते टाईप अपेक्षांचे गाठोडे वाटले. बदनामीचा आरोप वगैरे तर निव्वळ कांगावा आहे. या चित्रपटात त्याचा मागमूसही नाही.
एकवेळ जगातल्या सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पुर्ण करणे शक्य आहे. पण एव्हरेस्टच्या उंचीच्या बुद्धीजिवी, विद्वान, पत्रकार, समिक्षक असलेल्या जागतिक किर्तीच्या पुणेकरांच्या अपेक्षांची पुर्तता करणे केवळ अशक्य आहे. यापुढे या विद्वानांचे वाचण्याच्या भानगडीत न पडलेले बरे. गड्या आपला सामान्य माणूसच बरा. "या असल्या विद्वानांचे" बोजड ओझे आपल्याला झेपणारे नाही.

माजी आमदार सन्मित्र मोहन जोशी यांनी पुण्यातील साहित्यिक, पत्रकार, राजकीय, सामाजिक नेते यांना आवर्जून निमंत्रित केले होते.
या प्रसंगी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, विद्या बाळ, मुकुंद टाकसाळे, सुधीर गाडगीळ, ॲड. भास्करराव आव्हाड, सतिश देसाई, बुधाजीराव मुळीक, सदा डुंबरे, अरूण खोरे, अंकुश काकडे, प्रशांत कोठडिया,सुनिल माळी, अनिल टाकळकर, सुनिल कडूसकर, न.म.जोशी आणि या चित्रपटातील कलावंत उपस्थित होते.
गणेश मतकरी, रत्नाकर मतकरी, महेश मांजरेकर, अजित परब, सागर देशमुख, इरावती हर्षे, शुभांगी दामले, हृषीकेश जोशी, प्रिया जामकर, सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे, दिप्ती लेले आणि सर्व टिमचे मन:पुर्वक अभिनंदन.

कोणतीही कलाकृती म्हटले की मतभेद हे आलेच.
विद्वान पत्रकार, समीक्षक हे सारे व्यक्तीगत न घेता ही मते वस्तुनिष्ठपणे घेतील अशी आशा असल्याने माझी प्रांजळ मते मांडली. सादर मतभेद हेच पुणेकरांचे ठळक लक्षण किंबहुना पेटंट आहे.

-प्रा.हरी नरके, १७ जाने.२०१९

Friday, September 28, 2018

मंटो







सआदत हसन मंटो हा काळाच्या खूपखूप पुढचा लेखक होता. तो अकाली गेला. ११ मे १९१२ ला जन्मलेला हा गुणी लेखक वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी १८ जानेवारी १९५५ ला गेला. तो बंडखोर आणि सामाजिक वास्तवाचं प्रखर चित्रण करणारा कथाकार असल्यानं त्याच्यावर अश्लिल लेखणाबद्दल ब्रिटीश भारतात ३ आणि नवनिर्मित पाकीस्तानात ३ असे सहा खटले भरले गेले. आज त्याच्या या कथा वाचताना त्यात चिमूटभरही काही आक्षेपार्ह असल्याचं दिसत नाही. मात्र सनातन्यांनी ह्या प्रतिभावंत लेखकाला कोर्ट कचेर्‍यांमध्ये अडकवून टाकलं. मनस्ताप दिला.


मंटोसारखा बेडर, निर्भय माणूस फाळणीतील रक्तपात, धार्मिक कत्तली बघून घाबरला आणि आयुष्यातली सर्वात मोठी चूक करून बसला. तो मुंबईतील आगीतून उठून लाहोरच्या फुपाट्यात जाऊन पडला. स्वातंत्र्यानंतर त्याचं पाकीस्तानला निघून जाणं त्याला संपवणारं ठरलं. धर्मांध मुल्लामौलवींचं वर्चस्व असलेल्या पाकीस्तानला मंटोचं मोठेपण कळणं केवळ अशक्य होतं. पाकीस्तान म्हणजे सनातनी आणि पागल अशा धर्मांध लोकांचं महागटार.

मंटोला बहुधा डेथ विश असावी. तो मृत्यूसाठी आतूर असावा. भसाभसा सिगारेटी फुंकणं, रात्रंदिवस दारू ढोसणं याच त्याच्या जीवनशैलीमुळं तो फार लवकर गेला. त्याच्या हयातीत तर त्याचं मोठेपण त्याच्या देशाला कळलंच नाही. जेव्हा पाश्चात्य जगानं मंटोला डोक्यावर घेतलं तेव्हा कुठे  ५७ वर्षांनी २०१२ साली पाकीस्तान सरकारनं त्याला पहिला मरणोत्तर गुणवत्ता सन्मान प्रदान केला. त्याच्यावर पोस्ट स्टॅंप काढला.


मंटोचं लेखक म्हणून आयुष्य अवघं २१ वर्षे होतं. त्याच्या हयातीत त्याची २६ पुस्तकं प्रकाशित झाली होती. हा वेग मोठा असण्याचं कारण त्यानं दुसरा कामधंदा न करता निव्वळ लेखणावर उदरनिर्वाह करायचं ठरवलं होतं. जे आजही अवघड आहे, तेव्हातर होतंच आणि पाकीस्तानात तर अशक्यच. त्यासाठी सुमार असंही त्यानं बरंच खरडलं. त्याच्या स्वभावातले आणखी २ विरोधाभास म्हणजे तो दुसर्‍यांच्या लेखणावर कडवट आणि अवास्तव टिका करायचा पण त्याच्या लेखणावर कुणी टिका केली तर ती त्याला सहन व्हायची नाही. जिव्हारी लागायची. तो भडकायचा. दुसरं म्हणजे मुलंबाळं उपाशी आहेत, मुलगी आजारी आहे आणि औषध आणायला पैसे नाहीत यानं परेशान असलेला मंटो करतो काय तर दारू ढोसत बसतो. त्याचंही तत्वज्ञान ऎकवतो. समर्थन करतो. ही बुझदिलीच होती त्याची.


असला पलायनवादी माणूस लेखक म्हणून मात्र तगडा होता. बंडखोर होता. वेश्या, वेडे, फाळणीत पोळलेले लोक यांच्यावरच्या त्याच्या कथा दाहक आहेत. प्रचंड अस्वस्थ करणार्‍या आहेत. मानवी जीवनातली विसंगती, दांभिकता आणि अनिश्चितता यावरचं मंटोचं भाष्य आरपार भिडणारं आहे. "टोबा टेक सिंग" ही एका वेड्याच्या जीवनावरची त्याची कथा सुन्न करणारी आणि डोळ्यातून पाणी काढणारी आहे. "खोल दो" सारख्या कथेतनं त्यानं पुरूषांच्या हैवानियतवर केलेलं सुचक भाष्य झिणझिण्या आणणारं आहे.
समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून निग्रो आणि दलित साहित्यानं जी श्रेष्ठ वैश्विक कामगिरी केली त्यातला मंटो हा आघाडीचा लेखक मानला जायला हवा.

"मोगले आझम" सारखा भारतीय चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झालेला अव्वल दर्जाचा चित्रपट काढणार्‍या लेखक -दिग्दर्शक के. असिफ यांच्या एका स्क्रिप्टवर आपला अभिप्राय देताना मंटो त्यांना सांगतो, मी अभिप्राय देण्याचेही पैसे घेतो. असिफ त्याला पैसे देतात तेव्हा ते घेऊन हा गडी त्यांना काय सांगतो तर तुमची स्क्रीप्ट तद्दन बकवास आहे.

"थंडा गोस्त" ह्या मंटोच्या तगड्या कथेवर पाकीस्तानात अश्लिलतेचा खटला भरला जातो. आपल्या साक्षीच्या दरम्यान प्रख्यात कवी फैज अहमद फैज कोर्टाला सांगतात की मंटोची ही कथा अश्लिल नाही. मात्र वाड्मयीन गुणवत्ता पाहता ही कथा सामान्य दर्जाची आहे. तर मंटो त्यांच्यावर भडकतो.

मंटोनं अठरा महिने ऑल इंडीया रेडीओवर उर्दू विभागात नोकरी केली. त्याकाळात त्यानं सादर केलेल्या कलाकृतींचे पाच खंड प्रकाशित झालेत. अर्थातच मनस्वी स्वभावाच्या मंटोचं वरिष्ठांशी पटणं शक्य नव्हतं. आधी तो सिनेसृष्टीत काम करीत होता. तिथेच तो परततो. एका बॅरिस्टर घराण्यातला हा उच्चशिक्षित युवक डाव्या विचारांनी प्रभावित होतो आणि प्रागतिक प्रवाहात येतो. त्याचे वडील न्यायाधिश होते. मंटोचा जन्म लुधियानाचा आणि त्याचा मृत्यू झाला लाहोरला. त्याचं करियर बहरलं ते मुंबईत. श्याम, अशोक कुमार, जद्दन बाई, इस्मत चुगताई, कृष्ण चंदर, नौशाद हे त्याचे समकालीन. सखे सोबती.

अशा या रसरशीत, बंडखोर आणि हाडामासाच्या चक्रम लेखकावर, मनस्वी कलावंतावर, प्रचंड मेहनत करून नंदीता दास या गुणी अभिनेत्रीनं "मंटो" हा चरित्रपट निर्माण केलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने गांधी, आंबेडकर, भाग मिल्खा भाग, दंगल, असे काही दर्जेदार बायोपिक दिलेले आहेत. त्याचा आलेख आणखी उंचावणारा हा एक महान चित्रपट आहे.


मंटो हा चित्रपट कलात्मक असूनही अजिबात दुर्बोध नाही. २ तास हा सिनेमा आपल्यावर असं गारूड करतो की आपण मंटोला कडकडून भेटतोय असं वाटत राहातं. मंटोला आदर्श किंवा लार्जर दॅन लाईफ न बनवता नंदीताने जसा होता तसा पेश केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेला मंटो हा त्याच्या आजवरच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ठ रोल आहे. कदाचित ऑल टाईम बेस्ट भुमिका. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नंदीताचं आहे. नंदीता ही सत्यजित रे यांच्या मालिकेतली जागतिक गुणवत्तेची प्रतिभावंत दिग्दर्शक आहे हे या चित्रपटातून सिद्ध होतं. भारतीय चित्रपटानं जागतिक उंची गाठल्याचा हा अनुभव केवळ अविस्मरणीय आहे.

भारतीय संहिता, अभिनय, छायाचित्रण, पार्श्वसंगित, दिग्दर्शन, चित्रभाषा किती उत्कृष्ठ असू शकते हे पाहण्यासाठी तरी हा सिनेमा प्रत्येक सिनेरसिकाने पहायला हवा. विशेषत: सामान्य प्रेक्षक, दर्जेदार काही पाहणारे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि दलित, ग्रामीण साहित्यप्रेमी यांनी तरी एक अजरामर भारतीय कलाकृती म्हणून हा सिनेमा नक्कीच बघायला हवा.


असे चित्रपट वारंवार बनत नसतात. ते पंचवीसतीस वर्षातून एखादाच अप्रतिम चित्रपट या कॅटॅगिरीतले असतात. सलाम मंटो. सलाम नंदीता. सलाम नवाजुद्दीन.

-प्रा. हरी नरके, २८ सप्टेंबर २०१८
......................................

मंटोची काही पुस्तकं मुंबईच्या अक्षर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याचा एक निवडक कथांचा खंड नागपूरच्या विजय प्रकाशनाने काढलेला आहे.
त्याने लिहिलेल्या व्यक्तीचित्रांचे पुस्तक मुंबईच्या लोकवाड्मय गृह ने प्रसिद्ध केलेले आहे. त्याची कादंबरी पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनानं छापलेली आहे.
ही सर्व पुस्तकं, पुस्तक पेठ कोथरूड,पुणे, किंवा अक्षरधारामध्ये मिळतील.

विकीपिडीयात मंटोच्या उर्दू, हिंदी, इंग्रजी पुस्तकांची माहिती दिलेली आहे. त्याची ११ पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत.



Tuesday, August 21, 2018

मुल्क - प्रभावी चित्रभाषा, समकालीन चित्रपट -




लेखक- दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी एका सत्य घटनेवर आधारित असा हा विलक्षण प्रभावी, दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला आणि अभिनयाची कमाल उंची गाठणारा आजच्या काळातला सर्वाधिक महत्वाचा चित्रपट तयार केलेला आहे. गेल्या कित्येक वर्षात इतका अप्रतिम चित्रपट मी पाहिलेला नव्हता. या चित्रपटावर पाकीस्तानने बंदी घातलेली आहे. भारतात मात्र तो दणकून चाललेला आहे.
....................

मुराद अली मोहम्मद हे बनारसच्या मध्यमवर्गीय वस्तीत राहणारे वकील. परिसर हिंदू-मुस्लीम असा संमिश्र. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे हे एकत्रित कुटुंब. त्यांचा पुतण्या शाहीद हा अतिरेक्यांनी एका बसमध्ये केलेल्या बॉम्ब स्फोटातला संशयित आरोपी असल्याची बातमी येते.
एटीएसचे एसएसपी दानिश जावेद त्याला एका एनकाऊंटरमध्ये ठार करतात. काही मूठभर लोक मुस्लीम समाजाची प्रतिमा खराब करतात अशी पक्की समजूत झालेला हा कडक अधिकारी. मुस्लीम अतिरेक्यांचा नायनाट करण्याच्या इराद्याने पेटलेला मुस्लीम अधिकारी.

शाहीद अतिरेकी असल्याच्या वार्तेने हे कुटुंब हादरते, कोलमडून पडते. ते त्याचा मृतदेह ताब्यात घ्यायचे नाकारतात.
शाहीदचे वडील बिलाल अली मोहम्मद यांना अटक केली जाते. त्यांचा कस्टडीत अतोनात छळ केला जातो. ते आजारी असतात. त्यांचा कस्डडीत असतानाच मृत्यू घडवला जातो.
मुराद अली मोहम्मद यांनाही या खटल्यात आरोपी म्हणून गोवले जाते. त्यांच्या सार्‍या कुटुंबाची प्रतिष्ठा मातीमोल केली जाते. एका सज्जन मुस्लीम कुटुंबावर आलेले हे आरिष्ठ त्यांना आयुष्यातून ऊठवणार असे चित्र तयार केले जाते.

मुराद अलींचा थोरला मुलगा अफ्ताफ आणि सून आरती मल्होत्रा - मोहम्मद हे लंडनला असतात. त्यांचा आंतरधर्मिय विवाह झालेला असतो.
संपुर्ण कुटुंबावर कोसळलेल्या या आपत्तीमध्ये अफ्ताफ सर्वांना लंडनला चलायचा आग्रह करतो. भारतात का राहायचे असा त्याचा सवाल असतो. मुराद अली मोहम्मद त्याला स्पष्ट नकार देतात. ते म्हणतात, हा माझा मुल्क आहे. मी इथेच राहणार. ते भावाच्या आणि स्वत:च्या निदोषित्वासाठी लढायचे ठरवतात. त्यांची सून आरती त्यांचा खटला लढवते.

सरकारी वकील संतोष आनंद आणि एटीएसचे एसएसपी दानिश जावेद यांनी जबरदस्त केस तयार केलेली असते. मृत बिलाल अली मोहम्मद आणि मुराद अली मोहम्मद यांचे निर्दोष असणे सिद्ध होते का? त्यांच्यावरचा अतिरेकी असल्याचा ठपका दूर होतो का? "ते" आणि "आपण" या करड्या समजूतीवर मात करण्यात आरतीला यश येते का?
हा संपुर्ण चित्रपट म्हणजे कोर्टरूम ड्रामा आहे.

लेखक- दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे गेली 18 वर्षे व्यावसायिक चित्रपटांसाठी ओळखले जातात. तुम बिन, दस, तथास्तू, रा. वन, गुलाब गॅंग, हे त्यांचे आजवरचे काही चित्रपट.
त्यांनी एका सत्य घटनेवर आधारित असा हा विलक्षण प्रभावी, दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला आणि अभिनयाची कमाल गाठणारा आजच्या काळातला सर्वाधिक महत्वाचा चित्रपट तयार केलेला आहे. गेल्या कित्येक वर्षात इतका अप्रतिम चित्रपट मी पाहिलेला नव्हता.

मुख्य भुमिकेतले अभिनेते ऋषी कपूर हे मुळात एक अत्यंत सामान्य कुवतीचे अभिनेते आहेत असे माझे मत आहे... त्यांच्याकडून दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी इतका अफलातून अभिनय करून घेतलाय की ही ऋषी कपूर यांच्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ भुमिका ठरावी.

त्यांच्य पत्नीची भुमिका नीना गुप्ता यांनी केलीय. ही गुणी अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुठे गायब झाली होती कोण जाणे. तिचा अभिनय अगदी अस्सल.

रजत कपूर हे माझे अतिशय आवडते अभिनेते आहेत. त्यांनी साकारलेला एसएसपी दानिश जावेद हा आजवरच्या सर्व हिंदी चित्रपटातला पोलीस अधिकार्‍यांमधला अव्वल अधिकारी होय.
केवळ ग्रेट. सरकारी वकीलाची भुमिका करणारे आशुतोष राणा हे भडक आणि चढ्या आवाजातल्या भुमिका करणारे बेकार कुवतीचे खलनायक. पण या चित्रपटात त्यांच्याकडून दिग्दर्शक सिन्हा यांनी भुमिका जगणारा सुंदर अभिनय करून घेतलाय.

आरतीच्या भुमिकेत आहे तापसी पन्नू. गेली काही दिवस तिला एकाहून सरस एक अशा भुमिका मिळताहेत. तिने भुमिकेचे सोने केलेय.
बिलालच्या भुमिकेतले मनोज पाहवा आणि अतिरेकी शाहीदच्या भुमिकेतला प्रतिक स्मिता - राज बब्बर यांनी आपापल्या छोट्याशा भुमिका फार उंचीवर नेलेल्या आहेत.

या चित्रपटावर पाकीस्तानने बंदी घातलेली आहे.

उत्तम चित्रभाषा, सरस व्यक्तिचित्रणं, खटकेबाज तरिही अस्वस्थ करणारे संवाद, संपुर्ण समतोल मांडणी करणारा हा चित्रपट सध्या भारतीय प्रेक्षकांना खूप भावतोय.
हा समकालीन चित्रपट म्हणजे आजच्या संक्रमणकालीन, गुंतागुंतीच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीला लेखक- दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी दिलेला प्रतिसाद आहे. एक विलक्षण अस्वस्थ करणारा, मैलाचा दगड ठरावा, असा हिंदी चित्रपट... जबरदस्त अनुभव देणारा.
ज्यांना चांगले चित्रपट आवडत असतील त्यांनी चुकवू नये असा हा हिंदी चित्रपट आहे.
-प्रा. हरी नरके




Monday, August 13, 2018

अनंत पैलूंचे व्यक्तीमत्व आ. प्र. के. अत्रे -








अनंत पैलूंचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - प्रा.हरी नरके
[13 ऑगष्ट 1898 - 13 जून 1969]

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे एक अफाट व्यक्तीमत्व होते. मुळचे शिक्षक. पुढे वक्ता, विनोदकार, पत्रकार, संपादक, राजकारणी, कादंबरीकार, व्यंगकवी, [ विडंबनकार ] नाटककार, प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, अनंत पैलू.

साने गुरूजींच्या "श्यामची आई" वर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णकमळ मिळाले. त्यावेळी परीक्षक मंडळात एकही मराठी माणूस नव्हता. निव्वळ चित्रभाषेच्या ताकदीवर सुवर्णकमळ मिळवलं अत्र्यांनी.

मराठी परीक्षक नसल्यामुळेच कदाचित त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला असेल. मराठी परीक्षक असता तर त्याने नक्कीच टांग आडवी घातली असती.
"महात्मा फुले" यांच्यावरचा त्यांनी निर्माण केलेला बायोपिक आजवरचा सर्वोत्कृष्ठ मराठी बायोपिक आहे. त्यालाही राष्ट्रपतींचे रजत कमळ मिळाले. पण तो फारसा चालला नाही.
अत्रे महामिश्किल. ते म्हणाले, "त्याचं कायय की, एका ब्राह्मणेतरावरचा चित्रपट म्हणून सनातनी ब्राह्मणांनी पाहिला नाही. आणि एका ब्राह्मणाने काढलेला चित्रपट म्हणून बहुजनांनी बघितला नाही. एकुण काय तिकीटबारीवर सरासरी शून्य!"

अगदी दहाएक वर्षांपुर्वीपर्यंत मराठी रंगभुमीवर एकाच वेळी अत्र्यांची तो मी नव्हेच, मोरूची मावशी, अशी अनेक नाटकं गाजत होती.
"मी कसा झालो?" हे त्यांचे संक्षिप्त आणि "कर्‍हेचे पाणी" हे सहा खंडातले आत्मचरित्र केवळ अफलातून.
पुण्याच्या रे मार्केटला त्यांनीच "महात्मा फुले मंडई" हे नाव दिले.

तिथली जागा अपुरी पडते म्हणून जेव्हा गुलटेकडीला विस्तारित मंडई बांधण्यात आली आणि या मंडईचे स्थलांतर करण्यात आले तेव्हा अत्रे हयात नव्हते. त्यामुळेच बहुधा नव्या मंडईचे नाव बदलण्यात आले. हा बदल करणारे ब्राह्मण नव्हते. तथाकथित बहुजन वगैरेच होते.

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यायला आणि विद्यापीठात महात्मा फुले यांचा पुतळा बसवायला कोणा बहुजनांनी विरोध केला ते सर्वांना माहितच आहे.

बहिणाबाईंच्या कवितेवर अपार जीव असलेल्या अत्र्यांनी अनेक नव्या लोकांना प्रकाशात आणले. अत्रे मर्ढेकरांना मात्र समजून घेऊ शकले नाहीत. त्यांना वासुनाकावाले भाऊ पाध्येही कळले नाहीत. अत्रे अफाट होते, स्वागतशील होते पण त्यांच्या व्यक्तीमत्वात अनेकविध कुरूपता होत्या. ते अनेकदा खोटेही लिहित असत. गलिच्छही लिहित असत.

चालायचेच. माणूस म्हटला की विकार आलेच. विसंगती आल्याच. सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्वं फक्त सिनेमा-कादंबर्‍यात असतात. वास्तवातली माणसं हाडामांसाचीच असतात.

अत्रे यांच्या तोडीचा दणकट लेखक, नाटककार, वक्ता, संपादक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही. पुढच्या दहा हजार वर्षात होणार नाही.

- प्रा.हरी नरके

Tuesday, January 23, 2018

जेव्हा डेव्हीडच गोलिथ बनतो-



स्वित्झरलंड एक सुंदर, निसर्गसंपन्न देश. सुखी माणसाचा सदरा घातलेले लोक.
तिथलं डेव्हीड आणि जेसी हे अतिशय गोड असं तरूण जोडपं.
सुखात. मजेत. प्रेमात डुंबलेलं.
जेसी गरोदर असल्याचं समजल्यावर एक जबाबदार आणि जगातला सर्वोत्कृष्ठ बाप होण्याच्या स्वप्नांनं डेव्हीडला झपाटून टाकलंय.
एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना एक गुंड जेसीवर हल्ला करतो. डेव्हीड त्याला रोखतो. पण तो आडदांड गुंड त्या दोघांनाही मारहाण करतो. आपण जेसीचं संरक्षण करू शकलो नाही या अपराधभावानं डेव्हीड घायाळ होतो. खिन्नसा राहू लागतो.
आपण शक्तीमान व्हायला हवं, आपल्या पत्नीला आणि जन्माला येणार्‍या बाळाला संरक्षण पुरवू शकलो पाहिजे या ध्यासापोटी तो व्यायामशाळेत जाऊ लागतो. खूप व्यायाम करू लागतो आणि त्याचबरोबर स्टीरॅाइड घेऊ लागतो. त्याची ताकद वाढत जाते. गमावलेला आत्मविश्वास परत येतो.
मात्र शरिरातली रग वाढू लागताच ती बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधू लागते.
छोट्याछोट्या गोष्टींमुळे त्याचा क्षोभ होऊ लागतो. त्याचे स्वत:वरचे नियंत्रण हरवू लागते.
जेसीच्या हे परिवर्तन लक्षात येते. ती त्याला त्या जाळ्यातून प्रेमाने सोडवते.
परंतु पुन्हा एक निमित्त घडते आणि तो येरे माझ्या मागल्या करू लागतो.
बायबलमध्ये डेव्हीड हा एक भला माणूस आहे तर गोलिथ एक दुर्जन.
आजच्या काळात डेव्हीड या एका भल्या माणसाचंच रूपांतर सदहेतूपोटी आणि समकालीन परिस्थितीमुळे गोलीथमध्ये होतंय का?
ज्या बायको-मुलासाठी डेव्हीडला शक्तीमान बनायचं असतं, तेच त्याला दुरावतात काय?
त्याची आक्रमकता, संतापीपण त्याच्यात पाशवी, अमानवी असं काही तरी भरू लागतात, ते त्याला नकोय.
सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीतला संघर्श हा चित्रपटातला सरधोपट मार्ग सोडून दिग्दर्शक इथे नवा मार्ग हाताळतो.
जेव्हा सज्जन, प्रसन्न आणि गोड अशा डेव्हीडला बायको-मुलाच्या संरक्षणापुरतीच ताकद हवी आहे.
मात्र शक्तीच्या आराधनेतून डेव्हीड इच्छा नसतानाही दुष्टाव्याला कसा बळी पडत जातो हे बघताना आपल्या मनाला वेदना होतात. खरा प्रश्न निर्माण होतो तो इथेच.
हा ताण, हा नैतिक पेच सुटतो का? असल्यास कसा? नसल्यास का नाही?
डॉमिनिक लोचेर हे ताज्या दमाचे अतिशय ताकदीचे दिग्दर्शक आहेत.
त्यांनी कथा, पटकथा, संवाद यांचं सादरीकरण आणि दिग्दर्शन अशा प्रतिभेनं, जाणतेपणानं व उर्जेनं केलंय की हा चित्रपट खर्‍या अर्थानं जागतिक भाषेतला बनून जातो.
त्याला सबटायटलची गरजच राहत नाही. लोचेर यांनीच पटकथा लिहिलीय.
ही कथा केवळ जेसी-डेव्हीडची न राहता जगातल्या तमाम भल्या लोकांची कथा बनून जाते.
छायाचित्रण इतके सुंदर आणि ताकदीचे आहे की प्रत्येक फ्रेम बोलत जाते. चित्रभाषाच सगळा आशय सांगून जाते.
Sven Schelker डेव्हीड आणि Jasna_Bauer जेसी यांचा अभिनय जबरदस्त गारूड करतो.
एक अविस्मरणीय चित्रपट. खर्‍या अर्थानं जागतिक चित्रपट.
Sven Schelker डेव्हीड आणि Jasna Bauer जेसी यांचा अभिनय जबरदस्त गारूड करतो.
एक अविस्मरणीय चित्रपट. खर्‍या अर्थानं जागतिक चित्रपट.
गोलिथ, दिग्दर्शक- डॉमनिक लोचेर, स्वित्झरलॅंड.
Goliath, Directed by  Dominik Locher, Switzerland.
धन्यवाद डॉमिनिक लोचेर.
-प्रा.हरी नरके

कलंदर गायिकेचा बहारदार प्रवास - जॅम








कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवलेले गुणी फ्रेंच दिग्दर्शक टोनी गॅटलीफ हे सर्वोत्तम संगितमय चित्रपटांसाठी विख्यात आहेत. त्यांचा प्रसन्न शैलीतला, दर्जेदार गितांची बहार उडवून देणारा ताजा आणि धमाल चित्रपट आहे "जॅम."
जॅम ही एक हसरी ग्रीक युवती आहे. तिला देखणा गळा लाभलेला आहे. तिची आई उत्तम गायिका होती. ही मुलगी जिथे जाते तिथे आनंद निर्माण करते. सतत हसतखेळत जगणार्‍या या तरूणीवर एक कामगिरी सोपवली जाते. इस्तंबूलला जाऊन जहाजाचा एक तुटलेला पार्ट तिला नव्यानं बनवून आणायचा असतो.
प्रवासात तिला अ‍ॅव्हरिल ही 19 वर्षीय उदास, दु:खी, अडचणीत सापडलेली मुलगी भेटते. ती निर्वासीत आहे. फ्रान्सवरून आलीय. तिच्याकडे पैसे नसतात आणि तुर्कस्थानात तिच्या ओळखीचेही कोणी नसते, जॅम तिला सोबत घेते. दोघींची सहजच मैत्री जमते.
दोघींचा हा प्रवास म्हणजे अडचणी, संकंटं, धावपळ आणि केवळ धमाल.
 जॅमनं अनेक कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी वेळोवेळी केलेला संगिताचा वापर, तिचा हजरजबाबीपणा, तिच्या नकला, नृत्य, गमतीजमती हा अखंड सुखाचा वर्षाव असतो. मानवी जीवनप्रवासाचं अफलातून प्रतिक म्हणजे हा बहारदार चित्रपट.
लोकसंगितावर आधारलेली यातली सुमधूर गाणी ही भारतीयांसाठी मेजवानीच होय.
जॅमची भुमिका करताना अभिनेत्री डेफनी पटाकिया हिनं अभिनयगुणांची जी उंची गाठलीय ती थक्क करणारी आहे.
या भुमिकेला अनंत शेड्स आहेत. त्यातल्या प्रत्येकात ती समरसून काम करते.
चार्ली चॅप्लीनच्या तोडीची आजच्या काळातली ही मुलगी आहे. तिला उज्ज्वल भवितव्य आहे.
ती बंडखोर आहे आणि प्रसंगी शत्रूशी दोन हात करणारीही.
तिच्यावर सोपवलेली कामगिरी ती फत्ते करते का?
तिच्या मैत्रिणीचं रहस्य काय असतं?
जॅमच्या हुकुमशाहीवृत्तीच्या आजोबांनी जॅमच्या आईला गायला बंदी घातलेली असते. ती आजोबांचा सूड कसा घेते?
पिफमध्ये मी पाहिलेला सर्वाधिक प्रसन्न चित्रपट जॅम.
अनेक महोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजतोय. पिफमध्येही हा पुरस्कारांमध्ये बाजी मारेल अशी आशा होती.
तिच्याबरोबर गप्पा मारणं हा मस्त अनुभव होता. मुलगी खूपच टॅलेंटेड आहे. खुप पुढे जाईल.
निर्मितीमुल्ये अर्थातच एकदम भारी.
आयुष्य कसं जगावं याचा वस्तूपाठ देणारा हा भारीच सिनेमा आहे. संधी मिळाली तर पाह्यल्याशिवाय राहू नका.
"जॅम," दिग्दर्शक- टोनी गॅटलिफ, फ्रान्स, Djam, Directed by Tony Gatlif, France, 2017. 97 Minutes.
-प्रा.हरी नरके

Sunday, January 21, 2018

कत्तलखाण्यात बहरलेले प्रेम-




ही कल्पना ज्यांना सुचली असेल त्यांना सॅल्युट. एक आधुनिक पद्धतीचा कत्तलखाणा आहे. तिथे काम करणारे दोघेजण काही आजारपणांनी, अपंगत्वाने ग्रस्त आहेत.
त्यांना दररोज रात्री सारखीच स्वप्नं पडतात.
एका गर्द जंगलात एक हरीण जोडपे काही तरी शोधत फिरते आहे. प्रेम करते आहे.
कत्तलखाण्यातल्या या दोघांना मानसोपचारतज्ञांचे उपचार घेताना हे समजते. दोघांना एकत्र आणणारी एकच जागा स्वप्नभुमी.
एक नितांतसुंदर, अभिजात प्रेमकथा.
विषय स्थानिक असूनही जागतिक, हाताळणी अगदी अभिनव, कथा,पटकथा अगदी बांधीव, संवाद मोजके पण अर्थपुर्ण, अभिनय वास्तववादी तरीही कमालीचा संयत, दिग्दर्शन हळुवार, काव्यमय, प्रेक्षकांना बिटवीन दि लाईन आणि बियाँड दि लाईन दाखवणारे, कॅमेरा अफलातून, असं सारं जुळून आलेली भन्नाट अनुभव देणारी कहाणी, "ऑन बॉडी अ‍ॅंड सोल,"
प्रत्येकानं अवश्य पाहावा असा श्रेष्ठ चित्रपट. On Body and Soul, Director- Lidiko Enyedi, Hungary,
"ऑन बॉडी अ‍ॅंड सोल," दिग्दर्शक- लिडीको एनेडी, हंगेरी.
-प्रा.हरी नरके

ऑस्कर पुरस्कार-चित्रपट



ज्या चित्रपटाला Academy Awards Best Foreign Language Film, USA ऑस्कर पुरस्कार मिळाला तो "दि सिक्रेट इन देयर आईज,"
आणि ऑस्कर मानांकन मिळाले तो "वाईल्ड टेल्स," हे गाजलेले चित्रपट यावर्षीच्या Piff मध्ये दाखवण्यात आले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यशस्वी
Pune International Film Festival successful
या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या 1008 चित्रपटांमधून निवड केलेल्या 14 चित्रपटांचा समावेश जागतिक स्पर्धा विभागात केलेला होता.
याशिवाय विविध विभागात आणखी 130 चित्रपट दाखवण्यात आले.
या महोत्सवाला सुमारे सात हजार चित्रपट रसिक आठवडाभर उपस्थित असल्याची माहिती महोत्सवाचे प्रमुख डॉ.जब्बार पटेल यांनी दिली.
विविध माध्यमांचे प्रतिनिधी, निमंत्रित, प्रायोजक, चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, कलावंत व इतर सदस्य, हेही उपस्थित होते.
या महोत्सवासाठी पुण्यातील विविध ठिकाणच्या 10 थिएटर्समध्ये चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रत्येक ठिकाणी दररोज चार चित्रपट दाखवण्यात आले.
या दहा थिएटर्सची एकुण आसन संख्या 2897 इतकी आहे. प्रत्येकाने दररोज चार चित्रपट पाहिले असे समजले तरी आठ दिवसात मिळून एकुण सुमारे ऎंशी हजार प्रेक्षकांनी जागतिक चित्रपटांचा आनंद लुटला.
जगातल्या सुमारे 110 देशातील चित्रपट या महोत्सवात असतात असे सांगितले गेले.
2016-17 याकाळात निर्माण झालेले, जगातल्या 25 देशातील उत्कृष्ठ चित्रपट हा महोत्सव प्रत्येक रसिकाला दाखवायची सोय करतो.
मला स्वत:ला 21 देशातले ताजे चित्रपट बघता आले.

यात ज्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार Academy Awards Best Foreign Language Film, USA, मिळालाय तो "दि सिक्रेट इन देयर आईज," दिग्दर्शक- जाॅन जोसे, अर्जेंटिना, हा चित्रपट होता.
तसेच ऑस्कर मानांकन मिळवलेला "वाईल्ड टेल्स," दिग्दर्शक- डॅमियन झिफ्रान, अर्जेंटिना, हाही चित्रपट होता.
जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडले गेलेले आणि पुरस्कार मिळवलेले उत्तम चित्रपट पिफमध्ये दाखवले गेले.
कान्स, बर्लिन, व्हेनिस, झ्युरिच, शारजा, हॅंबर्ग, लोकार्नो, युरोपियन, मिलान, टोरॅंटो, म्युनिक, टोकियो, मामी, इफ्फी व इतर अनेक जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवातील चित्रपट यात होते.

जगभरातील प्रतिभावंत दिग्दर्शक-निर्माते गेले दोनेक वर्षे नेमके कोणते चित्रपट निर्माण करीत होते त्याचा आलेख यातून आपल्याला मिळतो.
भारतीय चित्रपट आणि जगभरचे चित्रपट यांची तुलना करता येते.
नवे प्रयोग बघता येतात.
जागतिक चित्रभाषेची अभिरूची समजते.

या महोत्सवातून प्रेक्षकांच्या अभिरूचीचा दर्जा उंचावला जातो.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अनेकजण वर्षभर राबत असतात.
त्यात प्रामुख्याने डॉ.जब्बार पटेल, प्रा.समर नखाते, मकरंद साठे,Makarand Sathe प्रा.सतिष आळेकर, अभिजित रणदिवे, श्रीनिवास संथानम व इतरांचा मोलाचा वाटा असतो.Abhijeet Ranadive,Satish Alekar,Samar Nakhate

महिला चळवळीवरचे प्रभावी चित्रपट








पिफमध्ये महिला चळवळीवरचे अतिशय प्रभावी चित्रपट-
डॉ. दाभोळकर, कॉं. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे संदर्भ-
या वर्षीच्या पिफमध्ये चळवळीवरचे अतिशय प्रभावी असे विविध चित्रपट बघता आले.
विशेष म्हणजे यातले काही चित्रपट तर जागतिक चित्रपट स्पर्धेत होते.
120 बीट्स पर मिनिट, दिग्दर्शक- रॉबीन कॅंपिलो, फ्रान्स,
दि आर्ट ऑफ लव्हिंग, दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का, पोलंड,
नॉक्टरनल टाइम्स, दिग्दर्शक- प्रियनंदनन, केरळ, भारत,
या तीन चित्रपटांवर आपण आज बोलूयात.

1990 च्या ज्या काळात गे, एच.आय.व्ही., एड्स, एलजीबीटी यासारख्या विषयावर बोलणे निषिद्ध मानले जात होते त्याकाळात पॅरिसमध्ये "अ‍ॅक्ट अप" नावाचा एक गट या विषयावर कायदे व्हावेत, औषद कंपन्यांनी औषदे निर्माण करावीत, लोकप्रबोधन व्हावे, म्हणून प्रखरपणे लढत होता.
त्याची थेट आणि आक्रमक कहाणी हा चित्रपट मांडतो. या चित्रपटाला गोव्यात इफ्फीमध्ये सुवर्णकमळ पुरस्कारही मिळाला होता.
अतिशय महत्वाचा विषय, आक्रमकपणे मांडणारा हा चित्रपट काहीसा पथनाट्याच्या अंगाने जातो. खुप जास्त बोलतो.
शेवटची 20 मिनिटे मात्र अतिशय हृद्य आहेत.

दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का यांचा " दि आर्ट ऑफ लव्हिंग," हा पोलंडचा चित्रपट भन्नाट आहे.
मिशलीन विश्लोका या पोलंडच्या बंडखोर महिला लेखिकेच्या जीवनावर तो आधारित आहे.
तिने महिला हक्कांसाठी चर्च आणि सरकारशी फार चिवटपणे झुंज दिली.
महिलांचे सुखी लैंगिक जीवन, शारिरिक सुख, ऑरगॅझम, आजार, कौटुंबिक हिंसा, कुटुंब नियोजन यासाठी ही महिला लढत राहिली.
तिने याबद्दल लिहिलेले पुस्तक छापायला सरकार परवानगी देत नव्हते. ती नानाप्रकारे प्रयत्न करीत राहिली.
तिने या सेन्सॉरशिपवर कशी मात केली आणि तिच्या या पुस्तकाने देशात कशी क्रांती घडवून आणली याची रंगतदार कहाणी हा चित्रपट सादर करतो.
मिशलीन विश्लोका एकाला विचारतात, "तुम्ही कुठून आलात?"
त्यावर तो आपल्या गावाचं नाव सांगतो.
त्या तडफेने सुनावतात, "विसरू नका, तुम्ही आईच्या योनीतून आलेले आहात."

मळ्याळममधले प्रतिभावंत दिग्दर्शक प्रियनंदनन यांचा चित्रपट "नॉक्टरनल टाइम्स," हा तर थेट डॉ. दाभोळकर, कॉं. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापर्यंत प्रेक्षकाला नेऊन भिडवतो.
जो चित्रपट महाराष्ट्र किंवा कर्नाटकात तयार व्हायला हवा होता तो केरळमध्ये तयार झालाय.
अतिशय गुंतवून ठेवणारी थरारकथा हा चित्रपट उलगडत जातो.
सरकार व पोलीसांचे क्रौर्य, दमनशक्ती, जंगलांची कत्तल, निसर्गाचा विनाश, आदिवासींचे भीषण शोषन, जाती व धर्माच्या नावाने घडवल्या जाणार्‍या दंगली,कत्तली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून होणारी गावकर्‍यांची पिळवणूक यांची सुन्न करणारी कथा ज्या कलात्मक आणि थरारक पद्धतीने या चित्रपटात समोर येते त्यातून गलबलायला होते.
हिंदु-मुस्लीम दंगली, वैरं, सरकार-पोलीस यांच्याकडून आदिवासींवर होणारे अन्याय, कोला कंपन्यांकडून होणारी पाण्याची अमाप लूट हा दिग्दर्शक कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे चित्रभाषेत मांडतो. हा चित्रपट भेदक आहे. सुन्न करणारा आहे.
अंगावर येणारा इतका थेटपणा अनेकांना पेलवत नाही. काहींना तो प्रचारी वाटू शकतो. मला मात्र तो खूपच भावला. आरपार भिडला.

सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, मराठी नाटक, सिनेमा, साहित्य क्षेत्रातील मंडळींनी हा चित्रपट बघायलाच हवा. त्यावर चर्चा व्हायला हवी. मौनाचा कट उधळायला हवा.
- प्रा. हरी नरके- Prof Hari Narke
PIFF 2018-7
Dr. Jabbar Patel
Makarand Sathe
Abhijeet Ranadive
Satish Alekar
Samar Nakhate

समृद्ध चित्रभाषा




समृद्ध चित्रभाषा,ताजेपणा, समकालीन विषय आणि जागतिक दर्ज्याची निर्मितीमुल्ये
आवडलेले चित्रपट- Pune International Film Festival- Piff 2018
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [पिफ] 2018

 या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक चित्रपट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला,
1. Free and Easy, Dir. Geng Jun, China,
"फ्री अ‍ॅंड इझी," दिग्दर्शक श्री जेंग जून, चीन, या श्रेष्ठ चिनी चित्रपटासह
अतिशय दर्जेदार आणि श्रेष्ठ चित्रपट
2. The Longing, Dir. Joram Lursen, Netherland,
"दि लॉन्गिंग," दिग्दर्शक - जोरम ल्युर्सेन, नेदरलॅंड,
3. Goliath, Dir. Dominik Locher, Switzerland,
"गोलिथ," दिग्दर्शक- डॉमनिक लोचेर, स्वित्झरलॅंड,
4. The Nothing Factory, Dir. Pedro Pinho, Portugal,
"दि नथिंग फॅक्टरी," दिग्दर्शक- पेद्रो पिन्हो,पोर्तुगाल,
5. More, Dir. Onur Saylak, Turkey,
"मोर," दिग्दर्शक- ओनुर सायलॅक, तुर्कस्थान,
6. Zama, Dir. Lucresia Martel, Argentina,
"झामा," दिग्दर्शक- लुक्रेशिया मार्टेल, अर्जेंटिना,
7. Djam, Dir. Tony Gatlif, France,
"दिजाम," दिग्दर्शक- टोनी गॅटलिफ, फ्रान्स,
8. Women of the Weeping River, Dir. Sheron Deyoc, Philippines,
"वुमेन ऑफ दि विपिंग रिव्हर," दिग्दर्शक- शेरॉन डेयोक, फिलिपाईन्स,
9. Nacturnal Times, Dir. Priyanandanan, Keral, India,
"नॉक्टरनल टाइम्स," दिग्दर्शक- प्रियनंदन, केरळ, भारत,
10. The Quartette, Dir. Miroslav Krobot, Check Republic,
"दि क्वार्टेट," दिग्दर्शक- मिरोस्लाव क्रोबोट, झेक रिपब्लिक,
11. I'm A Killer,  Maciej Pleprzyca, Poland, 
"आय एम अ किलर," दिग्दर्शक- मॅसिज प्लेप्रझिका,पोलंड,
पाहण्याची संधी मला मिळाली.

उद्घाटनाची फिल्म 12. Men Don't Cry,Dir. Alen Drlijevic, Bosnia,
"मेन डोंट क्राय," दिग्दर्शक- अलेन डरलिजेविक, बोस्निया,
यांसह जागतिक सिनेमातील खालील उत्तम चित्रपट मला मनापासून आवडले.

13.The Square, Dir. Ruben Ostlund, Sweden,
"दि स्क्वेयर," दिग्दर्शक- रूबेन ओस्टलुंड, स्विडन,
14. The Son of Snow, Dir. Robert Wichrowski, Poland,
"दि सन ऑफ स्नो," दिग्दर्शक- रॉबर्ट विचरोव्हस्की, पोलंड,
15. Burning Birds, Dir. Sanjieeva Pushpakumara, Shrilanka,
"बर्निंग बर्डस," दिग्दर्शक- संजीव पुष्पकुमार, श्रीलंका,
16. On Body and Soul, Dir. Lidiko Enyedi, Hungary,
"ऑन बॉडी अ‍ॅंड सोल," दिग्दर्शक- लिडीको एनेडी, हंगेरी,
17.Secret Ingredient, Dir. Gjorce Stavreski, Macedonia,
"सिक्रेट इनग्रेडीएंट," दिग्दर्शक- गोर्स स्टावरेस्की, मॅसेडोनिया,
18. Paradise, Dir. Andrei Konchalovsky, Russia,
"पॅराडाईज," दिग्दर्शक- आंद्रे कोचालोव्हस्की, रशिया,
19. Claire's Camera, Sangsoo Hong, Korea [South]
"क्लेयर्स कॅमेरा," दिग्दर्शक- सॅंगसू होंग, दक्षिण कोरिया, 
20. The Art of Loving, Dir. Maria Sadowska, Poland,
" दि आर्ट ऑफ लव्हिंग," दिग्दर्शक- मारिया साडोव्हस्का, पोलंड,
21. Asphyxia, Dir. Fereydoun Jeyrani, Iran,
"अस्फिक्षिया," दिग्दर्शक- फेरेदोन जयरानी, इराण,
22. Gabriel and the Mountain, Dir. Felipe Barbosa, Brazil,
"गॅब्रियल अ‍ॅंड दि माऊंटन," दिग्दर्शक- फिलिप बारबोझा, ब्राझिल,
23. The Day After, Dir.Sangsoo Hong, Korea [South]
 "दि डे आफ्टर," दिग्दर्शक- सॅंगसू होंग, दक्षिण कोरिया, 
24. 120 Beats Per Minute, Dir. Robin Campillo, France,
"120 बीट्स पर मिनिट," दिग्दर्शक- रॉबीन कॅंपिलो, फ्रान्स,
25. Wild Tales, Dir. Damian Szifron, Argentina,
"वाईल्ड टेल्स," दिग्दर्शक- डॅमियन झिफ्रान, अर्जेंटिना,
26. Spoor, Dir. Agnieszka, Holland,
"स्पूर," दिग्दर्शक- अग्नीस्का, हॉलंड,
27. The Secret in Their Eyes, Dir. Juan Jose Campanella, Argentina,
"दि सिक्रेट इन देयर आईज," दिग्दर्शक- जाॅन जोसे कॅंपानेला, अर्जेंटिना,
28. Ciao Ciao, Dir. Song Chuan, China,
" सिया सिया," दिग्दर्शक- सांग चुआन, चिन,
....................