Showing posts with label सेक्युलर. Show all posts
Showing posts with label सेक्युलर. Show all posts

Friday, April 3, 2020

मौनाचा धुर्तपणा थोरच-आकस फारच सकस

समाजमाध्यमांवर व्यक्त होणारे जे काही ओपिनियन मेकर्स आहेत त्यात बहुसंख्यांक पुरोगामी हे उच्चवर्णीय समाजवादी वा मार्क्सवादी छावणीतले आहेत. ते हिंदुत्ववाद्यांवर तोंडसुख घेतात ते ठिकच आहे. मात्र मुस्लीम समाजातील सनातनी, जात्यंध, धर्मांध शक्तींबद्दल बोलायचे झाले की यातले ९९% हे मौनात जातात. हा हिंदु पुरोगाम्यांचा सनातन बोटचेपेपणा आहे. नरहर कुरूंदकर आणि हमीद दलवाई हे याला अपवाद होते.

त्यामुळे ते हिंदुत्ववादाविरोधी असण्यापेक्षा हिंदुविरोधी असल्याचा प्रभावी प्रचार करणे हिंदु सनातनी शक्तीला सोयीचे जाते.

सामान्य हिंदू माणसाला ते पटतेही. त्यामुळेच हिंदु समाजामध्ये यांना काडीमात्र प्रतिष्ठा नाही.


ह्या बोटचेपेपणाची सुरूवात फार जुनी आहे. देशाच्या तत्कालीन श्रेष्ठ नेत्यांना हिंदुमुस्लीम प्रश्न जितका जिव्हाळ्याचा वाटला तितका एस.सी.एस.टी. ओबीसींचा प्रश्न कधीही महत्वाचा वाटला नाही.

मुस्लीम समाजातला ९९ टक्के वर्ग हा हिंदुंमधून धर्मांतरीत झालेला आहे. त्यातले जे उच्चवर्णांमधून तिकडे गेले ते तिकडे अश्रफ म्हणून ओळखले जातात. ह्यांची संख्या मूठभर असली तरी संपुर्ण सनातनी मुस्लीम छावणीचे नेतृत्व या अश्रफांकडे आहे.

जे घटक हिंदु ओबीसी आणि एस.सी.एस.टी.मधून धर्मांतरित झाले ते तिकडे अजलफ आणि अर्जल मानले जातात. त्यांच्या हातात नेतृत्व नाही. हा वर्ग गरिब, अल्पशिक्षित, कष्टकरी आणि कारागिर आहे. अश्रफ यांच्याशी बेटीव्यवहार करीत नाहीत.

हिंदु सनातनी छावणीचे नेतृत्व आणि मुस्लीम सनातनी छावणीचे नेतृत्व दोन्हीही उच्चवर्णियांच्याच हाती असल्याने यांचे नेतृत्वाचे हितसंबंध आहेत. त्यांची मूस एकच असल्याने विरोधीभक्ती, मिलीभगत आणि वर्ग वर्ण जाणीव यांच्यात सामंजस्य आहे. कमालीचा आप्पलपोटेपणा, दांभिकपणा, सामान्य माणसाविषयीची तुच्छता आणि अहंभाव ही यांची खास वैशिष्ट्ये. यांचा सामान्य वर्गातून आलेल्या बुद्धीमंतांबद्दलचा आकस फारच सकस असतो. त्यांना कॉर्नर करणे, त्यांची मुस्कटदाबी करणे, त्यांच्याविषयी बदनामीकारक, तुच्छतावादी अफवा पसरवणे यासाठी ते एकवटतात. अशांना बहिष्कृत करण्यासाठी ते जीवाचे रान करतात. बहुजन राज्यकर्तेही यांच्याच ओंजळीने पाणी पिणारे. मांडलिक. त्यामुळे प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमं हे लोकशाहीचे चारही खांब यांच्याच हातात.


बाजूचे आणि विरोधी असे सगळेच चर्चाविश्व व्यापून टाकण्याचा हा गेम फार मजेदार असतो. हे हिंदु पुरोगामी ज्ञानी लोक जगातील प्रत्येक गोष्टींवर व्यक्त होतात मात्र ते ओबीसी, एस.सी. एस.टी. यांच्या प्रश्नांवर कायम मिठाची गुळणी धरून बसतात. हा मौनाचा धुर्तपणा थोरच असतो.

-प्रा.हरी नरके,
०३/०४/२०२०

Tuesday, September 25, 2018

गणपती आणि इस्लाम खतरे में -










भारतीय संस्कृती ही मूलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे संमिश्र आणि सहिष्णू संस्कृती आहे. तिच्यावर कोणत्याही धर्मातील सनातन्यांनी हल्ला केला तर त्याचा निषेध व्हायलाच हवा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, पारशी, ज्यू, जैन, बौद्ध या सर्वच धर्मांमध्ये जसा प्रागतिक विचार मानणारे आधुनिक लोक असतात तसेच कट्टरपंथी, अधू मानसिकतेचे आणि सनातनी वृत्तीचे लोकही आहेत. त्या त्या धर्मातल्या प्रागतिकांनी त्याविरुद्ध आवाज टाकायला हवा. लढायला हवे. संघर्ष करायला हवा.

एमआयएमचे आमदार श्री. वारिस  पठाण त्यांच्या मतदार संघातील गणपती मंडळाला भेट द्यायला गेलेले असताना तिथे भाषणात गणपतीबद्दल बोलले, गणपती बाप्पा मोरया म्हणाले तर मुस्लीम सनातन्यांनी त्यावर गहजब माजवला आणि मग आमदारांनी जाहीरपणे माफी मागितली. हे अनुचित घडत असताना जर प्रागतिक मुस्लीम गप्प बसणार असतील तर ते दुर्दैवी आहे. यातनं मुस्लीम समाजाला ब्रॅंड करणार्‍यांनाच बळ मिळेल. मुस्लीम समाजाची स्पेस आणखी कमी होईल. चार्वाक ते चोखामेळा, नामदेव, ज्ञानेश्वर ते तुकाराम, फुले-शाहू- आंबेडकर,रानडे ते गांधी अशांनी झुंज केली, बंडखोरी केली म्हणूनच हिंदू समाजातला प्रागतिक प्रवाह मोठा झाला. टिकला. त्याला खिळ घालण्याचे प्रयत्न चालू असताना तुम्हाला तुमच्या समाजातल्या असहिष्णूतेबद्दल बोलावे लागेल. अहो, मौलाना अबूल कलाम आझाद उपनिषदांच्या योगदानावर लिहित होते. शेवटी भारत हा एकधर्मिय नाहीये. तो बहुसांस्कृतिक आहे.

इस्लाममध्ये जे जे सांगितलेय ते पवित्र आहेच, त्याबद्दल वादच नाही. प्रश्न आपल्या शेजारी राहणार्‍या इतर धर्माच्या लोकांच्या भावनांना आपण काही किंमत द्यायची की नाही हा आहे? देशाचा परिसर, माती, निसर्ग, सहजीवन, कला, शिक्षण, संगित, व्यवहार आणि कालानुरूपता या गोष्टी समजून घ्यायच्या की नाही?


१. श्री. हमीद दलवाई यांनी त्यांच्या पुस्तकात एक आठवण लिहिलेली आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात कोकणातल्या मुस्लीमांनी "मुस्लीम लिग" या पक्षाच्या शाखेची स्थापना करायचा निर्णय घेतला. ते सगळे दलवाईंच्या वडीलांना भेटले. त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी अशी सर्वांनी त्यांना गळ घातली. मुस्लीम लिगच्या कोकण शाखेचे उद्घाटन चिपळूणच्या मारूतीला नारळ फोडून झाले.

२. अल्लाशिवाय मी कोणालाही मानणार नाही हे विधान तारतम्याने घ्यायचे की ते सतत ताणत बसायचे? बरं मग, अजमेर दर्गा, दिल्ली निजामुद्दीन, हाजी अली, मंगळूर पीर दर्गा, खेड शिवापूर दर्गा अशा शेकडो ठिकाणी असलेल्या पीराला सगळे मुसलमान भजतात, हे बंद केले गेलेय का? मुळात करायचे का? सुफी योगदान नाकारायचे का? कबीर, साई हे सारेच बाद करायचे काय?

३. संत शेख महमद, जैतून बी हे वारकरी परंपरा मानणारे, मग त्यांना मुस्लीम समाजातून बहिष्कृत करायचे काय?

४. इस्लाममध्ये व्याज घेणे हराम असताना मुस्लीम को ऑपरेटिव्ह बॅंका कशा चालतात हो?

५. दारू प्यायला मनाई असताना दारू पिणारे कसे चालतात हो?

६. इस्लाम म्हणजे शांती, मग अतिरेकी, तालीबानी, अंडर वर्ल्डच्या टोळ्यांना, गुन्हेगारांना कसा काय थारा मिळतो हो?

७. सम्राट अकबराच्या नाण्यांवर रामसीतेचे चित्र असायचे तर गुलाम हैदरच्या [टिपूचे वडील] शंकर पार्वतीचे ही आपली मिलिजुली विरासत आहे.

यादी खूप मोठी करता येईल.
हिंदूंची सर्वात लोकप्रिय भजनं मुस्लीम गीतकारांनी लिहिलीयत, संगीतबद्ध केलीयत नी गायलीही आहेत. आणि उलटेही झालेले आहे. मोहरम, पीराचा उरूस यात हिंदूही पुढाकार घेतात. हे टिकवायला हवे. संवाद बंद झाला तर अंतर वाढेल. धार्मिक सलोखा लयाला जाईल.

व्यवहार म्हणून गैर गोष्टी खपवून घेतल्या जातात, मग शेजारधर्म म्हणून इतर धर्मियांच्या बाबतीत सहिष्णू राहायचे की नाही? प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या काळात नमाज लाऊड स्पिकरवरून पढली जायची काय? गणपती, नवरात्र आदीतले डीजे गैरच. पण नमाजचे भोंगेही अनावश्यकच. तुमचा धर्म हा तुमचा घरगुती मामला आहे. तो रस्त्यावर आणायची गरज नाही. राज्यघटनेने विवेकाचे आणि धर्माचे स्वातंत्र्य दिलेले आहे. दुसर्‍याच्या विवेकबुद्धीवर जबरदस्ती करण्याचा कोणालाही अधिकार नाही.


एका शासकीय प्रशिक्षण संस्थेत माझ्या एका उच्चपदस्थ मित्राने मुस्लीम समाजाचे आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, निवारा, कुटुंब नियोजन आणि सच्चर कमिटीचा अहवाल यावर सर्वदूर प्रबोधन करण्यासाठी २०० कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याला मुस्लीम समाजातील हजारो स्त्रिया व तरूणांनी  प्रतिसाद दिला. त्यातल्या एका कार्यक्रमाला मंत्रालयातले एक अतिवरिष्ठ मुस्लीम अधिकारी उपस्थित होते. ते वक्त्यांचे आभार मानताना म्हणाले, "कुराणात सगळे काही सांगितलेले आहे. या कार्यक्रमाची गरजच नाही. सामाजिक- शैक्षणिक प्रबोधन हे कुराणाच्या विरोधात आहे. बंद करा हा कार्यक्रम."

आम्ही ज्यांनी ज्यांनी या २०० कार्यक्रमांच्या आयोजनात पदरमोड केलेली होती, त्यांना सर्वांना समारोप कार्यक्रमात बोलू दिले गेले नाही. कारण देण्यात आले, आम्हाला नॉन मुस्लीम चालत नाहीत.

अशाच प्रकारचे उपक्रम ख्रिश्चन, शिख, जैन, बौद्ध यांच्यासाठीही आयोजित केलेले होते. त्यातल्या एका कार्यक्रमाला एक अतिवरिष्ठ ख्रिश्चन धर्मगुरू उपस्थित होते. त्यांनी भारतीय संत साहित्यावर पीएच.डी. केलेली होती. एका नॉन ख्रिश्चन वक्त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण त्यांना फार आवडले. त्यांनी त्यांच्या समाजाच्या एका मोठ्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले. मात्र ऎनवेळी तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता हे सांगा असे ते वक्त्यांना म्हणाले. वक्ता म्हणाला, "मी भारतीय संविधान मानतो. जात-धर्म हे माझ्यासाठी दुय्यम आहेत. ते मी कोणालाच सांगत नाही. पाळतही नाही. तुम्ही मला दिलेल्या विषयाशी त्यांचा काहीच संबंध नाही." तर धर्मगुरू म्हणाले, "मला आमच्या सर्वोच्च धर्मगुरूंकडून तुमच्या नावाला संमती घेताना तुमचा जात -धर्म सांगावे लागेल."

धर्मगुरूंनी अगदी ऎनवेळी निमंत्रण रद्द केले.

अगदी प्रेषित महंमद पैगंबरांच्या आधीपासून अफगाणिस्थानात असलेली Bamiyan बामियानची जागतिक वारसा हा दर्जा असलेली विशालकाय बुद्ध मुर्ती तालिबानी अतिरेक्यांनी २००१ मध्ये तोडली. हा पिसाटपणा निषेधार्हच होता.
मलाला युसुफझई या मुलीने तिच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेय की मी आधी स्वात खोर्‍यातली मुलगी आहे आणि नंतर मुस्लीम आहे.

मुस्लीम समाजातल्या या कट्टर पंथियांच्या वागण्यामुळेच त्याची प्रतिक्रिया म्हणून सामान्य हिंदूही दुरावत गेला आणि आजची सनातनी हिंदूंची चलती वाढली. त्याविरूद्ध आम्ही संघर्ष करीत असताना तुम्ही मुस्लीम समाजातले प्रागतिक लोक तुमच्यातल्या सनातन्यांविरूद्ध बोलणार की मौन धारण करणार?
-प्रा.हरी नरके, २६ सप्टेंबर, २०१८

Wednesday, March 14, 2018

युपी बिहार निकाल- फॅसिस्टांच्या शेवटाची सुरूवात?



गेली 4 वर्षे देशातील दलित-आदिवासी-ओबीसी-अल्पसंख्यांक यांना राजकीय जीवनातून संपुर्ण वगळतच नव्हे तर खतम करत वर्चस्ववादी सत्तेच्या रथाचे घोडे बेफाम उधळलेले आहेत.

दाखवायला लॉग इन आयडी विकासाचा आणि पासवर्ड मात्र जाती वर्ण वर्चस्ववादी हिंदुत्वाचा हे मोदी भागवत राजचे असली स्वरूप आहे. हे सरकार म्हणजे मोगलाई नी उत्तर पेशवाई यांच्या अंधारी काळाचं कुख्यात मिश्रण होय. इतर सरकारं भ्रष्ट होती. वाईट होतीच पण निदान त्यांच्यापुढचं संकल्पचित्र लोकशाहीचं होतं. फॅसिस्टांचं नव्हतं.

आमच्या लिहिण्या बोलण्यावर मोदीराजसारखी आणिबाणी वगळता कधीही  बंधनं नव्हती. पगारी ट्रोल आज हिंस्त्रपणे अंगावर येतात.

मतं मागताना मोदी आपण ओबीसी असल्याचं आवर्जून सांगतात. पण गेल्या चार वर्षात या ओबीसीद्रोही पंप्र नमोंनी ओबीसी जणगणनेचे आकडे मात्र दाबून ठेवलेत.

ओबीसी मेला पाहिजे हा मोदीसरकारचा अग्रक्रमाचा विषय आहे.  शेतकरी नष्टच झाला पाहिजे ह्याला यांची पसंती. तुघलकी नोटाबंदी, गाय गोमय हे यांचं बोधचिन्ह. सदैव परधर्म द्वेष हा यांचा ऑक्सीजन. यांना आरक्शण नकोय. दलित-आदीवासी कल्याणाचा कार्यक्रम नकोय. ललित मोदी, मल्ल्या, चोक्शी, नीरव मोदी ही यांच्या काळाची महान अपत्यं.

देशभर दलित-आदिवासी-ओबीसी-अल्पसंख्यांक यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्व बाबतीत मातीत घालण्याचे कट कारस्थान खुलेआम चालूय.

स्त्री-शूद्र अतिशूद्रांना संपवून देशात पुन्हा त्र्यैवर्णिक सत्ता प्रस्थापित करण्याकडे मोदी-शहा-योगी-भागवत सुसाट निघालेत. हा उलट्या पावलांचा प्रवास आहे. कालबाह्य, जीर्ण, अवैज्ञानिक आणि असहिष्णु मुल्यव्यवस्था हा यांचा आदर्श आहे.

सारे डावपेच बुद्धीभेदाच्या जोरावर आखले जाताहेत नी खेळवले जाताहेत. 99% माध्यमे विकली गेलीत. प्रशासन दारातल्या पाळीव प्राण्याचे काम निष्ठेने करतेय. न्यायव्यवस्थेवर न भुतो एव्हढा दबाव आहे.

लोकशाहीचे कंबरडे मोडण्याच्या स्थितीत आहे. भंगड साधू नी कुपोसित साध्वी यांनी उच्छाद मांडलाय. द्वेष आणि त्वेषाने भरलेली मुक्ताफळे रोज कानी पडताहेत. यांचे जुनाट मानसिकतावाले प्रचारक स्त्री-शूद्रांच्या गुलामीवर फुललेली कालबाह्य व्यवस्था पुन्हा आणायची स्वप्ने रंगवताहेत.

आधुनिकीकरणाचे हे सारेच शत्रू. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता यांचे हे मारेकरी. यांनी निवडणुका जिंकल्या त्या विकास, सुशासन, भ्रष्टाचारमुक्त नी काळा पैसारहित भारत घडवण्याच्या आवया उठवून. लोक भुलले. प्रत्यक्षात मात्र हेच कार्यक्रम नेमके गायब आहेत. शेणातले किडे फक्त गप्पा मारू शकतात, शाखा चालवणं नी देश चालवणं यात फरक असतो.

सीबीआय, ईडी, आयटी या सार्‍या वेठबिगारांना कामाला लावून स्वातंत्र्याच्या 65 वर्षात केलेला सगळा लोकशाहीवादी प्रवास पुसून टाकण्याचे षड्यंत्र वेग घेतेय.

आजच्या पोटनिवडणुकांतील निकालांनी उच्च जाती वर्ण वर्चस्ववादी सत्तेच्या शेवटाची सुरूवात झालीय असे म्हणायचे काय?

की याही स्थितीत 2019 ला देशातली लोकशाहीच नष्ट करण्याची कारस्थानं यांचे फॅसिस्ट चिंतन झरे आखणार नी राबवण्यात यशस्वी होणार?

लोकशाहीवादी शक्तींनी बेसावध न राहता डोळे उघडे ठेवून जागे राहायला हवे. आपले शत्रू नी सच्चे मित्र ओळखायला हवेत. प्रश्न अस्तित्वाचाच आहे. जिवंत राहिलो तरच संविधान वाचवता येईल. हुकुमशाहीची वाटचाल रोखता येईल.

-प्रा.हरी नरके




Tuesday, November 21, 2017

मी महंमद खान शपथेवर सांगतो की---


महंमद आमिर खान जुन्या दिल्लीतील गरीब कुटुंबातील मुलगा.
दहावीच्या परीक्षेनंतर कराचीत राहणार्‍या आपल्या मोठया बहिणीला भेटायला गेला. दिल्लीतील गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट आणण्याची कामगिरी सोपवतात.
देशप्रेमापोटी अजाणतेपणे तो होकार देतो.
कराचीत तिथल्या पोलीसांच्या भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन रिकाम्या हातानं दिल्लीला परततो.
दिल्ली पोलीस त्याचं अपहरण करतात.
गुप्तहेर यंत्रणा त्याचा अतोनात छळ करतात.
त्याच्यावर तब्बल 19 खोटे खटले भरले जातात. त्याला अतिरेकी ठरवले जाते.
खोटे साक्षीदार उभे केले जातात. बनावट पुरावे तयार केले जातात.
चौदा वर्षे त्याला कच्च्या कैदेत तुरूंगात काढावे लागतात.
त्याचे वडील कोर्टात हेलपाटे मारून थकतात. मरून जातात. आईही थकते. अर्धांगवायूनं आजारी पडते. मरते.
अखेर त्याची 17 केसेसमधून निर्दोष सुटका होते. दोन खटले अद्यापही रेंगाळलेत.

पुस्तकाच्या शेवटी तो म्हणतो,"मी पुर्णपणे मुक्त नसलो, तरी तुरुंगातही नाहीये. अन्यायाविरूद्ध लढतोय आणि आपल्यापैकी आणखी काही लोक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या या लढ्यात सहभागी झाले, तर आपण समाज बदलू शकतो."
एक निरपराध तरूणाची वयाच्या अवघ्या 20 वर्षांपासून तुरुंगवासानं सुरू होणारी ही लढत आज पस्तीशीच्या टप्प्यावर पोचलीय.
एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन-
राजहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती सप्टेंबर 2017, पृष्ठे 156,किंमत रू.180/-
-प्रा.हरी नरके

Thursday, October 19, 2017

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर का केलं?


आम्हाला शाळेत गोखलेसर गीता शिकवायचे.एकदा ते म्हणाले, मुलांनो सांगा, संजय उवाच नं सुरू होणारी गीता संजयानं आपलं प्रतिकूल मत देताच का संपली?
आम्हाला कोणालाच उत्तर देता आलं नाही.

सर म्हणाले, गीता कुठे संपते? संजय म्हणाला, "तर धृतराष्ट्रा, ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे, ती बाजू [पांडवांची बाजू] जिंकणार असं माझं मत आहे."

मग काय झालं?

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर केलं.
" लेका, मीठ खातोस कौरवांचं नी विजय चिंततोस पांडवांना?"
त्याचा दुसरा भयंकर गुन्हा म्हणजे धृतराष्ट्रानं संजयाला ड्युटी काय सांगितली होती, तर तिकडे रणांगणावर काय चाललंय ते तेव्हढं सांगायचं. हा लेकाचा स्वत:ची मतं सांगायला लागला. तेव्हा गीता संपताना काय धडा शिकवते मुलांनो? आपण नोकरीत असताना, आपल्या मालकानं विचारलेलं नसताना, आपलं मत सांगू नये, अनाहुत सल्ला देऊ नये, खरं असलं तरी मालकाविरूद्ध बोलू नये! मात्र लगे हात उदात्तीकरण करीत राहावं."

गीतेच्या या शिकवणुकीचा फायदा आजचे सगळेच लोक्स अगदी कौरव पांडवही घेत असतात.

राज्याच्या उभारणीत त्यांचं योगदान मोलाचंच आहे. पण त्याचा दामदुप्पट परतावाही त्यांना जनतेनं एकहाती 50 वर्षे सत्ता देऊन केलेला आहे. मुद्दा एव्हढाच आहे की यशाचे मानकरी आपण असलात तर दुर्गतीचे अपश्रेयही तुम्हालाच घ्यावे लागेल ना? तुमच्या यांव केलं नी त्यांव केलं ह्या मार्केटिंगचा उबग आलाय. 80 टक्के समाजकारण नी 20% राजकारण हा तुमचा दावा. प्रत्यक्षात मात्र तुम्ही 24 बाय 365 केलंत ते  फक्त 200 टक्के राजकारण. तुमची दुसरी बाजूही कळू द्या ना जनतेला!
नरूभाऊ दाभोळकरांची अमाणूस हत्त्या झाली. तुम्ही पुण्यावर लादलेला पोळ गुन्ह्याचा तपास करायचं सोडून प्लॅंचेट लावत बसला होता. सलग 15 वर्षे गृहखाते तुमच्या हातात असूनही गुन्हेगार तुम्ही शोधलेच नाहीत. परिणामी आणखी तीन हत्त्या झाल्या.

मालक, कोणाकोणाची जात सार्वजनिक व्यासपीठावर उद्धरतात, प्राचीन साहित्य नी संशोधन संस्था जाळणारांचं औरंगाबादच्या अ.भा.म.साहित्य संमेलनात जाहीर समर्थन करतात, एखाद्याचं इतिहासलेखन पटत नसेल तर त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून त्यांना मिळालेल्या राज्य पुरस्काराचे आपल्या चंपकांमार्फत वाभाडॆ काढतात, केव्हढी ही सहिष्णुता! केव्हढं हे निकोप अभिव्यक्तीचं प्रेम.

टिकाकार आणि विरोधकांकडे बघायची मालकांची दृष्टी इतकी व्यापक की अग्रलेख लिहिला म्हणून कुमार केतकरांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या जिवलग स्वपक्षीयांना ह्यांनी शब्दानं किरकोळ विरोध करीत पण कृतीनं मात्र पक्षात बढती दिली, यालाच म्हणतात लेखन स्वातंत्र्याबद्दलचा आदर!

एका शाळकरी मुलीनं एका नेत्याबद्दल फेसबुकवर काय लिहिलं तर यांच्याच राज्यात तिला ताबडतोब अटक करण्यात आली, तिच्या मदतीसाठी यांनी सेल काढला होता काय? ती स्वजातीय-स्वचाकरीतली असती तर विचार केलाही असता म्हणा.

एक संपुर्ण समाज दंगली घडवून जाळून किंवा कापून मारा असं पुस्तक लिहिणारांचे सत्कार हे मालक स्विकारतात आणि त्यांनीच आजवर खरा इतिहास महाराष्ट्राला शिकवला असा ताम्रपटही त्यांना  बहाल करतात, किती ही वैचारिक सहिष्णुता!

हजारो निरपराध्यांचं धार्मिक हत्त्याकांड करणारांना यांनी आपली सत्ता वापरून संरक्षण पुरवलं असा आरोप यांच्यावर अनेकदा झालाय. त्याची गुरूदक्षिणा ते खातायत.

यांची सेक्युलरनिष्ठा इतकी पक्की की निवडणुकीचे निकालही लागले नव्हते तर हे सच्च्या "सेक्युलरांना!" सत्तेसाठी पाठींबा देऊन मोकळे झाले.

अशा साक्षात दंतकथाच असलेल्या इतिहासपुरूषांचं जे उदात्तीकरण करणार नाहीत ते केवळ B/W चित्रण करणारेच म्हटले पाहिजेत. हाच आवाज आहे अवघ्या महाराष्ट्राचा!
- प्रा.हरी नरके

Tuesday, March 28, 2017

भारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 6 :-
भारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब
1. हमीद दलवाईंनी 80 वर्षांपुर्वीची एक आठवण सांगितलेली आहे.
कोकणात चिपळूणला काही मुस्लीम नेते व कार्यकर्ते एकत्र जमले व त्यांनी हमीदभाईंच्या वडीलांना मुस्लीम लिगची शाखा स्थापन करण्याचा आग्रह केला.
ते तयार झाले. मोठ्या उत्साहात शाखेचे उद्घाटन करण्यात आले, ते गावच्या मारूतीला नारळ फोडून. ग्रामदैवत म्हणून मारूती आणि कोकणचे प्रतिक असलेला नारळ.
2. अजमेरचा दर्गा असो की आणखी कुठलाही, तिथली जत्रा करण्यात हिंदूच पुढे असतात. अगदी गावोगाव हेच चित्र असते.
3. शिर्डीचे साईबाबा हेही एक महत्वाचे उदाहरण आहेच.
4.संत तुकाराम यांचे समकालीन संत बाबा शेख महंमद हे वारकरी होते.
5. सुफी संगीत आणि संगितातली अनेक घराणी यात, तसेच चित्रपटसृष्टी, खेळ, साहित्य, कला, व्यापार अशा अनेक क्षेत्रात अशी देवाणघेवाण / सरमिसळ झालेली आहे आणि ती सर्व भारतीयांनी मनोमन स्विकारलेली आहे.
"मन तड़पत हरि दर्शन को आज" हे गीत, राग - मालकंस, संगीत- नौशाद, गीत - शकील बदायुनी, गायक- मुहम्मद रफी,
तर दुसरे गीत, "रसुल अल्लाह, कर दो बेडा पार", राग - पुरिया धनश्री, संगीत- मास्टर दीनानाथ मंगेशकर, गीत - मास्टर दीनानाथ मंगेशकर, गायक- पंडित हृदयनाथ मंगेशकर, असा सुंदर मिलाफ एका मित्राने अलिकडेच फे.बु.वर लक्षात आणून दिलेला होता.
6. कोणी कोणाचे काय घेतले याचा हिशोब मांडण्याची आज गरज नसली तरी एक उदाहरण बघितले तरी हा मुद्दा पुरेसा स्पष्ट होईल. आज हिंदुंचा कोणताही कार्यक्रम समई पेटवूनच सुरू होतो. ही समई अरबी व्यापार्‍यांनी भारताला दिली. हिंदूंचा मुळचा लामणदिवा होता. आता ती इतकी हिंदूंची झालीय की तिचे मूळ सगळे विसरूनच गेलेत.
हिंदुंचा रक्षा बंधनाचा [नारळी /राखी पौर्णिमा] सण आता सामान्य मुस्लीम कुटुंबात आवर्जून केला जातो. 
 7. औरंगजेब हा कट्टर बादशहा पण त्याच्या अगदी जवळचे मानले जाणारे अनेक सरदार हिंदू होते आणि छ. शिवरायांच्या अनेक विश्वासू पदांवर मुस्लीम होते.
8. महाराजांचे एक पत्र मोठे बोलके आहे. 
ते म्हणातात, दक्षिण भारताची सत्ता आदिलशहा, कुतुबशाहा आणि शिवाजी राजे यांच्या ताब्यात राहावी आणि औरंगजेबाला सर्वांनी मिळून रोखावे असा राजकीय डावपेच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आखलेला आहे. आजच्या भाषेत याला महायुती किंवा महाआघाडी जे काही म्हणायचे ते म्हणा.
" आपली पातशाही वाढवू यें तितकी वाढवणे, पठाणाची [ औरंगजेबाची ] नेस्तनाबूद करणे. दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे." [ पाहा, छ. शिवाजी राजे, दि.वि. काळे, पुणे विद्यापीठ, पुणे, 1950, पृ. 271 ]
8. सोमनाथाचे मंदीर अनेक वेळा मुस्लीम बादशहांनी लुटले. गझनीचा महंमद याच्या स्वार्‍यांचे वर्णन अल्बेरूनी या इतिहासकारानं करून ठेवलंय. हे मंदीर म्हणजे संपत्तीचं कोठार
असल्यानं ते लुटलं गेलं असावं असं त्यावरून म्हणता येतं. नाहीतर दिल्ली आणि आग्रा येथून आलेले मुस्लीम लुटारू रस्त्यातल्या एकाही हिंदू मंदिराला हात लावत नाहीत, ते 1100 किलोमीटर चालत येतात, सोमनाथ लुटतात आणि परत जातात, याची संगती कशी लावणार?
9. शिवरायांनी सुरत लुटली तेव्हा त्यांनी आजच्या किमतीत सुमारे 25 लाख कोटी रूपये किमतीची संपत्ती लुटल्याच्या नोंदी मिळतात.
10. नागपूरचे भोसले आणि इतर मराठा सरदार ओरिसा, बंगाल प्रांतात वर्षानुवर्षे लूट करीत. अगदी 1950 सालापर्यंत लहान मूल जर रडत असेल तर त्याला धाक दाखवण्यासाठी, त्याची आई म्हणायची, "गप्प बस, नाहीतर मराठा [बारगी] येईल" अशी भिती दाखवली जाई.
11. मध्ययुगीन इतिहासात अनेक मतभेदाच्या जागा आहेत. मात्र सर्व राजे आणि बादशहा अशी लूट करीत असत यावर एकमत आहे.
12. ब्रिटीशांच्या कुटील नितिमुळे भारतात हिंदु-मुस्लीम दंगली होऊ लागल्यानंतर 1893 ते 1984 या 91 वर्षात सर्वाधिक दंगली झालेले शहर म्हणजे भिवंडी.
आपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी तिथे हिंदु-मुस्लीम समाजात मोहल्ला कमिट्या स्थापन करून चर्चा, संवाद आणि भाईचारा स्थापन केल्यानंतर गेल्या 33 वर्षात भिवंडीत एकही धार्मिक दंगल झालेली नाही. अगदी बाबरी मशिद विवादात 1992/93 साली सारा भारत पेटला असतानाही भिवंडी शांत होती, कारण संवाद असतो तिथे जातीय विद्वेषाला थारा मिळत नाही.

उर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 5 :-
उर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे
उर्दूचा जन्म भारतातला आहे. ही अतिशय गोड आणि काव्याला जवळची भाषाय. एखाद्याच्या प्रेमपत्रात एकही उर्दू शेर नसेल तर ते प्रेमपत्र कसलं?
ही भाषा अनेक भाषांच्या प्रभावातून तयार झालीय. त्यात पर्शियन, फारशी, अरेबिक, हिंदी, प्राकृत भाषा आणि संस्कृत यांचा समावेश आहे.
मात्र पाकिस्ताननं ही राष्ट्रभाषा म्हणून स्विकारली आणि दोन विचोइत्र गोष्टी घडल्या. एक -अनेक हिंदूंना ही भाषा पाकची म्हणुन दूरची वाटायला लागली. दोन- काही जुनाट विचारांच्या मुल्ला, मौलवींना ती भाषा अचानक जवळची वाटायला लागली.
खरं तर इस्लामची धर्मभाषा उर्दू नाही. कुराण अरेबिकमध्ये आहे, उर्दूमध्ये नाही.
पाकीस्तानचा जन्म धर्मराष्ट्र म्हणून झाला खरा पण अवघ्या वीसेक वर्षात पाकीस्तानची फाळणी झाली, ती भाषेच्या वादातून.
आजच्या बांगला देशाची राष्ट्रभाषा बंगाली आहे. आमार सोनार बांगलो.
महाराष्ट्रातील अनेक मुस्लीमांनी मराठीपेक्षाही उर्दू भाष आपली मातृभाषा असल्याचं जनगणनेत नोंदवलंय. खरंतर अनेकांना ती येत नाही. उर्दू माध्यमाच्या मदरशांना सरकारनं अधिक अनुदान द्यावं यासाठीही हा संघटित प्रयत्न असू शकतो.
राजकीय साठमारीत एखाद्या गोड भाषेचा गळा कसा आवळला जातो, त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे उर्दू होय.
भारतातल्या अनेक प्रांतातल्या मुस्लीमांना उर्दू येत नाही. उदा. केरळ, तमीळनाडू इ.
उर्दू साहित्यातले सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत म्हणुन गालिब आणि प्रेमचंद यांची नावं घेतली जातात.
रामानंद सागर [रामायण मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक] हे फार मोठे उर्दू लेखक होत. त्यांची "और इन्सान मर गया" ही अजरामर साहित्यकृती आहे.
राजेंद्र बेदी, विष्णु खरे, गुलजार, भीष्म सहानी, कृष्णचंद्र, हे जसे उर्दूतले महान साहित्यकार तसेच कवी महंमद इक्बाल, [सारे जहांसे अच्छा हिंदुस्ता हमारा वाले,]
साहीर लुधियान्वयी, कमाल अमरोही, ख्वाजा अहमद अब्बास, इस्मत चुगताई, कैफी आझमी, निदा फाजली, सआदत हसन मंटो, बसीर बद्र, जावेद अख्तर आणि आणखी कितीतरी हे या भाषेतले महत्वाचे प्रतिभावंत.
भाषेला अशा प्रकारे धर्माच्या चष्म्यातून बघणं किंवा केवळ ती पाकीस्तानची राष्ट्रभाषा आहे म्हणुन तिचा रागराग करणं म्हणजे आपल्याच लेकराला केवळ शेजार्‍यांनी नावाजलं म्हणुन त्याचा जळफळाट करण्यासारखं आहे.
मुद्दा एव्हढाच आहे की जसं उर्दूचा द्वेष करणं चुक तसंच उर्दूचा ओ की ठो माहित नसताना तिला मातृभाषा म्हणणंही चुकच होय.

मुस्लीम समाज आणि देशभक्ती



हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 4 :-
मुस्लीम समाज आणि देशभक्ती
कारगीलची अटीतटीची लढाई चालू होती.
टायगर हिल जर भारतानं जिंकलं तर भारताचा विजय होणार होता.
लढाऊ आणि ज्येष्ठ अधिकारी अजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यानं पाक सैन्यावर हल्लाबोल केला. भारतीय सैन्यानं पराक्रमाची शर्थ केली. जिवाची बाजी लावून आपले सैनिक लढले. पण पाकची कुमक मोठी होती. त्यांनी बाजी मारली. आपले जवान एकतर शहीद झाले किंवा गंभीर जखमी तरी.
अजित सिंग यांना माघार घ्यावी लागली.
हा पराभव जवानांच्या लढाऊपणाला, मनोबलाला आरपार छेदून गेला.
जाकीर हुसेन नाईक नावाचा अवघ्या 27 वर्षे वयाचा एक जवान अजित सिंगांना भेटला. त्यानं गनिमी काव्यानं परत हल्ला करण्याची परवानगी मागितली.
रिस्क फार मोठी होती. उरले सुरले सर्व जवान कामी आले असते.
अजित सिंग तयार नव्हते. एव्हाना रात्रीचे अडीच वाजले होते. जाकीर हुसेन नाईक परत परत विनंती करीत होता. त्याचा प्लॅन बढीया होता. अजित सिंग यांनी परवानगी दिली.
आता जाकीर हुसेन नाईक लिड करीत होता.
त्यानं आरोळी ठोकली, "बोलो, अल्ला हो अकबर!"
सार्‍या भारतीय जवानांनी प्रतिसाद दिला, "अल्ला हो अकबर!"
सगळे पाक सैनिक एव्हाना विजयोत्सव साजरा करण्यात मश्गूल होते. खात होते, पित होते, नाचत होते. ते सारेच बेभान झाले होते. त्यांनी हे नारे ऎकले, त्यांची समजूत झाली की पाकीस्थानी सैनिकच येत असणार. ते गाफिल राहिले आणि म्हणता म्हणता भारतीय जवानांनी पाकची सेना कापून काढली. ठार केली. त्यांना सावरायला वेळच मिळाला नाही.
आणि भारताचा तिरंगा टायगर हिलवर डौलानं फडकू लागला.
भारतानं कारगीलचं युद्ध जिंकलं होतं.
जाकीर हुसेन नाईक घोषणा देत होता, "बोलो, भारत माता की जय."
प्रतिसाद मिळत होता, "भारत माता की जय."
सारा आसमंत रात्रीच्या त्या अंधारात घोषणा देत होता, "भारत माता की जय."
स्वातंत्र्याच्या चळवळीत असफाक उल्ला फासावर गेला.
सोलापूरचा कुर्बान हुसेन शहीद झाला.
भारत पाक लढाईत परमवीर अब्दुल हमीद यांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांना मरणोत्तर "परमवीर चक्र" दिले गेले.
शहानवाज हुसेन हे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे वरिष्ठ सेना अधिकारी होते. सरहद्द गांधी उर्फ बादशाह खान, मौलाना आझाद आणि आणखी कितीतरी यांची स्वातंत्र्य चळवळीतली कामगिरी केवळ अभिमानस्पद होती.
हो, पाकीस्तानच्या हिंसक कारवायांनी भारत संतप्त आहे. भारतात सतत अतिरेकी घुसवणं, भारतीयांच्या संरक्षण यंत्रणा पोखरून काढणं, भारतावर वारंवार हल्ले करणं पाककडून चालूच आहे. त्याचा मुकाबला करायलाच हवा.
हो, अतिरेक्यांची नावं वाचताना त्यात बरीच नावं मुस्लीम असल्याचं वारंवार वाचनात येतं, पण म्हणून सरसकट सर्व मुस्लीमांच्या देशभक्तीवर शंका घ्यायची?
सगळे मुसलमान अतिरेकी नसले तरी सगळे अतिरेकी मुसलमान कसे? असल्या अफवा पसरावयाच्या? यामुळे नेमके काय साधेल?
याला उत्तर म्हणुन हिंदूंमधील अतिरेकी किंवा देशद्रोह्यांची नावं पुढं आणायची?
मला हे मान्य नाहीए.
अतिरेकी मग तो कोणीही असू द्या, त्याची गय करता कामा नये, पण उठसूठ कोणाही देशप्रेमी माणसाच्या देशप्रेमावर शंका घेऊन आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेत नाही आहोत काय?
.......................................
[संदर्भ पाहा- डोमेल ते कारगिल, मेजर जनरल शशिकांत पित्रे, राजहंस प्रकाशन,पुणे,2013, पृ. 243/244]

भारतीय मुस्लीम परके आहेत काय?

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 3 :-
भारतीय मुस्लीम परके आहेत काय?
सामान्यपणे मुस्लीम समाजाबद्दल बोलताना काही मंडळी जाणीवपुर्वक मुस्लीम हे परके असल्याचं, ते बाहेरून आल्याचं सांगतात. त्यात किती तथ्य आहे हे तपासायचं तर मग जे 99% धर्मांतरीत मुस्लीम आहेत त्यांना कसं परकं म्हणता येईल? फार तर 1% अश्रफ - अ - बाबत असं म्हणता येऊ शकेल. उरलेले 99% तर धर्मांतर केलेले इथलेच आहेत.
पण तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच.
हे विश्व सुमारे 1400 कोटी वर्षांपुर्वी तर आपली पृथ्वी 450 कोटी वर्षांपुर्वी अस्तित्वात आल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. असेही सांगितले जाते की माणसाच्या आधीचा माणसाचा जो पुर्वज आहे तो 1 कॊटी वर्षांपुर्वी जन्माला आला.
माणसाच्या आधीच्या या पुर्वजाची हाडं केनिया आणि टांझानिया या दक्षिण आफ्रिका प्रांतातील देशात सापडतात ती सामान्यपणे 22 लाख वर्षांपुर्वीची आहेत.
भारतीय उत्खननात मात्र अशी इतकी जुनी हाडं सापडलेली नाहीत. याचा अर्थ असा असू शकतो की कधीतरी आपले पुर्वज अन्न,पाणी यांच्य शोधात या प्रातांत आले असतील. पुर्वी असे मानले जायचे की आर्य सुमारे साडेसहा ते साडेतीन हजार वर्षांपुर्वी भारतात आले. लोकमान्य टिळक ते इतिहासाचार्य राजवाडे यांना हा शोध मान्य होता. मात्र डा.बाबासाहेब आंबेडकर व अन्य संशोधकांनी हा सिद्धांत नाकारलेला आहे.
शक, हुण, रठ्ठ अशा अनेक टोळ्या बाहेरून आल्याचं मानलं गेलं. आक्रमणं होत राहिली.
रोम आणि इतर प्रांतांशी भारताचा व्यापार दोन हजार वर्षांपुर्वींपासून असून त्याचे पुरावे आता तेर, उस्मानाबाद, लोथल [गुजरात] उत्खननात मिळतात.
प्रेषित महंमद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना ज्याकाळात केली त्याच लगतच्या काळात केरळमध्ये पहिली मशिद उभारली गेल्याचं सांगितलं जातं.
पार्शीसुद्धा असेच भारतात बाहेरून आले.
याचा अर्थ सतत बाहेरून लोक येत राहिले. फार तर काही आधी आले तर काही नंतर आले इतकाच फरक.
अशा परिस्थितीत कोण मुळचा आणि कोण परका हे कळायचं कसं?
एक मार्ग आहे.
बाबर आला, इंग्रज आले, फ्रेंच आले, पोतुगीज आले, अन्य काही आले.
काहींनी इथं राज्य केलं. संपत्ती लुटली आणि आपल्या देशाला ती घेऊन गेले. इंग्रज परत गेले, फ्रेंच परत गेले, पोर्तुगीज परत गेले. असे जे परत गेले ते परके. जे इथेच राहिले, इथेच त्यांनी लग्नं केली, इथंच मेले. इथल्याच मातीत त्यांची कबर उभारली गेले त्यांना या न्यायानं परकं कसं म्हणायचं?
या दीडदोन हजार वर्षात अनेक गोष्टी एकमेकांनी एकमेकांच्या स्विकारल्या. संगित, आर्कीटेक्ट, खाद्य पदार्थ, कला, कौशल्यं, ज्ञान, केशभुषा, वेशभुषा, भाषा, संस्कृती, तत्वज्ञान कितीतरी.
त्यातून एक गंगाजमना तहजीब म्हणजे "गंगाजमुना" संस्कृती जन्माला आली.
राजकीय सत्तेसाठी जरूर लढाया झाल्या, पण याकाळात सामान्य माणूस मात्र एकमेकांशी गुण्या गोविंदानं नांदत होता.
भारतात पहिली हिंदुमुस्लीम दंगल इंग्रज सरकारनं जाणीवपुर्वक "फोडा आणि झोडा" नीती वापरून घडवली ती 13 आगष्ट 1893 मध्ये.
हिंदू आणि मुस्लीम या देशात 1400 वर्षे एकत्र राहात असताना राज्यकर्त्यांमध्ये सत्तेच्या लढाया जरूर झाल्या पण जनतेमध्ये जातीय-धार्मिक दंगल झाली नाही, ती इंग्रजांनी घडवली 1893 साली, याचाही विचार आपण करायला हवा.
अकबराच्या नाण्यांवर तो राम सीता यांचं चित्र कोरतो. हैदर अली हा टिपूचा बाप आपल्या नाण्यांवर शंकर पार्वतीचं चित्र कोरतो. का कोरतो? पेशवे आपली नाणी फारशी आणि पर्शियनमध्ये कोरतात हे पुरावे अतिशय बोलके आहेत.
गणिताच्या विकासातून आज आपण फार मोठी प्रगती केलेली आहे.
शून्याचा शोध भारतात लागतो, पण "हिसाब अल्जब्र" मात्र "अल झफर मोहम्मद ख्वारिझ्मी" [ इ.स.780 ते 850] हा अरब व्यापारी लिहितो, काय आपल्याला हे माहित आहे?
क्रमश:--

हम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 2 :-
हम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा ---
भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आलेला आहे की," The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India."
माझ्या माहितीप्रमाणे गोव्यात पोर्तुगिज सरकारने असा uniform civil code केलेला आहे आणि तो तिथल्या मुस्लीमांनी मान्य केलाय. इंग्रज सरकारने 1939 साली शरियत कायद्यात बदल केलेले चालतात पण भारत सरकारने केलेले चालत नाहीत हे मला तरी अनाकलनीय आहे. माझ्या माहितीप्रमाणे खुद्द इस्लामिक देशांमध्येही तोंडाने तीन वेळा तलाक म्हटले की झाला घट:स्फोट ही जुबानी तलाक पद्धत नाही. भारतात मात्र ती आजही आहे. याच्या विरोधासाठी मुस्लीम स्त्रियांनी उभे राहायला हवे.
मुस्लीमांमध्ये एकाचवेळी चार बायका करण्याची असलेली पद्धत ही सुद्धा मुस्लीम स्त्रियांवर अन्याय करणारीच आहे.
हिंदू पुरूष मात्र जणू काही त्यामुळे हिंदू पुरूषांवरच अन्याय होतो अशा पद्धतीने बोलतात, "त्यांना चारचार बायका करायची परवानगी आणि आम्हाला मात्र..." ही तक्रार चुकीचीच आहे.
मुस्लीमांमध्ये केरळ राज्यात शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या चांगल्या सोयी असल्यानं तिथले मुस्लीम कुटुंब नियोजनात खुप पुढे आहेत. मात्र अन्यत्र मुस्लीम समाज गरीबी, निरक्षरता, अनारोग्य आणि बेरोजगारी यांनी पिडलेला असल्यानं आणि जन्माला येणारं प्रत्येक मुल हे कमावणारे हात असल्यानं मुस्लीम समाजात कुटुंब नियोजन कमी होते. परिणामी मुस्लीमांची लोकसंख्या इतर समाजांच्या तुलनेने वाढते हे खरेय. 2001 आणि 2011 या जनगणनांमध्ये हिंदूंचे जन्म दर वाढीचे प्रमाण 16.8% आहे तर मुस्लीमांचा याचकाळात तो 24.6% आहे. मुस्लीमांनीही कुटुंब नियोजन करायला हवे हे मान्यच आहे.
मात्र ते चार बायका करतात आणि म्हणून "हम दो हमारे दो" तर ते "म्हणजे हम पांच हमारे पच्चीस" अशाप्रकारे भरमसाठ [पाचपट वाढतात ] लोकसंख्या वाढते असे जे अवाजवी चित्र रंगवले जाते ते मात्र खरे नाही.
मी चार शादीया करण्याचा समर्थक नाही. मात्र चार लग्नांमुळे मुस्लीमांची लोकसंख्या वाढत नाही तर ती गरीबी, निरक्षरता, बेरोजगारी आणि कुटुंब नियोजनाबाबतची योग्य ती जागृती नसणं यातून वाढते हे समजून घेतलं पाहिजे.
लोकसंख्या शिक्षणाचा हा मुद्दा आपण जरा नीट समजाऊन घेऊया.
हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजात 1000 पुरूषांमागे 922 स्त्रिया आहेत. समजा त्या 1000 आहेत असे गृहीत धरूया.
एक हजार स्त्रियांनी एक हजार पुरूषांशी विवाह केले आणि त्यांना प्रत्येकीला पाच मुलं झाली असं समजलं तर लोकसंख्या पाच हजारानं वाढणार.
आता असं समजा की प्रत्येक मुस्लीम पुरूषानं चार बायका केल्या तर 250 च पुरूषांची लग्नं होणार. त्या मुस्लीम पुरूषाला प्रत्येक बायकोपासून पाच मुलं झाली तर त्याला वीस मुलं होतील. परंतु प्रत्यक्षात 250 च पुरूषांची लग्नं झालेली असल्यानं 20* 250= 5000 एव्हढीच लोकसंख्या वाढणार आहे.
काही मुस्लीम पुरूष एकापेक्षा जास्त बायका करतात हे खरं असलं तरी सरसकट सगळे मुस्लीम पुरूष चार बायका करतात हे खरं नाही. तेव्हढ्या स्त्रियाच नसल्यानं ते शक्यही नाही. मात्र तरीही एक पुरूष : एक स्त्री हेच सुत्र न्यायाचं आहे यात शंका नाही.
क्रमश:---

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1 :-
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद विवाद चर्चेने सोडवावा अशा सुचना दिल्यानंतर या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.
यात हमखास आढळणारी गोष्ट म्हणजे धर्मवादी जोरात [आक्रमक] आणि सेक्युलर [गारठलेले] बचावात्मक पवित्र्यात दिसत आहेत.
1. खरं म्हणजे हिंदु आणि मुस्लीम यांच्यातला हा गुंता किमान 1400 वर्षांचा आहे. किमान 800 वर्षांची मुस्लीम राज्यकर्त्यांची राजवट, इस्लाम हा बंदिस्त धर्म असणं, उर्दू भाषा, शरियत, 1857 चे युद्ध, इंग्रजांचे फोडा आणि झोडा राजकारण, त्यामुळे 1893 पासून घडवण्यात आलेल्या धार्मिक दंगली, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महमद अली जिना, सर सय्यद अहमद, मौलाना आझाद, डा. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि विनायक दामोदर सावरकर व गोलवलकर गुरूजी यांच्या भुमिका, पाकीस्तानची निर्मिती, फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली, कत्तली, जम्मू - काश्मीरचा प्रश्न, दहशतवाद, 370 कलम, एकसारखा नागरी कायदा, जुबानी तलाक, चार लग्नं, कांग्रेस पक्षाने आजवर व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी वापरलेला आणि बदनाम केलेला "सेक्युलर" विचार, पाकीस्तानचे भारतावर असलेले "अतिविशेष प्रेम", आजवर झालेली भारत पाक युद्धे, हमीद दलवाईंचे मुस्लीम सत्यशोधक आंदोलन, शाहबानो खटला आणि इतर अनेक पैलू आहेत. भारत हा "गंगाजमुना तहजीब" म्हणजे विविधता, समन्वय आणि बंधुतेचा सन्मान करणारा देश आहे.तीच आमची खरी संस्कृती आहे.
आज त्यातल्या फक्त एका पैलूवर चर्चा करणार आहे. बाकीचे पैलू आपण नंतर क्रमश: बघू...
हिंदू समाजाची विभागणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णात आणि 4635 जाती/जमातींमध्ये झालेली आहे.
मुस्लीम समाजातही शिया, सुन्नी, अहमदिया आणि इतर असे भेद आहेतच.
पण भारतीय मुस्लीम समाजात आणखी चार महत्वाचे घटक आहेत.
1. अश्रफ - अ - जे स्वत:ला बाहेरून आलेले उच्चकुलीन मानतात असे, इराक,इराण, अफगाणिस्तान, वा अन्य देशातून आलेले आणि नबाब, बादशहा, अमीर, उमराव म्हणून प्रतिष्ठा व मानमरातब असलेले, [ज्यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमांच्या संख्येत 1% पेक्षा कमी आहे.]
2. अश्रफ - ब - हिंदूंमधील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यातून धर्मांतर करून मुस्लीम झालेले, [ज्यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमांच्या संख्येत 2% पेक्षा कमी आहे.]
3. अजलफ - हिंदूंमधील शूद्र वर्णातून धर्मांतरीत झालेले,
4. अर्जल - हिंदूंमधील अतिशूद्र किंवा दलित, आदीवासी यांच्यामधून मुस्लीम झालेले,
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्र.3 व 4 यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमात 97% + आहे. मात्र गेल्या 70 वर्षात या समुहांमधून केवळ 20% नेतृत्व उभे राहिले. या उलट 3% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या क्र.1 व 2 मधून मात्र 80% पेक्षा अधिक नेतृत्व उभे राहिले.
परिणामी मुस्लीम लिडरशीप कायमच इस्लाम खतरेमें असल्याचा बागुलबुवा करीत राहिली.
शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षितता हे मुस्लीम समाजाचे खरे अग्रक्रमाचे प्रश्न आहेत. शिवाय विविध प्रादेशिक आणि भाषक संस्कृतींचा तिथल्या मुस्लीमांवरचा प्रभावसुद्धा महत्वाचा घटक आहेच. त्यांच्याकडे मात्र या उच्चभृ नेतृत्वाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले.
क्रमश: --