Showing posts with label व्यक्तीचित्रे. Show all posts
Showing posts with label व्यक्तीचित्रे. Show all posts

Thursday, June 18, 2020

विवेकवादी गोपाळ गणेश आगरकरांचा १२५ वा स्मृतीदिन : प्रा. हरी नरके









वयाच्या अवघ्या ३९ व्या  वर्षी  अकाली वारलेल्या गोपाळराव आगरकरांना जाऊन काल १२५ वर्षे झाली.          (जन्म, टेंभू, सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : पुणे, १७ जून १८९५)  कोरोना आणि एकुणच मराठी समाजाचा आगरकरांबद्दलचा थंडपणा यामुळे त्यांचे स्मरण फारसे कोणाला झाले नाही. हेही आपल्या रितीला धरूनच झाले म्हणा! आगरकरांनी ज्या मध्यमवर्गीयांच्या सुधारणेसाठी आपली हयात घालवली त्यांनी आगरकरांचा विचार स्विकारला, त्यानुसार उच्चशिक्षण घेतले, आधुनिक राहणीमान, जीवनमान स्विकारले पण आगरकारांचं नाव मात्र टाकून दिलं. विचारसुद्धा सगळा नाही घेतला. सोयीचा तेव्हढा घेतला. त्यांचा ध्येयवाद, त्यांचे समर्पण नाही घेतले. त्यांचा सुधारणावाद, बुद्धीप्रामाण्यवाद नाही घेतला. त्यांच्या विवेकनिष्ठेऎवजी त्यांच्या विरोधकांचा धार्मिक उन्माद आणि तुच्छतावाद मात्र आवर्जून घेतला. विज्ञाननिष्ठा नाकारली आणि पुरोहितशाहीची  मानसिकता घेतली.

अशा आप्पलपोट्यांसाठी आगरकर हकनाकच गेले म्हणायचे. आगरकर विवेकवादी होते. ते गरिबीतून कष्टाने शिकले. उत्तम सरकारी नोकरी आणि छान कमाई झाली असती तर तिच्यावर पाणी सोडून मध्यमवर्गीयांच्या अंधश्रद्धा दुर व्हाव्यात, स्त्रियांनी आधुनिक केशभुषा, वेशभुशा स्विकारावी, भरपूर शिकावे, कर्तबगारी गाजवावी, बालविवाह करू नयेत, विधवांचे पुनर्विवाह सन्मानाने व्हावेत, विधवांचे केशवपन करू नये, सती जाण्याची गरज नाही हे विचार लेखनाद्वारे मांडीत राहिले.  त्यावरून टिळकांशी मतभेद झाल्यावर आपला स्वत:चा "सुधारक" हा पेपर काढून विचारकलहाला घाबरू नका, चर्चेमुळे, वादविवादामुळे समाज समृद्ध होतो, मराठी माणूस हा मुलत: कलहशील आहे. कळवंड करणारा, भांडकुदळ आहे, त्याला चेतवित राहिले. जागवित राहिले.

"सुधारक" या पेपरला ब्राह्मणवाद्यांचा किती विरोध असावा? पुढे फाशी गेलेल्या चाफेकर बंधूंनी सुधारकाच्या संपादकाला अंधारात गाठून मारहाण करण्यासाठी तरूण हवेत अशी जाहीरातच वर्तमानपत्रात दिलेली होती.

ते आधी केसरी, मराठाचे व नंतर सुधारकाचे संपादक असताना लोकशिक्षण, लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकरंजन हे सुत्र उराशी बाळगून लिहित राहिले. कोल्हापूरच्या शिवाजीराजांना ब्राह्मण दिवाण बर्वे त्रास देत होते. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी अग्रलेख लिहिले. बर्व्यांनी अब्रुनुकसानीचा खटला भरला. ब्रिटीश कोर्टाने दहा हजार रुपयांचा जामीन मागितला. त्याकाळचे (१८८०-८१) दहा हजार रुपये म्हणजे आजचे सुमारे दहा कोटी रुपये. अशा संकटाच्या घडीला त्यांनी रात्री अकरा वाजता तार केली. मदत मागितली. महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावले. सत्यशोधक समाजाचे खजिनदार रा. बा. उरवणे यांनी रोख दहा हजार रुपये मुंबईला कोर्टात पोचते केले. पुढे टिळक-आगरकरांना न्यायालयाने साडेतीन महिन्यांची शिक्षा सुनावली. ते सुटले तेव्हा जोतीरावांच्या सुचनेवरून सत्यशोधकांनी डोंगरीच्या तुरूंगाबाहेर जल्लोश केला. एका रथातून त्यांची मिरवणूक काढली. त्यांचा जंगी सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. हे सगळे खुद्द टिळकांनीच पुढे केसरीत लिहिलेय. तिथूनच मी हे उद्धृत करतोय. (पाहा: केसरी, ३ ऑक्टोबर १८८२)

जोतीरावांनी त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद असतानाही कायम त्यांना पाठींबा दिला, सहकार्य केले. विवेकवादी असूनही आगरकरांची वैचारिक भुमिका  ही होती की, "जे काही करणे ते मूळ आर्यत्व न सांडता करावे," याच्याउलट फुले आर्यत्वाचे कणखर विरोधक होते.

लोकहितवदी, न्या.रानडे, आगरकर, कर्वे ही भलीच माणसं होती. पण महापुरूषांनाही मर्यादा असतातच. काही काळाच्या, काही स्वत:च्या. आगरकरांनी ज्या कुटुंबसुधारणेचा ध्यास घेतला होता ती आता बर्‍यापैकी साध्य झालेली आहे. लोकहितवादी आयुष्यभर लोकहितार्थ झटले. पण त्यांची लोकांची कल्पना बघितली तर ती सर्वसमावेशक दिसत नाही. ती लोक म्हणजे अभिजन अशी मर्यादित दिसते, अशी टिका ख्यातनाम इतिहासकार अरविंद देशपांडे यांनी केलेली आहे. (पाहा: महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, १९९८, पृ. ५ ) न्या. रानडे प्रकांडपंडीत होते. सुधारक होते. पण व्यक्तीगत जीवनात सुधारणा करताना पाय मागे घेणारे होते असे त्यांचे चरित्रकार न.र.फाटक सांगतात. ( पहिली बायको वारल्यावर विधवेशी लग्न करण्याऎवजी ९ वर्षांच्या मुलीशी जिल्हा न्यायाधिश असलेल्या ३२ वर्षांच्या रानड्यांनी लग्न केले.) कर्व्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी काम केले पण फक्त ब्राह्मण विधवांसाठीच ते काम करीत राहिले.

या पार्श्वभुमीवर जोतीराव फुले यांची समाजक्रांतीची भुमिका या समकालिनांना पेलवली नाही. या विवेकी माणसाने जोतीराव वारले तेव्हा ती बातमीही दिली नाही. टिळकांनी दिली नाहीच पण आगरकरांनीही सुधारकात ती दिली नाही याबद्दल इतिहासकार य. दि. फडके यांनी खेद व्यक्त केलेला आहे. जोतीराव धर्मांतर करून कधीही ख्रिस्ती झाले नाहीत. त्यांनी "सत्यधर्मा"ची मांडणी केली. तरिही आगरकर त्यांना "रेव्हरंड जोतिबा" असे हिनवतात. आगरकरांचे भावविश्व शहरी होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात शेती, शेतकी, शेतकरीजगत यावर फारसे काही लिहिलेले आढळत नाही.


सामाजिक समता, स्त्री-पुरुषसमता आणि विज्ञान‌निष्ठा‌ ही आगरकरांची जीवनमुल्ये होती.  ते बाळ गंगाधर टिळकांचे समकालीन, आधी मित्र आणि नंतर कट्टर विरोधकही. ते केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टिळक व आगरकर एकत्र आले. दिनांक १ जानेवारी १८८० रोजी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाली. आगरकर १८८१ मध्ये एम.ए. झाल्यावर या शाळेत शिकवू लागले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. पुढे  टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

ते थोर प्रबोधनकार होते. भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मुल्यांवर आधारलेला मराठी समाज उभा राहावा यासाठी ते झुंजले. महाराष्ट्रसमाजाला समाजपरिवर्तन, विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देण्यासाठी ते बोलत-लिहित राहिले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळावी या कारणे त्यांनी देह झिजवला. आपल्या समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यावा, ग्रंथप्रामाण्य नष्ट व्हावे, बुद्धीला पटेल तेच स्वीकारले जावे, केवळ अंधानुकरण करीत रूढीवादी जीवन जगु नये असा प्रचार ते करीत राहिले. रुढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशी समाजधारणा बनावी हे त्यांचे स्वप्न होते. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत, आधुनिक पादत्राणे वापरली पाहिजेत, स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरीने काम करावे हे आज सहज स्विकारले गेलेले विचार ज्याकाळात समाज नाकारीत होता तेव्हा आगरकर भांडत होते. ज्यांच्यासाठी ते भांडत होते त्यातल्या ९९ टक्क्यांना मात्र याची आज जाणीवसुद्धा नाही. आठवणीचा मुद्दाच नाही.

आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा? या वादात ते आधी समाजसुधारणा या मताचे होते. त्यांचे सुधारक हे वर्तमानपत्र इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काहीकाळ ना. गो.कृ. गोखले यांनी सांभाळली होती.

बुद्धीला जे पटेल ते बोलणार व शक्य ते आचरणात आणणार हा त्यांचा बाणा होता. " विचारकलह" हा समाजस्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे ह्याचे ते पुरस्कर्ते होते. त्यावेळी सनातनी आजच्यासारखेच आक्रमक होते. संघटित होते. हिंसकही होते. ब्रिटीश राज्य असले तरी सामाजिक जीवनात अजूनही पेशवाईच होती. त्यामुळे पुण्यातल्या सनातन्यांनी सर्व सुधारकांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.

वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी आगरकर गेले.

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात १९३४ मध्ये आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

आज त्यांच्या नावे काही पुरस्कारही दिले जातात. साहित्य संस्कृती मंडळाने तीन खंडात आगरकर-वाङ्मय प्रकाशित केलेले आहे. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे) त्यातल्या निवडक लेखांचा संग्रह प्रा. ग.प्र. प्रधान यांनी संपादित केलेला असून त्याचे प्रकाशन साहित्य अकादमीतर्फे झालेले आहे. "शोध बाळगोपाळांचा" हे य.दि.फडके यांचे पुस्तक व विश्राम बेडेकरांचे "टिळक-आगरकर" हे नाटक प्रसिद्ध आहे. "डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस", हे आगरकरांचे स्वत:चे अनुभवकथन व त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत केलेले भाषांतर ’विकार विलसित’ वाचनीय आहे.

या विवेकपुरूषाला विनम्र आदरांजली.

- प्रा. हरी नरके, १८/६/२०२०



Friday, May 29, 2020

डॉ. माईसाहेब : आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी- प्रा. हरी नरके



"या ग्रंथाची रचना करण्याचे काम मी हाती घेतले तेव्हा मी आजारी होतो. आणि अद्यापही मी आजारीच आहे. गेल्या पाच वर्षात माझ्या तब्बेतीत अनेक चढउतार झाले. त्यातील काही टप्प्यांवर माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती की, डॉक्टर्स मी विझती ज्योत ( Dying Flame) असल्याचे बोलत असत. या मालवत्या ज्योतीला यशस्वीपणे प्रज्वलित ( Sucessfully rekindling ) करण्यात माझी डॉक्टर पत्नी व माझ्यावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांचे वैद्यकीयशास्त्रातील कौशल्य कारणीभूत आहे. मी त्यांचा अत्यंत कृतज्ञ आहे. ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या " द बुद्धा अ‍ॅण्ड हिज धम्मा" च्या प्रस्तावनेतून )






डॉ. माईसाहेब आंबेडकर या तत्वनिष्ठ, करारी बाण्याच्या आणि कुशाग्र बुद्धीमत्तेच्या लढवय्या नेत्या होत्या. त्यांची माझी पहिली भेट मुंबईत १५ ऑगष्ट १९८२ रोजी झाली. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नामांतर परिषदेच्या त्या उद्घाटक होत्या. त्यांचे भाषण अतिशय कळकळीचे आणि जोशिले होते. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना भेटलो. त्यांना जयभीम केल्यावर त्यांनी माझ्याकडे बघत अतिशय खणखणीत आवाजात जयभीम असा प्रतिसाद दिला. कुठून आलास, काय करतोस असे त्यांनी जिव्हाळ्याने विचारले. मी तेव्हा  बारावीला शिकत होतो. हे मी त्यांना सांगताच " अच्छा म्हणजे तू पुण्याचा आहेस तर, आलास कसा?" त्यांनी विचारलं. मी या परिषदेला डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, गंगाधर आंबेडकर यांच्यासोबत आलो होतो. मी तसे सांगताच त्यांनी विचारलं, " घरी कोणकोण असतं? आईवडील काय करतात? राहतोस कुठे? "


" माझे वडील मी फार लहान असतानाच वारले, आई मजूरी करते, मी साडेसतरा नळीवरील दांगटवस्ती या झोपडपट्टीत राहतो. "

" सत्याग्रहात येणार असशील तर अटक होईल. तुरूंगात राहावे लागेल, तयारी आहे?" त्यांनी विचारले. मी हो म्हणालो. त्यांना कौतुक वाटले असावे. त्यांनी माझ्या पाठीवर थोपटले.


सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी व एसेम जोशी यांनी केले. पहिल्याच दिवशी सोळा हजार लोकांना अटक झाली. मी लहान असल्याने  बहुधा मला  नेत्यांच्या बराकीत ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्याचा मला खूप फायदा झाला. रावसाहेब कसबे, शरद पाटील, बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, अरूण कांबळे, लक्ष्मण माने, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, ग.प्र. प्रधान, विजय मोरे, दिनकर साक्रीकर, महंमद खडस, सुभाष लोमटे आदी १०० मान्यवरांच्या सोबत सुमारे महिनाभर एकत्र राहता आले. आम्ही राजकीय कैदी असल्याने श्रमदान किंवा कष्टाचे काम काहीच नव्हते. मग काय झोपेचे ६/७ तास सोडले तर बाकी सगळा वेळ चर्चा, व्याख्यानमाला, प्रश्नोत्तरे, शाहीरी गाणी, गप्पाच गप्पा.


दररोज १७ ते १८ तास चर्चा. माईसाहेब आम्हा कैद्यांना भेटायला जेलवर यायच्या. मृणालताई, अहिल्या रांगणेकर, डॉ. नीलम गोर्‍हेही यायच्या. याच सत्याग्रहाने मला सुनिल तांबे, नितीन वैद्य असे जिवाभावाचे मित्र मिळवून दिले. ( सत्याग्रहाच्या या अनुभवावर पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहायला हवे. )


आमची सुटका करताना जेलरने दिलेले प्रमणपत्र मी अतिशय जपून ठेवलेले आहे. मला तो फार मोठा पुरस्कार वाटतो.

पुढे मित्रवर्य विजय सुरवाडे यांच्यामुळे ( ते माईंचे सेक्रेटरी होते. त्या विजयला मानसपुत्र मानायच्या ) माईसाहेबांच्या खूप भेटीगाठी झाल्या. एकतर दरवर्षी आम्ही माईंसोबत ६ डिसेंबरला चैत्यभुमीवर जायचो. दरवर्षी जयंतीच्या कितीतरी कार्यक्रमात त्यांच्यासोबत मला स्टेजवर बसता आले, भाषण करता आले, त्यांचे भाषण ऎकता आले याचा मला अभिमान वाटतो.

याचकाळातला त्यांच्यासोबतचा एक फोटो विजयरावांमुळे उपलब्ध झाला. त्यात माईसाहेबांसोबत मी, विजय सुरवाडे, देवचंद अंबादे व वसंत मून दिसत आहेत.  " डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" खंड १ ते १६ यासाठी मूनांचे अफाट योगदान आहे. मी मूनांसोबत ११ वर्षे काम केले. त्यांचा माझ्यावर फार जीव होता.


त्यांचे प्रत्येक पुस्तक ते मला भेट द्यायचे. आज त्यांच्या या पुस्तकांवरच्या सह्या बघताना अनेक आठवणी दाटून येतात. मून अभ्यासू, जिगरबाज आणि तत्वनिष्ठ होते. पण ते गवई गटाचे असल्याने बहुधा त्यांच्या मनात माईंबद्दल एक अढी होती. माई हयात असेपर्यंत मूनांनी रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसच्या रॉयल्टीची सरकारी फाईल सतत फिरती ठेवली आणि बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून  त्यांना या रॉयल्टीचा एक रूपयाही मिळू दिला नाही. मूनांच्या मृत्यूनंतर त्यांचे पद माझ्याकडे आले.


तेव्हा तहसीलदार मूनांनी फाईल ( नस्ती ) कशी दाबून किंवा फिरती ठेवून माईंना कपरदीकही मिळू दिली नाही ते कळले आणि खेद वाटला. मी ताबडतोब सगळ्या पुर्तता करून घेऊन रॉयल्टीचा पहिला चेक काढला, पण तोवर २९ मे २००३ ला माई गेलेल्या होत्या. तो पहिला धनादेश प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना सुपुर्द करतानाचा क्षण आजही माझ्यासाठी ताजा आहे.

माईंच्या अनेक आठवणी आहेत. त्यातल्या किमान २ तरी इथे द्यायलाच हव्यात. मित्रवर्य अरूण खोरे यांनी आम्हा काही मित्रांच्यासोबत "दलित साहित्य संशोधन संस्था" स्थापन करायचे ठरवले. उद्घाटनाला उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांना निमंत्रण द्यायला आम्ही दिल्लीला गेलो. आमच्या भेटीत त्यांनी निमंत्रण स्विकारताना माईसाहेबांबद्दल अतिशय आपुलकीचे उद्गार काढले.


आमच्या व माईंच्या अशा दोन्ही कार्यक्रमांसाठी ते पुण्याला आले. आमचा कार्यक्रम बालगंधर्वला झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी माईंचा कार्यक्रम होता. सिंबॉयोसिसने उभारलेल्या आंबेडकर मेमोरियलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या स्मारकाच्या टेकडीवरील सरकारी जागेच्या हस्तांतराचे काही सोपस्कार बाकी राहिलेले होते. त्यावेळी बोलताना माईंनी स्टेजवर बसलेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशींना अधिकारवाणीने त्याबद्दल फटकारले. जोशीबुवा गोरेमोरे झाले. माई जरा जास्तच कडक बोलल्या होत्या.


त्यांना जोशींचे नावच आठवत नव्हते. त्या फटकळपणे म्हणाल्या, "मी मुख्यमंत्र्यांना सांगते, उगीच फाईल लांबवू नका. नाही तर मी बाळला ( बाळासाहेब ठाकरे ) सांगून काम करून घेईन. बाबासाहेबांच्या स्मारकाला नाही म्हणता म्हणजे काय?" आणि आपल्या एका मैत्रिणीकडे वळून त्या म्हणाल्या, " कोण ग तो मुख्यमंत्री? मला त्याचे नावच आठवत नाही बघ, वय झालं ना!"

आणि स्टेजवरील मुख्यमंत्र्यांकडे बघत त्यांनी विचारले,   "काय हो मि. सीएम, नाव काय तुमचे?" हशा आणि टाळ्यांचा गजर झाला.

मनोहर जोशी तुपटपणे आणि खोट्या विनयाने म्हणाले, " मॅडम, मी मनोहर जोशी."   "हा तर मि. जोशी, ताबडतोब आदेश काढा नाहीतर गाठ माझ्याशी आहे. माहित आहे ना मी कोण आहे ते? मी मिसेस आंबेडकर आहे म्हटलं!"  पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. कदाचित माईंनी प्रोटोकॉल पाळला नसेल पण  सीएमचेही कान अधिकारवाणीने उपटणारे कुणीतरी आहे याचा आम्हाला सॉलीड आनंद झालेला.

माझी माईंशी जवळीक आहे म्हणून मला बरीच बदनामीही सोसावी लागली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईंबद्दल काही नतद्रष्टांनी अफवांचे अभियान चालवून आंबेडकरी समाजाचे मत त्यांच्याबद्दल कलु्षित केले. त्यामुळे माईंना २५ वर्षे अज्ञातवास सोसावा लागला. त्या आर्थिक हालाखीत जगल्या. हालाखीतच गेल्या. त्यांनी मानहानी आणि बदनामी झेलली. पण आंबेडकर म्हणूनच जगल्या आणि आंबेडकर म्हणूनच गेल्या.

माझा माईंच्या बरोबरचा फोटो बघून एका मनोरूग्ण कार्यकर्त्याने त्याच्या गलिच्छ चोपड्यात मलाही गोवले. माईसाहेबांनी म्हणे बाबासाहेबांची कथित हत्या केली तेव्हा मी त्यांना मदत केली होती. आत्ता यात एक छोटीशी अडचण इतकीच आहे की, बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर ७ वर्षांनी माझा जन्म झालेला आहे. तेव्हा मी त्यावेळी दिल्लीला कसा असेन असा प्रश्न त्या माथेफिरूला पडला नाही.


असो. माईंच्यामुळे बाबासाहेबांना काही ऎतिहासिक कामं करायला आयुष्य मिळालं असं स्वत: बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. माईंचे आत्मकथन अतिशय महत्वाचे आहे. विजय सुरवाडे आणि देवचंद अंबाडे यांचे या ऎतिहासिक ग्रंथाबद्दल मन:पुर्वक आभार. ते आवर्जून वाचा. वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी अलिकडेच माईंवर एक पुस्तक लिहिलेय. तेही वाचा.

माईसाहेबांच्या ऎतिहासिक योगदानाला कृतज्ञतापुर्वक जयभीम!
............................................................
डॉ. माईसाहेब उर्फ सविता भीमराव आंबेडकर
माहेरचे नाव- शारदा कृष्णराव कबीर
जन्म- २७ जाने. १९०९, जन्मस्थळ- दादर, मुंबई,
परिनिर्वाण- २९ मे २००३, जे. जे. हॉस्पीटल, भायखळा, मुंबई.

डॉ. आंबेडकरांच्या सहवासात, आत्मचरित्र,
लेखनसहाय्य व संपादन, विजय सुरवाडे,
प्रकाशक- देवचंद वि. अंबादे, तथागत प्रकाशन, तिसगाव, कल्याण पूर्व, जि. ठाणे, ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, मुंबई करिता )

प्रथमावृत्ती-२४ मार्च १९९०, सुधारित आवृती, मे २०१३,

किंमत रू.५००/-
एकुण पृष्ठे-४८६+३२+६४= ५८२,
पुस्तकासाठी संपर्क-९७६ ९२९ ८६ १९



- प्रा.हरी नरके, २९/५/२०२०


Wednesday, May 27, 2020

भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन- प्रा. हरी नरके














भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन- प्रा. हरी नरके
शाळकरी वयात कोसला वाचली. खोलवर भिडली कोसला. लागोपाठ तीनदा वाचली. कोसलानं केलेलं गारूड त्यानंतर तिची कितीतरी वाचनं झाली तरी आजही उतरलेलं नाही. जी पुस्तकं, जे लेखक त्या वयात खूप आवडले होते त्यातले बरेचसे आता आवडत नाहीत. फार थोडे लेखक याला अपवाद आहेत. तेव्हाही आवडले, आजही आवडतात या यादीत नेमाडे अव्वल आहेत.


खरं तर मी नेमाडे वाचणार नव्हतो. कारण त्याकाळात पुल हे माझे दैवत होते. नेमाडे त्यांच्यावर टिका करतात म्हणून मी नेमाडेंवर फुली मारलेली होती. एकदा पुलंशी तावातावाने बोलताना मी नेमाडेंबद्दल काहीतरी बोलून गेलो. भाई म्हणाले, " हरी, तू नेमाडेंची कोसला वाचलीयस का?" मी म्हटलं, "नाही वाचली आणि वाचणारही नाही." ते म्हणाले, "असं का?"  मी त्यांना कारण सांगताच ते हसायला लागले. त्यांनी कपाटातून कोसला काढली आणि माझ्या हातात ठेवली. म्हणाले, " ही आधी वाच नंतर आपण बोलू नेमाडेंवर."


मी कोसला वाचली आणि नेमाडेंच्या प्रेमात पडलो. माझा भाई ( पु.ल. देशपांडे ) बद्दलचा आदर वाढला. भाई म्हणाले, "त्यांनी माझ्यावर किंवा आणखी कोणावरही टिका केली तरी त्यांची कोसला ही मराठीतली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे हे माझं मत कधीही बदलणार नाही. तुझ्या पुढच्या पिढीने आमच्या वादात पडू नये. हे वाद तात्कालिक असतात. काळाच्या रेट्यापुढे ते आपोआप मोडीत निघतात. टिकतं ते फक्त श्रेष्ठ साहित्य!"


आज आजूबाजूला अनेक किडके साहित्यिक आणि समीक्षक बघतो तेव्हा पुलंच्या मनाच्या मोठेपणाची आठवण येते.


पुढे मी बिढार, जरिला, झूल, हुल याही कादंबर्‍या वाचल्या. मनापासून आवडल्या. त्या सुनिताताईंना फारशा आवडलेल्या नव्हत्या. मला मात्र आवडल्या. भिडल्या. महत्वाच्या वाटल्या.

महाराष्ट्रातील जातीजमातींच्या ताब्यातील शिक्षणसंस्था आणि तिथलं ओंगळवाणं राजकारण यांचा नेमाडेंनी घेतलेला वेध स्तिमित करतो. जातीयता, प्रादेशिकता, शिक्षणाचा बाजार आणि मराठीच्या विविध बोलींची रसरशीत रूपं यांचा जो गोफ या कादंबर्‍यांमध्ये नेमाडॆंनी विणलाय तसं इंद्रधनुष्य मराठीतल्या अन्य लेखकांना क्वचितच जमलंय.


नेमाडे हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. माझ्या दृष्टीने ते थोर आहेत कारण त्यांना अनंत पैलू आहेत.


पहिलं, नेमाडे आजचे लेखक आहेत. अतिशय दणकट लेखक आहेत. पाचदहा वर्षात लेखक मागे पडतात, विसरले जातात. आज ५७ वर्षे होऊनही नेमाडेंची कादंबरी शिळी होत नाही. लोकप्रियता आणि विद्वतमान्यता असे दोन्हीही साध्य केलेले लेखक मराठीत चारपाचसुद्धा नाहीत. नेमाडे त्यात अग्रभागी आहेत.


दुसरं, जातीव्यवस्थेवर टिका करणारे मोजके का होईना लेखक मराठीत आहेत. पण जातीव्यवस्थेवर आसूड ओढणारे आणि स्वत:च्या जातीचीही सालटी काढणारे एक महात्मा जोतीराव फुले आणि त्याच जातकुळीचे दुसरे नेमाडे आहेत. ही यादी आणखी वाढवायची झाली तर रंगनाथ पठारे सोडले तर आज तरी मला पहिल्या श्रेणीतले कुणी दिसत नाहीत.


स्वत:च्या जातीवर टिका करायला फार मोठे धैर्य आणि नैतिकबळ असावे लागते, ते नेमाडेंमध्ये जबरदस्त आहे. असे बळ असलेले काही लोक आजूबाजूला जरूर आहेत पण ते प्रथम श्रेणीचे ललित लेखक नाहीत.


तिसरे कारण नेमाडे द्रष्टे आहेत. त्यांचा आवाका लांब पल्ल्याचा आहे. त्यांची जातीव्यवस्थेबद्दलची मांडणी वादग्रस्त आहे. त्यांची इतर बरीच मतं अनेकांना पटत नाहीत. पण ती मांडण्याचं धाडस नेमाडेंमध्ये ठासून भरलेलं आहे. याविषयावर स्वतंत्रपणे केव्हातरी लिहायला हवे.


आजची भारतीय जातीव्यवस्था नेमाडेंना जितकी आरपार समजलीय तितकी समजलेले विचारवंत क्वचितच दिसतात.


माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर नेमाडेसरांचे पोस्टकार्ड मला आले. आपल्या आवडत्या लेखकाने आपले पुस्तक वाचावे आणि त्याबद्दलचा अभिप्राय पत्राद्वारे कळवावा याचा आनंद अपार असतो. त्याच महिन्यात कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाच्या सेमिनारमध्ये नेमाडेसरांची भेट झाली.


मी त्यांना भेटलो. माझी ओळख सांगितली. मी त्यांच्या पायाला स्पर्श करणार तोच त्यांनी मला मिठी मारली. त्या भेटीत नेमाडेसरांचे रसायन नेमके काय आहे ते थोडेथोडे उलगडायला लागले. गेली ३१ वर्षे त्या केमिस्ट्रीचे नवनवे पदर उलगडतोच आहे. आजही हे काम पुर्ण झालेले नाही.


दरम्यान टिकास्वयंवर आले. त्याला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. लोकसत्ताकार अरूण टिकेकरांनी छाछू वादाला पुरस्कार नावाचा अग्रलेख लिहून त्यावर टिकेची झोड उठवली. टिकेकरसरांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असूनही मी या अग्रलेखावर खरपूस टिका केली. टिकेकरांशी तावातावाने वादही घातला. त्यातनं टिकेकरांची नाराजीही ओढवून घेतली.


बहुप्रतिक्षित हिंदू आली आणि तुफान गाजली. मला हिंदूही आवडली. त्यानंतर सरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

नेमाडॆंवर जळणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. खरंतर अशा भरपूर जळाऊ लाकडाच्या वखारीच आहेत असं म्हटलं तरी चालेल. माझा एक मित्र तर दर महिन्या दोन महिन्याला काहीही बादरायणी संबंध जोडून नेमाडॆंवर फेसबुकवर बरसत असतो. नेमाडॆंनाही वादविवाद आवडतात. तेही सुरसुरी आल्यासारखे त्यात भाग घेतात. नेमाडॆंमध्ये अफाट उर्जा आहे.

मध्यंतरी आम्ही त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार दिला. तो स्विकारायला ते प्रतिभाताईंसमवेत सहकुटूंब सवड काढून आले. सलग तीन दिवस सरांचा सहवास लाभला. मोकळ्याढाकळ्या गप्पा हा सरांचा विशेष.



मी त्या उभयतांना फुलेवाडा दाखवला. सुमारे तासभर सर त्यात रमून गेले.


कार्यक्रमाच्या स्टेजवर चढताना माझे पत्रकारमित्र अद्वैत मेहता यांनी सरांची पुरस्काराबाबतची भुमिका आम्हाला हवीय, तेव्हढी घेऊन देण्याची मला गळ घातली. नेमाडेसर मिडीयापासून दहा हात दूर असतात. मी त्यांना बाईट देण्याची विनंती करताच त्यांनी ती ताबडतोब फेटाळून लावली.


मला म्हणाले, तुला कल्पना नाही, हे पत्रकार लोक फार चावट असतात. त्यांना तिसर्‍याच कुठल्यातरी गोष्टीत रस असतो. पुरस्काराबाबबतची भुमिका हा फक्त त्यांचा बहाणा आहे. या डॅंबीश लोकांना मी कधीच जवळ करीत नाही.

अद्वैतच्या भरोश्यावर त्यांना मी पुन्हापुन्हा विनवत राहिलो. शेवटी सरांना माझी कणव आली. ते वाहिन्यांशी बोलायला तयार झाले. पण मला म्हणाले, त्यांना सांग, मी प्रत्येकाशी वेगवेगळे बोलणार नाही, सगळ्यांना एकच बाईट देईन.

सगळे तयार झाले. सर महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, त्यांच्या विचारातील क्रांतिसुत्रे यावर भरभरून  बोलले. बाईट संपला. आम्ही जायला वळलो. चार पावले गेलो. इतक्यात जाताजाता एकाने विचारले, " सर, साहित्य संमेलन तोंडावर आलेय, जाणार का?" नेमाडेसर उसळले आणि चिडून म्हणाले, मी असल्या रिकामटेकड्यांच्या उद्योगाकडे फिरकत नसतो."

पुरस्कार वितरण समारंभ अप्रतिम झाला. सरांचे समाजशास्त्रज्ञ महात्मा फुलेंवर अफलातून भाषण झाले. पण त्यातले अवाक्षरही कुणी दाखवले नाही. बहुतेक सगळ्या वाहिन्यांनी साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग यावर दिवसभर दळण दळले.


असा काही वाद रंगवला की त्यावर मग आजचा सवाल आणि बेधडक, आणि कायकाय कार्यक्रम घेतले गेले. नेमाडॆसर अशा चर्चांना वाहिन्यांवर जात नाहीत म्हणून मग गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तसे मला बोलावले गेले. अर्थातच मी वाहिन्यांवर गेलो नाही.

पण माझ्यामुळे सरांवर हा प्रसंग ओढवल्याने मला फार अपराधी वाटले. सर मजेत होते. मला म्हणाले, "सोड रे, काय घेऊन बसलास? कोण बघतो या  ****ट  वाहिन्या. तुला सांगतो, म्हणूनच मी बोलत नव्हतो. तर तुला त्यांचा फार पुळका. एक सांगतो. पत्रकार हा कधीही कोणाचाही मित्र नसतो. तो फक्त पत्रकार असतो, हे यापुढे कायम लक्षात ठेव."


मराठीला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे हा माझा लेख लोकराज्यमध्ये प्रकाशित झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सचिव विजय नहाटा आणि संचालक प्रल्हाद जाधव यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.

मी नेमाडेसरांना भेटलो. त्यांचा प्रमाण मराठीला ( पुणेरी) अभिजात दर्जा मिळायला विरोध होता. मी माझी भुमिका सांगितली. मी वर्‍हाडी, खानदेशी ( अहिराणी ) कोकणी, मराठवाडी आदी ५२ बोलीभाषा हीच खरी मराठी असे सांगताच सर खुलले. त्यांनी सगळे सहकार्य देऊ केले. पुढे आमचे अध्यक्ष पठारेसरही त्यांचे निकटवर्तीय असल्याने आम्ही नेमाडेसरांना याबाबतीत भरपूर त्रास दिला. खूपदा भेटलो. चर्चा केल्या.


तासनतास सरांसोबत बैठका झाल्या. नेमाडेसरांची मराठीनिष्ठा इतकी बावन्नकशी आहे की, ते प्रत्येक बैठकीला येताना आमचा अभिजातचा मसुदा वाचून त्यावर टिपणं काढून मगच बैठकीला यायचे. त्यांच्या सुचना अत्यंत मौलिक, नेमक्या आणि शास्त्रशुद्ध असायच्या.

आम्हाला आमच्या मसुद्याचे त्याबरहुकुम फेरलेखन करावे लागायचे. हे करताना त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. एव्हढे सगळे करूनही आभारात त्यांच्या नावाचा उल्लेखसुद्धा नको अशी नेमाडेसरांनी आम्हाला तंबी दिली. त्यामुळे आमचाही नाईलाज झाला. आमच्या अभिजात मराठी प्रकल्पाला सर्वाधिक मदत, मार्गदर्शन आणि अचुकता येण्यासाठीचे सहकार्य जर कोणी केले असेल तर ते नेमाडेसरांनी केले.


पण त्यांनी आमच्याकडून आधीच कबूल करून घेतल्याने आम्ही त्यांचा साधा आभारातही उल्लेख करू शकलो नाही. पुढे हा अहवाल आम्ही राज्य शासनामार्फत भारत सरकारला सादर केला. तो छाननीसाठी साहित्य अकादमीकडे पाठवला गेला. तिथे नेमाडेसरांनी मराठीची बाजू इतक्या जोरकसपणे मांडली की या अकादमीच्या भाषा समितीने एकमताने हा अहवाल स्विकारला आणि मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी एकमताची शिफारस लेखी शिफारस केंद्र सरकारला केली.


नेमाडेसरांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करावे यासाठी मी त्यांना अनेकदा भेटून गळ घालत असे. फुले त्यांचेही आवडते असल्याने तेही विचार करायचे.

पण त्या काळात सर अनेक व्यापांमध्ये बुडालेले होते. मुख्य म्हणजे त्यांना निवृत्तीनंतरचे पेन्शन मिळत नसल्याने त्याचा पाठपुरावा करताकरता ते मेटाकुटीला आलेले होते. एकदा त्यांना तुमचे पेन्शनचे काम माझ्यावर सोपवा, तुम्ही भाषांतराला वेळ द्या अशी मी योजना सुचवली.

ती त्यांनी मान्य केली. प्राध्यापकाच्या नोकरीत सरांनी ब्रेक घेतलेला होता. म्हणजे ते महाराष्ट्राबाहेर गोव्याला काही वर्षे गेलेले होते, त्यामुळे त्यांना सलग सेवेअभावी पेन्शन मिळत नव्हते. मी आमचे उच्च शिक्षण खात्याचे तत्कालीन सचिव जे. डी. जाधव यांना भेटलो. त्यांनी आत्मियतेने केसमध्ये लक्ष घातले. आणि जादूची कांडी फिरावी तसे घडले. फाईल मार्गी लागली. जेडीसर म्हणाले, नेमाडॆंनी माझे एक काम केले तरच मी त्यांच्या फाईलवर अंतिम सही करीन.

आता आली का पंचायत?

नेमाडेसर तसे अतिश्य वल्ली आहेत. किंचित विक्षिप्त म्हटले तरी चालेल. मला भिती होती की ते म्हणतील, "उडत गेली पेन्शन, मला जेडींची अट मान्य नाही." मी त्यामुळे जेडींचे काय काम आहे ते विचारायचे टाळत होतो. पण एकदा भीड रेटून त्यांना त्यांची अट/काम मी विचारले. त्यांनी काय सांगावे?

तर ते म्हणाले, "नेमाडे माझी आवडते लेखक आहेत, त्यांनी एकदा माझ्याकडे चहाला यायला हवे!"
हत्ततेरीकी! एव्हढेच ना?

नेमाडॆसर मंत्रालयात चहाला आनंदाने आले. मोठा चहासोहळाच झाला तो. त्यांनी चहासाठी दहा मिनिटे दिलेली होती. प्रत्यक्षात गप्पा इतक्या रंगल्या की तीन वेळा चहा झाला.

-प्रा. हरी नरके, २७/५/२०२०




Saturday, October 19, 2019

पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर





पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर- प्रा.हरी नरके
४० वर्षांपुर्वी धडफळेसरांची ओळख झाली. त्यांची थोरली मुलगी श्रुती आमच्या दर्पण या ग्रुपमध्ये होती. मंदार आमचा नेता. त्यांच्या दोन्ही मुली श्रुती आणि ऋतावरी ह्या बुद्धीमान आणि गुणी.

तेव्हा हे कुटुंब कसब्यात राहायचे. एकदा त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलावले. जेवताना धडफळेसर आम्हाला नानाविध किस्से सांगून हसवत होते. इतक्या प्रसन्न आणि खेळकर वातावरणातले ते जेवन ४० वर्षे झाली तरी आजही मला लख्ख आठवते. सर अतिशय व्यासंगी, निर्भीड आणि वाकपटू होते. तेव्हा बोलताना एका सनातनी आणि कर्मठ विचाराच्या संघटनेचा विषय निघाला. धडफळे सर स्वच्छ प्रागतिक असल्याने, ते म्हणाले, " माझे असे प्रामाणिक मत आहे की प्रत्येक लहान मुलाला या संघटनेत पाठवावे."

मी अवाक झालो. आणि सरांनी पुढे षटकार ठोकला. " जी मुलं बुद्धीमान आणि कर्तृत्ववान असतात ती वयात येताच ही संघटना सोडतात. आणि जे वयात येऊनही तिथेच राहतात ते त्याच [सुमार] कुवतीचे असतात." आमच्या ग्रुपमध्ये एकजण तिथे जाणारा होता. तो अगदी गोरामोरा झाला. आजही ह्या संघटनेकडे बुद्धीमान लोकांची वाणवा आहे. आहेत ते बहुतेक सारे आदेशावर चालणारे भक्त.

सर आम्हाला उत्तमोत्तम ग्रंथ वाचायची शिफारस करायचे. घरातली पुस्तकं वाचायला द्यायचे. श्रुती माझी मैत्रिण असल्याने जरी मी धडफळे कुटुंबाशी जोडला गेलो होतो तरी माझी सरांशी खास गट्टी जमलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये अनेकजण होते. त्यांच्या सर्वांच्या घरी मी जायचो. पण त्या मित्रमैत्रिणींच्या वडीलांशी एव्हढी दोस्ती जमली नाही. जशी आणि जितकी धडफळेसरांशी जमली होती. त्यांच्याशी मैत्र जडले त्याचं कारण सरांचा दिलखुलास, उमदा आणि हजरजबाबी स्वभाव.

१० ऑगस्ट १९३७ साली जन्म झालेल्या धडफळे यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर अध्यापनाचे कार्य हाती घेतले. प्राचीन भाषा आणि विशेषतः पाली भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दिवंगत संशोधक लेखक धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर पाली आणि बौद्ध संस्कृतीवर संशोधन करून लेखन करणारे मो. गो. धडफळे एकमेव मानले जातात. त्यांचा महाभारतावरही गाढा अभ्यास होता.

प्रदीर्घ काळ भाषासंशोधनामध्ये काम करत असताना धडफळे यांना देशातील, परदेशातील अनेक संस्था, विद्यापीठांनी सन्मानीत केले. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राचीन भाषांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सात प्रबंध आणि असंख्य शोधनिबंध आहेत. त्यांच्या परदेशातील व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. भाषेमध्ये संशोधन करणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले. ते देशविदेशात संशोधनाचे कार्य करत आहेत.

त्यांची कथनशैली लख्ख चित्रशैली होती. ते विद्वान असूनही अतिशय सोपं बोलत. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्वानांना विनोदाचे वावडे असते. धडफळेसरांची मात्र विनोदावर हुकुमत होती.
त्यामुळेच त्यांची जशी लक्ष्मणशास्त्री जोशींशी मैत्री होती तितकीच घट्ट मैत्री पु. ल. देशपांडे यांच्याशी होती.
श्रुती-मंदारच्या लग्नाल त्यामुळे हे दोघेही घरचे कार्य समजून आवर्जून उपस्थित राहिलेले होते.

मी प्राध्यापक व्हावे ही सरांचीच इच्छा. बहुजनांबद्दल सरांना विशेष आत्मियता होती. सरांनी मला भांडारकर संस्थेशी जोडले. प्रा. आ.ह.साळुंखे, सदानंद मोरे आणि माझी राज्य सरकारने भांडारकर संस्थेवर नियुक्ती केली. तेव्हा धडफळेसर बोरीचे मानद सचिव होते. सरांनी या संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. अनेक वर्षे त्यांनी या संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. धडफळे-भाटे वाद गाजले. ते लढवय्ये असल्याने कोणालाही वादात ओढायला ते घाबरत नसत.

ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरीही होते.
त्यांची " पाली भाषेतील बौद्धसंत साहित्य" आणि इतर पुस्तकं, विद्वत्ता, संशोधन आणि मौलिकता यांचा मानदंड ठरावीत.

भांडारकरमध्ये त्यांच्यासोबत काम करता आले, त्यांच्याकडून संशोधनाची शिस्त, व्यासंग आणि निकोप-निरामय संशोधनवृत्ती यांचे धडे घेता आले.

अभिजात मराठीबाबत मी रंगनाथ पठारेसरांना घेऊन त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर सलग तीनतास आमच्याशी बोलत होते. त्यात शेकडो संदर्भ, युक्तीवाद आणि भाषक प्रवासाचे नमुने होते. वयोपरत्वे अलिकडे ते बोलताना सहजपणे इतर विषयात शिरायचे आणि तिथेही रमायचे. नानाविध विषयांचा ज्ञानकोश म्हणजे धडफळे सर. अतिशय चैतन्यदायी, उर्जादायी विद्वत्ता.

सर बोलायला जसे विनोदी होते तसेच ते कायम निर्भिड आणि टोकदारही होते. भांडारकरच्या एका बैठकीत बोलताबोलता त्यांनी एका भांडकुदळ सदस्याला सणसणीत चपराक लगावली होती. ते म्हणाले, " आपल्या संस्थेचे अध्यक्ष सकाळी जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा कुत्रा आणि आणि *** असतात. [***संबंधित सदस्याचे नाव]

ते सदस्य इतके भडकले की त्यांना बोलताच येईना. धडफळेसर पुढे म्हणाले, " माझे हे म्हणणे खोटे असेल तर मी प्रत्यक्षदर्शींची साक्ष काढतो. काढू का?" ते सद्गृहस्थ निरूत्तर झालेले.

अलिकडेच त्यांनी अभिजात मराठीबाबत एक लेख लिहिला होता. त्यांच्या या बदलत्या भुमिकेबाबत त्यांच्याशी मला चर्चा करायची होती. पण आता ती कशी करणार?

सर, तुम्ही आम्हाला हवे होतात.

विनम्र आदरांजली.

प्रा.हरी नरके, १९ ऑक्टोबर २०१९

Tuesday, July 9, 2019

भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची उपेक्षा का?






दररोज एका नवीन डूडलच्या माध्यमातून लोकांचा सन्मान करणाऱ्या गुगलनं १ जुलै २०१८ च्या बुधवारी मराठी मनाला एक सुखद धक्का दिला. ते होतं डॉक्टर्स डेचं डूडल रखमाबाई (सावे) राऊत यांच्या सन्मानार्थ. कोण होत्या रखमाबाई? आणि त्यांच कार्य काय होते?
गुगलनं रखमाबाईंवर डूडल बनवलं आणि अनेकांनी त्यांचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. त्या भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
१८६४ साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या.
 त्याकाळी त्यांनी नवऱ्याकडे जायला नाही म्हणणं ही खूप मोठी गोष्ट होती.
त्यानंतर रखमाबाईंच्या आईंनी पुन्हा लग्न केलं. सावत्र वडिलांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता.
त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन राऊत हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.
तसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं लवकरच निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.
बालविवाहाविरुद्ध लढा
रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपल्या बालपणी झालेला विवाह रखमाबाईंना मान्य नव्हता आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला.
ब्रिटीश न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या विरूद्ध निकाल दिला. त्यावर त्या तुरूंगात जायला तयार झाल्या. लंडनमध्ये महिलांनी त्याविरूद्ध आवाज उठवला. त्यांनी निधी जमवून रखमाबाईंच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. तत्कालीन महाराष्ट्रात या निकालावर बरीच टीका झाली. शेवटी दादाजी भिकाजी यांनी पैसे देऊन कोर्टाबाहेर तडजोड करण्यात आली.
या निकालाला आणि त्या अनुषगांने येणाऱ्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांमधलं एक प्रमुख नाव होत बाळ गंगाधर टिळक.
रखमाबाईंनी  'द हिंदू लेडी' या टोपणनावानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखही लिहीले.
एमडी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. इंग्लंडच्या कॉलेजनं त्यांना एमडी करण्याची परवानगी दिली नाही. कारण त्याकाळी इंग्लंडमध्येही स्त्रियांना एमडी करण्याची परवानगी नव्हती. त्याकरिता त्यांनी तिथंही लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. परत आल्यावर त्यांनी मुंबईचे कामा हास्पीटल, तसेच सुरत आणि राजकोटमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून आयुष्यभर काम केले. वयाच्या नव्वदीतही त्या रूग्णसेवा करीत राहिल्या.
तरीही उपेक्षा?
असं असतानाही इतिहासानं रखमाबाईंची उपेक्षा का केली? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा महाराष्ट्रातल्या थोर स्त्रियांच्या यादीत रखमाबाईंचं नाव का येत नाही?
तसं पाहिलं तर स्वातंत्र्यलढा सुरू होता तेव्हा दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचंही वारं वाहात होतं.
दोन्ही चळवळींमध्ये मोठमोठी माणसं जोमानं काम करत होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत लढणाऱ्यांचा इतिहासात प्रामुख्यानं उल्लेख झाला आणि समाजसुधारकांकडे दुर्लक्ष झालं.
रखमाबाई बहुजन समाजाच्या होत्या म्हणून त्यांच्या कार्याकडे तत्कालीन इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं का?
अभिनेते आणि दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रखमाबाईंवर चित्रपट बनवला आहे. महादेवन सांगतात, "मुळात आपल्याकडे पुरुषांनाच हिरो बनवायची पद्धत आहे. त्यांचाच उदोउदो करा. त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून पटकथा रचल्या जातात. त्यामुळे स्त्रियांचं काम मागे पडतं. त्यांना इतिहासात अनुल्लेखानं मारलं जातं."
"म्हणूनच मी त्यांच्या कामावर, त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं. रखमाबाई या पहिल्या स्त्री बंडखोर होत्या. नवऱ्याला सोडण्यासाठी कोर्टात गेलेली पहिली भारतीय बाई असेल ती. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जो लढा दिला तो खूप प्रेरणादायी आहे," असं अनंत महादेवन म्हणाले.
पण आजही कित्येक जणांना रखमाबाईंच्या कार्याविषयी माहिती नाही हे आपलं दुर्दैव आहे, असं महादेवन यांना वाटतं.
"मी चित्रपट बनवायला सुरुवात केली, तेव्हा खूप लोकांना विचारलं की, तुम्हाला माहिती आहे भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? उत्तर आलं, आनंदीबाई जोशी. तेव्हा खूप वाईट वाटलं."
"आनंदीबाईंचं कर्तृत्व मोठं आहेच, पण त्या प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत. त्यांना अकाली मरण आलं. हा मान खऱ्या अर्थानं रखमाबाईंकडे जातो."
- अनघा पाठक, बीबीसी मराठी, या लेखाचा सारांश
https://www.bbc.com/marathi/india-42076214?SThisFB&fbclid=IwAR2fUS_w_skX0FwiTUFy-nfipy6PmIi7ngPFtxCX5MV3B7bS2WNrJrxYtU0
बीबीसी मराठी Related Topics जीवन इतिहास भारत महिला हक्क महिला १ जुलै २०१९ 

Saturday, June 15, 2019

आजपासून पूजा बंद

आजपासून पूजा बंद- प्रा.हरी नरके पन्नास वर्षे संसार केल्यानंतर, नातवंडांची लग्न झाल्यानंतर माझ्या आत्याला तिच्या नवर्‍यानं सोडलं. कारण काय तर बायको मला आवडत नाय. आत्या तिच्या माहेरी म्हणजे आमच्याकडं येऊन राहू लागली. वटसावित्री पौर्णिमेला हाच नवरा सात जन्म मिळो अशी प्रार्थना करीत तिनं वडाला फेर्‍या मारल्या. त्याची मनोभावे पूजा केली. मी तिला विचारलं," अगं आत्या, त्यानं तुला सोडलं. मग कशाला हवा हाच नवरा सात जन्मं?" ती म्हणाली, " त्यानं त्याचा धर्म सोडला. म्हणून आपण आपला सोडू नये बाळा." पुढच्या वर्षी ती पुन्हा पुजेला निघाली. मी तिला म्हटलं, " अगं, त्यानं तुला सोडून दुसरी बायको केली. आता तिही सात जन्मं हाच नवरा मागणार. तुही मागणार. याचा अर्थ तुला पुढची सात जन्मं हीच सवत मिळणार. बघ बाई!" आत्यानं ताडकन हातातलं पुजेचं ताट खाली ठेवलं. म्हणाली, " मला सवत नको. आजपासून पूजा बंद." - कुमुद पावडे यांच्या "अंत:स्फोट" या आत्मकथनातून - प्रा.हरी नरके, १६ जून २०१९

Wednesday, January 16, 2019

व्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक

- सोमनाथ चटर्जी



पंतप्रधान व्ही.पी.सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक होते.त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला.त्यातून सामाजिक उलथापालथ झाली.उत्तरेकडील राज्यात हिंसाचार उसळला. या प्रश्नावर संसदेत मी म्हणालो, " मंडल शिफारशींना माझा पाठींबा आहे. आजही देशातील इतर मागास वर्गाची दारूण पिळवणूक होते आहे. त्यांची प्रगती आणि विकास व्हावा यासाठी देशाची साधने आणि संसाधने वापरली जात नाहीयेत."

गुणवत्तेचा प्रश्न नेहमी आरक्षणाच्या संदर्भात पुढे केला जातो. गुणवत्ता ही उच्चवर्णियांची मक्तेदारी आहे असे मी मानत नाही. आरक्षण धोरण कायदेशीर आणि न्यायालयीन तपासणीत टिकलेले आहे.

प्रसारमाध्यमांची मंडल आयोगावरील प्रतिक्रिया निराशाजनक होती. माध्यमांनी व्ही.पी.सिंग यांना खलनायक म्हणून रंगवले. नैतिक आणि स्वच्छ राजकारणासाठी लढणारा एक शिपाई ही त्यांची खरी प्रतिमा पुसून टाकून त्यांच्याविरूद्ध अत्यंत दुष्ट आणि बदनामीकारक प्रचार करण्यात आला. हा प्रकार इतिहासात तरी कधीही घडलेला नव्हता.

संसदेत मी त्यावर म्हणालो, "प्रसारमाध्यमांनी योग्य प्रकारे लोकशिक्षण करायला हवे. दोन्ही बाजूंचे चित्र नीट मांडायला हवे. शिफारशी काय आहेत नी विरोध कशाला आहे हे व्यवस्थित मांडले गेले तर दुषित जनमत बदलू शकेल. आईवडील आणि शिक्षक लहान कोवळ्या मुलांना भडकावित आहेत. विरोधी चळवळ समाजविघातक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात गेलेली आहे."

"देशाच्या राजधानीत मंडल समर्थक आमदार खासदारांना घेराव घाला, त्यांना केरोसिनमध्ये बुडवून पेटवून द्या " असा विखारी प्रचार खुलेआम चालू होता. त्याचवेळी भाजपच्या अडवानींनी रथयात्रा काढली. अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा दाखवण्यापुरता होता. त्यांची मुख्य लढाई मंडल आयोगाविरूद्ध होती. मंडल आयोगामुळे मागास जाती संघटित होत होत्या. त्यांच्या विरोधात त्यांना आव्हान देण्यासाठी उच्च जातींचे संघटन करण्यासाठी अडवानींचा हा खटाटोप होता. त्यासाठी धर्माचा वापर केला गेला. संकुचित राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी भाषणे रथयात्रेता झाली. देशभर विलक्षण धर्मविद्वेषी परिस्थिती तयार करण्यात आली.

अडवानींना बिहारमध्ये अटक झाली. भाजपाने व्ही.पी.सिंग सरकारचा पाठींबा काढला. अडवानींना देशात धर्माच्या नावावर युद्धे घडवायची होती. रथयात्रेच्या मध्यभागी ठळकपणे भाजपाचे निवडणूक चिन्ह मिरवले गेले.

व्ही.पी. सिंगांनी राजीनामा दिला.

सत्ता गमावली तरी एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा आब वाढला. त्यांची निष्ठा आणि पारदर्शी सरकार देण्याचा त्यांचा प्रयत्न याचे मला फारच कौतुक वाटले. प्रसार माध्यमे अत्यंत कट्टरपणे त्यांच्या विरोधात होती. त्यांनी व्हीपींच्या अश्लाघ्य बदनामीची मोहीमच राबवली. व्हीपींनी जे काही केले ते योग्यच होते. त्यांची पद्धतही योग्यच होती असे मला वाटते.

-सोमनाथ चटर्जी, तत्वनिष्ठेची जपणूक, [आत्मचरित्र], अनुवाद- शारदा साठे, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१४, किं.३२५ रूपये.

-प्रा.हरी नरके

Wednesday, September 19, 2018

आंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र


आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्या सासर्‍यानेच त्याची हत्त्या केली. त्यासाठी एक कोटी रूपयांची सुपारी दिली. पोटच्या पोरीला, गरोदर मुलीला, जातीबाहेर लग्न केल्याची शिक्षा म्हणून जावयाची हत्त्या केल्याची तेलंगणामधली ही घटना संतापजनक आहे. नवविवाहीत अमृता वार्षिणी आपला पती प्रणय याला गमावून बसली. मुलीपेक्षा जात मोठी ही काय मानसिकता आहे?

कोल्हापूरची मेघा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णीच्या हत्त्येची घटनाही फार जुनी झालेली नाही. गेल्या पाचदहा वर्षात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या हत्यांना रानटी, जातीयवादातून केलेल्या निर्घृण हत्त्या म्हणण्याऎवजी ऑनर किलिंग म्हणणे हा तर मुर्खपणाचा कळस आहे.

नागराज मंजूळेंनी सैराट या मराठी चित्रपटाचा शेवट तेलंगणा राज्यात हैदराबादला झालेला दाखवलेला आहे. असे आणखी किती सैराट आपल्या आजूबाजूला घडणारेत?

कथासाहित्याचा जन्म भारतात झालेला आहे. पुराणकथा तर अतिशय रंजक, प्रभावी आणि खोलवर संस्कार करणार्‍या असतात. पुराणातील वांगी [वाणगी] पुराणातच ठिक आहेत असे आपण म्हणत असलो तरी त्यांचा प्रभाव अबोध मनावर पिढ्यानुपिढ्या टिकून राहतो. जाती व्यवस्थेचे पाईक तर सर्वच जातीजमातींमध्ये आहेत. जातीसाठी खावी माती ही वृत्ती सर्वांच्याच हाडीमाशी भिनलेली आहे.


फार पुर्वी पुराणातली मुरलीचरित्र नावाची कथा वाचनात आली होती. जुने किर्तनकार ती कथा सांगत असत.
पैठणला एक अस्पृश्य समाजातला बुद्धीमान मुलगा राहत असतो. तो एका संस्कृत पंडीताच्या घरी गोठा स्वच्छ करण्याचे काम करीत असे. पंडित म्हणत असलेले मंत्र, श्लोक गायाबैलांचे शेण काढताना, गोठा झाडताना त्याच्या कानावर पडत असत. तो मुलगा एकपाठी होता. एकदा ऎकलेला शब्द तो कधीच विसरत नसे. अल्पावधीत त्याला असंख्य मंत्र आणि श्लोक यांचे ज्ञान झाले. तो ते घडाघडा म्हणत असे.


एके दिवशी त्याने आपला गाव सोडला. तो पायी चालत पार नाशिकला गेला. तिथे गोदातीरावर आंघोळ करीत असताना तो म्हणत असलेले मंत्र शेजारच्या भटजींच्या कानावर पडले. त्याचे त्या लहान वयातले स्वच्छ आणि लयदार उच्चार ऎकून भटजी प्रभावित झाले.
त्यांनी त्याची आपुलकीनं विचारपूस केली.

मुलाने घाबरून जाऊन आपली जात चोरली. कुल,गोत्र सारंच बनवून सांगितलं. आपण पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न अशा महामहोपाध्यायांच्या घराण्यातले असल्याचे त्याने खोटेच सांगितले. आपले आईवडील महापुरात वाहून गेल्याचेही पुढे सांगितले. भटजी त्याला आपल्या घरी घेऊन गेले. त्याला जेवायला घातले.
त्याच्या पु्ढच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मुलगा गुणी होता. बुद्धीमान आणि कर्तबगार होता. म्हणताम्हणता त्याने नाव काढले.

अल्पावधीतच तो मुलगा सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. भटजींनी त्याला आपला घरजावईच करून घेतले.

त्याची पत्नी सुशील होती. तिचे पतीवर प्रेम होते.

मला एकदा माझे सासर बघायचे आहे, मला गावी घेऊन चला असा ती हट्ट करी. तो काहीतरी सबबी सांगून वेळ मारून नेई.

एकदा मात्र त्याची पत्नी हट्टाला पेटली. तिने अन्नपाणी वर्ज्य केले. त्याचा अगदीच नाईलाज झाला.
ते दोघे त्याच्या गावी निघाले.

तो चिंतित होता. आता आपले भांडे फुटणार या भितीने घाबरला होता. त्याला काहीच सुचत नव्हते. गुन्हा कबूल करावा तर बायको अंतरेल अशी भिती वाटत होती.

घनदाट जंगलातून जात असताना त्याने एका विहीरीत बायकोला ढकलून दिले आणि तो नाशिकला परत आला.

तुमची मुलगी विहीरीत पाणी पिताना पाय घसरून पडली आणि बुडाली असे त्याने सासू-सासर्‍यांना खोटेच सांगितले.

त्यांनी अपार शोक केला.
असेच दिवस जात होते.

एके दिवशी त्याची बायको साक्षात सुखरूप हजर झाली. तिला बघून तिच्या आईवडीलांना अपार आनंद झाला. तिचा नवरा मात्र खूप घाबरला.
त्याच्या पत्नीने मात्र त्याला सावरून घेतले. माझा पाय घसरून मीच विहीरीत पडले. यांना पोहता येत नसले तरी यांनी मला वाचवायचे खूप प्रयत्न केले वगैरे कथा तिने तयार करून सांगितली.

त्याचा जीव भांड्यात पडला. तिने आपल्याला वाचवले या जाणीवेने तो भारावून गेला. विहिरीत उगवलेल्या एका पिंपळाला आपण लटकून राहिलो आणि काही दिवसांनी तिकडून जात असलेल्या सैनिकांच्या टोळीने आपल्याला कसे वाचवले याची चित्तथरारक कथा तिने त्यांना सांगितली.

रात्री एकांतात असताना त्याने तिचे पाय धरले. मी चुकलो म्हणून तिची क्षमा मागितली.
तिने नवर्‍याला माफ केले. पावसाने झोडपले आणि नवर्‍याने मारले तर तक्रार करू नये असे तिचे संस्कार सांगत होते. ती पतिव्रता असल्याने तिच्या पतीला तिच्या हत्त्येचा गुन्हा माफ वगैरे होता.

आपण तिची हत्त्या करण्याचा प्रयत्न केला तरी तिने उदार मनाने आपल्याला माफ केल्याचे बघून त्याचे डोळे पाणावले. तिला आता सगळे खरेखरे सांगून टाकावे असे त्याला वाटले. त्याला बायकोबद्दल पुर्ण विश्वास वाटू लागला. आपण जात चोरल्याचे त्याने त्याभरात तिला सांगून टाकले.

ती अंथरूणातून ताडकन उठली.

म्हणाली, "माझी हत्त्या तुम्हाला माफ आहे. पण तुम्ही जात चोरलीत हे मात्र कधीच क्षम्य नाही."

तिने नवर्‍याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला पेटवून दिले. जाळून मारले. संपवून टाकले.
पुढे तिथे उगवलेल्या बांबूंच्या मुरलीतून ही कथा चिरस्थाई झाली.

-प्रा. हरी नरके, १९ सप्टेंबर २०१८

Monday, September 17, 2018

पालीभाषा गौरव दिन-



पालीभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तथागत, त्यांच्या परंपरेतले सगळे विद्वान, आधुनिक भारतातले आचार्य धर्मानंद कोसंबी, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनागरिक धम्मपाल, महान पंडीत राहूल सांकृत्यायन, जगदीश कश्यप आदी मान्यवरांना वंदन.

बुद्ध, धम्म, संघ यांचा प्रचार, प्रसार आणि पालीभाषेचे संवर्धन यासाठी धर्मानंद कोसंबींनी आपले आयुष्य वेचले.

जगाचा निरोप घेताना महात्मा गांधींकडे आपली अंतिम इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी १९४७ साली १ हजार रूपये गांधीजींकडे सुपुर्द केले आणि या पैशातून तरूण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन धम्म व पालीचे ज्ञान घेण्यासाठी श्रीलंकेला पाठवा असे सांगितले. गांधीजींनी त्यांना तसे लेखी वचनही दिले. गांधीजींनी आपल्या सहकार्‍यांना लिहिले, " उनके आश्रममें रहने से आश्रम पवित्र होता हैं." त्यांची बुद्धधम्म व पालीबाबतची इच्छा पुर्ण केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

४ जून १९४७ ला कोसंबींनी पवनारच्या गांधी आश्रमात जगाचा शेवटचा निरोप घेतला.
५ जून १९४७ रोजी संध्याकाळच्या प्रार्थना सभेत बोलताना गांधीजी म्हणाले, " जो अपनी डोंडी पीटते -पिटवाते हैं, उन्हे तो हम बहुत चढाते हैं. पर जो मूल सेवक हैं, धर्म की सेवा करते हैं, उन्हें लोग पहचानते भी नही हैं. ऎसे एक आचार्य कोसंबीजी थे. वे हिंदुस्थान के बौद्धविचार और पाली के प्रमुख विद्वान थे. उन्होंने स्वयं फकीरी पसंद की थी. वे प्रार्थनामय थें. ईश्वर करें हम सब उनका अनुकरण करें."

कोसंबींनी ४० वर्षांपुर्वी कलकत्ता विद्यापीठातल्या आपल्या दरमहा २५० रूपये पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. ते १९०८ साली त्यासाठी महाराष्ट्रात आले. महाराजा सयाजीराव गायकवाड देत असलेल्या ५० रू. च्या मानधनावर त्यांनी मराठी माणसांना पाली शिकवायला सुरूवात केली. बुद्ध विचारांचा आणि पाली भाषेचा महाराष्ट्रात प्रचार - प्रसार करण्यासाठी ते पुढचे सारे आयुष्य जगले.

कोसंबींनी पालीभाषेचे शेकडो विद्वान तयार केले. हरीनाथ दे, डॉ. जेम्स एच. वूडस, प्रो. लॅनमन, प्रो.चिंतामण वैजनाथ राजवाडे, विनोदकार म्हणून ख्यातनाम असलेले पालीचे विद्वान चिं.वि.जोशी, डॉ. प.ल.वैद्य, प्रो. ना.के.भागवत, भदन्त यू.धम्मजोती, भिक्कू धर्मरक्षित, डॉ. पु.वि. बापट या त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी बुद्धीझम आणि पाली भाषेवर लिहिलेल्या ग्रंथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे.

भदन्त आनंद कौशल्यायन हे त्यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी कोसंबींच्या "भगवान बुद्ध" या चरित्र ग्रंथाचा सिंहली भाषेत अनुवाद केला. हा ग्रंथ श्रीलंकेत गाजला. त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" चा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे.

महात्मा गांधीनीं १९२७ साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. तिथे पाली भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कोसंबींना निमंत्रित केले. तिथे प्राध्यापक म्हणून
काम करीत असताना त्यांनी आपल्या "हिंदी संस्कृती आणि अहिंसा," "पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म," या ग्रंथामध्ये गांधीजींच्या विचारांची कठोर चिकित्सा केली. रामराज्य, सनातन धर्म, गीता, विश्वस्त या संकल्पानांबद्दलचे आपले मतभेद नोंदवले.

तेव्हाच्या गुजरात पॅटर्नमध्ये मतभेदांचे स्वागत असायचे.


महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात कोसंबींच्या बुद्धीझमवरील ५ भाषणांचे आयोजन केले. महाराज स्वत: सभेला अध्यक्ष म्हणून उपस्थित असायचे. पुढे सयाजी ग्रंथ मालेद्वारे त्यांनी बुद्धीझमवरील असंख्य ग्रंथ प्रकाशित केले.

बडोदा संस्थानात दारूबंदी करावी असा विचार जोर धरू लागला होता. महाराजांनी मात्र तो मुद्दा फेटाळून लावला. "दारूविक्रीद्वारे मिळणारा कर महसूल कुठून आणायचा? असा त्यांनी प्रश्न विचारला. उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत सांगा, तरच मी दारूबंदी करतो" असे ते म्हणाले.

ही बाब कोसंबींना आवडली नाही. कोसंबींनी आपल्या भाषणात सम्राट अशोकाने केलेल्या संपूर्ण दारूबंदीचे उदाहरण दिले. कोसंबी म्हणाले, "सम्राट अशोक असं म्हणाला नाही, की उत्पन्न बुडते, मला पर्याय द्या, त्याने ताबडतोब दारूबंदी केली.चांगली गोष्ट करताना उत्पन्नाचा मुद्दा गौण असतो. विचार महत्वाचा असतो."
भर दरबारात सन्नाटा पसरला. सयाजीराव महाराज भर सभेतून उठून गेले. लोक घाबरले. आता कोसंबींची उचलबांगडी होणार, हाकालपट्टी होणार, पुढची भाषणं रद्द केली जाणार असं जो तो बोलू लागला.

दरबारने त्याच दिवशी महाराजांचा हुकूम प्रसिद्ध केला.

"आचार्य कोसंबी यांच्या विचारांशी महाराज सहमत आहेत. आजपासून संस्थानात संपूर्ण दारूबंदी करण्यात येत आहे."

कोसंबींची पुढची भाषणं सुरळीतपणे पार पडली. महाराज जाहीरपणे म्हणाले, " आचार्य कोसंबींचा अधिकार आम्हाला मान्य आहे. त्यांनी आमच्या कानशिलात वाजवली असली तरी त्यानंच आम्हाला जाग आलेली आहे."
महाराज कोसंबींना कायम गुरूस्थानी मानत असत.

तेव्हा गुजरातमध्ये राजधर्म पाळला जायचा. गुरुजनांचा सन्मान केला जायचा. विचारांचा आदर केला जायचा.
-प्रा.हरी नरके, १७ सप्टेंबर, २०१८

Sunday, September 16, 2018

जयवंत दळवी यांचा २५ वा स्मृतीदिन




निमित्त- जयवंत दळवी यांचा २५ वा स्मृतीदिन -प्रा.हरी नरके

स्मृतीशेष जयवंत दळवी, (१४ ऑगष्ट १९२५  – १६ सप्टेंबर १९९४ ) माझे आवडते लेखक. माझं पहिलं पुस्तक त्यांना भेट द्यायला त्यांच्या भवानीशंकर रोडवरील [ दादर, मुंबई ] घरी गेलो.
घराला कुलूप होतं. दरवाजाच्या फटीतून पुस्तक आत सरकवलं नी पुण्याला परत आलो.
आठवड्याभरात त्यांचं पत्र आलं. "तुझं पुस्तक मी विकत घेऊन वाचलेलं आहे. पहिलंच पुस्तक असूनही नवखेपणाच्या खुणा अजिबात नाहीत. तू सप्रमाण नी समतोल लेखण केलेलं आहेस. सतत लिहिता राहा. मोठा होशील."

त्यांनी त्या पत्रासोबत एक धनादेश पाठवलेला होता.
त्यासोबत २ ओळींची चिठ्ठी होती. "तू मला भेट दिलेली ही प्रत मी माझ्याकडे ठेवतोय. मी विकत घेतलेली प्रत माझ्या कोकणातल्या गावी, अरवलीच्या वाचनालयाला देतोय. माझ्यातर्फे तुला खाऊला हे पैसे पाठवित आहे."

मी त्यांचे आभार मानणारे पत्र पाठवले व तुमचा चेक मी तुमची आठवण म्हणून कायम जपून ठेवतोय असं लिहिलं.

त्यांचं लगेच उत्तर आलं, "असं करू नकोस. चेकची झेरॉक्स काढून ठेव व चेक बॅंकेत भर. त्या रकमेचा आवडता खाऊ घे."

मी तो चेक आजही तसाच जपून ठेवलाय.

त्यानंतर त्यांच्या अनेक भेटी झाल्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. माझी मैत्रिण सविता कुडतरकर त्यांच्या केशवराव कोठावळ्यांची [ मॅजेस्टीकवाले ] नात असल्याने त्या दोघांची गट्टी होती. माझीही त्यांच्याशी मस्त दोस्ती जुळली. नंतर ते बोरिवलीला राहायला गेले. किडनीच्या आजारपणाने ते अकाली गेले.

दळवी गोष्टीवेल्हाळ होते. त्यांच्याशी मतभेद झाले तरी ते नाराज होत नसत. म्हणायचे, "तुझा मुद्दा मला पटत नसला तरी तू बोल. माझ्या वयाचा होशील तेव्हा हाच मुद्दा पुन्हा आठव. मला खात्री आहे तुझे मत बदललेले असेल."

ते राष्ट्र सेवा दलातून आलेले होते.
त्यांचा ठणठणपाळ अफलातून होता.
दळवींच्या कादंबर्‍या, कथा, नाटकं, संपादनं, विनोद, आत्मचरित्राऎवजी हे आत्मकथन यातनं ते मराठीचे अव्वल मानकरी ठरलेत. अनेक आठवणी दाटून येतात.
-प्रा.हरी नरके, १६ सप्टेंबर २०१८

आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी बुद्धीझमवर लिहिले २२ ग्रंथ


आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/







१. बुद्ध, धर्म आणि संघ,
२. बुद्धलीलासारसंग्रह,
३. लघुपाठ,
४. निवेदन, [मराठी, गुजराती, इंग्रजीत प्रकाशित],

५. खुलासा,
६. जातक कथा संग्रह, भाग-१,
७. जातक कथा संग्रह, भाग-२
८. जातक कथा संग्रह, भाग-३

९. समाधिमार्ग,
१०. बौद्ध संघाचा परिचय,
११. हिंदी संस्कृती आणि अहिंसा,
१२. भगवान बुद्ध, [१४ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित],

१३. पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म,
१४. बोधीसत्व नाटक,
१५. विसुद्धीमग्गा,
१६. सुत्तनिपात,

१७. बोधीचर्यावतार,
१८. धर्मचक्रप्रवर्तन,
१९. अभिधर्म,
२०. धम्मपद,

२१. अभिधम्मत्थसंग हो,
२२. अठ्ठकथेचे सिंहलीमधून मराठीत भाषांतर

त्यांचे १४ ग्रंथ गुजराती भाषेत प्रकाशित झालेले आहेत.
त्यांच्या भगवान बुद्ध, या चरित्रग्रंथाचे १४ प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतर प्रकाशित झालेले असून
त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, मल्याळम, तामीळ, तेलगु, कन्नड, सिंहली, आदी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.
आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/

-प्रा. हरी नरके, १६ सप्टेंबर, २०१८

Saturday, September 15, 2018

बुद्धीझम व पालीचे पहिले आधुनिक भारतीय विद्वान-धम्मानंद कोसंबी









आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/

त्यांचा जन्म गोव्यात झाला. त्यांना पाली भाषा शिकायची होती. भगवान बुद्धाला भेटायचं होतं. लहान वयात लग्न झालं. पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि ते घरातून पळाले.
ज्ञानाच्या-बुद्धाच्या,पाली भाषेच्या शोधात.

वाराणसीला जाऊन हालअपेष्ठा सोशित गंगेच्या घाटावर राहून धर्मशाळेत जेवत पंडीतांकडून संस्कृत शिकले.


त्यावेळी संपुर्ण भारतात पाली शिकवणारा एकही विद्वान नव्हता. केवळ त्यासाठी ते नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेशला गेले. तिथल्या धर्मगुरूंकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

ते श्रामनेर बनले. पुढे बौद्ध भिक्कू बनले. त्यानंतर आचार्य, स्थविर आणि महास्थविर बनले. ते बुद्धीझम आणि पालीचे पहिले आधुनिक भारतीय विद्वान ठरले. उमेदीच्या वयातली अनेक वर्षे त्यांनी बुद्धाच्या आणि पालीच्या शिक्षणात घालवली. आयुष्यातली ५० वर्षे त्यांनी बुद्धीझमला वाहिली.


लुंबिनीवनात ज्या ठिकाणी तथागतांचा जन्म झाला, तिथला सम्राट अशोकाने लावलेला शिलालेख वाचताना ते घळाघळा रडले. संपुर्ण बुद्धमय झाले. बुद्धगया, सारनाथ, कुशीनगरला रानावनात राहून त्यांनी बुद्धीझमची साधना केली.

त्यांच्या बौद्ध गुरूंनी त्यांना नाव दिले धम्मानंद. ते बंगाली, गुजराती, सिंहली, ब्राह्मी, नेपाळी, मराठी, हिंदी, कोकणी, पाली, अर्धमागधी, संस्कृत, इंग्रजी, रशियन अशा अनेक भाषांचे तज्ज्ञ होते.

आचार्य धर्मानंद कोसंबी, जन्म ९ आक्टोबर १८७६, निधन- २४ जून १९४७.

ते कलकत्याच्या नॅशनल कॉंलेजात पाली व बुद्धीझमचे पहिले भारतीय प्राध्यापक बनले. कलकत्ता आणि मुंबई विद्यापीठांमध्ये त्यांनी पाली विभाग सुरू करायला लावले. त्याकामात त्यांना ख्यातनाम विद्वान सर रा.गो. भांडारकर यांची खूप मदत झाली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना पाली आणि बुद्धीझम शिकवला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी कमी पगारावर नियुक्ती स्विकारून पालीचे विद्यार्थी घडवले.

मूळ पाली धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून पहिले बुद्ध चरित्र त्यांनी लिहिले. त्यांनी आपलं संपुर्ण आयुष्य पाली आणि बुद्धविचारांच्य संशोधनाला वाहिलं.

बड्योद्याला महाराजा सयाजीरावांनी त्यांची पालीसाठी नियुक्ती केली. त्यांनी धम्मावर अनेक ग्रंथ लिहिले. गुजरात विद्यापीठात त्यांनी काम केले.

त्यांच्या व्यासंगाचा आणि ग्रंथांचा विचार करून अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठाने त्यांना अनेकवार निमंत्रित केले. तिथे त्यांनी अनेक वर्षे बौद्ध ग्रंथांवर लेखन-संशोधन केले. दरमहा २५० रूपये पगाराची प्राध्यापकाची सन्मानाची नोकरी सोडून अवघ्या ५० रूपये मानधनावर हा माणूस पाली व बौद्धविचारांचा प्रचार-प्रसार करीत राहिला.

बुद्धाच्या शोधात आयुष्य घालवणार्‍या या विद्वानाने आधुनिक भारतातला पहिला बुद्धविहार मुंबईत उभा केला. या बहुजन विहाराने पुढचा रस्ता घडवला. पी.लक्ष्मीनरसू, अनागरिक धम्मपाल यांचे ते सहकारी.


सयाजीरावांना पाली साहित्याची त्यांनी गोडी लावली. मराठीतले पहिलेवहिले सगळे बौद्ध साहित्य आचार्य धम्मानंद, सर भांडारकर आणि महाराजा सयाजीराव या तिघांच्या प्रयत्नातून तयार झाले. त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला पालीची गोडी लावली. पुढे या कार्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे, चलो बुद्ध की ओर असा नारा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे स्नेही आणि सहकारी होते.

जागतिक किर्तीचे इतिहासकार, गणिती आणि शास्त्रज्ञ दामोदर तथा डी.डी.कोसंबी हे त्यांचे पुत्र होत.

आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/

-प्रा.हरी नरके, १५ सप्टेंबर, २०१८

Wednesday, September 12, 2018

बलुतंनं जगण्याचा निरामय दृष्टीकोन दिला-






निमित्त-##बलुतंचीचाळीशी##
बलुतंनं जगण्याचा निरामय दृष्टीकोन दिला- प्रा.हरी नरके

"हरी, तू बलुतं अवश्य वाच," असं पु.ल. देशपांडे मला म्हणाले. मी तेव्हा शाळेत होतो. हे पुस्तक ज्या दिवशी प्रकाशित झालं त्याच दिवशी त्यांनी वाचलं होतं. आणि भेटेल त्याला ते बलुतं वाचायची जोरदार शिफारस करीत होते.

परवडत नव्हतं तरी बलुतं मी विकत घेतलं. एका दमात वाचलं आणि मुळासकट हादरलो. खूप रडवलं या पुस्तकानं. एखादं पुस्तक आपल्या आयुष्याचा कायमचा भाग व्हावं हे काम सर्वात प्रथम करणारं पुस्तक म्हणजे बलुतं. दगडू मारूती पवार तथा दया पवार, जन्म १९३५ - निधन- २० सप्टेंबर १९९६, तगडा कवी, श्रेष्ठ आत्मकथाकार, निबंधकार, समीक्षक आणि बलदंड कथाकार. बलुतंची पहिली आवृत्ती २५ डिसेंबर १९७८ ला प्रकाशित झाली. बलुतंनं नवी भाषा, मांडणी, कथनशैली आणि बाज निर्माण केला.

हे पुस्तक खूप गाजलं. त्यावर बाजूनं आणि विरोधात गदारोळ माजला.
या पुस्तकानं मराठी साहित्याची इयत्ता वाढवली. समाजशास्त्रीय दस्तावेजांचं दालन श्रीमंत करून दलित साहित्याचा दबदबा निर्माण केला. कसबे, बागूल, ढसाळ, दया पवार ही नावं श्रेष्ठ मराठी लेखक म्हणून गौरवानं घेतली जायला लागली.





आमचा पुण्यातल्या अनेक शाळांमधल्या मुलामुलींचा "दर्पण" नावाचा एक सोशल ग्रुप होता. मी हे पुस्तक वाचायची सर्वांना शिफारस केली. अनेकजण हे पुस्तक वाचून रडले. बदलले. एक हुशार, "संस्कारवाली कन्या" मात्र भडकली. "कित्ती गलिच्छ पुस्तकाय. आमच्या घरात असल्या घाणेरड्या शिव्या चालत नाहीत. किळस आली वाचून, वैतागाय पुस्तक, मी एकदोन पानंच वाचल्नी ठेऊन दिलं बलुत," असं ती म्हणाली.

ती माझ्या खेडवळ उच्चारांची सदैव टवाळी करायची. मला माझ्या गावठी उच्चारांवरून हिणवायची. पण तिला बलुतंचा उच्चार जमत नव्हता. मला खूप भारी वाटलं. शुद्ध उच्चारांची मिजास मारणारांना बलुतं हा शब्दच माहित नसावा याचा मला प्रचंड आनंद झाला. अर्थात मला तसं वाटणं हे तात्कालिक होतं. चूकही होतं, हे पुढं उमगलं.
आम्ही सगळ्यांनीच तिला फैलावर घेतलं. आम्ही सारेच त्यावेळी बलुतंच्या "वर्षा"वात न्हाऊन निघालो होतो.

मुंबई मनपामधल्या एका उच्चपदावरील अधिकार्‍यांचा फोन आला. म्हणाले, " आम्ही बलुतंची होळी करणार आहोत. समाजाची बदनामी केलीय दया पवारांनी."
मला तर काय दिसली नाही बदनामी. मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही. उलट बलुतंचा फॉर्म रणांगणच्या विश्राम बेडेकरांना "एक झाड दोन पक्षी" साठी वापरावासा वाटला याचं मला अप्रूप वाटतं. बलुतंनं मराठीचं वळण बदललं. खूप सकस, नवं आणि उमदं लेखण बलुतंमधून प्रेरणा घेऊन होत राहिलं.

बलुतंच्या प्रस्तावनेतल्य एका वाक्याने माझा जगण्याचा दृष्टीकोनच बदलला. त्यावेळी मी झोपडपट्टीत राहायचो. मध्यमवर्गीय मित्रांना घरी न्यायला मला लाज वाटायची. बलुतंमध्ये दयाकाकांनी लिहिलंय, "आपल्याला कशाला लाज वाटायला हवी? वाटायची तर लाज ज्यांनी आपल्यावर हे गुहाजीवन लादलं त्यांना वाटायाला हवी!" खाडकन डोळे उघडले. एक वाक्य विजेसारखं डोक्यात घुसलं. खूप बळ देऊन गेलं. मनातला न्यूनगंड तात्काळ पळाला. थेट जगणंच बदललं.

पुढे विद्यापीठात शिकत असताना आनंद यादवसर भरवर्गात दलित साहित्याबद्दल वाईट बोलायचे. तर मी त्यांच्याशी सिद्धा पंगा घ्यायचो. बाहेर आल्यावर वर्गातले मित्र म्हणायचे, "तू कशाला त्यांना क्रॉस करतोस? वर्गातली इतर मुलं त्यामुळं आपल्याकडे खुन्नसनं बघतात."

मी त्याची कधीच पर्वा करायचो नाय. आनंद यादव लेखक म्हणून बरे असले तरी प्राध्यापक म्हणून अगदीच सुमार होते. त्यांना ग्रामीण साहित्याचा फार अभिमान असायचा. मलाही ग्रामीण साहित्य आवडायचे. पण दलित साहित्य आणि साहित्यिकांबद्दल यादवसर एकेरी आणि अतिशय हिनकसपणे बोलायचे. दलित साहित्यावर ते सतत कोरडे ओढायचे. एकतर्फी टिका करायचे. आम्हा दलित साहित्यवादी मुलांबद्दल ते जातीय आकसही बाळगायचे. एकदम बुटकी आणि संकुचित शिक्षकवृत्ती. ते वर्गात आम्हाला शिकवताना ४० वर्षांपुर्वीच्या काळ्यापिवळ्या पडलेल्या नोट्स वापरायचे. त्यांनी दलित साहित्यातले फारसे काहीही वाचलेले नसायचे. पण वेदना,विद्रोह, विज्ञान यांच्याबद्दल नफरत असायची. यादव म्हणजे संकुचित गावगाड्याचं अंधारलेलं प्रतिकच जणू. पुणे विद्यापीठाचे दिवस आठवले की मला तिसर्‍या-चौथ्या श्रेणीतले प्राध्यापक आनंद यादव हमखास आठवतात. यादवसर बलुतंवर फार वाईट बोलायचे.

ग्रंथालीच्या एका कार्यक्रमात दयाकाकांची दोस्ती झाली. भलताच जिंदादिल माणूस. बोलायला, वागायला एकदम रॉयल! मी तर त्यांच्या प्रेमातच पडलो. ते साहित्यावर तासनतास बोलायचे. त्यांचं वाचन अफाट होतं. त्यांची रसिकता चोखंदळ होती. चित्रशैलीतलं त्यांचं बोलणं मनाच्या गाभ्यात झिरपायचं.

ते मासे अतिशय चवीनं खायचे. आम्हालाही खिलवायचे.

साहित्य संस्कृती मंडळात य.दि.सर अध्यक्ष असताना दयाकाका, नारायण सुर्वे, अरूण साधू, श्रीपु, विजयाबाई अशा दिग्गजांसोबत काम करायला मिळालं. खूपखूप शिकायला मिळालं.
दयाकाकांनी एकदा मला कोल्हापूर आकाशवाणीवर य.दि.सरांची मुलाखत घ्यायला लावली होती. ती खूप गाजली होती. यदिसरांच्या कारमधून आम्ही तिघं खूपदा एकत्र प्रवास करायचो. गप्पांचे फड रंगायचे. बलुतंवरच्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले, मात्र तो फारसा चालला नाही. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाच्या निमित्ताने काका, य.दि.सर, अरूण साधूसर अशा आमच्या खूप चर्चा व्हायच्या. बैठकांच्या फेर्‍या व्हायच्या. खूप धमाल आठवणी आहेत त्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथाचे काम अनेक वर्षे रेंगाळले होते. दयाकाका यदिसरांशी बोलले. त्या दोघांनी मला बोलावले. म्हणाले, "उद्यापासून तुम्ही पुण्याच्या फोटोझिंको प्रेसमध्ये जाऊन बसा. दोनतीन महिन्यात गौरवग्रंथ छापून होईल असं बघा."
मी दीडेक महिन्यात ते काम पुर्ण करू शकलो. दयाकाका खूप खूष झाले.
साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रचारात त्यांना खूप धावपळ करावी लागली. त्यातच ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले. खूप जवळचा, कुटुंबातला मार्गदर्शक हरपल्याचं दु:ख झालं.

पुण्याच्या साहित्य संमेलनात त्यांच्या दया या नावावरून फसगत होऊन संयोजकांनी त्यांची व शांताबाईंची एकाच रूममध्ये राहायची व्यवस्था केली होती. काकांना प्रत्यक्ष बघितल्यावर मात्र संयोजकांनी त्या निवासव्यवस्थेत दुरूस्ती केली. बहुधा कोणीतरी ही अफवा पसरवलेली असावी.
लक्ष्मण माने आणि दयाकाका फोर्ड फाऊंडेशनची स्कॉलरशिप घ्यायला अमेरिकेला गेलेले असताना त्या कार्यालयात लिफ्टमधून जाताना लिफ्ट फुल झाल्याने लक्ष्मण माने खालीच राहिले. दयाकाकांना स्वागतिकेने विचारले, "व्हेअर इज लॅकस्मॅन मॅन्ये?"

दयाकाका म्हणाले, "ही इज अंडरस्टॅंडींग."
आम्ही त्यांच्या अशा खूप गंमती करायचो. ते खळखळून हसायचे.
ते स्वत:वरच्या टिकेकडॆही खिलाडूपणे बघायचे.
फारच भला, उमदा आणि जिंदादिल माणूस होते दयाकाका!
प्रकाशित साहित्य

कोंडवाडा (कवितासंग्रह)
चावडी (कथासंग्रह)
जागल्या (कथासंग्रह)
धम्मपद (कवितासंग्रह)
पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)
पासंग(कथासंग्रह)
बलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.
अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).
बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)
विटाळ (वैचारिक)
पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत.

बलुतं, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, सर्वत्र उपलब्ध.


-प्रा.हरी नरके, बलुतंची चाळीशी, १३ सप्टेंबर २०१८