Showing posts with label जातीजमाती. Show all posts
Showing posts with label जातीजमाती. Show all posts

Friday, June 12, 2020

We Two आम्ही दोघे नांदतो सौख्यभरे : आंतरजातीय विवाह झालेत, होतील


जातीबाहेर प्रेम केलं म्हणुन पुण्यात नुकतीच विराज जगतापची निर्घृण हत्त्या झाली. काही दिवसांमागे अशाच कारणाने हत्याकांडं झाली. नितीन आगे, आशा शिंदे, मंगला कांबळे, सोनई हत्त्याकांड, इंद्रजित कुलकर्णी- मेघना पाटील (कोल्हापूर), यांच्या हत्त्या झालेल्या होत्या. सजातीय विवाह हा नियम झालेला आहे. किंबहुना ‘लग्न म्हणजे सजातीयच, ही धारणा समाजमनात पक्की झालेली आहे. आंतरजातीय विवाह म्हणजे अधःपतन / वर्णसंकर / कुलभ्रष्ट होणे हा अर्थ न उच्चारताही इथे रूजवण्यात आलेला आहे. आपल्याला या नॉर्मलसीला आव्हान द्यायचंय आणि ती नाकारायची आहे म्हणून आंतरजातीय विवाह हा जाहीर उल्लेख आवश्यक ठरतो. यातून आंतरजातीय संबंध हे विवाह म्हणवून पात्र आहेत, नव्हे तो आमचा अधिकारच आहे हे आपण दाखवून देत आहोत. यातूनच नवी नॉर्मलसी रूजेल. रूळेल. समाजमान्य होइल. जातीबाहेर विवाह/प्रेम केलं म्हणून ज्या निर्घृण हत्त्या होतात त्यांना मिडीयाने " ऑनर किलिंग" म्हणणे चुकीचे आहे. ह्या संघटित गुन्हेगारीच्या कृत्याला  " ऑर्गनाइज्ड क्राईम", " ब्रुटल मर्डर", "निर्घृण हत्त्या" असेच म्हटले पाहिजे.


 समाजाची ही चौकट मोडून बंड करून कमीअधिक किंमत मोजून ज्यांनी ठरवून किंवा प्रेमातून आंतरजातीय/आंतरधर्मिय विवाह केले अशांची संख्या एकुणात भले कमी असेल परंतु आपल्या आजुबाजूला अशी जोडपी बरीच आहेत. तुम्ही किंवा तुमच्या माहितीत कुणी असा आंतरजातीय/आंतरधर्मिय विवाह केला असेल तर ती नावे कमेंट मध्ये लिहा. मागे काहीवर्षांपुर्वी मी फेबुवर अशी यादी केली होती तेव्हा ती नावे हजाराच्या वर झालेली होती. आतातर त्यात कितीतरी भर पडलेली असेल. आंतरजातीय विवाहाची दहशत, सामाजिक दडपण कमी करण्यासाठी नव्या पिढीला या यादीचा उपयोग होईल...आपल्या आजूबाजूला इतक्या मोठ्या संख्येने आंतरजातीय विवाह केलेले लोक आहेत, सुखी आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या कर्तृत्वाने त्यांनी या नात्याला समाजमान्यता, आदर, स्नेहही मिळवलाय. फारच प्रेरक बाब आहे ही आणि अनुकरणीयही.



१. एक विनंती, जातीबाहेर किंवा पोटजातीबाहेरसुद्धा झालेला प्रत्येक विवाह हा स्वागतार्हच आहे. मात्र इथे आपण जातीबाहेर झालेलेल्या विवाहांचीच यादी करतो आहोत. त्यामुळे उदा. कोकणस्थ, देशस्थ, कर्‍हाडे आदी पोटजातीत झालेले विवाह इकडे नोंदवू नयेत.
२. ज्यांचे विवाह जातीतल्या जातीत झालेले आहेत त्यांनी ह्यानिमित्ताने दुरूस्ती करण्याच्या फंदात पडू नये. नाहीतर नवी समस्या निर्माण व्हायची. जातीतल्या जातीत लग्न झालेय त्यांनी कोणीही अपराधी वाटून घेऊ नये. पुढच्या पिढीला जातीत लग्न करायला भाग पाडू नये, इतके केले तरी भरपूर झाले.
३. नावात वा आडनावात काही चुका आढळल्यास क्षमस्व-
४. मला सहज आठवलेली काही नावं पुढीलप्रमाणे-


(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर- डॉ. शारदा कबीर (२) बाळासाहेब आंबेडकर - अंजली मायदेव (३) निळू फुले - रजनी मेहता (४) गोपीनाथ मुंडे 
(५) सु्शीलकुमार शिंदे (६) रामदास आठवले (७) भालचंद्र फडके (८) हरी नरके- संगिता (९) सुषमा देशपांडे - कणेकर (१०) सुप्रिया सुळे

(११) गार्गी फुले- ओंकार थत्ते (१२) संजय सोनवणी (१३) प्रदीप आवटे- माधुरी (१४) संजय आवटे- अर्चना (१५) महेश भागवत (१६) सुनिल तांबे- सविता कुडतरकर
(१७) कौस्तुभ दिवेगावकर- प्रियंका बोकील (१८) गणेश विसपुत्ये- श्रुती तांबे (१९) नागनाथ कोत्तापल्ले (२०) शर्मिला रेगे


(२१) रजिया पटेल - श्रीकांत सावंगीकर (२२) युवराज मोहिते (२३) नागेश चौधरी- पुष्पा (२४) अन्वर राजन - अरूणा तिवारी (२५) मनस्विनी ल.र. - सतिश मन्वर
(२६) समीर भुजबळ - शेफाली (२७) विलास वाघ- उषा कुलकर्णी (२८) हुसेन दलवाई - शमा पंडीत (२९) संघमित्रा खोरे - सचिन कांबळे,   (३०) मुकुंद बहाळकर


(३१) मनोहर कदम- प्रतिमा जोशी (३२) संजय मं. गो.- लतिका (३३) वसंत चव्हाण- (३४) अशोक जैन- सुनिती (३५) रितेश देशमुख- जेनेलिया 
 (३६) डॉ. अनिरूद्ध फडके (३७) जुई फडके (३८) डॉ. सई ठाकूर (३९) चिन्मयी सुर्वे- सुमित राघवन (४०) लक्ष्मण माने - शशी भोसले


(४१) पार्थ पोळके (४२) मिहीर थत्ते- बोराटे (४३) गगनविहारी बोराटे (४४) अशोक अंकुश (४५) तेज निवळीकर (४६) प्रदीप मोहिते
 (४७) नंदा पाटील (४८) डॉ. निलम जाधव- पन्हाळे  (४९) सुनिता-दिलीप अरळीकर (५०) प्रज्ञा दया पवार - अभय कांता


(५१) शाहरूख खान-गौरी (५२) अमिर खान- किरण (५३) सैफ अली खान - करिना कपूर (५४) ऎश्वर्या नारकर- अविनाश (५५) प्रशांत दळवी- प्रतिक्षा लोणकर
 (५६) भाऊ पाध्ये- शोशन्ना (५७) पुष्पा भावे- अनंत भावे (५८) अस्मिता दुभाषी- संतोष मोहिते- (५९) सचिन अहीर (६०) नामदेव ढसाळ- मल्लिका अमर शेख


(६१) शाहीर अमर शेख (६२) अनिल बर्वे (६३) भारत सासणे (६४) पद्मकांत कुदळे (६५) रवींद्र सुर्वे- देशपांडे (६६) चंद्रकांत वानखेडे - माया कुलकर्णी
 (६७) भास्कर चंदावरकर- मिना कुलकर्णी (६८) सुधाकर जाधव - माया देशपांडे (६९) निरजा पटवर्धन- संदीप सावंत (७०) दिनेश ननोरे- सविता 


(७१) संजय धिवरे- भाग्यश्री बानायत (७२) दत्ता बाळसराफ-कुसुम रोकडे (७३) पद्मभुषण देशपांडे (७४) कपिल पाटील- - वर्षा कांबळे  (७५) येशू पाटील-मेरी (७६) अमर हबीब - आशा
 (७७) मंदार फणसे- संपदा डावखरे (७८ महेश म्हात्रे- सुमेधा रायकर (७९) सीताराम रायकर (८० चिन्मय मांडलेकर


(८१) संग्राम खोपडे (आर.जे.) (८२) राणा जगजितसिंह पाटील (८३) रंगा राचुरे - बजाज (८४) अनिल खैरे (८५) निलिमकुमार खैरे
(८६) आनंद सोनावणे- (८७) परिमल माया सुधाकर (८८) सुभाष वारे (८९) शांताराम पंदेरे- मंगल खिंवसरा (९०) प्रशांत कोठडिया- उज्वला मेहेंदळे


(९१) प्रतिभा शिंदे (९२) शिवाजी गायकवाड- निशा शिऊरकर (९३) यमाजी मालकर- अंजली (९४) शबाना वारणे- अजित जोगळेकर (९५) चंद्रकांत पुरी- स्वाती बॅनर्जी
(९६) प्रवीण चव्हाण- अनघा तांबे (९७) नितीन कोत्तापल्ले (९८) मनिषा तोकले- आशोक तांगडे (९९) राजन सुमन खान (१००) मुग्धा कर्णिक- धनंजय


(१०१) शैला नार्वेकर - राम सातपुते (१०२) स्नेहल नारकर - अनिल नेने (१०३) सरिता आवाड (१०४) गणेश राऊत- ज्योती भोसले (१०५) शेखर सोनाळकर
(१०६) वर्षा शेडगे (१०७) ऋत्वीज काळसेकर (१०८) मधुकरराव पिचड (१०९) मयुरा डोळस (११०) अस्मिता जोगदंड- दीपक चांदणे


(१११) भारत पाटणकर- गेल ओम्वेट (११२) सुनिल सरदार (११३) नितीन सरदार (११४) सतिश पावडे - निशा शेंडे (११५) कुमुद पावडे (११६) जयंत पवार - संध्या नरे (११७) दिलीप चव्हाण (११८)अविनाश हावळ-गुत्तीकर (११९) ज्योती सुभाष (१२०) नसिरूद्दीन शहा-रत्ना पाठक 


(१२१) रणवीर सिंग- दिपिका पदूकोन  (१२२) विराट कोहली - अनुष्का शर्मा (१२३) रामविलास पासवान (१२४) जनार्दन वाघमारे (१२५) बापू काळदाते,  (१२६) फ.मु.शिंदे,  (१२७) उत्तमराव भोईटे


-प्रा. हरी नरके, १२/६/२०२०

Thursday, June 11, 2020

जातीव्यवस्था : मजबूत होतीय की खिळखिळी? - प्रा. हरी नरके, ( भाग-१ )


लागोपाठच्या जातीअत्त्याचारांनी, हत्त्यांनी जातीचा विषय पुन्हा एकदा ऎरणीवर आलाय. चर्चाविषय बनलाय. जातीव्यवस्था ही एक मानसिकता आहे आणि भौतिक व्यवस्थासुद्धा. ती माणसांच्या तनामनात खोलवर रूजलेली आहे. अगदी अबोध मनावरही तिचीच सत्ता आहे. बलदंड ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य पुरूष हे तिचे लाभार्थी आहेत. सर्व स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र हे तिचे बळी आहेत. हे लाभार्थी शतकानुशतके जातीचे हितसंबंध जपण्यासाठी राबत असतात. जातीचा प्रचार, पगडा, दरारा कायम ठेवण्यासाठी ते सदैव झटत असतात. वर्षभर झोपा काढून एका दिवसापुरते नाचत नसतात.जातपिडीत एकमेकांबद्द्ल संशय घेत, परस्परांना शिव्या घालीत अधिक एकटे पडत जातात. तिकडे तथाकथित उच्चजातीय-उच्चवर्णिय संघटित असतात. त्यांच्यात पोलादी ऎक्य असते. ते जागृत आणि प्रबळ असतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, प्रचाराची यंत्रणा आहे. त्यांच्याकडे बळकट साधनसंपत्ती आहे. सरकार, (शासन व्यवस्था) मिडीया, अर्थसत्ता, धर्मसत्ता आणि न्यायव्यवस्थासुद्धा त्यांच्याच ताब्यात असल्याने त्यांच्या शब्दांना सामाजिक प्रतिष्ठा असते. तथाकथित खालच्या जातींचे लोकसुद्धा आपापल्या वा अधिक खालच्या जातीच्या विचारवंतांचे फारसे मनावर घेत नाहीत. त्यांना " वरचे" काय म्हणतात हे महत्वाचे वाटते. वरच्यांची मान्यता मिळावी, वरच्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी यासाठी आटापिटा करीत असतात.


या तथाकथित वरच्यांच्या शब्दाला अधिक विश्वासार्हता असते, तिच्यासाठी खालचेही जीव टाकीत असतात. पाटलाचं घोडं आणि **** भूषण! ही म्हणच आहे. यामुळे जातबळींना न्याय मिळणे दुरापास्त ठरते. गरिब माणसं सहज विकली जातात. बळाच्या जोरावर फोडता येतात. कुर्‍हाडीचे दांडे गोतास काळ ठरतात. भारतात २६ जाने. १९५० ला संविधान आलं पण संविधानाची मानसिकता आली नाही.

मानसिकता आजही जातीची, सरंजामी, सामंती, भांडवली आणि धार्मिक उन्मादाचीच आहे. शहरीकरण, महानगरीकरण, शिक्षण, आरक्षण आणि औद्योगिकरण यामुळे सुबत्ता आली. उंच इमारती वाढल्या. मोबाईल्स, इंटरनेट आले. शेकडो चॅनेल्स आले. मनोरंजन आणि चंगळवाद यांचा पगडा वाढला. त्या गतीनं प्रबोधनाचा वारसा या नवशहरी वर्गात, नवमध्यमवर्गात, नवशहरी भागात विस्तारला नाही. उलट देवदेव वाढला. रूढी, परंपरा, नारायण नागबळी, जातीचा माज वाढत गेला.


"बघतोस काय रागानं, **** आणलंय वाघानं," ही जुन्या सरंजामी पीळाला अधिक सुदृढता देणारी व्यवस्था  जोडीला आली. जमिनीला सोन्याचे भाव आले. गुंठेवारीचा पैसा आला. सुयोग्य गुंतवणीचे शिक्षणच नसल्याने तो लग्न, देवकार्यावर, चैनीवर उधळला जाऊ लागला.  श्रीमंती आली म्हणजे सुजाणता येतेच असे नाही. अडाणीपणा जातोच असेही नाही. तोही भुमितीश्रेणीत वाढतो. ही सगळी जातअहंकाराची जळमटं आणि सरंजामीवृत्ती सहजासहजी जाणार नाही. ती घालवण्यासाठी प्रबोधन करावेच लागेल. जातीनिर्मुलनाचा अजेंडा राबवावा लागेल. पर्यायी संस्कृती विकसित करावी लागेल. तसे फारसे न करता  " जातीयता ही एक अंधश्रद्धा आहे,"  " जातीचा अभिमान असलाच पाहिजे,"  "दुसर्‍या जातीचा द्वेश करू नका, पण आपल्या जातीचा गर्व बाळगा",  "एक *** लाख ***"  असली सुभाषितं तोंडावर फेकली जातात.


भलेभले सुशिक्षित, उच्चपदस्थ ही सुभाषिते, हे नॅरेटिव्ह वापरतात. कळत नकळत रूजवतात. त्याच्या जोडीला "जी जात नाही ती जात" ही शिवाजीराव भोसलेटाईप वाक्ये लोकप्रिय केली जातात. रा.स्व.संघ व सावरकरवादी हे अस्पृश्यता, जातीभेद नको म्हणतात. मात्र ते जातीनिर्मुलनाचे आंदोलन चालवित नाहीत.  त्यांचा जातीभेदाला तेव्हढा विरोध आहे. जातींना नाही. जाती राहाव्यात फक्त भेद तेव्हढे जावेत ही भुमिका वरवर बघता, प्रथमदर्शनी बरोबरही वाटते.


मात्र संघ-सावरकर व फुले - आंबेडकर यांच्या भुमिकांमध्ये मुलभूत फरक आहे. एक भूतदयेवर, वरच्यांच्या मेहरबानीवर जगायला सांगते तर दुसरी सर्वांना समान मानवी अधिकार हवेत, असे सांगते. फुले -आंबेडकर म्हणतात, जातीच नकोत, जातीनिर्मुलन झाले पाहिजे असे ते सांगतात. कारण जातीयता ही पायर्‍यापायर्‍यांची, श्रेणीबद्ध विषमतेची व्यवस्था आहे. ती राहू द्या असे म्हणणे म्हणजे जातीय हितसंबंध, अहंकार, श्रेणी कायम ठेवा असेच म्हणणे होय. जात राहणार तर जातीय द्वेश, विखार, पायरीने राहा ही वृत्ती राहणारच. सर्व जाती एका पातळीवर नाहीत. त्या एकाखाली एक किंवा एकावर एक अशा उभ्या आहेत.


जाती राहणार असतील तर अन्याय, पक्षपात, भेदभाव राहणारच. तेव्हा जातच गेली पाहिजे. स्वत:च्या जातीचा गर्व, अभिमान बाळगणे म्हणजेच दुसर्‍या जातींचा द्वेश करणे होय. तथाकथित वरच्या जातींना मागासांची प्रगती का बघवत नाही, माजलेत असे का वाटते, कारण त्यांनी आपल्या पायरीने राहावे, गुलाम राहावे, स्वाभिमानाने जगू नये असे वाटते म्हणून.  मित्रहो, आपला अजेंडा जातीभेद निर्मुलनाचा नसून जातीनिर्मुलनाचा आहे. हा फरक नीट लक्षात घ्या. समरसतावाद्यांना ह्यातला फरक कळणार नाही. कळला तरी वळणार नाही. कारण ते जातीव्यवस्थेचे लाभार्थी आहेत. आपण पिडीत आहोत. आपण त्यांचे गुलाम राहण्यात त्यांचा फायदा असला तरी आपला त्यात काय लाभ आहे? काहीच नाही. जातीव्यवस्था मान्य करणे म्हणजेच उच्चनिचता, श्रेष्ठकनिष्ठता, मालक-गुलाम ही मानसिकता स्विकारणे होय हे नीट समजून घ्या.


जातीव्यवस्था माणसाने निर्माण केलीय. जी गोष्ट अनित्य आहे, ती जातेय. ती जाणार. जातीव्यवस्था आज खिळीखिळी होत आलीय. प्रतिगामी शक्तींनी तिला बळकट करण्यासाठी बुस्टर दिलाय खरा. पण तरीही ती जाणारेय.मात्र  ती आपोआप जाणार नाही. त्यासाठी तुम्हालामला एकजुटीने काम करावे लागणार आहे. जगातील ८०० कोटी लोकांपैकी अवघ्या १५० कोटींमध्ये जातीव्यवस्था आहे. उरलेल्या ६५० कोटींमध्ये वर्णभेद, वंशभेद, भाषाभेद, राष्ट्रभेद असतीलही पण हे आणि जातीव्यवस्था या वेगळया बाबी आहेत. त्यांच्यात गल्लत करू नका. परत सांगतो, जात ही व्यवस्था आहे. मानसिकता आहे. भौतिक आधारावर ती पोसली गेलीय. तिला अर्थसत्ता, धर्मसत्ता, कुटुंबसत्ता, शिक्षणसत्ता यांचा आधार असल्याने ती अधिक किचकट, गुंतागुंतीची, चिवट, सबळ आणि भयंकर आहे. पाताळयंत्री आहे.


"आरक्षणामुळे जातीयता वाढली," "शाळेच्या दाखल्यावरून जात काढली की जात आपोआप जाईल," "मनुस्मृती कुणी वाचलीय? कशाला मनूला बिचार्‍याला दोष देता?" " समान नागरी कायदा आणा, " असले युक्तीवाद भलेभले करीत असतात. हे युक्तीवाद पोरकट, विक्षिप्त, अगदी बालीश, भ्रामक, भंपक आणि मुर्खपणाचे आहेत. जातीयतेने शूद्र-अतिशूद्रांवर अन्याय केला त्याची भरपाई म्हणून आरक्षण आलेय. जात समाजात शेकडो वर्षे होती म्हणूनच आरक्षण द्यावे लागलेय.


आरक्षणाने जातीयता आलेली नाही. समाजात जातीची मानसिकता होतीच, आजही आहे, म्हणून जात शाळेच्या दाखल्यावर आलीय. दाखल्यावर आल्यामुळे समाजाला ती कळलेली नाही. ती आधीच होती. नोंदवली नाही की ती जाईल असे म्हणणे म्हणजे कोरोना टेस्ट करू नका, उपचारही करू नका, कोरोना नाहीच असे म्हणा, थाळ्या, टाळ्या वाजगा, गो कोरोना गो म्हणा, की गेला कोरोना, असली अडाणचोट वृत्ती आहे ही.


मनुस्मृती वाचलीय की नाही हा मुद्दाच नाहीये. भारतात वाचनसंस्कृती फारशी नव्हती. नाही. कथनसंस्कृती, वाणीसंस्कृती होती. आहे. म्हणून तर आजही साहित्य यापेक्षा वाड्मय हा शब्द अधिक प्रचलित आहे. वाणीद्वारे जे सांगितले गेले ते वाड्मय. ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा ह्या सांगितल्या गेल्या. त्या कुणीतरी लिहून घेतल्या. आजही लाखो बुवा, बापू, महाराज, ह.भ.प., साधू, संन्याशी, गोसावी, गुरू, किर्तन, प्रवचन, सत्संग याद्वारे लक्षावधींच्या जमावांना मनुमहात्म्य सांगत असतात. आंबाभुर्जीवाले बहुजन तरूणांना सांगत असतात, " मनु हा संताच्या चार पावले पुढे होता. " तेव्हा वाचायची काय गरज आहे. हे कथन इथे रुजलेले आहे. रुतलेले आहे. मनामनावर कोरलेले आहे.


दुसरा एक मुद्दा, मनुस्मृती हा धार्मिक आणि कायद्याचा ग्रंथ होता. कायद्याचे मुख्य तत्व हे आहे की, कायदा सर्वांना माहितच असतो हे गृहित धरावे लागते. नाहीतर प्रत्येक आरोपी असा बचाव करील की मला हा कायदा माहितच नव्हता, म्हणुन मला शिक्षा करू नका. हे चालत नाही. वेद, गीता, उपनिषदे, पुराणे, महाभारत, रामायण, कुणी वाचलेय? पण म्हणून त्यांचे महात्म्य भारतीयांना माहित नाही काय? तेव्हा मनुस्मृती न वाचल्याचा ब्राह्मणी युक्तीवाद भाकड आहे. भुक्कडपणाचा आहे. ह्या पुराणकथा इथल्या प्रत्येकाच्या हाडीमाशी भिनलेल्या आहेत. मठ, मंदिर, धर्माचार्य त्यांना जोपासत आहेत.


जातीव्यवस्था निर्मुलनाची जादूची कांडी कुणालाही सापडलेली नाही. अगदी फुले-शाहू-आगरकर-आंबेडकरांनासुद्धा नाही. जातीनिर्मुलनाला शॉंर्टकट नाही. जाती घालवण्याची पंचसुत्री फुले-शाहू-आंबेडकरांनी जरूर दिलेली आहे. मुळात भारतात शोषण, पक्षपात, भेदभावाची ३ केंद्रे आहेत. (१) जात, (२) आर्थिक वर्ग, (३)लिंगभाव, स्त्री-पुरूष विषमता.


या तिन्हींवर एकत्रित मारा करण्यासाठीच हे पंचशील आहे. ही विषयपत्रिका अतिशय प्रभावी आहे. (१) सर्वांना शिक्षण, ज्ञाननिर्मिती, कौशल्यांचे संवर्धन (२) स्त्री-पुरूष समता, (३) आंतरजातीय विवाह, (४) संसाधनांचे फेरवाटप, (५) वादविवाद, विचारकलह, संवाद, टिकाटिप्पणी, धर्म चिकित्सा, सामाजिक प्रबोधन याच रस्त्याने आपल्याला जावे लागेल. जातीनिर्मुलनाला दुसरा रस्ता नाही.


त्यावर फोकस करायला हवा. झोकून देऊन काम करायला हवे. ही मानसिकता घालवण्याचे अभियान संघटन, प्रशिक्षण, डावपेच (स्ट्रॅटेजी) आणि परिवर्तनवादी तत्वज्ञान यांच्याद्वारेच उभे करता येईल. प्रतिक्रियावाद, अत्त्याचारविरोध, आरक्षण आणि अनुदानात अडकलेली आपली सामाजिक चळवळ आज गोल्गोल फिरतेय. आपण एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसलो आहोत. बहुजनातील मानसिक दुरावा दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की नाही? की फक्त स्पर्धाभावना, एकमेकांबद्दलचा संशय, आकस, परस्परद्वेश आणि सर्वज्ञभावना, मीच एकमेव क्रांतिकारक असल्याचा दावा याने समग्र परिवर्तन साधणार आहे?


कोणीही शेंबडं पोरगं उठतं आणि सुरू होतं, " आता आ. ह. साळुंखे का बोलत नाहीत? आता अमुकने का लिहिले नाही? तमुकने लिहिले तर एव्हढेच का लिहिले? ह्याला एव्हढ्या उशीरा का जाग आली? आम्ही यांना मोठे केले, आमच्या मदतीला कोणीच येत नाही? आम्ही समर्थ आहोत, आम्हाला कोणाचीच गरज नाही. कोणावर अन्याय झाल्यावर आम्हीच लढायला जातो, आता इतरांवर अन्याय झाल्यावर आम्ही का म्हणून जावे? हरी नरके, आम्हाला आंबेडकर सांगू नका, तो आमच्या रक्तात आहे, तुम्ही तिकडे बहुजन समाजात जाऊन प्रबोधन करा, आम्हाला अक्कल शिकवू नका, आम्ही प्रबुद्धच आहोत,"  हा सगळा युक्तीवाद पोकळ आहे. बोलबच्चन, बाष्कळ आणि तकलादू आहे. अरे बाबांनो, सगळं आयुष्य ज्यांनी चळवळीला वाहिलं त्यांना प्रश्न करण्यापुर्वी जरा स्वत:च्या लायकीचाही विचार करा. कोण आपण, काय आपली कुवत? साळुंखेसरांची जेव्हढी पुस्तकं आहेत ना तेव्हढं तर तुझं वयही नाही. तुझा अभ्यास किती? तू बोलतोस किती?


" तुम्ही माळ्यांना, मराठ्यांना, ब्राह्मणांना त्यांच्या वस्तीत जाऊन का सांगत नाही? आम्हाला बाबासाहेब माहितच आहेत, ते तुम्ही सांगायची गरजच नाही, आम्हालाच कशाला परत सांगताय?" हा प्रश्न, हा दावाही, जातीय दर्प आणि अर्धवट शिक्षणाच्या अहंकारातून आलेला आहे. एव्हढा अहंकार बरा नाही. जन्माच्या अपघाताने जे आंबेडकरवादी आहेत त्यांच्यापेक्षा बाय चॉईस ज्यांनी बुद्ध-आंबेडकर स्विकारलेत ते साळुंखेसर फार मोठे आहेत. त्यांच्याबद्दल शंका घेता आणि हा माझा समाजबांधव, तो माझा रक्तबांधव असली भाषा जी फुले-आंबेडकरवादाला काळीमा फासणरी जातीय किड आहे तिला जोपासता?


प्रबोधनाची गरज सगळ्यांनाच आहे. आपल्या सर्वांनाच एकमेकांची गरज आहे. आपण सगळ्यांनीच गोळ्यामेळ्यांनी राहायला हवेय. आम्ही सगळ्यांनाच शिवराय, फुले, शाहू, आगरकर, आंबेडकर, साने, शिंदे, गांधी सांगतो आहोत. सांगत राहणार आहोत. प्रस्थापित व्यवस्था अतिशय धुर्त, लबाड, दुटप्पी, नीच आणि चलाख आहे. तिच्याशी लढायचे काम एकट्यादुकट्याचे नाहीच. आपल्यात फूट पडावी, आपण एकमेकांचे गळे पकडावेत हेच तर त्यांना हवेय. परजातींबद्दल संशयी वृत्ती हीच तर जातीयता आहे. आम्ही जर रक्ताचे नाते मानत असू तर तो बुद्ध-बाबासाहेबांचा पराभव आहे. शुद्ध रक्ताचा दावा हा प्रचंड मोठा फ्रॉड आहे. जातीचे रक्त ही संकल्पनाच भंकस आहे. रक्ताला जात नसते. रक्ताला गट असतो. ए, बी, ओ, एबी, +, - असा.


बाबासाहेब म्हणाले, "मला जातीचे नको, विचारांचे बहुमत हवेय." ज्ञानसूर्य बाबासाहेबसुद्धा असे कधी म्हणाले नाहीत, की मला कोणाचीच गरज नाही. माझा मी समर्थ आहे. त्यांनीसुद्धा, बुद्ध, कबीर, फुले यांना गुरू मानले. त्यांनी जातीतला गुरू नाही केला. करता आला असता. त्यांनी "महार महासंघ किंवा सेवा संघ" नाही काढला. "महारनायक" नाही चालवला. बहिष्कृत भारत, हितकारीणी सभा, मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत, स्वतंत्र मजूर पक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन पार्टी, सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद कॅंपस यातनं काही संदेश घ्यायचा की नाही?  तुम्हाला केवळ जातीचं काम करायचं असेल तर जरूर करा. पण मग बुद्ध, बाबासाहेबांची नावं घेऊ नका. फुल्यांनीही "माळी समाज महासंघ" नाही चालवला. ओठात फुले-आंबेडकर आणि पोटात जातीयता, जातसंघ, जातीचं रक्त हे शोभत नाही.


मी गेली ४० वर्षे शिवराय,फुले-शाहू, शिंदे, आगरकर, गांधी, साने, आंबेडकर अत्र, तत्र, सर्वत्र मांडतोय. माफ करा स्वत:ला ज्ञानी समजणार्‍या थोर्थोर विद्वानांनाही ५, १० टक्क्यांच्या पलिकडचे फुले, शाहू, बाबासाहेब माहित नाहीत. जे माहिती आहेत तेही वरवरचे आणि तकलादू स्वरूपात. पोपटपंची करण्यापुरते. जातीच्या टोळ्याटोळ्यांनी रहायचे तर जरूर राहा. पण हाच तर मनुवाद आहे, हीच तर जातगुलामी आहे.


" जातीसाठी खावी माती" हा फुले-आंबेडकरवाद नाही. " जी जात नाही ती जात" हा विचार परिवर्तनवादी विचार नाही. तो प्रस्थापितांचे हात बळकट करणारा विचार आहे. असा विचार करा आणि मरा. अशामुळे मनुवादी हिंदुत्ववादाला, जातीव्यवस्थेला अजून बळकटी मिळेल हे लक्षात ठेवा. सत्तेसाठी धार्मिक व जातीय तेढ वाढवण्यासाठी संघपरिवार कोणत्याही थराला जायला तयार आहे. बहुजनात वाढणारी तेढ, आपसातला संशयवाद हाच हिंदुत्ववादी शक्तींना बळ देत असतो. त्यांना विविधता, समावेशकता नकोय. त्यांना सगळीच कळसुत्री बाहुली हवीयत. आदेशावर चालणारी. ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करणारी. तिच्याशी आयुष्यभर लढणारे फार कमी आहेत. त्या मोजक्यांना गमावू नका. मन मोठं करा. चार बुकं वाचली म्हणजे अक्कल आली हा अहंकार सोडा.


इथली कुठलीही एक जात "एकसंघ" नाही. तेव्हा सब घोडे बारा टक्के करू नका. अत्याचार करणारा भले माळी, मराठा, वंजारी, आग्री, भंडारी, ब्राह्मण, राजपूत, ठाकूर, बनिया, कुणबी कुणीही असेल पण म्हणून बुद्ध, फुले, शाहू, सयाजीराव, विठ्ठल रामजी, साने गुरूजी यांनाही त्यांच्या गोटात ढकलणार आहात काय? गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र अख्ख्या समाजाला टार्गेट करू नका. जातीपातीचा विखार कोण वाढवतंय? भटके, विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, अल्पसंख्याक समाजाविरूद्ध सवर्णांना कोण पेटवतंय? कोण द्वेशाग्नी भडकवतंय? हा हिंसावादी मेंदू कोण पोसतंय?  जरा शोध तर घ्याल.


जागतिकीकरणामुळे प्रत्येक जातीत नवे वर्ग तयार झालेले आहेत. हे वर्गीय हितसंबंधाचे ताणेबाणे, राजकीय सत्तेचे आकर्षण आणि अप्पलपोटेपणा यातली गुंतागुंत विसरून सुलभीकरण करणारी मांडणी करण्याच्या नादात आजवरची सामाजिक पुण्याई मातीत घालवू नका. आम्हीच बोलावतो,  आम्हीच मानधन देऊन पोसतो, मोठे करतो, ह्या गमजा सोडा. असं उगीच कुणीही कुणालाही बोलवित नसतं. आम्हाला बोलवा असा कुणी अर्ज केला होता का? नका बोलवू ना मग. हिनवणं सोडा. बोलावण्याची भिक नको पण उपकाराचे कुत्रे आवरा.


लक्षात ठेवा, वक्त्यांचा व्यासंग, परिणामकारकता, उपयुक्ततता, त्याग आणि कळवळा यांनाही काही मार्क द्यावे लागतात. वक्त्याचा ब्रॅंड एका दिवसात तयार होत नसतो. त्यासाठीची साधना अणि पायपीट यांना कवडीमोल ठरवू नका. प्रा. रावसाहेब कसबे, उत्तमराव कांबळे, प्रा. भालचंद्र मुणगेकर यांना सगळेच समाज बोलावतात, ते का? शोध घ्या. याच्या उलट काहींना आपला म्हणवणारा समाजही वार्‍याला उभं का करीत नाही? शोधा म्हणजे सापडेल.....हा लेख व इतर ८००+ पोस्ट तुम्ही माझ्या ब्लॉग/ फेसबुक पेजवर पाहू शकता. संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.....https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR38LDRzVM_XdR2JvWeIhR7r1RUWHpp5dZAnCISJaRzDVpLLBM8pw-NIfKQ
क्रमश:

- प्रा. हरी नरके, ११/६/२०२०

Wednesday, June 10, 2020

बौद्ध युवकाची पुण्यात हत्त्या, पुरोगामी विचारांना मूठमाती : प्रा. हरी नरके

विराज विलास जगताप या बौद्ध युवकाची पुण्यात हत्त्या, शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती : प्रा. हरी नरके

विराज विलास जगताप, वय २० वर्षे, रा. जगतापनगर, बुद्धविहाराजवळ, पिंपळे सौदागर, पुणे यांची तथाकथित उच्च जातीय मुलीवर प्रेम केले म्हणून ७ जून २०२० रोजी रा. १० वा. काटे कुटुंबियांकडून अमाणूष हत्त्या,
आरोपी : हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे यांनी एकत्रितपणे मिळून आधी टेम्पोने विराजच्या टू व्हीलरला धडक दिली, खाली पडलेल्या विराजला लोखंडी रॉडने व दगडांनी ठेचून अमाणूषपणे मारहाण करीत हत्त्या केली. मारताना आमच्या मुलीवर प्रेम करतो काय अशी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून हत्त्या केली.


सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद झालेली आहे.
एफ. आय. आर. ३०६/२०२०, भा. दं. वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, अनुसुचित जातीजमाती कायदा २०१५ चे कलम, १८८९, ३ (१) ( आर) ( एस) ३ (२ ) (व्हीए) ३ (२) (व्ही) ६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५


कोणतीही हत्त्या हा गंभीर गुन्हाच. तथाकथित वरच्या जातीच्या मुलीवर प्रेम करतो म्हणून जातीभेदापोटी सहाजणांनी रानटीपणाने कोवळ्या युवकाला ठार मारणे हा तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा गुन्हा.

जग कुठे चाललेय आणि ही तथाकथित उच्चजातीय मानसिकतेतली माथेफिरू माणसं प्रेम केलं म्हणुन हत्त्या करतात? महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह झालेले आहेत. महात्मा फुल्यांचा दत्तक पुत्र यशवंतचे लग्न आंतरजातीय होते. राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या बहीणीचा विवाह आंतरजातीय केलेला होता. स्वत: बाबासाहेबांचा शारदा कबीर यांच्याशी झालेला विवाह आंतरजातीय होता.


या पुरोगामी राज्यात आंतरजातीय विवाह करण्यात सर्वाधिक पुढे असलेल्या समाजापैंकी पहिले तीन समाज आहेत, मराठा, बौद्ध आणि ब्राह्मण. असे असताना पुण्यासारख्या शहरात हे घडावे याची शरम वाटते. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती देणार्‍या या कृतीचा मी तीव्र धिक्कार करतो. आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करतो.

राज्यातला सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा.

-प्रा. हरी नरके, १०/६/२०२०

Wednesday, April 1, 2020

या सापळ्यात आपण अडकता कामा नये- प्रा. हरी नरके






अ, ब, क, ड या जात-जमातवादी, जात्यंध, धर्मांध संघटना असल्या व त्या एकमेकांवर आग ओकत असल्या तरी त्या मागून हातमिळवणी असलेल्या संघटना आहेत. विरोधीभक्ती हे यांचे जगण्याचे सूत्र असते. या संघटनांचा बरीच वर्षे व सखोल अभ्यास केल्यानंतर माझे झालेले हे मत आहे. आपल्याला एकमेकांच्या अंगावर सोडण्यासाठी, वादात गुंतवून टाकण्यासाठीच हे भांडणाचे नाटक असते. अ, चे चुकले की ब चे या वादात आप का पडायचे? आपण आपसात का झुंजायचे? हे सारे एकाच माळेचे मणी आहेत.
हे सगळे एकत्र बसून स्ट्रॅटेजी ठरवतात आणि त्यावर आपल्यासारख्या सामान्यांना नाचवतात. यांनी एक फुसकी सोडली की लागले सगळे कामाला. आपले डोळे कधी उघडणार? ही सगळीच बांडगुळे आहेत, सामान्य माणसाचे रक्त शोषन करणारी. आपसात लढू देत त्यांना. मरू देत त्यांना. मुळात ती लढाई नसतेच. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखे कर अशी ही रणनिती असते. या डावपेचांना आपण बळी पडता कामा नये.
प्रा.हरी नरके, १ एप्रिल, २०२०

Monday, December 30, 2019

जातिव्यवस्थेचा शोध घेणारा मौलिक ग्रंथ





जातिव्यवस्थेचा शोध घेणारा मौलिक ग्रंथ-प्रा.हरी नरके


श्री सुनिल सांगळे यांनी "जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जातीजमाती" हा ग्रंथ लिहून अतिशय मोलाचे काम केलेले आहे. जातीपातींचा विषय हा अस्मितेचा आणि वादंगाचा विषय असतो. अलिकडे तर तो अतिशय ज्वलंत किंबहुना स्फोटक विषय बनलेला आहे. या वादग्रस्त विषयाला हात लावण्याची हिंमत आज भलेभले विद्वानही करताना दिसत नाहीत. कोणाच्या भावना कधी दुखावल्या जातील आणि कधी रान पेटेल याची शाश्वती राहिलेली नाही. अशा काळात एक अतिनाजुक बनलेला विषय ज्या प्रगल्भपणे सांगळे यांनी उलगडून दाखवला आहे, ज्या संयमाने आणि समतोलपणे मांडणी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांचे मी सर्वप्रथम हार्दीक अभिनंदन करतो. सांगळे यांच्या या पुस्तकाद्वारे एका विपरित सामाजिक व्यवस्थेची केलेली उकल ही सर्वांनाच आत्मपरिक्षणाला प्रवृत्त करेल असा मला भरवसा वाटतो.

या विषयावर मराठी व इंगजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. त्यातली डॉ. श्री. व्यं. केतकर, डॉ. गो.स. घुर्ये, डॉ. इरावतीबाई कर्वे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आर. ई. इंथोवेन, रसेल - हिरालाल, त्रिं. ना. आत्रे आदींची पुस्तकं महत्वाची आहेत. बाकी इतर भाराभर पुस्तकातली बहुतांश पुस्तकं एकतर सवंग, उथळ, कंठाळी तरी आहेत किंवा विद्वतजड तरी आहेत. ही दोन्ही टोकं टाळून सांगळे यांनी अतिशय सोप्या, प्रवाही, सुबोध भाषेत ही रचना केलेली आहे. हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांसाठी असला तरी संशोधक-अभ्यासकांनाही तो उपयुक्त ठरेल असा झालेला आहे.
याविषयावरील अक्षरश: डझनावारी ग्रंथांचा शोध घेऊन त्यातले विवेचन आपल्या सोप्या भाषेत सांगळे आपल्याला उपलब्ध करून देतात. बोजड लिहिणे सोपे असते. मात्र सोपे लिहिणे सर्वात अवघड असते. सोपं लिहिण्याच्या या कसोटीत सांगळे अव्वल ठरलेले आहेत. विषय सोपा करतानाही त्याचे मर्म किंवा गाभा सांगळे चिमटीत पकडून आपल्यासमोर सादर करतात.

खरंतर सांगळे यांनी कोणत्याही पीएच.डी. प्रबंधापेक्षा सरस कामगिरी केलेली आहे. एखाद्या विद्यापीठाने त्यांच्या या पुस्तकाचा मानद पदवीसाठी विचार करायला हवा. सांगळे एक निवृत्त सनदी अधिकारी असतानाही त्यांचे वाचन चौफेर असावे याचा आनंद वाटतो. या विषयातली बहुतांश महत्वाची संदर्भ पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत व त्याचे संदर्भ पुस्तकात दिलेले आहेत. हे पुस्तक वाचणारांना ही मूळ संदर्भ पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो.

मुळांचा शोध घेण्याची माणसाला अनावर ओढ असते. आपल्या जातीप्रधान देशात आपापल्या जातींबद्दल माहिती घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. बर्‍याचदा अशी माहिती निव्वळ ऎकिव असते. तिच्यामध्ये पुर्वगौरवाची भावना दडलेली असते. भारतीय समाज जातीपातींनी बनलेला समाज आहे. त्यातल्या काही जाती या व्यवस्थेच्या लाभार्थी असल्याने त्या एनकेण प्रकारेन या व्यवस्थेचे गोडवे गात असतात. तर ज्या या व्यवस्थेचे बळी आहेत तेही अज्ञानापोटी या व्यवस्थेचे वाहक बनतात. भारतीय समाजात उदात्तीकरण आणि मौन धारण करणे ही दोन षडयंत्रे सतत शिजत असतात. एक उच्चवर्णीय, पुरूषप्रधान, श्रीमंत मंडळींचे उदात्तीकरण करणे आणि दुसरे लिंगभाव, जात आणि वर्ग व्यवस्थेने ज्यांचे अतोनात शोषण केलेले आहे, पक्षपात आणि भेदभाव केलेला आहे त्यांच्या समस्यांबद्दल मौन धारण करणे. सांगळे मात्र या दोन्ही षडयंत्रांना नकार देतात आणि एका अभ्यासकाच्या नात्याने हा विषय निर्भयपणे आपल्याला समजाऊन सांगतात.

सांगळे यांनी अक्षरश: शेकडो जातींची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. तथापि हे केवळ माहितीचे संकलन नाही तर तिचे सम्यक विश्लेषण आणि समतोल सत्यशोधन या ग्रंथात केलेले आहे.
मनु, कौटिल्य, विविध स्मृतीकार यांचे दाखले सांगळे यांनी दिलेले आहेत. साडेतीन हजार वर्षांचा प्रवास रेखाटताना विद्यमान राष्ट्रपती श्री रामानाथ कोविंद यांचा पुरीच्या मंदिरात कसा अपमान केला गेला यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर शबरीमाला, शनि शिंगनापूर इथल्याही घटनांची आठवण त्यांनी करून दिलेली आहे. उच्चभ्रू आरक्षण विरोधक विद्यमान सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तवाकडे कशी डोळेझाक करतात यावरही झगझगीत प्रकाशझोत त्यांनी टाकलेला आहे.



ब्रिटीश राजवटीत हा देश, इथली माणसं समजाऊन घेण्यासाठी विल्सन, रसेल, इंथोवेन, क्रूक, रिस्ले, केनडी आदींनी या विषयांचा धांडोळा घेणारी पुस्तके लिहिली. दर दहा वर्षांनी जनगणना करून ही माहिती अद्ययावत करण्याची व गॅझिटियर मार्फत जिल्हावार अभ्यास उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाद्वारे या विषयाची तोंडओळख करून देण्याची गरज त्यांना वाटली.

त्यातून जातवार धर्मशाळा, संस्था, जातपंचायती, शाळा, महाविद्यालये, बॅंका, पेठा जन्माला आल्या. जातजाणिवा अधिक धारदार झाल्या. जातीव्यवस्था ही मनोर्‍यासारखी व्यवस्था असल्याने प्रत्येक जात आपण वरचे आहोत हे दाखवण्याचा खटाटोप करीत असते. समाज शास्त्रज्ञ डॉ. एम.एन. श्रीनिवासन म्हणतात त्याप्रमाणे " संस्कृतीकरणाचा " सिंद्धांत अर्थात वरच्यांचे अनुकरण करण्याची वृत्ती हा भारतीय जातींचा याकाळातला स्थायीभाव दिसतो.

महात्मा फुल्यांनी १८६९ साली न्यायासाठी आरक्षण द्या अशी मागणी केली. राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण आले. त्यानंतर मात्र जादूची कांडी फिरावी तशी जातींची उतरंड आरक्षणाच्या रांगेत उभी राहिली. आपली जात कशी आणि किती मागासलेली आहे हे मांडण्याची, सिद्ध करण्याची चढाओढच लागली. त्यासाठी उग्र आणि प्रसंगी हिंसक आंदोलने होऊ लागली.
स्वतंत्र भारताचे मंडलपुर्व भारत आणि मंडलोत्तर भारत असे प्रवासाचे दोन ठळक कालखंड बनले.

जातीव्यवस्थेने कामांचे वाटप केले, ती जन्मावर आधारित नव्हती, ती कामांवर आधारित होती अशा प्रकारचे समर्थन कायम केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मौलिक पुस्तकांद्वारे या मांडणीचे समर्पक खंडन केलेले आहे. मुळात ही व्यवस्था श्रमाचे वाटप करणारी नव्हती तर ती जन्मावर आधारित श्रमिकांचे वाटप करणारी अतिशय काटेकोर मनोर्‍याची रचना होती. तिने विषमतेचे श्रेणीबद्ध वाटप केले होते. जातीव्यवस्था मुलत: आर्थिक वाटप करणारी, शासनाच्या राजदंडाच्या आधारे चालवली जाणारी व्यवस्था होती.तिने शुद्र, अतिशुद्र आणि स्त्रिया यांचे वारेमाप शोषण केले, त्यांचे मानवी अधिकार हिरावून घेतले याकडे सांगळे लक्ष वेधतात. ही व्यवस्था हिंदुंइतकीच मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख आदी धर्मातही कशी पसरली यावरही ते भाष्य करतात.

सांगळे यांनी स्वामी विवेकानंद, ताराबाई शिंदे, लोकहितवादी, विविध दलित-भटक्यांच्या आत्मकथनांचे लेखक आदींचे दाखले देऊन विषयाचे सुबोध आकलन सादर केलेले आहे.
महाराष्ट्रातील शेकडो जातींची सांगळे यांनी दिलेली माहिती समजाऊन घेण्यासाठी तरी कार्यकर्ते, वाचक आणि अभ्यासक ह्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवले पाहिजे. सुनिल सांगळे व संजय सोनवणी यांच्यासारखे नव्या समाजथरातले लेखक या विषयावर अभ्यासपुर्ण मांडणी करताना बघितले की आजवर खिळखिळी न होणारी ही व्यवस्था निदान किलकिली तरी होईल अशी उमेद वाटू लागते.
आजच्या आधुनिक युगात ही व्यवस्था कालबाह्य झालेली आहे, आज सगळ्यात महत्वाची आहे ती अर्थसत्ता. सारे जग तिकडे झेपावत असताना मध्ययुगीन जातीय मानसिकतेत लोळत पडलेल्या आपल्या समाजाला जातीसंघर्ष काबूत ठेवण्याची हाक सांगळे देतात.
सांगळे यांच्या या समतोल, सम्यक आणि अभ्यासपुर्ण शोधग्रंथाचे स्वागत होईल असा मला विश्वास वाटतो.
- प्रा.हरी नरके,
सदस्य- राज्य मागासवर्ग आयोग, [नि.]

पृष्ठे ३३२, किंमत रू.३५०/-
ग्रंथाली प्रकाशन,माटुंगा, मुंबई, संपर्क- ०२२- २४२१६०५७,२४३०६६२४
granthaliruchee@gmail.com