Showing posts with label समग्र वाङ्मय. Show all posts
Showing posts with label समग्र वाङ्मय. Show all posts

Sunday, April 12, 2020

महात्मा फुले यांच्या लेखनाची समग्रता आणि संपादक प्रा.हरी नरके








महात्मा फुले यांच्या लेखनाची समग्रता- प्रा. केदार काळवणे

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे समताकेंद्री आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. ते सामाजिक क्रांतिकारक,समाजशिक्षक,सर्जनशील लेखक आणि कृतिशील विचारवंत होते.प्रस्थापित परंपरागत व्यवस्थेविरूध्द रचनात्मक विद्रोही भूमिका घेणारे आणि सनातनशास्र मोडीत काढत नव्या समाजव्यवस्थेची मागणी करणारे थोर समाजसुधारक म्हणून त्यांचे कार्य अक्षर ठरलेले आहे.शोषित समूहांचे नायक म्हणून त्यांनी लढलेले सामाजिक युध्द समानतेचे मूल्य रूजवण्यासाठी मोलाचे ठरले आहे.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारलेल्या आजच्या सर्व प्रकारच्या लोकशाहीची बीजभूमी ही एकोणिसाव्या शतकातील महात्मा फुले यांचे ऐतिहासिक क्रांतिकार्य हीच आहे.

या क्रांतिकार्याला अनेकविध पैलू आहेत.जातवर्णवर्गस्रीदास्यमुक्तीसाठीचा संघर्ष,धर्मचिकित्सेतून नवधर्मतत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी आणि पर्यायी संस्कृती निर्माणाची पायाभरणी करणारे इहवादी समाजचिंतक म्हणून हे कार्य मानवतेचा परीघ व्यापक करणारे ठरलेले आहेत.त्यांचे जीवन,कार्य आणि साहित्य यात कमालीची एकवाक्यता-एकरूपता होती.म्हणूनच हे लेखन महत्त्वाचे ठरलेले आहे. सार्वकालिक जीवनतत्त्वे आणि वैश्विक मूल्यांचे प्रकटीकरण,समकालीन सामाजिक वास्तवाची जनकेंद्री अभिव्यक्ती,तत्कालीन शोषणाची सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्षात परखड मीमांसा,इतिहास व वर्तमानाचा विवेकवादी अन्वयार्थ,वाचकांवर वैचारिकतेचा सखोल संस्कार करणारे,लेखक व वाचकांना प्रेरक ठरणारे,लेखन परंपरा निर्मिणारे आणि बहुसंख्यांच्या लोकभाषेचा माध्यम म्हणून वापर या कारणांनी हे लेखन अभिजात ठरलेले आहे.त्यांचे सर्व लेखन‘महात्मा फुले समग्र वाड्मय’या ग्रंथात उपलब्ध आहे.

महात्मा फुले यांच्या समग्र वाड्मयाचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे १९६९ साली प्रथम प्रकाशन झाले होते.धनंजय कीर व स.गं.मालशे त्याचे संपादक होते.मंडळाच्या वतीने सहा आवृत्त्या प्रसिध्द झालेल्या आहेत.या संपादनात य.दि.फडके यांचाही मोलाचा वाटा आहे.’तृतीय रत्न ‘(१८५५)हे मराठीतले पहिले आधुनिक नाटक,‘पवाडा:छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा’ (१८६९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले बहुजनवादी मराठी काव्यचरित्र,सांस्कृतिक शोषणाची मीमांसा करणारे ब्राम्हणांचे कसब(१८६९) व गुलामगिरी (१८७३) हे गद्यलेखन;भारतीय शेतकर्यांचा आक्रोश प्रथमच मांडणारा‘शेतकर्याचा असूड’(१८८३) हा कथा-निबंधात्मक ग्रंथ आणि सत्य व नितीवर आधारलेल्या वैश्विक धर्माचे तत्त्वज्ञान विशद करणारा‘सार्वजनिक सत्यधर्म’ (प्रकाशन:१८९१)या तत्त्वज्ञान ग्रंथासह अखंडात्मक काव्यरचना व इतर उपलब्ध लेखनाचा अंतर्भाव या समग्र वाड्मयात केलेला आहे.

हे वाड्मय मराठी साहित्यातले अक्षर साहित्य आहे.बहुजनांचे क्रांतिविज्ञान त्यातून साकार झाले आहे.भारतीय शोषित समूहाच्या आवाजाचे अनेकविध स्वर नि स्तर-अस्तर त्यामधून उजागर झाले आहे.जागतिक वाड्मयातही या लेखनाचे श्रेष्ठत्त्व अधोरेखित झाले आहे.गेल्या पन्नास वर्षात या ग्रंथाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या.१९९१ साली महात्मा फुले स्मृतीशताब्दी निमित्ताने काढलेली य.दि.फडके संपादित आवृत्ती विकत घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.त्यावेळी पु.ल.देशपांडे, गोविंद तळवलकर,राम बापट,डाॅ.श्रीराम लागू, ना.धो.महानोर,शंकरराव खरात,रा.चिं.ढेरे यांनी रांगेत उभे राहून हा ग्रंथ विकत घेतला होता.२००६ साली निघालेली आवृत्तीही हातोहात संपली.या ग्रंथाची मागणी होत होती.ती मागणी १२ वर्षानंतर २०१८ साली पूर्ण झाली.

महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या समग्र वाड्मयाची सुधारित आवृत्ती २०१८ साली प्रसिध्द झालेली आहे.ही समितीची प्रथमावृत्ती आहे.८६२ पृष्ठांच्या या आवृत्तीचे साक्षेपी संपादन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या लेखन-विचाराचे अभ्यासक प्रा.हरी नरके यांनी केलेले आहे.ही आवृत्ती अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे.जवळपास दोनशे पृष्ठांचा अलक्षित व दुर्मिळ मजकूराचा समावेश या आवृत्तीत केलेला आहे.तो फुले अभ्यासक-वाचकाला उपयुक्त ठरणारा आहे.

यात यशवंत फुले यांनी लिहिलेले महात्मा फुले यांचे आद्य चरित्र,त्यांची सामाजिक पत्रकारिता, त्यांनी कमिशनर म्हणून केलेले काम, सत्यशोधक चळवळीतील ऐतिहासिक दस्तऐवज,महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी केलेला पत्रव्यवहार,विश्राम रामजी घोले,केशवस्वामी व्यंकय्या अय्यावरू,रत्नाम्माबाई अय्यावरू यांनी महात्मा फुले यांच्या लेखन आणि कार्यासंबंधी दिलेले अभिप्राय,त्यांच्या मूळ लेखनाच्या प्रस्तावना आदी लेखन समाविष्ट केलेले आहे.या ग्रंथाला प्रा.हरी नरके यांनी एकतीस पृष्ठांचे चिकित्सक संपादकीय लिहिलेली आहे.महात्मा फुले यांच्या समग्र कार्य आणि लेखनाचा अर्करूपी गाभी तीमधून विशद झाला आहे.महात्मा फुले यांचे कार्य समजून घेताना हे संपादकीय मोलाचे ठरते.महात्मा फुले यांच्या कार्याची महत्ता तीमधून ध्वनित झालेली आहे.

प्रा. नरके पहिल्या आवृत्तीपासून या ग्रंथाशी संबंधीत आहे.तसेच त्यांनी महात्मा फुले यांच्या संबंधीचे मौलिक संशोधनही केलेले आहे.त्यामुळे ही आवृत्ती त्यांनी अधिक परिपूर्ण करत अद्यावत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.महात्मा फुले यांचे आजपावेतो उपलब्ध असणारे ललित-वैचारिक समग्र लेखन,महत्त्वाचा पत्रव्यवहार, त्यांच्या कार्यासंबंधीची विविध कागदपत्रे,विविध ग्रंथाच्या प्रस्तावना,मूळ छायाचित्रे, तत्कालीन वर्तमानपत्रातील बातम्या, महात्मा फुले यांचा जीवनपट, संदर्भ टीपा,निवडक शब्दांचा कोश आणि संदर्भ सूची यांचा समावेश या ग्रंथात असल्याने हा ग्रंथ परिपूर्ण वाटतो.

महात्मा फुले समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व साहित्य या ग्रंथात समाविष्ट केलेले आहे.ही सामग्री विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासकांना साह्यभूत ठरणारी आहे.हा ग्रंथ इतिहास लेखनाचे विश्वसनीय साधन आहे.या आवृत्तीत समाविष्ट केलेला ऐवज ऐतिहासिक दस्तावेज आहे.प्रा.नरके यांनीच महात्मा फुले यांची खरी जन्मतारीख आणि खरे छायाचित्र शोधून काढलेले आहे.महात्मा फुले यांच्या कार्य-लेखनाचा प्रचार-प्रसार मागील तीस वर्षात त्यांनी सातत्याने केलेला आहे.त्यांच्याच प्रयत्नातून महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय  इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली, उर्दू, गुजराती अशा तेरा भाषेत अनुवाद  झालेले आहे.इतर नऊ भाषेतील अनुवादाचे काम सुरू आहे.म्हणून त्यांनी संपादित केलेल्या प्रस्तुत आवृत्तीला मूल्य प्राप्त झालेले आहे.
   

महात्मा फुले यांचे समग्र लेखन हे विषमतामुक्त समाजनिर्मितीचे तत्त्वज्ञान आहे.‘माणूस’आणि त्याच्या लौकिक सुखाचा शोध या लेखनाने घेतलेला आहे.मानवमुक्तीचा जाहिरनामा म्हणून हे लेखन महत्त्वाचे आहे. श्रेष्ठ मानवी मूल्यांचा जागर या लेखनाने घडविलेला आहे.समकालीन सामाजिक वास्तव आणि इतिहासगत सांस्कृतिक संघर्ष या लेखनातून समोर आलेला आहे.सामाजिक समताविचार हे या लेखनाचे केंद्रसूत्र आहे.शेती,उद्योग,शिक्षण,समाज-संस्कृती, इतिहास, धर्म, साहित्य,भाषा आदी व्यवस्थासंबंधीचे मूलगामी आणि व्यवस्था परिवर्तनाचे मूल्ये असलेले मानवतावादी चिंतन यातून प्रकट झालेले आहे. सामाजिक समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय,सत्य,निती,प्रेम आदी वैश्विक मूल्यांचा अविष्कार या लेखनातून झालेला आहे.

परकीय अभिजनांनी(आर्य)येथील मूलनिवासी बहुजनांना अज्ञानी ठेवून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक गुलाम केले.त्यांचे ‘माणूस’म्हणून अस्तित्त्व नाकारून आपले वर्चस्व प्रस्थापित करत शोषण केले.याची परखड आणि चिकित्सक मीमांसा आधुनिक काळात प्रथमच महात्मा जोतीराव फुले यांनी केली.त्यांचे हे समग्र लेखन अभिजनांचा बुरखा फाडणारे आणि बहुजनांना सत्याची जाणीव करून देणारे असे आहे.म्हणूनच आपल्या सांस्कृतिक परंपरेकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे हे लेखन महत्वाचे आहे.महात्मा फुले यांच्या लेखनाची ही समग्रता कोणत्याही काळातील समाजपुनर्रचनेसाठी उपयुक्त ठरणारी आहे.

- केदार काळवणे,सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि. उस्मानाबाद. पिन:४१३५०७, ईमेल: kedar.kalwane.28@gmail.com          मो: ७०२०६३४५०२

‘आपलं महानगर’या वर्तमानपत्रातील ‘सारांश’पुरवणीतील आजचा लेख.
••••••••••••••••••••••••••

Wednesday, April 8, 2020

उद्योगपती आणि नेशन बिल्डर महात्मा जोतीराव फुले : प्रा. हरी नरके





उद्योगपती आणि नेशन बिल्डर महात्मा जोतीराव फुले : प्रा. हरी नरके
११ एप्रिल २०२० रोजी महात्मा जोतीराव फुले यांची १९३ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने -
जोतीराव 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं.

जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.

‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.

नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी १८७३ साली [१४७ वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं..........


ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे." स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.

जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या सात वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांचा कालातीत वारसा कोणता याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय? असल्यास किती आणि कोणत्या गोष्टी याचा विचार करायला हवा.

जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं.

जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं.

‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.

जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.

सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती.
ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.

एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.

कितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.

नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी १८७३ साली [१४७ वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं.

डॉ. जी.एस.घुर्ये आणि डॉ. एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचं विशेषत: जातीव्यवस्थेचं ज्या पद्धतीनं शास्त्रीय विश्लेषण केलं होतं ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचं हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे.

रिपोस्ट-

प्रा. हरी नरके, ०८/०४/२०२०
.......................

संदर्भ १. संपादक-प्रा हरी नरके, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३, २०१९

२. संपादक-प्रा हरी नरके, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८

३. संपादक-प्रा हरी नरके, महात्मा फुले - समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३

४. पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७

५. संपा. प्रा. हरी नरके-प्रा. य. दि. फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९३,२००६,

६. संपादक-प्रा हरी नरके, महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००६, २०१९


Tuesday, April 7, 2020

आद्य शिवचरित्रकार : महात्मा जोतीराव फुले- प्रा. हरी नरके





११ एप्रिल २०२० रोजी महात्मा जोतीराव फुले यांची १९३ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपुर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. अशावेळी शिवाजी महाराजांवरचं पहिलं मराठी पुस्तक महात्मा फुल्यांनी लिहिलं. १८०६ सालापासून मराठी [ देवनागरी ] छापखाना सुरू झाला.

१८०६ साली विल्यम कॅरेचं पहिलं मराठी पुस्तक छापण्यात आलं. [ ग्रामर ऑफ मराठा लॅण्गवेज, grammar of maratha language ] तेव्हापासूनचा इतिहास शोधून पाहा. मराठीतलं शिवरायांबद्दलचं पहिलं पुस्तक जोतीरावांचं आहे. जून १८६९ मध्ये ते प्रसिद्ध झाले.

मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक मुंबईत काळबादेवीला वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तर पुण्यात स्वत: जोतीरावांच्या वेताळ पेठेतील [ नंतरची गंज पेठ व सध्याची महात्मा फुले पेठ ] पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवलेले होते. त्याची किंमत अवघी सहा आणे ठेवण्यात आलेली होती. हे पुस्तक जोतीरावांनी परमहंस सभेचे अध्यक्ष दिवंगत रामचंद्र बाबाजी राणे यांना अर्पण केले होते. शिवराय एव्हढे मोठे होते की ते अमक्याएव्हढे मोठे होते अशी इतर कोणाची त्यांना उपमा द्यायची असेल तर दुसरी व्यक्तीच उपमेला समोर दिसत नाही इतके महाराज मोठे होते, असे फुले या पोवाड्यात सांगतात. छत्रपतींचे जीवन व कार्य याविषयी भरभरून आदर व्यक्त करून तेच आपली कार्यप्रेरणा आहेत असेही जोतीराव सांगतात. सुमारे एक हजार ओळींचा हा प्रदीर्घ पोवाडा आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या व मी संपादीत केलेल्या महात्मा फुले समग्र वाड्मयात तसेच इंटरनेटवरही हा पोवाडा उपलब्ध आहे. [ लिंक खाली दिली आहे.]

सदर पुस्तकाच्या लेखनासाठी आपले ब्राह्मण बालमित्र भांडारकर यांनी आपल्याला सहकार्य केले अशी कृतज्ञतापुर्वक नोंद जोतीरावांनी प्रस्तावनेत आवर्जून केलेली आहे. " ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी जोती म्हणे!"   हेच तर त्यांचे ब्रीद होते. हे शिवचरित्र लिहिण्यासाठी जोतीरावांनी अनेक संदर्भ साधनांचा धांडोळा घेतला. मराठीतील विविध बखरी, फारशीमधील तवारिखा, इतिहास ग्रंथ, इंग्रजी भाषेतील नानाविध ऎतिहासिक पुस्तके यांचा सखोल व्यासंग करून मोठ्या तयारीनिशी जोतीरावांनी हा ग्रंथ सिद्ध केला. गेली १५१ वर्षे तो सर्वत्र उपलब्ध आहे. किती शिवप्रेमींनी तो वाचलाय? उलट बहुतेक सगळेच उच्चभ्रू शिवचरित्रकार आणि शिवशाहीर या पुस्तकाची ठरवून उपेक्षा करतात.

" अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेतायुगी !१!
स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी !२!"

शिवराय देशासाठी लढत होते असे सांगणारे पहिले इतिहासकार, शिवशाहीर महात्मा जोतीराव फुले होत. त्यांना हा मान का नाकारला जातो?

हा चरित्रपर पोवाडा असल्याने यात तोवर उपलब्ध असलेल्या सर्व ऎतिहासिक संदर्भांचा त्यांनी वापर केलेला आहे. यात इतिहास असला तरी तो कोरडा, नीरस नाही. त्यात रसरशीत काव्य आहे. जोतीरावांच्या प्रतिभेचा आणि धगधगत्या शिवनिष्ठेचा हा ताम्रपट आपणही एकदा वाचावा. मी गेली ३२ वर्षे या पुस्तकावर बोलतोय. लिहितोय. मराठीत शिवरायांवर अनेक चरित्रपर आणि ललित पुस्तकं उपलब्ध आहेत. सत्यशोधक कृ. अ. केळुसकर, नरहर कुरूंदकर, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, वसंत कानेटकर, सेतुमाधव पगडी, दि. वि. काळे, वा. सी. बेंद्रे, गजानन भास्कर मेहेंदळे, गोविंद पानसरे, जयसिंगराव पवार आणि इतर अनेकांनी आपापले शिवछत्रपती मांडले. प्रत्येक विचारी माणसाने आवर्जून वाचावीत अशी ४ शिवचरित्रं निवडायची असतील तर म. फुले, केळुसकर, दि. वि. काळे आणि सेतुमाधवराव पगडी यांची निवडावी लागतात.

बहुजन समाजाला एक महानायक, महापुरूष देण्याचा जोतीरावांचा उद्देश होता. कोणतीही चळवळ उभी करायची असेल तर ५ गोष्टींची गरज असते.

१. आदर्शपुरूष वा स्त्री, जिच्या पावलावर पाऊल टाकून प्रगती करण्याची प्रेरणा सामान्य माणसाला मिळेल.

२. कार्यक्रमपत्रिका, परिवर्तनाचा कृतीकार्यक्रम, [ जोतीरावांनी ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, नैसर्गिक संसाधनांचे फेरवाटप ही विषयपत्रिका दिलेली होती.]

३. संघटना- सुरूवातीला शिक्षण संस्था आणि नंतर सत्यशोधक समाजामार्फत संघटित कार्य जोतीरावांनी केले.

४. नेतृत्व- जोतीराव, सावित्रीबाई यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ही चळवळ पुढे लहुजीवस्ताद साळवे, ना.
मे. लोखंडे, कृ. पां. भालेकर, ताराबाई शिंदे, डॉ. विश्राम रामजी घोले, तान्हुबाई बिर्जे, धोंडीराम कुंभार, सावित्रीबाई रोडे, गंगाधरभाऊ म्हस्के, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षि वि. रा. शिंदे, राजर्षी छ. शाहू महाराज, भास्करराव जाधव, गोपाळबाबा वलंगकर, केशवराव विचारे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मुकुंदराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, सी. के. बोले, कृष्णाजी अर्जून केळूसकर अशा असंख्य मान्यवरांच्या सहभागाने आणि नेतृत्वाने मोठी होत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर तिला वैश्विक उंची प्राप्त करून दिली.

५. तत्वज्ञान- जोतीरावांनी सनातन संस्कृती नाकारून पर्यायी भारतीय संस्कृती निर्माण करण्याचे सत्यशोधकी तत्वज्ञान विकसीत केले.

हा ग्रंथ लिहिताना शिवरायांच्या इतिहासाच्या माध्यामातून वरिल सगळी उद्दीष्टे गाठण्यासाठी जोतीरावांनी मांडणी केलेली आढळते.

शहाजी महाराजांना विजापूरमध्ये कैद करण्यात आले तेव्हा शिवरायांच्या पत्नी सईबाई वयाने खूप लहान होत्या. शिवराय अडचणीच्या प्रसंगी आपल्या या पत्नीशी विचारविनिमय करीत असत हे नागरिकांच्या मनावर बिंबवण्यासाठी फुले सांगतात, " सईबाईंनी मसलत सुचवली, तसे महाराज वागले आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली." ऎतिहासिकदृष्ट्या हे खरे की खोटे हे महत्वाचे नाही. आपल्या आदर्शांचे अनुकरण समाज करीत असतो आणि म्हणून आदर्श काय करीत होते हे लोकांपुढे उलगडऊन दाखवणे गरजेचे असते. बहुजन समाजात स्त्रियांचा सन्मान वाढवायचा असेल तर शिवाजी महाराज असे करायचे तुम्हीही करा हे सांगण्याचा यामागचा हेतू उघडच दिसतो. शिवाजीमहाराज हे आपले तमाम भारतीयांचे आदर्श होत हे पटवून देणारे फुले पहिले.

या पोवड्यात अशा कितीतरी जागा अहेत की ज्यांची विस्तृत चर्चा पुढे कधीतरी करता येईल.

शिवरायांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आलेख रेखाटताना जोतीराव म्हणतात,
"सोसिले उन्हातान्हाला भ्याला नाही पावसाला
डोंगर कंगर फिरला यवन जेरीस आणला
लढवी अचाट बुद्धीला आचंबा भुमीवर केला
बाळगी जरी संपत्तीला तरी बेताने खर्च केला
वाटणी देई शिपायाला लोभ द्रव्याचा नाही केला
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला!"

हे पुस्तक लिहून आणि प्रकाशित करूनच जोतीराव थांबले नाहीत. त्यांनी शिवचरित्रावर व्याख्याने द्यायचा,पोवाडे गायचा धडाका लावला. १८८० साली जोतीराव रायगडावर गेले. महाराजांच्या समाधीची त्यांनी पुजा केली. पुण्यात येऊन स्वारगेटजवळच्या हिराबागेत [ शिवाजी मराठा शिक्षण संस्थेजवळ]  गंगारामभाऊ म्हस्के [ मराठा ] आणि चाफळकर स्वामी [ ब्राह्मण ] या मित्रांच्या सोबत सत्यशोधक समाजातर्फे पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. तिथून ही जयंती मुंबईला लालबाग परळला रावबहादूर लोखंड्यांनी नेली. त्यानंतर १५ वर्षांनी लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला हजेरी लावली. इतिहास लिहिणार्‍या उच्चभ्रूंनी मात्र शिवजयंतीचे सगळे श्रेय एकट्या टिळकांना देऊन टाकले. खरा इतिहास सांगतो, शिवजयंती सुरू महात्मा फुल्यांनी केली होती, लो. टिळकांनी ती पुढे नेली. टिळकांचे नातू जयवंतराव टिळक यांना याचे भान होते. त्यामुळे आपल्या आत्मचरित्रात टिळकांनी ती सुरू केल्याचा दावा न करता त्यांनी ती पुढे आणली अशी कबुली जयवंतराव देतात.

फुल्यांच्या रायगड भेटीच्या आणि शिवजयंतीच्या बातम्या तत्कालीन केसरीने जरी दिल्या नसल्या तरी दिनबंधूने त्या दिलेल्या आहेत. दिनबंधूच्या जुन्या फायलींमध्ये आजही त्या आहेत. शिवाय माधवराव बागल, वि. द. घाटे, फुले चरित्रकार, पं. सी. पाटील, धनंजय कीर, आचार्य अत्रे, मुकुंदराव पाटील, केळुसकर, जेधे, जवळकर, प्रबोधनकार, पाळेकर, श्रीपतराव शिंदे आदी मान्यवरांनी त्याच्या नोंदीही केलेल्या आहेत. तरिही काही सनातन्यांना म्हणे हे पुरावे मान्य नाहीत. का तर केसरीत तशी नोंद नाही ना! हे नासक्या आमराईतले रेशीमकिडे हा व्हायरस भयंकर आहे. त्यांचे मानायचे तर केसरीने जोतीराव व सावित्रीबाई यांच्या मृत्यूच्या बातम्या ज्याअर्थी दिलेल्या नाहीत त्याअर्थी ते वारलेच नाहीत असेही मानावे लागेल!


हा अफवाबाज विषाणू सातत्याने बुद्धीभेदाचा रणगाडा चालवित असतो. बहुसंख्य बहुजन तिला बळी पडत असतात. जातीविद्वेशाने सडलेल्या या प्रतिगामी मेंदूंनी आजपर्यंत जोतीरावांच्या या आद्यशिवचरित्राची वा जयंतीकार्याची दखलच घेतलेली नाही. याउलट जोतीरावांच्या अन्य लेखनातल्या नोंदी संदर्भापासून तोडून, विकृत करून जोतीरावांनी शिवरायांची बदनामी केलीय अशा आवया यांनी उठवल्या. आजही हाच उद्योग चालू आहे. १८६९ पर्यंत शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातले एकही पत्र उपलब्ध झालेले नव्हते. स्वाभाविकच उपलब्ध ऎतिहासिक कागदपत्रांच्या आधारे शिवरायांचे औपचारिक शिक्षण झालेले नसावे अशा समजुतीने त्या अर्थाची नोंद जोतीरावांनी केली. मात्र अफवागॅंगकडून हा एकच शब्द तेव्हढा निवडून विकृतपणे पेश केला जातो, आणि फुलेबदनामीचे दुकान चालवले जाते. एखाद्या लेखकाचा एखादा सुटा शब्द नुसता बघून उपयोग नसतो तर त्याचा काळ, संदर्भ, हेतू आणि त्या लेखकाचे इतर लेखन हे सारे एकत्रितपणे बघावे लागते. अंडरवर्ल्डच्या टोळ्या जशा देशासाठी घातक आहेत तशाच या अफवागॅंग समाजशत्रू होत.

आर.एस.एस.चे स्वयंसेवक बाळ गांगल हे डबल पीएच.डी. होल्डर यात आघाडीवर होते. त्यांचा बुरखा मी ३२ वर्षांपुर्वीच माझ्या "महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन " या ग्रंथात सप्रमाण फाडला होता. हिंदुत्ववादी बेहर्‍यांच्या सोबतमध्ये गांगलांनी १९८८ साली महात्मा फुल्यांवर भयंकर गरळ ओकलेली होती. फुल्यांनी शिवरायांची बदनामी केल्याचा धादांत खोटा आरोप गांगलांनी केलेला होता. आजही काही सडक्या आंब्यातले किडे हीच गोबेल्सची मोहीम चालवित असतात. देव, धर्म, देश यांचे नाव घेत बहुजनांचा बुद्धीभेद करून इतिहासाचा गैरवापर करीत ही विषवल्ली फोफावत राहते.

म्हणूनच संदर्भसाधनांच्या शोधात सतत राहावे लागते, त्यांच्या प्रकाशात इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. संदर्भसाधनांचा शोध आणि सत्यशोधन ही सतत चालणारी प्रक्रीया आहे. ती अथकपणे सुरूच ठेवावी लागेल. बहुजनांना या कामात फारसा रस नसतो. वाचन, चिंतन, संशोधन यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. अर्थात तशी गोडीही नसते. ते प्रतिगामी विद्वानांना रखेल्या ठेवाव्यात तसे आपल्या पदरी ठेवतात. हे बाळगलेले कावेबाज सनातनी इतिहासाचा विपर्यास आणि विकृतीकरण यात तरबेज असतात. प्रबोधन, परिवर्तनपर उपक्रमांना अदखलपात्र मानणे हा त्यांचा पहिला कट असतो. तरिही चळवळी, नेते वाढतच राहिले तर त्यांच्यावर हल्ले करणे, नेतृत्वाचे चारित्र्यहनन करणे, नेत्यांच्या हत्येच्या सुपार्‍या देणे, हत्त्या करणे, ही दुसरी पायरी असते. तरिही ते संपले नाहीत, उलट वाढतच राहिले, समाजमान्य होत गेले तर त्यांचे अपहरण करणे ही तिसरी पायरी असते. या अवस्थेत सध्या शिवराय, बाबासाहेब आदी महापुरूष सापडलेले आहेत. अर्थात अपहरण करण्यामागे स्विकारण्याचा प्रामाणिक हेतू नसतो. त्यांच्या क्रांतिकारक विचारात भेसळ करून ते विकृत करीत राहणे हे मुख्य अभियान असते. मधूनमधून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मानणारे लोक झोपलेत की जागे आहेत याचाही अंदाज घेतला जातो. तो अंगलट आला तर प्रसंगी माघार घेऊन तह केला जातो. विकृतीकरण मात्र जारीच राहते.  २०१४ पासून या शक्तींनी पुन्हा उचल खाल्लेली आहे. केंद्रात आणि राज्यात नरेंद्र-देवेंद्रांची सत्ता आल्याबरोबर या आमराईतील रेशीमकिड्यांना रसद मिळू लागली. हे घाशीराम कोतवाल पुन्हा मस्तवाल झाले.

जोतीरावांचे अनुयायी, मित्र आणि सत्यशोधक विद्वान कृष्णाजी अर्जून केळुसकर यांनी १९०६ साली सुमारे ६०० पृष्ठांचे प्रदीर्घ असे मौलिक शिवचरित्र लिहिले. केळुसकर मराठा कुणबी असल्याने शतकानंतरही हे पुस्तक दुर्लक्षित आहे. शिवचरित्राच्या लेखन-प्रकाशनाने केळुसकारांचे हातच पोळले होते. या पुस्तकासाठी व याच्या इंग्रजी अनुवादासाठी [ अनु. एन.एस. ताकाखाव ] त्यांनी बॅंकेचे कर्ज काढले. ग्रंथशत्रू असलेल्या बहुजनांनी या पुस्तकाकडे ढुंकुनही बघितले नाही. तोवर शिवराय मध्यमवर्गीयांचे डार्लिंग वा रोजगाराचे साधन झालेले नव्हते. ते सेलिब्रीटीही झालेले नव्हते. तसे ते फार नंतर झाले. त्यामुळे मध्यमवर्गीयांनीही हे पुस्तक घेतले नाही. केळुसकर गुरूजी आपले विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्यासोबत डोक्यावर या पुस्तकाचे गठ्ठे घेत घरोघरी फिरून शिवचरित्र घ्या हो शिवचरित्र घ्या! अशी बहुजनांना विनवणी करायचे. कोणाही मराठा, कुणबी, माळी, आगरी, भंडारी बहुजनांना हे पुस्तक खरेदी करावेसे वाटले नाही. परिणामी केळुसकरांवरील कर्जाचा बोजा वाढतच गेला. बॅंकेच्या जप्तीच्या नोटीसा यायला लागल्या. केळुसकर हवालदिल झाले. अश्रू गाळू लागले. कुठून आपल्याला ही अवदसा आठवली असे त्यांना झाले.

 ते शाहू महाराजांकडे गेले. महाराजांनी शिवचरित्राच्या २५० प्रती तात्काळ विकत घेतल्या. कर्ज फेडण्यासाठी मदतीचे आश्वासनही दिले. आपण लग्नाला बडोद्याला चाललोय, आल्यावर भेटा, असे महाराज म्हणाले. पण महाराज मुंबईत अचानक, अकाली वारले. केळुसकर ग्वाल्हेरला शिंदे सरकारांकडे गेले. आपण लंडनला तातडीने निघालोय, आल्यावर भेटा, नक्की मदत करू असे आश्वासन माधवराव शिंदे यांनी दिले. पण शिंद्यांचे लंडनमध्येच निधन झाले. केळुसकर इंदूरला तुकोजीराव होळकर महाराजांकडे गेले. तुकोजीराव पडले धनगर राजे.आजूबाजूला डझनावारी मराठा संस्थानिक असताना ज्याअर्थी केळुसकर गुरूजी आपल्याकडे आलेत त्याअर्थी  मदत करायला हवी म्हणून त्यांनी २५ हजार रूपये तात्काळ दिले आणि केळुसकर कर्जमुक्त झाले. केळुसकरांनी पुस्तकाच्या ५०० प्रती होळकर महाराजांना भेट पाठवल्या. पण त्या मिळायच्या आतच होळकरांची गादी ब्रिटीशांनी खालसा केलेली होती. अशी झाली केळुसकरांच्या शिवचरित्राची फरपट.

अर्थात आजही बहुजनांना ना केळुसकर माहित आहेत, ना होळकर, ना शिवचरित्र! उत्तम चालूय!
सदैव धार्मिक गुंगीत असलेले बहुजन आणि स्पर्धाभावनेने पछाडलेले पुरोगामी हे सनातन्यांच्या बुद्धीभेदाला पुन्हापुन्हा बळी पडतात. कावेबाज प्रतिगामी सनातनी व्यवस्थेकडून विकृतीकरणाचे हे उद्योग चिवटपणे चालूच राहतात. बहुजन पुरोगामी सोयर्‍यांनो, अशाच गाढ झोपा काढा. तुम्हाला गुंगीची, झोपेची नितांत गरज आहे. तुम्हारा कुछ नही होनेवाला. तुम्ही गुलामीतच सडणार. तुमची तीच लायकी आहे. तुमची झोप हीच जोतीरावांना जयंतीनिमित्तची खरी आदरांजली असेल!

प्रा. हरी नरके, ०७/०४/२०२०

संदर्भ-

https://shivray.com/mahatma-fule-povada/

https://archive.org/details/MahatmaPhuleSamgraVanmay5Avruti/mode/2up

* संपा. प्रा. हरी नरके, महात्मा फुले समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन,मुंबई, २०१३

* पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७

* संपा. माधवराव बागल, सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ, कोल्हापूर,१९३३

* संपा. प्रा. हरी नरके, आम्ही पाहिलेले फुले, महाराष्ट्र शासन,मुंबई, १९९३,२०१९

* संपा. प्रा. हरी नरके-प्रा. य. दि. फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन,मुंबई,१९९३,२००६,

* छत्रपति शिवाजी महाराज, दिनकर विनायक काळे, पुणे विद्यापीठ, पुणे, प्रथमावृत्ती, १६ मार्च १९६०

* संपा. प्रा. हरी नरके, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८

* संपा. धनंजय कीर, गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर आत्मचरित्र व चरित्र, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, १९७७, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, २०१४

* सरस्वती पब्लिशिंग कंपनी, वरदा प्रकाशन,पुणे व साकेत, औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेले केळूसकर लिखित शिवचरित्र

* प्रा. हरी नरके, महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन, सुगावा, पुणे, १९८९

* दिनबंधू मधील बातम्या

Sunday, December 30, 2018

महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचा निरोप घेताना









२०१८ मध्ये महत्वाच्या ५ ग्रंथांच्या सुधारित आवृत्त्या मला प्रकाशित करता आल्या.
१. महात्मा फुले : समग्र वाड्मय,
२. सावित्रीबाई फुले : समग्र वाड्मय,
३. आम्ही पाहिलेले महात्मा फुले,
४. महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ,
५. महात्मा फुले: गौरव ग्रंथ,
या पुस्तकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महात्मा फुले : समग्र वाड्मयच्या आठ महिन्यात तीन आवृत्त्या संपल्या

या मालिकेतला ६वा ग्रंथ, "महात्मा फुले:शोधाच्या नव्या वाटा" हा प्रकाशनासाठी तयार आहे.
इतरही डझनभर पुस्तकांची कामं पुर्णतेच्या जवळ पोचलेली आहेत.
आणखी काही पुस्तकं छपाईच्या प्रक्रियेत पाईपलाईनमध्ये आहेत.
सध्या प्रकाशनाच्या प्रक्रियेत असलेली ही पुस्तके प्रकाशित होतील की नाही हे मला माहित नाही.

सध्या या ग्रंथ प्रकाशन समितीची सुत्रे सनातनी, सरंजामी, जात्यंधाच्या हातात आहेत.
मुलत: फुले आंबेडकरद्वेशावरच ते पोसले गेलेले आहेत. प्रबोधनाशी हाडवैर असलेल्यांना समाजक्रांतीच्या विचारांबद्दल जन्मजात आकस आहे.नफरत आहे. या समतावादी विचारांचे विकृतीकरण करण्यासाठी तसेच हे विचार नष्ट करण्यासाठी आजवर ते कार्यरत होते. आजही आहेत.

सगळेच राजकारणी फुले-शाहू-आंबेडकरांचा जप करीत असतात. मात्र या सरकारी ग्रंथ प्रकाशन समितीकडे एकही मुद्रीतशोधक, संशोधन सहाय्यक किंवा संपादन सहाय्यक नाही. कधीही नव्हते. सगळे काम एकहाती संपादक/सदस्य सचिवाला करावे लागते. त्याचा प्रवासखर्चही मिळाला तर पाच दहा वर्षांनी कधीतरी मिळतो.
सदस्य सचिवाला या पुर्णवेळ कामासाठी शिपाई, हमाल, झाडूवाले आदींच्या मासिक पगाराच्या २५% पेक्षाही कमी मानधन मिळते. अर्थातच तेही आठदहा वर्षांनी कधीतरी मिळते.

खरंतर हा सगळा थॅंकलेस जॉब आहे.भरपूर शिव्या, दूषणे आणि मन:स्तापाचा खुराक मात्र मुबलक मिळतो. टेल्कोतली माझी नोकरी सोडून मी हे काम करण्यासाठी गेलो. अनेक हिन्दी, मराठी, इंग्रजी पुस्तकं प्रकाशित केली. शंभर वर्षात महात्मा फुले साहित्याचे हिन्ही, इंग्रजीत भाषांतर झालेले नव्हते. ते केले. त्यातून बंगाली, तेलगू, गुजराती, उर्दू, मल्याळम, कन्नड, सिंधी, उर्दूत अनुवाद होऊन फुले साहित्य देशभर पोचले. लोकव्यवहार आणि शासनव्यवहार यात फक्त ’स्व’हित पाहिले जाते. सामाजिक कृतज्ञतेचा बहुधा दुष्काळ असतो. फुले-आंबेडकरी चळवळीबद्दलची माझी समज खूपच भाबडी होती असे आज मला वाटते. प्रबोधन चळवळीच्या ह्या कामासाठी टेल्को सोडण्याचा, पुर्णवेळ वाहून घेण्याचा, स्वत:चे प्रचंड आर्थिक नुकसान करून घेण्याचा निर्णय चुकला की काय अशी मला आज शंका येते.

महात्मा फुले यांच्या जीवनावर संशोधनाच्या नव्या प्रकाशात अद्ययावत चित्रपट करावा असा प्रस्ताव मी १९९९ साली राज्य शासनाला दिला होता. तो स्विकारला गेला होता. त्याच्या निर्मितीचे काम एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल यांच्याकडे सोपवले गेले होते. विजय तेंडूलकर, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, भा.ल.भोळे अशा दिग्गजांसोबत मला संशोधन व स्क्रिप्टवर काम करायला मिळेल हा आनंद होता.
तथापि ही चित्रपटनिर्मिती १८ वर्षे रखडली. त्याची कारणे सरकार, एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल हेच सांगू शकतील. या काळात संशोधन व स्क्रिप्ट टीममधल्या काही मान्यवरांचे निधन झाले. आता एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेलांकडचे हे काम नविन संस्थेकडे सोपवण्यात आलेले आहे.
नवी टिम ह्या कामाला गती देणार आहे.
२०१९ मध्ये ही संस्था महात्मा फुले यांच्या जीवनावरील भव्य अशा हिंदी, मराठी, इंग्रजीतील चित्रपटाची निर्मिती करील अशी आशा आहे.

प्रा.हरी नरके, ३१ डिसेंबर, २०१८

Sunday, November 18, 2018

महात्मा फुलेंचे क्रांतिदर्शी समग्र वाङ्मय-



'महात्मा फुले समग्र वाङ्मय' हा संपादक प्रा हरि नरके यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात गेला पाहिजे अशा तोलामोलाचा आहे...

'महात्मा फुले समग्र वाङ्मय' हा संपादक प्रा. हरि नरके यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात गेला पाहिजे अशा तोलामोलाचा आहे. आज २१व्या शतकात सोशल मीडिया जोरदार चालू असताना, मतामतांचा गलबला वाढलेला असताना हा ग्रंथ 'मूळ साधनांच्या अभ्यासाचे' महत्त्व अधोरेखित करतो. सध्या 'जो जे वांछिल तो ते लाहो' अशा काळात महात्मा फुले आणि त्यांचे समग्र वाङ्मय आपल्यासाठी एक कसोटीचा दगड ठरू शकते. यामुळेच हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात जाण्याची गरज आहे.

या समग्र वाङ्मयाचे सुरुवातीचे संपादक धनंजय कीर, स. गं. मालशे आणि य. दि. फडके होते. 'मूळ प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' होते. नवी समिती २०१३ मध्ये अस्तित्वात आली. त्यांनी ही नवी आवृत्ती अलीकडेच प्रकाशित केली आहे. या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे 'आद्य फुले चरित्र - यशवंत जोतीराव फुले' या भागाचा समावेश. खंडाला प्रा. हरि नरके यांची ३९ पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. या खंडाची मध्यवर्ती कल्पना म्हणजे 'स्त्री-पुरुष समानता, ज्ञानार्जन आणि अंधश्रद्धा निर्मूलन' यांचा पुरस्कार करणे. यासाठी कार्यरत असणाऱ्या, झटणाऱ्या लोकांसाठी हा खंड म्हणजे अक्षय्य ऊर्जा केंद्र आहे.

महात्मा फुले कोण होते? त्यांचे योगदान काय? असे अज्ञ किंवा उर्मट प्रश्न विचारण्याचे धाडस काही जण दबक्या आवाजात करीत असतात. अशांना संपादकीय प्रस्तावनेत जोरदार उत्तर नरके यांनी दिले आहे. शिक्षणतज्ञ, कृषितज्ञ, अर्थतज्ञ, आधुनिक नाटककार, निबंधकार, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक मराठी क वितेचे जनक, पुण्याचे आयुक्त, पुणे कमर्शियल अॅण्ड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रकाशक एवढ्या साऱ्या भूमिका त्यांनी एकाच आयुष्यात बजावल्या.

१८७३ मध्ये 'गुलामगिरी' ग्रंथ निग्रो चळवळीला अर्पण करणे, शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक करणे या गोष्टी महात्मा फुले यांच्या दूरदर्शित्वाच्या निदर्शक होत. संपादकीयात नरके यांनी पुढील शब्दात फुलेंच्या साहित्याबद्दल लिहिले आहे- 'त्यांचे समग्र साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय. हा श्रेष्ठ ग्रंथ हे परिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र आणि समताधिष्ठित समाजाचे संकल्पचित्र असल्याने त्यांचे जागतिक साहित्यात आगळेवेगळे स्थान आहे.' संपादकांनी योग्य आणि अचूक शब्दात साहित्याचे मर्म ओळखले आहे. संपादकीयात त्यांनी ज्या चार पायऱ्या दिलेल्या आहेत त्यांची यथार्थता आजही कमी झालेली नाही.

सामाजिक न्यायासाठी राखीव जागांची मागणी भारतात सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केली. त्यांच्या विचारांचा आधार घेऊन सत्तेवर आलेली मंडळी 'समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय विसरून सत्तेवाचून सकळ कळा, झाल्या अवकळा', यावर दृढ विश्वास ठेवून चालत आहेत.

या ग्रंथाचा गाभा आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणविषयक कार्य आणि विचार. विचारांची मांडणी खूप जण करतात. कृती मात्र थोड्यांनाच जमते. 'शिक्षण हा स्त्रियांचा मानवी अधिकार आहे आणि समग्र देशाची उन्नती स्त्रीशिक्षणाविना शक्य नाही' असा विचार १९व्या शतकात नुसता मांडायचा नाही तर स्वत: अस्तित्वात आणायचा. हे अवघड काम उभयतांनी केले. त्याचा पुरावा २९ मे १८५२च्या 'पुना ऑब्झर्वर' वृत्तपत्रातील पत्रात आहे. वाचकांच्या पत्रात एका विद्यार्थ्याचे पत्र आहे. तो लिहितो - 'जोतीरावांच्या शाळातील मुलींची पटसंख्या सरकारी शाळातील मुलांपेक्षा दहापटीने मोठी आहे. त्याचे कारण मुलींना शिकविण्याची जी व्यवस्था आहे ती मुलांच्या शासकीय शाळांतील व्यवस्थेपेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ आहे.'

महात्मा फुले यांचा आणखी एक दुर्मीळ पैलू या ग्रंथातून समोर येतो. एखादा लेखक क्वचितच दुसऱ्या लेखकाची स्तुती करतो किंवा पाठराखण करतो. १८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांच्या 'स्त्री-पुरुष तुलना' पुस्तकाने खळबळ उडवून दिली. पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेतून या पुस्तकावर टीका होताच 'सत्सार' या नियतकालिकातून महात्मा फुले यांनी ताराबाईंची पाठराखण केली. स्त्रीदु:खाचा कढ जितका समर्थपणे स्त्रियाच व्यक्त करू शकतात, तितका तो पुरुषांकडून प्रगट होणे शक्य नाही याची जोतीराव प्रांजळ कबुली देतात. आजही किती जणांना हे जमेल?

अभिनव कल्पना लढविण्यात या पती-पत्नींचा हात कोणी धरू शकत नव्हता. १८५२ मध्ये पहिले भारतीय शालेय ग्रंथालय उभारणे, मुलामुलींना पहिलीपासून इंग्रजी, शेतीशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण देणे, विद्यार्थी गळतीचा प्रश्न सोडविण्यासाठी गरीब मुलामुलींना पगार देणे, मुलामुलींच्या आई-वडिलांसाठी रात्रशाळा काढणे, शिकायला चला सांगणारे 'तृतीय रत्न' नाटक लिहिणे या सगळ्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सेंद्रिय विचारवंत कसे होते हे समजते.

इतिहासाच्या पुनर्निमितीचा खरं म्हणजे पुनर्लेखनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक तथ्ये मोडतोड न करता सामाजिक शहाणपणाचा अवलंब करून कशी मांडता येतात आणि त्यासाठी तारतम्य कसे वापरावे हे आपणास जोतीरावांच्या पोवाड्यातून समजते.

जगातील धर्मग्रंथांसंदर्भात महात्मा फुले यांचे जे निरीक्षण आहे त्याचे आश्चर्य वाटते. जगभराच्या धर्मग्रंथांनी कमी-अधिक प्रमाणात स्त्रियांवर अन्याय केला. हे धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिल्याने त्यांनी स्वार्थासाठी पक्षपात केल्याचेही निरीक्षण जोतीरावांनी नोंदविले आहे. काळाचा विचार करता जोतीरावांचे द्रष्टेपणच जणू आपणास दिसते. या सखोल अभ्यासातूनच त्यांना पर्यायी संस्कृतीचे वेध लागल्याचे दिसते. पुढे 'पर्यायी संस्कृतीचे जनक' म्हणून महात्मा फुले यांची जी प्रतिमा पुढे आली त्याची पाळेमुळे आपणास येथे दिसतात.

शेतकरी संघटनेच्या अधिवेशनास महिला उपस्थित होत्या हा इतिहास पाठ्यपुस्तकात आला आहे. १९२५ मध्ये वर्धा येथे सत्यशोधक महिला परिषदेला पाच हजार महिला उपस्थित राहतात हा भाग आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी येणार? सत्यशोधक विवाहपद्धती, भाऊपणा व बहीणपणा, सामाजिक संघटन, पाणी अडवा पाणी जिरवा, उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव, नेशन बिल्डिंगसाठी नेशन बिल्डरची भूमिका, शेती आणि अर्थव्यवहारांसंबंधी त्यांची भूमिका या गोष्टी पाठ्यपुस्तकातून किंवा सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याची गरज आहे. समाज विनाकारण कोणालाही महात्मा पदवी अर्पण करीत नाही.

आद्य फुले चरित्र ही ग्रंथाची जमेची बाजू आहे. नऊ परिशिष्टे अत्यंत महत्त्वाची आहेत. संदर्भ टीपा, निवडक शब्दांचा कोश, निवडक संदर्भ सूचीने ग्रंथाचे मोल वाढविले आहे. संपादकीयातील काही पॅरेग्राफ चुकून दोनदा छापले गेले आहेत ते पुढील आवृत्तीत दुरुस्त करता येतील. सरकारने मनावर घेतल्यास ग्रंथाची स्वस्त जनआवृत्ती काढता येईल.

महात्मा फुले समग्र वाङ्मय,संपादक : प्रा. हरि नरके,
प्रकाशक : फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन,
पृष्ठं : ८६२, किंमत : ३२० रु.
म.टा. रविवार, दि. १८ नोव्हेंबर २०१८, संवाद, पृ. ६
https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/#
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/mahatma-fulles-revolutionary-composite-class/articleshow/66662150.cms
डॉ गणेश राऊत- मटा ऑनलाइन | Updated:Nov 18, 2018, 04:00AM IST