Showing posts with label मराठी भाषा. Show all posts
Showing posts with label मराठी भाषा. Show all posts

Wednesday, February 26, 2020

३००० कोटी बुडाले

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची केवळ घोषणाच बाकी ; सरकार उदासीन असल्यानं महाराष्ट्राचे ३००० कोटी बुडाले :प्रा.हरी नरके

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन [प्रेरणा परब - खोत]
२७ फेब्रुवारीला कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. अतिशय समृद्ध अशा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा अशी तमाम मराठी मनांची इच्छा आहे.  मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचा प्रयत्न समितीकडून पुरेपूर झाला असला तरी गेल्या ६ -७ वर्षांपासून या प्रकरणाचं घोंगडं अद्यापही भिजतच आहे. या प्रकरणात नक्की गाडी कुठे थांबली आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी 'पोलिसनामा'ने प्रा. रंगनाथ पाठारे समितीचे सदस्य व समन्वयक असणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्याशी बातचीत केली पाहूया त्यांचे याबाबत काय मत आहे.

याबाबत बोलताना प्रा. हरी नरके म्हणाले की सर्वप्रथम केंद्र सरकारने तमीळ भाषेला हा दर्जा दिला. त्यानंतर जगातील ४ थ्या स्थानावर असणाऱ्या मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळवा याकरिता प्रयत्न केले गेले. याकरिता प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये प्रा. रंगनाथ पठारे समितीचे समन्वयक आणि ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, प्रा.नागनाथ कोत्तापल्ले, श्रीकांत बहुलकर, मैत्रेयी देशपांडे, कल्याण काळे, आनंद उबाळे, मधुकर वाकोडे यांचा समावेश होता. त्यांनी केंद्र सरकारला पुराव्यासहित सुमारे ५०० पानी अहवाल सादर केला आहे. यानंतर अनेकदा समितीकडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र सरकारच्या तज्ञांकडून हा अहवाल मान्य करण्यात आला. परंतु याबाबत पुढे काहीच घडले नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा याकरिता समितीने तत्कालीन मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु तत्कालीन मंत्र्यांनी केवळ टोलवाटोलवीच केल्याचे प्रा. नरके यांनी संगितले.

याबाबतीत राज्यसरकार उदासीन

याबाबत बोलताना प्रा. नरके पुढे म्हणाले , २०१४ साली सत्तांतर झाले. केंद्र सरकारकडे हा अहवाल नाकारण्याचे काही कारणच नव्हते. या अहवालाला केंद्राच्या तज्ञांनी मान्यता दिली देखील पण याबाबत  राज्य सरकार मात्र गेली पाच वर्ष पूर्णपणे उदासीन दिसत आहे. आपल्या मातृभाषेबद्दल केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची इच्छाशक्ती या राजकारण्यांमध्ये दिसत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तत्कालीन मंत्र्यांमध्ये आपसात ताळमेळ नव्हता याचा परिणाम होऊन मराठीचं नुकसान झालं. सुरवातीला काही पक्षांनी 'मराठी'- 'मराठी'चा  ढिंडोरा पिटला खरा पण त्यांना जेव्हा उमगले की निवडणुकीत याचा काही फायदा होत नाही तेव्हा मात्र त्यांनी विषय बदलला.

पावसाळ्यातच बेडकांना आवाज फुटतो

हे प्रकरण इतके वर्ष अडकून ठेवले आहे याचा अर्थ मराठी राजकर्त्यांनाच मराठी विषयी आस्था नाही. मराठीचे गोडवे केवळ निवडणुकांपुरतेच आणि मराठी कार्यक्रमात गायले जातात. हे म्हणजे पावसाळ्यातच बेडकांना आवाज फुटतो असे आहे. इतरवेळी आपण मराठी असल्याची आपल्या भाषेची आठवण त्यांना होत नाही असे म्हणत प्रा. नरके  यांनी राजकारण्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. इतर राज्यात मातृभाषेविषयी आस्था जाणवते जेव्हा मल्याळम भाषेचा अभिजात भाषा म्हणून दर्जा नाकारला गेला तेव्हा तेथील राजकारणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मातृभाषेकरीता एकत्र आले. मग महाराष्ट्र असे का होत नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अ.ब. क सरकार सर्वच सारखे आहेत. मराठीला वर आणण्यासाठी ते महत्वाचे कार्य करू शकतात मात्र त्यांना असे करायचे नाही त्यांना मराठीला मारायचे आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकारणी केवळ 'तू कर रडल्यासारखं ...अशा भुमिकेत आहेत काय ? जर जनतेने हा प्रश्न लावून धरला आणि मराठी भाषेचा प्रश्न सुटेपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय घेतला तर मात्र यात नक्की फरक पडू शकेल. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेसाठी जागे होणे गरजेचे आहे.

पालकांनी मराठीचं बाळकडू द्यायला हवं

हल्ली मराठी माध्यमात शिक्षण देण्यासाठी पालक तयार होत नाहीत याबाबत बोलताना प्रा. नरके म्हणाले " मला असे वाटते की समाजातील बुद्धिजीवी वर्गाने आपली मुलं मराठी माध्यमात शिकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मोठं मोठे मराठी साहित्यिक त्याची मुलं, नातवंडं आज इंग्रजी माध्यमातच शिक्षण घेतात. एवढंच नाही तर मराठीला  मोठ्या तोण्डाने 'माझी भाषा' म्हणनाऱ्या राजकारण्यांची मुलं देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच शिकत आहेत. जर समाजातील बुद्धिजीवी, प्रतिष्ठित नागरिकच याप्रकारे वागत असतील तर अर्थातच समाजातील इतर वर्ग देखील तेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. मराठी भाषेत शिक्षण देण्याबद्दल पालकांचा आत्मविश्वास जागा करणे महत्वाचे आहे.

कितीतरी महान व्यक्तींचे शिक्षण मातृभाषेतच

राहिला भाषा आणि रोजगाराचा प्रश्न तर सॅम पित्रोदा, जयंत नारळीकर,रघुनाथ माशेलकर, विजय भटकर यासारख्या कित्येक महान लोकांनी आपले शिक्षण मातृभाषेतच पूर्ण केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, मी मान्य करतो की सॉफ्टवेअर, अभियांत्रिकी अशा क्षेत्रात इंग्रजीच चालते. पण कृषीप्रधान असणाऱ्या आपल्या देशात व राज्यात बहुतेक करून मासिके,साहित्य हे मातृभाषेतच प्रसिद्ध होते. कला क्षेत्राचा विचार केला तर मराठी भाषेमुळे नाटक,अभिनय यातील बारकावे अधिक चांगल्या प्रकारे समजतात.

शासनाचे केंद्राकडून मिळणारे ३००० कोटी बुडाले

अभिजात दर्जा मिळाला की सध्या त्या भाषेसाठी केंद्र सरकारकडून सुमारे ५०० कोटी रुपये दरवर्षी मिळतात.याचा विचार केला तर राज्य शासनाने गेल्या सहा वर्षाचा विलंब केल्याने ३००० कोटी रुपये बुडवल्याचे प्रा. नरके म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रश्न केवळ पैशांचा नाही तर सन्मानाचा आहे. जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळला तर ही भाषा अधिक समृद्ध होईल. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्राकडे हा प्रश्न लावून धरतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
 
https://policenama.com/article-about-marathi-bhasha-din/

‘भाषा शिकून पोट भरतां येणार का’ - होय

कौस्तुभ दिवेगावकर- उद्या मराठी भाषा दिन आहे. माझे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मराठी साहित्य या विषयात झाले. यू॰पी॰एस॰सी॰ची परीक्षा उत्तीर्ण होताना मराठी वाड्.मय या वैकल्पिक विषयातील गुणांमुळे माझा गुणवत्तायादीतील क्रमांक उंचावला. किंबहुना ‘भाषा शिकून पोट भरतां येणार का’ या प्रश्नाचे माझ्यासाठीचे उत्तर होय असेच आहे. स्पर्धा परीक्षेची पुस्तकें मी मूळ इंग्लिश वाचून मराठीत नोटस् काढत असे. उत्तरे लिहिण्याचे माध्यम मराठी होते. मी काही दिवसांपूर्वी यशदात प्रारुप मुलाखती घेताना काही विद्यार्थी कौशल्य प्रदर्शनाच्या नादात उत्फुर्तता गमावताना दिसले. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. मी मुलाखत इंग्लिशमध्ये देत असताना मुलाखत मंडळाची परवानगी घेऊन हिंदीतही उत्तरे दिली होती. त्याचा गुणांवर कोणताही परिणाम झाला नव्हता. उलट एक प्रश्न विचारला गेला होता. “ साहित्याने माणसे घडत असती तर माणसांमाणसातील द्वेषभाव कधीच संपला असता. धार्मिक जातीय हिंसेऐवजी कबीराच्या दोह्यातील एकतेचा, प्रेमाचा संदेश सर्वांनी घेतला असतां. मग साहित्याचा उपयोग काय?”

इंग्लिशमध्ये काही सुचले नाही, मी हिंदीत सांगितले की “ माझ्या एका आवडत्या कवीच्या अरूण काळ्यांच्या एका कवितेचे सूत्र होते, हस्ताक्षर सुधारावे म्हणून कोणी लिहीत नाही. माणसे भंगारात जाऊ नये म्हणून कवी लिहितो.” भाषा समाजाशी एकरूप होण्याचे माध्यम आहे. त्यातील विविधता आपल्या बहुसांस्कृतिक विश्वाला समजून घेण्याचे माध्यम आहे. आज उत्तम मसुदा लिहिणे दुर्मिळ होत आहे. स्पर्धा परिक्षा तर आहेतच पण भाषांतरे, पत्रकारिता, जाहिराती अशा कितीतरी क्षेत्रांत बहुभाषिकांना संधी आहेत. त्यामुळे अहंकार आणि न्यूनगंड यांच्या पलिकडे जाऊन भाषेकडे पाहूयात. कुवलयमाला या प्राचीन ग्रंथात मराठी लोकांचा स्वभाव ‘शूर, अभिमानी, भांडखोर, सरळ, दिल्हे घेतले करणारा’ असा सांगीतलाय. असशील शहाणा तुझ्या घरी असे म्हणणारे पण तितकेच प्रेमळ लोक आहोत आपण! असो. बहुभाषिक बहुसांस्कृतिक आपलेपण जपुयात. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (ता.क. शुध्दलेखनाच्या चुकांसाठी क्षमस्व! प्रमाण आणि बोलीभाषा- शुध्द अशुध्दतेच्या कल्पना, स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या भाषिक प्रयोगांबद्दल नंतर कधीतरी!) 🙂-Kaustubh Diwegaonkar

Sunday, October 20, 2019

अंतर्नादच्या २५ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन -









मराठीला दिवाळी अंकांची ११० वर्षांची समृद्ध परंपरा आहे. दरवर्षी ५०० दिवाळी अंक निघत असत. औद्योगिक मंदी, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कंबरडे मोडल्याने व्यापारी व उद्योगपतींनी दिवाळी अंकांना जाहीराती देणे बंद केले किंवा आधीच्या तुलनेत ते एकदम अवघ्या २५% वर आणले. परिणामी गेल्या ५ वर्षात सुमारे २५० दिवाळी अंक बंद पडले. यावर्षी निवडणुका आणि राज्यातील काही भागात दुष्काळ तर उर्वरित भागात महापूर आल्याने आणखी बर्‍याच दिवाळी अंकांची आरेतील झाडांप्रमाणेच कत्तल होणार असे समजते.

मराठीतील सर्व दिवाळी अंकांमधले सर्वश्रेष्ठ तीन अंक निवडले तर जो दिवाळी अंक गेली २५ वर्षे पहिल्या ३ अंकांमध्ये असतोच तो म्हणजे अंतर्नाद.

भानू काळे व वर्षा काळे यांनी अतिशय मेहनतीने, निगुतीने आणि साक्षेपाने प्रकाशित केलेला हा २५ वा अंक बहुधा शेवटचाच असण्याची शक्यता आहे. यापुढे तो आजच्या स्वरूपात निघणार नाही. तथापि तो इ फॉर्ममध्ये किंवा अन्य स्वरूपात कदाचित निघेल अशी आशा आहे.

मराठीची ११० वर्षांची दिवाळी अंकांची ही परंपरा मराठी माणसांच्या भाषक अनास्थेमुळे आता लवकरच मोडीत निघण्याच्या दिशेने चाललेली आहे.

आज पुण्यात अंतर्नाद या दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रा.हरी नरके यांच्या हस्ते झाले. गेले २ दिवस पुण्यात सलग आणि धोधो पाऊस पडत असल्याने कार्यक्रमाला सभागृह रिकामेच असेल अशी भिती होती. तथापि अंतर्नादवर प्रेम करणार्‍या साहित्यिक आणि वाचकांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केलेली होती. ७०% खुर्च्या भरलेल्या होत्या. स्वत:चे भाषण नसूनही मोठमोठे साहित्यिक केवळ ऎकायला आलेले होते हा चमत्कारच होय.

अंतर्नादचा हा २५ वा दिवाळी अंक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तप्रसाद दाभोळकर होते. यावेळी व्याकरणकार यास्मिन शेख आणि विज्ञान कथाकार सुबोध जावडेकर यांचे सत्कार करण्यात आले. २३ वर्षे अंतर्नाद हे मासिक चालवून २ वर्षांपुर्वी ते बंद करावे लागले. मात्र ही २ वर्षे ते दिवाळीत प्रसिद्ध होत असे.
या कार्यक्रमाला मिलिंद बोकील, मेघना पेठे, उमा व विरूपाक्ष कुलकर्णी, राजन खान, सुहास व साधना बहुळकर, विनय हर्डीकर, अनंत सामंत, विजय पाडळकर, एम के सी एल चे विवेक सावंत, विनया खडपेकर, विलास पाटील, सनदी अधिकारी बापू करंदीकर, मिलिंद जोशी, सुधीर जोगळेकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्यानंतर चंद्रशेखर महामुनी यांचा "त्या सुरांच्या गंधकोशी" हा दर्जेदार कवितांचा, भावगीतं आणि चित्रगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

प्रा. हरी नरके, २०/१०/२०१९

Monday, June 10, 2019

गिरिश कार्नाड, विजय तेंडूलकर, ज्ञानपीठ, मराठी विनोद आणि बरंच काही



गिरिश कार्नाड यांच्या जाण्याने सगळेच हळहळत आहेत. अशावेळी त्यांच्याविषयी लिहायला काही सुचत नाही.
तरिही काही नोंदी करायला हव्यात-

१. अहमदनगरला यशवंतराव गडाख यांनी  अ.भा.मराठी साहित्य संमेलन घेतले असताना त्याला कार्नाडांना निमंत्रित केलेले होते. सन्मित्र अरूण शेवते यांच्यामुळे ते आले. त्यांचे भाषण अतिशय मौलिक होते, त्यातला एक मुद्दा महत्वाचा होता. ते म्हणाले, मराठीत श्रेष्ठ दर्जाचा विनोद आहे. त्या तोडीचा विनोद माझ्या कन्नड किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेत नाही.

२. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले, " मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद असला तरी माझ्यापेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ असलेल्या विजय तेंडूलकरांना तो मिळायला हवा होता."

मनाचा एव्हढा मोठेपणा विरळाच. त्यावेळी ज्ञानपीठ बैठकीत तेंडुलकरांचे नाव अनेकांनी लावून धरलेले असताना एका खत्रूड मराठी साहित्यिकाने विरोध केल्याने तेंडुलकरांचे नाव बाजूल ठेवले गेले होते, व कन्नड प्रतिनिधीने कार्नाड यांचे नाव सुचवताच त्याला सार्वत्रिक पाठींबा मिळालेला होता.

३. त्यांच्या तुघलक मध्ये त्यांनी राजकारणाची जी अंतस्थ उकल आहे ती बघता एव्हढे मौलिक राजकीय नाटक भारतीय नाट्यसृष्ठीला प्रथमच मिळालेले असावे. त्याचा मराठी अनुवाद विजय तेंडुलकरांनी करावा हाही एक अपुर्व योग.

लेखक, अभिनेता, तत्वज्ञ, चित्रपट कलावंत,नाटककार म्हणून असलेली त्यांची कामगिरी जागतिक पातळीवरची होती.




-प्रा.हरी नरके, १० जून २०१९

Tuesday, September 18, 2018

मराठी साहित्य संस्कृती- दर्जा-निकोपपणा

मराठी साहित्य संस्कृतीच्या दर्जाबद्दल,  निकोपपणाबद्दल सध्या फेसबुकवर चर्चा चालू आहे. त्यातनं सहज आठवलं. १९९० च्या दशकात मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा सदस्य असताना महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व व्यासंगी समीक्षक आणि मृदूभाषी असलेले प्रा. सुधीर रसाळसर होते. ते सभेचे कामकाज अतिशय उत्तम चालवायचे. बैठकीतले वातावरण कायम खेळीमेळीचे राहिल असे बघायचे.

दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी आदी साहित्य प्रवाहांचे नेतृत्व करणार्‍यां आणि महामंडळाबाहेर असलेल्यांना महामंडळात सामावून घेण्यासाठी महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करावी असा विषय मी आणला. त्याला काही प्रस्थापित दुढ्ढाचार्यांनी कडाडून विरोध केला.

रसाळसरांनी सर्वांना बोलू दिले. ते नि:पक्षपाती आणि तटस्थ होते. अतिशय मुत्सद्दीपणानं त्यांनी त्यातनं मार्ग काढला आणि घटनादुरूस्तीसाठी एक उपसमिती नेमली.
या घटनादुरूस्ती उपसमितीत ज्यांनी घटनादुरूस्तीला स्पष्ट विरोध केलेला होता त्यांनाच स्थान मिळाले हा निव्वळ योगायोग असणार.
त्या समितीत मला स्थान देण्याचा प्रश्नच त्यांच्यापुढे आला नसणार.
मला त्यांचा हा नि:पक्षपातीपणा आणि मुत्सद्दीपणा फार म्हणजे फारच आवडला.
-प्रा. हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

Saturday, August 4, 2018

मराठी भाषेची इंग्रजीतली मंगळागौर -


" मी मराठी भाषेचा शिवाजी आहे," अशी घोषणा 150 वर्षांपुर्वी पुण्यातल्या एका सनातनी शास्त्रीबुवांनी केली होती. त्यांचे मराठी इथल्या सामान्य माणसाच्या समजण्यापलिकडचे होते. त्यांनी आयुष्यभरात शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्या प्रश्नांवर ब्र शब्द उच्चारला नाही. तरिही या शास्त्रीबुवांचा जयजयकार मराठी भाषेचे शिवाजी म्हणून केला गेला.
अभ्यासक्रमातून तो लादला गेला.

शिवाजी महाराज हे रयतेचे राजे. त्यांचे अपहरण करण्याची सुरूवात इथूनच झाली.

मराठी ग्रंथांची छपाई 1806 ला सुरू झाली. ज्या महात्मा जोतीराव फुल्यांनी मराठीतले पहिले पोवाडारूपी शिवचरित्र लिहून जून 1869 ला प्रकाशित केले त्यांच्या ह्या कार्याची दखल घ्यायचे सोडा, शास्त्रीबुवांनी त्यांच्या व्याकरणात कशा चुका आहेत याचा हिशेब मांडण्यावर भर दिला. 1876 च्या भीषण दुष्काळात लाखो भारतीय मेले त्याबद्दल अवाक्षर न लिहिता शास्त्रीबुवा मराठी व्याकरणावर लेख लिहित राहिले. फुल्यांवर त्यांनी आयुष्यभर गलिच्छ टिका केली. गरळ ओकले.
विनोद म्हणजे या मराठी भाषेच्या शिवाजीने ही घोषणा चक्क इंग्रजीत केली होती. "आय एम दि शिवाजी ऑफ मराठी लॅंग्वेज"

हे आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यातले जे मराठी विचारवंत कायम सामान्य माणसांशी एकरूप झालेले होते, त्यांच्या नावे काल पुण्यात एक व्याख्यान झाले. संयोजक मराठी, वक्त्या मराठी, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यान ते मराठी, विषय मराठी भाषेचा, पण व्याख्यान सामान्य मराठी माणसांना समजू नये म्हणून इंग्रजीत!

वर्तमानपत्रांनी बातम्या देताना काय लिहावे?

म्हणे बुद्धीवंतांनी व्याख्यानाला गर्दी केली होती!

यातले 95% तथाकथित "बुद्धीवंत!" म्हणजे मराठीला कायम नाकं मुरडणारे, मूळचे मराठीच पण इंग्रजी मिडीयममधून मराठी शिकलेले, धड मराठी न येणारे, तरीही मराठीचे तज्ज्ञ म्हणून मिरवणारे.

हे लोक मराठीचे संरक्षक-अभ्यासक आहेत की "तेव्हढेच ज्ञानप्रकाशात" म्हणून चमकून घेणारे?

-प्रा. हरी नरके