Showing posts with label भिडेवाडा. Show all posts
Showing posts with label भिडेवाडा. Show all posts

Sunday, January 10, 2021

भिडेवाडा- उंटावरून शेळ्या हाकणारे सरकारी अधिकारी - प्रा. हरी नरके

 




अधिकारी- "हॅलो, मी मंत्रालयातून अमूकतमूक अधिकारी बोलतोय. मी काल तुम्हाला फोन केला होता, तुम्ही का उचलला नाही? मला भिडेवाड्यासंबंधात माहिती हवीय. अमूक ढमूक मंत्र्यांना मला त्याबाबतचा रिपोर्ट सादर करायचा आहे. कुठे आहे हा भिडेवाडा?"

मी- "पुण्यात, बुधवार पेठेत."

अधिकारी- "कोणी बांधलाय तो?"

मी- " तात्यासाहेब भिड्यांनी."

अधिकारी- "त्यांना सगळी कागदपत्रे घेऊन मला भेटायला सांगा."

मी- "ते वारले त्याला आता १७० वर्षे झाली."

अधिकारी- "मग आता कोण मालक आहेत?"

मी- "खाजगी मालकी आहे."

अधिकारी- "वाड्याची अवस्था कशीय?"

मी- " अतिशय वाईट. कुठल्याही क्षणी तो पडेल. तिथले मालक, भाडेकरू दुकानदार, निवासी भाडेकरू कोर्टात गेलेत. मुंबई हायकोर्टात ती केस गेली २० वर्षे पेंडींग आहे."

अधिकारी- "तुम्ही पार्टी आहात का?"

मी- "नाही."

अधिकारी- "मला केस नंबर व कोर्टाची सगळी कागदपत्रे पाठवा. तिथे शाळा कशावरून होती? कोणकोण वादी-प्रतिवादी आहेत त्यांचे मला फोन नंबर द्या. त्यांना मला मंत्रालयात येऊन भेटायला सांगा."

मी- " जोतीराव-सावित्रीबाईंच्या तिथल्या शाळेचे सगळे पुरावे मी कोर्टाला सादर केलेले आहेत. तुम्हाला फक्त निकाल लवकर यावा यासाठी उच्च न्यायालयाकडे शासनामार्फत पाठपुरावा करायला हवा."

अधिकारी- " तुम्ही, मला सगळे पेपर्स आणून द्या आणि वाड्याबद्दलचा रिपोर्ट तयार करून मला मंत्रालयात आणून द्या, मी तो मंत्र्यांना सादर करतो. वाड्याची एकुण जागा किती आहे? सर्व्हे नंबर किती आहे? वाड्याचे जुने व ताजे फोटो काढून मला कागदपत्रांसह २ दिवसात आणून द्या."

मी- " तुम्ही उंटावरून शेळ्या हाकण्याऎवजी जरा बूड हलवा आणि रिपोर्ट बनवा. मी तुमचा नोकर नाही. आणि मला कसले आदेश देताय? तुमच्या कर्मचार्‍यांना जरा कामाला लावा. नाहीतरी फुकटचाच पगार खातात ना ते आणि तुम्हीही?"

- प्रा. हरी नरके,

१०/०१/२०२१


Friday, January 1, 2021

#सावित्रीउत्सव भिमा कोरेगाव आणि भिडेवाडा - प्रा. हरी नरके

भिमा कोरेगाव आणि भिडेवाडा ही दोन्ही सामाजिक बंडखोरी, व्यवस्था परिवर्तन आणि सामाजिक उलथापालथ यांची प्रतिकं आहेत. देशातल्या पोलादी सनातनी व्यवस्थेला सुरूंग लावणार्‍या ह्या दोन्ही मुलुखमैदान तोफा. भिमा कोरेगाव आता सामाजिक अस्मितेचं प्रतिक बनल्यानं १ जानेवारीला लाखोंना तिथं जाऊन अभिवादन करावसं वाटतं, पण त्याहीपेक्षा खोलवरचं, चौफेर आणि मुलगामी परिवर्तन घडवणार्‍या भिडेवाड्याकडे मात्र आमचं तेव्हढं लक्ष जात नाही. पेशवाई हा प्रस्थापित व्यवस्थेचा किल्ला होता. तिला समग्रपणे मातीत घालण्याचं काम या दोघांनीही केलं असलं तरी जास्त परिणामकारकता नेमकी कशात होती? भिडेवाड्यात की भिमा कोरेगावात? प्रस्थापित फार चतुर असतं. ते कलागती लावून देतं. दिखाऊ किंवा कमी परिणामकारकतेत आम्हाला गुंतवून ठेवतं असं तुम्हाला वाटत नाही? भिमा कोरेगावची लढाई केवळ नागवंशी विरूद्ध पेशवे अशी होती की बारा बलुतेदार, अलुतेदार, कारू, नारू, बहुजन, वंचित, अल्पसंख्यक विरूद्ध प्रस्थापित व्यवस्था अशी होती? तरिही त्यात स्त्रिया नव्हत्या. पण भिडेवाड्यात लिंगभावपिडीत, जातपिडीत, वर्गपिडीत असे सारे सारे होते, ज्ञाननिर्मितीनं केलेलं काम प्रस्थापितांचं कंबरडं मोडणारं होतं. आम्हाला आमचा फोकस शिफ्ट करावा लागेल काय? विचार करा. (लंडनचे मित्रवर्य प्रताप तांबे Pratap Tambay यांच्या कमेंटवरून )  

-प्रा. हरी नरके


Tuesday, January 1, 2019

भिडेवाडा दुर्लक्षित का?







स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके

शनिवारवाडा, लालमहाल, विश्रामबागवाडा अशा ऎतिहासिक स्थळांचा विकास झाला, स्मारके झाली, मग स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक असलेल्या भिडेवाड्याकडे दुर्लक्ष का? हा वाडा कोणत्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीत आहे. गेल्या १३ वर्षात स्मारकाच्या घोषणा अनेकदा झाल्या. बैठका, चर्चा रंगल्या. मोर्चे झाले.तरिही वाड्याचे जतन का होत नाहीये?
हे स्मारक कोणाला नकोय?
वाड्यातले भाडेकरू, दुकानदार, बॅंक,स्थानिक लोकप्रतिनिधी, पुण्याचे आजीमाजी कारभारी यांना हा वाडा नष्ट करण्यात रस का आहे?
पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २१ फेब्रुवारी २००६ ला भिडेवाड्याचे स्मारक करण्याचा एकमताने ठराव झाला.

वाडा शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया ५ जून २००८ ला सुरू झाली. स्मारकाला विरोध असलेले भाडेकरू, दुकानदार, बॅंक ८ डिसेंबर २०१० ला मुंबई उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने भूसंपादनाच्या कामाला स्थगिती दिली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी व पुण्याचे आजीमाजी कारभारी यांचे आर्थिक हितसंबंध ह्या वाड्यात गुंतलेले असल्याने मनपा आणि राज्य सरकारचे वकील,न्यायालयात अनेकदा गैरहजर राहिले. मनपा अधिकार्‍यांना बिल्डरने खिश्यात घातल्याने ते इथे सावित्रीबाईंची मुलींची पहिली शाळा नव्हतीच अशी पोपटपंची करु लागले. आर्थिक प्रलोभन, राजकीय संगनमत आणि जनतेची उदासिनता यामुळे गेली ८ वर्षे एकही पाऊल पुढे सरकलेले नाही.
शाळेचे समकालीन दस्तावेजांमधील असंख्य पुरावे सादर करूनही ते वारंवार गहाळ केले जातात.
शाळा नसल्याचेच ढोल सगळे मिळून वाजऊ लागतात.

जोतीराव,सावित्रीबाई, भिडे,चिपळूणकर, गोवंडे, जोशी, भवाळकर,म्हस्के, शिंदे,लहुजी वस्ताद,राणबा महार,धुराजी चांभार, गणू मांग,फातिमा आणि उस्मान शेख असे उच्च वर्णीय, बहुजन,दलित, अल्पसंख्यांक एकत्र येऊन १७० वर्षांपुर्वी
एक ऎतिहासिक काम सुरू करतात. देशातली मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू होते. स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे संस्कारकेंद्र उभे राहते.ज्ञानार्जनाचे, ज्ञाननिर्मितीचे उर्जाकेंद्र साकारले जाते.

आज पुणे हे देशातले सर्वात मोठे आणि प्रगत शैक्षणिक शहर आहे.इथे शेकडो महाविद्यालये व डझनांनी विद्यापिठे आहेत.
स्त्री,बहुजन,दलित चळवळीचे हे शहर म्हणजे मोहळ आहे. मग तरिही लिप सर्व्हीस वगळता काहीच का घडत नाही?
कोणाच कारभार्‍याला हा वाडा टिकवावा असे का वाटत नाही?
-प्रा.हरी नरके, १ जानेवारी २०१९