Showing posts with label लढाई. Show all posts
Showing posts with label लढाई. Show all posts

Monday, March 9, 2020

१२४ वा स्मृतीदिन - शहीद सावित्रीबाईंची शौर्यगाथा - प्रा. हरी नरके






१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे...........




जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्शक शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता

मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला अपघाती निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड

१८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. मुंबईत यावर्षी झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीत जीव धोक्यात घालून सावित्रीबाईंनी शांतता प्रस्थापनेचे काम केले. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.

* २५ डिसेंबर १८७३ रोजी झालेल्या सत्यशोधक विवाहाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले.

* १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंची होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली.
त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले.

* १८७२ ते १८७६ याकाळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. जगवली. स्वत: स्वयंपाक करून त्यांना जेऊखाऊ घातलं.

* ब्राह्मण विधवांचे केशवपन करू नये म्हणून नाभिक समाजाला संघटित करून त्यांचे प्रबोधन करून विधवांचे केशवपन, मुंडन करणार नाही यासाठी त्यांचा संप घडवून आणला.

जोतिरावांच्या मृत्यूनंतर स्वत: सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. आधुनिक भारताच्या इतिहासातली अशी ही बहुधा पहिलीच घटना असावी.

सावित्रीबाई निव्वळ शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री आणि शिक्षणतज्ञही होत्या. त्यांचा काव्यफुले हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. त्यात पर्यावरण जागृती, शिक्षणाचे महत्व,
निसर्ग आणि माणसाचे नाते, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, स्त्रीपुरूष समता अशा विषयांवरच्या मौलिक कविता आहेत.

त्यांनी श्रमाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणारे कृतीशील शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षणातला गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाय सुचवले व ते अंमलात आणले.

स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, संवाद, वादविवाद, चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. आधुनिक भारताचा स्त्रीपुरूष समतेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात त्यांनी केली.
आजच्या स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्यांना उर्जा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या जीवनकार्यातून होत असते.

- प्रा. हरी नरके, १ मार्च, २०२०

संदर्भ-
प्रा. हरी नरके, सावित्रीबाई फुले चरित्र, नागानालंदा प्रकाशन, इस्लामपूर, २००५
प्रा.हरी नरके, [ संपा.] सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले गौरवग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८



[लेखक सावित्रीबाईंचे चरित्रकार असून त्यांनी महात्मा फुले समग्र वाड्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय यांचे संपादन केलेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख व प्राध्यापक राहिले असून त्यांनी राज्य शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ समितीचे सचिव म्हणून [१९९० ते २०१८] काम केलेले आहे.]







Thursday, January 17, 2019

Girls of the Sun सर्वोत्कृष्ठ चित्रपट








पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इव्हा हुसेनचा Girls of the Sun सर्वोत्कृष्ठ चित्रपट
श्रेष्ठ चित्रभाषेद्वारे Women, Life, Liberty चा कलात्मक वेध- प्रा.हरी नरके

जागतिक पातळीवरील महत्वाच्या महिला दिग्दर्शक इव्हा हुसेन यांच्या Girls of the Sun या चित्रपटाने सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. अतिरेक्यांच्या तावडीतून कुर्दीस्तानातील आपले गाव मुक्त करण्यासाठी लढणार्‍या कमांडर बहार या विरांगनेची आणि तिच्या महिला सहकार्‍यांची जबरदस्त लढत टिपणारा हा चित्रपट म्हणजे श्रेष्ठ चित्रभाषेद्वारे Women, Life, Liberty चा घेतलेला अस्सल कलात्मक अनुभव होय.

फ्रेंच पत्रकार Mathilde च्या नजरेतून प्रेक्षकांपुढे हा पट उलगडत जातो. कमांडर बहार जिचा पती अतिरेक्यांकडून मारला गेलेला आहे, जिचा लहानगा मुलगा अतिरेक्यांच्या कब्ज्यात आहे अशा स्थितीत ही उच्चशिक्षित युवती शस्त्र हाती घेते. स्त्रियांमध्ये मनोबल निर्माण करते. स्वातंत्र्याच्या शोधात निघालेली ही फौज निव्वळ आशावादाच्या जोरावर कशी आणि किती झेप घेते त्याचा हेलपाटून टाकणारा हा अनुभव म्हणजे स्वातंत्र्याच्या वैश्विक मूल्याचे महाकाव्यच होय.

श्रेष्ठ कथा,पटकथा, बहार [Golshifteh Farahani] आणि  पत्रकार Mathilde [ Emmanuelle Bercot] यांचा दर्जेदार अभिनय, जिवंत छायाचित्रण, हटके एडिटिंग आणि उच्च पातळीवरील दिग्दर्शनाचा अनुभव घ्यायचा असेल तर खिळवून ठेवणारा आणि अस्वस्थ करणारा हा चित्रपट चुकवू नका.


Girls of the Sun 2018 (Official) movie trailer
Original Name: Les Filles Du Soleil
English Name: Girls Of The Sun
Year: 2018
Run time: 115'
Language: French, English, Arabic, Kurdish
Type (Colour/ Black & white): Colour
Country: France
Director: Eva Husson
Producer: Didar Domehri
Cast: Golshifteh Farahani, Emmanuelle Bercot
Screenplay: Eva Husson
Cinematographer: Mattias Troelstrup
Editor: Emilie Orsini
Sound Designer: Olivier Le Vacon, Alexis Place, Emmanuel de Boissieu
Music Composer: Morgan Kibby
Costume Designer: Marine Galliano
Production Designer: David Bersanetti
Production Company: Maneki Films


Festivals:
Cannes IFF 2018
TIFF 2018
BFI London FF 2018
Selected Filmography:
Hope to Die (short) 2004
Those for Whom It’s Always Complicated 2013
Bang Gang (A Modern Love Story) 2015

Director's Biography:
Eva Husson was born and raised in France. She began working as an actress in theatre, and films at very young age. She went to prestigious American Film Institute where she received MFA. Her thesis short film Hope to Die went on to get screening at many festivals across the globe. Her second short was Those for Whom It’s Always Complicated. She directed her debut feature Bang Gang (A Modern Love Story) in 2015. Her recent film Girls Of The Sun was selected to compete for Palm d'Or.

प्रा.हरी नरके, १७ जाने. २०१९

Tuesday, August 14, 2018

कारगिल हिरो जाकीर हुसेन नाईक-

" अल्ला हो अकबर " या मेजर अजितसिंगच्या पहिल्या आरोळीला सर्व भारतीय सैनिकांनी प्रतिसाद दिला. "अल्ला हो अकबर, अल्ला हो अकबर," च्या निनादाने कारगिलचा सारा परिसर दणाणून गेला होता. ग्रेनेडिअरचे जवान आपल्या संगिनी काढून पाकीस्तानी सैनिकांवर तुटून पडले होते. शत्रूवर प्राणघाती वार करून त्यांचा खातमा करण्यात ते गढले असतानाच 1/11 जी. आर. ची गुरखा कंपनीही या मोर्चाजवळ पोहोचली होती.

"आयो गुरखाली," चे पडसाद "अल्ला हो अकबर" मध्ये मिसळून गेले.

भारताचा जो टायगर हिल पाकच्या ताब्यात गेलेला होता तो पॉइंट 5250 कब्ज्यात घेऊन पहाट फुटायच्या आत भारतीय सैन्याने कारगीलची हरलेली लढाई जिंकलेली होती.

पराभवाचे यशात रूपांतर घडवून आणण्यात येथे मुख्यत्वेकरून दोन घटक कारणीभूत झाले. पहिला दुर्दम्य आशावाद. भारतीय जवान जाकीर हुसेन नाईक हे त्याचे प्रातिनिधिक रूप. दुसरा म्हणजे युद्धशास्त्रातला पहिल्या दहा मुलतत्वांपैकी एक असलेला नियम "विस्मय" ["सरप्राईज"] चा परिणामकारक वापर.

प्रतिकूल परिस्थितीत बुद्धीच्या जोरावर पाक सैनिकांना आचंबित करणारा हा देशभक्त भारतीय जवान होता जाकीर हुसेन नाईक.

22 ग्रेनेडिअरची भारतीय कंपनी संपूर्णपणे मुसलमान जवानांची होती. त्यांचे नेते होते मेजर अजितसिंग. किर्र अंधारात रात्री नऊ वाजता भारताने पाकवर चढाई केली. प्राण पणाला लावून शत्रूशी लढणारे दहा भारतीय जवान दोन तासात शहीद झाले होते. अठरा गंभीररित्या जखमी झालेले होते. काहीतर जबर जखमी झालेले होते. भारताचा संपुर्ण पराभव झालेला होता.

तथापि या पराभवाने न खचता मेजर अजितसिंगांनी टॅक्टीकल माघार घेतली होती. डोंगराच्या एका कड्याखाली त्यांनी आसरा घेतला. जखमी सैनिकांवर औषधोपचार चालू होते. 27 वर्षे वयाचा एक तरणाबांड जखमी जवान सरपटत त्यांच्याजवळ आला.
" साब, आपकी अनुमती हो तो और एक कोशीश करते हैं. खुदा रहमतगार हैं. आलातालाकी दुवा होगी तो हमारी जरूर फतेह होगी."

मेजर अजितसिंग यांच्या गंभीर जखमा ठणकत होत्या. ते थकलेले होते. पुन्हा हल्ला करण्याच्या मनस्थितीत ते अजिबात नव्हते.

पण जाकीरची आयडिया डोकेबाज होती. गनिमी कावा.
रिस्क घ्यायला हरकत नव्हती. बिनबोभाट, गनिमी काव्याने पाकवर अचानक हल्ला करायचा. शत्रूला चकित करून सोडायचे. त्याला काही कळायच्या आत शत्रू खतम करायचा.

"साब, मै ऎसे वापस इंडीया नही जाऊंगा. करेंगे या मरेंगे. जितकरही अपने मुल्कमें जायेंगे साब. नही तो यही मर मिटॆंगे मेजरसाब."

जाकीर हुसेन निर्वाणीचं बोलत - सांगत होता.

रात्रीचे दोन वाजलेले होते. फार विचार करायला वेळ नव्हता. पहाट झाली असती, झुंजूमुंजू झालं असतं नी पाक सैनिकांना अजितसिंगची कंपनी दिसली असती. गोळीबारात, तोफगोळ्यांच्या मार्‍यात सगळेच ठार झले असते.

रेडीओ सेटवरून त्यांनी 1/11 जी. आर. कंपनीच्या कमांडरला आपली योजना सांकेतिक भाषेत सांगितली. "आम्ही पुढे जातोय, मागे या."
यापेक्षा जास्त बोलण्यात धोका होता. गौप्यस्फोट झाला असता. शत्रू जागा झाला असता. पुन्हा पराभव पदरी पडला असता. भारत पुन्हा हरला असता.
भरभर हुकुम सुटू लागले. आदेशाबरहुकुम जवानांनी कुच केली. सर्वात पुढे होता जाकीर हुसेन नाईक.

पाक सैनिक गाफिल होते. विजयाची पार्टी करीत होते. त्यांची जित झालेली होती.
इतक्यात कुणीतरी येत असल्याची त्यांना चाहूल लागली.
पाकीस्तानी कमांडरने अंदाज बांधला आपलीच कुमत येत असणार! रसद रात्रीच येत असे. भारतीय जवानांना आपलेच समजून पाक जवानांनी चक्क त्यांचा हात धरून वर उचलून घेतले होते.

"अल्ला हो अकबर, अल्ला हो अकबर," च्या निनादाने पाक छावणीचा परिसर दणाणून गेलेला होता. संपुर्ण छावणी आता भारताच्या ताब्यात आलेली होती.

आणि भारताने कारगिल
युद्ध जिंकलेले होते. या विजयाच्या शिलेदाराला, ह्या सच्चा मुसलमान असलेल्या जवान जाकीर हुसेन नाईकला देशभक्त म्हणायचे की नाही?
तुम्हाला काय वाटतं?

[ पाहा- डोमेल ते कारगिल, लेखक मेजर जनरल [नि.] शशिकांत पित्रे, राजहंस प्रकाशन, पुणे, चौथी आवृत्ती, 2013, पृ. 244/45 ]

-प्रा.हरी नरके