Showing posts with label शिवराय. Show all posts
Showing posts with label शिवराय. Show all posts

Wednesday, May 6, 2020

रा.स्व.संघ २२/ " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : शिवाजी महाराज








शिवाजी महाराज म्हणतात, " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : प्रा.हरी नरके
"जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." छ. शिवराय

संघवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रेशीमबागेच्या रंगात पुरते बुडवून टाकलेले आहे. त्यांचे पार ब्राह्मणीकरण करून टाकलेले आहे. ही महाराजांची बदनमी आहे. महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजलखानाच्या ब्राह्मण वकीलाची हत्त्या कशी केली? महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर जिवाजी विनायक सुभेदार या ब्राह्मण कारकुनाला गद्दारीबद्दल महाराजांनी शिक्षा कशी केली? ब्राहमण म्हणून कोणतीही गय केली जाणार नाही, सवलत मिळणार नाही असे त्याला ठणकावणारे महाराजांचे हे अस्सल पत्र संघवाले का दडवून ठेवतात?

ब्राह्मणाची गय केली जाणार नाही-

पत्र १८ जानेवारी १६७५ चे आहे. अतिशय जळजळीत आणि कठोर आहे. महाराज या ब्राह्मण कारकुनाला नादान म्हणतात. "गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे" या ब्राह्मणाला "हरामखोर" अशी चक्क शिवी देतात. लाचखोरही म्हणतात. तुमच्यासारख्या लाच खाणारांना "ठिकेठाक" केले जाईल असा सज्जड दम भरतात. महाराज या पत्रात म्हणतात, " ऎशा चाकरास ठीकेठाक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?.. याउपरी बोभाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनीम जालेस, ऎसे जाणून बरा नतिजा तुम्हास पावेल. ताकीद असे." महाराज जर गोब्राहमण प्रतिपालक असते तर म्हणाले असते, " ब्राहमणदेवता, आपण शत्रूचे पैसे खाल्लेत, आमच्याशी गद्दारी केलीत, हरकत नाही, आम्ही आपले धर्माचे चाकर आहोत. आपण आमचे मालक. तेव्हा आपले उत्तम चालूय. असेच पुढे चालू द्या."

ब्राह्मण असलात तरी गर्दन मारली जाईल- 

पण महाराज तर या ब्राह्मणाला चक्क धमकी देतात. बघून घेऊ म्हणतात. ब्राह्मणाला आपला चाकरही म्हणतात, हे कसे काय? बरे इथे ठीकेठाक केले जाईल म्हणजे गर्दन मारली जाईल असे महाराज सांगताहेत! धर्मशास्त्रानुसार ब्रह्महत्त्या वर्ज्य असतानाही महाराज चक्क ब्रह्महत्त्येची धमकी कशी काय देतात? त्याकाळातले काही ब्राह्मण लाचखोर होते, स्वराज्याशी गद्दारी करणारे होते याचे हे पत्र हा खणखणीत पुरावाच आहे. म्हणून तर दडवादडवी चाललेली नाही ना?

एक श्लेष काढायचा तर असे म्हणता येईल की समाजात तोवर ब्राह्मणांना विशेषाधिकार असल्याने ब्राह्मणांच्या लाचखोरीकडे, गद्दारीकडे कानाडोळा केला जात असेल. तसा मुलाहिजा [तशी सवलत ] यापुढे बंद करण्यात आलेली आहे असे महाराज या पत्रांद्वारे सुनावताहेत. मग महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी ब्राह्मणांची ही पुर्वापार चालत आलेली ही सवलत तडकाफडकी बंद कशी काय केली बुवा? दया, कुछ तो गडबड है!

" धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगणे म्हणजे ईश्वरी आज्ञेचा भंग करणे होय." - छ. शिवराय 

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. 




"हिंदवी स्वराज्य"वाली पत्रे बनावट-

महान इतिहासकार द. वि. आपटे, त्र्यं. शं. शेजवलकर आणि ग. ह. खरे यांच्या मते, ज्या पत्रांमध्ये "हिंदवी स्वराज्य" हे शिवाजीराजांचे ध्येय होते असे म्हटलेले आहे ती पत्रे विश्वासार्ह नाहीत. [ पगडी, २६] याचाच अर्थ ती पत्रे बनावट आहेत.

राज्य आणि स्वराज्य या शब्दांचे जे अर्थ आज घेतले जातात, त्याकाळात ते शब्द खूप संकुचित अर्थाने वापरले जात असत. १७ जुलै १६५७ ला चाकणच्या पुजार्‍याला दिलेल्या इनामपत्रात शिवाजीराजे आपल्या जहागिरीला राज्य म्हणतात. १६६० पर्यंत त्यांच्या ताब्यातील प्रदेश म्हणजे " मोकासा " म्हणजे देणगी मिळालेली जहागिर असाच होता.[ पगडी, २७]


जहाल धर्मांध आणि वंशवादी औरंगजेब- तो हिंदुमुस्लीम अशा सर्व भारतीयांचा द्वेश करी-

याचा अर्थ आजच्या अर्थाने राजे धर्मनिरपेक्ष होते असेही नाही. ते धर्माने हिंदू होते. हिंदू जीवनपद्धतीत वाढलेले होते. धर्मांध औरंगजेबाची वर्तणूक त्यांना अमान्य होती. औरंगजेब वंशवादी होता.

त्याला त्याच्या तुरेनियन वंशाचा गर्व होता. त्याच्या नजरेत सर्वच हिंदुस्थानी म्हणजे हिंदू आ्णि मुस्लमान दोघेही तिरस्करणीय होते. तो त्यांचा द्वेश करीत असे. याच्या उलट शिवराय धर्मवेडे नव्हते. ते धर्माचे पालन करणारे, धर्माने सांगितलेले पुजाविधी करणारे राजे होते. त्यांचा संघर्ष राजकीय होता. त्यामुळे धार्मिक अवडंबरापासून राजे दूर राहिले.

दुर्दैवाने त्यांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांचा हा संघर्ष धर्मवादी नजरेने पाहिला. पक्षपाती पद्धतीने रेखाटला. परमानंदाने तर त्यांना परमेश्वराचा अवतारच बनवून टाकले. अर्थातच राजांच्या विरोधकांचे चित्रण त्याने राक्षस असे केले. या परमानंदाचे आजचे सगळे संघीय वारसदार महाराजांचा संघर्ष हा हिंदुमुस्लीम धर्माचा संघर्ष म्हणून रंगवतात. त्यात सगळ्या मुस्लीमांच्या वागण्याला ते अतिरंजित स्वरूपात अत्याचार म्हणून पेश करतात.

बाबा याकुत यांच्या आशिर्वादासाठी राजांची धडपड -

पण ते विसरतात की, राजे सहिष्णू होते. विविध धर्म आणि पंथांबद्दल त्यांना मनापासून आदर होता. इस्लामी धर्मग्रंथ आणि मशिदी, पिरांची ठाणी यांच्याशी ते सन्मानाने वागत. बाबा याकुत यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी राजे सदैव धडपड करीत. [पगडी, ३२]

छ. शिवराय औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." [ पगडी, १२ ]

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. [ पगडी, ११ ]

असहिष्णुतेमुळे विनाश -

कितीही मोठी असली तरी माणसं आणि संस्था यांचा असहिष्णुतेमुळे विनाश होतो असेही शिवाजीराजे औरंगजेबाला लिहितात. विभिन्न जाती आणि धर्म यांच्याबद्दल सहिष्णुता अवलंबिली तरच मनुष्य जातीला शांतता आणि सुबत्ता लाभेल अशीही ताकीद शिवराय औरंगजेबाला देतात. [ पगडी, १२ ] अशा शिवरायांना स्वार्थासाठी संघाने कडवे हिंदुत्ववादी बनवून टाकलेय.

कवी परमानंद संघाला सोयीचे-

शिवरायांच्या समकालीन लेखकांमध्ये संस्कृत कवी परमानंद, जयराम, हिंदी कवी भूषण, मराठी बखरकार सभासद यांनी शिवाजी राजे हिंदुंचे कैवारी असल्याचे चित्र रंगवले त्याचे कारण त्यांच्यावर [ या चरित्रकारांवर ] असलेला पौराणिक कथांचा पगडा होय.

समकालीन पर्शियन बखरकार मुहम्मद कासीम आणि मुस्तेखान तसेच दखनी लेखक नुसरती यांनी महाराजांचे वर्णन नेमके उलटे केलेय.

युरोपियन लेखक आधी महाराजांना बंडखोर ठरवतात, मात्र त्यांची सरशी होऊ लागताच त्यांचे वर्णन उमदा युवराज असे करतात.

शिवराय हिंदूंचे कैवारी होते नी ते मुस्लीमवर्चस्वाविरूद्ध लढत होते ही मांडणी टोकाची, अतिरेकी असल्याचे सेतुमाधवराव पगडी आपल्या ग्रंथात पुराव्यानिशी दाखवून देतात. [ पगडी, १३] पगडी जरी संघाचे नाव घेत नसले तरी त्यांना संघच अभिप्रेत आहे हे स्पष्ट दिसते.

संघपरिवाराचा सततचा आंधळा आणि रक्ताळलेल्या असहिष्णुतेचा त्वेष त्यांनी मुत्सद्दी राजकारणी असलेल्या शिवरायांवर शेंदरासारखा लेपून टाकलाय. हा शेंदूर खरवडायला हवा. तेव्हाच महाराजांचे खरे रूप दिसू शकेल. हे काम धर्माचे चष्मे नसलेल्या सत्यशोधकांनाच करावे लागेल.
क्रमश:....

प्रा. हरी नरके, ७/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: १. सेतुमाधवराव पगडी, छत्रपती शिवाजी, काँन्टीनेंटल प्रकाशन, पुणे, २०१९, पृ. ११, १२, १३, २६, २७,
२. दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २६४/६५

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR3iGVCMJEhRtiAUu2-k_xFSJAUkHd_IcieJC_nmxlHjCCU3KBdfHUl67dU

रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?








रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके

बहुजनांचे महापुरूष पळवायचे, त्यांचे दैवतीकरण करायचे आणि त्यांना स्वत:च्या कब्ज्यात ठेवायचे, आपल्या फायद्यासाठी हत्त्यार म्हणून वापरायचे ही रा. स्व. संघाची कपटनिती आहे. महाराजांचा जन्म १६३० चा. शिवराय १६८० ला गेले. त्यांचा जीवनकाळ ५० वर्षांचा होता. या ३९० वर्षातली २६० वर्षे या मंडळींना शिवरायांची साधी आठवणसुद्धा का आली नाही? या मंडळींचे शिवरायांबद्दलचे प्रेम पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे अचानकच का उद्भवले? गेल्या ५०/६० वर्षातच ते उतू का जाऊ लागले? संघाचे छ. शिवराय "गोब्राह्मण प्रतिपालक" का? "कुळवाडीभूषण" का नाहीत? ते मुस्लीमद्वेष्टेच का? संघाने महाराजांना अवतारी पुरूष का बनवलेय? संघाचे मनोहर भिडे त्यांचा उल्लेख "शिवप्रभू" असा का करतात? ३२ मण सोन्याचे सिंहासन, खडा पहारा या नावाखाली हजार बाराशे कोटी रूपयांचा " एमबी [मनोहर भिडे] केयर्स फंड" त्यांना का जमवायचा आहे? रायगडावर त्यांना कब्जा का मिळवायचा आहे? यामागे मराठा तरूणांना संमोहित करण्याचा कोणता कट, कोणती कपटनिती आहे?

देवाचे पेटंट भटजीचे- ही तर रोजगार हमी-
यांचे एक वचन आहे. " देव मंत्राधीन आहेत. म्हणजे आधी दगडाची किंवा शाडूची साधी मुर्ती असते. तिच्यात मंत्राद्वारे भटजी प्राण निर्माण करतो. विसर्जनाआधी ते पुन्हा काढून घेतो. मंत्र भटजीच्या ताब्यात असतात. अंतिमत: देवांवर मालकी कोणाची असते तर भटजीची." म्हणून प्रत्येक महापुरूषाचा यांना देव करायचा असतो. त्याचा देव झाला की त्याचे पेटंट यांच्या नावे जमा होते. त्याची रॉयल्टी पिढ्यानुपिढ्या यांना मिळते. म्हणजे मानवनिर्मित देव ही यांची हजारो वर्षांची रोजगार हमी योजना आहे तर!

जातपात नाही मानत मग दलित शंकराचार्य का नाही? दलित सरसंघचालक का नाही?

एरवी बहुजनांच्या आरक्षणाला प्राणपणाने विरोध करणारे हे लोक भटजीची नियुक्ती मात्र जन्माच्या आरक्षणाद्वारे करण्याबद्दल आग्रही असतात. तिथे का गुणवत्तेवर नियुक्त्या नको असतात? या एकाच जातीला दिलेल्या १०० टक्के आरक्षणाबद्दल सगळेच गप्प कसे असतात? तिथे का सगळ्या हिंदुंना प्रवेश नाही? आजपर्यंत एकही ब्राह्मणेतर शंकराचार्य का झाला नाही? संघ जातपात मानत नाही तर आजपर्यंत किती सरसंघचालक अनुसुचित जातींचे झालेत? किमान एक तरी शूद्र या पदावर का बसला नाही? आजही संघाच्या पहिल्या श्रेणीच्या श्रेष्ठींमध्ये एकही शूद्र किंवा अतिशूद्र का नाही?

भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा, म्हणून मुस्लीमद्वेश-
हिंदु संघटन करायचे तर भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा. यांनी मुस्लीमांना शत्रू ठरवले. सतत मुस्लिम समाजाचा द्वेश करीत बोलायचे. लिहायचे. वागायचे. मुस्लीमद्वेश वगळला तर संघ संपला.
यांचे शिवराय कट्टर मुस्लीमद्वेष्टेच का? याचे उत्तर यात आहे. भारतीय संस्कृती ही मुलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे गंगा आणि यमुना या दोघींच्या एकत्रित पाण्यावर पोसलेली. या देशात हिंदु राजे महाराजे व मुस्लीम नबाब, सुलतान यात संघर्ष झाले, हे खरे आहे. पण ते धर्माचे नव्हे तर सत्तेचे संघर्ष होते. इथली सामान्य हिंदुमुस्लीम जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. गावोगावी हिंदुलोक मुस्लीम पिरांच्या यात्रा करीत होते. पिराच्या पुजा करीत होते. कोकणात मुस्लीम लिगची स्थापना झाली तर ती गावच्या मारूतीला नारळ फोडून. [ संदर्भ- हमीद दलवाई]

सत्तेसाठी झालेल्या लढाया या धार्मिक लढाया नव्हत्या. म्हणून इंग्रजी राज्य यायच्याआधी या देशात कधीही हिंदुमुस्लीम जातीय दंगली झाल्या नाहीत. १८५७ चे स्वातंत्र्यसमर ते दोघे एकत्रितपणे लढले. इंग्रजांनी त्यांच्यात पद्धतशीरपणे फूट पाडली म्हणून आठशे वर्षांच्या इतिहासात ११ ऑगष्ट १८९३ ला भारतातली पहिली हिंदुमुस्लीम दंगल झाली. पुढे मुस्लीम लिगने घडवलेल्या दंगली व पाकीस्तानची निर्मिती यातनं कटुता वाढत गेली. पाकच्या कारवायांनी तर आता ही कटुता, द्वेशभावना, आकसभावना गु्णाकाराच्या वेगाने वाढते आहे.

गंगाजमुना तहजीब-

इथले संगित, खाणेपिणे, कपडेलत्ते, भाषा, साहित्य, कला, विद्या या सार्‍यांमध्ये सरमिसळ आहे. अगदी रक्तातसुद्धा. भांडारकर नावाच्या शास्त्रज्ञांनी १०० वर्षांपुर्वीच हे सिद्ध केलेले आहे की शुद्ध रक्त नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. हजारो, लाखो वर्षांच्या मानवी प्रवासात सगळ्यांचे रक्त एकमेकात मिसळलेले आहे. शुद्ध रक्ताच्या निव्वळ थापा आहेत.

एक हिंदू व दोन मुस्लीम सत्ता मिळून मुघलांशी का लढत होते?
आज महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे सरकार अस्तित्वात येण्यामागे ज्या पत्राचे सुत्र आहे, तिकडे आपले लक्ष वेधतो. पत्र शिवाजी राजांचे आहे. मार्च १६७७ मधले आहे. राज्याभिषेकानंतरच्या राजकारणावरचे आहे. मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेले आहे. महाराज पत्रात म्हणतात, "संप्रती राजकारण वर्तमान म्हणजे, दक्षिणेचे पातशहा तीन.निजामशाह, आदिलशहा, कुतुबशाहा. त्यातली निजामशाही बुडाली... पठाण [दिल्लीकर मुघल] बळावला म्हणजे एका उपरी एक दक्षिणीयांची घरे बुडविल. कोणास तगो देणार नाही. ऎसे आम्ही समजोन कुतुबशहा यांसी पहिलेपासून रूजुवात राखिली होती... आम्ही त्यांच्या भेटीस गेलो. या भेटीत असे ठरले की, "आपली पादशाही जितकी वाढवू तितकी वाढवणे. पठाणाची नेस्तनाबूत करणे. दक्षिणेची पादशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे."

शिवाजी महाराजांचे हे पत्र हा सज्जड पुरावा आहे की लढाई हिंदुमुस्लीम अशी नव्हती. १ हिंदू आणि २ मुस्लीम सत्ताधिश एकत्र मिळून मुस्लीम असलेल्या मोगलांशी लढत होते. कारण लढाई धर्माची नाही तर सत्तेची होती.
क्रमश:....

प्रा.हरी नरके, ६/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २७१

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1wyrOJM-Z-vA7dsV47JiWtcD0MoB4SNG4ykT0bG9U1akS6hQtPCgm-Ybg

Tuesday, April 7, 2020

आद्य शिवचरित्रकार : महात्मा जोतीराव फुले- प्रा. हरी नरके





११ एप्रिल २०२० रोजी महात्मा जोतीराव फुले यांची १९३ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपुर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. अशावेळी शिवाजी महाराजांवरचं पहिलं मराठी पुस्तक महात्मा फुल्यांनी लिहिलं. १८०६ सालापासून मराठी [ देवनागरी ] छापखाना सुरू झाला.

१८०६ साली विल्यम कॅरेचं पहिलं मराठी पुस्तक छापण्यात आलं. [ ग्रामर ऑफ मराठा लॅण्गवेज, grammar of maratha language ] तेव्हापासूनचा इतिहास शोधून पाहा. मराठीतलं शिवरायांबद्दलचं पहिलं पुस्तक जोतीरावांचं आहे. जून १८६९ मध्ये ते प्रसिद्ध झाले.

मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक मुंबईत काळबादेवीला वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तर पुण्यात स्वत: जोतीरावांच्या वेताळ पेठेतील [ नंतरची गंज पेठ व सध्याची महात्मा फुले पेठ ] पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवलेले होते. त्याची किंमत अवघी सहा आणे ठेवण्यात आलेली होती. हे पुस्तक जोतीरावांनी परमहंस सभेचे अध्यक्ष दिवंगत रामचंद्र बाबाजी राणे यांना अर्पण केले होते. शिवराय एव्हढे मोठे होते की ते अमक्याएव्हढे मोठे होते अशी इतर कोणाची त्यांना उपमा द्यायची असेल तर दुसरी व्यक्तीच उपमेला समोर दिसत नाही इतके महाराज मोठे होते, असे फुले या पोवाड्यात सांगतात. छत्रपतींचे जीवन व कार्य याविषयी भरभरून आदर व्यक्त करून तेच आपली कार्यप्रेरणा आहेत असेही जोतीराव सांगतात. सुमारे एक हजार ओळींचा हा प्रदीर्घ पोवाडा आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या व मी संपादीत केलेल्या महात्मा फुले समग्र वाड्मयात तसेच इंटरनेटवरही हा पोवाडा उपलब्ध आहे. [ लिंक खाली दिली आहे.]

सदर पुस्तकाच्या लेखनासाठी आपले ब्राह्मण बालमित्र भांडारकर यांनी आपल्याला सहकार्य केले अशी कृतज्ञतापुर्वक नोंद जोतीरावांनी प्रस्तावनेत आवर्जून केलेली आहे. " ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी जोती म्हणे!"   हेच तर त्यांचे ब्रीद होते. हे शिवचरित्र लिहिण्यासाठी जोतीरावांनी अनेक संदर्भ साधनांचा धांडोळा घेतला. मराठीतील विविध बखरी, फारशीमधील तवारिखा, इतिहास ग्रंथ, इंग्रजी भाषेतील नानाविध ऎतिहासिक पुस्तके यांचा सखोल व्यासंग करून मोठ्या तयारीनिशी जोतीरावांनी हा ग्रंथ सिद्ध केला. गेली १५१ वर्षे तो सर्वत्र उपलब्ध आहे. किती शिवप्रेमींनी तो वाचलाय? उलट बहुतेक सगळेच उच्चभ्रू शिवचरित्रकार आणि शिवशाहीर या पुस्तकाची ठरवून उपेक्षा करतात.

" अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेतायुगी !१!
स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी !२!"

शिवराय देशासाठी लढत होते असे सांगणारे पहिले इतिहासकार, शिवशाहीर महात्मा जोतीराव फुले होत. त्यांना हा मान का नाकारला जातो?

हा चरित्रपर पोवाडा असल्याने यात तोवर उपलब्ध असलेल्या सर्व ऎतिहासिक संदर्भांचा त्यांनी वापर केलेला आहे. यात इतिहास असला तरी तो कोरडा, नीरस नाही. त्यात रसरशीत काव्य आहे. जोतीरावांच्या प्रतिभेचा आणि धगधगत्या शिवनिष्ठेचा हा ताम्रपट आपणही एकदा वाचावा. मी गेली ३२ वर्षे या पुस्तकावर बोलतोय. लिहितोय. मराठीत शिवरायांवर अनेक चरित्रपर आणि ललित पुस्तकं उपलब्ध आहेत. सत्यशोधक कृ. अ. केळुसकर, नरहर कुरूंदकर, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, वसंत कानेटकर, सेतुमाधव पगडी, दि. वि. काळे, वा. सी. बेंद्रे, गजानन भास्कर मेहेंदळे, गोविंद पानसरे, जयसिंगराव पवार आणि इतर अनेकांनी आपापले शिवछत्रपती मांडले. प्रत्येक विचारी माणसाने आवर्जून वाचावीत अशी ४ शिवचरित्रं निवडायची असतील तर म. फुले, केळुसकर, दि. वि. काळे आणि सेतुमाधवराव पगडी यांची निवडावी लागतात.

बहुजन समाजाला एक महानायक, महापुरूष देण्याचा जोतीरावांचा उद्देश होता. कोणतीही चळवळ उभी करायची असेल तर ५ गोष्टींची गरज असते.

१. आदर्शपुरूष वा स्त्री, जिच्या पावलावर पाऊल टाकून प्रगती करण्याची प्रेरणा सामान्य माणसाला मिळेल.

२. कार्यक्रमपत्रिका, परिवर्तनाचा कृतीकार्यक्रम, [ जोतीरावांनी ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, नैसर्गिक संसाधनांचे फेरवाटप ही विषयपत्रिका दिलेली होती.]

३. संघटना- सुरूवातीला शिक्षण संस्था आणि नंतर सत्यशोधक समाजामार्फत संघटित कार्य जोतीरावांनी केले.

४. नेतृत्व- जोतीराव, सावित्रीबाई यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ही चळवळ पुढे लहुजीवस्ताद साळवे, ना.
मे. लोखंडे, कृ. पां. भालेकर, ताराबाई शिंदे, डॉ. विश्राम रामजी घोले, तान्हुबाई बिर्जे, धोंडीराम कुंभार, सावित्रीबाई रोडे, गंगाधरभाऊ म्हस्के, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षि वि. रा. शिंदे, राजर्षी छ. शाहू महाराज, भास्करराव जाधव, गोपाळबाबा वलंगकर, केशवराव विचारे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मुकुंदराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, सी. के. बोले, कृष्णाजी अर्जून केळूसकर अशा असंख्य मान्यवरांच्या सहभागाने आणि नेतृत्वाने मोठी होत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर तिला वैश्विक उंची प्राप्त करून दिली.

५. तत्वज्ञान- जोतीरावांनी सनातन संस्कृती नाकारून पर्यायी भारतीय संस्कृती निर्माण करण्याचे सत्यशोधकी तत्वज्ञान विकसीत केले.

हा ग्रंथ लिहिताना शिवरायांच्या इतिहासाच्या माध्यामातून वरिल सगळी उद्दीष्टे गाठण्यासाठी जोतीरावांनी मांडणी केलेली आढळते.

शहाजी महाराजांना विजापूरमध्ये कैद करण्यात आले तेव्हा शिवरायांच्या पत्नी सईबाई वयाने खूप लहान होत्या. शिवराय अडचणीच्या प्रसंगी आपल्या या पत्नीशी विचारविनिमय करीत असत हे नागरिकांच्या मनावर बिंबवण्यासाठी फुले सांगतात, " सईबाईंनी मसलत सुचवली, तसे महाराज वागले आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली." ऎतिहासिकदृष्ट्या हे खरे की खोटे हे महत्वाचे नाही. आपल्या आदर्शांचे अनुकरण समाज करीत असतो आणि म्हणून आदर्श काय करीत होते हे लोकांपुढे उलगडऊन दाखवणे गरजेचे असते. बहुजन समाजात स्त्रियांचा सन्मान वाढवायचा असेल तर शिवाजी महाराज असे करायचे तुम्हीही करा हे सांगण्याचा यामागचा हेतू उघडच दिसतो. शिवाजीमहाराज हे आपले तमाम भारतीयांचे आदर्श होत हे पटवून देणारे फुले पहिले.

या पोवड्यात अशा कितीतरी जागा अहेत की ज्यांची विस्तृत चर्चा पुढे कधीतरी करता येईल.

शिवरायांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आलेख रेखाटताना जोतीराव म्हणतात,
"सोसिले उन्हातान्हाला भ्याला नाही पावसाला
डोंगर कंगर फिरला यवन जेरीस आणला
लढवी अचाट बुद्धीला आचंबा भुमीवर केला
बाळगी जरी संपत्तीला तरी बेताने खर्च केला
वाटणी देई शिपायाला लोभ द्रव्याचा नाही केला
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला!"

हे पुस्तक लिहून आणि प्रकाशित करूनच जोतीराव थांबले नाहीत. त्यांनी शिवचरित्रावर व्याख्याने द्यायचा,पोवाडे गायचा धडाका लावला. १८८० साली जोतीराव रायगडावर गेले. महाराजांच्या समाधीची त्यांनी पुजा केली. पुण्यात येऊन स्वारगेटजवळच्या हिराबागेत [ शिवाजी मराठा शिक्षण संस्थेजवळ]  गंगारामभाऊ म्हस्के [ मराठा ] आणि चाफळकर स्वामी [ ब्राह्मण ] या मित्रांच्या सोबत सत्यशोधक समाजातर्फे पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. तिथून ही जयंती मुंबईला लालबाग परळला रावबहादूर लोखंड्यांनी नेली. त्यानंतर १५ वर्षांनी लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला हजेरी लावली. इतिहास लिहिणार्‍या उच्चभ्रूंनी मात्र शिवजयंतीचे सगळे श्रेय एकट्या टिळकांना देऊन टाकले. खरा इतिहास सांगतो, शिवजयंती सुरू महात्मा फुल्यांनी केली होती, लो. टिळकांनी ती पुढे नेली. टिळकांचे नातू जयवंतराव टिळक यांना याचे भान होते. त्यामुळे आपल्या आत्मचरित्रात टिळकांनी ती सुरू केल्याचा दावा न करता त्यांनी ती पुढे आणली अशी कबुली जयवंतराव देतात.

फुल्यांच्या रायगड भेटीच्या आणि शिवजयंतीच्या बातम्या तत्कालीन केसरीने जरी दिल्या नसल्या तरी दिनबंधूने त्या दिलेल्या आहेत. दिनबंधूच्या जुन्या फायलींमध्ये आजही त्या आहेत. शिवाय माधवराव बागल, वि. द. घाटे, फुले चरित्रकार, पं. सी. पाटील, धनंजय कीर, आचार्य अत्रे, मुकुंदराव पाटील, केळुसकर, जेधे, जवळकर, प्रबोधनकार, पाळेकर, श्रीपतराव शिंदे आदी मान्यवरांनी त्याच्या नोंदीही केलेल्या आहेत. तरिही काही सनातन्यांना म्हणे हे पुरावे मान्य नाहीत. का तर केसरीत तशी नोंद नाही ना! हे नासक्या आमराईतले रेशीमकिडे हा व्हायरस भयंकर आहे. त्यांचे मानायचे तर केसरीने जोतीराव व सावित्रीबाई यांच्या मृत्यूच्या बातम्या ज्याअर्थी दिलेल्या नाहीत त्याअर्थी ते वारलेच नाहीत असेही मानावे लागेल!


हा अफवाबाज विषाणू सातत्याने बुद्धीभेदाचा रणगाडा चालवित असतो. बहुसंख्य बहुजन तिला बळी पडत असतात. जातीविद्वेशाने सडलेल्या या प्रतिगामी मेंदूंनी आजपर्यंत जोतीरावांच्या या आद्यशिवचरित्राची वा जयंतीकार्याची दखलच घेतलेली नाही. याउलट जोतीरावांच्या अन्य लेखनातल्या नोंदी संदर्भापासून तोडून, विकृत करून जोतीरावांनी शिवरायांची बदनामी केलीय अशा आवया यांनी उठवल्या. आजही हाच उद्योग चालू आहे. १८६९ पर्यंत शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातले एकही पत्र उपलब्ध झालेले नव्हते. स्वाभाविकच उपलब्ध ऎतिहासिक कागदपत्रांच्या आधारे शिवरायांचे औपचारिक शिक्षण झालेले नसावे अशा समजुतीने त्या अर्थाची नोंद जोतीरावांनी केली. मात्र अफवागॅंगकडून हा एकच शब्द तेव्हढा निवडून विकृतपणे पेश केला जातो, आणि फुलेबदनामीचे दुकान चालवले जाते. एखाद्या लेखकाचा एखादा सुटा शब्द नुसता बघून उपयोग नसतो तर त्याचा काळ, संदर्भ, हेतू आणि त्या लेखकाचे इतर लेखन हे सारे एकत्रितपणे बघावे लागते. अंडरवर्ल्डच्या टोळ्या जशा देशासाठी घातक आहेत तशाच या अफवागॅंग समाजशत्रू होत.

आर.एस.एस.चे स्वयंसेवक बाळ गांगल हे डबल पीएच.डी. होल्डर यात आघाडीवर होते. त्यांचा बुरखा मी ३२ वर्षांपुर्वीच माझ्या "महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन " या ग्रंथात सप्रमाण फाडला होता. हिंदुत्ववादी बेहर्‍यांच्या सोबतमध्ये गांगलांनी १९८८ साली महात्मा फुल्यांवर भयंकर गरळ ओकलेली होती. फुल्यांनी शिवरायांची बदनामी केल्याचा धादांत खोटा आरोप गांगलांनी केलेला होता. आजही काही सडक्या आंब्यातले किडे हीच गोबेल्सची मोहीम चालवित असतात. देव, धर्म, देश यांचे नाव घेत बहुजनांचा बुद्धीभेद करून इतिहासाचा गैरवापर करीत ही विषवल्ली फोफावत राहते.

म्हणूनच संदर्भसाधनांच्या शोधात सतत राहावे लागते, त्यांच्या प्रकाशात इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. संदर्भसाधनांचा शोध आणि सत्यशोधन ही सतत चालणारी प्रक्रीया आहे. ती अथकपणे सुरूच ठेवावी लागेल. बहुजनांना या कामात फारसा रस नसतो. वाचन, चिंतन, संशोधन यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. अर्थात तशी गोडीही नसते. ते प्रतिगामी विद्वानांना रखेल्या ठेवाव्यात तसे आपल्या पदरी ठेवतात. हे बाळगलेले कावेबाज सनातनी इतिहासाचा विपर्यास आणि विकृतीकरण यात तरबेज असतात. प्रबोधन, परिवर्तनपर उपक्रमांना अदखलपात्र मानणे हा त्यांचा पहिला कट असतो. तरिही चळवळी, नेते वाढतच राहिले तर त्यांच्यावर हल्ले करणे, नेतृत्वाचे चारित्र्यहनन करणे, नेत्यांच्या हत्येच्या सुपार्‍या देणे, हत्त्या करणे, ही दुसरी पायरी असते. तरिही ते संपले नाहीत, उलट वाढतच राहिले, समाजमान्य होत गेले तर त्यांचे अपहरण करणे ही तिसरी पायरी असते. या अवस्थेत सध्या शिवराय, बाबासाहेब आदी महापुरूष सापडलेले आहेत. अर्थात अपहरण करण्यामागे स्विकारण्याचा प्रामाणिक हेतू नसतो. त्यांच्या क्रांतिकारक विचारात भेसळ करून ते विकृत करीत राहणे हे मुख्य अभियान असते. मधूनमधून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मानणारे लोक झोपलेत की जागे आहेत याचाही अंदाज घेतला जातो. तो अंगलट आला तर प्रसंगी माघार घेऊन तह केला जातो. विकृतीकरण मात्र जारीच राहते.  २०१४ पासून या शक्तींनी पुन्हा उचल खाल्लेली आहे. केंद्रात आणि राज्यात नरेंद्र-देवेंद्रांची सत्ता आल्याबरोबर या आमराईतील रेशीमकिड्यांना रसद मिळू लागली. हे घाशीराम कोतवाल पुन्हा मस्तवाल झाले.

जोतीरावांचे अनुयायी, मित्र आणि सत्यशोधक विद्वान कृष्णाजी अर्जून केळुसकर यांनी १९०६ साली सुमारे ६०० पृष्ठांचे प्रदीर्घ असे मौलिक शिवचरित्र लिहिले. केळुसकर मराठा कुणबी असल्याने शतकानंतरही हे पुस्तक दुर्लक्षित आहे. शिवचरित्राच्या लेखन-प्रकाशनाने केळुसकारांचे हातच पोळले होते. या पुस्तकासाठी व याच्या इंग्रजी अनुवादासाठी [ अनु. एन.एस. ताकाखाव ] त्यांनी बॅंकेचे कर्ज काढले. ग्रंथशत्रू असलेल्या बहुजनांनी या पुस्तकाकडे ढुंकुनही बघितले नाही. तोवर शिवराय मध्यमवर्गीयांचे डार्लिंग वा रोजगाराचे साधन झालेले नव्हते. ते सेलिब्रीटीही झालेले नव्हते. तसे ते फार नंतर झाले. त्यामुळे मध्यमवर्गीयांनीही हे पुस्तक घेतले नाही. केळुसकर गुरूजी आपले विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्यासोबत डोक्यावर या पुस्तकाचे गठ्ठे घेत घरोघरी फिरून शिवचरित्र घ्या हो शिवचरित्र घ्या! अशी बहुजनांना विनवणी करायचे. कोणाही मराठा, कुणबी, माळी, आगरी, भंडारी बहुजनांना हे पुस्तक खरेदी करावेसे वाटले नाही. परिणामी केळुसकरांवरील कर्जाचा बोजा वाढतच गेला. बॅंकेच्या जप्तीच्या नोटीसा यायला लागल्या. केळुसकर हवालदिल झाले. अश्रू गाळू लागले. कुठून आपल्याला ही अवदसा आठवली असे त्यांना झाले.

 ते शाहू महाराजांकडे गेले. महाराजांनी शिवचरित्राच्या २५० प्रती तात्काळ विकत घेतल्या. कर्ज फेडण्यासाठी मदतीचे आश्वासनही दिले. आपण लग्नाला बडोद्याला चाललोय, आल्यावर भेटा, असे महाराज म्हणाले. पण महाराज मुंबईत अचानक, अकाली वारले. केळुसकर ग्वाल्हेरला शिंदे सरकारांकडे गेले. आपण लंडनला तातडीने निघालोय, आल्यावर भेटा, नक्की मदत करू असे आश्वासन माधवराव शिंदे यांनी दिले. पण शिंद्यांचे लंडनमध्येच निधन झाले. केळुसकर इंदूरला तुकोजीराव होळकर महाराजांकडे गेले. तुकोजीराव पडले धनगर राजे.आजूबाजूला डझनावारी मराठा संस्थानिक असताना ज्याअर्थी केळुसकर गुरूजी आपल्याकडे आलेत त्याअर्थी  मदत करायला हवी म्हणून त्यांनी २५ हजार रूपये तात्काळ दिले आणि केळुसकर कर्जमुक्त झाले. केळुसकरांनी पुस्तकाच्या ५०० प्रती होळकर महाराजांना भेट पाठवल्या. पण त्या मिळायच्या आतच होळकरांची गादी ब्रिटीशांनी खालसा केलेली होती. अशी झाली केळुसकरांच्या शिवचरित्राची फरपट.

अर्थात आजही बहुजनांना ना केळुसकर माहित आहेत, ना होळकर, ना शिवचरित्र! उत्तम चालूय!
सदैव धार्मिक गुंगीत असलेले बहुजन आणि स्पर्धाभावनेने पछाडलेले पुरोगामी हे सनातन्यांच्या बुद्धीभेदाला पुन्हापुन्हा बळी पडतात. कावेबाज प्रतिगामी सनातनी व्यवस्थेकडून विकृतीकरणाचे हे उद्योग चिवटपणे चालूच राहतात. बहुजन पुरोगामी सोयर्‍यांनो, अशाच गाढ झोपा काढा. तुम्हाला गुंगीची, झोपेची नितांत गरज आहे. तुम्हारा कुछ नही होनेवाला. तुम्ही गुलामीतच सडणार. तुमची तीच लायकी आहे. तुमची झोप हीच जोतीरावांना जयंतीनिमित्तची खरी आदरांजली असेल!

प्रा. हरी नरके, ०७/०४/२०२०

संदर्भ-

https://shivray.com/mahatma-fule-povada/

https://archive.org/details/MahatmaPhuleSamgraVanmay5Avruti/mode/2up

* संपा. प्रा. हरी नरके, महात्मा फुले समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन,मुंबई, २०१३

* पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, १९२७

* संपा. माधवराव बागल, सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ, कोल्हापूर,१९३३

* संपा. प्रा. हरी नरके, आम्ही पाहिलेले फुले, महाराष्ट्र शासन,मुंबई, १९९३,२०१९

* संपा. प्रा. हरी नरके-प्रा. य. दि. फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन,मुंबई,१९९३,२००६,

* छत्रपति शिवाजी महाराज, दिनकर विनायक काळे, पुणे विद्यापीठ, पुणे, प्रथमावृत्ती, १६ मार्च १९६०

* संपा. प्रा. हरी नरके, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८

* संपा. धनंजय कीर, गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर आत्मचरित्र व चरित्र, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, १९७७, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, २०१४

* सरस्वती पब्लिशिंग कंपनी, वरदा प्रकाशन,पुणे व साकेत, औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेले केळूसकर लिखित शिवचरित्र

* प्रा. हरी नरके, महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन, सुगावा, पुणे, १९८९

* दिनबंधू मधील बातम्या

Friday, October 18, 2019

सरकारने शिवरायांचा इतिहास का वगळला?- प्रा.हरी नरके






इयत्ता ४ थीचे बालभारतीचे पुस्तक छ. शिवरायांच्या इतिहासाचे असून ते अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय झाल्याची सध्या सर्व माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यावर कडाडून टिका झाल्यावर इ. ६ वीच्या पुस्तकात शिवराय असतील असा साळसुद खुलासा करण्यात आला. मग हे आधीच का केले नाही? सहावीचे पुस्तक आल्यावर मग इ. ४ थीचे पुस्तक रद्द का केले नाही? आता ही पश्चातबुद्धी का? दुसरीकडे हे नवे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे असल्याचे व त्याचा बालभारतीशी संबंध नसल्याचे सांगितले जातेय. खरेखोटे एक ते "विनोदविरच" जाणोत. शिक्षणात चातुर्वर्ण्य आणण्याचा हा सांघिक कट असल्याचा आरोप राज्य शासनावर होत आहे.


प्रत्यक्षात यामागे असलेले जातीय वर्चस्वाचे राजकारण वेगळेच आहे.

मागे १५ वर्षांपुर्वी जेम्स लेन ह्या अमेरिकन लेखकाने छ. शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांची बदनामी करणारा मजकूर असलेले पुस्तक लिहिले होते. त्याचा सर्वदूर झालेला धिक्कार योग्य, आवश्यक आणि इतिहासाचे विकृतीकरण करणारांना चपराक देणारा होता.
पुढे लालमहालातील दादोजी कोंडदेव यांच्या शिल्पाचा वाद गाजला.
ते शिल्प रातोरात कापूनही काढण्यात आले.

२००७ ची गोष्टय.

प्रा.वसंत पुरके हे तेव्हा आघाडी सरकारचे शिक्षणमंत्री होते. ३१ जुलै २००७ रोजी पुण्यात एका कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली. ते म्हणले, " छ. शिवराय-दादोजी" यांच्याबद्दल एक तज्ञ समिती नेमण्याचा सरकारने निर्णय घेतलाय. नरकेसर, तुम्ही त्या समितीचे अध्यक्षपद स्विकारावे."

मी त्यांचे आभार मानून नम्रपणे नकार दिला. मी त्यांना म्हणालो, " प्रा. जयसिंगराव पवार, प्रमोद मांडे, गजानन भास्कर मेहेंदळे, निनाद बेडेकर, आ. ह. साळुंखे, सदानंद मोरे, राजा दिक्षित, गणेश राऊत, संजय सोनवणी अशा ज्येष्ठ इतिहासकारांना आपण समितीवर घ्या. यातल्या ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्षपद द्या."
ते म्हणाले, " तुम्हाला या समितीचे किमान सदस्य तरी व्हावेच लागेल."

यथावकाश समिती स्थापनेचा शासनादेश आला. मला धक्काच बसला. कारण मी सुचवलेली काही मान्यवरांची नावं त्यात होती पण समितीची रचना चक्क जातीय निकषावर केलेली होती. छ. शिवरायांच्या जातीचे अध्यक्ष आणि ७० टक्के सदस्य व दादोजींच्या जातीचे ३० टक्के सदस्य. या शासकीय समितीवर सरकारने इतिहासतज्ञ म्हणून चक्क एका आक्रमक आणि वादग्रस्त संघटनेचे कार्यकर्ते घेतलेले होते.

झाले, त्यानुसार समितीचा निर्णयही आला.

समितीच्या बैठकीची कार्यवृत्ते वाचल्यावर समजले की दादोजींच्या जातवाल्यांनी समितीवर बहिष्कार घातलेला होता.

आलेल्या निर्णयाबद्दल त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले.

पुढे त्याप्रमाणे ४ थीचे इतिहासाचे पुस्तक बदलण्यात आले.

मात्र आता त्यात पुढे कधीही बदल करायचा नाही असाही विधीमंडळाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
पुढे काही वर्षांनी बालभारतीच्या इतिहास समितीवर काम करताना प्रा. सदानंद मोरे, आ.ह. साळुखे, संभाजी भगत, गोविंद पानसरे यांना या इतिहासात सकारात्मक भर घालायची होती, पण त्यावर सरकारची बंदी असल्याचे सांगण्यात आले.

आणि ज्या ४ थीच्या पुस्तकाला अजिबात हात लावायचा नाही असे सांगण्यात येत होते ते संपुर्ण पुस्तकच युती सरकारने आता रद्द केल्याचे माध्यमांतून समजतेय.

इतिहासाचे संशोधनाच्या नव्या प्रकाशात फेरलेखन करायलाच हवे. मात्र ते पुराव्यांवर आधारित असावे. तटस्थ आणि सत्यप्रिय भुमिकेतून ते व्हायला हवे. असत्यलेखन आणि सत्यापलाप यासाठी प्रसिद्ध असणारी संघटना आणि त्यांची भक्तमंडळी इतिहासाचं काय करतात ते आपण बघतच आलो आहोत.

आघाडी सरकारने इतिहास लेखनाला जातीय वळण दिले. युतीचे सरकार त्याच्या पुढचे पाऊल उचलित आहे.
नंबर एकवर कोण या दोन जातींच्या वर्चस्ववादी लढाईत इतिहासाचे काय होणार ते स्पष्टच आहे.

इतिहासाचा हत्त्यार म्हणून वापर करणारी आणि सोयीचा इतिहास तेव्हढाच सांगणारी, स्वकियांचे,विषमतेचे सदैव गौरवीकरण, उदात्तीकरण करणारी मात्र विरोधी विचारांचे विकृतीकरण करणारी आणि वर्चस्ववादी, जातवर्णवादी मंडळी आता ह्या इतिहासाचे काय वाटोळे करतील ते दिसतेच आहे.

-प्रा.हरी नरके, १८ ऑक्टोबर २०१९


Sunday, February 18, 2018

महात्मा फुले आणि शिवराय -






महात्मा फुले यांनी शिवरायांचा पोवाडा लिहिला, पुण्यात शिवजयंती केली, रायगडवरची शिवसमाधी शोधली याला आधार काय असे प्रश्न विचारले जातात.
खरंतर याबद्दलचे अनेक लेखी, अव्वल दर्जाचे, अस्सल पुरावे उपलब्ध आहेत.
1. पंढरीनाथ सीताराम पाटील, महात्मा फुले यांचे चरित्र, पुणे, 1927,

2. संपा. माधवराव बागल, सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ,कोल्हापूर,1933,

3. संपा. प्रा. हरी नरके, आम्ही पाहिलेले फुले, महाराष्ट्र शासन,मुंबई, 1993,

4. संपा. प्रा. हरी नरके-प्रा.य.दि.फडके, महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन,मुंबई, 1993,

5. संपा. प्रा. हरी नरके, महात्मा फुले समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन,मुंबई, 2013,

6. दिनबंधू मधील बातम्या

या ग्रंथांमध्ये महात्मा फुले यांनी लिहिलेला शिवरायांचा पोवाडा, रायगडवरची शिवसमाधी शोधली, पुण्यात शिवजयंती केली, याबाबतचे अनेक अस्सल पुरावे दिलेले आहेत.
ते जिज्ञासूंनी वाचावेत.

भारतात 1806 मध्ये ग्रंथछपाई सुरू झाल्यानंतर मराठी भाषेतले पहिले पोवाडारूपी शिवचरित्र 1869 ला लिहिणारे आणि ते स्वखर्चाने छापून प्रकाशित करणारे लेखक कोण? तर महात्मा जोतीराव फुले. जून 1869.
पण ही माहिती मुद्दामहून दडवली जाते.

लोकमान्य टिळक, गोपाळराव आगरकर यांना कोल्हापूरचे शिवाजी महाराज आणि दिवाण रा.ब.बर्वे प्रकरणी लेखन केल्याबद्दल जेव्हा तुरूंगवास भोगावा लागला तेव्हा त्यांना त्याकाळात रूपये दहा हजार [ म्हणजे आजचे रूपये सुमारे दहा कोटी ] चा जामीन देण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्ष रामशेट बापूशेट उरवणे यांना पाठवले असे दि. 3 आक्टोबर 1882 च्या केसरीत कोणी लिहिले आहे?
तर खुद्द लोकमान्य टिळक यांनी.

पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी लिहिलेले फुलेचरित्र अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे. ते 1927 सालचे आहे.
आजवर प्रा. गं. बा. सरदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, धनंजय कीर, प्रा. स. गं.मालशे, प्रा. य. दि. फडके यांच्यासह सर्व अभ्यासक ते चरित्र प्रमाण मानतात.
माधवराव बागल यांचे वडील हंटरचे संपादक, सत्यशोधक खंडेराव बागल हे महात्मा फुले यांचे घनिष्ट मित्र होते.
भास्करराव जाधव यांनी महात्मा फुल्यांशी अनेकदा गप्पा मारलेल्या होत्या.
इतिहासकार कृ.अ.केळुस्कर हे फुल्यांचे सहकारी होते. त्यांनी 1906 साली लिहिलेले शिवचरित्र 1906 सालचे आहे. त्यांनी महात्मा फुल्यांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत.
या सर्वांशी माधवराव बागलांचे घनिष्ठ संबंध होते.
वि.द.घाटे, महर्षि वि.रा.शिंदे आदींनी बागलांच्या लेखनाला मान्यता दिलेली आहे.

महात्मा फुले यांचे पहिले बृहद चरित्र 1927 साली लिहिणारे सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील,

सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ 1933 साली काढणारे सत्यशोधक माधवराव बागल यांनी फुले आणि शिवराय यांच्याबाबत दिलेली सर्व माहिती विश्वासार्ह आहे. मौलिक आहे.

महात्मा फुले यांच्या आप्त, स्वकीय, सहकारी, कार्यकर्ते, समकालीन यांनी लिहिलेल्या "आम्ही पाहिलेले फुले " या इतिहास ग्रंथातील आठवणी हा महात्मा फुले विषयक इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे.
महात्मा फुले समग्र वांड्मयात महात्मा फुले यांनी लिहिलेला हा पोवाडा पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठासह [1869ची] छापलेला आहे.
त्याच्या प्रस्तावने त संपादकीयात आणि कालपटात हे विषय आलेले आहेत.

ज्यांना महात्मा फुले लिखित शिवछत्रपतींचा पोवाडा दिसत नाही, शेकडो समकालीन सत्यशोधकांच्या अस्सल आठवणी जे बघतही नाहीत, प्रमाणभूत असलेली फुलेचरित्रे ज्यांनी नजरेखालून घातलेली नाहीत ते दुषित पुर्वग्रहांनी बाधित आहेत.

गेली 40 वर्षे मी सत्यशोधक चळवळ आणि महात्मा फुले यांच्यावर वाचन, संशोधन, लेखन करतोय.
माझे याबाबतचे पहिले पुस्तक प्रकाशित होऊन आता 30 वर्षे झालीत.

माझे आजवर पन्नासेक ग्रंथ प्रकाशित झालेत आणि अद्यापही माझे शोधकार्य चालूच आहे. सतत काम करूनही हे काम संपत नाही. संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया असते.

ज्यांना अस्सल ऎतिहासिक पुरावे मान्यच करायचे नसतात, ज्यांना बनावट आणि खोटाच इतिहास प्रचलित करायचा असतो अशा हितसंबंधियाने जर शंका उपस्थित केल्या तर त्या गंभीरपणे घेण्याची गरज नाही. ते इतिहास अभ्यासक नव्हेत. प्रचारक आहेत. त्यांना पढवून पाठवलेले असते. अभ्यसकांनी पुढे आणलेले अस्सल ऎतिहासिक पुरावे न पाहताच नाकारायचे, या त्यांच्या हिनकस मानसिकतेमुळेच समाजात ज्ञानाचे व इतिहासाचे राजकारण माजले आहे.
जे सदैव काल्पनिक शिखंडी उभे करून त्यांच्या काठीने परस्पर वार करण्यात वाकबगार आहेत अशांना आपण अदखलपात्र मानले पाहिजे.

असत्यकथन व सत्यापलाप करणार्‍या या प्रसिद्धीलोलुप प्रवृत्तीला गंभीरपणे का घ्यायचे?  जे लोक संशोधनाची शिस्त आणि नैतिकता पाळता नाहीत त्यांचे आक्षेप बाजारूच असतात.

अफवांचे मळे पिकवणारे आणि द्वेषाच्या जळाऊ लाकडांच्या वखारी चालवणारे हे सांस्कृतिक माफिया कोण असतील ते सुज्ञांना सांगणे न लगे.
- प्रा.हरी नरके


इतिहासकार, कवी, कादंबरीकार आणि दंतकथा -






साहित्य, कला, चित्रपट, नाटक यांचा समाजावर परिणाम होतो की नाही आणि असल्यास कितपत होतो हा विषय बहुचर्चित आणि वादग्रस्त राहिलेला आहे.

कल्याणच्या सुभेदाराची सून-

एखादा उत्तरकाळातील कवी सदहेतूनं शिवरायांवर कविता करतो. "अशीच आमुची आई असती, वदले छत्रपती " असं कवितेत लिहितो आणि चक्क ती खरीच घटना असल्याच्या कथा तयार होतात. वर्षानुवर्षे त्या इतिहास म्हणून सांगितल्या जातात. पुन्हापुन्हा सांगितल्या जातात.
महाराज परस्त्रियांचा कसा गौरव करायचे हे सांगण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कथेतले कच्चे दुवे पुढीलप्रमाणे-

1. महाराजांनी भर दरबारात त्या अनोळखी महिलेचा गौरव करण्यासाठी आमची आई, "जिजाऊ" सुंदर नाहीत असं अप्रत्यक्षपणे म्हटलं हे खरं असेल का? बाई, तुम्ही खुप देखण्या आहात हे सांगण्यासाठी माता जिजाऊ दिसायला चांगल्या नाहीत असं महाराज खोटं का सांगतील?
2. महाराजांना ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं, जे महाराजांना आरपार ओळखतात असे ज्येष्ठ सरदार महाराजांचा महिलांचा आदर करण्याचा नियम मोडून एका परक्या स्त्रीला पळवून आणतील का? तिला महाराजांसमोर पेश करतील का? जो वरिष्ठ अधिकारी पैसे खात नसतो याची खात्रीलायक माहिती असताना, जसे त्याला त्याच्या हाताखालचे लोक पैसे द्यायची हिंमत करणार नाहीत, तसेच महाराजांना लहानपणापासून ओळखणारे सरदार एक विवाहीत महिला पळवून आणून ती महाराजांना पेश करणं शक्य तरी आहे का?
3. जो कल्याणचा सुभेदार तीन वर्षे कल्याणला न गेल्यानंच कल्याणची लूट शिवाजी राजांनी केल्याचा ठपका ठेऊन त्याला विजापूर दरबारने बडतर्फ केले असा इतिहास आहे तर मग त्या मुस्लीम सरदाराची बुरख्यातली तरूण सून एकटीच कल्याणला कशाला जाईल?
ती मॉर्निंग वॉकला 400 किलोमीटरवर नक्कीच गेली नसणार, नाही का?

गड आला पण सिंह गेला म्हणून सिंहगड-

हरी नारायण आपटे यांची ’गड आला पण सिंह गेला’ ही मस्त कादंबरी आहे. ती महाराजांच्या निधनानंतर सुमारे 200 वर्षांनी लिहिली गेलीय.
नरवीर तानाजीनं कोंढाणा जिंकल्यानं त्याला महाराजांनी नंतर सिंहगड हे नाव दिलं अशी कथा सांगितली जाते. मात्र ही निव्वळ दंतकथा असणार. कोंढाण्याच्या या युद्धापुर्वीही या किल्ल्याचे सिंहगड असे नाव असल्याचे अनेक ऎतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत.
आपट्यांच्या या कादंबरीनं ही काल्पनिक कथा मात्र भलतीच लोकप्रिय झाली.

जेम्स कनिंगहॅम ग्रॅंड डफ आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधनं-

ब्रिटीश अधिकारी, योद्धा आणि इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रॅंड डफ याचा जन्म 8 जुलै 1789 रोजी झाला.
तो सातारा गादीचा प्रशासक असताना त्याने कार्यालयीन कामांव्यतिरिक्त व्यक्तीगत आवड म्हणून घरोघरी फिरून ऎतिहासिक कागदपत्रं जमा केली.
तब्बेत बिघडल्यानं तो स्कॉटलंडला परत गेला.
त्यानं 2 हजार रूपये कर्ज काढून 1826 साली "ए हिस्टरी ऑफ द मराठाज" हा इतिहासग्रंथ 3 खंडांमध्ये प्रकाशित केला. त्याकाळात ह्या पुस्तकांचे महत्व मराठी अभ्यासकांना फारसे जाणवले नाही.
परिणामी पुस्तकांच्या या कर्जातच त्याला 23 सप्टेंबर 1858 ला मरण आले. मृत्यूसमयी तो 69 वर्षांचा होता.
मराठ्यांच्या इतिहासाच्या लेखन-प्रकाशनार्थ एक इंग्रज कर्जात मेला याची आज कुणाला आठवण किमान जाणीव तरी असेल काय?
-प्रा.हरी नरके
.....................

छ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-

शिवरायांच्या पत्रव्यवहारातून तत्कालीन समाज जीवनावर प्रखर प्रकाशझोत पडतो.
प्रजाहितदक्ष राजा ह्या त्यांच्या प्रतिमेचे अनेक पैलू समोर येतात.
भारत हा 4635 जातींनी बनलेला आणि त्यांनीच आरपार जखडलेला देश आहे.
प्रत्येक जातीत सज्जन आणि भली माणसं असतात तशीच वाईट माणसंही असतात हे या पत्रांमधून स्पष्ट होते.
एका पत्रात महाराज प्रभावळीच्या गद्दार जिवाजी विनायक सुभेदाराला, तुमचा ब्राह्मण म्हणून कोणताही मुलाहिजा केला जाणार नाही असे बजावतात. तुम्हाला ठिकेठाक केले जाईल असेही सुनावतात. तुम्ही हरामखोर आहात, तुम्ही हबश्यांकडून लाच घेतलेली असून त्यासाठी स्वराज्याशी बेईमानी केलेली आहे. शत्रूचे चाकर आमचे शत्रूच होत. याचा नतिजा तुम्हाला भोगावा लागेल असेही महाराज त्याला फटकारतात.
या पत्राचा मतितार्थ म्हणजे ब्राह्मण समाजाला शिवकाळात काही सवलती मिळत होत्या. म्हणून तर महाराज म्हणतात, "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही."

महाराज गद्दारांप्रति किती सक्त होते तेच यातून स्पष्ट होते. शिस्त कशाला म्हणतात ते महाराजांच्या पत्रांमधून दिसते.
कर्नाटक स्वारीवर असताना आपला एक मराठा सरदार शत्रूच्या पत्नीशी गैर वागला तर महाराजांनी त्याला कठोर शिक्षा केली.
शत्रूशी हातमिळवणी करणार्‍या केदार नाईक खोपडे या देशमुखांना "हे अक्कल तुम्हासं कोणी दिधली?" असे महाराज विचारतात.
गुंजण मावळच्या हेमंतराव देशमुखांना त्यांचे तीनतीन गुन्हे असतानाही, प्रसंगी महाराज आणखी संधी देतात. "तुम्ही शकजादे आहात. तुम्हास साहेब घरच्या लेकरासारिखे जाणिती...तुमचे हजार गुन्हे माफ आहेती...आमच्या इमानावरी आपली मान ठेऊनु आम्हापासी येणे" असे महाराज कळवतात.

लोकभावना आणि धार्मिक श्रद्धेला हात घालीत "हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे," असे रोहिड खोर्‍यातील दादाजी नरस प्रभु देशपांडे आणि कुलकर्णी यांना शिवराय लिहितात.
तगारा नायकवाडी याने "मराठा होऊनु ब्राह्मणावरी तरवार केली, याचा नतिजा तोच पावला...अखेर आपलेच पोटांत सुरी मारून घेऊन जीव दिल्हा."
इथे दोन प्रश्न निर्माण होतात,
1. मराठा हा शब्द जर मराठा जातवाचक नसेल तर मग त्यात ब्राह्मण येत नव्हते का? त्यांचा उल्लेख वेगळा का?
2. महाराज अनेकदा मराठा हा शब्द जात म्हणुनही वापरत होते काय?

हाली बापुजी नलावडा व कोंडाजी चांदरा व संताजी जमादार हरबकसा करून सबनिसास दटावितात..त्याची खबर घेणे जरूरी आहे....कोण्ही बेढंग न वर्ते. तुम्ही ऎसे बेकैद लोकांस होऊ न देणे."
सैनिकांनी शिस्त पाळली नाही तर " मराठियांची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा?"
" भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास्त व दुरूस्त वर्तणे....कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येती करून ..तरी साहेबा कबूल असतील."
महाराजांची लढाई हिंदू विरूद्ध मुस्लीम अशी धार्मिक नाही तर ती उत्तर [पठाण=मोगल] विरूद्ध दक्षिण भारतातले सर्व हिंदु व मुस्लीम अशी असल्याचं ते मालोजीराजे घोरपडे यांना स्पष्ट कळवतात. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा हे सर्व आपले मित्र असल्याचं महाराज म्हणतात. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून मोगलांशी लढण्याचा तह आम्ही केलाय असे ते म्हणतात. "दक्षणची पादशाही आम्हां दक्षणियांच्या हाती राहें ते करावें."
याच पत्रात ते पुढे लिहितात, "आपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावें, हे आपणांस उचित आहे." आपले परंपरागत वैर विसरून आपण सर्व मराठ्यांनी एकत्र आले पाहिजे असेही ते घोरपड्यांना लिहितात. "घोरपडे आपण कुलीन मराठे आहोत याची तुम्हाला आण आहे. तुम्ही मराठे लोक आपले आहात. तुमचे गोमटे व्हावे म्हणून तुम्हांस पस्टच लिहिले आहे."
आम्ही व तमाम दखणी मिळून मोगलांना बुडवणार असा संकल्पही ते करतात.

[संदर्भासाठी पाहा, छत्रपति शिवाजी महाराज, दिनकर विनायक काळे, बहि:शाल शिक्षण ग्रंथमाला, पुणे विद्यापीठ, पुणे, प्रथमावृत्ती, 16 मार्च 1960, तिसरी आवृत्ती, एप्रिल, 1971, मूल्य: सहा रूपये, पृष्ठे 252 ते 272 ]
-प्रा.हरी नरके

Saturday, February 17, 2018

शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शिवराय-


दोन हजार वर्षांपुर्वीच्या गाथा सप्तशती या हाल राजाच्या काव्यग्रंथात शेतकर्‍याला पेरणीसाठी बियाणे घ्यायला पैसे नसल्याने आपले जुने धोतर बाजारात विकून त्याचे बियाणे विकत घेणारा मराठी शेतकरी दिसतो. आजही लक्षावधी शेतकरी आत्महत्त्या करतात. सरकार नावाचे निव्वळ बोलबच्चन बुजगावणे. मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया!

शिवराय हे रयतेचे राजे होते. स्वराज्य, कृषी, आरमार, युद्धशास्त्र, स्त्रीसन्मान, गडकोट, जलदुर्ग या  अशा अनेक बाबींवरचे त्यांचे विचार आणि कार्य अभिमानास्पद होते.
त्यांचा द्रष्टेपणा स्तिमित करून जातो.
शेती आणि शेतकरी हा विषय महाराजांच्या काळजातला विषय.
पेरणीच्या वेळी शेतकर्‍याला पेरणी करायला काही अडचणी असतील तर त्या स्वत: पुढाकार घेऊन तात्काळ दूर करण्याचे आदेश सरदारांना देणारे महाराजांचे पत्र फार फार बोलके आहे.
"गावोगाव फिरा. शेतकर्‍यांच्या बैठका घ्या. त्यांची मायेनं विचारपूस करा. पेरणीला आवश्यक बियाणे, मणुष्यबळ नसेल, औतकाठी नसेल, बैलबारदाणा नसेल तर तो सर्व त्याला पुरवा. त्याच्या सगळ्या अडचणींचे जातीने निराकरण करा. त्याला जगायलाही धान्य पुरवा.

तो पिकवील तर स्वराज्य टिकेल.
नवे पिक आले की त्याच्याकडून कर्जाची रक्कम त्याच्या कलाकलाने [हप्त्याहप्त्याने] वसूल करा. फक्त मुद्दल तेव्हढे घ्या.
व्याज माफ करा.

कर्जफेडीसाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करू नका.

तो खुष राहील, आनंदी असेल याची काळजी घ्या. शेतकरी जगला तर स्वराज्य जगेल."

किती हा कळवळा. किती अपार माया आणि जिव्हाळा.
......................
--प्रा.हरी नरके
.....................
[संदर्भ-पाहा, शिवचरित्राची साधने, खंड क्र. 9, लेखांक 55, शके 1598, भाद्रपद शुद्ध अष्टमी, दि. 5 सप्टेंबर, 1676]