Showing posts with label चीन. Show all posts
Showing posts with label चीन. Show all posts

Saturday, June 27, 2020

हे घ्या अस्सल पुरावे- बाबासाहेबांनी चीन, कम्युनिझम आणि माऒ यांचे काढलेले वाभाडे - प्रा. हरी नरके


















माझा "बाबासाहेब आणि चीन" हा १४ एप्रिल २०२० चा लेख तुफान गाजल्याने आता अडीच महिन्यांनी या लेखामुळे अडचणीत आलेल्या काही डाव्या मित्रांनी " बाबासाहेब असे बोललेच नव्हते, हरी नरकेंनी बाबासाहेबांच्या तोंडी खोटी वाक्ये टाकली" असा धादांत खोटा प्रचार सुरू केलेला आहे.

विचारांचे विश्लेषण करताना त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मतभेद होऊ शकतात. पण मूळ कोटेशन्समध्ये बदल होऊ शकत नाही. मी गेली ४० वर्षे लेखन-संशेधनाच्या क्षेत्रात आहे. वैचारिक मतभेद असण्यात गैर काहीच नाही. पण बाबासाहेब असे म्हणालेच नव्हते असे सांगणे हा प्रकार अक्षम्य आहे. मुद्दा विश्वासार्हतेचा आहे.

खाली मी बाबासाहेबांच्या पुस्तकांमधले संबंधित उतारे दिलेले आहेत. हे मोजकेच आहेत. हा फक्त एक नमुना आहे. डाव्यांची जर इच्छाच असेल तर वर्षभर दररोज मी बाबासाहेबांच्या पुस्तकामधले "असे" उतारे टाकू शकेन.

मी बाबासाहेबांच्या चीन, कम्युनिझम, माऒ, पंचशील विषयक मताचा सारांश पुढीलप्रमाणे सांगितला होता.

साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे असा परखड इशारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट्र निती या विषयावर बोलत होते.

"बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे खंड १५ मधले काही उतारे आहेत तर काही खंड १८ भाग २ मधले आहेत.
"बाबासाहेबांना चीनबद्दल प्रेम होते" असा प्रचार हे फेसबुकवर करीत आहेत.

मी कम्युनिस्टांना शत्रू मानत नाही. वैचारिक मतभेद जरूर आहेत. वैचारिक टिकेचे मी स्वागत करतो, मात्र व्यक्तीगत बदनामी, टोकाची वैयक्तिक शेरेबाजी, चारित्र्यहनन कराल तर मग मला गप्प बसता येणार नाही.

निदान सध्याच्या भारतीय राजकीय वातावरणात तरी मला कम्युनिस्टांशी भांडण करायचे नव्हते, नाही. शहीद कॉ. गोविंद पानसरे हे माझे मार्गदर्शक होते. आज या चळवळीत असलेल्या इतर अनेक मान्यवरांना मी अतिशय मानतो. आमच्या छावण्या  भल्या वेगवेगळ्या असतील पण अनेक मुद्यांवर आम्ही सोबत होतो. राहू.   पण कोणी अर्धवट डावे जर माझ्यावर भांडण लादणारच असतील तर मग माझाही नाईलाज होईल... लक्षात ठेवा, " ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी." तुर्तास समजनेवालों कों इतना इशारा काफी हैं....

- प्रा. हरी नरके,
२७/६/२०२०

(संदर्भासाठी पाहा - १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड,१८ वा, भाग २, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२, पृ. ५८३ ते ५८६ )

Tuesday, June 23, 2020

"बाबासाहेब आणि चीन" या लेखावरची एका चीनप्रेमीची पोटदुखी आणि जळफळाट - प्रा. हरी नरके


१. हरी नरके यांच्या "बाबासाहेब आणि चीन" या लेखाला एव्हढी भरमसाठ प्रसिद्धी कशाला? सध्या त्याचीच सगळीकडे धूम आहे. मोबाइलवर ओव्हरसबस्क्राईड.

२. लेख वाचण्यापुर्वीच मला तो लेख खोटा असणार अशी शंका होती. एका मित्राने मला विचारले, " हे खरे आहे काय?" मी तेव्हाच म्हणालो, "वाटत नाही."

कारण ५४ ला चीन केवळ पाच वर्षाचा होता. १९४९ ला चीनला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्यावर कशाला बाबासाहेब बोलतील? हरी नरके खोटे लिहित असणार.

३. हरी नरकेंनी ज्याच्या आधारे लिहिलेय तो "बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचा खंड १५ वा" मी वाचलेला नाही.

४. पण मी एका लेखकाचे दुसरे पुस्तक वाचलेय.

५. त्यानुसार बाबासाहेबांनी त्या भाषणात रशियाचा उल्लेख जास्त वेळा केलाय. चीनचा कमी वेळा केलाय. मग हरी नरके रशियावर का लिहित नाहीत?

६. बाबासाहेब चीन, माओ, कम्युनिझमवर बोललेत. पण कमी बोललेत.

७. परिस्थितीजन्य हंगाम येतात, जातात, प्रसिद्धि येते, अन जातेही.

८. हरी नरकेंना एव्हढी जास्त प्रसिद्धी मिळतेच कशी? काहीतरी लबाडी असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? आम्ही इतके दिवस लिहितोय, आमचे लेखन का गाजत नाही? आम्हाला प्रसिद्धी का मिळत नाही? हरी नरकेचे का गाजते? कारण वाचक मुर्ख आहेत आणि हरी नरके खोटे लिहितात म्हणून ते गाजते. जे गाजते ते खोटेच असते.

९. हरी नरकेचा हा लेख वाचू नका. तो चीनवर आहे. त्याला सांगा रशियावर लिही. चीन मला आवडतो.


-प्रा. हरी नरके,
२३/६/२०२०

टीप- बाबासाहेबांचे संसदेतले २६ ऑगस्ट १९५४ चे ते भाषण २ तासांचे प्रदीर्घ, अभ्यासपुर्ण आणि द्रष्टे विचार मांडणारे मौलिक भाषण आहे. त्यात जागतिक प्रश्नांवरचे चिंतन आहे. चीन, रशियापासून अगदी पोर्तुगिजांच्या ताब्यातील गोवा, निजामाच्या ताब्यातील विदर्भ  असे अनेक विषय त्यात आहेत. एकुण छापील १३ पानांचा मजकूर आहे. मला एका पानाचा लेख लिहायचा होता. पुस्तक नव्हते लिहायचे.
माझा मुद्दा हा आहे की कोरोना कुठून आला? भारतावर हल्ला कुणी केलाय? चीन. सध्या चर्चेचा मुद्दा कोणता आहे? चीन. म्हणून मी जर चीन, कम्युनिझम आणि बाबासाहेब हा विषय प्रासंगिक विषय निवडलेला आहे. मी त्या लेखात आणखी याच्यावर का लिहिले नाही, त्याच्यावर का लिहिले नाही असले प्रश्न अनावश्यक आहेत - प्रा. हरी नरके

Sunday, June 21, 2020

फेसबुकवरील वाड्मयचौर्य - प्रा. हरी नरके












फेसबुकपोस्टच्या चोर्‍यामार्‍यांचे प्रमाण अलिकडे फारच वाढल्याचे आढळते. मित्रमैत्रिणींच्या चांगल्या पोस्ट ढापायच्या आणि स्वत:च्या नावाने स्वत:च्या भिंतीवर चिकटवायच्या हा प्रकार बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. याचे काही उपप्रकारही आढळतात.
उदा.

१ ) मूळ लेखकाचे नाव डिलीट करायचे आणि त्यात किरकोळ फेरबदल करून लेख स्वत:च्या नावावर खपवायचा.

२) मूळ लेखकाचे नाव काढून टाकून लेख आपल्या भिंतीवर प्रकाशित करायचा. मूळ लेखकाचे नाव नसल्याने व लेख तुमच्या भिंतीवर प्रकाशित झाल्याने सामान्य वाचकांचा असाच समज होतो की लेख तुमचाच आहे. मग लोक तुमच्या कौतुकाच्या कमेंट करतात, त्यांना लाईक मारायचे. जर कुणी मूळ लेखकाचे नाव कमेंटमध्ये लिहिलेच तर त्या उडवायच्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे.


३) यदाकदाचित चोरी पकडली गेलीच, माझा लेख माझे नाव गाळून का प्रकाशित केला अशी मूळ लेखकाकडुन विचारणा झालीच तर मला हा लेख मला बिननावाचाच मिळाला होता अशी सारवासरव करून आपली लबाडी झाकायची. समजा तुम्हाला हा लेख बिननावाचा मिळाला होता तर तुम्ही तो लेख आपल्या भिंतीवर टाकताना "लेखक अज्ञात, किंवा लेखक माहित नाही" असे का लिहिले नाही?

कपिल सरोदे नावाचे एक वकील आहेत. त्यांनी माझा " डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि करोना" हा लेख स्वत:च्या भिंतीवर माझे नाव वगळून टाकला. हा लेख भीमजयंतीच्या निमित्ताने मी १४ एप्रिल २०२० रोजी लिहिलेला होता व तो महाराष्ट्र टाइम्स, सामना, बहुजन शासक या व इतर अनेक दैनिकांनी प्रकाशित केलेला होता. आंबेडकरी डॉट कॉम व इतर काही वेबसाईटवरही तो आलेला होता. शिवाय माझ्या तिन्ही फेबु खात्यांवर, पेजवर व ब्लॉगवर ही तो टाकलेला होता. ही दोनच महिन्यापुर्वीची ताजी घटना आहे. वकील असल्यामुळे सरोदे यांना असे करणे हा बौद्धिक सम्पदा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे माहित आहे.

माझ्या काही मित्रांनी ही गोष्ट माझ्या निदर्शनाला आणून दिली. मी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर दिलगिरी राहिली बाजूला त्यांनी माझ्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या. कपिल सरोदेंचा अजब खुलासा पुढीलप्रमाणे "किती मरता नावासाठी. मला नावच जर टाकायचे असते तर मि माझे नाव नसते का टाकले, तुमच्या सारखे नावसाठी मारणारे लोकच जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वतःच्या नावाने छापतात तेव्हा बरे वाटते का तूम्हाला, माझी प्रतेक पोस्ट चेक करा मि माझे नाव टाकल्याशिवय शेर करत नाही, आणि जी पोस्ट मि शेर केली जी तुमही तुमची आहे असे बोलता, त्यात 90 % विचार बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. मग तुम्हीं इतके विद्वान झाले का बाबसाहेबांचे विचार स्वतःच्या नावाने खपवायला?" ते पुढे असेही म्हणतात, " आपला काही तरि गैरसमज होतोय, पहिला विषय तर तो लेख मला जसा मिळाला तसा मि माझ्या वॉलवर टाकला आहे, त्यात तुमचे नाव नव्हते. मला तो लेख तुमच्या नावाविनाच मिळाला होता, यातील दूसरा विषय, म्हणजे तुमच वाङ्गमय वैगेरे हे तुमच्या ठिकाणी राहुदया मला तो लेख माझ्या नावाने टाकायचा असता तर मि त्यात माझे नाव स्पष्ठ शब्दात टाकले असते. मि तुमच्या सारखा नावसाठी हापापलेला नाही. आणि हो मा. नरके आपन त्या लेखात जे विचार लिहिले आहेत ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तुमच्याकडे मकतेदारी कुणी दिली?" त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, " अरे रे रे नरके तुमच्या बुद्धिची कीव येते राव! "


त्यांचा खुलासा अजिबात पटण्याजोगा यासाठी नाही की त्यांच्या कमेंटमध्ये त्यांना Sandip Khillare, योगेश वाघमारे, Kunal Gajghate, Sachin Kalambe, Atul Gawali, Mangesh Sasane, Kuldeep Ramteke अशा अनेकांनी लिहिले होते की हा लेख प्रा. हरी नरके यांचा आहे, तुम्ही मान्य करा आणि विषय संपवा, पण तरिही त्यांनी तशी दुरुस्ती केली नाही, की मान्य केले नाही. उलट त्यांनी तिकडे साफ दुर्लक्षच केले. त्यांना तेव्हाच आजचा खुलासा करता आला असता.

माझे नाव वगळुन टाकल्यामुळे लेख त्यांचा स्वत:चा असल्याचा भास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. हे कायद्यात बसते?


हा लेख चांगला आहे, कुणाचा आहे अशी काहींनी त्यांचाकडे कमेंटमध्ये विचारणा केली तेव्हाही ते गप्प बसले. अनेकांनी त्या लेखाबद्दल सरोदेंचे कौतुक केले त्यांना सरोदेंनी लाइकही केले.


शेवटी मीच त्यांना हा लेख माझा आहे असे लिहिल्यावर मात्र त्यांचे उत्तर आले. दिलगिरी सोडा उलट अरेरावी आणि मूळ लेखकावरच / माझ्यावरच त्यांनी दोषारोप केले. आताही एव्हढे सगळे खुलासे-प्रतिखुलासे झाल्यावर अजूनही त्यांनी लेखावर माझे नाव टाकलेलेच नाही.


असे बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्य करणार्‍या लोकांना खंतखेद तर वाटतच नाही, ते नैतिकतेवरची प्रवचने चालूच ठेवतात हे जास्त त्रासदायक आहे.


आपले काही मित्रही या कृत्याचा निषेध करण्याऎवजी दुर्लक्ष करा हो, असा आपल्यालाच सल्ला देतात हे तर जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे. काय दुर्लक्ष करा? समोर माणूस वाड्मयचौर्य करतोय आणि तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा असे सांगताय म्हणजे तुम्ही चोरीला मदत करताय, प्रोत्साहन देताय असे वाटत नाही तुम्हाला?


-प्रा. हरी नरके,
२१/६/२०२०


Ref: कपिल सरोदे - https://www.facebook.com/Kapil-Sarode-112733103738395/ 

Friday, June 19, 2020

चीन हा लोकशाही जाळणारा वणवा : भारताला चीनच्या आक्रमणाचा धोका- प्रा. हरी नरके












साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे, असा परखड इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी दिला होता.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. १९६२ साली ज्या गलवान खोर्‍यावरून चीनने आक्रमण केले होते तोच मुद्दा पुढे करून चीनने आपल्या २० बहादूर जवानांचे लाखमोलाचे जीव घेतलेले आहेत. सीमेवर पेट्रोलिंग करताना शस्त्र सोबत असले तरी फायरिंग करायची नाही म्हणुन आपल्या जवानांनी गोळीबार केला नाही असे परराष्ट्रमंत्री म्हणतात. कुणाचा जीव घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी स्वसंरक्षणार्थ एखाद्याचा जीव घ्यावा लागला तर तो क्षम्य असतो, मग चीनचे जवान आपल्या सैनिकांवर दगडगोटे, तीक्ष्ण हत्त्यारे, यांचा मारा करीत असताना त्यांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करता आला असता, मग त्यांना कोणी रोखले याचे उत्तर मिळालेले नाही. राज्यसभेत परराष्ट्रनीतीवर बोलत असताना बाबासाहेबांनी काढलेले उद्गार सुरूवातीला मी दिलेले आहेत. पंतप्रधान नेहरू बाबासाहेबांचे भाषण काळजीपूर्वक ऐकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणला असता अध्यक्षांनी त्या सदस्याला फटकारले.


आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर गेला आहे. बाबासाहेबांची भाषा वापरून सांगायचे, तर या वणव्यात सारे जग होरपळत असून, चीनच्या चुकीची शिक्षा भारतासह साऱ्या जगाला भोगावी लागते आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला, की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोहोचवला, यावर आरोपप्रत्यारोप होत आहेत. चीनने लादलेल्या या जैविक महायुद्धामुळे सारे जग पोळून निघाले आहे.


चीनचे लालभाई सत्ताधीश अतिमहत्त्वाकांक्षी, हुकूमशाही वृत्तीचे आणि आक्रमक आहेत, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या लाखो तरुणांना रणगाड्यांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीश क्रूरकर्मा आणि रानटी आहेत, हे वेगळे सांगायला नको. आज गलवान खोर्‍यावर कब्जा करायला पुढे सरसावलेला चीन अतिदुष्ट साम्राज्यवादी आहे हे अनेकवार सिद्ध झालेले आहे. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनीती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार (व्हेटो), हे सारे बघितले की चीन शेजारी देशांवर आक्रमण करू शकतो हे सिद्ध होते. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात.


जगातील सगळी प्रगत राष्ट्रे आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनीतीही असू शकते.


डॉ. बाबासाहेबांचा द्रष्टेपणा असा, की त्यांनी साडेसहा दशकांपूर्वीच भारताला याबाबत जागे केले. 'साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते. त्यांना नीतीमत्ताही नको असते.


माओ हा चीनमध्ये तिथल्या बौद्धांना जी अमानुष वागणूक देत आहे, ती पाहता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे, हे उघडच दिसते. भारताने चीनशी मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी,' असेही बाबासाहेब म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, 'साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱ्यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी, हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली, तरी माओचा पंचशिलावर विश्वास नाही.

चिनी राजनीतीची दोन तत्त्वे आहेत. पहिले, त्यांची राजनीती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे, त्यांच्या जगात कोणत्याही नीतीला मुळी जागाच नसते. आजची नीती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झाला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्वीकारतात, त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे.'

नेहरू सरकारमधील कायदेमंत्रिपदाचा १९५१ साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली,

त्यातले एक म्हणजे नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनीती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले, तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळ्याआड होता कामा नये.

बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते, की चीन आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार. भविष्यात भारताला या दोघांपासून धोका आहे, असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकर खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर अतोनात खर्च करावा लागतो आहे. याबाबतही बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली होती.

संरक्षण धोरणात भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौद्धबहुल तिबेटची जी ससेहोलपट केली, त्यावरही बाबासाहेब अतिशय नाराज होते. खरे तर चीन व भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभला आहे. चीनशी आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध आहेत. रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नीतीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो, असे बाबासाहेब सांगतात.

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले उच्च शिक्षण घेताना, बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्या काळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. पुढील काळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले, तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्या करण्यात आली, त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले.


१९५४ साली मुंबईत 'आपण महात्मा फुल्यांना कधीही सोडणार नाही,' असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडत असल्याचे जाहीरपणे सांगितले.

बाबासाहेबांनी 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची १९३६ साली स्थापना केली. त्यावेळी काही कम्युनिस्ट मित्रांशी त्यांची जवळीक होती; मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले.

१९५२च्या लोकसभा निवडणुकीत मते कुजवा; पण बाबासाहेबांना पराभूत करा, हा कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला.
कोणताही विधीनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जातिप्रश्नावर मात्र मौन बाळगत असे. स्त्रीप्रश्न हाही त्यांना अग्रक्रमाचा नव्हता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी 'बुद्ध की मार्क्स?' या प्रश्नावर जाहीरपणे 'मार्क्स नाही, तर बुद्धच आपला मार्गदाता' असल्याचे घोषित केले.
मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झाली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला, तरी कम्युनिस्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने आणि भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे, हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.
बाबासाहेबांच्या दृष्टीने देश सर्वप्रथम होता. या  हिंसक आणि हुकूमशाही वृत्तीच्या चिनीच्या वागण्याचे कुणीही समर्थन करणार नाही.


-प्रा. हरी नरके,@Hari Narke

(लेखक समाजशास्त्रांचे संशोधक असून ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँज स्पीचेस' या ग्रंथमालेचे संपादक होते.)

दि. १४ एप्रिल २०२० रोजी म.टा.मध्ये प्रकाशित झालेला माझा हा लेख किंचित भर घालून रिपोस्ट केला आहे.


(संदर्भासाठी पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ. विजय खरे, सुगावा प्रकाशन,पुणे,२०१०)

Monday, April 13, 2020

बाबासाहेब आणि चीन - @ प्रा. हरी नरके, भीमजयंती 20/3

आज चीनमुळे जगभर हाहा:कार माजला असताना,या धोकादायक देशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेकवार इशारे दिले होते. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या द्रष्टेपणाचे स्मरण...




साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे,   असा परखड इषारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट निती या विषयावर बोलत होते. पंतप्रधान नेहरू हे बाबासाहेबांचे भाषण काळजीपुर्वक ऎकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्षांनी त्या सदस्याला फटकारले.

     आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर पसरवला गेलाय. ह्या वणव्यात सारे जग होरपळून निघत असून चीनच्या चुकीची शिक्षा आज भारतासह सार्‍या जगाला भोगावी लागते आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोचवला यावर मतभिन्नता आहे. चीनने सार्‍या जगावर लादलेल्या या जैविक महायुद्धाने सारे जग पोळून निघाले आहे. चीनचे लालभाई सत्ताधिश महत्वाकांक्षी, हुकुमशाहीवृत्तीचे आणि आक्रमक आहेत हे आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या लाखो तरूणांना रणगाड्यांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीस क्रूरकर्मा आणि रानटी आहेत हे वेगळे सांगायला नको. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनिती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार [ व्हेटोचा अधिकार ] हे सारे बघितले की चीन काहीही करू शकतो यावर विश्वास बसतो. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात. जगातील सगळी प्रगत राष्ट्रं आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनितीपण असू शकते.

     बाबासाहेबांचा द्रष्टेपणा असा की त्यांनी साडेसहा दशकांपुर्वीच भारताला याबाबत जागे केले होते. " साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते. त्यांना नितीमत्ताही नको असते. माओ हा चीनमध्ये ज्याप्रमाणे तिथल्या बौद्धांना अमाणूष वागणूक देत आहे ते पाहाता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधिश आहे, हे उघड दिसते. भारताने चीनबरोबर मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी," असेही ते म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, " साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजार्‍यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला फार महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण ह्याला मान्यता दिलेली असली तरी माओचा पंचशीलावर विश्वास नाही. चिनी राजनितीची २ तत्वे आहेत. एक- त्यांची राजनिती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे त्यांच्या जगात नितीला मुळी जागाच नसते. आजची निती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झालेला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्विकारतात त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे."

       नेहरू सरकारमधील कायदेमंत्रीपदाचा १९५१ साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली होती त्यातले एक नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनिती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळ्याआड होता कामा नये. बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते की चीन आणि पाकीस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार. भविष्यात भारताला या दोघांपासून खतरा आहे असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकरच खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर अतोनात खर्च  करावा लागतोय याबाबत बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली होती.

संरक्षणनितीमध्ये भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौध्द तिबेटची जी ससेहोलपट केली त्यावर बाबासाहेब सक्त नाराज होते.

    खरं तर चीन आणि भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभलेला आहे. चीनसोबत आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध राहिलेले आहेत. रशियाने दुसर्‍या महायुद्धांनंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नितीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो असे बाबासाहेब सांगतात.

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेताना बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्याकाळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. मात्र पुढीलकाळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्त्या करण्यात आली त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले.

१९५४ साली मुंबईत बोलताना आपण महात्मा फुल्यांना कधीही सोडणार नाही असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडीत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची १९३६ साली स्थापना केली, त्यावेळी काही कम्युनिष्ठ मित्रांशी त्यांची जवळीक होती. मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले.

१९५२ च्या लोकसभा निवडणूकीत आपली मतं कुजवा पण बाबासाहेबांना पराभूत करा हा डांग्यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. कोणताही विधीनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जातीप्रश्नावर मात्र मौन बाळगीत असे. स्त्रीप्रश्नही त्यांच्यादृष्टीने अग्रक्रमाचा नव्हताच. या सगळ्या पार्श्वभुमीवर नेपाळच्या काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स याबाबत जाहीरपणे मार्क्स नाही तर बुद्धच आपला मार्गदाता असल्याचे घोषित केले. मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी आपल्या लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झालेली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला तरी कम्युनिष्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने व भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.

       बाबासाहेबांच्या दृष्टीने देश प्रथम होता. त्यामुळे आपल्या साम्यवादी मित्रांना काय वाटेल त्याची पर्वा ते करीत बसले नाहीत. चीन किंवा रशियामध्ये पाऊस पडला की इकडे छत्र्या उघडणारांचा अपवाद वगळता या चिनी हिंसक आणि हुकुमशाहीवृत्तीच्या नेत्यांच्या वागण्याचे कुणीही समर्थन करणार नाही.


-प्रा. हरी नरके,@Hari Narke

(लेखक समाजशास्त्रांचे संशोधक असून ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँज स्पीचेस' या ग्रंथमालेचे संपादक होते.)

दि. १४ एप्रिल २०२० रोजी म.टा.मध्ये प्रकाशित झालेला माझा हा लेख किंचित भर घालून रिपोस्ट केला आहे.


(संदर्भासाठी पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ. विजय खरे, सुगावा प्रकाशन,पुणे,२०१०)


https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/PrintPages.aspx?doc=MTMUM/2020/04/14&from=6&to=6&ts=20200413211954&uq=20191018031251