Showing posts with label वाचन. Show all posts
Showing posts with label वाचन. Show all posts

Tuesday, January 12, 2021

डिजिटल मराठी वाचकांचे दैनंदिन वाचन- किरण लिमये

‘सजग चॅरिटेबल ट्रस्ट’ ह्या संस्थेच्या वतीने मराठीतील वाचनव्यवहाराच्या संशोधक मेघना भुस्कुटे ह्यांच्या मदतीने वाचनसवयींचे एक सर्वेक्षण ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये केले गेले. हे सर्वेक्षण गुगल फॉर्म्सद्वारे केले गेले आणि समाजमाध्यमांतून ते लोकांपर्यंत पोचले. सुमारे ८५०० प्रतिसाद ह्या सर्व्हेला मिळाले. मराठी वाचकांच्या वाचनसवयी – किती वाचतात आणि काय वाचतात – ह्याचा प्राथमिक अभ्यास करणे हा या सर्व्हेचा उद्देश होता.

1.     स्त्री किंवा पुरुष असण्याचा वाचनासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेच्या शक्यतेवर काही प्रभाव नाही. म्हणजे ह्या सर्वेक्षणात सहभागी लोक, ज्यांना आपण थोडक्यात स्मार्टफोन वापरू शकणारे मराठी वाचक म्हणू, ह्यांच्यात ते स्त्री आहेत का पुरुष ह्याचा वाचनाला किती वेळ द्यायचा ह्यावर काही प्रभाव नाही असं दिसतंय. हा एक सकारात्मक निष्कर्ष आहे, पण त्याचवेळी तो न-डिजिटल वाचकांना लागू पडेल का हा कुतूहलाचा विषय आहे. घरकाम, स्वतःच्या वाचनावर पैसा आणि वेळ खर्च करण्याची मुभा ह्याबाबतीत स्त्री-पुरुष ह्यांच्यातील भेद मिटत आले आहेत असा एक गट आहे आणि हे भेद अजून आहेत असा एक गट आहे असं मला वाटतं. ह्यातल्या दुसऱ्या गटाबाबत कदाचित ह्या सर्वेक्षणात फारशी माहिती नसावी. त्यामुळे हा सकारात्मक निष्कर्ष आपण थोड्या साशंकतेने साजरा केला पाहिजे.


2.     वैवाहिक स्थितीचा दैनंदिन वाचनाच्या वेळेच्या संभाव्यतेवर वेगळा परिणाम दिसत नाही. व्यक्तीचे प्राधान्यक्रम हे वैवाहिक स्थितीने बदलतात आणि त्यात वाचनासाठी काढलेला वेळ असू शकतो असं मानलं तर वैवाहिक स्थितीचा परिणाम नसणं ह्याचा अर्थ असा असू शकतो कि मुळात अविवाहित व्यक्तीत वाचनाचे प्रणाम जास्त नसावे. शिक्षण, उपजीविकेवर जाणारा वेळ, अन्य मनोरंजन माध्यमे ह्या सगळ्यांचा हा परिणाम असू शकतो. निष्कर्षांतील ही पहिली धोक्याची घंटा.  


3.     ५१-७५ आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती ह्या वाचनासाठी जास्त वेळ देतात. डिजिटल माध्यमे वापरू शकणाऱ्या निवृत्त व्यक्ती वाचनासाठी जास्त वेळ देऊ शकतात ह्यात फारसे नवल नाही. ह्या वयोगटात डिजिटल माध्यमे वापरता येणं हाच मुळात एक सकारात्मक भाग मानला पाहिजे. पण ११-१८, १९-३० ह्या वयोगटातील दैनंदिन वाचनकालावधी  हा ३१-५० वयोगटासारखा असणं हे थोडं विचारात पाडणारं आहे. वर विवाहाच्या मुद्द्यात जी चर्चा झाली, शिक्षण, उपजीविका आणि अन्य मनोरंजन माध्यमे, ती इथेही लागू पडते.


4.     शिक्षणाचा दिसणारा संबंध अपेक्षित असा आहे. जास्त दैनंदिन वाचनवेळ असणाऱ्या गटात (चौथा स्तंभ) पदव्युत्तर किंवा अधिक शिक्षण असेल तर जास्त दैनंदिन वाचनकालावधी असण्याची शक्यता वाढते आहे आणि केवळ शालेय शिक्षण असेल तर जास्त दैनंदिन वाचनकालावधी असण्याची शक्यता कमी होते. हा निष्कर्ष शिक्षण आणि वाचन ह्यांच्याबद्दल आपल्या मनात जो पूर्वग्रह असतो त्याच्याशी जुळणारी आहे. इथे हे लक्षात घ्यायला हवं कि आपल्याला परस्परसंबंध (correlation) दिसत आहे, कार्यकारणभाव (causation) नव्हे. अधिक वाचनाची आवड हा अधिक शिक्षण असण्यासाठी कारणीभूत घटकांपैकी एक असू शकतो. [i]      


5.     वस्तीस्थानाचा दैनंदिन वाचनकालावधीशी असलेला संबंध हाही अपेक्षित असाच आहे. अधिक धकाधकी असलेल्या शहरांतील वाचकांत फरक नाही असे चित्र आहे. जिथे ही धकाधकी कमी आहे अशा शहरी भागांत आणि ग्रामीण भागात दैनंदिन वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. ग्रामीण भागाच्या संबंधाबाबत असं म्हणता येईल कि जर पुस्तकांची उपलब्धता आणि क्रयशक्ती हे घटक अनुकूल असतील (जे सर्वेक्षणात विचारात घेतलेले नाहीत[ii]) तर वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता जास्त होते असे असू शकेल.


6.     उपजीविकांच्या बाबतीतही नोकरी करणारी व्यक्ती ही अधिक व्यस्त असते ह्या पूर्वग्रहाशी जुळणारे निकाल आहेत. निवृत्त व्यक्ती, विद्यार्थी, अध्यापन-संशोधन-लिखाण करणाऱ्या व्यक्ती ह्यांचा दैनंदिन वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता नोकरदार व्यक्तीहून (जी अध्यापन-संशोधन-शिक्षण ह्यातील नोकरी करत नाही)  जास्त आहे. इथे विद्यार्थी ह्या गटाच्या संबंधाचा विचार ‘वय’ ह्या घटकासोबत केला तर असं दिसतं कि १९-३० वयोगटातील व्यक्ती विद्यार्थी अवस्थेतून अध्यापन-संशोधन-लिखाण ह्यांच्याशी संबंध नसलेल्या नोकरीत जाते तसा तिचा दैनंदिन वाचनकालावधी घटण्याची शक्यता वाढते.


7.     सांख्यिकीय मॉडेलची स्पष्टीकरण क्षमता मर्यादित आहे. क्रयशक्ती, दैनंदिन जीवनातील वेळेचा वापर, वाचनवारसा अशा अनेक महत्वाच्या  घटकांवर सर्वेक्षणात माहिती विचारली गेली नाही. [iii]


ह्या सगळ्या निष्कर्षांचा एकत्र विचार आणि सर्वेक्षणाच्या मर्यादा (एका ठराविक प्रकारचे वाचक आणि वरील मुद्दा 7) लक्षात घेता असं दिसतं कि डिजिटल समाजमाध्यमांवर असणाऱ्या मराठी वाचकांच्या वाचनकालावधीत स्त्री-पुरुष असा भेद दिसत नाही, विद्यार्थी अधिक वाचणारे आहेत ह्या आश्वस्त करणाऱ्या बाबी आहेत, पण महानगरांची आणि अध्यापन-संशोधन-लिखाण ह्या व्यतिरिक्त नोकऱ्यांची वाढलेली धकाधकी वाचनकालावधी कमी करते ही चिंतेत टाकणारी बाब आहे. ह्या दोन घटकांचा संबंध भौतिक समृद्धीशी आहे. येत्या काही वर्षांत अधिकाधिक तरुण व्यक्ती ह्या अशाच धकाधकीचा भाग होणार आहेत आणि ह्या अभ्यासात दिसणारे निष्कर्ष बरोबर असतील तर अशा व्यक्तींचा दैनदिन वाचनकालावधी घटेल अशी शक्यता आहे. साहजिक साहित्याच्या डिमांडवर ह्याचा परिणाम होणार आहे. अर्थात हा नक्त परिणाम दोन घटक परिणामांचा असणार आहे: विद्यार्थी गटाचे वाचन (जास्त) आणि नोकरदार (कमी). जर विद्यार्थी गटाचे परिणाम हा अधिक प्रभावी असेल तर नक्त परिणाम वाढता असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनसवयी हा महत्वाचा घटक ठरतो. वाचनव्यवहार वाढता राहणे ज्यांना हवे आहे त्यांनी catch them young कडे लक्ष द्यायला हवे. लोकांचा  वाचनकालावधी हा विद्यार्थीदशेतून नोकरी-व्यवसायात जाताना घटतो आणि जसे ते निवृत्तीकडे येतात तसा वाढतो, शेवटी त्यांना मिळू शकणाऱ्या निवांत बौद्धिक स्पेसचा हा मामला असावा. पण शहरांची धकाधकी ही मधल्या टप्प्यातील वाचन फारच घटवू शकते आणि निवृत्त/निवांत जगण्याचे वयही लांबवते. येत्या काळांत, ज्यांत समाजात ३१-५० वयोगटाचे प्रमाण वाढणार आहे आणि शहरीकरणही, त्यांत सुरुवातीला मराठी वाचनाची मागणी घटण्याचा कल दिसू शकतो, जो पुढे जाऊन बदलून वाढीकडे येऊ शकतो, जसे समाजातील ५० च्या पुढच्या वयांचे प्रमाण वाढेल. नवे वाचक बनणं आणि वाचणाऱ्या माणसाची वाचनाची खुमखुमी आयुष्याच्या मधल्या टप्प्यात टिकून राहणं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतील.   


समारोप


हा सर्वेक्षण मराठी वाचकांतील एका मर्यादित आणि कदाचित भौतिकदृष्ट्या संपन्न किंवा अधिक जागरूक  गटाचा सर्वेक्षण आहे. ह्या सर्वेक्षणाची डेटा मिळवायची पद्धत ही सर्वोत्तम नाही. ह्या मर्यादा लक्षात घेता सर्व्हेतील निष्कर्ष हे अधिक अभ्यासाची गरज अधोरेखित करण्यासाठी आहेत आणि कोणताही अंतिम धोरणात्मक निष्कर्ष ठरवायला नाही. मराठी भाषेबद्दलच्या समाजशास्त्रीय संशोधनात अधिक संख्यात्मक (quantitative) तंत्रांचा वापर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा सर्वेक्षण डेटा उपलब्ध आहे. मराठीतील लेखन-वाचन व्यवहार समृद्ध होण्याच्या प्रक्रियेत हा अभ्यास कारणी लागावा हीच आमची अपेक्षा आहे.   


अधिक अभ्यासाच्या काही स्वाभाविक दिशा असू शकतात. एखाद्या शहरातील व्यक्तींचा अधिक शास्त्रीय sampling द्वारे त्यांच्या वाचनसवयींबाबत सर्व्हे करणं, अधिक वाचणाऱ्या लोकांच्या वाचनसवयी कशा प्रत्यक्षात आल्या ह्यासाठी काही मुलाखती घेणं, विद्यार्थ्यांच्या वाचनसवयींबाबत होणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेणं अशी काही उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील भाषाविषयक प्रश्नांत रुची असलेल्या संशोधकांनी, त्यांना उपलब्ध संशोधन रिसोर्सेस ह्या प्रश्नाकडे वळवले तर असे अनेक अभ्यास प्रत्यक्षात येऊ शकतात. ह्या संशोधनाला मराठीच्या संदर्भातच मूल्य आहे असे नाही. विश्वरूपाकार इंग्रजीसमोर राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यात तोकड्या साऱ्याच भाषांसाठी असे प्रश्न महत्वाचे राहणार आहेत.  


https://kiranlimayeecoblog.blogspot.com/2021/01/blog-post_10.html?spref=fb&fbclid=IwAR0IDs1F8BpWACaj7gIDTLqUab1XgxDf2OPbSCJe1v_egP-nPXj6WpU_mGo

Thursday, July 9, 2020

राजगृह: जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र, विश्वाचे ज्ञानकेंद्र- प्रा. हरी नरके






दादर परिसरातील राजगृहाला तिहेरी महत्व आहे. मुळात तिथे पुस्तकं राहात होती आणि उरलेल्या जागेत आंबेडकर कुटूंबिय राहात होते. ते जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र/प्रेरणास्थान आणि सार्‍या विश्वाचे ज्ञानकेंद्र आहे. ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थळ हे फक्त एक घर नाही. १९३४ ते १९५६ या काळात बाबासाहेब तिथे राहात असत. त्यांनी अनेक पुस्तकं तिथं लिहिली. त्यांचे दोन मास्टरपीसेस "अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" आणि "वेटींग फॉर व्हीसा" इथेच लिहिले गेले. "स्वतंत्र मजूर पक्षाचा" जन्म इथेच झाला. २७ मे १९३५ मातोश्री रमाबाईंचे महानिर्वाण इथेच झाले. बाबासाहेब सुमारे २८ वर्षे मुंबईच्या चाळीतच राहिले. जेव्हा ते शासकीय विधी महाविद्यालयात प्रोफेसर झाले तेव्हा पोय बावडीची चाळीतली जागा पुस्तकांसाठी फारच अपुरी पडू लागल्याने दादरच्या हिंदू कॉलनीच्या परिसरात त्यांनी दोन प्लाॅट खरेदी केले. बॅंकेचे कर्ज काढून १९३१ ला राजगृहाचे बांधकाम त्यांनी सुरू केले. १९३३ च्या अखेरीस राजगृह बांधून तयार झाले. १९३४ च्या प्रारंभी बाबासाहेब, रमाबाई, यशवंतराव, लक्ष्मीबाई, मुकुंदराव हा आंबेडकर परिवार तिथे राहायला गेला.


आपल्या बंगल्याला "राजगृह" हे नाव देण्यामागे बाबासाहेबांचा एक ठाम विचार होता. बिहार मधल्या नालंदा जिल्ह्यातल्या राजगिर किंवा राजगृहला तथागत अनेकवेळा राहिलेले होते. त्यांनी त्याठिकाणी धम्मप्रवचने दिलेली होती. राजगृह ही मगधांची पहिली राजधानी. बिंबीसार व अजातशत्रू या बौद्ध राजांची कारकिर्द या शहराने पाहीली. सम्राट अशोकाने या स्थानाला भेट दिली होती. इ.स.पुर्व २००० मधील बांधकामाचे अवशेष या शहरात मिळतात. बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांचे पवित्र स्थान म्हणुन या शहराला महत्व आहे. पहिली बौद्ध धम्म संगिती इथेच झाली. "विनयपिटक" या पवित्र बौद्ध ग्रंथाची निर्मिती २२५० वर्षांपुर्वी इथेच झाली. या ग्रंथात महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख मिळतो.


 १९३३ मध्ये राजगृहाचे बांधकाम चालू असताना बाबासाहेबांनी त्यांचे मित्र सुभेदार सवादकर यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात आपला धर्मांतराचा निर्णय झालेला आहे व आपला कल बौद्ध धम्माकडे आहे असे त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे. येवल्याला त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी जी धर्मांतराची  महागर्जना केली ते भाषण राजगृहातच लिहिले गेले होते. काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडच्या चवदार तळ्याची केस लढण्याची तयारी करणे, शेतकर्‍यांची आंदोलने, खोती विरोधी बिल, कुटुंब नियोजन बिल ह्या सार्‍या ऎतिहासिक गोष्टी राजगृहावरच जन्माला आल्या.



जल उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा  या महत्वाच्या असल्या तरी त्यात भारनियमन /लोडशेडींग असू शकते. पण बाबासाहेबांच्या राजगृहातून मिळणारी बौद्धिक उर्जा मात्र कोणतेही भारनियमन नसलेली.


बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टींनी देशातला सर्वात मोठा खाजगी ग्रंथसंग्रह होता. सुरूवातीला त्यात ५० हजार ग्रंथ होते. त्यात सतत भर पडत राहिली. नंतर बाबासाहेबांचे बरेचसे वास्तव्य दिल्लीला राहिले. त्यामुळे राजगृहावरील काही पुस्तके तिकडे हलवण्यात आली. नंतर काही पुस्तके सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई व मिलिंद महाविद्यालय, औरंगाबादच्या ग्रंथालयांना दिली गेली.


बाबासाहेबांचा हा ग्रंथसंग्रह त्या काळात बनारस हिंदु विद्यापीठाचे मालवियजी आणि पिलानीचे बिर्ला शेट यांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांनी काही कोटी रुपये देऊ केलेले असताना व बाबासाहेबांना त्याकाळात आर्थिक निकड असतानाही बाबासाहेबांनी हा ग्रंथसंग्रह विकला नाही. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, " माझा समाज ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला शतकानुशतके ज्ञानाची उपासमार सोसावी लागली. त्यांची ही अपुरी राहिलेली तहानभुक माझ्या एकट्यामध्ये सामावलेली असल्याने मी रात्रंदिवस, प्रत्येक सेकंद वाचतच असतो."

राजगृह हे वाचन संस्कृतीचं माहेरघर आहे. ते सार्‍या जगाचे ज्ञानकेंद्र आहे. तमाम बौद्धांचे ते पवित्र तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थान आहे.

बाबासाहेब हे सामाजिक न्यायाचे व ज्ञान निर्मितीचे जागतिक प्रतिक आहेत. राजगृह हे ज्ञाननिर्मितीचे महाकेंद्र आहे.


- प्रा. हरी नरके,
हरी नरके, ९/७/२०२०



Sunday, April 12, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातील मास्टरपीस- प्रा. हरी नरके, भीमजयंती 20/1










डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२० ला १२९ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञाननिर्मिती, समता, सामाजिक न्याय आणि लोकशाही मुल्यव्यवस्था यांचे प्रतिक होत. या राष्ट्रपुरूषाने अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात शेपाचशे लोकांनाही जमणार नाही
असे पर्वताएव्हढे काम त्यांनी उभे केले.

त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे महाराष्ट्र शासनाने आजवर २२ खंड प्रकाशित केलेत. या पुस्तकांचे संपादन करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. स्मृतीशेष वसंत मून यांच्या निधनानंतर २००१ ते २००६ पर्यंत समितीचा संपादक व सदस्य सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावर महाराष्ट्र शासनाने सोपवली होती. त्याकाळात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणांचे अनेक खंड प्रसिद्ध केले. आधीचे जे मिळत नव्हते त्यांच्या सुधारित आवृत्त्या काढल्या. अनेक नव्या प्रकल्पांना गती दिली. गेली १४ वर्षे मी त्या समितीवर नाहीये तरिही सामान्य जनता आणि चळवळीतले कार्यकर्ते आजही मलाच त्या पुस्तकांबाबत विचारणा करतात, इतके या कामाशी माझे नाते जडलेले आहे.

डॉ. बाबासाहेबांचे मास्टरपीस :-

डॉ. बाबासाहेबांचे आम्ही काय वाचावे असा प्रश्न मला खूपदा विचारला जातो. त्यावर माझे उत्तर असते सर्वच्या सर्व २२ खंड वाचा. मग लोक म्हणतात, आमच्याकडे तेव्हढा वेळ नाही. निवडक पुस्तके सांगा. हा शॉर्टकट झाला. पण हरकत नाही. तुम्ही किमान दीड ते दोन तास बाजूला काढू शकता? वाचनाला देऊ शकता? तेव्हढ्या वेळात वाचायची डॉ. बाबासाहेबांची २ सर्वश्रेष्ठ पुस्तके मी तुम्हाला सांगतो. माझ्या मते हे डॉ. बाबासाहेबांचे मास्टरपीस आहेत. किमान हे तरी वाचाच वाचा. जे एव्हढेही वाचणार नाही त्यांनी बाबासाहेबांचे नावच न घेतलेले बरे!

१९३५ साली लिहिलेली ही २ पुस्तकं आहेत. ती आज मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. इंटरनेटवरही ती उपलब्ध आहेत. { लिंक्स खाली दिलेल्या आहेत. त्या न वाचताच, न पाहताच " लिंक्स द्या, ही पुस्तकं कुठं मिळतील?" असल्या विचारणा घाईघाईत करू नका}  ही आणि बाबासाहेबांची इतर सगळी पुस्तकं मिळण्याची ठिकाणे म्हणजे- मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या ५ शहरांमधील राज्य सरकारची पुस्तक दुकानं. ही पुस्तकं व्हीपीने पाठवली जात नाहीत. ती ऑनलाईन खरेदी करता येत नाहीत. ती पोस्टाने किंवा कुरियरनेही पाठवली जात नाहीत. काही खाजगी विक्रेते आणि काही खाजगी दुकानदार ही पुस्तके ठेवतात, त्यांच्याकडून ती तुम्हाला मिळू शकतील.

१. " अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट," हे लिहिलेले, प्रकाशित केलेले पण न झालेले भाषण आहे. पृष्ठसंख्या सुमारे ५०, शासकीय पुस्तकाची किंमत, रू. १५/- याचा समावेश शासनाच्या लेखन आणि भाषणांच्या पहिल्या खंडात केलेला आहे. याची मराठी भाषांतरे स्वतंत्रपणे प्रकाश सिरसट, वसंत मून आणि गौतम शिंदे यांनी केलेली आहेत. ही सगळी पुस्तके बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत.

२. " वेटींग फार ए व्हीजा," हे डॉ. बाबासाहेबांचे आत्मच्ररित्र आहे. ते हस्तलिखित स्वरूपात होते. ते १९९० साली प्रथम प्रकाशित झाले. त्याचा समावेश शासनाच्या लेखन आणि भाषणांच्या १२ व्या खंडात केलेला आहे. पृष्ठसंख्या सुमारे ३०, शासकीय पुस्तकाची {संपुर्ण खंडाची} किंमत, रू. ९५/- याची मराठी भाषांतरे भा.ल.भोळे, { डॉ. बाबासाहेब आंबेडकर- अनुभव आणि आठवणी, ले.सं. नानकचंद रत्तू, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९८, पृ.३१ ते ५१} आणि शंकरराव खरात, { डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा, इंद्रायणी साहित्य, पुणे, २०१८, } यांनी स्वतंत्रपणे केलेली आहेत. साकेत व इंद्रायणी प्रकाशनाची ही पुस्तके सगळीकडे मिळतात.
पहिले पुस्तक वैचारिक, समाजशास्त्रीय दस्तावेज असे आहे. जातीपातींवर लिहिल्या गेलेल्या हजारो पुस्तकांमधले आऊटस्टॅंडींग म्हणता येईल असे हे सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे.

दुसरे आत्मचरित्रपर आहे. पहिल्याच्या वाचनाने भारतीय समाजाचे आपले आकलन लख्ख होते, डोळे खाडकन उघडतात तर दुसर्‍याच्या वाचनाने बाबासाहेबांविषयी, त्यांच्या आयुष्यातील संघर्षाविषयी जाणून डोळ्यात आसवं येतात. ह्या महामानवाची ही संघर्षगाथा परिवर्तनाची आस जागवते. लढण्यासाठी बळ देते.

- प्रा. हरी नरके,१२/०४/२०२०

वाचनासाठी लिंक्स:-

http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html 
http://drambedkar.co.in/wp-content/uploads/books/category2/6waiting-for-a-visa.pdf
http://ccnmtl.columbia.edu/projects/mmt/ambedkar/web/readings/aoc_print_2004.pdf
https://books.google.co.in/books?id=Eio8BQAAQBAJ&printsec=frontcover&source=gbs_ge_summary_r&cad=0#v=onepage&q&f=false

पुस्तके मिळण्याची ठिकाणे- शासकीय ग्रंथ भांडार -
१. शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथ भांडार, जिल्हाधिकारी कार्यालय व जनरल पोस्ट ऑफिस यांच्या शेजारी,
पुणे स्टेशन, पुणे ४११००१
२. मध्यवर्ती शासकीय ग्रंथ भांडार, चर्नी रोड रेल्वे स्टेशन लगत, मुंबई, ४०० ००४
३. शासकीय ग्रंथ भांडार, तारा राणी पार्क, कोल्हापूर,
४. शासकीय ग्रंथ भांडार,सिव्हील लाईन्स, नागपूर,
५. शासकीय ग्रंथ भांडार, रेल्वे स्टेशन पुलालगत, औरंगाबाद

** पुस्तक पेठ, लक्ष्मीछाया इमारत, आयडीयल कॉलनी ग्राऊंडजवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८ येथे
मराठी, इंग्रजी, हिन्दीतील सर्व पुस्तके मिळतात.
पुस्तक पेठ
pustakpeth@gmail.com

Sanjay Bhaskar Joshi
sanjaybhaskarj@gmail.com

Madhav Vaishampayan
madhavvaisham@gmail.com

कृपया संपर्क करा-
संजय भास्कर जोशी,09822003411

Monday, March 23, 2020

संग्रही असलेली, एकदा वा अनेकदा वाचलेली काही आवडती पुस्तकं



१. लिळाचरित्र, चक्रधर स्वामी २. तुकाराम गाथा, संत तुकाराम, ३. धग, उद्धव शेळके, ४. संत वाड्मयाची सामाजिक फलश्रुती, गं. बा. सरदार, ५. कोसला, डॉ. भालचंद्र नेमाडे, ६. राधामाधवविलासचंपू, संपादक वि.का. राजवाडे, ७. मृत्युंजय, शिवाजी सावंत, ८. गाथा सप्तसती, ९. श्यामची आई, साने गुरूजी, १०. मनुस्मृती : काही विचार, नरहर कुरूंदकर, ११. स्मृतीचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, १२. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, वि.का.राजवाडे, १३. पोटमारा, रवीन्द्र पांढरे, १४. जागर, नरहर कुरूंदकर, १५. रामनगरी, राम नगरकर, १६. युगांत, इरावती कर्वे, १७. बलुतं, दया पवार, १८. गावगाडा, त्रिं. ना. आत्रे, १९. आठवणीचे पक्षी, प्र. ई. सोनकांबळे, २०. भाऊसाहेबांची बखर,

२१. एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर, २२. रणांगण, विश्राम बेडेकर, २३. वैर्‍याची एक रात्र, व्होल्गा ल्येंगेल, अनु. जी. ए. कुलकर्णी,  २४. एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर, २५. आणि माणसाचा मुडदा पडला, रामानंद सागर, २६. बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर, २७. माझा प्रवास, वरसईकर गोडसे, २८. झाडाझडती, विश्वास पाटील,  २९. शिवाजी जीवन रहस्य, नरहर कुरूंदकर, ३०. शाळा, मिलिंद बोकील, ३१. शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे, ३२. सती, प्रविण पाटकर, ३३. विद्रोही तुकाराम, डॉ. आ.ह. साळुंखे,  ३४. रारंग ढांग, प्रभाकर पेंढारकर, ३५. मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, डॉ. आ.ह. साळुंखे,   ३६. हंस अकेला, मेघना पेठे,  ३७. बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३८. मुंबई दिनांक, अरूण साधू, ३९. फकीरा, अण्णाभाऊ साठे, ४०. जातीसंस्थेचे निर्मुलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

४१. गोलपीठा, नामदेव ढसाळ, ४२. सिंहासन, अरूण साधू, ४३. शतकाचा संधीकाल, दिलीप चित्रे, ४४. नागीण, चारूता सागर, ४५. श्री विठ्ठल : एक महासमन्वय, डॉ. रा.चिं. ढेरे, ४६. ताम्रपट, रंगनाथ पठारे, ४७. शेतकर्‍याचा असूड, महात्मा जोतीराव फुले, ४८. सात पाटील कुलवृत्तांत, रंगनाथ पठारे, ४९. सेकंड सेक्स, सिमॉन दि बोव्हा, ५०. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, जयंत पवार, ५१. अक्षरनिष्ठांची मांदियळी, डॉ. अरूण टिकेकर, ५२. इडापिडा टळो, आसाराम लोमटे, ५३. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, आनंद विंगकर, ५४. गुलामगिरी, महात्मा जोतीराव फुले, ५५. भिजकी वही, अरूण कोलटकर, ५६. वासुनाका, भाऊ पाध्ये, ५७. लांबा उगवे आगरी, डॉ. म.सु.पाटील, ५८. झोत, डॉ. रावसाहेब कसबे, ५९. पिंगळावेळ, जी.ए.कुलकर्णी, ६०. प्रकाशाची सावली, दिनकर जोषी,

६१. तमस, भीष्म सहानी, ६२. तुघलक, गिरिश कार्नाड, ६३. घासीराम कोतवाल, विजय तेंडुलकर, ६४. वाडा चिरेबंदी, महेश एलकुंचवार, ६५. शांतता कोर्ट चालू आहे, विजय तेंडुलकर, ६६. चक्र, जयवंत दळवी, ६७. बळी, मालती बेडेकर, ६८. मेटकॉफ हाऊस ते राजभवन, राम प्रधान, ६९. मर्ढेकरांची कविता, बा.सी. मर्ढेकर, ७०. शतपत्रे, लोकहितवादी, ७१. आहे मनोहर तरी, सुनिता देशपांडे, ७२. व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे, ७३. बदलता भारत, भानू काळे, ७४. हमरस्ता नाकारताना, सरिता आवाड, ७५. लेखकाची गोष्ट, विश्राम गुप्ते, ७६. शोध, मुरलीधर खैरनार, ७७. माणसं, डॉ. अनिल अवचट, ७८. जेव्हा मी जात चोरली होती, बाबुराव बागूल, ७९. स्त्रीपुरूष तुलना, ताराबाई शिंदे, ८०. प्राचीन महाराष्ट्र, डॉ. श्री.व्यं. केतकर,

८१. मी कसा झालो, आचार्य अत्रे, ८२. माणसं आरभाट आणि चिल्लर, जी. ए. कुलकर्णी, ८३. प्रतिस्पर्धी, किरण नगरकर, ८४. बियॉण्ड दि लाईन्स, कुलदीप नय्यर, ८५. अजुनि वाढताती झाडे, रस्किन बॉण्ड, ८६. मैला आंचल, फनिश्वरनाथ रेणू, ८७. राग दरबारी, श्रीलाल शुक्ल, ८८. आत्मरंगी. रस्किन बॉण्ड, ८९. गोदान, प्रेमचंद, ९०. चालत दुरूनी आलो मागे, राजेंद्र यादव, ९१. तिरिछ, उदय प्रकाश, ९२. सेपियन्स, युवाल नोवा हरारी, ९३. माणूस, मनोहर तल्हार, ९४. रंग माझा वेगळा, सुरेश भट, ९५. आठवले तसे, दुर्गा भागवत, ९६. घातचक्र- अरूण गद्रे, ९७. क्लोरोफॉर्म, डॉ. अरूण लिमये, ९८. समग्र विंदा, विंदा करंदीकर, ९९. एक कहाणी अशीही, मन्नू भंडारी, १००. ओअ‍ॅसिशच्या शोधात, फादर फ्रान्सीस दिब्रिटो,

१०१. नचिकेताचे उपाख्यान, संजय भास्कर जोशी, १०२. चिरदाह, भारत सासणे, १०३. पण लक्षात कोण घेतो? हरी नारायण आपटे, १०४. बिढार, जरीला, झूल, हूल, हिंदू , डॉ. भालचंद्र नेमाडे, १०९. भुमी, सेतू, आशा बगे, १११. होमो डेअस, युवाल नोवा हरारी, ११२. एका कोळीयाने, पु. ल. देशपांडे, ११३. हसरे दु:ख, भा. द. खेर, ११४. उदकाचिये आर्ती, मिलिंद बोकील, ११५. वारूळ, बाबाराव मुसळे, ११६. शुभ्र काही जीवघेणे, अंबरिश मिश्र, ११७. शोध राजीव हत्त्येचा, डी. कार्तिकेयन, ११८. फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट, डॉमनिक लॅपिए, ११९. मुकज्जी, शिवराम कारंत, १२०. कर्वालो, के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र, १२१. खेळता खेळता आयुष्य, गिरीश कार्नाड, १२२. संवादु अनुवादू, उमा कुलकर्णी. १२३. सिटी ऑफ जॉय, डॉमनिक लॅपिए, १२४. महात्मा फुले : पंढरीनाथ सीताराम पाटील, १२५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, १२६. आसूरवेद, आणि पानिपत, संजय सोनवणी, १२८. रस अनौरस, राजन खान, १२९. मोराची बायको, किरण येले, १३०. निळ्या डोळ्याची मुलगी, शिल्पा कांबळे,
१३१. वेटींग फॉर व्हीजा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १३२. धर्मशास्त्राचा इतिहास, पा.वां.काणे, अनु. यशवंत आबाजी भट, 
तुम्ही यातली किती वाचली आहेत?

-प्रा.हरी नरके, २३ मार्च, २०२०


*** टीप- ही यादी सर्वसमावेशक नाही. माझ्या संग्रही चाळीस हजार पुस्तकं आहेत. मी अनेक ग्रंथालयांचा सदस्य आहे. माझ्या मित्रांचाही समृद्ध ग्रंथसंग्रह आहे. त्यातून मी वाचलेल्या पुस्तकातली मला आवडलेली एकुण पुस्तकं किमान एक हजार तरी भरतील. मला आवडलेली असूनसुद्धा जागेअभावी किमान ८६८ पुस्तकं या यादीत आलेली नाहीत. जी पुस्तकं या यादीत आलेली नाहीत त्यांच्या कर्त्यांनी लगेच नाराज होऊन हेत्वारोप करू नयेत. किंवा यादीत नाहीत याचा अर्थ ती पुस्तकं मी वाचलेलीच नाहीत असाही अर्थ लावू नये. एखादा पुरस्कार मिळाला म्हणून ते पुस्तक मला आवडलेच पाहिजे असा आग्रह कशासाठी?

काडा मनलो अस्तो तर काडलो अस्तो बगा

१. " डागतर, पईले दावलो तवा फकस्त पू येऊलालाता, आता वास घान मारूलालाय." पेशंट तक्रार करीत होता.
कान तपासला. त्यानं कानात ठेवलेला कापसाचा बोळा काढला. बघतो तर आत दुसरा बोळा. तो काढला तर काय आत तिसरा बोळा. एकुण सात बोळे काढले. त्यानं ठोकून ठोकून सातसात बोळे कोंबल्यामुळे दुर्गंधी येत होती. मी चिडलो. हा काय मुर्खपणा आहे? तर तो म्हणाला," सायब, तुमीच मनलो व्हतो की आंगोळीच्या टायमाला कानात कापसाचा बोळा ठिवा मनून, म्हनुन ठिवलो. आंगोळ जाल्यावर काडा मनलो अस्तो तर काडलो अस्तो बगा. माजी काय चूक?" मी कपाळाला हात लावला. कानात ठेवलेला बोळा आंघोळीनंतर काढा असं मी कुठं सांगितलं होतं हा त्याचा प्रश्न बिनतोड होता.

२. एका पेशंटनं मला बुचकळ्यात टाकलं. " डागतर, तुमी गोळ्या तर दिलाव, पन जिरंना गेल्यात. अप्पूट जाईनाबी गेलीय. आन जिरंनाबी गेलीय. काय उपेग?" सखोल विचारपूस केल्यावर कळलं, तो काय म्हणतोय ते. त्याचं म्हणणं गोळी कानात जात नाहीये. दोन तुकडे करून घातली तरी ती कानात जिरत नाहीये.
तुम्हाला गोळी कानात घालायला कोणी सांगितलं? अहो ती तोंडातून घ्यायची गोळी आहे.
कानात घालायच्या ड्रॉपच्या खाली गोळ्या लिहिल्याने त्यानं गोळी पण कानात घालायचीय असा समज करून घेतलेला.

३. शाखेत जाणारा मित्र सांगत होता, त्याला एक दिवस आदेश मिळाला, "लोहगाव विमानतळावर जायचें. तिथे दिल्लीवरून *** *** **** येतील. त्यांना घेऊन शाखेवर यायचें.
आणि हो, काही कारणानें ते आले नाहीत तर तू मात्र परत यायचें हो, काय समजलें?"
सुचना कशा फुलप्रूफ हव्यात.

फटाके, ढोल, महाआरत्या, वाजतगाजत मिरवणुका, शेकडोंनी एकत्र जमून केलेला जल्लोश, हे बघितलं की हा देश किती महान लोकांचा आहे त्याचे दर्शन होते.
जे सर्वांचे होणार तेच आपल्याही वाट्याला येणार. कारण आपण सारे एकाच हवेत श्वास घेतो. सर्वांची नियती एकच.

वाजवा म्हणताना वाजवून झालं की थांबा असंही सांगायला लागतंय, हे अनुभवी लोक कसे काय विसरले? की त्यांनाही हेच हवं होतं?

-प्रा.हरी नरके, २३ मार्च २०२०

१ व २ चा संदर्भ- डॉ. संजय कुलकर्णी, कुलकर्ण्याचा दवाखाना, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१९,

Sunday, March 22, 2020

ज्यांना कंटाळा परवडतो त्यांचा मला हेवा वाटतो- प्रा. हरी नरके












ज्यांना कंटाळा परवडतो त्यांचा मला हेवा वाटतो- प्रा. हरी नरके
नुकतीच एक कादंबरी वाचली. त्यातला नायक सतत म्हणत असतो, कंटाळा आला. घरात बसून बसून कंटाळा आला अशी तक्रार काही लोक बर्‍याचदा करतात. मला कळत नाही हे बोअर होण्याचे औषद मिळते कोण्या दुकानात? कोणत्या पिठाच्या गिरणीतले पीठ खाल्ले की कंटाळा येतो? मला कळायला लागले, तेव्हापासूनचे जे आठवते त्यात कंटाळा आला होता असा एकही क्षण माझ्या वाट्याला आलेला नाहीये. लहान असताना सकाळी एक नोकरी, दुपारी शाळा, संध्याकाळी दुसरी नोकरी या रगाड्यात कंटाळ्याची चैन कधी परवडलीच नाही.

पुस्तकं वाचता यायला लागली, त्यांची गोडी लागली तसी पुस्तकं विकत घ्यायची सवय जडली. आज घरात सुमारे ४०,००० [चाळीस हजार] पुस्तकं असताना, त्यातली किमान पाचशेक तरी वाचायची बाकी असताना कंटाळ्यासाठी वेळच काढता येत नाही मला. एक वैचारिक पुस्तक वाचलं की दुसरं ललित वाचायचं. यासाठी समोर शेकडो पुस्तकं प्रतिक्षेत असताना कंटाळा आसपास फिरकूच शकत नाही. आमच्यासारख्या ज्यांना बिडी, काडी, सिगारेट, गुटका, दारू, तंबाखू, गांजा यांची कुणाचीच साथ परवडत नाही त्यांना पुस्तकं सोबत असली की दिवसरात्रीचे २४ तास कमी पडतात राव. ज्यांना कंटाळा परवडतो त्यांचा मला खरंच हेवा वाटतो.
-प्रा.हरी नरके, २२ मार्च २०२०

........................................

घरात बसा, बाहेर फिरु नका अशी आर्जवं का करायला लागताहेत? लहान मुलांचं एकवेळ ठीकाय,पण प्रौढांना असं बाबापुता का करावं लागावं?
सगळेच अश्या पोस्टी टाकायलेत, त्याचा परिणाम उलटाच होऊ नये म्हणजे मिळवली. रविवारी घरात बसणं इतकं कष्टाचं असतं? इतकं अवघड की त्यासाठी दुसर्‍यांनी इनंती करायला लागत्येय?
आमच्या महाविद्यालयात राज्यपातळीवरील एकांकिका स्पर्धा भरवण्यात आली होती. आमच्या प्राचार्यांनी त्यासाठी विषय दिला होता, "दारू वाईट असते!"
राज्यभरातून ६३ संघ आले होते. सलग तीन दिवस दररोज प्रत्येकी २१ एकांकिका बघून परिक्षकांवर झालेला परिणाम फारच नामी होता.
पुरस्कार वितरण समारंभात बोलताना मुख्य परिक्षक म्हणाले, " तीन दिवस दारू वाईट असते याचा इतका मारा झालाय की आज घरी गेल्यावर लावल्याशिवाय काही पर्याय नाही बघा!"
-प्रा. हरी नरके, २१/०३/२०२०


Monday, December 30, 2019

जातिव्यवस्थेचा शोध घेणारा मौलिक ग्रंथ





जातिव्यवस्थेचा शोध घेणारा मौलिक ग्रंथ-प्रा.हरी नरके


श्री सुनिल सांगळे यांनी "जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जातीजमाती" हा ग्रंथ लिहून अतिशय मोलाचे काम केलेले आहे. जातीपातींचा विषय हा अस्मितेचा आणि वादंगाचा विषय असतो. अलिकडे तर तो अतिशय ज्वलंत किंबहुना स्फोटक विषय बनलेला आहे. या वादग्रस्त विषयाला हात लावण्याची हिंमत आज भलेभले विद्वानही करताना दिसत नाहीत. कोणाच्या भावना कधी दुखावल्या जातील आणि कधी रान पेटेल याची शाश्वती राहिलेली नाही. अशा काळात एक अतिनाजुक बनलेला विषय ज्या प्रगल्भपणे सांगळे यांनी उलगडून दाखवला आहे, ज्या संयमाने आणि समतोलपणे मांडणी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांचे मी सर्वप्रथम हार्दीक अभिनंदन करतो. सांगळे यांच्या या पुस्तकाद्वारे एका विपरित सामाजिक व्यवस्थेची केलेली उकल ही सर्वांनाच आत्मपरिक्षणाला प्रवृत्त करेल असा मला भरवसा वाटतो.

या विषयावर मराठी व इंगजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. त्यातली डॉ. श्री. व्यं. केतकर, डॉ. गो.स. घुर्ये, डॉ. इरावतीबाई कर्वे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आर. ई. इंथोवेन, रसेल - हिरालाल, त्रिं. ना. आत्रे आदींची पुस्तकं महत्वाची आहेत. बाकी इतर भाराभर पुस्तकातली बहुतांश पुस्तकं एकतर सवंग, उथळ, कंठाळी तरी आहेत किंवा विद्वतजड तरी आहेत. ही दोन्ही टोकं टाळून सांगळे यांनी अतिशय सोप्या, प्रवाही, सुबोध भाषेत ही रचना केलेली आहे. हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांसाठी असला तरी संशोधक-अभ्यासकांनाही तो उपयुक्त ठरेल असा झालेला आहे.
याविषयावरील अक्षरश: डझनावारी ग्रंथांचा शोध घेऊन त्यातले विवेचन आपल्या सोप्या भाषेत सांगळे आपल्याला उपलब्ध करून देतात. बोजड लिहिणे सोपे असते. मात्र सोपे लिहिणे सर्वात अवघड असते. सोपं लिहिण्याच्या या कसोटीत सांगळे अव्वल ठरलेले आहेत. विषय सोपा करतानाही त्याचे मर्म किंवा गाभा सांगळे चिमटीत पकडून आपल्यासमोर सादर करतात.

खरंतर सांगळे यांनी कोणत्याही पीएच.डी. प्रबंधापेक्षा सरस कामगिरी केलेली आहे. एखाद्या विद्यापीठाने त्यांच्या या पुस्तकाचा मानद पदवीसाठी विचार करायला हवा. सांगळे एक निवृत्त सनदी अधिकारी असतानाही त्यांचे वाचन चौफेर असावे याचा आनंद वाटतो. या विषयातली बहुतांश महत्वाची संदर्भ पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत व त्याचे संदर्भ पुस्तकात दिलेले आहेत. हे पुस्तक वाचणारांना ही मूळ संदर्भ पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो.

मुळांचा शोध घेण्याची माणसाला अनावर ओढ असते. आपल्या जातीप्रधान देशात आपापल्या जातींबद्दल माहिती घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. बर्‍याचदा अशी माहिती निव्वळ ऎकिव असते. तिच्यामध्ये पुर्वगौरवाची भावना दडलेली असते. भारतीय समाज जातीपातींनी बनलेला समाज आहे. त्यातल्या काही जाती या व्यवस्थेच्या लाभार्थी असल्याने त्या एनकेण प्रकारेन या व्यवस्थेचे गोडवे गात असतात. तर ज्या या व्यवस्थेचे बळी आहेत तेही अज्ञानापोटी या व्यवस्थेचे वाहक बनतात. भारतीय समाजात उदात्तीकरण आणि मौन धारण करणे ही दोन षडयंत्रे सतत शिजत असतात. एक उच्चवर्णीय, पुरूषप्रधान, श्रीमंत मंडळींचे उदात्तीकरण करणे आणि दुसरे लिंगभाव, जात आणि वर्ग व्यवस्थेने ज्यांचे अतोनात शोषण केलेले आहे, पक्षपात आणि भेदभाव केलेला आहे त्यांच्या समस्यांबद्दल मौन धारण करणे. सांगळे मात्र या दोन्ही षडयंत्रांना नकार देतात आणि एका अभ्यासकाच्या नात्याने हा विषय निर्भयपणे आपल्याला समजाऊन सांगतात.

सांगळे यांनी अक्षरश: शेकडो जातींची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. तथापि हे केवळ माहितीचे संकलन नाही तर तिचे सम्यक विश्लेषण आणि समतोल सत्यशोधन या ग्रंथात केलेले आहे.
मनु, कौटिल्य, विविध स्मृतीकार यांचे दाखले सांगळे यांनी दिलेले आहेत. साडेतीन हजार वर्षांचा प्रवास रेखाटताना विद्यमान राष्ट्रपती श्री रामानाथ कोविंद यांचा पुरीच्या मंदिरात कसा अपमान केला गेला यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर शबरीमाला, शनि शिंगनापूर इथल्याही घटनांची आठवण त्यांनी करून दिलेली आहे. उच्चभ्रू आरक्षण विरोधक विद्यमान सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तवाकडे कशी डोळेझाक करतात यावरही झगझगीत प्रकाशझोत त्यांनी टाकलेला आहे.



ब्रिटीश राजवटीत हा देश, इथली माणसं समजाऊन घेण्यासाठी विल्सन, रसेल, इंथोवेन, क्रूक, रिस्ले, केनडी आदींनी या विषयांचा धांडोळा घेणारी पुस्तके लिहिली. दर दहा वर्षांनी जनगणना करून ही माहिती अद्ययावत करण्याची व गॅझिटियर मार्फत जिल्हावार अभ्यास उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाद्वारे या विषयाची तोंडओळख करून देण्याची गरज त्यांना वाटली.

त्यातून जातवार धर्मशाळा, संस्था, जातपंचायती, शाळा, महाविद्यालये, बॅंका, पेठा जन्माला आल्या. जातजाणिवा अधिक धारदार झाल्या. जातीव्यवस्था ही मनोर्‍यासारखी व्यवस्था असल्याने प्रत्येक जात आपण वरचे आहोत हे दाखवण्याचा खटाटोप करीत असते. समाज शास्त्रज्ञ डॉ. एम.एन. श्रीनिवासन म्हणतात त्याप्रमाणे " संस्कृतीकरणाचा " सिंद्धांत अर्थात वरच्यांचे अनुकरण करण्याची वृत्ती हा भारतीय जातींचा याकाळातला स्थायीभाव दिसतो.

महात्मा फुल्यांनी १८६९ साली न्यायासाठी आरक्षण द्या अशी मागणी केली. राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण आले. त्यानंतर मात्र जादूची कांडी फिरावी तशी जातींची उतरंड आरक्षणाच्या रांगेत उभी राहिली. आपली जात कशी आणि किती मागासलेली आहे हे मांडण्याची, सिद्ध करण्याची चढाओढच लागली. त्यासाठी उग्र आणि प्रसंगी हिंसक आंदोलने होऊ लागली.
स्वतंत्र भारताचे मंडलपुर्व भारत आणि मंडलोत्तर भारत असे प्रवासाचे दोन ठळक कालखंड बनले.

जातीव्यवस्थेने कामांचे वाटप केले, ती जन्मावर आधारित नव्हती, ती कामांवर आधारित होती अशा प्रकारचे समर्थन कायम केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मौलिक पुस्तकांद्वारे या मांडणीचे समर्पक खंडन केलेले आहे. मुळात ही व्यवस्था श्रमाचे वाटप करणारी नव्हती तर ती जन्मावर आधारित श्रमिकांचे वाटप करणारी अतिशय काटेकोर मनोर्‍याची रचना होती. तिने विषमतेचे श्रेणीबद्ध वाटप केले होते. जातीव्यवस्था मुलत: आर्थिक वाटप करणारी, शासनाच्या राजदंडाच्या आधारे चालवली जाणारी व्यवस्था होती.तिने शुद्र, अतिशुद्र आणि स्त्रिया यांचे वारेमाप शोषण केले, त्यांचे मानवी अधिकार हिरावून घेतले याकडे सांगळे लक्ष वेधतात. ही व्यवस्था हिंदुंइतकीच मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख आदी धर्मातही कशी पसरली यावरही ते भाष्य करतात.

सांगळे यांनी स्वामी विवेकानंद, ताराबाई शिंदे, लोकहितवादी, विविध दलित-भटक्यांच्या आत्मकथनांचे लेखक आदींचे दाखले देऊन विषयाचे सुबोध आकलन सादर केलेले आहे.
महाराष्ट्रातील शेकडो जातींची सांगळे यांनी दिलेली माहिती समजाऊन घेण्यासाठी तरी कार्यकर्ते, वाचक आणि अभ्यासक ह्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवले पाहिजे. सुनिल सांगळे व संजय सोनवणी यांच्यासारखे नव्या समाजथरातले लेखक या विषयावर अभ्यासपुर्ण मांडणी करताना बघितले की आजवर खिळखिळी न होणारी ही व्यवस्था निदान किलकिली तरी होईल अशी उमेद वाटू लागते.
आजच्या आधुनिक युगात ही व्यवस्था कालबाह्य झालेली आहे, आज सगळ्यात महत्वाची आहे ती अर्थसत्ता. सारे जग तिकडे झेपावत असताना मध्ययुगीन जातीय मानसिकतेत लोळत पडलेल्या आपल्या समाजाला जातीसंघर्ष काबूत ठेवण्याची हाक सांगळे देतात.
सांगळे यांच्या या समतोल, सम्यक आणि अभ्यासपुर्ण शोधग्रंथाचे स्वागत होईल असा मला विश्वास वाटतो.
- प्रा.हरी नरके,
सदस्य- राज्य मागासवर्ग आयोग, [नि.]

पृष्ठे ३३२, किंमत रू.३५०/-
ग्रंथाली प्रकाशन,माटुंगा, मुंबई, संपर्क- ०२२- २४२१६०५७,२४३०६६२४
granthaliruchee@gmail.com

Tuesday, October 22, 2019

मोबाईलमग्न बहुजन नाटक आणि ग्रंथांकडे का वळत नाहीत?

मोबाईलमग्न बहुजन नाटक आणि ग्रंथांकडे का वळत नाहीत?- प्रा.हरी नरके
आज बहुजन समाज शिकून सवरून महत्वाच्या पदांवर पोचलाय. काहींचे पगार इतके मुबलक आहेत की त्या पैशांचं काय करावं असा त्यांना प्रश्न पडतो.

शिक्षक, प्राध्यापक, सरकारी अधिकारी, खाजगी क्षेत्रातील पगारदार अशा बहुजनांची राज्यातली संख्या किमान १ कोटी असावी.

हा समाज शिकला सवरला पण पुस्तकांकडे वळला नाही. यातल्या ९९% लोकांच्या घरी एकही पुस्तक आढळणार नाही. ही माणसं मॉलमध्ये जाऊन भरमसाठ खरेदी करतील पण एकही दिवाळी अंक विकत घेणार नाहीत.

उथळ, भंपक, कंगालीकरण आणि सुमारीकरण असलेल्या हिन्दी मराठी टिव्ही कार्यक्रमात संपुर्ण बुडालेला हा समाज नाटकं बघायला मात्र कधीही फिरकत नाही.
बहुजनांचा ज्ञाननिर्मितीशी असा उभा दावा का?

सत्ताधारी झाले, श्रीमंत झाले, शिक्षण संस्थांचे मालक झाले, अधिकारी बनले पण हे बहुजन वाचनाकडे का वळले नसावेत?

व्हॉटसॲपवर २४ तास रमणारा हा स्त्रीपुरूष जमाव झुंडीत लवकर शिरतो, मग त्याला ग्रंथसंग्रहाचे वावडे का?
१% पेक्षा जास्त बहुजन वाचन-लेखन, संशोधन, ओपनियन मेकींग यांच्या फंदात पडत नाहीत. बहुजन प्राध्यापक,शिक्षक, अधिकारी,पत्रकार वाचन, वैचारिक चर्चा,व्यासंग, सर्जन/निर्मितीच्या क्षेत्रात दिसतात असा आरोप मी करणार नाही.

कुठे चुकले? काय चुकले?

हे असे का?

कोणी सांगेल ?

प्रा.हरी नरके, २२/१०/२०१९

Saturday, July 6, 2019

पुस्तकं महाग करून मोदी सरकारने लावला वाचन संस्कृतीला हातभार





परदेशातून येणार्‍या पुस्तकांवर मोदी सरकारने ५ टक्के सीमाशुल्क लागू केले आहे. त्यामुळे यापुर्वी २ किंवा तीन हजार रूपयांना मिळणारे पुस्तक शंभर ते दीडशे रूपयांनी आता महाग होईल. त्यामुळे पुस्तक खरेदीत वाढ होईल. वाचन संस्कृतीचा विकास होईल. आजवर न वाचणारे, ग्रंथ खरेदी न करणारे तमाम भारतीय प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तकं विकत घेऊ लागतील. महारष्ट्रासारख्या अतिप्रगत राज्यात ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये वैचारिक-साहित्यविषयक पुस्तकांचे एकही  दुकान नाही. १६ महानगरपालिका क्षेत्रात असे ग्रंथ मिळण्याची सोयच नाही. आता आहेत तीही दुकाने बंद होतील.
या मेहरबानीबद्दल पंप्र, "ग्रंथप्रेमी" नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री, "वाचन विरांगना" निर्मला सितारामन यांना धन्यवाद.
नाहीतरी पुस्तकं वाचणारे लोक डेंजरस असतात. ते विचार करतात. प्रश्न विचारतात. देशाला निबुद्धीकरणाची लस टोचायची असेल तर याहून जालीम उपाय करायला हवा. ५ टक्क्यांवरून हे सीमाशुल्क किमान ५०० टक्क्यांएव्हढे वाढवणे गरजेचे आहे. आदेशसंस्कृतीला वाचन संस्कृती बाधक असल्याने तिच्यावर खरं म्हणजे कडक कायदे करून बंदीच आणायला हवी. पुस्तकांना जीएसटीही लावा. प्रकाशकांकडून २०० टक्के अबकारी कर घ्या. पुस्तकविक्री केंद्रांवर बंदी घाला. यापुढे ज्यांच्या घरात पुस्तकं सापडतील त्यांना देशातून थेट तडीपारच करा.
- प्रा.हरी नरके, ६ जुलै २०१९

Wednesday, June 19, 2019

वेटींग फॉर व्हिसा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मास्टरपीस












"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" या मालिकेतील खंड १ ते २२ वाचणे ही अभ्यासकांसाठी अविस्मरणीय मेजवानी असते. विद्वत्ता, विज्डम, संशोधन, लेखन यांचे जागतिक मानदंड म्हणजे हे ग्रंथ होत. ज्यांना आपला भारतीय समाज आणि १८९१ ते १९५६ चा काळ याबद्दलचे दस्तऎवज वाचायचे असतील त्यांनी हे ग्रंथ वाचायलाच हवेत.

तथापि काही कारणांनी ज्यांना हे सगळे ग्रंथ वाचता येणे शक्य नसेल त्यांनी त्यातले किमान पाच ग्रंथ तरी वाचायलाच हवेत.
त्यातला मास्टरपीस म्हणजे वेटींग फॉर व्हिसा.

एक विलक्षण ग्रंथ.

हे पुस्तक वाचून ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, जे लोक हेलावणार नाहीत ती माणसेच नव्हेत.
हे बाबासाहेबांचे संक्षिप्त आत्मचरित्र आहे. अतिशय चटका लावणारे, गलबलून सोडणारे.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" या मालिकेतील खंड क्र.१२ मध्ये आम्ही ते छापलेले आहे. [पाहा- पृ. क्रमांक ६५९ ते ६९२] न्य़ुयार्कच्या कोलंबिया विद्यापीठाने हे पुस्तक आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सचिव श्री नानकचंद रत्तू  यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी", हा मराठी अनुवाद प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे, यांनी केला आहे. त्या मराठी अनुवादात " प्रवेश परवान्याच्या प्रतीक्षेत " सदर ग्रंथ समाविष्ट आहे. साकेत प्रकाशन, औरंगाबाद, यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला असून त्याची तिसरी आवृत्ती-२०१५, ही अवघ्या रू.१७५/- ला सर्वत्र उपलब्ध आहे.
ह्या पुस्तकाचे हस्तलिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरात उपलब्ध आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहात ते आजही आहे. त्यांनी हे पुस्तक १९ मार्च १९९० ला प्रकाशित केले. राज्य शासनाने बाबासाहेबांचा हा १२ वा खंड १४ एप्रिल १९९३ ला प्रकाशित केलेला असून सुमारे ८०० पृष्ठांचे रॉयल आक्टोव्ह आकारातील हे पुस्तक अवघ्या ९५ रूपयांना सर्व शासकीय ग्रंथ भांडारात उपलब्ध आहे.
हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच हवा. ज्यांनी तो वाचला नाही त्यांनी काहीच वाचले नाही. अवघ्या अर्ध्या तासात हे पुस्तक वाचून होते. पण ते सून्न करते. कायमचे अस्वस्थ करते. भारतीय समाजाचा आरसा बाबासाहेब आपल्याला त्यात दाखवतात.

ह्या आठवणींनी बाबासाहेब व्याकूळ होत असत. यातल्या गोरेगावच्या प्रवासाच्या आठवणीने ५० वर्षांनंतरही त्यांचे डोळे पानावत असत. त्यांच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट होता.

अवघ्या ३० पृष्ठांचे हे लेखन जागतिक साहित्यातले श्रेष्ठ लेखन आहे.

मंडळी, मग बाबासाहेबांचे हे आत्मकथन वाचणार ना?

-प्रा.हरी नरके, १९ जून २०१९

#वेटींगफॉरव्हिसा

Saturday, June 15, 2019

आजपासून पूजा बंद

आजपासून पूजा बंद- प्रा.हरी नरके पन्नास वर्षे संसार केल्यानंतर, नातवंडांची लग्न झाल्यानंतर माझ्या आत्याला तिच्या नवर्‍यानं सोडलं. कारण काय तर बायको मला आवडत नाय. आत्या तिच्या माहेरी म्हणजे आमच्याकडं येऊन राहू लागली. वटसावित्री पौर्णिमेला हाच नवरा सात जन्म मिळो अशी प्रार्थना करीत तिनं वडाला फेर्‍या मारल्या. त्याची मनोभावे पूजा केली. मी तिला विचारलं," अगं आत्या, त्यानं तुला सोडलं. मग कशाला हवा हाच नवरा सात जन्मं?" ती म्हणाली, " त्यानं त्याचा धर्म सोडला. म्हणून आपण आपला सोडू नये बाळा." पुढच्या वर्षी ती पुन्हा पुजेला निघाली. मी तिला म्हटलं, " अगं, त्यानं तुला सोडून दुसरी बायको केली. आता तिही सात जन्मं हाच नवरा मागणार. तुही मागणार. याचा अर्थ तुला पुढची सात जन्मं हीच सवत मिळणार. बघ बाई!" आत्यानं ताडकन हातातलं पुजेचं ताट खाली ठेवलं. म्हणाली, " मला सवत नको. आजपासून पूजा बंद." - कुमुद पावडे यांच्या "अंत:स्फोट" या आत्मकथनातून - प्रा.हरी नरके, १६ जून २०१९

Saturday, June 1, 2019

भुरटे सरकारी इतिहासकार, राष्ट्रमातेची बदनामी आणि सतिप्रथा











भुरट्या सरकारी इतिहासकार श्रीमती श्यामा घोणसे यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची बदनामी करणारी वक्तव्ये केली.

खरंतर ज्या बाईंचा इतिहासाचा काडीमात्र अभ्यास नाही त्या श्यामा घोणसे यांना विद्यापीठाने गरळ ओकणार्‍या भाषणासाठी बोलावलेच कसे? हे विद्यापीठ आहे की समरसतेचा अड्डा?

शिक्षणमंत्री विनोद तावडॆंनी तर या महामातेला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख नेमलेले आहे.

त्यांची मुक्ताफळे अशी की " अहिल्यामातेच्या कुटुंबातील सर्व पुरूष व्यसनी होते, सतीची प्रथा राजा राममोहन रॉय यांनी नाही तर समर्थ रामदास यांनी बंद केली."

माझा त्यांना सवाल आहे की काय महायोद्धा मल्हारराव होळकर व्यसनी होते?

संत रामदासांनी जर सती प्रथा बंद केली होती तर त्यांच्यासमोर छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पुतळाबाई सती कश्या काय गेल्या होत्या?

थोरले माधवराव पेशवे [माधवराव बाळाजी भट पेशवे] यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रमाबाई कशा काय सती गेल्या होत्या?

संपुर्ण भारतातल्या १८ व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक असणार्‍या अहिल्यामातेला त्यांनी आज दुषणे लावलीत.

उद्या ह्या बाई म्हणतील मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी सुरू केली नसून ती भलत्याच कुणीतरी सुरू केलेली होती.

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या या समरतेच्या भुरट्या सरकारी इतिहासकारांना त्यांची जागा आत्ताच दाखवली नाही तर हे लोक सगळाच इतिहास बदलून टाकतील.

ही प्रवृत्ती घातक आहे.

-प्रा.हरी नरके, १ जून २०१९

Saturday, May 11, 2019

मृत्यूनंतर

एखादे चटका लावून गेलेले पुस्तक वर्षानुवर्षे आठवत राहते. काळाच्या ओघात नवनवी पुस्तके वाचनात येतात. ते जुने पुस्तक विस्मरणात जाते.
का कोण जाणे मात्र कधीतरी अचानक ते जुने पुस्तक आठवू लागते. पुस्तकातले तपशील विसरलेले असतात. पुस्तकाचा गाभा डोक्यात पक्का कोरला गेलेला असतो.
फार पुर्वी शालेय वयात वाचलेले शिवराम कारंत यांचे एक पुस्तक असेच अचानक धडका मारू लागले. कादंबरी वाचून किमान ४० वर्षे झालेली. एका वृद्धाची नातेसंबंधातली फरपट चित्रित करणारी कथा परतपरत आठवू लागली.

पुस्तकाचे नाव मात्र आठवेचना. पुस्तक सापडेना.
दातात अडकलेल्या बडीशेपेच्या एखाद्या दाण्यानं यावी तशी अस्वस्थता येऊ लागली. पुस्तकाचं नाव आठवायचा खूप प्रयत्न करून झाला. शोधाशोध करून झाली.

पुस्तक सापडत नाही म्हटलं की बेचैनी येते. परतपरत तेच पुस्तक धडका मारू लागतं.
परवा घरातल्या सर्व पुस्तकांची साफसफाई करताना अचानक ते पुस्तक हाती लागलं. अशावेळी होणारा आनंद केवळ अपार नी असीम. हा क्षण जणू युरेका युरेका ओरडण्याचा.
"मृत्यूनंतर" हे ते पुस्तक. कादंबरी. नॅशनल बुक ट्रस्टने १९७५ साली तिचा मराठी अनुवाद प्रकाशित केलेला. अनुवादक केशव महागावकर.
अवघी १८६ पृष्ठांची ही कादंबरी. कारंतांनी १९६० मध्ये लिहिलेली.
कादंबरी अफाट ताकदीची. मानवी नात्यांमधली गुंतागुंत बारकाईनं टिपणारी. पैशासाठी माणसं किती खालच्या पातळीवर उतरतात, हैवान होतात त्याची अस्वस्थ करणारी कथा.यशवंतराव ह्या नायकाची भिडणारी गाथाच.
-प्रा.हरी नरके, ११ मे २०१९

Friday, October 26, 2018

महाविद्यालयीन जीवनातली काळी करडी युवागाथा





श्री प्रणव सखदेव हे नव्या पिढीतले महत्वाचे लेखक आहेत. त्यांची या आठवड्यात प्रकाशित झालेली "काळे करडे स्ट्रोक्स" ही मजबूत कादंबरी आहे. सखदेव यांची लेखनकळा प्रवाही, चित्रशैलीतली आणि वाचकांशी गप्पा मारणारी आहे. मुंबईच्या रूईया महाविद्यालयात शिकणार्‍या तीन युवक युवतींची उत्तर आधुनिक काळातली चटका लावणारी गोष्ट या कादंबरीतून उलगडत जाते. समीर, सानिका आणि सलोनी या तिघांची वाचकांशी दोस्ती होऊन जाते. अरण्या उर्फ अरूण आणि दादूकाका ही भन्नाट अवलियांची जोडी तर काळजातच घुसते. रूईया महाविद्यालयाचा परिसर, दडकर कट्टा, दादर, फाइव्ह गार्डन, मुंबई लोकलचा व्हीडीयो कोच आणि हिमाचल प्रदेश मधलं मॅकलीओडगंज ही नुसती स्थळं न राहता या कादंबरीतली अफलातून पात्रं बनुन आपल्याला भेटतात. मुंबईचा पाऊस, विशेषत: २६ जुलैचा महाप्रलय, २६ अकराचा अतिरेकी हल्ला हे केवळ नेपथ्य न राहता या गोष्टीचा आलेख उंचावत नेणारं कलात्मक शक्तीस्थळ बनत जातं.

सखदेवांनी समकालीन युवकांची घुसमट अतिशय प्रभावीपणे चितारलेली आहे. प्रत्येक महानगरी माणूस हा आपापल्या ओझ्यांनी, अपार दु:खांनी गांजलेला असतो. जनरेशन गॅप, सामाजिक - सांस्कृतिक गोची आणि विस्कटलेली, पोकळीत जगणारी युवापिढी यांची ही सिंफनी मूळातून अनुभवायला हवी. आपल्या आजुबाजूच्या पर्यावरणातला समकालीन कोलाहल सखदेव भेदक पद्धतीनं टिपत जातात. सोनेरी युवावस्था आणि परिस्थितीचे काळे ढग यांची करडी काळी पोकळी वाचकाला तुफान घेरून सोडते. थेट दंशच करते.

मासकॉंम करणार्‍या समीरला चित्रपट दिग्दर्शक बनायचं असतं. सलोनीला तिच्या आजारावरच्या अत्त्याधुनिक उपचारांसाठी न्यूझीलंडला जायचं असतं. सानिकाला डेथविश असते.. काय होतं त्यांचं?
समीरला विलास सारंग आणि तारकोव्हस्की आवडत असतात. भन्नाट आयुष्य जगणार्‍या अरूणलाही.
अवघ्या २१९ पृष्ठांमध्ये सखदेव फार मोठा ऎवज आपल्यापुढे चितारत जातात. कथेतली पात्रं गोलगोल न फिरता सतत विकसित होत जातात. त्यांची मानसिक आंदोलनं आपल्याला जखमी करत जातात. छळतात. तरूण पिढीचा टिपलेला जिवघेणा संघर्ष, औदासिन्य, व्यसनं, सेक्स, हलकल्लोळ,कोलाहल,पोकळी आणि आरपार भिडत जाणारा रक्ताळलेला प्रवास यामुळे ही कादंबरी महत्वाची ठरते.

मरण काय असतं
जगण्याचा एक भाग बनून
अचानक फणा काढतं
आणि जातं डसून

इथून सुरू झालेली ही चित्तरकथा

उदासी
चमकत्या अंधाराच्या दिवसांची
जिच्या फण्यावर
हिंदळतोय
तुझ्या-माझ्या नात्याचा आस....

इथवर घेऊन जाते. कादंबरी संपली तरी तिच्या अनुभवातनं आलेली अस्वस्थता चिरत राहते.

रोहन प्रकाशनाची ही दर्जेदार ग्रंथनिर्मिती असून साजेसं मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचं आहे. अनुजा जगतापांनी ग्रंथ संपादन केलंय तर प्रकल्प समन्वयक आहेत रोहन चंपानेरकर

टिम रोहन आणि प्रणव सखदेव तुम्ही लय भारी काम केलेलं आहे.

-प्रा.हरी नरके, २५ ऑक्टोबर २०१८

काळे करडे स्ट्रोक्स, प्रणव सखदेव, रोहन प्रकाशन, पुणे, १८ ऑक्टोबर २०१८, दसरा, युथ एडिशन, रू. १९९/-, पृष्ठे २१९


Saturday, October 6, 2018

सापात चांभार की माणसात साप ?



सत्यशोधक चळवळीने आधुनिक भारतात सर्वप्रथम जातीनिर्मुलनाचा विषय हाती घेतला. जातीव्यवस्थेचे लाभार्थी आणि शोषित अशी ही सरळ लढाई नव्हती. जातीव्यवस्थेकडून नागवले जात असूनही तिचे समर्थन करणारे लोक होते आणि जातीव्यवस्थेचे लाभ मिळत असूनही तिला विरोध करणारे विवेकी लोकही होते. असे गुंतागुंतीचे चित्र पुढे येऊ लागले.
महाडच्या सत्याग्रहातून जातीचा हा मुद्दा आणखी कणखरपणे पुढे आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रीय अंगाने जातीनिर्मुलनाची आवश्यकता प्रभावीपणे मांडीत असत.

अलिबागचे कुलाबा समाचार हे सनातन्यांचे वर्तमानपत्र होते. ते जातीव्यवस्थेचे समर्थक होते. या वर्तमानपत्राने एक खोडसाळ बातमी छापली. पेणच्या पिठ्या महाराला साप चावला असता त्याच्यावर उपचार करणार्‍या मांत्रिकाने म्हणे सांगितले की त्याला चांभार जातीचा साप चावलेला आहे. ते ही सांगोवांगी बातमी भरपूर मिठमसाला लावून छापूनच थांबले नाहीत तर त्यांनी सत्यशोधकांना सवाल केला, " जिथे सापात चांभार आहेत, तिथे माणसातल्या जाती जाणं कसं शक्यय? जी जात नाही ती जात."


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारतातून याचा खरपूस समाचार घेतला. बाबासाहेबांनी दिलेले उत्तर बिनतोड तर होतेच पण आजही ते उद्बोधक आहे. मार्गदर्शक आहे.
त्यांनी कुलाबा समाचारकर्त्यांना काही प्रश्न विचारले.

१. मुळात परळला स्थापन झालेल्या [ पुढे हाफकीन इन्स्टीट्यूट म्हणून नावाजलेल्या ] वैज्ञानिक संस्थेत हे सिद्ध झाले आहे की, सापाचे विष मंत्राने उतरत नाही. त्यासाठी डॉक्टरी इलाज करावे लागतात. तर पिठ्याला डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाकडे का नेले?

२. मांत्रिकाने अंगात आल्यावर म्हणे पिठ्याच्या अंगात आलेल्या सापाला काही प्रश्न विचारले. "तू कुठे आहेस? तू पिठ्याला का चावलास? सापा, तुझी जात कोणती?"
तर साप म्हणाला की, " मी आता जंगलात फिरतोय. पिठ्याचा मला धक्का लागला म्हणून मी चावलो. मी चांभार जातीचा साप आहे."

जर तो साप ज्यावेळी पिठ्याच्या अंगात आला होता त्याचवेळी तो जंगलातही फिरत होता, याचा अर्थ सापाला दोनदोन आत्मे असतात काय?


३. मुळात सापाला जात विचारण्याचे कारण काय? मांत्रिकाने त्याला जात विचारली यावरून जात मांत्रिकाच्या डोक्यात होती व तोच जातीग्रस्त असल्याचे सिद्ध होते.

४. जाती जर कामावरून आल्या असे जातीव्यवस्थेचे समर्थक सांगतात, म्हणजे लोखंडाचे काम करतो तो लोहार, सोन्याचे काम करणारा सोनार आणि चामड्याचे काम करणारा चांभार. तर सापाला मूळात पायच नसतात. त्यामुळे तो चप्पल, बूट, सॅंडल घालत नाही. मग सापात चांभार कसे काय असतील?

५. याचा अर्थ असाय की सापात चांभार नसतात पण माणसांमध्ये मात्र सापाच्या प्रवृत्तीचे काही लोक असतात. आणि ते सर्व जातींमध्ये असतात. जाती निसर्गाने निर्माण केलेल्या नाहीत. त्या मानवनिर्मित आहेत. जर निर्धार केला तर माणूस जाती घालवू शकतो. जातीनिर्मुलनाची खरी लढाई ही मानसिकतेविरूद्धची लढाई आहे. ती प्रवृत्तीविरूद्धची लढाई असल्याने तिच्याविरूद्ध चिवटपणे चळवळी करीत राहाव्या लागतील. जात जाईल पण त्यासाठी शिक्षण, विज्ञाननिष्ठा, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा विचार सर्वांनी स्विकारायला हवा. तो आचरणात आणायला हवा. जातीतल्या लग्नांना नकार द्यायला हवा. स्त्रीपुरूष समता, ज्ञानार्जन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा यांची कास धरावी लागेल. आपल्याला जातीच्या बहुमतावर चालणारी लोकशाही नको, आपल्याला विचारांचे बहुमत हवेय असा निर्धार करायला हवा."
{ पाहा- डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८,  [ ब.भा.१६ ऑगष्ट १९२९ ] पृ.३११}

-प्रा.हरी नरके, ६ आक्टोबर २०१८

Sunday, September 23, 2018

नेमाडे - कसबे वाद आणि चाहत्यांची गोची









नेमाडे - कसबे वाद आणि चाहत्यांची गोची - प्रा.हरी नरके

साहित्यिक वाद महाराष्ट्राला नवे नाहीत. त्यातून वैचारिक-साहित्यिक मंथन व्हावे अशी अपेक्षा असते.  वादविवाद आणि चिकित्सा यातून विचार घासून पुसून घेतले जातात. त्यात वार आणि प्रहार असले तरी त्याला एक वैचारिक-वाड्मयीन दर्जा असतो. आपसातले मतभेद मांडायलाच हवेत. साहित्यकृतीच्या सामर्थ्य आणि मर्यादा यांच्यावर घमासान वाद व्हायलाच हवा. त्यातून लेखकाला योग्य मार्गदर्शन मिळते. विचारकलहाला कशाला घाबरता असे आगरकर म्हणत असत. मराठी माणूस हा मूलत:च कलहप्रिय आहे. बाराशे वर्षांपुर्वी उद्योतन सुरी यांनी मराठी माणूस हा "कळवंड करणारा" असतो असे त्याचे अचूक वर्णन केलेले आहे. "भांडखोरपणा" हे मराठी माणसाचे "सार्वकालिक ओळखपत्र" आहे.


सध्या महाराष्ट्रात दुष्काळी वातावरण असले तरी कसबे-नेमाडे वादाच्या रणभेरी घुमत आहेत. हे दोघेही बलदंड योद्धे एकमेकांवर तुटून पडलेले आहेत.


या दोघांनाही मानणारा युवकांचा एक मोठा वर्ग आहे. तो त्यांच्यावर अमाप प्रेम करतो.  तो सध्या त्यांच्यातील या वादाने व्यथित आहे. दोघेही आपलेच, आपलेच दात नी आपलेच ओठ, कोणाची बाजू घ्यायची याने तो संभ्रमित झालेला आहे.


प्रा. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याचे गारूड गेले ४० वर्षे ज्याच्या मनावरून उतरलेले नाही असा मी एक छोटा वाचक आहे. कोसला ते हिंदू, टिकास्वयंवर, देखणी आणि त्यांच्या भाषणांची व मुलाखतींची पुस्तकं, तुकाराम, साने गुरूजींवरील समीक्षापर पुस्तकं, हे सारं नेमाडपंथी साहित्य एकदाच नाही तर अनेकदा मी वाचलेलं आहे. हे केवळ मराठीतलंच नाही तर अखिल भारतीय पातळीवरचं, जागतिक पातळीवरचे श्रेष्ठ साहित्य आहे आणि म्हणूनचे नेमाडे हे जागतिक पातळीवरील महान साहित्यकार आहेत असं माझं मत आहे. मात्र त्यांच्या देशीवाद, जातीप्रश्न यांच्या मांडणीबाबत माझे काही आक्षेप - मतभेद आहेत.



प्रा. रावसाहेब कसबे यांचेही प्रत्येक पुस्तक मी काळजीपुर्वक वाचलेले आहे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान, झोत, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकरवाद: तत्त्व आणि व्यवहार, भक्ती आणि धम्म, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, मानव आणि धर्मचिंतन, हिंदुराष्ट्रवाद," हे त्यांचे सारेच ग्रंथ मी बारकाईने वाचलेले आहेत. पुन्हापुन्हा वाचत असतो. परिवर्तनवादी चळवळीचे महान भाष्यकार, वक्ते आणि विचारवंत म्हणून रावसाहेब मला नितांत आदरणीय आहेत. त्यांचे "देशीवाद, समाज आणि साहित्य" हे पुस्तक वाचताना मात्र मला खूप त्रास झाला.


व्यक्तीश: या दोघांशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या दोघांनीही मला आजवर उत्तम मार्गदर्शन आणि प्रेम दिलेले आहे. मी या दोघांनाही स्वकीय तत्वज्ञ आणि मार्गदर्शक मानतो.


अशा परिस्थितीत त्यांच्यातील वादावर लिहायला मी अपात्र माणूस आहे. कारण एकतर मी या दोघांच्याही लेखणावर अमाप प्रेम करीत असल्याने त्यांच्याबाबतीत पक्षपाती असण्याची दाट शक्यता आहे. किमान त्यांच्याबाबतीत तटस्थ राहणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
त्यामुळे त्यांच्यातील वादात न पडण्याचे मी ठरवले होते. आजही खरंतर माझं तेच मत आहे. या दोन मोठ्या माणसांच्या वादात न्यायाधीश, किमान ज्युरी होण्याची आपली लायकी नाही हे मला पुरेपूर माहित आहे.


त्यामुळे जेव्हा मी श्री. अशोक बाबर यांचे "देशीवादाचे दुश्मन" हे पुस्तक वाचले तेव्हा रावसाहेबांच्या किंवा बाबर यांच्या पुस्तकांचे समग्र परिक्षण करणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे
आहे याची मी स्वत:शी खूणगाठ बांधली.
हे या पुस्तकांचे परीक्षण नसून फक्त काही धावती निरिक्षणे आहेत. ही माझी व्यक्तीगत निरिक्षणे असल्याने ती सर्वांना पटायलाच हवीत असे नाही. माझ्या या लेखणातला धोका असाय की हे दोघेही माझ्यावर नाराज होऊ शकतात. न घरका ना घाटका असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही लिहिले पाहिजे.


१. नेमाडे यांच्याबद्दल श्री. विद्याधर पुंडलिक यांनी असे लिहिले आहे की, नेमाडे हे मुटके मारणारे पट्टीचे पोहणारे आहेत. म्हणजे असे लोक पोहण्यात पटाईत असल्याने ते अशा पद्धतीने विहीरीत मुटके मारतात की काठावर उभे असणारांच्या अंगावर भरपूर पाणी उडते. नेमाडे त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे अनेकदा वादग्रस्त ठरत असतात. ते सतत प्रकाशझोतात असतात. त्यांची मतं अतिशय टोकदार असतात. विवाद्य असतात. ते एक अत्यंत निर्भय आणि संपुर्ण स्वतंत्र तत्वचिंतन असलेले श्रेष्ठ विचारवंत तसेच निर्मितीशील साहित्यकार आहेत. आजतरी मला त्यांच्या तोडीचा दुसरा भारतीय पातळीवरचा श्रेष्ठ साहित्यिक दिसत नाही. नेमाडेंना नीट समजून न घेता केवळ त्यांच्या देशीवादी मांडणीला शिव्याशाप देणारांनी, त्यांना जातीयवादी म्हणणारांनी आजवर महात्मा गांधींनाही असेच दूर लोटले, परिणामी गोडसेवादी बोडक्यावर बसले. सनातन की नेमाडे, गोडशे की गांधी यात निवड करावी लागेल.पण ज्यांना ते स्वत: सोडता इतर सारेच प्रतिगामी वाटतात अशा संशयवाद्यांचा विजय असो! ते थोरच आहेत.


२. प्रा. रावसाहेब कसब्यांनी अफाट वाचन, चिंतन आणि संशोधनाद्वारे मौलिक लेखण केलेले आहे.
त्यांचा नेमाडे यांच्यावरचा ग्रंथ मात्र त्यांच्या आजवरच्या कामगिरीला साजेसा नाही असे मला खेदाने म्हणावे लागते. या पुस्तकात अनेक ठिकाणी रावसाहेबांनी नेमाडॆंवर जे व्यक्तीगत शेरे आणि ताशेरे मारलेले आहेत त्याची काहीच गरज नव्हती. अपशब्द आणि मानहानीकारक मजकूर तर अगदीच आक्षेपार्ह आहे. नेमाडेंना ते कुणीतरी भुरटा आणि प्रतिगामी समजतात हीच मुळात फार मोठी वेदनादायक बाब आहे. रावसाहेबांनी व्यक्तीगत आकसाने प्रेरित होऊन हा ग्रंथ लिहिलेला आहे असे सतत वाटत राहते. तो त्यांनी लिहिला नसता तर अधिक बरे झाले असते. त्याला "देशाचे दुश्मन" या दिनकरराव जवळकरांच्या पुस्तकाच्या धाटणीचे "देशीवादाचे दुश्मन" हे पुस्तक लिहून श्री. अशोक बाबर आणि श्री. सुशील धसकटे यांनी उत्तर दिलेले आहे.


३. आरपीआयच्या दोन गटांमध्ये ज्याप्रकारच्या उखाळ्या पाखाळ्या चाललेल्या असतात, त्या नळावरच्या भांडणाची कळा या पुस्तकाला आलेली आहे. श्री. अशोक बाबर आणि सुशील धसकटे यांनी रावसाहेबांना दिलेले उत्तर म्हणजे नळावर एकमेकांच्या झिंज्या धरणे किंवा भर चौकात एकमेकांची गचांडी धरण्याच्या पातळीवरील कामगिरी आहे. श्री.बाबर यांनी अनेक अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यांचा आवाका फार मोठा आहे. पण ते टोकाचे नेमाडे समर्थक आहेत. कट्टर भक्त. नेमाडे हे सर्वांगपरिपुर्ण साहित्यिक आहेत असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे शेरास सव्वाशेर म्हणुन त्यांनी वापरलेली भाषा, त्यांनी रावसाहेबांवर केलेले हेत्वारोप आणि मारलेले असभ्य ताशेरे यांच्यामुळे ह्या पुस्तकाचा दर्जा घसरलेला आहे.


४. रावसाहेब आणि बाबर या दोघांनाही "षडयंत्र [ कॉंन्स्पीरशी ] थिएरी" प्राणप्रिय असल्याचे दिसते. त्यामुळे एकच आरोप ते दोघेही एकमेकांवर करीत आहेत. दोघेही हेत्वारोपांचा परस्परांवर तुफान मारा करतात. "तू हिंदुत्ववादी आहेस," "तू जातीयवादी आहेस," "तू प्रतिगाम्यांचा हस्तक आहेस," "तू सरंजामी मानसिकता मानणारा आहेस," असे आरोप दोघांनी एकमेकांवर केलेले आहेत.


५. या दोघांना जे लोक जवळून ओळखतात त्यांना माहित आहे की ह्या दोघांचेही एकमेकांवरचे आरोप बिनबुडाचे आहेत. निराधार आणि असत्य आहेत.


६. या दोघांनाही खूप मानसन्मान मिळालेले आहेत. आणखी मिळोत. ते दोघेही नितांत सन्मानणीय आहेत. पण ते एकमेकांचे स्पर्धक आणि अतिहितचिंतक असणार. त्यामुळे हे प्रहार आपापली टेरीटरी सांभाळण्यासाठी केलेले असू शकतात. इगो आणि प्रसिद्धीचा झोत कोणावर कमी आणि कोणावर जास्त याच्या इसाळातूनही हे भांडण चालू असणार. मेरी कमीजसे  तेरी कमीज ज्यादा सफेद क्यों? हा मुद्दाच जास्त प्रभावी दिसतो.


७. हे दोघेही वैचारिकदृष्ट्या फुले-शिंदे-शाहू-गांधी-आंबेडकरांना मानणारे आहेत, एकाच छावणीतले आहेत. दोघेही परिवर्तनवादी आहेत. मतभेद असलेच तर ते तपशीलांचे असू शकतात. स्वभावांचे असू शकतात. फारसे गंभीर असे विचारसरणीचे- तात्विक म्हणता येतील असे मतभेद मला तरी दिसत नाहीत. शैली, मांडणी, अन्वेषण, छावणी यांचा एकत्रित विचार केला तर त्यांच्या दोघांच्याही काही चुका झालेल्या असू शकतात. मांडणी सदोष असू शकते. मात्र त्या दोघांपैकी कोणीही आजवर "चुकीच्या बाजूला" उभे राहिलेले नाहीत.

८. परिवर्तनवादी छावणीपुढे आज अनेक गंभीर आव्हानं उभी आहेत. प्रतिगामी शक्ती रोरावत चालल्या आहेत. अशावेळेला आपण सार्‍यांनीच एकत्र यायची गरज आहे. अन्यथा परिवर्तनवाद्यांचे अस्तित्वच संपेल अशी भिती आहे. आपल्या भुमिका परस्परपूरक असताना जर एकत्र येता येत नसेल तर निदान एकमेकांना खाऊ का गिळू या वृत्तीने लक्ष्य तरी करायला नको असे माझ्यासारख्या एका छोट्या आणि गरिब माणसाला वाटते.
तुर्तास इतकेच-

-प्रा.हरी नरके, २३ सप्टेंबर २०१८

Wednesday, September 19, 2018

आंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र


आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्या सासर्‍यानेच त्याची हत्त्या केली. त्यासाठी एक कोटी रूपयांची सुपारी दिली. पोटच्या पोरीला, गरोदर मुलीला, जातीबाहेर लग्न केल्याची शिक्षा म्हणून जावयाची हत्त्या केल्याची तेलंगणामधली ही घटना संतापजनक आहे. नवविवाहीत अमृता वार्षिणी आपला पती प्रणय याला गमावून बसली. मुलीपेक्षा जात मोठी ही काय मानसिकता आहे?

कोल्हापूरची मेघा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णीच्या हत्त्येची घटनाही फार जुनी झालेली नाही. गेल्या पाचदहा वर्षात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या हत्यांना रानटी, जातीयवादातून केलेल्या निर्घृण हत्त्या म्हणण्याऎवजी ऑनर किलिंग म्हणणे हा तर मुर्खपणाचा कळस आहे.

नागराज मंजूळेंनी सैराट या मराठी चित्रपटाचा शेवट तेलंगणा राज्यात हैदराबादला झालेला दाखवलेला आहे. असे आणखी किती सैराट आपल्या आजूबाजूला घडणारेत?

कथासाहित्याचा जन्म भारतात झालेला आहे. पुराणकथा तर अतिशय रंजक, प्रभावी आणि खोलवर संस्कार करणार्‍या असतात. पुराणातील वांगी [वाणगी] पुराणातच ठिक आहेत असे आपण म्हणत असलो तरी त्यांचा प्रभाव अबोध मनावर पिढ्यानुपिढ्या टिकून राहतो. जाती व्यवस्थेचे पाईक तर सर्वच जातीजमातींमध्ये आहेत. जातीसाठी खावी माती ही वृत्ती सर्वांच्याच हाडीमाशी भिनलेली आहे.


फार पुर्वी पुराणातली मुरलीचरित्र नावाची कथा वाचनात आली होती. जुने किर्तनकार ती कथा सांगत असत.
पैठणला एक अस्पृश्य समाजातला बुद्धीमान मुलगा राहत असतो. तो एका संस्कृत पंडीताच्या घरी गोठा स्वच्छ करण्याचे काम करीत असे. पंडित म्हणत असलेले मंत्र, श्लोक गायाबैलांचे शेण काढताना, गोठा झाडताना त्याच्या कानावर पडत असत. तो मुलगा एकपाठी होता. एकदा ऎकलेला शब्द तो कधीच विसरत नसे. अल्पावधीत त्याला असंख्य मंत्र आणि श्लोक यांचे ज्ञान झाले. तो ते घडाघडा म्हणत असे.


एके दिवशी त्याने आपला गाव सोडला. तो पायी चालत पार नाशिकला गेला. तिथे गोदातीरावर आंघोळ करीत असताना तो म्हणत असलेले मंत्र शेजारच्या भटजींच्या कानावर पडले. त्याचे त्या लहान वयातले स्वच्छ आणि लयदार उच्चार ऎकून भटजी प्रभावित झाले.
त्यांनी त्याची आपुलकीनं विचारपूस केली.

मुलाने घाबरून जाऊन आपली जात चोरली. कुल,गोत्र सारंच बनवून सांगितलं. आपण पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न अशा महामहोपाध्यायांच्या घराण्यातले असल्याचे त्याने खोटेच सांगितले. आपले आईवडील महापुरात वाहून गेल्याचेही पुढे सांगितले. भटजी त्याला आपल्या घरी घेऊन गेले. त्याला जेवायला घातले.
त्याच्या पु्ढच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मुलगा गुणी होता. बुद्धीमान आणि कर्तबगार होता. म्हणताम्हणता त्याने नाव काढले.

अल्पावधीतच तो मुलगा सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला. भटजींनी त्याला आपला घरजावईच करून घेतले.

त्याची पत्नी सुशील होती. तिचे पतीवर प्रेम होते.

मला एकदा माझे सासर बघायचे आहे, मला गावी घेऊन चला असा ती हट्ट करी. तो काहीतरी सबबी सांगून वेळ मारून नेई.

एकदा मात्र त्याची पत्नी हट्टाला पेटली. तिने अन्नपाणी वर्ज्य केले. त्याचा अगदीच नाईलाज झाला.
ते दोघे त्याच्या गावी निघाले.

तो चिंतित होता. आता आपले भांडे फुटणार या भितीने घाबरला होता. त्याला काहीच सुचत नव्हते. गुन्हा कबूल करावा तर बायको अंतरेल अशी भिती वाटत होती.

घनदाट जंगलातून जात असताना त्याने एका विहीरीत बायकोला ढकलून दिले आणि तो नाशिकला परत आला.

तुमची मुलगी विहीरीत पाणी पिताना पाय घसरून पडली आणि बुडाली असे त्याने सासू-सासर्‍यांना खोटेच सांगितले.

त्यांनी अपार शोक केला.
असेच दिवस जात होते.

एके दिवशी त्याची बायको साक्षात सुखरूप हजर झाली. तिला बघून तिच्या आईवडीलांना अपार आनंद झाला. तिचा नवरा मात्र खूप घाबरला.
त्याच्या पत्नीने मात्र त्याला सावरून घेतले. माझा पाय घसरून मीच विहीरीत पडले. यांना पोहता येत नसले तरी यांनी मला वाचवायचे खूप प्रयत्न केले वगैरे कथा तिने तयार करून सांगितली.

त्याचा जीव भांड्यात पडला. तिने आपल्याला वाचवले या जाणीवेने तो भारावून गेला. विहिरीत उगवलेल्या एका पिंपळाला आपण लटकून राहिलो आणि काही दिवसांनी तिकडून जात असलेल्या सैनिकांच्या टोळीने आपल्याला कसे वाचवले याची चित्तथरारक कथा तिने त्यांना सांगितली.

रात्री एकांतात असताना त्याने तिचे पाय धरले. मी चुकलो म्हणून तिची क्षमा मागितली.
तिने नवर्‍याला माफ केले. पावसाने झोडपले आणि नवर्‍याने मारले तर तक्रार करू नये असे तिचे संस्कार सांगत होते. ती पतिव्रता असल्याने तिच्या पतीला तिच्या हत्त्येचा गुन्हा माफ वगैरे होता.

आपण तिची हत्त्या करण्याचा प्रयत्न केला तरी तिने उदार मनाने आपल्याला माफ केल्याचे बघून त्याचे डोळे पाणावले. तिला आता सगळे खरेखरे सांगून टाकावे असे त्याला वाटले. त्याला बायकोबद्दल पुर्ण विश्वास वाटू लागला. आपण जात चोरल्याचे त्याने त्याभरात तिला सांगून टाकले.

ती अंथरूणातून ताडकन उठली.

म्हणाली, "माझी हत्त्या तुम्हाला माफ आहे. पण तुम्ही जात चोरलीत हे मात्र कधीच क्षम्य नाही."

तिने नवर्‍याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला पेटवून दिले. जाळून मारले. संपवून टाकले.
पुढे तिथे उगवलेल्या बांबूंच्या मुरलीतून ही कथा चिरस्थाई झाली.

-प्रा. हरी नरके, १९ सप्टेंबर २०१८

Monday, September 17, 2018

पालीभाषा गौरव दिन-



पालीभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तथागत, त्यांच्या परंपरेतले सगळे विद्वान, आधुनिक भारतातले आचार्य धर्मानंद कोसंबी, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनागरिक धम्मपाल, महान पंडीत राहूल सांकृत्यायन, जगदीश कश्यप आदी मान्यवरांना वंदन.

बुद्ध, धम्म, संघ यांचा प्रचार, प्रसार आणि पालीभाषेचे संवर्धन यासाठी धर्मानंद कोसंबींनी आपले आयुष्य वेचले.

जगाचा निरोप घेताना महात्मा गांधींकडे आपली अंतिम इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी १९४७ साली १ हजार रूपये गांधीजींकडे सुपुर्द केले आणि या पैशातून तरूण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन धम्म व पालीचे ज्ञान घेण्यासाठी श्रीलंकेला पाठवा असे सांगितले. गांधीजींनी त्यांना तसे लेखी वचनही दिले. गांधीजींनी आपल्या सहकार्‍यांना लिहिले, " उनके आश्रममें रहने से आश्रम पवित्र होता हैं." त्यांची बुद्धधम्म व पालीबाबतची इच्छा पुर्ण केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

४ जून १९४७ ला कोसंबींनी पवनारच्या गांधी आश्रमात जगाचा शेवटचा निरोप घेतला.
५ जून १९४७ रोजी संध्याकाळच्या प्रार्थना सभेत बोलताना गांधीजी म्हणाले, " जो अपनी डोंडी पीटते -पिटवाते हैं, उन्हे तो हम बहुत चढाते हैं. पर जो मूल सेवक हैं, धर्म की सेवा करते हैं, उन्हें लोग पहचानते भी नही हैं. ऎसे एक आचार्य कोसंबीजी थे. वे हिंदुस्थान के बौद्धविचार और पाली के प्रमुख विद्वान थे. उन्होंने स्वयं फकीरी पसंद की थी. वे प्रार्थनामय थें. ईश्वर करें हम सब उनका अनुकरण करें."

कोसंबींनी ४० वर्षांपुर्वी कलकत्ता विद्यापीठातल्या आपल्या दरमहा २५० रूपये पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. ते १९०८ साली त्यासाठी महाराष्ट्रात आले. महाराजा सयाजीराव गायकवाड देत असलेल्या ५० रू. च्या मानधनावर त्यांनी मराठी माणसांना पाली शिकवायला सुरूवात केली. बुद्ध विचारांचा आणि पाली भाषेचा महाराष्ट्रात प्रचार - प्रसार करण्यासाठी ते पुढचे सारे आयुष्य जगले.

कोसंबींनी पालीभाषेचे शेकडो विद्वान तयार केले. हरीनाथ दे, डॉ. जेम्स एच. वूडस, प्रो. लॅनमन, प्रो.चिंतामण वैजनाथ राजवाडे, विनोदकार म्हणून ख्यातनाम असलेले पालीचे विद्वान चिं.वि.जोशी, डॉ. प.ल.वैद्य, प्रो. ना.के.भागवत, भदन्त यू.धम्मजोती, भिक्कू धर्मरक्षित, डॉ. पु.वि. बापट या त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी बुद्धीझम आणि पाली भाषेवर लिहिलेल्या ग्रंथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे.

भदन्त आनंद कौशल्यायन हे त्यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी कोसंबींच्या "भगवान बुद्ध" या चरित्र ग्रंथाचा सिंहली भाषेत अनुवाद केला. हा ग्रंथ श्रीलंकेत गाजला. त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" चा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे.

महात्मा गांधीनीं १९२७ साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. तिथे पाली भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कोसंबींना निमंत्रित केले. तिथे प्राध्यापक म्हणून
काम करीत असताना त्यांनी आपल्या "हिंदी संस्कृती आणि अहिंसा," "पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म," या ग्रंथामध्ये गांधीजींच्या विचारांची कठोर चिकित्सा केली. रामराज्य, सनातन धर्म, गीता, विश्वस्त या संकल्पानांबद्दलचे आपले मतभेद नोंदवले.

तेव्हाच्या गुजरात पॅटर्नमध्ये मतभेदांचे स्वागत असायचे.


महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात कोसंबींच्या बुद्धीझमवरील ५ भाषणांचे आयोजन केले. महाराज स्वत: सभेला अध्यक्ष म्हणून उपस्थित असायचे. पुढे सयाजी ग्रंथ मालेद्वारे त्यांनी बुद्धीझमवरील असंख्य ग्रंथ प्रकाशित केले.

बडोदा संस्थानात दारूबंदी करावी असा विचार जोर धरू लागला होता. महाराजांनी मात्र तो मुद्दा फेटाळून लावला. "दारूविक्रीद्वारे मिळणारा कर महसूल कुठून आणायचा? असा त्यांनी प्रश्न विचारला. उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत सांगा, तरच मी दारूबंदी करतो" असे ते म्हणाले.

ही बाब कोसंबींना आवडली नाही. कोसंबींनी आपल्या भाषणात सम्राट अशोकाने केलेल्या संपूर्ण दारूबंदीचे उदाहरण दिले. कोसंबी म्हणाले, "सम्राट अशोक असं म्हणाला नाही, की उत्पन्न बुडते, मला पर्याय द्या, त्याने ताबडतोब दारूबंदी केली.चांगली गोष्ट करताना उत्पन्नाचा मुद्दा गौण असतो. विचार महत्वाचा असतो."
भर दरबारात सन्नाटा पसरला. सयाजीराव महाराज भर सभेतून उठून गेले. लोक घाबरले. आता कोसंबींची उचलबांगडी होणार, हाकालपट्टी होणार, पुढची भाषणं रद्द केली जाणार असं जो तो बोलू लागला.

दरबारने त्याच दिवशी महाराजांचा हुकूम प्रसिद्ध केला.

"आचार्य कोसंबी यांच्या विचारांशी महाराज सहमत आहेत. आजपासून संस्थानात संपूर्ण दारूबंदी करण्यात येत आहे."

कोसंबींची पुढची भाषणं सुरळीतपणे पार पडली. महाराज जाहीरपणे म्हणाले, " आचार्य कोसंबींचा अधिकार आम्हाला मान्य आहे. त्यांनी आमच्या कानशिलात वाजवली असली तरी त्यानंच आम्हाला जाग आलेली आहे."
महाराज कोसंबींना कायम गुरूस्थानी मानत असत.

तेव्हा गुजरातमध्ये राजधर्म पाळला जायचा. गुरुजनांचा सन्मान केला जायचा. विचारांचा आदर केला जायचा.
-प्रा.हरी नरके, १७ सप्टेंबर, २०१८

Sunday, September 16, 2018

जयवंत दळवी यांचा २५ वा स्मृतीदिन




निमित्त- जयवंत दळवी यांचा २५ वा स्मृतीदिन -प्रा.हरी नरके

स्मृतीशेष जयवंत दळवी, (१४ ऑगष्ट १९२५  – १६ सप्टेंबर १९९४ ) माझे आवडते लेखक. माझं पहिलं पुस्तक त्यांना भेट द्यायला त्यांच्या भवानीशंकर रोडवरील [ दादर, मुंबई ] घरी गेलो.
घराला कुलूप होतं. दरवाजाच्या फटीतून पुस्तक आत सरकवलं नी पुण्याला परत आलो.
आठवड्याभरात त्यांचं पत्र आलं. "तुझं पुस्तक मी विकत घेऊन वाचलेलं आहे. पहिलंच पुस्तक असूनही नवखेपणाच्या खुणा अजिबात नाहीत. तू सप्रमाण नी समतोल लेखण केलेलं आहेस. सतत लिहिता राहा. मोठा होशील."

त्यांनी त्या पत्रासोबत एक धनादेश पाठवलेला होता.
त्यासोबत २ ओळींची चिठ्ठी होती. "तू मला भेट दिलेली ही प्रत मी माझ्याकडे ठेवतोय. मी विकत घेतलेली प्रत माझ्या कोकणातल्या गावी, अरवलीच्या वाचनालयाला देतोय. माझ्यातर्फे तुला खाऊला हे पैसे पाठवित आहे."

मी त्यांचे आभार मानणारे पत्र पाठवले व तुमचा चेक मी तुमची आठवण म्हणून कायम जपून ठेवतोय असं लिहिलं.

त्यांचं लगेच उत्तर आलं, "असं करू नकोस. चेकची झेरॉक्स काढून ठेव व चेक बॅंकेत भर. त्या रकमेचा आवडता खाऊ घे."

मी तो चेक आजही तसाच जपून ठेवलाय.

त्यानंतर त्यांच्या अनेक भेटी झाल्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. माझी मैत्रिण सविता कुडतरकर त्यांच्या केशवराव कोठावळ्यांची [ मॅजेस्टीकवाले ] नात असल्याने त्या दोघांची गट्टी होती. माझीही त्यांच्याशी मस्त दोस्ती जुळली. नंतर ते बोरिवलीला राहायला गेले. किडनीच्या आजारपणाने ते अकाली गेले.

दळवी गोष्टीवेल्हाळ होते. त्यांच्याशी मतभेद झाले तरी ते नाराज होत नसत. म्हणायचे, "तुझा मुद्दा मला पटत नसला तरी तू बोल. माझ्या वयाचा होशील तेव्हा हाच मुद्दा पुन्हा आठव. मला खात्री आहे तुझे मत बदललेले असेल."

ते राष्ट्र सेवा दलातून आलेले होते.
त्यांचा ठणठणपाळ अफलातून होता.
दळवींच्या कादंबर्‍या, कथा, नाटकं, संपादनं, विनोद, आत्मचरित्राऎवजी हे आत्मकथन यातनं ते मराठीचे अव्वल मानकरी ठरलेत. अनेक आठवणी दाटून येतात.
-प्रा.हरी नरके, १६ सप्टेंबर २०१८

आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी बुद्धीझमवर लिहिले २२ ग्रंथ


आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/







१. बुद्ध, धर्म आणि संघ,
२. बुद्धलीलासारसंग्रह,
३. लघुपाठ,
४. निवेदन, [मराठी, गुजराती, इंग्रजीत प्रकाशित],

५. खुलासा,
६. जातक कथा संग्रह, भाग-१,
७. जातक कथा संग्रह, भाग-२
८. जातक कथा संग्रह, भाग-३

९. समाधिमार्ग,
१०. बौद्ध संघाचा परिचय,
११. हिंदी संस्कृती आणि अहिंसा,
१२. भगवान बुद्ध, [१४ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित],

१३. पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म,
१४. बोधीसत्व नाटक,
१५. विसुद्धीमग्गा,
१६. सुत्तनिपात,

१७. बोधीचर्यावतार,
१८. धर्मचक्रप्रवर्तन,
१९. अभिधर्म,
२०. धम्मपद,

२१. अभिधम्मत्थसंग हो,
२२. अठ्ठकथेचे सिंहलीमधून मराठीत भाषांतर

त्यांचे १४ ग्रंथ गुजराती भाषेत प्रकाशित झालेले आहेत.
त्यांच्या भगवान बुद्ध, या चरित्रग्रंथाचे १४ प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतर प्रकाशित झालेले असून
त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, मल्याळम, तामीळ, तेलगु, कन्नड, सिंहली, आदी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.
आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/

-प्रा. हरी नरके, १६ सप्टेंबर, २०१८