Showing posts with label भटके विमुक्त. Show all posts
Showing posts with label भटके विमुक्त. Show all posts

Monday, August 6, 2018

ओबीसी आयोगासाठीच्या घटनादुरूस्तीला संसदेची मान्यता-








ओबीसी आयोगासाठीच्या घटनादुरूस्तीला संसदेची मान्यता- प्रा.हरी नरके
ओबीसींच्या इतिहासातले महत्वपुर्ण पाऊल --

आज 123 वी घटना दुरूस्ती राज्यसभेने मंजूर केली. लोकसभेने तिला 3 ऑगष्टला  मंजूरी दिलेली होती. देशातील 52% लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी काम 
करणार्‍या केंद्रीय ओबीसी आयोग या अर्धन्यायिक आयोगाला या घटनादुरूस्तीद्वारे भारतीय संविधानाचे संरक्षण लाभलेले आहे. ही एक ऎतिहासिक घटना आहे. ओबीसींच्या इतिहासातले 13 ऑगष्ट1990  नंतरचे  हे एक महत्वाचे पाऊल आहे.

केंद्र सरकारचे हार्दीक अभिनंदन. झोपलेल्या ओबीसींचेही अभिनंदन.

खरे तर मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, मंत्री आणि स्वतंत्र अर्थसंकल्प ही ओबीसींची गेली 25 वर्षे मागणी होती. तिला आज अंशत: यश लाभले आहे. दुधाची तहान ताकावर भागवणारी ही कृती असूनही तिचे स्वागतच करायला हवे.

बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचे हे जन्मशताब्धी वर्ष आहे. त्यांनी 1980 साली दिलेला अहवाल 1990 साली तेरा ऑगष्टला व्ही.पी.सिंग यांनी अंशत: लागू केला.त्याला 16 नोव्हेंबर 1992 ला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने मान्यता दिली. त्या ऎतिहासिक आदेशात केंद्र आणि सर्व राज्य सरकारांचे ओबीसीत नव्या जाती सामील करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने काढून घेतले. त्यासाठी कायदे करा, त्यानुसार कायमस्वरूपी तज्ज्ञांचे आयोग स्थापन करा, आणि चार महिन्यात करा असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले.

त्याची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य म्हणजे उत्तरप्रदेश होय. महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा असल्याने त्याने सर्वात शेवटी म्हणजे 2005 साली कायदा केला आणि त्याची अंमलबाजवणी 2009 सालापासून केली. कायदा जरी उशीरा केला तरी राज्य सरकारने 1993 पासून अनुक्रमे न्या. खत्री, न्या. बापट, न्या. सराफ, न्या. भाटीया, न्या. म्हसे, न्या. गायकवाड यांची या आयोगावर आजवर नियुक्ती केलेली आहे. मी स्वत: दोन टर्म या आयोगावर काम केले आहे.

केंद्रीय ओबीसी यादीत म्हाराष्ट्रातील 261 जातींचा समावेश आहे. राज्यातील सर्व ओबीसी, भटके, विमुक्त, विमाप्र च्या यादीत 510 जाती असून त्यातल्या
कुणबी, धनगर, तेली, आगरी, वंजारी, बंजारा, गोवारी, भोई, कोळी, भंडारी, गवळी, सोनार, सुतार, कासार, शिंपी, नाव्ही, गवंडी, कोष्टी, कुंभार, लोहार, वडार, तांबट, साळी, परीट, गवंडी, माळी आदी 261 जातींचा समावेश केंद्रीय यादीत आहे.

महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे आणि बुद्धीजिवींचे मागास वर्ग आयोगाबाबतचे ज्ञान केवळ अगाध असल्याने अमूक एका जातीसाठी हे आयोग स्थापन केले गेले अशा सरसकट चुकीच्या बातम्या हे लोक गेली 25 वर्षे देत असतात. लिहित/छापीत असतात. या बुद्धीवादी पत्रकार/संपादकांना याबाबतची माहिती आपण जाणकारांकडून घ्यावी असेसुद्धा वाटत नाही. हे सारे  जाणकारच  असल्याची त्यांची आजन्म धारणा असते.

केंद्र सरकारच्या 2 एप्रिल 1993 च्या केंद्रीय मागासवर्ग आयोग कायद्याला संसदेच्या या आजच्या घटनादुरूस्तीमुळे घटनेत प्रथमच स्थान मिळालेले आहे.

राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 338 अन्वये अनु.जाती व जमाती यांच्या संरक्षणासाठी घटनात्मक आयोगाची व्यवस्था केली होती. 2003 साली 89 व्या घटना दुरूस्तीद्वारे या एका आयोगाचे दोन  स्वतंत्र आयोग करण्यात आले. एक आयोग अनु.जातीसाठी तर दुसरा [338 अ.] आयोग अनु.जमातींसाठी.

आजच्या या 123 व्या घटना दुरूस्तीद्वारे 338 व्या कलमामध्ये भर घालण्यात आलेली असून [338 ब] द्वारे ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे.

1993 च्या केंद्रीय ओबीसी आयोग कायद्यातील सर्व तरतूदी तशाच ठेवण्यात आलेल्या असून त्यांनाही घटनेत स्थान मिळालेले आहे. या कायद्यात थोडी भर घालण्यात आलेली असून  पुर्वी अध्यक्ष आणि दोन तज्ज्ञ सदस्य आयोगात असत. त्याऎवजी आता अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि तीन तज्ज्ञ सदस्य असे एकुण 5 जण या आयोगात असतील.

घटनेच्या कलम 342 मध्ये [ कलम 342 अ. ] चे भर घालून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ओबीसींचा केद्रीय यादीत समावेश करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहेत.

घटनेच्या 366 मध्ये उपकलम 26 क ची भर घालण्यात आलेली असून त्यानुसार आता घटनेत ओबीसींची व्याख्याही समाविष्ट करण्यात आलेली आहे.

मोदी सरकारने या घटनादुरूस्तीचे विधेयक 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत मंजूर करून ते राज्यसभेकडे पाठवले. राज्यसभेत भाजपाचे बहुमत नसल्याने काँग्रेसचे राज्यसभा सदस्य खा. हुसेन दलवाई यांनी या बिलाला एक दुरूस्ती सुचवून ते पुन्हा लोकसभेकडे पाठवले.

या आयोगावर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि देशभरातून निवडलेले 3 तज्ज्ञ सदस्य अशा 5 जणांची नियुक्ती राष्ट्रपती करतील. त्यातला किमान एक सदस्य अल्पसंख्याक समाजाचा असावा अशी काँग्रेसची मागणी होती.

यातली गंमत म्हणजे हा आयोग ज्या ओबीसी समाजासाठी आहे त्या ओबीसींचा किमान एकतरी सदस्य आयोगावर घ्यावा अशी तरतूदच या घटनादुरूस्तीत नाही.

धन्य ते सरकार. धन्य ते विरोधक आणि धन्य ते  24*365  झोपलेले तमाम ओबीसी.

सारांश या घटनादुरूस्तीमुळे आता कलम 340 च्या सोबतच कलम 338, 342, 366 या तीन कलमांद्वारे ओबीसींना घटनात्मक संरक्षण मिळालेले आहे.

- प्रा.हरी नरके

Tuesday, July 3, 2018

मीटर नेहमी चालू राहायला पाहिजे

किडन्या काढण्यासाठी लहान मुलं पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा ग्रामस्थांनी पाच जणांना ठार केलं. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे हे लोक ज्योतिष सांगून गावोगाव भटकत जगत होते. जगाचं भविष्य सांगणारांना आपलं स्वत:चं मात्र भविष्य काही कळलं नसणार! अन्यथा असा अकाली आणि भीषण हिंसक मृत्य़ू वाट्याला न येता. गावकर्‍यांमध्ये एव्हढं क्रौर्य कुठून येतं? हा शुद्ध रानटीपणाय. माणसं मारण्याचा, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.

आता चार दिवस सहानुभुतीचा धुरळा ऊठेल. त्यांचे नेते प्रकाशझोताने आणखी मोठे होतील. लाचार भटके मात्र भिक मागत पुन्हा येरे माझ्या मागल्या करीत भटकतच राहतील.

हे भटक्या जमातींचे लोक आपापल्या परिसरातील शेतांमध्ये किंवा जवळपासच्या कारखाण्यांमध्ये मजुरी का करीत नाहीत? असे गावोगावी भटकत जगण्यात नेमके काय सुख असते?

भटक्यांचे राष्ट्रीय नेते गेली 50 वर्षे नेमकी कसली चळवळ करताहेत? ते त्यांना व्यवसाय परिवर्तन करायला का शिकवित नाहीत? सन्मानाने जगायला का सांगत नाहीत? लाचारी, व्यसनं सोडायचा संस्कार का करीत नाहीत? त्यांचं कायमचं पुनर्वसन का करीत नाहीत?

मुंबईतल्या प्रत्येक मंदिरासमोर, फोर्टमधल्या हरेक फूटपाथवर अनेक बायका गाई घेऊन बसलेल्या असतात. त्यांच्याकडे हिरवा चारा असतो. कणकेचे लाडू असतात. भाविक ते विकत घेतात आणि श्रद्धेने गाईला खाऊ घालतात. चाराही त्याच बाईचा, गायही तिचीच आणि तरीही भाविक खिशातले पैसे खर्चून त्या गाईला खाऊ घालण्यासाठी आतुर असतात हे काय गौडबंगाल असते?

मुंबईच्या चेंबूरजवळ असलेल्या पांजरापोळ भागात दोनेक हजार झोपड्यांमध्ये डवरी गोसावी राहतात. या बायका भल्या पहाटे ऊठतात, तबेल्यात जातात, दूध काढलेली गाय भाड्याने घेतात. हिरवा चारा आधल्या दिवशीच विकत घेतलेला असतो. या बायका या भाडोत्री गाया घेऊन आपापल्या वतनात जातात. यांच्या बसण्याच्या ह्या जागा वर्षानुवर्षे ठरलेल्या असतात. फिक्स असतात. त्याचंही भाडं स्थानिक दादांना द्यावं लागतं.

मंदिरात दर्शनाला येणारे भाविक खिशातले पैसे खर्चून चारा किंवा लाडू विकत घेतात, गाईला खायला घालतात, नमस्कार करतात. त्यातून पापांपासून त्यांना मुक्ती मिळते. लाभणार्‍या पुण्यातून परत नवी पापं करायला ते नव्या दमानं कामाला लागतात. पुण्यं कमावण्याचा शॉर्टकट मार्ग.

सगळेच पापी असतात असंही नाही. अनेक भाबडे असतात. देवभोळे गोभक्त असतात.

दिवसभराचा बिजनेस झाला की ती बाई तबेल्यात गाय नेऊन जमा करते. गवळ्याला गायीमागे दरडोयी 200 ते 300 रूपये भाडं देते. गवळ्याचा चार्‍याचा खर्च वाचतो. गाय सांभाळायचीही कटकट वाचते. बसल्या जागी गायीमागे 200 ते 300 रुपये त्याला मिळतात. दुधाचा पैसा मिळतो तो वेगळाच.

त्या बाईला 100 पासून 500 पर्यंत कमाई उरते. या बहुतेक सगळ्या बायका नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या असतात. त्या दिवसरात्र गोभक्ती करतात तेव्हा संध्याकाळी त्यांची चूल पेटते.

त्यांचे नवरे काय करतात?

बहुसंख्य नवरे दिवसभर हातभट्टीची मारून टूण्ण झालेले असतात. बायको घरी आली की तिला मारझोड करून तिने कमावलेले अर्धे पैसे हिसकावून घेतात, पुन्हा हातभट्टीवर नाहीतर देशी दारूच्या दुकानावर जातात नी दारू ढोसतात. राष्ट्रीय कार्यक्रम. शॉर्टकटनं, मेहनत न करता जगण्याचा परंपरागत मार्ग.

बापानं दररोजची आईला दारू पिऊन केलेली ही मारहाण बघून मुलगेही यात पटाईत होतात. शाळेत जा, शिका, अभ्यास करा, या भानगडीपेक्षा शॉर्टकटने पैसे कमावण्याच्या धंद्यातले तेही "तज्ञ" बनतात. एक्स्पर्ट बनतात. येरे माझ्या मागल्या--- अशा रितीने आपली उज्वल परंपरा अबाधित ठेवतात.

मध्यंतरी मुंबई मनपाने या बायकांना गाया घेऊन बसायला बंदी केली. चुली पेटेनाशा झाल्या. बायका पोरं उपाशी मरू लागले.

काही तळमळीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब आमच्या निदर्शनाला आणली. काही विवेकी संपादक मित्रांनी यावर लेख लिहिले. ओळखीतनं वाहिन्यांनी बातम्या दिल्या. आवाज उठवला.
मी एका ओळखीच्या मंत्री महोदयांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहिले, फोन केला.
बंदी उठली. प्रश्न सुटला.

भटक्यांचे एक राष्ट्रीय नेते माझ्यावर नाराज झाले. म्हणाले, " एक मोठे वकील होते. त्यांचा मुलगाही वकील झाला. त्याने 20-25 वर्षे प्रलंबित असलेली केस जिंकली. कौतुकानं बातमी पित्याला सांगितली. पिताश्री म्हणाले, "तू मुर्ख आहेस. अरे तुझं सगळं शिक्षण मी याच तर केसच्या फिमधून केलं होतं. तुझ्या मुलाचं शिक्षण कसं होणार?"

कथेचा अर्थ मला समजला नाही.

राष्ट्रीय नेते म्हणाले, "गेली 50 वर्षे मी भटक्यांचा राष्ट्रीय नेता कशामुळे आहे? माझ्या पुढच्या पिढीचीही मौजमजा कोणाच्या पैशावर चालूय? आम्ही काहीही कामधंदा न करता राजेशाहीत जगायचं असेल तर या वंचितांना असंच ठेवलं पाहिजे. त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटले तर आम्ही मेलोच. माझ्या अनेक पिढ्यांची रोजगार हमी योजना संपवायला निघालायस काय? प्रश्न कायम राहिले तरच आमचे नेतृत्व टिकणार ना? तरच आम्ही लेख लिहिणार. वाहिन्यांवर पोपटपंची करणार. तरच आम्हाला पुरस्कारबिरस्कार मिळणार. आम्ही मेनबत्ती मोर्चे काढणार. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई मिळवून देण्याच्या बहाण्याने आमचीही व्यवस्था भागवणार! मीटर नेहमी चालू राहायला पाहिजे. टाकी कायम फुल राहिली पाहिजे."

नेते दर वर्षा दोन वर्षाला मेळावे, परिषदा, शिबिरं घेतात. त्यासाठी दरडोई पट्टी [ वर्गणी ] जमा करतात. डोळ्यातून हुकमी आसवं काढतात. भाषणातून तळमळीची गाणी गातात. गयावया करतात. बातम्या, लेखमाला छापून येतात. पुरस्कार नेत्यांचे घर चालत येतात. बाय द वे हे राष्ट्रीय नेते डवरी गोसावी नाहीत बरं का! जागृतीच्य नावावर अंधार पेरण्याचा यांचा पिढीजात धंदा आहे. आतातर त्यांची पुढची पिढीही यात वाकबगार झालीय.

उपेक्षित, वंचितांच्या समस्या कायम आहेत म्हणून तर हे नेते मजेत जगताहेत. नी वंचित असे कुत्र्याच्या मौतीनं मरताहेत.

ते यांना गावोगाव फिरण्याऎवजी शिकण्याचा, भिक न मागता स्वाभिमानानं जगण्याचा, दारू सोडण्याचा, बायकांना मारहाण न करण्याचा, छोट्यामोठ्या चोर्‍यामार्‍या न करण्याचा, लाचारीनं न जगण्याचा, व्यवसाय परिवर्तनाचा मार्ग का सांगत नाहीत?

आयतं खाण्यात, लाचारीनं जगण्यात जी मजा आहे ती कष्टात कशी असणार भाऊ? कष्ट, मेहनत, घाम गाळणं हे तर मुर्खांचे उद्योग.
मेहनत न करता जगण्याचा, शॉर्टकटनं पैसे कमावन्याचा हा परंपरागत मार्गच महत्वाचा.

बदल घडतच नाही असं मात्र नाही. पण त्याचा वेग अतिमंद आहे. या गतीनं आणखी शेदीडशे वर्षं हे लोक असेच भटकत राहणार. लाचारीनं मरण जगत राहणार.

राष्ट्रीय नेत्यांच्या वीसेक पिढ्या सराईतपणे खोटं बोलून, नक्राश्रू ढाळीत त्यांना आणि संवेदनशील मध्यमवर्गीयांना लुटत राहणार. अशा घटना तर नेत्यांसाठी महापर्वच!
-प्रा. हरी नरके

Monday, January 22, 2018

मधू दंडवते एक भला माणूस-

मधू दंडवते राजकारणाच्या घाणीत राहूनही अतिशय भला माणूस. निळू फुले, डॉ.श्रीराम लागू,सदाशिव अमरापूरकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत मी त्यांच्या निवडणुक प्रचाराला त्यांच्या मतदार संघात कोकणात गेलेलो होतो. तिकडे नारायण राणेंची प्रचंड दहशत होती. त्या निवडणुकीत दंडवते पराभूत झाल्याचे खूप वाईट वाटले होते. एकदा नानांचा [मधू दंडवते]
फोन आला. नाथ पैंच्या नावानं आपण महोत्सव घेतोय. तू अवश्य ये.
मी होकार दिला.
रेल्वेचं तिकीट पोस्टानं घरी आलं.
त्यात माझं वय 65 वर्षे लिहिलेलं होतं.तेव्हा मी अवघा तिशीत होतो. मी नानांना फोन केला, तर ते म्हणाले, अरे आपल्या चळवळीत माणसाचं नाव व्हायला वयाची किमान पन्नाशी ओलांडावी लागते. तुझं नाव मी किमान पंधरा वर्षे ऎकतोय. मला वाटलं तू 65 वर्षांचा नक्कीच असशील.
रेल्वेत तिकीट चेकरनं मला वयाबाबत विचारलं. मी माझं ओळखपत्र दाखवलं आणि मधू दंडवतेसायबांची ही चूक असल्याचं त्याला सांगितलं. तो हसला, म्हणाला, असू द्या. त्यांच्यामुळेच ही कोकण रेल्वे झालीय. दुसरा कोणी असता तर मी नियमाप्रमाणं तुम्हाला फाईन मारला असता पण मधुभाई एकदम जंटलमॅन माणूसाय. बिनधास्त राव्हा.
कार्यक्रमाला माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मधुकरराव चौधरी, नलिनी पंडीत, मेधा पाटकर असे अनेकजण आलेले.
कार्यक्रम छानच झाला. परतताना नलिनीबाईंच्या घरी एक दिवस मुक्काम केला.
एकदा निवडणुक प्रचाराला नाना पुण्याला आलेले. मी सोबत होतो. घोरपडीच्या सभेत मीही बोललो. माझी ओळख सांगताना माझ्या महात्मा फुल्यांवरील पुस्तकांचा सुत्रसंचालकानं उल्लेख केलेला होता.
कार्यक्रम संपल्यावर एक गरीब म्हातारा मला भेटला.म्हणाला, महात्मा फुले तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांना सांगा माझे घेतलेले 500 रूपये परत करा.
मी हादरलो. महात्मा फुल्यांना जाऊन 100 वर्षे होऊन गेलेली.
म्हातार्‍याला चहा पाजला. शांतपणे नीट विचारपूस केली तेव्हा खरा मामला कळला. राज्य शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडे म्हातार्‍यनं अर्ज केलेला होता. तिथल्या एका कर्मचार्‍यानं 500 रूपये लाच घेऊनही त्या म्हातार्‍याचं काम केलेलं नव्हतं. त्या कर्मचार्‍यालाच म्हातारा महात्मा फुले समजत होता. म्हातार्‍याला महामंडळाच्या कार्यालयात घेऊन गेलो. म्हातार्‍यानं लाचखोराला बरोबर ओळखलं.
महामंडळाचे प्रमुख अधिकारी दैठणकरसाहेब यांच्या मदतीनं त्या कर्मचार्‍याकडून 500 रूपये म्हातार्‍याला परत करायला लावले. शिवाय दैठणकरसाहेबांकडून म्हातार्‍याचं कर्ज प्रकरणही मंजूर करवून मार्गी लावलं.
देवेगौडा पंतप्रधान असताना नाना केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते सेवा दलाच्या एका कार्यक्रमाला पुण्यात पुनम हॉटेलात आलेले होते. मीही एक वक्ता होतो. नानांशी छान गप्पा झाल्या. केंद्रीय नियोजन आयोगाने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली तरच त्यांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि घरकुलाचे प्रश्न सुटतील हे मी नानांना बोललो. ते म्हणाले, तू दिल्लीला ये. आपण तरतूद करू.
मी नानांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली. स्वत: नानांच्या हाताने माझे नाव लिहिलेलं व त्यांच्या सहीचं अपॉंईंटमेंट दिल्याचं पत्र आलं.
आम्ही दिल्लीला जाऊन नियोजन भवनात नानांना भेटलो.
त्या दिवशी नानांचा मूड बिनसलेला होता. दुसर्‍या कुठल्यातरी कारणानं ते वैतागलेले होते. मला बघताच म्हणाले, मला तुझा मुद्दा पटलेला आहे. आय एम कन्विन्स्ड. तू पंतप्रधान देवेगौडांना भेट. त्यांच्याकडून आदेश घेऊन ये. मी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करतो.
नाना, प्लीज तुम्हीच आम्हाला मदत करा. पीएमओत आमची ओळख नाही. असं मी त्यांना म्हणताच ते उखडले. मला ते जमणार नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला निराश केलं.
त्यावेळी म.टा.चे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी नितीन वैद्य आणि श्री सुरेंद्र मोहन व विरोधी पक्षाच्या एका खासदारानं आम्हाला पंतप्रधानांची वेळ मिळवायला मदत केली.
पंतप्रधान देवेगौडा बथ्थड होते. त्यांना भटकेविमुक्त, त्यांचे प्रश्न यांचे काडीचेही ज्ञान नव्हते. त्या दिल्ली भेटीत फारसं भरीव असं काहीच हाताला लागलं नाही. तिकीटाचे पैसे फुकट खर्च झाले. मी संतापून नानांना तसं पत्रं लिहिलं. नानांनी पत्राची पोचही दिली नाही.
नाना का चिडले? त्यांना शक्य असूनही त्यांनी दुबळ्या भटक्या विमुक्तांसाठी आपले अधिकार का वापरले नाहीत? आणि शक्य नव्हतं तर आम्हाला दिल्लीचा हेलपाटा आणि खर्च का करायला लावला?
याची उत्तरं कधीच मिळाली नाहीत.
मात्र त्यानंतर मी नानांच्या प्रचाराला कधीही गेलो नाही.
काहीही असो. पण नाना एक भला माणूस होते यात शंकाच नाही!
-प्रा.हरी नरके

Saturday, October 14, 2017

मित्राचे वडील- बाळासाहेब

माझं प्राथमिक शिक्षण पुणे महानगर पालिकेच्या मुंढव्याच्या शाळेत झालं. शाळेच्या शेजारी सेटलमेंट कॅंप आहे. ब्रिटीशांनी सतत गुन्हे करणार्‍या जातींना या सेटलमेंट कॅंपमध्ये बंदिस्त केलं होतं. तिथं त्यांच्यावर दररोज पोलीसांकडं हजेरी देण्याची सक्ती केलेली होती. अशाच एका सेटलमेंट कॅंपच्या संचालक म्हणून सुप्रसिद्ध लेखिका मालतीताई बेडेकर यांनी काम केलेलं होतं. त्या अनुभवावर आधारित कादंबरी त्यांनी 1950 साली लिहिली. "बळी". ती मराठीतली एक अतिशय महत्वाची कादंबरी आहे.
माझ्या शाळेला लागून हा कॅंप असल्यानं यातलीच 70-80 टक्के मुलं माझ्या वर्गात होती. पिढ्यानपिढ्या खिसे कापणं, दारू गाळणं, समोरच्याशी कमालीचं गोड बोलून त्याला हातोहात फसवणं यात ही मंडळी पटाईत असतात. गुन्हेगारीशास्त्रातले जणू पीएच.डी. झालेले तज्ञच.
त्याकाळात पीएमटी बसस्टॉपवर यांच्यापासून सावध राहा अशा सदरात खिसेकापूंचे फोटो लावलेले असायचे. एकदा बस यायला वेळ होता. सहज चाळा म्हणून मी ती नावं वाचत होतो. तर त्यात माझ्याशेजारी बसणार्‍या एका मुलाच्या आईवडीलांचे फोटो बघितले आणि मी हादरलोच.
माझी आई सांगायची, माणसानं एकवेळ उपाशी राहावं पण चोरी करू नये. कसल्याही कामाची लाज वाटू देऊ नये. त्यात कमीपणा नाही. कष्टाचं, मेहनतीचं कमवून खावं. कामानं माणूस मरत नसतो. मात्र चोरीत आणि लबाडीत इज्जत नाही. माणसानं जगायचं तर इज्जतअब्रूनं जगावं."
त्यामुळेच वयाच्या पाचव्या वर्षापासून मी कबरस्थानात बागकाम आणि साफसफाईचं काम करायचो.
तर मी ते फोटो बघून ठरवलं, उद्यापासून त्याला आपल्याशेजारी बसू द्यायचं नाही.
दुसर्‍या दिवशी तो आला नी नेहमीप्रमाणं माझ्याशेजारी बसला. मी त्याला त्याच्या आईवडीलांचे खिसेकापू म्हणून फोटो बघितल्याचं सांगितलं. त्यावर तो फुशारकीनं म्हणाला, तू नीट बघितलं नाहीस. त्यात माझ्या दोन भावांचे आणि तीन बहिणींचेसुद्धा फोटो आहेत. हे तो मला अशा पद्धतीनं सांगत होता की जणू त्याच्या भावाबहिणींनी ऑलिंपिकमध्ये गोल्डमेडल्स मिळवल्याबद्दल त्यांचे फोटो छापलेले होते. सहा महिन्यांपुर्वी मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा मला त्याच्या आईवडीलांकडे बघून ते अट्टल खिसेकापू असतील अशी शंकासुद्धा आली नव्हती.
दरम्यान भटक्याविमुक्तांच्या नेत्यांचं लेखन वाचनात आलं. अनिल अवचटांचं माणसं वाचलं. कोणीही माणूस जन्मानं गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते.प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे या विचारांनी खुप प्रभावीत झालो.
पुढे मीही या चळवळीशी जोडला गेलो. अनेक आंदोलनं, मोर्चे, यात्रा, परिषदा यांच्या आयोजनात पुढाकार घेतला. नेत्यांची पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना समाज मान्यता मिळावी, पुरस्कार मिळावेत म्हणून त्यांची वकीलीही केली. पण हे फार पुढचं झालं.

त्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला त्यानं वर्गातल्या आम्हा सर्वांना घरी बोलावलेलं. मी येत नाही, म्हणून त्यानं खुप आग्रहही केलेला. एकदा बघू तर खरं खिसेकापू कसे दिसतात म्हणून शेवटचं एकदा जावं म्हणून मी त्याच्या घरी गेलो. त्याचे वडील बाळासाहेब आमच्याशी खुप चांगलं वागले. आम्हाला सगळ्यांना त्यांनी बटाटेवडे खायला दिले. सरबत दिलं. एकुण डिट्टो भलीच माणसं म्हणायची!
मी थोडी भीड चेपल्यावर त्यांना विचारलं, ते असला घाणेरडा धंदा कशाला करतात? ते म्हणाले, हे बघ, मला पाच मुली, तीन मुलं. एव्हढं मोठं घर चालवायचं तर दुसरा कोणता धंदा करणार? आजकाल चांगल्या नोकर्‍या तरी कुठं मिळतात? तसा मी सरकारी नोकरीत होतो. पण लई पिट्ट्या पडायचा. लईच काम करावं लागायचं. मरायचा ना माणूस असल्या कष्टांनी. म्हणून सोडली नोकरी.
आता आम्हाला ना रानात शेत आहे ना गावात घर आहे. चोर्‍या करणं चांगलं नाही. पण त्याच्याशिवाय दुसरा शॉर्टकट तरी कुठंय? आता हे एक वाडवडीलांच्या कृपेनं मिळालेलं सरकारी घर आहे म्हणा. पण आता मुलींची लग्नं करायची तर खर्चाची सोय करायला नको? तसंही आमच्यात कोणीही सराईत खिसेकापू असल्याशिवाय मुलगा किंवा मुलगी देतच नाहीत. प्रॅक्टीकलच करून दाखवावं लागतं ना."
ते बोलण्यात अतिशय लाघवी आणि चतुर. दिसायचे अगदी डिट्टो ऋषीमुनीच. मी त्यांच्या शिक्षणाची चौकशी केली तर ते पदवीधर होते. त्यांना उत्तम अभिनय येत असणार. समोरच्या माणसावर एकदम छाप पाडायचे. "लहानपणी म्हणले, वडीलांबरोबर घरोघर ज्योतिष सांगायला जायचो. अंगणात वाळत घातलेले कपडे, राहणीमान, भाषा यावरून हेरायचं आणि अंदाजानं बोलत राहायचं. एकदोन बाण तरी नेमके लागतातच. लई मजबुती कमाई. बोलबच्चनगिरीचं ट्रेनिंग मात्र पाह्यजे. बेस्ट धंदा. पण लई फिराया लागायचं. पाय मोडून जायचं काम."

अलिकडेच एका कार्यक्रमात 40 वर्षांनी तो मित्र भेटला. म्हणाला, वडीलांची नुक्तीच पंच्याहत्तरी झाली. त्यांनी एव्हढ्यांचे खिसे कापले पण कोणालाही डाऊट नाय. मी मात्र आपला एस.टी.त कंडक्टर आहे. माझं त्यांच्याशी पटत नाय. बाकी माझे भाऊ बहिणी आईवडीलांचाच वारसा चालवतात.
आता मी सेटलमेंट कॅंपमध्ये राहत नाही. केशवनगरला राहतो. मला दोन मुलं आहेत. ये एकदा घरी.
पुढं बोलताना म्हणाला, " पुढं मग वडलांना आमच्यातलेच एक समाजसेवक भेटले. ते म्हणले, एव्हढं कष्ट करूने माण्सानं. शहरातल्या लोकांनी लै पाप केल्यालं अस्तंय. त्यांनी तरी कुठं इमानदारीनं कमावलेलं अस्तंय? त्यांचं मन त्यांना खात अस्तंय. आपून माण्साचा बारीक आभ्यास करायचा. गोड बोलून आज्जाद गळा कापायचा. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायची टॅक्ट मातर जमायला पाह्यजे. त्ये एरागबाळाचं कामच नाय. आता रिस्क कोणत्या धंद्यात नसते? आपून त्यांना पुण्य करायचा चान्स द्यायचा. एकदम गोरगरीब असल्याचं मस्त नाटाक करायचं. गरीब माणूस म्हणलं, की शिकल्याली माण्सं लई हालत्यात. आपुण फाट्का शर्टच घालून जायचं. समाजसेवक असल्याची मजबूत बतावणी करायची. मायंदाळ कमाई होतीया. बख्खळ पुरस्कारबी मिळत्यात. मंग, पोलीसांची काय टाप हाय हात लावायची? सोंग मातर आज्जाद जमलं पाह्यजे."
त्यांनी माझ्या धाकट्या बहिणीला वकीलच केलंय. ती त्यांच्याच धंद्यातली एक्सपर्ट हाये. अगदी लेडी डॉनच! नेहमी पेपरात नाव अस्तंय त्या बापलेकीचं."
तो पुढं असंही म्हणाला, " त्यांचं ते ज्ञान माझ्या उपयोगाचं नव्हतं. त्यांचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. मी पुन्हा त्या घरी गेलो नाही."
मला आठवलं, पिंपरी चिंचवडच्या महापौर पदावर याच समाजातले एक सद्गृहस्थ निवडले गेले होते. आता या मागास समाजाला न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. एकदा त्यांच्या घरी त्यांना भेटायला एका पत्रकारमित्रासोबत गेलो असताना घरातून कुजलेल्या गुळाचा आणि नवसागराचा वास येत असल्याचा भास झाला. त्यांच्या चहालाही कसलातरी वास येत होता. जरा नीट बघितल्यावर लक्षात आलं की महापौर महोदयांच्या स्वयंपाकघरात मोठी हातभट्टी लावलेली होती.
मी त्यांना म्हटलं, अहो महापौर, आता तरी हे बंद करा. तुमच्या पदाला शोभत नाही. तर ते अभिमानानं म्हणाले, मी उद्या पंतप्रधान जरी झालो ना तरी बापजाद्यांचा दारू गाळण्याचा धंदा आपण सोडणार नाही. पदावर असल्यामुळं पोलीसांची रेड पडू शकत नाही.
माझे मित्र सुरेश खोपडेसाहेब पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक असताना त्यांनी या दारू गाळणार्‍या मंडळींनी हा धंदा सोडावा नी पर्यायी दुसरं सन्मानजनक काम करून जगावं असा प्रकल्प हाती घेतला. त्याला दारूण अपयश आलं, कारण हातभट्टीच्या,खिसे कापण्याच्या, या धंद्यात कष्ट कमी, कमाई मजबूत.
"साह्येब, मानसन्मान काय चुलीत घालायचाय का? आपल्याला कष्टबिष्ट सांगू नका. मेहनतीचं काम आपल्या शंभर पिढ्यांनी केलं नाही. भिक मागणं, खिसे कापणं, चोर्‍या करणं, दरोडे घालणं यात आपण मास्टर हावोत. आपल्याला कामधंदा जमणार नाही. दिवसभर घाम गाळून कमाई जेव्हढी होते तेव्हढी तर आमचं लहान मुलसुद्धा पंधरा मिन्टात कमावतं. पैसे कमावण्याचा शॉर्टकट हाताशी असताना असली मेहनतीची अवदसा हवी कशाला?" असं काही लोक त्यांना डायरेक्ट विचारायचे.
मुंढव्याच्या शाळेतले एक शिक्षक गेल्या वर्षी सांगत होते, नरकेसर, काही म्हणा, आपण तर हात जोडले बाबा. कितीही प्रयत्न करा. तळमळीनं सांगा. एखाददुसरा अपवाद वगळता या लोकांचं येरे माझ्या मागल्याच चालूय. कुणाला ओळख सांगताना मी मुंढव्याचा आहे म्हटलं की, बसमधला शेजारचा तो माणूस आधी सरकून, जपून बसतो. आपलं पाकीट आधी तपासतो. सतत त्याचं लक्ष त्याच्या पाकीटावर असतं. अगदी लहानलहान मुलंसुद्धा किती सराईत खिसेकापू असावीत?"
ते म्हणाले, "एक अधिकारी तक्रार घेऊन आले. म्हणाले, तुमच्या शाळेतल्या मुलानं माझं पाकीट हातोहात मारलं."
विचारा कसं काय?
" मी माझ्या मोटरसायकलवरून चाललो होतो. रस्त्यात एक लहान शाळकरी मुलगा लिफ्ट मागत होता. खुप उन होतं. बसचा पत्ता नव्हता. मी माणुसकी दाखवायला गेलो. त्याला मागं बसवलं. शाळेजवळ आल्यावर तो उतरला. पुढं एका हॉटेलात मी चहा प्यायला गेलो. पैसे द्यायला पाकीट बघितलं तर पाकीट गुल झालेलं. आजच माझा पगार झाला होता हो."
शिक्षक म्हणाले, त्याला मी वर्गांवरून फिरवलं. त्या भल्या माणसानं त्या मुलाला एका वर्गात बसलेलं बरोबर ओळखलं. चेक केलं तर त्या पाचवीच्या मुलाच्या दप्तरात ते पैशांनी भरलेलं पाकीट सापडलं. आता बोला."
"त्याच्या पालकांना बोलावून समज दिली तर ते पालक उलटं म्हणाले, " पण त्यानं याला लिफ्ट दिलीच कशाला? पहिलं कळायला नको?"
-प्रा.हरी नरके

Friday, December 18, 2015

पुरस्कारांची खिरापत, नेमकी कोणासाठी?

उदंड झाले पुरस्कार!
पुरस्कारांची खिरापत, नेमकी कोणासाठी?
अतिशय प्रतिष्ठेचे मोजके पुरस्कार त्यागी आणि प्रतिभावंताना देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची समाजभावना खरंतर महत्वाची सांस्कृतिक अशी आवश्यक बाब.
अशा पुरस्कारांची आजही गरज आहेच. अशा पुरस्कार विजेत्यांच्या कामाबद्दल सर्वदूर आदर आणि सन्मानाची भावना असते.

पण आजकाल उदंड झाले पुरस्कार! अशी अवस्था असून पुरस्कारांची घोर विटंबना चालू असल्याचे दिसते.

1. पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशी अलिकडे दररोज पुरस्कारांची उधळण चालू असते.  गावगन्ना पुरस्कारांच्या घाऊक खिरापती वाटण्याच्या मोहीमा आत्ताशा चालू असल्याचे दिसून येते. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की दहावीस सटरफटर लोकांना कोणते ना कोणते पुरस्कार मिळाल्याच्या फोटोसह बातम्या वाचाव्या लागतात. काही मंडळींनी तर पुरस्कारांचे कारखानेच उघडल्याचे दिसते. हा एक अतिशय नफा मिळवून देणारा उद्योग असावा असे दिसते.

2. अनेक पुरस्कारांमध्ये तर पाच पन्नास लोकांना स्मृतीचिन्हे देऊन बोळवले जाते. एरवी मान्यवर वक्ते किंवा सेलीब्रेटी यांना कार्यक्रमांना बोलवायचे तर प्रवासखर्च नी मानधन द्यावे लागते. ते टाळण्याचा नामी उपाय संयोजकांनी शोधून काढलेला दिसतो. पुरस्कार देतोय म्हटले की मानधन नी प्रवासखर्च कोण मागणार?
निवडीचे निकष कोणते? निवड समितीचे परिक्षक कोण? पुरस्कारामागील भुमिका काय? असले काहीही प्रश्न या पुरस्कार देणार्‍या घेणार्‍यांना पडत नाहीत.
आजकाल अशी शेकडो मंडळं किंवा एन.जी.ओ. आहेत की ते वर्षातून एकच कार्यक्रम करतात. पुरस्कारवितरण सोहळा.

दिल्लीत भरपूर व्ही.आय.पी.असल्याने काही चतूर लोकांनी 25 वर्षांपुर्वी हा धंदा सुरू केला. दिल्लीचा पुरस्कार म्हटले की लोक भलतेच खूष होतात. नटून थटून बायकापोरांसह जातात. तिथे गेल्यावर कळते की एकुण पाच हजार लोकांना पुरस्कार दिले जाणार आहेत, आणि एका हातगाडीवर पुरस्काराचे बिल्ले ठेवलेले असतात. आधीच मनिआर्डरने संस्थेची सदस्य फी 500 रूपये भरायची आणि दिल्लीत जाऊन लोकांनी रेशनसारखी रांग लावून दहा रूपयांचा बिल्ला घेऊन तोंडात मारल्यासारखे परत यायचे. बरं झालेली फजिती कोण सांगणार?

3.एका पुरस्कार समारंभाचा गाजलेला किस्सा.
एका पुरस्कार विजेत्याला एकुण सत्तर ऎंशी हार पडले तरी त्यांचा चेहरा पडलेलाच. शेवटी बायको म्हणाली, अहो, असे काय करताय?लोकांनी एव्हढे प्रेमाने हार आणले तर जरा हसा तरी. साहेब म्हणाले, अगं माझ्याकडून चारशे जणांनी हाराचे पैसे नेले होते. चांगलंच गंडवलं की नाही चोरांनी.

4. फसणं,फसवणं, फसवलं जाणं हा राष्ट्रीय उद्योग एकुणातच अतिशय तेजीत असावा. काही मंडळी त्यांच्या गावात अतिशय बदनाम असतात. पण बाहेरच्या मंडळींसमोर सामाजिक कामांचा देखावा करण्यात ते पटाईत असतात. त्यातल्या त्यात वंचित, शोषित, कष्टकरी, भटके यांच्यासाठी आपण काम करतो असा उत्तम बहाणा यांना जमतो. त्यावर लोकवर्गणी मिळवून छानछोकीने राहणे, पुरस्कारामागून पुरस्कार कब्ज्यात घेत फिरणे हेच यांचे जगणे.

5. चोर्‍या न लबाड्या  करण्यात  आणि भिका मागण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाहीत. पिढ्यानपिढ्या एव्हढाच हातखंडा उद्योग. मध्यमवर्गिय शहरी लोकांचा सामाजिक जाणिवेचा धागा हेरून तोंड वेंगाडायचे, त्यागाचा आणि समर्पणाचा पाढा वाचायचा, कात्रणांच्या फायली बगलेत मारूनच तयार राहायचे, प्रसिद्धी आणि बिनकष्टाचा मुबलक फायदा आयता चालून येतो.
अशी पुरस्कार खानदाने, लोकभावनांचा अचूक फायदा घेतात. मध्यमवर्गियांची वंचितांना आपण मदत केल्याने पुण्य मिळते ही भावना नेमकी पकडून हे भिकारी पुरस्कार, अनुदाने, वर्गण्या आणि मदती लाटत असतात. हा ओरबाडण्याचा मार्ग आता राजमार्ग होऊ लागलाय काय?

6. निवड समितीच्या दोनदोन फेर्‍या असणार्‍या ठिकाणीही एकाच कामासाठी एकाच घरातील दोनदोन पिढ्यांना दोनतीन वर्षांच्या अंतराने तेच पुरस्कार जेव्हा दिले जातात तेव्हा चकीत व्हायची वेळ येते. बरं एकवेळ सामाजिक काम नसलं तरी चालेल पण निदान चारित्र्य, समाजहिताची मुल्ये आणि छटाकभर तरी प्रतिभा किंवा त्याग असायला हवा की नको? अशावेळी पुरस्काराचे अवमुल्यन झाल्याशिवाय कसे राहील?
................