Showing posts with label व्याख्यानमाला. Show all posts
Showing posts with label व्याख्यानमाला. Show all posts

Saturday, November 10, 2018

श्रेष्ठ प्रतिभेचे धनी प्रा. रंगनाथ पठारे






प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, दणकट कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीसेक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. ताम्रपट ह्या महाकादंबरीने ते पहिल्या श्रेणीचे कादंबरीकार बनले. अरूण साधू यांच्यामते काळाचा अफाट अवाका असलेली, ग्रामजीवनाचे अस्सल चित्रण करणारी, ताम्रपटच्या तोडीची दुसरी कादंबरीच मराठीत नाही.

"सातपाटील कुलवृत्तांत" ही सुमारे आठशे वर्षांचा महाकाय पट चितारणारी, मराठा योद्धे आणि समाज जीवनाचा सबाल्टर्न हिस्ट्रीच्या अंगाने वेध घेणारी महामहाकादंबरी ते सध्या लिहित आहेत. असे मजबूत आणि चिरेबंदी काम मराठीत आजवर झालेलेच नाही.


पठारेसर मूळचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक. ते उत्तम खेळाडू आणि निसर्गप्रेमी आहेत. दुबळ्यांबद्दल अपार कणव, मराठा असूनही सरंजामशाहीचा तिटकारा आणि ज्ञाननिर्मितीबद्दल जिव्हाळा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये. अतिशय नम्र, मातीशी घट्ट नाते आणि तुफान वाचन-चिंतन.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूच शकत नाही असे ज्या काळात बहुतेक सगळे दिग्गज म्हणत होते तेव्हा सरांनी एकदा मला फोन केला आणि प्रदीर्घ चर्चा केली. मराठी भाषेबद्दल ममत्व आणि तिच्या भल्याची आस असल्यानं सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताबडतोब कामाला लागलो आणि म्हणता म्हणता एक महाकाय अहवाल तयार झाला. पठारे समितीचा हा अहवाल केंद्र सरकारने भाषा तज्ज्ञांकडे पाठवला. त्यांनी त्याची छाननी करून मराठीला हा दर्जा द्यावा अशी एकमुखी शिफारस केली.

या काळात सरांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला. त्यांचा उमदा स्वभाव, सलगपणे १६ ते १८ तास काम करण्याची क्षमता, शिस्त आणि सखोल संशोधनाची वृत्ती यांनी मी प्रभावित झालो.

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, सरांचे संगमनेरचे घर, माझे पुण्यातले घर, यशदा आणि शासकिय विश्रामधाम येथे आम्ही सलगपणे असंख्य बैठका घेतल्या नी महिनोन महिने काम केले. सरांमुळे एक मजबूत काम कसे उभे राहाते याचा साक्षात अनुभव मला घेता आला.

आणीबाणीच्या पार्श्वभुमीवरील " दिवे गेलेले दिवस" आणि  " अनुभव विकणे आहे" या पुस्तकांनी सरांनी कादंबरी व कथा लेखनाला प्रारंभ केला. त्यानंतर गेली ४० वर्षे सर अव्याहतपणे लिहित आहेत. अखंडपणे आलेल्या रथ, हारण, चक्रव्यूह, टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, त्रिधा, कुंठेचा लोलक, दु:खाचे श्वापद, भर चौकातील अरण्यरूदन, एका आरंभाचे प्रास्ताविक, चोषक फलोद्यान या त्यांच्या एकाहून सरस एक अशा महत्वाच्या कादंबर्‍या.

सर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळ्याचे. त्यांच्या आणि माझ्या तालुक्यांना जोडणारी घोडनदी. या परिसरात बोलली जाणारी मराठी अचूकपणे त्यांच्या कादंबर्‍यामधून, कथांमधून येते. आमच्या भागातल्या या गावरान मराठीला पठारेसरांनी आपल्या साहित्यातून अजरामर केले. गावगाड्याची जी आरपार समज त्यांना आहे तशी आणि तितकी क्वचितच अन्य कोणा मराठी साहित्यिकाला असेल. हिंदीमध्ये जे काम फनिश्वरनाथ रेणूंनी केलेय त्यातोडीचे काम पठारेसर आज मराठीत करीत आहेत. आज नेमाडेसरांनंतर ज्ञानपीठ मिळायला हवे असे नाव म्हणजे रंगनाथ पठारेसर. घरात लेखनाचा कोणताही वारसा नसताना एकाच पिढीत त्यांनी किती मोठी भरारी घेतलीय! केवळ अभिमानास्पद!

गाव, गोत, कुळ, समकालीन आर्थिक-राजकीय वास्तव, परंपरा व परिवर्तनाची नाळ, जातीय तेढ, अहंकार आणि वर्चस्ववादी मानसिकता यांचे समाजशास्त्रीय दस्तावेजीकरण म्हणजे सरांचे ग्रंथ होत.

त्यांच्या सार्‍याच पुस्तकांवर मी विस्ताराने लिहिणार आहे.

तळेगाव ढमढेरे हे गाव ऎतिहासिक गाव आहे. नुक्ताच ८०० वर्षांपूर्वींचा एक शिलालेख गावात एका वाड्याच्या उत्खननात मिळालाय. हडाप्पा, मोहेनजोदाडो पूर्वकालीन वस्तीचे पुरावे उत्खननात मिळालेले इनामगाव तळेगावपासून जवळच आहे.

महात्मा फुले तळेगावात आल्याचे व एक ऎतिहासिक सामाजिक संघर्ष त्यांनी इथे केल्याचे पुरावे खुद्द जोतीरावांनीच लिहून ठेवलेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत शहीद झालेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे तळेगावचेच.

बृहद पुणे शहराच्या सीमा आता तळेगावपर्यंत विस्तारल्या आहेत. विकासाचा फार मोठा डोलारा या भागात उभा राहतोय. गेली १३ वर्षे आपण या गावात सोनाई नरके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोनाई व्याख्यानमाला चालवतो. पुण्याचे बौद्धिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वैभव या भागाला मिळावे यासाठी, या परिसराचे नितांत गोमटे व्हावे यासाठी ही व्याख्यानमाला महत्वाची पाऊलवाट तयार करते आहे.

निळू फुले, डॉ. आ. ह.साळुंखे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. रामचंद्र देखणे, संजय आवटे, संजय सोनवणी, संजय भास्कर जोशी आदींची भाषणे खूप गाजली. लोक वर्षभर या व्याख्यानमालेची वाट बघतात. पंचक्रोशीतून उदंड प्रतिसाद मिळतो.

सोनाई व्याख्यानमाला, २०१८, यावर्षीचे वक्ते आहेत- प्रा.रंगनाथ पठारे,

सोमवार दि. १२ नोव्हेंबर, सायं. ६ वाजता,

स्थळ- सावता महाराज मंगल कार्यालय, तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि.पुणे.

नक्की यायचं!


प्रा. हरी नरके, ११ नोव्हेंबर २०१८

Saturday, August 4, 2018

मराठी भाषेची इंग्रजीतली मंगळागौर -


" मी मराठी भाषेचा शिवाजी आहे," अशी घोषणा 150 वर्षांपुर्वी पुण्यातल्या एका सनातनी शास्त्रीबुवांनी केली होती. त्यांचे मराठी इथल्या सामान्य माणसाच्या समजण्यापलिकडचे होते. त्यांनी आयुष्यभरात शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्या प्रश्नांवर ब्र शब्द उच्चारला नाही. तरिही या शास्त्रीबुवांचा जयजयकार मराठी भाषेचे शिवाजी म्हणून केला गेला.
अभ्यासक्रमातून तो लादला गेला.

शिवाजी महाराज हे रयतेचे राजे. त्यांचे अपहरण करण्याची सुरूवात इथूनच झाली.

मराठी ग्रंथांची छपाई 1806 ला सुरू झाली. ज्या महात्मा जोतीराव फुल्यांनी मराठीतले पहिले पोवाडारूपी शिवचरित्र लिहून जून 1869 ला प्रकाशित केले त्यांच्या ह्या कार्याची दखल घ्यायचे सोडा, शास्त्रीबुवांनी त्यांच्या व्याकरणात कशा चुका आहेत याचा हिशेब मांडण्यावर भर दिला. 1876 च्या भीषण दुष्काळात लाखो भारतीय मेले त्याबद्दल अवाक्षर न लिहिता शास्त्रीबुवा मराठी व्याकरणावर लेख लिहित राहिले. फुल्यांवर त्यांनी आयुष्यभर गलिच्छ टिका केली. गरळ ओकले.
विनोद म्हणजे या मराठी भाषेच्या शिवाजीने ही घोषणा चक्क इंग्रजीत केली होती. "आय एम दि शिवाजी ऑफ मराठी लॅंग्वेज"

हे आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यातले जे मराठी विचारवंत कायम सामान्य माणसांशी एकरूप झालेले होते, त्यांच्या नावे काल पुण्यात एक व्याख्यान झाले. संयोजक मराठी, वक्त्या मराठी, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यान ते मराठी, विषय मराठी भाषेचा, पण व्याख्यान सामान्य मराठी माणसांना समजू नये म्हणून इंग्रजीत!

वर्तमानपत्रांनी बातम्या देताना काय लिहावे?

म्हणे बुद्धीवंतांनी व्याख्यानाला गर्दी केली होती!

यातले 95% तथाकथित "बुद्धीवंत!" म्हणजे मराठीला कायम नाकं मुरडणारे, मूळचे मराठीच पण इंग्रजी मिडीयममधून मराठी शिकलेले, धड मराठी न येणारे, तरीही मराठीचे तज्ज्ञ म्हणून मिरवणारे.

हे लोक मराठीचे संरक्षक-अभ्यासक आहेत की "तेव्हढेच ज्ञानप्रकाशात" म्हणून चमकून घेणारे?

-प्रा. हरी नरके

Sunday, October 8, 2017

प्रा.मु.ब.शहासर- उत्तम वक्ते

धुळ्याचे प्रा.मु.ब.शहासर हे उत्तम वक्ते होते. राष्ट्र सेवा दल आणि राजवाडे संशोधन मंदिर या दोन संस्थांसाठी ते खुप झटले. ते नामवंत शिक्षक होते.
मी अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शिकत असताना विविध आंतर महाविद्यालयीन वादविवाद-वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे. त्यात प्रवरानगरला सर मला परीक्षक होते. त्याच स्पर्धेत 35 वर्षांपुर्वी सर्वप्रथम राधाकृष्ण मुळी, यमाजी मालकर यांची भेट झाली. मैत्री जुळली. मुळी यांनी त्या उत्स्फुर्त स्पर्धेत आचार्य अत्रे यांच्यावर केलेलं भाषण आजही एव्हढ्या वर्षांनी माझ्या लक्षात आहे.
त्या स्पर्धेनंतर मी शहासरांना भेटून वक्तृत्व, वाचन आणि आवाज यांच्या सुधारणांबद्दल विचारलं. राष्ट्र सेवा दलात असलेले मु.ब. शहासर उंच, गोरे, रूबाबदार, बघताच प्रभाव पाडील असं व्यक्तीमत्व. फर्डे वक्ते. ते मला शांतपणे म्हणाले," हे बघ, वक्तृत्व ही एक कला असली तरी माणसाचं रंगरूप हे जन्मानं मिळतं आणि वक्त्याच्या दिसण्याचा त्याच्या वक्तृत्वावर फार मोठा परीणाम होतो. तुझा रंग एव्हढा काळाभोर आहे की तुझा प्रभाव पडणार नाही. तुझ्या भाषणांकडे लोकांचं लक्षच जाणार नाही. आता तु्झा चेहरा... कधी आरश्यात बघितलायस? .... तर तात्पर्य असं की तू वक्ता बणण्याच्या फंदात अजिबात पडू नकोस. हा नाद सोड." सर बोलत गेले आणि मी खचत गेलो. कुठून झक मारली आणि यांना भेटलो असं झालं. प्रवरानगरहून परत येताना खुप चिडचिड झालेली.
पण मग नंतर मी असा विचार केला की शहासर कदाचित सदहेतूनंही बोलले असतील. मला उचकवावं, पेटवावं हाही हेतू असेल त्याच्यामागे. आता आपण किमान बरा वक्ता नक्कीच व्हायचं. झपाटून वाचायचं. अण्णा म्हणजे प्रा. गं. बा. सरदार यांना भेटून मी त्यावर चर्चा केली. अण्णा म्हणाले, " तू अजिबात खचू नकोस. ते शहांचं व्यक्तीगत मत आहे. मला ते पटत नाही. तुझ्या एखाद्या मुद्द्यानं ते दुखावले असतील. विसरून जा. परत भेटले तर मनात कटुता ठेवू नकोस. मला खात्रीय त्यांना आपलं मत बदलावं लागेल. माणसाला वेगळं मत जरूर असावं. पण विद्यार्थ्यांपुढे ते अशा पद्धतीनं मांडणं मला तरी गैर वाटतं. असं बघ, अजातशत्रू वगैरे हे खरं नसतं. नॉनकमिटल राहणं सोयीचं आणि फायद्याचं असेलही, पण भुमिका घेणं महत्वाचं आहे. सगळी नाटकं करता येतात पण तळमळीचं नाटक नाही करता येत. तुझी ग्रामीण नाळ, वाचन, मेहनत, तुझी ओरिजनॅलिटी तुला खुप पुढे घेऊन जाईल." अण्णांच्यामुळे माझी उमेद वाढली. अशाच शुभेच्छा पु.ल., बाबासाहेब पुरंदरे यांनीही दिलेल्या. बाकीचे पण अनेकजण उत्तेजन द्यायचे. विशेषत: विनायकराव कुलकर्णी, एसेम अण्णा, ग.प्र.प्रधान पाठीशी होते.  सततची मेहनत आणि मित्रांशी सतत वादविवाद यातनंही उर्जा मिळायची. त्याचकाळात चंद्रकांत कुलकर्णी, भूषण गगराणी, अभिराम भडकमकर, सदानंद दाते, विकास आबनावे आणि आणखी कितीतरी मित्र मिळत गेले.
पुरस्कारामागून पुरस्कार मिळत गेल्यानं आत्मविश्वास वाढत गेला. माझ्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य मा.तु.पवार यांनी " हरी, तुला हव्या तेव्हढ्या स्पर्धा कर, फक्त नापास होणार नाहीस याची काळजी घे," असा सल्ला दिला.
आज मागं वळून बघताना गंमत वाटते की त्या अवघ्या 3 वर्षांमध्ये मी 133 वादविवाद, वक्तृत्व, उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. बक्षीसं काय कुणाला तरी मिळायचीच. बहुधा माझ्या ग्रामीण पार्श्वभुमीमुळे, तडाखेबंद आणि कळकळीच्या बोलण्यामुळे असेल पण त्याकाळात कधी पहिलं, कधी दुसरं तर कधी तिसरं, पण बक्षीस न घेता परत आलो असं घडलं नाही. बाय द वे शहांच्या वेळी प्रवरानगरलाही मला तिसरं बक्षीस मिळालेलं होतं बरं का. पुढच्या वर्षी तर प्रवरानगरचं पहिलं बक्षीस मला मिळालेलं. तर असो.
मध्यंतरी धुळ्याच्या शरद पाटलांनी कापडण्याच्या ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला बोलावलेलं होतं.
बघतो तर काय स्टेजवर साक्षात प्रा. मु. ब. शहासर होते. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, "सर आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळं बरं का!" ते खुष झाले.
संयोजक मला म्हणाले, "एक अडचण आहे. नियोजित अध्यक्ष आजारी असल्यानं येऊ शकत नाहीयेत. तर मु. ब. सरांना करूया का अध्यक्ष?"
मी म्हणलो, " जरूर करा."
शहासर तयार झाले. मात्र त्यांनी अट घातली, म्हणाले," मी हरी नरकेच्या आधी बोलणार."
शहासर उत्तमच वक्ते होते. ते छानच बोलले. मुद्देसूद. अभ्यासपुर्ण.
प्रवरानगरचा प्रसंग त्यांच्या लक्षात होता.
त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या भाषणात आवर्जून केला.
म्हणाले, "मी प्राध्यापक म्हणून अनेक वक्ते घडवले. हरी नरकेला मी प्रवरानगरला परिक्षक होतो. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, हा पोरगा चमकणार. मी त्याला तिकडे बक्षीस देऊन तसं भाकीतही केलं होतं. काय हरी, तुझ्या लक्षात आहे ना? असणारच म्हणा. ज्याअर्थी आता स्टेजवर मला भेटल्याभेटल्या नमस्कार करून, तू म्हणालास, " सर, आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळं बरं का! त्याअर्थी तुही माझं ऋण मानतोस! ..."
मी तसा फाटक्या तोंडाचा. शहासरांना प्रवरानगरला खरा प्रसंग काय घडला होता, त्याची आठवण करून द्यावी असा खुप मोह झाला. पण आवरला.
म्हणतात ना, ज्याचा शेवट चांगला... सरांच्या विचारात बदल झालाय तर आता जुनं उकरून कशाला काढा?
चुकतात कधीकधी मोठ्या माणसांचे अंदाज! मी माझ्या भाषणात एव्हढंच म्हटलं, "सर, प्रवरानगरला काय घडलं, ते तुम्हाला आणि मला माहित आहे. तुमचं व्हर्जन तुम्ही सांगितलंत. एकच विनंती, निदान यापुढे तरी केवळ दिसण्यावरून कोणाला ठोकू नका. अहो, आपले संत चोखामेळा सांगून गेलेत, " उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा...."
भाषण संपवून मी खाली बसल्यावर शहासर माझा हात आपल्या हातत घेत मला म्हणाले, "आज तू जोरदार बोललास. पुढं ते मला Sorry" म्हणाले.
संयोजक बघतच राहिले. शहासर एकीकडे छान बोललास असंही म्हणताहेत अणि त्याच वेळी Sorry ही म्हणताहेत. एकुण हे काय प्रकरण आहे बुवा?
विनम्र आदरांजली.
- प्रा. हरी नरके

Wednesday, March 29, 2017

एस.टी.स्टॅंडसारखा एअरपोर्ट

तुम्ही कधी नेपाळमधील जनकपुरला गेलायत?
मस्त गाव आहे. रामायणातला राजा जनक याचं हे गाव असं तिथले लोक मानतात. तर तिथल्या गावाबाहेरच्या विमानतळावर आम्ही तिघे उभे होतो.
आम्हाला जायचं होतं काठमांडूला, नेपाळमध्ये. महाराष्ट्रातल्या कुठल्याही मोठ्या शहराच्या एस.टी.स्टॅंडच्या बाहेर जसे खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांचे एजंट अमूक रूपयात अमूक गावी जाणारी बस लगेच सुटणार आहे असं ओरडत उभे असतात अगदी तसंच चित्र होतं त्या विमानतळाबाहेरचं. चलो,चलो, हिमालया एअरलाईन्स, बुद्धा एअरलाईन्स, काठमांडू एअरलाईन्स, अवघ्या बाराशे रूपयात काठमांडूला नेणार म्हणून तिकडचे एजंट ओरडत होते. आम्ही तिघं आहोत म्हटल्यावर त्यानं प्रत्येकी दोनशे रूपये कन्सेशन दिलं.
आम्ही त्याच्यासोबत आत गेलो, त्यानं स्वत:च्या हातानं लिहून आम्हाला बोर्डींग पास दिले. तिथलं सिक्युरिटी चेक म्हणजे नेपाळी पोलीसवाला आपल्याला बॅगा उघडायला सांगतो. स्वत:च्या डोळ्यांनी बघतो आणि पुढे जा म्हणुन सांगतो. तो एजंट आमचं सामान घेऊन आम्हाला आत विमानजवळ घेऊन गेला. आमचं सामान त्यानं आत टाकलं. छोटं विमान होतं. जेमतेम 16 सीटर. त्यानं आम्हाला आत बसवलं आणि नविन पॅसेंजर आणायला गेला. अशाप्रकारे अर्ध्या तासात विमान फुल झालं.
त्यानं आत येऊन आम्हाला सर्वांना ज्युस दिला. सुचना दिल्या आणि तो उतरून गेला. दुसरा एक कर्मचारी आला आणि तो आत जाऊन पायलटच्या सीटवर बसला. तोच आता आमचा "कॅप्टनवा" किंवा "पायलटवा" होता.
हिमालयातला तो हवाई प्रवास मात्र अविस्मरणीय होता. अगदी हाताच्या अंतरावर एव्हरेस्ट दिसत असतो. भन्नाट.
काठमांडूला राजधानी असल्यानं जरा बरा विमानतळ आहे. बाहेर आलं की चौकाचौकात राजघराण्यातील कोणाचे तरी पुतळे असतात. पण त्यांची कोणाचीही उंची अवघी फुट दीडफुट असते.
काठमांडूमध्ये एका चौकाला संत ज्ञानेश्वरांचे नाव दिलेले दिसले. तिथल्या भाषेत, चहा,भात,चेहरा असे मराठी शब्द  ऎकताना छान वाटत होतं.
तिथले पशुपतीनाथाचे मंदिर फार फेमस. तिकडे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले, तुम्ही दुसर्‍या देशातून आलात म्हणून तुम्हाला तिकीट काढावे लागेल. दरडोई सत्तर रूपये तिकीट. मंदिरात जायला तिकीट ही कल्पनाच भारी वाटली.
तिकीट घेऊन आत गेलो तर पंडे लोकांनी चक्क घेराव घातला. अमूक रूपयात अभिषेक, अमूक रूपयात तमुक पुजा वगैरे.
आम्ही नाही म्हटलं तरी जाम सोडायला तयार नाहीत. वैताग.
मला एक आयडीयाची कल्पना सुचली. एक पंड्या फारच गळ्यात पडत होता. मी त्याच्याशी थोडं बोललो. त्याला वाटलं गिर्‍हाईक पटलं. गडी खुष.
मला म्हणाला, "साब तुम्हारा गोत्र कौनसा हैं?"
मी म्हटलं, " फुले-आंबेडकर."
तो म्हणला, "यह क्या होता हैं? तुम्हारी जाती कौनसी हैं?"
मी म्हटलं, "महादलित." तो जो 120 च्या स्पीडनं पळाला. तो परत काही फिरकला नाही. त्यानं बाकीच्यांना काय सांगितलं, माहित नाही पण त्यानंतर एकही पंडया आमच्या आसपासही फिरकला नाही. तिकडची नदी म्हणजे पुण्याचा आंबीलओढा मोठा म्हणावी अशी मरतुकडी. मुंबईच्या समुद्रात असतं तसं किंवा पुण्याच्या मुळामुठेत असतं तसं गटाराचं पाणी वाहून नेणारा ओढा जेमतेम. सगळीकडे अतिशय घाण. अस्वच्छ वातावरण. आम्ही आणखी थांबलो तर उलटी व्हायची म्हणुन तिकडनं पळालो.
बाकीचा नेपाळ दौरा मात्र एकदम झकास. हिमालयाचा काय वरदहस्त. निसर्गाची मनमुराद सोयरिक. वा.
आम्ही परत जनकपुरला आल्यावर सीतामढीला जिल्ह्याच्या ठिकाणी माझं व्याख्यान होतं. सीतामढी म्हणजे जनक राजाला शेतात जिथं सीता सापडली ते ठिकाण अशी श्रद्धा.
मैदानात खुर्च्या मांडलेल्या. सारे वयस्कर लोक खुर्चीवर मांडी घालून बसलेले. स्टेज सुमारे 20 फूट उंचीचे. त्यावर चढायला चक्क एक शिडी लावलेली. कार्यक्रम चांगला झाला.
हाटेलवर आलो तर रात्रभर एक लाऊडस्पीकर कसली कसली देवीची गाणी किंचाळत होता. मी चौकशी केली की बुवा इकडं रात्री 10 च्या पुढं लाऊडस्पीकरला बंदी नसते का? पोलीस काही कारवाई का करीत नाहीत वगैरे.
हाटेलवाला माझ्याकडं तुम्ही "येडे का खुळे" अशा नजरेनं बघायला लागला. त्यानं दिलेल्या माहितीतून समजलं ते इतकंच की आज डीवायएसपी साहेबांच्या बंगल्यावर पुजा होती आणि म्हणून तो लाऊडस्पीकर रात्रभर बोंबलत राहणार होता. तिकडे बहुतेक वेगळंच सुप्रीम कोर्ट असणार.
सीतामढी ते पाटणा कारचा प्रवास अवघा तीनचार तासांचा. पण येतानाचा अनुभव जमेला धरता आम्ही आपलं 12 तास आधीच निघालो होतो.
मुंबई ते पाटणा फ्लाईटने आलो होतो. प्रमितीचा हा पहिलाच बिहार प्रवास होता. संगिता व प्रमितीची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी माझ्या नेहमीच्या सवयींना काट देऊन चारचार वेळा पाटण्याला आम्हाला न्यायला संयोजक वेळेवर पोचतील याची खात्री करून घेतलेली होती.
संयोजक सकाळीच पाटण्याला रवाना झाल्याची मुंबईतून फोन करून पुन्हापुन्हा खातरजमा करून घेतलेली होती.
आम्ही ऎतिहासिक पाटलीपुत्र उर्फ पाटणा विमानतळावर पोचलो तर कार अद्याप आलेली नव्हती. मोबाईलवर फोन केला तर संयोजक म्हणाले, "साबजी, बस पहुंचही रहे हैं.
क्या करे जॅम लगा हुवा हैं. उसने फंसे हैं."
किती वेळ लागेल या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले, जॅम निघाला तर फक्त अर्धा तास. आणि नाही सुटला तर मग मात्र कितीही तास."
मी म्हटलं, "म्हणजे किती?"
ते म्हणाले, "काहीच सांगता येणार नाही. कदाचित सहा तास, कदाचित बारा तास. कितीही."
बापरे. मी टरकलो. आता काय करायचं? ते म्हणाले, पहिलं म्हणजे शेजारच्या हाटेलात जाऊन जेवून घ्या. फेरफटका मारा. शहरातील म्युझियम बघा आणि तरिही टाईम उरला तर एखादा सिनेमा बघा.
तर अशाप्रकारे संध्याकाळी म्हणजे आम्ही एयरपोर्टवर पोचून अवघे आठ तास झालेले असताना ते आम्हाला घ्यायला पोचले.
आम्ही सीतामढीला निघालो. गंगा ओलांडली आणि संयोजक म्हणाले, "आगे खतरा है. हमारे साथ बिटीया और भाभीजी है इसलिए इतनी देर रात आगे जाना ठीक नही होगा."
आम्ही हाजीपुरला मुक्काम करायचे ठरवले. रेल्वे स्टॆशनच्या समोर असलेल्या सबसे बढीयां हाटेलात त्यांनी आम्हाला नेले. ते तिथले कायम खासदार आणि कायम केंद्रीय मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांचे होते. अत्यंत भिकार आणि गलिच्छ. पासवान महोदय गेली 30 वर्षे कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी हे मंत्री असतातच.
त्यांचे हे हाटेल म्हणजे आपल्याकडे एखाद्या किरकोळ गावात असणार्‍या चाळीपेक्षाही भिकार होते.
आमच्या खोलीत सगळी मिळून साधारणपणे आठ बाय आठ फूट जागा. स्वच्छतागृह आपल्या एस.टी.स्टॅंडवर असते त्याच्याहीपेक्षा घाण.
संगिता आणि प्रमिती जाम वैतागल्या. पण रात्र झालेली होती. कशीबशी रात्र काढली आणि पहाटेच मार्गस्थ झालो.
सीतामढी...
एक थोर शहर.
तर आता आम्ही सीतामढीहून पाटणा आणि तिकडून रेल्वेने पुणे असा परतीचा प्रवास करीत होतो. गंगेच्या पुलावर आम्ही पोचलो तेव्हाच आम्ही सुमारे सहा तास आधीच पाटण्यात पोचू असे आमच्या लक्षात आले. हरकत नाही. पाटण्यात फिरता येईल. रात्री दहाची ट्रेन होती. कोणतीही धावपळ न करता आरामात ती पकडता येईल.

गंगासागरवर पुलाच्या दुरूस्तीचे काम चालू होते. पुलावरचा रस्ता गर्दीने फुललेला होता. पण काळजीचं कारण नव्हतं कारण आमच्या हातात सहा तास होते. थोडं पुढे काय गेलो तर वाहतुक ठप्प झालेली. जॅम लगा हैं. कधी मुंगीच्या स्पीडनं तर कधी एकाच जागेवर तासतासभर प्रतिक्षा करीत आम्ही तिकडे अडकलो होतो.
वाट बघुनबघुन आम्ही थकलो. जॅम खुलनेकी कोई गुंजाइश नही थी. आम्हाला सांगण्यात आलं की अजून साडेतीन किलोमीटर पुल बाकी आहे. हा पुलच मुळी साडेपाच किलोमीटर लांबीचा आहे. एकदा पुल ओलांडला की मग काय दहा मिनिटात रेल्वे स्टेशनवर.
शेवटी रात्रीच्या नऊ वाजता आम्ही तिघे कारमधून खाली उतरलो. आमच्या बॅगा घेतल्या आणि पायी चालत अंधारात ठेचकाळत एकदाचा साडेतीन किलोमीटरचा पुल ओलांडला. पुढे मात्र रस्ता एकदम मोकळा होता.
एका रिक्षावालाल्या विचारलं. तो प्रामाणिक होता. आपणहून म्हणाला, गेले सहा तास तो बसून होता. त्यामुळे एरवी तो या अंतराला पन्नास रूपये घ्यायचा पण आज तो अडीचशे रूपये घेणार होता.
आम्ही घासाघीस करत बसलो असतो तर ट्रेन चुकली असती. मे महिना असल्यानं सार्‍या रेल्वेगाड्या फुल होत्या. कसंबसं आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालेलं होतं. ट्रेन आम्हाला चुकवायची नव्हती.
आमच्या हातात फक्त 5 मिनिटं होती. त्यानं रिक्षा फुलस्पीडनं मारली. रस्ता पुर्ण मोकळा होता. आम्ही रेल्वेस्टेशनला पोचलो तेव्हा गाडी सुटत होती. रिक्षावाला स्वत: आमच्या दोन बॅगा घेऊन धावला. माझ्याकडे दोन बॅगा होत्या. आम्ही धावत सुटलो.
शेवटच्या डब्यात त्यानं संगिता अन प्रमितीला चढवलं. मीही आत घुसलो. त्यात पायातली एक चप्पल खाली पडली. रिक्षावाल्याला तीनशे रूपये दिले. त्याला काय वाटलं माहित नाही. तो म्हणाला, " बाबुजी, ऎसा करते हैं, मैनें आपको ढांईसौ रूपया बोला था. मगर ये गलत हैं. मैं सौ रूपये रखुंगा. बाकी यह आप ले लो. बिटीयाको मिठाई खिला देना."
...................
टीप : गेल्या सातआठ वर्षात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये रस्त्यांचं जाळं इतकं उत्तम उभारलंय की आमचा हा 2008 सालचा हा अनुभव आज काल्पनिक वाटावा. आता बिहार ओळखू येऊ नये इतका बदललाय. रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखाच चकाचक झालाय.

Tuesday, February 14, 2017

प्रवास -- लोकं जब्राट प्रेम करतात


वीसेक वर्षांपुर्वीची गोष्ट.
एप्रिल महिन्यातला व्याख्यान दौरा होता. त्यावेळी मोबाईल नव्हते. गावात फोनसुद्धा फार मोजक्या लोकांकडे असायचे.
पत्रानं मराठवाड्यातली तीन निमंत्रणं स्विकारली होती. अंतरं विचारली तर, "विशेष काय नाय, जवळजवळच आहेत गावं" अशी उत्तरं.
"किती किलोमीटर?" या प्रश्नाला , "ते नाही सांगता यायचं,पण विशेष दूर नाहीत" असं उत्तर.
आधल्या दिवशी परभणीहून संयोजकांनी दिलेल्या नंबरवर फोन केला तर उत्तर मिळालं, "तुम्ही दुपारी 2 वाजता निघा, 6 वाजता पोचा, आधी पोचून तरी काय करणार?"
"मार्ग कोणता?"
"या लातूरमार्गे."
दुपारी 2 वाजता एस.टी. स्टॅंडवर गेलो तर लातूर बस लागलेली होती.
घेतली.
पण ती निघाली, जनता बस. हात दाखवा, एस.टी. थांबवा. ती रेणापूरमार्गे होती. तिने लातूरला पोचायला 6 वाजवले.
परांड्याच्या बसची चौकशी केली तर, "डायरेक्ट बस नाही,पण येडशीला जा, तिथून मिळेल परांडा बस." असं सांगितलं चौकशी खिडकीनं.
लातुर - मुंबई येडसीमार्गे बस लागलेलीच होती. तुफान गर्दी. झुंबडच उडालेली.
कसाबसा घुसलो.
रात्री पावणेआठला ती येडशीला पोचली.
चौकशी खिडकी बंद करून साहेब घरी निघाले होते. म्हटलं, "परांडा बस कधीय साहेब?"
"आहे की आठला."
छान वाटलं. चला पंधरा मिनिटात बस मिळणार.
"तुम्ही बंद करून निघाले काय?"
ते म्हणाले, "हो. शेवटची गाडी गेली, आजचं काम संपलं, निघालो आता घरी."
"आठची बस आहे ना?"
"हो आहेना, उद्या सकाळी आठला".
बापरे! रात्रीची वेळ. अनोळखी गाव.पोचायचं ते गाव अजून 40 किलोमीटरवर.
शेजारच्या पब्लिक फोन बुथवरून फोन केला. उत्तर मिळाले, "आरामात या, लोकं जमायलीत. टाइम लागंल. काय काळजीचं कारण नाय!"
"पण वाहनाचं काय?" म्हणताच ते म्हणाले, "येडशीत, चौकशी करा. टॅक्शी घ्या आणि या."
विचारलं, तर पब्लिक फोन बुथवाला म्हणाला,"हे पुणं मुंबई थोडंच आहे, टॅक्सी मिळायला? इथं कसली टॅक्शीनफॅक्शी?"
मग आता?
"तुम्ही असं करा, इथं थांबू नका. एक किलोमीटरवर धाबा आहे, तिकडं जा. रातच्याला इथं चोराचिल्टाचं लई भ्याव असतंय. दारूडे, जेबकतरे अड्डा टाकत्यात."
पुन्हा फोन केला. मी चिडलो होतो, "निदान मोटरसायकल तरी पाठवा राव घ्यायला!"
तर पलिकडून शांत उत्तर, "बघ्तो, पण लईकरून तुम्हीच या जसं जमल तसं"
पब्लिक फोन बुथवाल्यानं त्याच्या मोटर सायकलवरून धाब्यावर सोडलं, सांगितलं, "हैद्राबादहून येणारी बस घ्या, ती तुम्हाला परांड्याला सोडील."
धाबेवाला म्हणाला, "हैद्राबादहून येणारी बस दिवसाआड येते. आज येईल की नाही नाय सांगता येणार! रात्री बाराच्या पुढं येते ती. आरामात बसा जेवन करा. दोन अडीच तास आहेत."
...रात्री बारा वाजता हैद्राबाद बस आली. तुंबळ गर्दी. कंडक्टर म्हणाला, " जगा नय. उपर बैठना पडेगा. आभी इदर सब लोग खानावाना खायेगा. आराम करेगा. हमको शिर्डी सुबा पहुंचना हैं."
एस.टी.च्या टपावर बसून रात्री अडीच वाजता परांड्याला पोचलो.
एस.टी.स्टॅंडवर 50 ते 60 जण घ्यायला थांबलेले.
मी खूप चिडलो होतो.
घोळ असा होता की गावात फोन होता तो विरोधी गटाकडं. त्यांनी मुद्दामच मला चुकीचा सल्ला दिलेला. तो मला एक सांगत होता, अन संयोजकांना त्याच्या उलटं.
मला येरमाळामार्गे येण्याऎवजी मुद्दामच लांबचा मार्ग घ्यायला लावला होता पठठ्यानं.
मुलं म्हणाली, "सर, वांधा नाय, आपण आत्ताच कार्यक्रम करूया."
आत्ता? रात्री/पहाटे तीन वाजता?
" कायबी प्राब्लम नाय. 300 लोकं वाट बघायलेत तुमची."
आता पाणी माझ्या डोळ्यात होतं!
असे प्रेमाचे श्रोते अन्यत्र कुठे मिळतील?
..............................

Friday, November 8, 2013

व्याख्यानमाला-निमंत्रण