Showing posts with label विविध. Show all posts
Showing posts with label विविध. Show all posts

Tuesday, July 24, 2018

नामांतर शहीद विलास ढाणे - स्मृती आणि वेदना









" नमस्कार. मी शिवाजीनगर पोलीस स्टॆशनमधून बोलतोय. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर एका तरूणाने रेल्वेखाली आत्महत्त्या केलीय. त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवर नामांतर आंदोलनाला माझ्या समाजाचा असलेला विरोध कमी व्हावा यासाठी मी आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटलेले आहे. त्यात तुमचे नाव मिळाले. आत्महत्त्या करणार्‍या तरूणाचे नाव विलास ढाणे आहे." महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सोमवारच्या साप्ताहिक बैठकीत आम्ही असताना डॉ. बाबा आढावांना हा फोन आलेला होता. आम्ही सारेच सुन्न झालो. श्रद्धांजली वाहून सभेचे काम आवरते घेण्यात आले.

विलास ढाणे हा सातारा जिल्ह्यातला तरूण. सप्टेंबर 1982 मध्ये मुंबईत नामांतर सत्याग्रह झाला होता. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पहिल्याच दिवशी 16 हजार नामांतरवाद्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यात डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, कॉं. शरद पाटील, बाबूराव बागूल, रावसाहेब कसबे, प्रा. अरूण कांबळे, डॉ. कुमार सप्तर्षी, अंकुश भालेकर, बापूराव जगताप, लक्ष्मण माने आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर आदींचा समावेश होता. आझाद मैदानावर झालेल्या सभेला शुभेच्छा द्यायला तब्बेत बरी नसूनही अण्णा, एसेम जोशी आलेले. ज्या तरूणाने त्यांना उदगीरल जोड्यांचा हार घातलेला होता, तोही उपस्थित होता. त्याने जाहीरपणे क्षमायाचना केली होती. आपल्याला गुमराह केले गेले. आपला वापर केला गेला असे तो म्हणाला. आम्हाला सर्वांना ठाण्याच्या तुरूंगात ठेवलेलं होतं. तिथं या विलास ढाणेचा परिचय झालेला होता. मनस्वी, अत्यंत संवेदनशील तरूण.

नामांतराला विरोध करण्यासाठी भयानक हिंसाचार करण्यात आला होता. गोरगरीबांची घरं जाळण्यात आली होती. निष्पापांना ठार करण्यात आलेलं होतं. माझा समाज हिंसाचारात पुढे आहे याचा गिल्ट विलासला होता.

विलासनं शिवाजीनगर रेल्वे स्टेशनात लोकलखाली आत्महत्त्या केली.

२७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. १४ जानेवारी १९९४ रोजी ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.

हे करण्यासाठी 26 वर्षे संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे हे नामांतर झाले. अनेकांनी अनेक प्रकारे लढा दिला.

पुढे या आंदोलनावर काही पुस्तकं लिहिली गेली. स्मारकं उभी राहिली. पण यातल्या बहुतेकात  डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचासुद्धा उल्लेख नाही मग विलास ढाणेचा कु्ठून असेल?विकीपिडीयावर नामांतर शहीद म्हणून खालील शहीदांचा उल्लेख आहे. त्यात विलासचे नाव नाही.

नामांतर आंदोलनातील शहीद-
The martyrs of Namantar Andolan:
Pochiram Kamble पोचिराम कांबळे, Janardan Mawade जनार्दन मवाडे Gautam Waghmare (गौतम वाघमारे),
Suhasini Bansod (सुहासिनी बनसोड),Govind Bhurewar (गोविंद भुरेवार), Bhalchandra Borkar (भालचंद्र बोरकर),Roshan Borkar (रोशन बोरकर),
Avinash Dongre (अविनाश डोंगरे),Narayan Gaikwad (नारायण गायकवाड),Shabbir Ali Kajal Hussain (शब्बीर अली काजल हुसैन),Chandar Kamble (चंदर कांबळे),
Domaji Kuttarmare (डोमाजी कुत्तरमारे),Janardan Mhaske (जनार्दन मस्के),Ratan Mendhe (रतन मेंढे),Kailas Pandit (कैलास पंडित),Ratan Pardeshi (रतन परदेशी),
Dilip Ramteke (दिलीप रामटेके),Dyneshwar Sakhare (ज्ञानेश्‍वर साखरे),Abdul Sattar (अब्दुल सत्तार),Pratibha Tayade (प्रतिभा तायडे),Diwakar Thorat (दिवाकर थोरात),
Manoj Waghmare (मनोज वाघमारे),Shila Waghmare (शीला वाघमारे)
https://en.wikipedia.org/wiki/Namantar_Shahid_Smarak

नाही चिरा नाही पणती!

शेवटी संत तुकाराम म्हणतात तेच खरे!
-प्रा.हरी नरके

Monday, July 9, 2018

स्त्रीपुरूष विषमता सांगणारा चाणक्य--

कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ सुमारे 2200 वर्षे टिकून राहिलेला आहे. ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, त्यावरचा हा ग्रंथ नाहीए. त्यात प्रामुख्याने राजकारण, समाजकारण, न्याय, नीती, राजा, प्रजा, योगक्षेम, मुख्य म्हणजे व्यवहार आणि मुत्सद्दीपणा [कुटीलता] हे विषय आलेले आहेत.
हे पुस्तक जागतिक साहित्यातले महत्वाचे पुस्तक मानले जाते.

त्यात अनेक लोककल्याणकारी सुत्रे असली तरी सव्वादोन हजार वर्षांपुर्वीचा चाणक्य आज जसाच्या तसा स्विकारता येणे अवघड आहे. तो समतावादी नव्हता.

कौटिल्य जन्मावर आधारित वर्णव्यवस्थेचा आणि व्यवसाय बंदीचा समर्थक होता. सगळे मानवाधिकार फक्त तीन वर्णांच्या पुरूषांना तो देतो.

शूद्रांचा धर्म ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या द्विज जातींची सेवा करणे हाच आहे असे चाणक्य स्पष्टपणे सांगतो. चातुर्वर्ण्य व्यवस्था चिरंतन व सुस्थीर राखणे हे राजाचे प्रमुख कर्तव्य असल्याचे तो सांगतो. तो गुलामीच्या प्रथेचे समर्थन करतो. 70 व्या अध्यायात गुलामांच्या खरेदी-विक्रीबाबत उल्लेख येतो. मात्र आर्येतराला [ अनार्याला ] दास करावे, आर्याला कधीही दास करू नये अशी तंबी तो देतो.

पुर्वीच्या धर्मशास्त्रकारांपेक्षा चाणक्य शूद्रांच्या बाबतीत उदार होता असे ब. रा. हिवरगावकर सांगतात.

अर्थात यातल्या काही मर्यादा काळाच्या आहेत. सगळा दोष चाणक्याच्या माथी मरणे उचित होणार नाही.
वर्णधर्म आग्रह हा चाणक्याचा आणि त्याच्या पुर्वसुरींचा व मनूचा मुख्य गाभा होता.
चाणक्य हा त्रैवर्णिक पुरूषांचा आदर्श असेलही पण तो स्त्री-शूद्र-अतिशूद्रांचा आदर्श कसा होऊ शकेल?

उत्तम किंवा आदर्श माणूस तयार करण्याचा कौटिल्याचा ध्यास नव्हता तर त्याचा सगळा भर व्यवहारावर असल्याने भारतात राजकारणाचे शास्त्र विकसित होऊ शकले नाही असा ठपका कौटिल्यावर दुर्गा भागवत ठेवतात.

विशेषत: स्त्रियांबद्दलची चाणक्यसुत्रे आजच्या समतावादी स्त्री-पुरूषांना मान्य होणे अवघड आहे. हे विचार अनुदारपणाचे असल्याचे भाषांतरकारही म्हणतात.
चाणक्य म्हणतो,
सुत्र क्र. 336- पत्नीने पतीच्या मनाप्रमाणे वागावे.
सुत्र क्र. 356-बायको ही बिनलोखंडाची बेडीच आहे.
सुत्र क्र. 360- स्त्रियांवर किंचितही विश्वास ठेऊ नये.

सुत्र क्र. 359-स्त्रियांवर दक्षतेने नजर ठेवावी.
सुत्र क्र. 389- जिला मुलं होतात तिलाच पत्नी म्हणावे
सुत्र क्र. 393- पत्नी ही पुत्र होण्यासाठीच असते.

सुत्र क्र. 477- स्त्री ही सर्व अशुभ गोष्टींचे उत्पत्तीस्थान आहे.
सुत्र क्र. 478 - स्त्रियांना पुरूषांची किंमत नसते.
सुत्र क्र. 479- स्त्रियांचे मन चंचल असते.

सुत्र क्र. 480- आपले अकल्याण होऊ नये असे ज्याला वाटते त्याने स्त्रियांमध्ये रमू नये.
सुत्र क्र. 476- स्त्रियांच्या बंधनातून सुटका होणे कठीण असते.
सुत्र क्र. 512- स्त्रियांना नवर्‍यापेक्षा दुसरे दैवत नाही.

सुत्र क्र. 513- नवर्‍याच्या मनाप्रमाणे वागण्यातच तिचे सुख आहे.
सुत्र क्र. 508- आईच्या सहवासात मुलग्याने राहू नये.

सुत्र क्र.486- कधीही अनार्याशी मैत्री करू नये. त्यापेक्षा दुसर्‍या आर्याशी शत्रुत्व परवडले.

या ग्रंथात पंधरा अधिकरणे, 149 अध्याय आणि 571 चाणक्य सुत्रे आहेत.

स्त्रीपुरूष विषमता आणि वर्ण श्रेष्ठत्व यांचा चाणक्य पुरस्कार करतो. 21 व्या शतकात हे विचार उचलून धरण्याजोगे, उदोउदो करण्याजोगे आहेत काय?

-प्रा.हरी नरके

टिप- कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथावरचे हे समग्र परीक्षण नव्हे. त्यात दिसणार्‍या स्त्रीपुरूष विषमतेबद्दलचे हे एक संक्षिप्त टिपण आहे. जिज्ञासूंनी हा ग्रंथ मुळातून वाचूनच आपापली मतं बनवावीत.

मराठी अनुवादाचे हे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले असल्याने ते सर्व शासकीय बुक डेपोंमध्ये मिळते.

तसेच ते सरिता प्रकाशन,वरदा,सेनापती बापट रोड, वेताळबाबाबा चौक, पुणे, 411016 यांनीही प्रकाशित केलेले आहे. किंमत रू.500/-  email- vardaprakashan@gmail.com

Friday, July 6, 2018

सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर- समाजसुधारक आणि प्राच्य विद्येचे महान पंडीत


सर रामकृष्ण भांडारकरांचा जन्म मालवणला 6 जुलै 1837 ला झाला.
1862 साली मुंबई विद्यापीठातून पहिली तुकडी पदवीधर झाली. त्यात न्या.रानडे आणि रा.गो. भांडारकर होते.
त्यांनी जर्मनीमधील गोटीन्जेन विद्यापीठातून 1885 ला पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

मुंबईच्या एल्फिन्स्टन आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
ते महिला शिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, जातीनिर्मुलन यांचे पुरस्कर्ते होते.
त्यांनी 1917 साली मुंबईतील समता परिषदेत आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला होता.
ते पुण्याच्या हुजुरपागा शाळेचे संस्थापक होत.

ब्रिटीश सरकारने शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची 1903 साली ब्रिटीश भारताच्या कौन्सिलवर निेयुक्ती केली होती. त्यांच्यासोबत गो.कृ.गोखले यांचीही नियुक्ती झालेली होती.
ते परम हंस सभा आणि प्रार्थना समाजाचे क्रियाशील पदाधिकारी होते. केशवचंद्र सेन, न्या.रानडे, महर्षि कर्वे, महर्षि वि.रा.शिंदे यांच्यासमवेत ते समाज सुधारणा चळवळीत आयुष्यभर क्रियाशील राहिले. परम हंस सभेचे अध्यक्ष आणि भांडारकरांचे निकटवर्ती रामचंद्र बाळकृष्ण राणे यांना महात्मा फुले यांनी आपला शिवाजी राजांचा पोवाडा अर्पण केलेला होता.
संत तुकाराम यांना ते आपला आदर्श मानत.

दख्खनचे इतिहासकार व संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांनी केलेले योगदान बहुमुल्य ठरलेले आहे. 1917 साली ब्रिटीश सरकारने त्यांना सर हा किताब बहाल केला.
ते प्राच्य विद्येचे जागतिक किर्तीचे महान पंडीत होते. त्यांच्या 80 व्या वाढदिवशी 1917 मध्ये त्यांच्या विद्यार्थी आणि चाहते यांनी पुण्यात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेची स्थापना केली.

या संस्थेत पाली, संस्कृत, अरेबिक, अवेस्ता, प्राकृत आदी भाषांमधील 30 हजार प्राचीन हस्तलिखिते आहेत. या संस्थेने प्रसिद्ध केलेले छत्रपती संभाजी राजे लिखित बुधभूषण,[1927] भारत रत्न पां.वा. काणे यांचा धर्मशास्त्राचा इतिहास, [1964] आणि पाच पिढ्यांनी 55 वर्षे मौलिक संशोधन करून प्रकाशित केलेली 19 खंडातील महाभारताची चिकित्सक आवृत्ती जगप्रसिद्ध आहेत.

महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला अनेकदा भेटी देऊन संस्थेच्या संशोधनपर कार्याचा जाहीरपणे गौरव केलेला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मूकनायक आणि बहिष्कृत भारत मध्ये सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा संत तुकाराम, संत कबीर, महात्मा फुले यांच्या मालिकेतील महान संत असा तीन वेळा गौरव केलेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भांडारकर संस्थेत अनेक भाषणे दिलेली आहेत.
या संस्थेच्या नियामक मंडळावर महान पंडीत डॉ. आ.ह.साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. सदानंद मोरे आदींनी अनेक वर्षे काम केलेले आहे.
-प्रा.हरी नरके
...........................

Tuesday, June 19, 2018

मीही माझ्या वडीलांचा एक फोटो काढला असता-



माझ्याकडे माझ्या वडलांचा फोटोसुद्धा नाही. ते गेले तेव्हा आमची गरिबी इतकी होती की ते खुप आजारी असताना त्यांना दवाखाण्यात न्यायला किंवा औषधे आणायलाही पैसे नव्हते. फोटो कुठून काढणार?

त्यांचा आजार खूप वाढला तेव्हा वेदनेने ते कळवळायचे. त्या वेदना खूप वाढल्या की त्यांना गुंगी यायची किंवा ते बेशुद्ध पडायचे. त्यांच्या पोटात खूप दुखत असायचं. चक्कर यायची आणि दोन शब्द बोलले तरी दम लागायचा.

त्याकाळात ते आमच्या झोपडीत न राहता मोकळ्या आभाळाखाली शेतातल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली राहायचे. बहुधा आपल्या सततच्या कण्हण्यामुळे, भयंकर वेदनांमुळे आपल्या छोट्या लेकरांना त्रास व्हायला नको, किंवा शेतात खुल्या आभाळाकडं बघत मोकळ्या हवेत त्यांना बरं वाटत असावं म्हणून असेल.

सकाळ, दुपार, संध्याकाळ मी त्यांच्यासाठी शेतात भाकरी घेऊन जायचो. मला शेतातल्या साप, विंचू यांची भिती वाटायची. एकदा भाकरी घेऊन जाताना मला विंचू चावला होता. तेव्हा खूप दुखलं होतं. मी दिवसभर रडत होतो.

बाबा, गोधडीवर मलूल पडलेले असायचे. त्यांना जेवन जातच नसे. आंघोळ करण्याइतकं त्यांच्या अंगात त्राण नसायचं. मग मी विहीरीतनं पाणी काढून फडक्यानं त्यांचं अंग पुसून द्यायचो.

त्यांच्या वेदना फारच वाढल्या की कधीतरी ते खिशातून दहा किंवा वीस पैसे काढून माझ्याकडे द्यायचे. मी औषधाच्या दुकानात जाऊन क्रोसिनच्या गोळ्या आणून त्यांना द्यायचो.

ससूनला जायला आई, वडील दोघेही घाबरायचे. तिकडे सरकारी डॅाक्टर गरिबाला "ढोस" देऊन मारून टाकतात असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. खाजगी डॅाक्टर परवडणं शक्यच नव्हतं. आई पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कुठेकुठे राबायची तेव्हा झोपडीतली चूल पेटायची.
परीक्षेला जाताना मी त्यांच्या पाया पडलो तेव्हा ते काहीतरी पुटपुटले. " चांगली शाळ शिक. पास हो. तुझा निकाल येईपर्यंत मी असेन की नाही मला माहित नाही," असं ते म्हणत होते असं आई म्हणाली.
ते तिथेच झाडाखालीच गेले. अकाली गेले. वयाच्या 50 च्या आतच.

ते गेले तेव्हा मी इतका लहान होतो की आई रडली म्हणून मी रडलो. तोवर मी मृत्यू पाहिलेला नव्हता.

वडील म्हटलं की मला नेहमी फक्त एव्हढंच आठवतं. बाकी आठवणी काही नाहीतच.

पुढे बरे दिवस आले तोवर ते जगले असते तर मीही त्यांचा एक फोटो काढला असता.

-प्रा.हरी नरके

Monday, June 18, 2018

सत्यशोधक महान पंडीत डॉ. आ.ह. साळुंखे अमृत महोत्सव सोहळा


या भव्य ऎतिहासिक सोहळ्यातील भाषणात मी मांडलेल्या मुद्यांचा सारांश-

1] 11 मे 1888 ला मुंबईतल्या हजारो कष्टकर्‍यांनी जोतीराव फुले यांच्या सत्कारार्थ आयोजित केलेल्या सोहळ्याची मला आज आठवण होते. या सामान्य माणसांनी जोतीरावांना महात्मा ही पदवी दिली. डॉ. आ.ह. साळुंखे यांचे गेल्या 55 वर्षातले चौफेर आणि अफाट कार्य पाहता त्यांना आपण "सत्यशोधक महान पंडीत" हा सन्मान बहाल करायला हवा.

2. "धर्मशास्त्राचा इतिहास" हा महाग्रंथ लिहिल्याबद्दल पां.वा.काणे यांना "भारत रत्न" हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला. डॉ. आ.ह. साळुंखे यांनी गेली 55 वर्षे अपार व्यासंग आणि संशोधनाद्वारे लिहिलेल्या 53 ग्रंथांमधून धर्मशास्त्र, संस्कृती, इतिहास यांच्या क्ष्रेत्रात फेरलेखन करून नवा अन्वयार्थ लावून ज्ञानाची नवनिर्मिती केलेली आहे. याबद्दल "भारत रत्न" हा सन्मान त्यांच्याकडे चालत यायला हवा होता.

3. निवडणुक काळात ज्यांना बहुजनांची आठवण येते त्यांचेच राज्यात 15 वर्षे आणि केंद्रात 10 वर्षे सरकार होते. त्यांनी हे का केले नाही?

4. एका सत्कार सोहळ्यात एक महानेते म्हणाले, साळुंखे सरांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटते. आता डोके ठेवणारांनी आपली सत्ता असताना गेल्या 15 वर्षात डॉ. आ.ह. साळुंखे यांनी तयार केलेले राज्याचे सांस्कृतिक धोरण का लागू केले नाही?

5. एका जातीला टार्गेट करून राजकीय सत्ता मिळवता येत असेलही, पण सामाजिक परिवर्तन नाही करता येत. सगळ्याच जातीत चोर आहेत नी भली माणसंही आहेत.

6. साळुंखेसर फक्त बहुजनांचे नाहीत ते समग्र भारताचे आहेत. त्यांना छोटं करू नका.

7. ज्यांनी त्यांना कधीही कुलगुरू केले नाही, डी.लीट दिली नाही, त्यांची पुस्तकं विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला लावली नाहीत, त्यांचे प्रेम खरे आहे की निव्वळ राजकीय, ते तपासले पाहिजे.

8. डॉ. आ.ह. साळुंखे यांचे अनंत पैलू मला भावतात. प्रतिभावंत संशोधक, धर्मशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, शिस्तबद्ध प्रशासक, कुटुंबवत्सल, निसर्गप्रेमी, प्रवासात रमणारा आणि सामान्य माणसात खुलणारा, अतिशय हळवा, संवेदनशील, कोवळ्या मनाचा, आरपार विनयी, सहृदय भला माणूस.

सरांना 125 वर्षांचे उदंड आयुरारोग्य लाभो.
-प्रा.हरी नरके

Thursday, June 14, 2018

लढाई सांस्कृतिक वर्चस्वाची की मतबँकेची?





ज्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आणि चळवळींनी आधुनिक भारत घडला त्यात महात्मा फुले अग्रणी असूनही त्यांची पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक का नाही मानायची?

आपल्या देशात प्रतिकात्मकेतेला असाधारण महत्व आहे. इथल्या निवडणुका पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जातात. 1952 साली तर म्हणे फक्त पक्षाचे निवडणूक चिन्ह असायचे, उमेदवार कोण, त्याचे/तिचे नाव काय याला काहीच महत्व नव्हतं.

ही प्रतिकं सांस्कृतिक वर्चस्व आणि मतबॅंकाच्या अनुनयाची साधनं बनलेली आहेत.

पेशवाई पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक आहे असं सांगितलं जातं. शिवाजीराजांच्या नातवानं जी पेशवाईची वस्त्रं दिली त्यात ती पगडी होती म्हणे. आजकाल तिचा उल्लेख पुणेरी पगडी असा केला जातो. पाहुण्यांचा सत्कार करताना ती देण्याची पद्धत आहे. पहिले काही पेशवे पराक्रमी होते. पण दुसरा बाजीराव हासुद्धा विद्वत्तेचं प्रतिक?

लोकमान्य टिळक, गो.कृ. गोखले, न्या. रानडे, आगरकर हे पगडी घालायचे. प्रत्यक्षात या प्रत्येकाच्या पगड्या वेगवेगळ्या होत्या असं लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक यांनी लिहिलय. हे सगळे मान्यवर आदरणीय आहेत. वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल सर्वदूर आदर आहे. आपुलकी आहे.

पण आज जी वापरली जाते ही एकच पगडी सगळ्या पुणेकरांनी स्विकारावी ही सक्ती का?

हे नेमके ठरवले कोणी? कधी ठरवले? कोणाला विचारून किंवा विश्वासात घेऊन ठरवले? की जे आमचे ते सर्वांनी आपोआपच नी निमुटपणे स्विकारायचे असते?

महात्मा जोतीराव फुले पुण्याचेच होते. तरी त्यांची पगडी मात्र पुणेरी नाही, असं का?

एका सांस्कृतिक छावणीने सारे काही ठरवायचे, बळजबरीने सर्वांवर लादायचे आणि तेच अंतिम असल्याचे सांगायचे दिवस गेले आता मालक.

ज्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आणि चळवळींनी आधुनिक भारत घडला त्यात महात्मा फुले अग्रणी असूनही त्यांची पगडी हे विद्वत्तेचं प्रतिक का नाही मानायची?

एका विशिष्ट जातीच्या संघटनेचे पदाधिकारी वाहिन्यांवर सांगत होते, पुणेरी पगडीच्या ऎवजी फुले पगडी घातल्याने तमाम पुणेकरांचा अपमान झाला. माफी मागितली पाहिजे.

हे तमाम पुणेकर नेहमी एका विशिष्ट वर्गाचे, जातीसमाजाचेच का असतात? त्यात समावेशकता का नसते? इतरांची प्रतिकं बहिष्कृत करणं हीही विद्वत्ताच असणार!

अशा पद्धतीने फुलेपगडी जाहीरपणे नाकारून आपण स्त्री, शूद्रातिशूद्र नवजागृत घटकांचा अपमान करतोय याची जाणीवही ह्या "पुण्याच्या मालकांना" कशी असत नाही?

मुळात हा फुले प्रेमाचा अगर पुणेरी पगडीच्या अपमानाचा विषयच नाहीये.

तुम्ही आम्हाला मतं देत होतात, आम्ही मनपा, राज्य, केंद्रात सत्तेत होतो तोवर गेल्या 50 वर्षात शंभरदा तुमची पगडी मिरवली ना आम्ही डोक्यावर?

दादोजी, भांडारकर, रायगडवरचा वाघ्या कुत्रा, राम गणेश गडकरी, गोब्राह्मण प्रतिपालक की बहुजन प्रतिपालक?, पगड्यांचं राजकारण हे सारे निवडणुका जिंकण्याचे फंडे आहेत याला आमचा नाविलाज हाये.

हे अगदी नकळत, सहज घडतं. त्यावेळी आमच्या मनात जात पात अजिबात नसते. उलट जातपात नष्ट्च झाली पायजेलाय असं आम्ही रात्रंदिन सांगत असतो.

आजवर डोक्यावर पेशवाई पगडी आणि तोंडात "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असा गजर करीत, आम्हाला सामाजिक अभियांत्रिकी साधावी लागली.
आजवर डोक्यावर पेशवाई पगडी आणि तोंडात "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असा गजर करीत, आम्हाला सामाजिक अभियांत्रिकी साधावी लागली.
हर बातका एक टायमिंग होता हैं भिडू. हर एक अ‍ॅक्शन पोलीटिकली करेक्ट होना मांगताय की नय?
मुळात करार तुम्हीच मोडलात. तुम्हाला सांस्कृतिक सत्ता आणि आम्हाला राजकीय सत्ता असं आपलं वाटप ठरलेलं होतं! तुम्ही आम्हाला आताशा मतं देणार नसाल तर तुमची पगडी आम्ही का मिरवावी? मग आम्ही टोपी, पगडी फिरवणारच ना?

आम्ही तुमची पगडी बाद केली तर आमचं काय चुकलं?

पेशव्यांना ही वस्त्रं ज्यांनी दिली त्यांच्याच विद्यमान वंशजांनी म्हणजे दस्तुरखुद्द आम्हीच ती काढून घेतली तर सगळं कसं रितीप्रमाणेच झालं नाही का?

"ते" पगडीमुळे खुश होणार असतील तर एकुण सौदा स्वस्तात पटतोय, असं नाही का तुम्हाला वाटत?

त्यांच्या मतबॅंकेची आपल्याला सक्त गरजाय.

जे आमचे मांडलिक राहतील त्यांचीच पगडी तुमच्या आमच्या डोक्यावर असेल, हा निकाल आम्हाला घेतला पायजेलाय!

शेवटी हे राजकारणाय.
आणि तुम्हाला तर माहिताय आपण 24* 365 राजकारणी आहोत.
....................................

Sunday, June 10, 2018

नाटक! आणि घरात!!- प्रमिती नरके, म.टा.संवाद



पुण्यातील काही तरुण रंगकर्मींनी नुकताच पुण्यात 'रीड मी इन 5D झोन' या नाटकाचा एक अफलातून प्रयोग केला. बंगल्यात मोजक्याच प्रेक्षकांसमोर व्हारांडा, परसदार, गच्ची, घरातली एखादी खोली यांनाच स्टेज करून, वेगवेगळ्या पातळ्यांवर सादर झालेल्या या नाविण्यपूर्ण प्रयोगाविषयी...
......................
'…शेवटी नाटक जिवंत राहिलं पाहिजे', असं अनेक रंगकर्मींना म्हणताना आपण ऐकलं असेल. परंतु एखादी कला, एखादं माध्यम किंवा एखादी जीवनशैली टिकून राहण्यासाठी बदलत्या काळाच्या गरजांनुसार रूढ अर्थाने प्रचलित असणाऱ्या त्याच्या अस्तित्वामध्ये सातत्याने काही बदल घडवणं, आणखी पैलू पडताळून पाहणं आणि शक्यता शोधणं आवश्यक आहे, असं आम्हाला - थिएटर फ्लेमिंगो आणि बडे मुछवाले - मंडळींना वाटतं. आजपर्यंत नाटक करत असताना विषय, मांडणी, फॉर्म, अभिनय शैली या सगळ्याचा वरील संदर्भात विचार करत असतानाच 'How about performing space?' असा एक विचार मनात आला... आणि विनायक कोळवणकर या आमच्या कन्सेप्ट डिझायनर आणि एडिटरने लगेच कामाला सुरुवात केली. आमचा मित्र आणि 'बडे मुछवाले' संस्थेचा संस्थापक अभिनव काफरे याच्या घरी, सिंहगड रोड, पुणे इथे एका दुमजली रो-हाऊसमध्ये, या घराचाच रंगमंच म्हणून वापर करता येईल का असा विचार सुरू झाला.

मग सिंहगड रोडवरची ती सन सिटी सोसायटी, तिथे राहणाऱ्या लोकांचं सोशिओ-इकोनॉमिकल स्टेटस, राहणीमान, जाणिवा काय असतील इथून प्रवास सुरू झाला. या सगळ्याचा अभ्यास करून विनायकने वीस-पंचवीस लहान लहान गोष्टी डेव्हलप केल्या. त्यातल्या निवडक चार गोष्टींमधून मग नाटकाचं कथानक उभं राहिलं. संवाद लिखाणाचं काम अक्षय संतने केलं. त्यानंतर अॅक्टर्स 'इन' झाले.

अॅक्टर म्हणून काम करत असताना सुरुवातीला हे सगळं फारच मजेशीर आणि सोपं वाटलं. ना खोटं वय प्ले करायचं होतं, ना कुठला 'कॅरेक्टर रिसर्च' नावाचा घाट घालायचा होता. वाचनाला सुरुवात झाली तेव्हाच ठरलं की जितकं जास्त नैसर्गिक पद्धतीने बोलता येईल, तसंच आणि तेवढंच बोलायचं-वागायचं. माझ्या पात्राचं नाव जसप्रीत होतं. ही दिल्लीची पंजाबी मुलगी शिक्षणासाठी गेली काही वर्षं पुण्यात स्थायिक असलेली. हिंदी ही माझी जिव्हाळ्याची भाषा असल्यामुळे तोडकं-मोडकं मराठी बोलणारं हे पात्र साकारताना मला फारच जास्त मज्जा आली. पहिला सीन घडतो हॉलमध्ये. त्या घराच्या हॉलची आम्ही अॅक्टर्सनी स्वत:च आमच्या 'बॅचलर्स फ्लॅट'ची लिव्हिंग रूम बनवली. अभिनव नाटकाचं नेपथ्य सांभाळत होता. त्याने आम्हाला हवी तशी त्याच्या घरातल्या फर्निचरची फेरफार - अॅडीशन - सबस्ट्रॅक्शन करू दिली. भिंतीवर ती टिपिकल फेअरी लाइटसची माळ आणि रेड बोर्डवर जसप्रीत आणि नंदिनीच्या आप्तेष्टांचे फोटोग्राफ्स आले. सगळ्यात भन्नाट पार्ट होता या नाटकाचं मंचन आणि आवाज. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी डोक्यात होती की आपण आपल्या घरात ज्या आवाजात बोलतो, जसे वावरतो तसंच सगळं करायचं होतं. वरकरणी पाहता जरी हे सोपं वाटत असलं, तरी आजवर शिकलेल्या, केलेल्या नाटकाच्या सगळ्या नियमांची पाटी स्वच्छ कोरी करून नवीन धडे गिरवायचे होते. 'माझा आवाज प्रेक्षकांपर्यंत जाईल का, माझी पाठ दिसतेय का, माझा अभिनय पोहोचतोय का' हे मुद्देच गायब झाले होते. नवीन चॅलेंज असं होतं की, 'मी फूटभर अंतरावरून 'प्रमिती' न वाटता खरी 'जसप्रीत' वाटतेय का, हे माझं घर वाटतंय का?' अॅक्टरसाठी अवघड गोष्ट असते की अभिनयाच्या मोहाला आवर घालणं आणि तेच आम्हाला एक हजार टक्के करायचं होतं. एक मिनीटसं एक्स्प्रेशन जरी कमी-जास्त झालं तरी ते दिसणार होतं सहज. सो आता 'टू अॅक्ट' विसरून 'टू बी'चा प्रवास सुरू झाला. या फक्त असण्याच्या प्रक्रियेमध्ये साहजिकच संवादांची लीलया मोडतोड झाली. दिग्दर्शकाने तशी पूर्ण मुभा देऊनच ठेवलेली होती. घरातला वावरही प्रत्येक तालमीत वेगळा होऊ लागला आणि डेलीबरेटली तो शेवटपर्यंत कधीच 'ब्लॉक' नाही झाला.

अशाच प्रकारे पुढचे किचनमध्ये, बॅकयार्डमध्ये, जिन्याने वर जाऊन बेडरूममध्ये आणि शेवटी गच्चीवर असे सगळे प्रसंग उभे राहिले.

आणखी एक गंमत अशी की हे सगळं रीयल टाइममध्ये घडत होतं. त्यामुळे पहिल्या सीनमधल्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ तिसऱ्या सीनमध्ये किंवा चौथ्या सीनचा धागा घेऊन शेवटचा सीन घडायचा असं काहीसं स्ट्रक्चर तयार झालं. त्यात जेव्हा प्रेक्षक 'इन' झाले तेव्हा तर आणखीनच मजा. बऱ्याचदा असं होई की एक-दोन प्रेक्षक तिसऱ्याच सीनमध्ये रमलेत आणि पुढे रीयल टाइमनुसार चौथा सीन सुरू झालाय. ही सगळी गंमत बाहेरून बघताना विनायक, अभिनव आणि मधुराची पण धांदल उडत असणार. मधुरा संपूर्ण नाटकाचं व्यवस्थापन पाहत होती.

तालमींपासून ते प्रयोगांदरम्यान अजूनही काही गोष्टी बदलत होत्या. त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जिन्यासमोर लावलेलं एक भलं मोठ्ठं पेंटिंग. सहा बाय नऊच्या पिवळ्या रंगवलेल्या कॅनव्हासवर काही चित्रं, काही गोष्टी रंगवलेल्या, अडकवलेल्या आणि चिकटवलेल्या होत्या. त्यात एक चप्पल, एक अंडं, तीन-चार पक्ष्यांच्या नक्षी असलेल्या फ्रुट-फोर्कच्या रंगीत काड्या, तारेनं बनवलेलं घरटं, चावी, कात्री, कबुतराचं पीस, पेनाचं टोपण, आणखी काही अशाच गोष्टी होत्या. रोज गेल्यावर त्यात काहीतरी बदल झालेला असायचा. रसास्वादाच्या दृष्टीने त्यातून प्रत्येकजण आपला आपला अर्थ घेऊन जात असणार. एक दिवस तर चक्क त्या जागी एक राजा-राणी शृंगार करत बसलेत असं पेंटिंग होतं. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी अनामिका आणि सचिन - ज्यांचा तिथे सीन घडायचा - त्यांना खूप भरभरून चिडवलं. पण गमतीचा भाग वगळता, खरंच या प्रोसेस दरम्यान दिग्दर्शकाने अशा काही गोष्टी पेरल्या होत्या की ज्यामुळे त्या दिवशीच्या प्रयोगाला एक वेगळीच दिशा प्राप्त होई. एका प्रयोगात तर सीनमध्ये भांडण सुरू असताना खुद्द विनायक दारुड्याचा अवतार करून आमच्यात आला. याची काहीच पूर्वकल्पना नसणारे आम्ही गोंधळून, गलका करून त्या तमाशा करणाऱ्या पात्राला हाकलून लावलं. हे सगळं इतक्या वेगात आणि अविश्वसनीय पद्धतीने घडलं की प्रेक्षकांना तो तालीम केलेला नाटकाचाच भाग असल्यासारखं वाटलं. एका प्रयोगात अचानक दिवे गेले आणि आम्ही मोबाइलचे टॉर्च ऑन करून सीन केला. पाच मिनिटांत लाइटस आले तेव्हा पुन्हा बंद केला आणि सीन सुरू राहिला अगदी तसाच, जसं आपल्या घरात दिवे गेल्यावर जगणं सुरू राहतं तसं. प्रेक्षकांना तोही प्लॅन्ड एलिमेंट वाटला. एका प्रसंगात अचानक वरून पाणी पडतं आणि अनेकदा त्याचे शिंतोडे प्रेक्षकांच्या अंगावर उडत. याचीही सगळ्यांना गंमत वाटे. मुळात आमचा, इथे खरंच हे प्रसंग घडत आहेत असं भासवण्याचा हेतू साध्य होई.

प्रेक्षकांना बसायला आम्ही कुठलीच वेगळी व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे अनेकदा आमच्या मागे, पुढे, शेजारी कुठेही प्रेक्षक बसलेले किंवा उभे असत. त्यानुसार ठरलेल्या (पण कधीच पक्क्या न ठरलेल्या) गोष्टी बदलत जात. याला आम्ही 'Read me in 5D zone' असं नाव देण्यामागची कल्पना हीच होती की आपण सिनेमागृहात 3D, 4D सिनेमे पाहतो. पण त्याहीपुढे जाऊन प्रेक्षकांना जेव्हा गंध, स्पर्श आणि स्वत: मूव्ह होत प्रसंग अनुभवण्याचा डायमेंशन मिळतो, तेव्हा ते आम्हाला कसं वाचतील...…

नाटकाचा सूत्रधार - अक्षय - प्रेक्षकांना बाजूच्या चौकातल्या एका हॉटेलमध्ये भेटायचा. तिथे तुम्ही आता कशा प्रकारे गोष्टी अनुभवणार आहात याबद्दल त्यांना एक हलकीशी कल्पना दिली जायची आणि मग त्यांना घेऊन तो घरात म्हणजेच आमच्या 'रंगमंचीय अवकाशात' प्रवेश करे. इथून पुढचा खेळ प्रेक्षकांना आपल्याला हव्या त्या जागी उभं राहून, बसून, झोपून पाहण्याची गंमत अनुभवता येई. बऱ्याचदा प्रेक्षकांना आपण चोरून बाजूच्या घरात डोकावून पाहतोय की काय असा थ्रिलिंग फील येई, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ही एक प्रकारे या फॉर्मला मिळालेली पावतीच होती.

या क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांना आम्ही प्रयोगासाठी बोलावलं होतं. सर्वांनी या नावीन्यपूर्ण प्रयोगाचं स्वागत आणि कौतुक केलं. चांगले-वाईट मुद्दे सांगितले. निसटलेले क्षण मिळवून दिले, त्यानुसार आम्ही प्रयोग-दरप्रयोग बदल करत गेलो. त्यामध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, अतुल पेठे, अनिरुद्ध खुटवड, मोहीत टाकळकर, उमेश कुलकर्णी असे अनेक मान्यवर होते. एक 'गोड रंगाचे' नाट्य-सिने दिग्दर्शक असं म्हणाले की- 'आमच्या काळात आम्ही नाटक करायचो, तेव्हा अगदी शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत आमची देहबोली आणि आवाज पोहोचतोय की नाही हे बघायचो. तुम्ही आताची पोरं असं खुसुरपुसुर नाटक करताय, पण करा. तुम्हाला काय कोणी स्पर्धक नाही. तुम्ही करत राहा.' मुळात आजच्या प्रेक्षकालाच त्या तथाकथित 'शेवटच्या' रांगेत बसून नाटक बघायचंय का, हा आमचा मुद्दा आहे. रूढ पद्धतीने नाटक करण्यावर आमचं मुळातच प्रेम आहे. हा सगळा घाट जो घातला गेला तो 'अॅमेझॉन' आणि 'नेटफ्लिक्स'च्या प्ले-पॉझ-प्ले खेळणाऱ्या, नवीन जाणिवा, नवीन हुशारीने जगणाऱ्या प्रेक्षकाची नाटकाकडे ओढ निर्माण व्हावी, किंवा टिकून राहावी (जिवंत रहावी) यासाठी! त्यासाठी यातील विषयही तसेच आजच्या जाणिवेचे, बदलत्या पिढीच्या रोजच्या जगण्यातलेच तरीही दुर्लक्षिले जाणारे असे निवडले आणि आमची अशीच इच्छा आहे की हा एवढा प्रचंड रिस्पॉन्स बघता, लवकरात लवकर असे अजून अनेक प्रयोग व्हावेत आणि आम्हाला यातही स्पर्धा निर्माण होऊन आणखी नवीन काहीतरी शोधण्याचं बळ मिळावं! - प्रमिती नरके
Jun 10, 2018, 10:34AM IST Maharashtra Times
म.टा.संवाद, रविवार, दि. 10 जून 2018, पृ. 3
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/drama-and-the-house/articleshow/64515067.cms

Monday, June 4, 2018

महर्षि कर्व्यांच्या स्मृतींना अभिवादन-




महर्षि धोंडो केशव कर्वे एक फार मोठा भला माणूस. अतिशय द्रष्टा. प्रांजळ.
3 व 4 जून 1916 ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली.

18 एप्रिल 1858 चा त्यांचा जन्म. ते 104 वर्षे जगले. 29 आक्टोबर 1958 रोजी त्यांचा भारत रत्न देऊन सन्मान करण्यात आला.

मात्र पुरस्कार घ्यायला कर्वे दिल्लीला वेळेत पोचू शकले नाहीत. कारण हिंगण्याच्या तलाठ्यानं गृहचौकशी अहवालात राष्ट्रपती भवनला कळवलेलं होतं, महर्षि कर्वे नावाचा इसम या गावात आढळून आला नाही.
पुढे त्याची विभागीय चौकशी झाली तेव्हा त्यानं सरकारी उत्तर दिलं, मला श्री धोंडो केशव कर्वे माहित होते, महर्षी कर्वे हा इसम कोण ते मला माहित नव्हतं. माझ्या दप्तरात तशी नोंद नव्हती.

कर्व्यांनी शतकापुर्वी विधवांसाठी होस्टेल काढणं, महिला विद्यालय व त्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना करणं, स्वत: एका विधवेशी लग्न करणं ही सारीच क्रांतिकारक पावलं.

बोटी बंद होत्या म्हणून ते कोकणातून [मुरूड] मुंबईला शिकायला चालत गेले. केव्हढी ही ज्ञाननिष्ठा.
गावानं त्यांना तालुक्याचं भूषण म्हणून गौरवलेलं असताना कर्व्यांनी एका विधवेशी लग्न केलं म्हणून ब्राह्मण जातीनं त्यांना "जिल्हादूषण" म्हणून वाळीत टाकलं.
कर्व्यांच्या पुनर्विवाहाने नाराज झालेल्या नाशिकच्या गंगालहरी या वर्तमानपत्राने लिहिले, "कर्वे हा खर्‍या ब्राह्मण बीजाचा बच्चा नसणार." जातीबंधने व पुर्वापार चाली पाळूनच अशी लग्ने व्हावीत असे कर्वे मानत असत.
सं. शारदा हे नाटक लिहुन ज्यांनी मराठी रंगभुमीवर सुधारणवादी विचार मांडला त्या देवलांनी कर्व्यांच्या संस्थेला देणगी दिली. त्यातून बांधण्यात आलेल्या मंदिरात हिंदू अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी अट लिहिलेला बोर्ड लावलेला असे.
"पण लक्षात कोण घेतो?" ही विधवांबद्दलची बंडखोर कादंबरी लिहिणार्‍या ह.ना.आपटे यांचा महिला विद्यापीठाला विरोध होता.
मुंबईत शिकवण्या करून राहताना खुप गरीबी कर्व्यांच्या वाट्याला आलेली.

पुण्यात फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाल्यावर त्यांनी ब्राह्मण विधवांसाठी आश्रम काढला. त्यासाठी निधी जमवण्याकरिता ते देशभर फिरले. अनेकदा अपमान सोसले. जननिंदा तर कायमचीच पदरात पडायची.

मुर्ती छोटी पण धीराची. जिद्दीची.

ज्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं त्यांच्याच विधवा लेकीबाळींच्या भल्यासाठी काम करणं ही साधी गोष्ट नाही.

त्यांनी 1915 साली आपले आत्मवृत्त लिहिले. 1928 साली त्याला पुरवणी जोडून त्याची सुधारित आवृत्ती काढली. 1958 मध्ये त्यांच्या शतकमहोत्सवानिमित्त 1928 ते 1958 च्या नोंदीच्या आधारे पटवर्धनांनी त्यांचे चरित्र लिहिले. वाचताना गलबलायला होते.

एखाद्यानं समाजासाठी किती सोसावं?
3 व 4 जून 1916 ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली.
वयाच्या सत्तरीत त्यांनी निराश होऊन लिहिलं, भारतीय स्त्रीयांच्या उच्च शिक्षणाला हजारो वर्षे जावी लागतील.
आज स्त्रियांनी उच्च शिक्षणात घेतलेली आघाडी बघून कदाचित आपला अंदाज चुकला याची त्यांनी प्रांजळ कबुली दिली असती.
कर्वे बुद्धीने बेताचे होते असे त्यांच्या या पुस्तकाच्या प्रस्तावनाकारांनी, रॅंग्लर परांजपे यांनी लिहून ठेवलंय. एव्हढा त्याग करणारा बंडखोर माणूस बुद्धीने बेताचा असेल असं मला तरी वाटत नाही. कर्वे यांच्या तीक्ष्ण बुद्धीचच हे काम.

मुलींना उच्च शिक्षण का द्यायचं यामागचं कर्व्यांचं म्हणणं असं, "बायकांना प्रपंच चांगला करता यायला हवा. प्रत्येक बाईला किमान 5 माणसांचा स्वयंपाक कोणाच्याही मदतीशिवाय करता यायला हवा. त्याशिवाय तिला पदवी मिळता कामा नये. गृहीणीची कर्तव्ये व जबाबदार्‍या यांचे शिक्षण पदवीला दिलेच पाहिजे. स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा बाईला अत्यावश्यक."
या कामाला लोकमान्य टिळकांचा पाठींबा मिळावा म्हणून कर्वे त्यांना भेटले. स्त्रीयांना उच्च शिक्षण देता कामा नये अशी भुमिका टिळकांनी घेतली. ते म्हणाले, "उच्च शिक्षणामुळे स्त्रिया संशयवादी बनतील व आपले गृहसौख्य लयाला जाईल."

शिक्षणखात्यातले एक उच्च अधिकारी तर म्हणाले, "उच्च शिक्षणामुळे स्त्रीया स्वैराचारी बनतील आणि वाट्टेल तसले बूट आणि कपडे घालून नाचरेपणा करायला लागतील."
1927 साली अखिल भारतवर्षीय स्त्रीयांची पहिली शैक्षणिक परिषद झाली. तिने ठराव केला, "बायकांना मातृत्वाचा आदर्श आणि घर सुंदर, आकर्षक व स्वच्छ कसे ठेवावे याचे उच्च शिक्षण दिले जावे."

मुंबई विद्यापीठात स्थापनेपासून वकिलीची, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत होती. 1871 पासून विद्यापीठाने मराठी शिकायला बंदी घातली.

कर्वे म्हणतात, मराठी माणूस हा भांडखोर असणार हे ठरलेलेच आहे. त्याने मराठी भाषेची साथ सोडल्यानेच त्याच्या शिक्षणाचे नुकसान झालेले आहे.
कर्वे एम.ए. ला गणितात नापास झाले होते. आपण फार भित्रे आणि लाजाळू होतो असेही कर्वे म्हणतात.
त्यांचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले तेव्हा त्यांच्या बायकोचे वय 9 वर्षे होते. ती एका मुलाला,रघुनाथाला जन्म देऊन अकाली गेली.
कर्व्यांच्या आईची चार मुले जन्मत:च गेली म्हणून पुढे त्यांच्या आईने एका मुलाचे नाव भिकू ठेवले व कर्व्यांचे नाव धोंडा ठेवले. अशी नावे शूद्रांमध्येच ठेवली जात.

कर्व्यांनी गावी शाळा काढली तेव्हा त्या शाळेत मात्र ब्राह्मणेतरांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

कर्व्यांच्या हिंगण्याच्या आश्रमात महर्षि वि.रा.शिंदे यांच्या विधवा बहिणीला, बायजाक्काला प्रवेश दिला गेला नाही. कारण संस्थेचा नियम होता फक्त ब्राह्मण विधवांनाच प्रवेश मिळेल.
पुढे विद्यापीठात मात्र तो शिथिल करण्यात आल्याने पहिल्या 25 वर्षात तिथे शिकलेल्या 201 मुलींपैकी 1 धनगर, 1 तेली, 4 वाणी, 11 मराठा व 184 ब्राह्मण होत्या.

ब्राह्मणांनी बेटीव्यवहार हा फक्त ब्राह्मणातच करावा, पंक्तीव्यवहारात पुर्वपरंपरा पाळावी असे कर्वे सांगतात.
अस्पृश्य जर स्वच्छ, संभावित आणि रितीभाती पाळणारा असेल तर त्याच्यासोबत भोजन करायला मात्र आपली हरकत नाही असेही कर्वे म्हणतात.

स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सर्व भारतीयांचा कर्वे आवर्जून ऋणनिर्देश करतात मात्र ते चुकूनही महात्मा फुल्यांचा अथवा सावित्रीबाईंचा उल्लेख करीत नाहीत.
या पुस्तकात फुले, शाहू, बाबासाहेब यांच्या नावाला जागासुद्धा नाही याने मन खंतावते.

कर्वे यांच्या महिला विद्यापीठात शिकवणारे आणि महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिणारे पहिले लेखक म्हणजे प्रा. गं.बा. सरदार होत. त्यांनी आपले हे पुस्तक कर्व्यांना सप्रेम भेट दिलेले होते.

ते मला 25 वर्षांपुर्वी पुण्याच्या आप्पा बळवंत चौकातील रद्दीच्या दुकानात मिळाले.
ते आजही माझ्याकडे सुरक्षित आहे.

महर्षि कर्व्यांच्या कामाला काही व्यक्तीगत आणि काही काळाच्या मर्यादा असतीलही पण त्यांनी स्त्रीशिक्षण आणि स्त्री-पुरूष समतेच्या वाटा सुकर केल्या हे विसरता कामा नये.

102 वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी महिला विद्यापीठाची पुण्यात पायाभरणी करणार्‍या महर्षि कर्व्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

- प्रा.हरी नरके

Thursday, March 29, 2018

गंगाधर पानतावणे-

गंगाधर पानतावणेसर- -प्रा.हरी नरके

गंगाधर पानतावणेसरांनी गेली 50 वर्षे अस्मितादर्श त्रैमासिक एकहाती पेलले होते. अनेकांना त्यांनी लिहते केले. अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेकांना बोलते केले. अनेकांच्या पुस्तकांवर त्यांनी परीक्षणे प्रकाशित केली. दोनतीन पिढ्या त्यांनी घडवल्या.

अस्मितादर्शचा अंक नियमितपणे यायचा. जाहीराती नसताना अंक काढणे खरंच अवघड. आजवर सामाजिक चळवळीतील अनेकांनी वर्गण्या नेल्या, एकदोन अंक आले की पुढे अंक बंद. अस्मितादर्श हा एकमेव अपवाद.
माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर धुळ्याच्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला सरांनी मला बोलावलं होतं.

औरंगाबादच्या त्यांच्या घरी "श्रावस्ती"वर अनेकदा भेटीगाठी झालेल्या. ते आजारी असताना तीनचारदा त्यांना भेटायला गेलो होतो. बर्‍याच गप्पा होत असत.

सर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीवर होते. त्यांना मी बाबासाहेबांच्या खंड 18 च्या तिन्ही भागांची संदर्भ सूची तयार करण्याबाबत विनंती केली. त्यांनी भाग 1 व 2 ची सूची बनऊन दिली.

एका ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाला नागपूरला मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचा फार मोठा ताफा उपस्थित होता. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांवर त्याच आठवड्यात नक्षली हल्ला झालेला होता. स्टेजवर प्रवेशासाठी फोटो लावलेले पोलीस आयुक्तांच्या सहीचे ओळखपत्र घेणे सक्तीचे करण्यात आलेले होते.

सिक्युरिटीवाल्यांनी सरांकडे प्रवेशपत्र नसल्याने व स्टेजवर खुप गर्दी असल्याने सरांची बसण्याची व्यवस्था स्टेजवर केली नाही. त्यांना पहिल्या रांगेत बसावे लागले. त्याबद्दल सर माझ्यावरच रागावले. तो राग ते कधीही विसरले नाहीत. स्वत:च्या मानसन्मानाबाबत ते अतिशय सजग असत.

त्यांचे रागलोभ फार तीव्र होते. एखाद्यावर नाराज झाले की त्याला कायमचे ब्लॅकलिस्ट करून टाकायचे.

माझी आजवर 40 पुस्तके प्रकाशित झालीत. त्यातल्या एकावरही अस्मितादर्शमध्ये एक ओळही सकारात्मक छापून आली नाही. खंड 21 वर कडक टिका करणारे लेख त्यांनी छापले. मात्र वारंवार विनंती करूनही आमचा खुलासा त्यांनी छापला नाही. बाबासाहेबांच्या साक्षेपी पत्रकारितेवर त्यांचे संशोधन होते. बाबासाहेब दोन्ही बाजूंना स्थान देत असत. पानतावणेसरांनी मात्र अस्मितादर्शमध्ये कधीही दुसरी बाजू छापली नाही.
आपला-परका याबाबतची त्यांची निवड काटेकोर असायची.

एक मनस्वी वक्ता, लेखक, संपादक, प्राध्यापक म्हणून त्यांचे मौलिक योगदान कायम स्मरणात राहील. खुप आठवणी आहेत.

-प्रा.हरी नरके

Friday, March 9, 2018

मेरा पांडुरंग नही दुंगी-

मेरा पांडुरंग नही दुंगी- प्रा.हरी नरके
10 मार्च 1897 ला सावित्रीबाई गेल्या. काम करता करता गेल्या.
पुण्या-मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता. शेकडो माणसं दररोज मरत होती. त्यांच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नसल्यानं आज 367 लोक मेले. आज 289 लोक लोक मेले अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या.

ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला सावित्रीबाईंचा मुलगा यशवंत डॅाक्टर होता. तो सैन्यात नोकरीला होता. सावित्रीबाईंनी त्याला तार करून पुण्याला बोलावून घेतले. हडपसरजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला लावला. तो आईला ह्या आजाराची भीषणता समाजावून सांगत होता. सावित्रीबाईंचा एकच प्रश्न होता, "आज जोतीराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय? आपल्याला जमेल तेव्हढ्यां रूग्णांना आपण वाचवूया."

त्याकाळात न अ‍ॅंब्युलन्स होती ना स्ट्रेचर. आजार भयानक होता. संसर्गजन्य होता. आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्याला दिसत असल्यानं पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती. कुणीही मदतीला येत नव्हतं. पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं.

अंधश्रद्धेमुळं लोक औषधपाणी करायला, घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते. पुण्यात रॅंडसाहेब आरोग्याची सक्ती करीत असल्याची नाराजी वाढत होती.
सावित्रीबाई एकटीनं घरोघर फिरून आजारी असलेल्या लहान मुलं, मुली, महिला यांना उपचारासाठी यशवंतच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या. स्वत: त्यांची सुश्रुषा करीत होत्या.

इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर, रूग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला.
पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या.

पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भितीनं गावोगावी पांगले होते.

सावित्रीबाईंनी कित्येकांना वाचवले. बरे केले.

मुंढव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीबाईंना समजलं. गायकवाड अस्पृश्य मानले जात असल्यानं सरकारी वैद्यकीय कर्मचारीही मदत करीत नव्हते.
सावित्रीबाई तिथं धावून गेल्या.

पांडुरंग गायकवाड 11 वर्षांचा होता. काखेत गोळा आलेला. तापानं फणफणलेला.
एका चादरीत पोराला गुंडाळलं. पाठीवर घेतलं.

सावित्रीबाईंचं वय झालेलं होतं. गेली पन्नास वर्षे त्या अहोरात्र राबत होत्या. 7 वर्षांपुर्वीच जोतीराव गेलेले होते.
मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा, व्हाया मगरपट्टा पल्ला मोठा होता.

67 वर्षे वयाची एक म्हातारी बाई अकरा वर्षांच्या आजारी पोराला पाठीवर घेऊन साताठ किलोमीटर चालत जाते.
त्याच्यावर उपचार करते. त्याला बरा करते. पांडुरंग जगतो. मोठा होतो.

सावित्रीबाई त्याला पाठीवर घेऊन चालल्या असतील तेव्हा त्या नक्की प्लेगला सांगत असणार, "मेरा पांडुरंग नही दुंगी."
मृत्यूला त्यांच्यापुढे पराभव पत्करावा लागला.

पण त्याच काळात, त्याच कामात सावित्रीबाईंना मात्र प्लेगचा संसर्ग झाला.
पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रूग्ण.

सलग 50 वर्षे आपला देह या समाजासाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी त्यांनी वाहिलेला होता. आता देह थकला होता.
10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई प्लेगमध्ये रूग्णसेवेचं काम करता करता गेल्या.

राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणारे इतिहासात अजरामर झाले.
या सामाजिक शहीदांसाठीही आपण एखाद दुसरा आसू असू द्यावा.
-प्रा. हरी नरके

रंग माणसांचे

एका कार्यक्रमानंतर एक चाहते भेटले.
म्हणाले, "सर, ओळखलत का? मी अमुकतमूक. माझं अमुकतमूक पुस्तक वाचलंत का? कसं वाटलं?"
"चांगलं लिहिलंय तुम्ही. हात लिहिता ठेवा. भरपूर वाचा. खुप पुढे जाल. माझ्या शुभेच्छायत."
तो त्याच्यासोबतच्या मित्रांना म्हणाला, "सरांची शाबासकी म्हणजे काय साधी गोष्ट नाय. सर म्हणजे साहित्यातली अथॉरिटीय."
..............
स्थळ तेच.
दहापंधरा मिनिटांनी दुसरे एक सज्जन भेटले. त्यांचाही तोच प्रश्न. " सर, माझा कवितासंग्रह कसा वाटला?"
"अहो, तुमच्या कविता तशा बर्‍यायत. पण तुम्ही पुस्तक प्रकाशनाची थोडी घाई केली असं वाटतं.
थोडं थांबायला हवं होतं. चांगल्या कविता वाचा. भरपूर अनुभव घ्या. एक दिवस नक्कीच चांगली कविता लिहाल तुम्ही."
त्याचा चेहरा पडला.
तो थोडं पुढं जाऊन मला ऎकू येईल अशा आवाजात सोबतच्या मित्रांना म्हणाला," अरे याला कवितेतलं काय घंटा कळतंय? माझ्या कविता अशा ऎर्‍यागैर्‍या नथ्थू खैर्‍याला थोड्याच कळणारेत? त्यासाठी कवितेतलं समजण्याची प्रतिभा हवी. जान हवी.
आणि दुसरं असं की मुदलात हा काय समीक्षक हाय का? मी काय म्हणतो, ह्याची लायकीच नाय माझ्या कवितांवर बोलण्याची!"
.............

कौतुक केलं की तुम्ही कोण, तुमची लायकी काय हे कोणीच विचारत नाहीत. तुम्ही मोठे. थोर्थोर.
मात्र उणीवा सांगितल्या, सौम्य टिका केली तर लगेच फणा काढून सारेच विचारतात, तुमची लायकी काय? तुम्हाला साहित्यातलं काय घंटा कळतं?
रंग माणसांचे!
- प्रा.हरी नरके

Wednesday, March 7, 2018

पुतळ्यांचे शहर-पुणे - प्रा. हरी नरके



पुणे हे पुतळ्यांचे शहर. जितके पुतळे या एका शहरात आहेत तेव्हढे जगातल्या कोणत्याही शहरात असणं शक्य नाही. या पुतळ्यांवर राम नगरकर एक कार्यक्रम करायचे.
पुण्याच्या मंडईला आचार्य अत्र्यांनी महात्मा फुल्यांचे नाव दिले. त्या मंडईत लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे. धमाल म्हणजे या दोघांनीही 1880 च्या दशकात ही मंडई बांधायला कडाडून विरोध केलेला होता.
मंडईपेक्षा शाळा आणि दवाखाने जास्त गरजेचे आहेत असे फुले म्हणत होते तर सदाशिव- शनवार पेठांच्या जवळ मंडई नको, त्यामुळे शांतताभंग होईल, अस्वच्छता माजेल असे टिळक म्हणत होते.
इंग्रज सरकारने दोघांचेही ऎकले नाही. मंडई बांधली. एकदा आमची सहल या मंडईत गेली होती, तेव्हा आमचे शिक्षक सांगत होते, मुलांनो, ही आहे पुण्याची मंडई. ती जोतीराव फुल्यांनी नी बाळ गंगाधर टिळकांनी बांधली. म्हणून एकाचे नाव दिलेय नी दुसर्‍याचा पुतळा उभारलाय.

पुणे नगरपालिकेचे सदस्य केशवराव जेधे यांनी 1925 साली पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा असा ठराव मांडला. रावबहादूर आपटे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी विरोध केला. सत्ताधारी पक्षाचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे सदस्य गणपतराव नलावडे, बाबुराव फुले यांनी या ठरावाला विरोध केला. ठराव फेटाळला गेला. महात्मा फुल्यांची बदनामी करणारी 3 पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्यावर लेखक म्हणून गणपतराव नलावड्यांचे नाव असले तरी त्याचे घोस्ट रायटर वेगळेच होते.
कोल्हापूरला फुले पुतळा उभारा असे हिनवले गेले.
महात्मा फुले पुतळ्याचा ठराव आणून पुणेकरांची बदनामी केली असा ठपका ठेऊन जेध्यांचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
हा संदर्भ लक्षात ठेऊन 1969 साली माळीनगर साखर कारखान्याने पुणे मनपा मुख्यालयातला पुतळा भेट दिला.
इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात.
पुणे विद्यापीठात महात्मा फुले यांचा पुतळा बसवायला कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी विरोध केल्याने तयार असलेला पुतळा चार वर्षे मुर्तीकाराच्या स्टुडीओत पडून होता.

. अलका सिनेमागृहाच्या जवळच्या चौकात पुर्वी राधेचा पुतळा होता. ती खुप ऎटीत उभी असायची. तिच्या मागे सेनापती बापटांचा पुतळा उभा केला गेला. राधेची अशी जिरली की ती म्हणाली, मला इथून हलवा, म्हणून बहुधा तिचा पुतळा तिथून हलवला गेला.

. तिथून जवळ असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा अर्धपुतळा आहे. शास्त्रीबुवा पट्टीचे लेखक. किती दणकट अहंकार. निबंधमलेत त्यांनी भविष्य वर्तवले होते, मि. जोती फुले यांचा टिचभरसुद्धा पुतळा कोणी उभा करणार नाही. काळाचा महिमा बघा, महात्मा फुल्यांचा पुर्णाकृती पुतळा 31 मे 1969 ला पुणे मनपा मुख्यालयात उभारण्यात आला. नी खुद्द शास्त्रीबुवांचा मात्र टिचभर पुतळा त्यांनी स्थापन केलेल्या शाळेने उभारलेला आहे.
. सारसबागेच्या चौकात सावरकरांचा पुतळा आहे. मूठ आवळलेल्या अवस्थेत. जणू तो सांगतोय, जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडा.

. शिवाजीनगर कोर्टाच्या शेजारी कपाळाला हात लावलेला कामगाराचा पुतळा आहे. जणू तो सांगतोय, वाडवडील म्हणायचे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यांचं ऎकलं नाही. आणि ही अवस्था आली.
. पुणे रेल्वे स्टेशनसमोर महात्मा गांधींचा पुतळा आहे. तो वेगाने चालताना, बहुधा पळताना दाखवलाय. जणु तो म्हणतोय, नेहमीप्रमाणे रेल्वे लेट आली. आता बस पकडायची तर पळतच जायला हवं.

. अभिनव महाविद्यालयाच्या चौकात वसंत दादांचा पुतळा आहे. हातात काठी आहे. जणू म्हणतोय, मी त्यांनाच पुढचा सीएम करणार होतो. पण पाठीत खंजीर खुपसला ना त्यांनी. आलोच जरा पाठीला बाम लावून.
. त्या मागच्या चौकात बाबुराव सणस उभे आहेत. जुन्या जवाहर हॉटेलकडे लक्ष ठेवून. जणू म्हणताहेत, बारीक लक्ष ठेवावं लागतं पोरांकडं. नेम नाही कायकाय उद्योग करतील.

. स्वारगेटच्या चौकात केशवराव जेधे आणि शनिवार वाड्यापुढे काकासाहेब गाडगीळ उभे आहेत. जणू म्हणताहेत, जेधे -गाडगीळ जोडी फुटली नी पुण्यातून काँग्रेस संपली.
. शनिवारवाड्यापुढे थोरले बाजीराव घोड्यावर उभे आहेत. आता या शनिवारवाड्यात काही दम राहिला नाही. माझ्या मस्तानीला यांनी पाबळला हाकललं. मीही निघालो तिकडे असे म्हणताहेत जणू.

[क्रमश:]
-प्रा.हरी नरके
.......................

च्या-प्रा.हरी नरके


सूर्य मावळत होता. रंगपंचमीमुळं बहुधा फारच लालजर्द होता. एस.टी.चा लालडबा चहा नास्त्यासाठी थांबला.
एक आजी हॉटेलच्या काऊंटरवर चहाची चौकशी करीत होत्या.
"अरे सायबा, च्या कितीला हाय?"
"वीस रूपये."
"अरं बापरं, माह्याकडं तर दहाच रूपयं हायती. जरा कटींग देतोस का साह्यबा? लई तल्लफ आलीया बघ."
"जमणार नाही. चल निघ पुढं. भिकारी साले."
"अरं ये साह्यबा नीट बोल, म्या भिकारी नाय. गरीब असलो तरी भिकारी नाय बग. म्या काय तुला फुकाट मागितल्याला नाय."
एक तरूणी शेजारी उभी होती. ती म्हणाली, "आजी माझ्याकडे आहेत पैसे. मी देते तुम्हाला चहा घेऊन."
"नको बाळा, असं फुकाटचं खाल्यापिल्यालं अंगाला लागत नस्तंय बघ. तुला वाटलं यातच समदं आलं बघ बाळा. माजे आशीरवाद हायती तुला. मी म्हातारीकोतारी असलो तरी माजं हातपाय धडधाकट हायती. अरे हॉटेलवाल्यासायबा, मी तुझी फरशी पुसून देतो नायतर भांडी घासून देतो पटाकक्यानं. त्याचं दहा रूपयं तरी देशील ना? मग इस रूपया व्हतात बग माज्याकडं."
" सांगितलं ना एकदा, जमत नस्तया. निघ म्हणलं ना."
" बरं असू दे बाबा. नाय तर नाय. कल्याण होवू दे तुझ्या लेकराबाळाचं."
"काय झालं बगा, की माह्याकडं 100 च रूपयं व्हतं.. एसटीवाला आजवर पन्नास घ्यायचा. आज त्यानं पाऊनशे घेतले. त्यो तरी काय करणार? म्हागाईला आग लागलीया. माजी लेक आजारी हाय पुण्याला. तिला भेटायला चाललो म्या. आता मोकळ्या हातांनी कसं जावावं? सोन्यासारकी 2 नातवंडं हायती. खायला घेतलं 15 रूपयाचं त्यांन्ला. उरलं दहाच."
"माझा पोरगा ढाण्या वाघ होता बगा. सैन्यात होता. लगीन जमल्यालं होतं. पाक तिकडं लई लांब होता बघा कामावर. उरीला. मागल्या वर्साला दुस्मानाची गोळी लागली नी गेला बघा.
मी त्याची आईय. फुकटाचं कसं खायचं?"
"एस.टी.वाले पण महाग ठिकाणीच का गाडी थांबवतात?"
"आजी, हायवेच्या पलिकडच्या हॉटेलमध्ये दहा रूपयाला मिळतो बघा चहा. मी आणून देऊ का तुमच्यासाठी?"
"पोरी, जपून जा बरं का. गाड्या लई जोरात येत्याती बग."
त्या मुलीनं रस्ता ओलांडून जाऊन आजीसाठी चहा आणून दिला....
आजी म्हणाली, "बाळा, तुझं लई कल्याण होईल बघ. तुला चांगली लेकरं व्हत्याल. मोटी माडी बांधशीला तू..."
मग मीही रस्ता ओलांडून गेलो. तिकडचा चहा घेतला. छानच होता.
पण त्यानं त्याचे 20 रूपये घेतले.
-प्रा.हरी नरके

Saturday, March 3, 2018

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त- पिढी तुझी - माझी

आंतर राष्ट्रीय महिला दिना निमित्त- पिढी तुझी - माझी
संगिता नरके आणि प्रमिती नरके
सामाजिक मागासलेपणा आणि आर्थिक चणचण हातात हात घालून असतात. पण इच्छाशक्ती,बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर त्यावरही मात करता येते. संगिता ही त्या पिढीची प्रतिनिधी. या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड असेल तर पुढच्या पिढीचा पाया सर्वार्थाने भक्कम होतो, तिला भरारी घ्यायला बळ देतो, जसं प्रमितीला मिळालं. वाचा या मायलेकींच्याच शब्दात-

--संगिता
माझं बालपण मुंबईत गेलं. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच लग्न झालं. आमचा आंतरजातीय प्रेमविवाह असल्यानं खूप विरोध झाला. माझं माहेर भटक्या-विमुक्त समाजातलं. हा समाज म्हणजे निरक्षरता, कुपोषण, गुन्हेगारीचा शिक्का बसलेला समाज. पोटासाठी चोर्‍यामार्‍या करण्याचा वारसा लाभलेला समाज. आई-वडीलांनी मुंबईच्या फूटपाथवरून त्यांच्या आयुष्याची सुरूवात केलेली. वडील सामाजिक चळवळीत काम करीत असूनही मुलगाच हवा या हट्टापायी आम्हा ५ बहिणांना जन्म दिला गेला. त्यामुळं कोणतीही हौसमौज आमच्या वाट्याला आलीच नाही. आपल्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आपल्या मुलांना द्यायचं आणि आपल्याला जे मिळालंच नाही ते सगळंही त्यांना मिळायलाच हवं अशी खूणगाठ मी कळत्या वयात मनात बांधलेली.

वडील कधी घरी नसायचेच. घरात सतत कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यामुळं काही झालं तरी कार्यकर्त्याशी लग्न करायचं नाही असा मी ठाम निश्चय केलेला होता. विद्यापीठ नामांतर आंदोलनात हरीची भेट झाली. तेव्हा तो टेल्कोत रात्रपाळीची पूर्णवेळ नोकरी करीत महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचवेळी त्यानं चळवळीलाही संपुर्ण वाहून घेतलेलं होतं. त्यामुळं त्यानं जेव्हा मला प्रपोज केलं तेव्हा मी त्याला चक्क नकार दिला.

पुढं आम्ही "झोळ्या जाळा-बेड्या तोडा" परिषदेला औरंगाबादला भेटलो. त्यानंतर अजिंठा - वेरूळचा एकत्र प्रवास झाला. महाडच्या चवदार तळ्यावरील स्त्रीमुक्ती परिषदेनंतर रायगड-प्रतापगड-महाबळेश्वर सहल झाली. आपला जोडीदार शिकलेला हवा. स्त्री-पुरूष समानता मानणारा हवा. व्यसनी नी अंधश्रद्धाळू नसावा. जात, दिसणं, सांपत्तिक स्थिती या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीत हे मात्र माझ्या मनात पक्कं होतं. साडेसतरा नळीच्या झोपडीवजा घरात हरी राहायचा. तिकडे "होल वावर इज अवर-गो एनी व्हेअर" अशी पद्धत असल्यानं स्वच्छतागृहाची सोयही नव्हती. तिथल्या मंडळींना त्याची गरजही वाटत नव्हती.

लग्नात मानसिक, शारिरिक, वैचारिक, अनुरूपतेच्या बाबी भक्कमपणे जुळायला हव्यात असं मला वाटे. मुख्य म्हणजे दोघात बलदंड प्रेम हवं. या प्रेमामुळंच शेवटी माझा कार्यकर्त्याशी लग्न न करण्याचा निर्धार ढासळला. आम्ही मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. माझं महाविद्यालयीन शिक्षण पुढं चालू राहिलं. फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रभावातून आम्ही दोन निर्णय घेऊन टाकलेले होते.

उच्चशिक्षण पुर्ण झाल्याशिवाय मुल होऊ द्यायचं नाही. नी मुलगा होवो की मुलगी एका अपत्यावर कुटुंबनियोजन करायचं.
लग्नाआधीच हरीनं पिंपरीत छोटी सदनिका घेतली होती. माझ्या सासरी तेव्हा चुलीवर स्वयंपाक व्हायचा, पण हरीनं शाळेत असतानाच गॅस बुक केलेला होता. त्यानं वयाच्या ५ व्या वर्षापासून स्मशानात नोकरी करीत पुणे मनपाच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं होतं.

त्याच्या घरात पिढ्यानपिढ्या शेतमजुरीची परंपरा असल्यानं त्याला कष्टाची गोडी होती. मात्र भीक, लाचारी आणि चोरीची प्रचंड नफरत होती. त्याचे वडील तो लहान असताना औषेधपाण्याविना अकाली गेले होते. त्यामुळे आणि प्रचंड गरिबीमुळे काटकसर त्याच्या नको इतकी हाडीमाशी मुरली होती. त्याचा कधीकधी अतिरेक झाला की मला त्रास होई. पण तरिही आम्ही उमेदीचे दिवस पोटाला चिमटे घेऊन अतिशय काटकसरीने काढले. आम्हाला त्याचा फायदा असा झाला की आमच्या गरजा अतिशय मर्यादित राहिल्या.

फक्त पुस्तकं विकत घेण्याचं व्यसन वगळता आम्हाला दुसरं कोणतंही व्यसन नाही. भिकेचा आणि लाचारीचा तिटकारा पण चांगल्या जीवनमानाची ओढ यामुळे आम्ही आधी झोपडी, मग दोन खोल्यांची छोटी सदनिका आणि पुढे कोथरूडला दोन बेडरूमचं घर असा प्रवास केला.
सध्या मी लोणकर माध्यमिक विद्यालयात मुंढवा, पुणे इथं काम करते.

प्रमिती ३ महिन्यांची असतानाच मला मोठा अपघात झाला. तिचे खूप हाल झाले. तिला चांगल्या शाळेत घालता यावं म्हणून आम्ही पिंपरीहून कोथरूडला राहायला आलो. तिला मराठी माध्यमात घालायचं आमचं ठरलेलं होतं. अभिनव विद्यालयाचे प्रमुख चिं.स.लाटकर अण्णा यांनी तिला प्रवेश द्यायचं मान्य केलेलं होतं. मात्र आम्हाला तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं आहे असं ते गृहीत धरून चाललेले.
अभिनव मराठी माध्यमाची शाळा सुरूही झाली तरी इंग्रजी शाळेचे प्रवेश उशीरा असल्यानं ते निवांत होते. आम्ही हादरलो. तिला मराठी शाळेत घालून आम्ही तिचं नुकसान करू नये असं अण्णांना मनापासून वाटत होतं. शेवटी आमच्या हट्टापुढे त्यांनी नमते घेतले आणि तिला मराठी शाळेत प्रवेश दिला.

हरी एकतर फुले-आंबेडकर ग्रंथ प्रकाशनांच्या कामासाठी मुंबईला मंत्रालयात किंवा व्याख्यानांच्या दौर्‍यांवर सतत घराबाहेर असायचा. मी मुंढव्याच्या लोणकर विद्यालयातली माझी नोकरी सांभाळून प्रमितीच्या अभ्यासाचं बघायचे. प्रमितीच्या शाळेतील कार्यक्रमांना मीच उपस्थित असायचे. प्रमिती अभ्यासात हुशार होती. परंतु तिनं पहिला-दुसरा क्रमांक मिळविण्याऎवजी अभ्यासेतर उपक्रमातही भाग घ्यावा असं मला वाटत असे. बालवाडीपासूनच मी तिला त्यासाठी प्रोत्साहन देत होते. ती कथाकथन, काव्यवाचन, नाट्यछटा, वक्तृत्व, नाट्यवाचन, नृत्य यात सहभागी व्हायची. बक्षीस घ्यायला व्यासपीठावर जायला मात्र बुजायची. ती चित्रकला व गायनाच्या क्लासलाही जायची. पण तिला त्यात फारशी रुची निर्माण झाली नाही. मात्र पोहणे तिने मनापासून एन्जॉय केले. पोहण्याचे सर्व प्रकार तिने आत्मसात केले.

आम्ही तिला भरपूर बालनाट्यं दाखविली. तिला त्याची इतकी गोडी लागली की अनेकदा ती एकट्यानं जायची. काही नाटकं तिनं अनेकवेळा पाहिली. तिला कविता करायला आवडतं. त्या ती मला आवर्जुन वाचून दाखवते. त्या बाबाला दाखव म्हटलं की मात्र ती आपल्या दोघीतलीच गंमत आहे असं म्हणते. सुट्ट्यांमध्ये ट्रेक, ओरीगामी, सुदर्शन रंगमंच यात ती गर्क असायची. सहावीत असताना तिनं एकटीनं हिमाचल, पंजाबचा प्रवास केलेला होता.
चारित्र्य प्रतिष्ठानचा आंतरशालेय आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार तिला मेधा पाटकरांच्या हस्ते टिळक स्मारकला मिळाला होता. त्यावेळी ती म्हणाली होती," आमच्या घरात हजारो पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही तिघं राहतो."

राष्ट्र सेवा दलाची वार्षिक शिबिरं ती चुकवायची नाही. तिथं एका वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे तिला भेटले. त्यांनी तिची अभिनय क्षमता हेरली. त्यांनी तिची "सत्यशोधक" या नाटकातील सावित्रीबाईंच्या भुमिकेसाठी निवड केली. तिनं तालमीही केल्या. मात्र पुढं ललित कलाच्या वर्गांमुळं तिला ते नाटक सोडणं भाग पडलं. सत्यशोधक खूप गाजलं. पर्ण पेठेनं तो रोल उत्तम केला. परंतु तिच्या उच्च महाविद्यालयीन शिक्षणामुळं तिही पुढील प्रयोगांसाठी वेळ देऊ शकत नव्हती.
हा प्रयोग पाहिल्यावर सतिश आळेकरांनी पेठेंना या रोलसाठी प्रमितीचं नाव सुचविलं, तेव्हा या योगायोगाची मला गंमत वाटली.
दहावीनंतर पुढं काय करावं याबाबत प्रमितीचा निर्णय होत नव्हता. तिचा निर्णय तिनंच घ्यावा असं आम्ही तिला सांगितलं होतं. अभिनयात तिला रस होता. मात्र या क्षेत्रातील अनिश्चितता व अफाट स्पर्धा बघता जोडीला आणखी एखादा आधार असावा असं तिलाही वाटत होतं. त्यासाठी ती जर्मन, मानसशास्त्र, मासकॉम यांचाही विचार करित होती. हरीनं भारतीय प्रशासन सेवेचं क्षेत्रही सुचवुन ठेवलं होतं. तिनं फर्ग्युसनला अकरावी कला शाखेला प्रवेश घेतला.

दरम्यान बारावीतच तिचा ललित कला केंद्रात प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का झाला होता.
हरी आरक्षण धोरणाचा समर्थक असला तरी आमच्या मुलीनं मात्र ललितकलाला खुल्या गटातूनच प्रवेश घ्यावा यासाठी तो आग्रही होता. प्रवेश परिक्षेत जर यश आलं नाही तर १ वर्ष थांबून पुन्हा प्रवेश परिक्षा द्यायची पण ललितलाच जायचं यावर प्रमिती ठाम होती.

तिनं कसून तयारी केली. चंद्रकांत कुलकर्णींसारख्या नामवंत परिक्षकांनी तिची ललितला निवड केली. गेल्या ३ वर्षात या क्षेत्राचा ध्यास घेऊन ती करीत असलेला अभ्यास, सकाळी ८ ते रात्री १ किंवा २ वाजेपर्यंत तिच्या चालणार्‍या वर्ग, तालमी यात ती आरपार बुडालेली असते. ललितला जातानाची प्रमिती आणि आजची प्रमिती यात खुपच फरक पडलाय. तिचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय.

तिला कष्टाचं महत्व कळावं, घामाचे पैसे मिळवताना काय वाटतं, हा अनुभव यावा यासाठी तिनं विद्यापिठाच्या "कमवा आणि शिका" योजनेत भाग घेतला. सुट्टीत बिग बझार आणि इतर अनेक ठिकाणी काम करून अर्थार्जन करीत तिनं स्वत:चं शिक्षण घेतलं.

मितुची पिढी अतिशय प्रॅक्टीकल आहे. बोल्ड आहे. जेंडर सेंसेटिव्ह आणि अर्थातच न्यायासाठी आग्रही आहे.
ती जिथं जाईल तिथं तिनं आपली स्पेस मोठी करण्यासाठी झटावं एव्हढीच आमची अपेक्षा आहे.

हरीला सामाजिक चळवळीत आणि लेखन-संशोधनात रस होता, आहे.
मला स्वत:ला अभिनयाची आवड होती. मी तिकडं जावं असं मी एकदा माझ्या पालकांना बोलून दाखवलं तेव्हा ते उखडले होते. ते तसा विचारही करू शकत नव्हते. माझ्या मुलीनं हे क्षेत्र निवडलं याचा मला आनंद आहे. तिचं आवडीचं क्षेत्र तिनंच निवडलं हे महत्वाचं आहे.

तिच्यात कोणताही भाबडेपणा नाही. कठोर परिश्रमांची तिची तयारी आहे. तिनं स्वाभिमानी, निर्भीड, कष्टाळू, संवेदनशील असावं. कितीही स्पर्धा असली तरी ती तिची मुद्रा नक्की उमटविल असा मला विश्वास आहे.
तिचा जोडीदार निवडताना तिनं जात, धर्म, वर्ण, वंश, प्रांत, भाषा असला कोणताही संकुचित विचार करून तिचं निवडीचं क्षेत्र छोटं करू नये असं आम्ही तिला सांगितलेलं आहे. ती जे ठरविल त्याला आमचा संपुर्ण पाठिंबा असेल.
तिनं चांगला माणूस बनावं एव्हढीच आमची अपेक्षा राहणार. तसे संस्कार आम्ही तिच्यावर केलेले आहेत.
..............................
प्रमिती--

माझी लहानपणीची पहिली आठवण म्हणजे बालवाडीत असताना शाळेच्या छोट्याशा सभागृहात पन्नास एक वर्गमित्र-मैत्रिणी आणि पाच-सहा शिक्षकांच्या समोर मी घाबरत घाबरत केलेलं वक्तृत्व स्पर्धेतलं बिरसा मुंडावरचं पहिलं छोटसं भाषण. पण त्या भाषणाच्या आधिचा आणि नंतरचा तासभर माझं अंग आणि मन ज्या गतीनं, ज्या प्रकारे थरथर कापलं होतं ते म्हणजे काही विचारता सोय नाही. त्यानंतर प्रत्येकच स्पर्धेच्यावेळी एन्गझायटीच्या परमोच्च बिंदूशी गाठ पडणं काही चुकत नव्हतं. परंतु तरीही बक्षिसं मिळवणंही चुकत नसल्यानं वारंवार स्पर्धेत उतरतच होतेच.

या सगळ्यात शालेय जिवनातच कधीतरी कलेची, अभिनयाची, नाटकाची गोडी लागली. घरातून आईचा मिळणारा संपूर्ण पाठींबा आणि बाबाचा असलेला आदर्श याचीही खूप मदत झाली. हे सगळं करत असताना तेव्हा गंभीरपणे करीयर म्हणून अभिनयाचा तसा विचार केला नव्हता. पण मनातल्या मनात मी अभिनेत्री व्हायची स्वप्नं नेहमीच रंगवत होते. पण गुप्तपणे. उघडपणे नाही. कारण, एक म्हणजे बाबाची मी आय.ए.एस. व्हावं ही अपेक्षा आणि दुसरं म्हणजे " ज्यांना दुसरं काही जमत नाही, ते पूर्णवेळ अभिनय करतात " हा शाळेत, आपल्या समाजात तेव्हा असलेला गैरसमज.

त्यात मी दिसायला तशी चारचौघींसारखी. त्यामुळं अभिनेत्री व्हायचं असं म्हटल्यावर वर्गातली चार टाळकी फिदीफिदी हसणार याची खात्री होती. पण तरी धीर करून एकदा, "सुंदर दिसण्याचा अभिनयाशी काहीही संबंध नाही" यावरून शाळेतल्या बाईंशी मी वाद घातल्याचं मला आठवतं. तेव्हापासूनच माझी "उद्धट" म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती.

शाळा संपली. पण पुढं काय करायचं हे माझं काही ठरत नव्हतं. माझं "गुप्त स्वप्न" तर मला पूर्णत्वास न्यायचंच होतं. पण कसं? हा प्रश्न होताच.

बाबाच्या अपेक्षा अन माझ्या मनाचा कल पाहता आईनं हुशारीनं एक मध्यममार्ग सुचवला. तो म्हणजे मासकॉम. जेणेकरून "इलेक्ट्रॉनिक माध्यमातली पत्रकारिता" म्हणून बाबाही खूश होणार होता आणि "अभिनयाच्या जवळपास जाणारंच हे क्षेत्र आहे" ही तात्पुरती गोळी मलाही पुरणार होती.

त्यानुसार मी ११ वी कला शाखेत प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून थेट फर्ग्युसन मधल्या सगळ्या कॉन्व्हेंटच्या क्राऊडशी मॅचअप करताना आधी नाकी नऊ आलेले. अभ्यासात मन रमेना अन आर्ट सर्कल मधल्या अंतर्गत राजकारणामुळं तिथंही घुसता येईना. हा काळ म्हणजे माझ्यासाठी करीअरच्या दृष्टीनं अगदीच अंधूक आणि घाबरवून सोडणारा होता. पण त्याचा उलट परिणाम असा झाला, की अनेक पर्याय चाचपडल्यानंतर मी आपल्याला काय करायचं नाहीये, ते पक्कं करून टाकलं.

या सर्व घडामोडींची सर्वात जवळची साक्षीदार म्हणजे माझी मम्मा. माझा कलाक्षेत्राकडे १२०, १३० वरून थेट १८० अंशात वळलेला कल पटवून देऊन बाबाचं मन वळवण्यात ती सफल झाली. आणि मी १२ वी नंतर पूर्णवेळ नाट्यशास्त्राला ललितकला केंद्रात प्रवेश घ्यायचा निर्णय झाला. माझ्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता.

निर्णय तर झाला. पण प्रवेश प्रक्रीया सोपी नव्हती. लेखी परीक्षा आणि मग शॉर्टलिस्टेड मुलांची प्रत्यक्ष मुलाखत अन परफॉरमन्स टेस्ट व्हायची होती. त्यात लिमिटेड सीटस - फक्त दहा. आता पूर्वीसारखा थरकाप उडत नसला तरी टेन्शन खूप आलं होतं.

दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय आमच्या पिताश्रींनी ओबीसी कोट्यातून प्रवेश न घेता ओपन कॅटेगरीतूनच प्रवेश मिळवायचा असं आपलं धोरण जाहीर केलं होतं. बरं त्यामागं भक्कम विचारसरणी असल्यानं मला काही बोलताही येईना. झपाटून तयारी केली आणि प्रवेश परिक्षेत ओपनमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले.

ललितला आल्यानंतर अभिनयाकडं, नाटकाकडं बघण्याची एक वेगळीच दृष्टी मला मिळाली. ललित हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा म्हणावा लागेल.

सतिश आळेकरसर, प्रविण भोळेसर, समर नखातेसर, राजीव नाईकसर यांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही समृद्ध झाल्याचं मला जाणवतं.

शालेय जिवनातही मी नाटकात कामं केली. पण इथं आल्यावर मी " जाणीवपूर्वक ’ नाटक करायला शिकले.

याकाळात मी माझ्या स्वत:च्या चार संहिताही लिहिल्या. फर्ग्युसनच्या सुरुवातीच्या दिवसांत मला नेहमी खंत वाटत असे, की माझ्या पालकांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं नाही.

पण आता मात्र मला याच गोष्टीचा प्रचंड फायदा होत आहे. माझ्याच वर्गातील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना जी नाटकाची भाषा दुर्बोध व त्यामुळं कंटाळवाणी वाटते ती मी अगदी सहज समजून घेऊ शकते. माझं मराठी साहित्य मला जवळचं वाटतं. संहिता समजून घेणं, संदर्भ जुळवणी, शैलीचा अभ्यास यासाठी लागणारी समज मराठी माध्यमामुळं प्रगल्भ होत गेली.

अभिनयाच्या वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास करत असताना मी शेक्सपिअरच्या हॅम्लेट आणि अ मिडसमर नाईटस ड्रीम, मॅक्झीम गॉर्कीचं द लोअर डेप्थ, विजय तेंडुलकरांचं मित्राची गोष्ट, बर्टोल्ट ब्रेक्थचं दी कॉकेशिअन चॉक सर्कल इ. नाटकांत कामं केली. दी कॉकेशिअन चॉक सर्कलचे मुंबईला पृथ्वी थिएटर, दिल्लीला आंतरराष्ट्रीय भारतरंग महोत्सवामध्ये प्रयोग केले. सकाळ व हिंदूमध्ये त्याची छान परिक्षणं आली. संदेश कुलकर्णीसर, अनिरूद्ध खुटवडसर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करताना नाटकाच्या अनेक अंगांचा सखोल अभ्यासही करता आला.

"संहिता ते प्रयोग" या अभ्यासक्रमा अंतर्गत लेखक आणि दिग्दर्शक याही पातळ्यांवर विचार करण्याची संधी मला मिळाली.

मीही चार संहिता लिहिल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व अनुभवांतून मला पुढच्या आयुष्याची दृष्टी मिळत गेली. शिदोरी भक्कम झाली.

आमच्या घरात स्वतंत्र ग्रंथालय काढता येईल एवढी पुस्तकं आहेत. याचा मला खूपच फायदा झाला. केवळ नाटकांचीच नाही तर वैचारिक, कथा, कादंबर्‍या, कविता, संदर्भग्रंथ पटकन हाताशी असतात. यासाठी मी स्वत:ला प्रचंड लकी मानते. ही रसद आयुष्यभर पुरेल.

आता मी ललितकला केंद्रातून पदवीधर होऊन लवकरच बाहेर पडते आहे. अजून खूप काही शिकायचं आहे.
....................................
Sangita Hari Narke -March 1, 2014 ·
"माहेर," मार्च २०१४, पृ.५२ ते ५४


Monday, January 22, 2018

मधू दंडवते एक भला माणूस-

मधू दंडवते राजकारणाच्या घाणीत राहूनही अतिशय भला माणूस. निळू फुले, डॉ.श्रीराम लागू,सदाशिव अमरापूरकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत मी त्यांच्या निवडणुक प्रचाराला त्यांच्या मतदार संघात कोकणात गेलेलो होतो. तिकडे नारायण राणेंची प्रचंड दहशत होती. त्या निवडणुकीत दंडवते पराभूत झाल्याचे खूप वाईट वाटले होते. एकदा नानांचा [मधू दंडवते]
फोन आला. नाथ पैंच्या नावानं आपण महोत्सव घेतोय. तू अवश्य ये.
मी होकार दिला.
रेल्वेचं तिकीट पोस्टानं घरी आलं.
त्यात माझं वय 65 वर्षे लिहिलेलं होतं.तेव्हा मी अवघा तिशीत होतो. मी नानांना फोन केला, तर ते म्हणाले, अरे आपल्या चळवळीत माणसाचं नाव व्हायला वयाची किमान पन्नाशी ओलांडावी लागते. तुझं नाव मी किमान पंधरा वर्षे ऎकतोय. मला वाटलं तू 65 वर्षांचा नक्कीच असशील.
रेल्वेत तिकीट चेकरनं मला वयाबाबत विचारलं. मी माझं ओळखपत्र दाखवलं आणि मधू दंडवतेसायबांची ही चूक असल्याचं त्याला सांगितलं. तो हसला, म्हणाला, असू द्या. त्यांच्यामुळेच ही कोकण रेल्वे झालीय. दुसरा कोणी असता तर मी नियमाप्रमाणं तुम्हाला फाईन मारला असता पण मधुभाई एकदम जंटलमॅन माणूसाय. बिनधास्त राव्हा.
कार्यक्रमाला माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मधुकरराव चौधरी, नलिनी पंडीत, मेधा पाटकर असे अनेकजण आलेले.
कार्यक्रम छानच झाला. परतताना नलिनीबाईंच्या घरी एक दिवस मुक्काम केला.
एकदा निवडणुक प्रचाराला नाना पुण्याला आलेले. मी सोबत होतो. घोरपडीच्या सभेत मीही बोललो. माझी ओळख सांगताना माझ्या महात्मा फुल्यांवरील पुस्तकांचा सुत्रसंचालकानं उल्लेख केलेला होता.
कार्यक्रम संपल्यावर एक गरीब म्हातारा मला भेटला.म्हणाला, महात्मा फुले तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांना सांगा माझे घेतलेले 500 रूपये परत करा.
मी हादरलो. महात्मा फुल्यांना जाऊन 100 वर्षे होऊन गेलेली.
म्हातार्‍याला चहा पाजला. शांतपणे नीट विचारपूस केली तेव्हा खरा मामला कळला. राज्य शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडे म्हातार्‍यनं अर्ज केलेला होता. तिथल्या एका कर्मचार्‍यानं 500 रूपये लाच घेऊनही त्या म्हातार्‍याचं काम केलेलं नव्हतं. त्या कर्मचार्‍यालाच म्हातारा महात्मा फुले समजत होता. म्हातार्‍याला महामंडळाच्या कार्यालयात घेऊन गेलो. म्हातार्‍यानं लाचखोराला बरोबर ओळखलं.
महामंडळाचे प्रमुख अधिकारी दैठणकरसाहेब यांच्या मदतीनं त्या कर्मचार्‍याकडून 500 रूपये म्हातार्‍याला परत करायला लावले. शिवाय दैठणकरसाहेबांकडून म्हातार्‍याचं कर्ज प्रकरणही मंजूर करवून मार्गी लावलं.
देवेगौडा पंतप्रधान असताना नाना केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते सेवा दलाच्या एका कार्यक्रमाला पुण्यात पुनम हॉटेलात आलेले होते. मीही एक वक्ता होतो. नानांशी छान गप्पा झाल्या. केंद्रीय नियोजन आयोगाने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली तरच त्यांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि घरकुलाचे प्रश्न सुटतील हे मी नानांना बोललो. ते म्हणाले, तू दिल्लीला ये. आपण तरतूद करू.
मी नानांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली. स्वत: नानांच्या हाताने माझे नाव लिहिलेलं व त्यांच्या सहीचं अपॉंईंटमेंट दिल्याचं पत्र आलं.
आम्ही दिल्लीला जाऊन नियोजन भवनात नानांना भेटलो.
त्या दिवशी नानांचा मूड बिनसलेला होता. दुसर्‍या कुठल्यातरी कारणानं ते वैतागलेले होते. मला बघताच म्हणाले, मला तुझा मुद्दा पटलेला आहे. आय एम कन्विन्स्ड. तू पंतप्रधान देवेगौडांना भेट. त्यांच्याकडून आदेश घेऊन ये. मी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करतो.
नाना, प्लीज तुम्हीच आम्हाला मदत करा. पीएमओत आमची ओळख नाही. असं मी त्यांना म्हणताच ते उखडले. मला ते जमणार नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला निराश केलं.
त्यावेळी म.टा.चे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी नितीन वैद्य आणि श्री सुरेंद्र मोहन व विरोधी पक्षाच्या एका खासदारानं आम्हाला पंतप्रधानांची वेळ मिळवायला मदत केली.
पंतप्रधान देवेगौडा बथ्थड होते. त्यांना भटकेविमुक्त, त्यांचे प्रश्न यांचे काडीचेही ज्ञान नव्हते. त्या दिल्ली भेटीत फारसं भरीव असं काहीच हाताला लागलं नाही. तिकीटाचे पैसे फुकट खर्च झाले. मी संतापून नानांना तसं पत्रं लिहिलं. नानांनी पत्राची पोचही दिली नाही.
नाना का चिडले? त्यांना शक्य असूनही त्यांनी दुबळ्या भटक्या विमुक्तांसाठी आपले अधिकार का वापरले नाहीत? आणि शक्य नव्हतं तर आम्हाला दिल्लीचा हेलपाटा आणि खर्च का करायला लावला?
याची उत्तरं कधीच मिळाली नाहीत.
मात्र त्यानंतर मी नानांच्या प्रचाराला कधीही गेलो नाही.
काहीही असो. पण नाना एक भला माणूस होते यात शंकाच नाही!
-प्रा.हरी नरके

Saturday, December 2, 2017

कोपर्डी आणि खर्डा- जिल्हा एकच, न्यायाचं काय?


नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या मुलीवर झालेले अत्याचार भयंकरच होते. चीड आणणारेच होते.
दोषींना कडक शिक्षा व्हायलाच हवी होती. तशी ती झाली. फाशीचा जल्लोष सर्वदूर करण्यात आला. योग्यच झाले अशी भावना सर्वत्र उमटली.
नगर जिल्ह्यातील खर्डा, नितीन आगे हत्या प्रकरणातले सगळे आरोपी मात्र निर्दोष सुटले, याची हळहळ काही मोजक्यांनाच वाटली.
नगर जिल्ह्यातले हेरंब कुलकर्णी कळवळले. इतर चारदोन लिहू बोलू लागले.
मला वाटते दिवंगत नितीन आगेचे अनेक गुन्हे होते.

* नितीननं बहुसंख्याक जातीत जन्म का घेतला नाही?
1. नितीनने दलित जातीत जन्माला येऊन एका सवर्ण मुलीवर प्रेम केले. तीही प्रबळ, संघटित, लढाऊ आणि सत्ताधारी जातीतली. त्यानं प्रेम करण्यापुर्वी जात बघून प्रेम करायला हवे होते. जिवंत असलेल्या संभाव्य नितीन आगेंनी याची नोंद घ्यावी.
2. नितीनने बहुधा स्वत: आत्महत्त्या केली असावी. आणि निर्दोष अशा गरिब मुलांवर हत्येचा नाहक आरोप लादण्यात आला असावा. ते सर्व सुटले ते "योग्यच" झाले. त्यांनीच आता नितीनच्या आईवडीलांवरच बदनामीची फिर्याद दाखल करावी. चांगली अद्दल घडायला हवी त्यांना.
3. सगळेच साक्षीदार फिरले.
त्यांना बिच्यार्‍यांना त्या गावात आणि महाराष्ट्रात राहायचंय ना?
यापुढे महाराष्ट्रात राहायचे असेल किंवा निवडून यायचे असेल तर प्रबळ, संघटित, लढाऊ आणि सत्ताधारी जातीला दुखावण्याची हिम्मत कोणताही राजकारणी करणंच शक्य नाही.

4. पोलीस त्यांचे. सरकार त्यांचे. सत्तेतील बी टीमही त्यांची. सगळेच साहेब त्यांचे. अशावेळी नितीन आगेसाठी नाहक अश्रू कोण गाळणार? आमची संवेदनाच जिथं जातीय झालीय, तिथं कोणी कोणासाठी रडावं, लढावं, बोलावं, लिहावं, वाईटपणा घ्यावा?
5. दिवंत राष्ट्रवादी आर.आर. आबापाटील तेव्हा गृहमंत्री होते. ते म्हणाले होते, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमू. उज्ज्वल निकमांची नियुक्ती करू.
प्रत्यक्षात काहीही झाले नाही.
कारण गोष्ट राजकीय समीकरणात उलटी होती. तसं करायचं तर स्वजातीयांना दुखवावे लागले असते. अशी पॉलीटिकली करेक्ट नसलेली गोष्ट कोणतेही साहेब घडूच देणार नाहीत.

6. भांडारकर हल्ला प्रकरणातील 72 जणही निर्दोष सुटले. ही 4 जानेवारी 2004 ची घटना घडली तेव्हाही आबाच गृहमंत्री होते.
इथे तर भांडारकर संस्थेतलेच साक्षीदार फिरले. जणू आरोपींनाच सामील झाले. भांडारकरमधल्याच लोकांनी बहुधा हल्ल्याचं नाटक करून निर्दोष ब्रिगेडींना नाहक गुंतवलेले असणार.खरंतर या 72 जणांनी भांडारकरवर बदनामीचा दावा लावायला हवा.
काय करणार, पुन्हा पुन्हा जानेवारी 1948 परवडत नसते मालक.

7. लोकशाहीमध्ये बहुसंख्यांकच राज्य करत असतात. त्यांच्या मेहरबानीवर तुम्ही आम्ही जगत असतो. त्यांना दुखवले की तुमचा दाभोळकर, पानसरे होणं अटळच असतं.
8. नितीन आगेप्रकरणी आता मा. महाकवी आणि केंद्रीय मंत्री श्री. रामदास आठवले म्हणतात, हायकोर्टात लढू.
हायकोर्टात साक्षीपुरावे होत नसतात.
जिथे सगळेच साक्षीदार फिरले तिथे हायकोर्ट तरी काय करणार?

8. जेसिका लाल प्रकरणात वेगळे घडले होते कारण तेव्हा जनताच रस्त्यावर आली होती. नितीनसाठी "आगे" कोणी यावं?
जिवावर उदार होऊन साक्ष द्या म्हणणं सोपं. प्रत्यक्षात अशी वेळ आल्यावर समजतं मालक. जातीय दहशत किती भयानक असते.

9. माध्यमे- वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांबाद्दल लिहित नाही. त्यांनाही वाचक/टीआरपीची मजबुरी आहे. तेही शेवटी नोकरदार आहेत.त्यांनाही त्यांचे संसार, मुलंबाळं आहेत.
10. सगळ्या वाहिन्यांवरच्या चर्चा बघा. दलित, ओबीसी, आरक्षण असले काही विषय असतील तरच औषधापुरते त्या त्या समाजघटकातले प्रतिनिधी चर्चेला बोलावले जातात.
एरवी बाकी तमाम सगळ्या विषयांमध्ये "तज्ञांना" बोलावले जाते. तेथे पाहिजे जातीचे.
हे तज्ञ सध्या तरी दोनतीनच जातीत जन्मलेले आहेत हा निव्वळ योगायोग आहे. त्याला ते तरी काय करणार?
11. जिथे आम्ही आमच्या महान संतांचे उल्लेख करतानाही नावामागे त्यांच्या जाती लावतो. उदा. सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सेना न्हावी, चोखा मेळा, नामदेव, [संत नामदेव यांच्या नावामागे जातीचा थेट उल्लेख नसला तरी याच नावाची शिंपी समाजाची एक पोटजात आहे....]......
फक्त दोनतीन जातीतले संत याला अपवाद असतात. कारण ते सर्वांचेच असतात. बाकीचे संत मात्र त्या त्या जातीचे असतात.

12. चालयचंच. उत्तमच आहे म्हणा. कधीकाळी याच महाराष्ट्राचा मला अतिशय अभिमान वाटायचा. आता फक्त, दहशत, उबग आणि खेद. आपल्याच राज्यात आपण गुलाम असल्याची खंत.

13. या देशात बळी हा माणूस होता यापेक्षा त्याची जात महत्वाची असते. नितीन आगे दलित असला तरी तो हिंदू मातंग या जातीचा. राज्यात सत्ता हिंदुत्ववाद्यांकडे आहे. पण तमाम हिंदुत्ववादी पक्ष-संघटना नितीनच्या हत्त्येवर मिठाची गुळणी धरून आहेत. कारण सरळ आहे. बहुसंख्याक जातीचे हिंदू विरूद्ध अल्पसंख्याक जातीचे हिंदू असा जेव्हा संघर्ष असतो तेव्हा सत्तेसाठी बहुसंख्याक महत्वाचे. न्याय, निती, सत्य हे काय कामाचे? 
हरी नरके, नितीन आगे प्रकरणावर तुम्ही का लिहित नाही अशी फे.बु.वरून वारंवार विचारणा व्हायला लागली म्हणून मग स्पष्टच लिहिले.

14. दु:खाची गोष्ट म्हणजे फेबुवरच्या अनेक प्रतिभावंतांना उपरोधही कळत नाही.
-प्रा.हरी नरके

Thursday, November 9, 2017

आईेनं आयुष्यभराची पुंजी चळवळीला देऊन टाकली -





माझे वडील मी खूप लहान असताना गेले. पुढचं आमचं सगळं आईनंच केलं.
आई आम्हा चिल्यापिल्यांसाठी रात्रंदिवस राबायची. मोलमजुरी करायची, ती निरक्षर होती.
कष्टाला वाघीण, तापट स्वभावाची, व्यसनांबद्दल कमालीची चिड असणारी.
एकदा मोठ्या भावानं मित्रांच्या संगतीत दोन घोट घेतले.
आईला कळल्यावर ती इतकी संतापली की तिनं सलग दहा दिवस अन्नसत्त्याग्रह केला.
परिणामी आम्हा भावंडांना आयुष्यात कसलंही व्यसन जडलं नाही.
त्या दिवसांची आठवण म्हणून पुढं दरवर्षी ती दहा दिवस उपास करायची.
निळूभाऊ फुले खलनायकाची कामं करतात म्हणून त्यांच्यावर तिचा फार राग होता. ते पहिल्यांदा आमच्या घरी आले तेव्हा ती त्यांच्यावर फार भडकली होती. त्यांना चिडून बोलली होती.
एकदा स्वत: भाऊंनीच तिला शुटींग पाहायला नेलं नी ते कसं खोटं असतं, नाटक असतं याची तिची खात्री पटवली. मग ती भाऊंची फॅन झाली.
हातपाय धट्टेकट्टे असताना आपल्याला मृत्यू यावा अशी तिची प्रबळ इच्छा होती आणि ती वयाच्या 85 व्या वर्षी गेली तीही चालताबोलतानाच.
तिला जाऊन 12 वर्षे झाली.

जाताना ती तिची शेवटची इच्छा सांगून गेली, मोलकरणीचं काम करून, मोलमजुरी करून तिनं आयुष्यभरात काही छोटेछोटे दागिने केले होते, ते मोडा, नी महाराष्ट्रातल्या 10 सामाजिक नी शैक्षणिक संस्थाना ती रक्कम भेट द्या. निळूभाऊंच्या हस्ते हा कार्यक्रम करावा अशी तिची  इच्छा होती.
निळूभाऊ त्यासाठी आमच्या गावी तळेगाव ढमढेरेला आले.
हजारो लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला.
आम्ही भावंडांनी तिच्या नावानं गावात एक व्याख्यानमाला सुरू केलीय. आजवर अनेक नामवंत त्या व्याख्यानमालेला आवर्जून आलेत.
त्याच कार्यालयात परवा [सोमवार, दि.13 रोजी,] या सोनाई व्याख्यानमालेत लेखक, समीक्षक नी विचारवंत संजय भास्कर जोशींचं व्याख्यान होईल.
ती गेली तेव्हा मी नेहमीप्रमाणे एका सामाजिक कार्यक्रमाला विदर्भात गेलोतो.
कळल्यावर आलो तोवर अंत्यसंस्कार झालेले होते. येताना रस्त्यात सतत डोळे भरून यायचे.
माझे अतिशय आवडते लेखक चारूता सागर यांची वाट ही कथा मला अतिशय भावलेली.
आजारी आईच्या शेवटच्या भेटीला निघालेल्या लेकीची परवड चित्रित करणारी. चटका लावणारी. डोळ्यातून पाणी काढणारी.
ते पुस्तक एका मित्रानं माझ्याकडून वाचायला नेलं नी हरवलं. त्या कथासंग्रहाचं नावच काही केल्या मला आठवत नव्हतं. जणू मेमरी इरेझ झालेली.
आईच्या अंत्यविधीला निघालो असताना प्रवासात ती कथा मला आठवली आणि अनेक वर्षे विस्मृतीत गेलेलं कथासंग्रहाचं नाव अचानक आठवलं. "नागीण"
माझा मित्र भीमराव गोपनारायण याची "सर्वा" या कवितासंग्रहातली एक दोनोळी माझ्या आईचीच भावना सांगते जणू.
"असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती
माझी आई म्हणते चार भिंतींचं घर मी एकटी चालवते."
- प्रा.हरी नरके

Tuesday, November 7, 2017

नोटाबाणी








इंदोर, दि. 8 नोव्हेंबर 2016 -
सायंकाळी बातम्या बघण्या-ऎकण्यासाठी हॉटेलच्या रूममधला टिव्ही लावला तर सुतकी चेहर्‍याने घातलेली मित्रो, अशी हाक ऎकू आली. आता भारत-पाक युद्ध घोषित होणार म्हणून काळजी वाटायला लागली. पोटात धडकीच भरली ना!
बघतो तर काय? झाली ना नोटाबंदीची घोषणा.
प्रवासात मोजकेच पैसे बरोबर आणलेले. तेही ठेवायला सोयीचं व्हावं म्हणून 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये. आता काय करायचं?
आधल्याच दिवशी इंदोरच्या पुस्तक दुकानात जाऊन बरीच हिंदी पुस्तकं घेण्यासाठी ऑर्डर दिलेली. उद्या दुकानाला सुट्टीय. परवा या. आणून ठेवतो असं दुकानदार म्हणालेला. मनासारखी पुस्तक मिळणार म्हणून आनंद झालेला.
दुसर्‍या दिवशी गेलो तर दुकानदारानं सगळी पुस्तकं आणलेली होती. पण तो म्हणाला, 1000, 500 च्या नोटा "महज एक कागज का टुकडा" असल्यानं चालणार नाहीत.
त्यामुळे हातातोंडाशी असलेली पुस्तकं न घेताच परत फिरावं लागलं.
संगिताला इंदोरमध्ये महेश्वरी साड्या, कपडे, नमकीन, मिठाई अशी कायकाय खरेदी करायची होती, कागज का तुकडा काय कामाचा? सबब खरेदी कॅन्सल.
इंदोरला जाऊनसुद्धा काहीही न घेता आम्ही हात हलवत परत आलो.
मेहरबानी परतीच्या तिकीटांचं रिझर्वेशन आधीच झालं होतं म्हणून परत तरी येता आलं. नाही तर राहावं लागलं असतं इंदोरातच.
एकच आनंद होता की आता भारतात सुवर्णयुग येणार. अमीर लोकांची चैन की निंद हराम की होणार. गरीबाची मात्र चांदी होणार.
आणि तसंच झालं. सगळ्यांचे अच्छे दिन सुरू झाले.
बघता बघता गरीब मालामाल झाले.
श्रीमंत पार भिकारी झाले.
लाखो - करोडोंचा काळा पैसा बाहेर आला.
भारताचा जीडीपी दोन हजार वर्षात प्रथमच 25% वर गेला.
नवे रोजगार इतके जास्त निर्माण झाले की स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी संपुर्ण बेरोजगारी प्रथमच दूर झाली.
100 टक्के भारतीय श्रीमंत झाले.सारा भारत एका रात्रीत डिजीटल झाल्यानं कार्ड पेमेंटवर कमिशन कमावता येऊ लागले. कामधंदा न करता पैसे कमावण्याचा घरबसल्या नवा मार्ग उपलब्ध झाला. अगदी सरकारी कंपन्याही [महा.विद्युत निर्मिती आणि पारेशन] कार्ड पेमेंट केले तर आजही त्या रकमेवर कमिशन घेतात. धन्य धन्य सरकार.
दुसर्‍या दिवसापासून ए.टी.एम. वर हवे तेव्हढे पैसे सहज उपलब्ध होऊ लागले.
देशात रांगा म्हणून कुठेच नाहीत.
बॅंक कर्मचार्‍यांना तर कामच शिल्लक राहिलं नाही.
सगळा काळा पैसा संपल्यानं देशभर आनंदी आनंद पसरलेला.
असा महान राज्यकर्ता या आधीच आम्हाला का मिळाला नाही असं जो तो एक दुसर्‍यांना विचारू लागला.
पाडवा, दिवाळी, दसरा, आणखी कायकाय एकदमच साजरं करू लागला.120 जणांना रांगेतून मोक्ष मिळाला. आणीबाणीमुळे इंदिराबाईंना जावे लागले होते तसे या नोटाबाणीसाठी कोणाला घालवणार?
तर मित्रो, आजच्या दिवशी वर्षश्राद्ध घालायचं तर काय करता येईल?
आपण तमाम भारतीय आजच्या आपल्या राष्ट्रीय पुण्यतिथीदिनी
सामुदायिक आत्महत्त्या केल्याची आठवण म्हणून
सर्व मिळून दोन मिनिटं उभं राहून स्वत:लाच श्रद्धांजली वाहू या का?
-प्रा. हरी नरके
...........................