Showing posts with label स्वत:बद्दल. Show all posts
Showing posts with label स्वत:बद्दल. Show all posts

Tuesday, July 14, 2020

नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)









माझ्या घरात महात्मा फुले व बाबासाहेबांचे फोटो मी इयत्ता चौथीत होतो तेव्हापासून लावलेले आहेत.


मी इयत्ता सहावीत असताना काढलेला फोटो. हातातले घड्याळ फोटो स्टूडीओतले असून, अंगठा तुटलेली प्लॅस्टीकची चप्पल माझीच आहे. जुन्या बाजारातून बारा आण्याला घेतलेली.सर्वात महत्वाचे हातातले पुस्तक- माझे सर्वाधिक आवडते पुस्तक "महात्मा फुले : समग्र वाड्मय"


इथून मी सुरूवात केली. नरकेवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे येथील १९८० च्या काळातील माझं घर आणि गोठा-



मुख्यमंत्री शरद पवार यांनी टाटांशी बोलून मला टेल्कोतून मंत्रालयात वि.का.अ. म्हणुन घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मी सम्पादित केलेला अंक-



नामांतर आंदोलनातल्या तुरूंगवासाबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या हस्ते सत्कार


ओबीसीत जाऊन काम करा असा मला अनाहूत सल्ला देणार्‍या "मित्रांसाठी खास", हे माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे.


जेव्हा दोनचार सरंजामदार तथाकथित डावे मला रा. स्व. संघाचा हस्तक म्हणुन हिनवत होते, वाळव्यात मला रितसर निमंत्रित करून त्यांच्याच स्टेजवर बोलू देत नव्हते, बाबरी विध्वंसनाला उत्तर म्हणुन तेव्हा मी भाई वैद्य आणि विलास वाघ यांच्यासमवेत सम्पादित केलेला ग्रंथ- धर्मनिरपेक्षता




श्री.छगन भुजबळ, प्रा.ना.स.फरांदे, श्री. मुकुंदराव ठकोजी पाटील, डी.के. माळी  आणि इतर नेत्यांसोबत १९९०



माझा जन्म निरक्षर शेतमजूर-मोलकरीण आईवडीलांच्या पोटी झोपडपट्टीत झाला. कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल " वेस्ट इन" च्या शेजारच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत पुणे मनपाच्या मुंढवा शाळेत शिकलो. माझा पहिल्या महिन्याचा पगार होता रुपये पाच. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा दरमहा पगार होता साठ रूपये. माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा " सेटलमेंट कॅंप" असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. त्यामुळेच इतक्या लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली.


मार्च १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफटिए म्हणून टेल्कोत शिकायला गेलो आणि फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. म्हणता म्हणता याला  ४० वर्षे कधी झाली कळलंच नाही. मी " डीकास्ट"  झालोय, जातीबाहेर पडलोय अशाच गोड समजुतीत मी होतो. सामाजिक कामात तुम्ही तुमची जात विसरून गेलात तरी काही "ज्ञानीजन" तुम्हाला तुमची जात विसरू देत नाहीत. ते तोंडाने "जातीनिर्मुलनाची" भाषा करीत पुन्हापुन्हा तुम्हाला तुमच्या जाती-धर्मात ढकलायचा प्रयत्न करीत असतात.


हे लोक मूठभरच असतात. आहेत. त्यांना आपण अपवादात्मक लोक समजू शकतो. ते सर्वच जाती-धर्मात आहेत. एकुण समाजाचा विचार केला तर असे लोक एका लाखामागे एखाददुसरासुद्धा भरणार नाहीत. उरलेला सारा समाज माझ्यावर नितांत प्रेम करतो. जिवाला जीव देतो. त्यामुळे या हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्या अपवादात्मक लोकांचा राग मी समजून घेऊ शकतो. त्या माझ्या मित्रांचे तीन बारकुलेसे गट पडतात.

१. जे लोक तरूणतुर्क, अगदी नवे आहेत, ते अलिकडेच सोशल मिडीयात आलेले आहेत. त्यांनी माझे फारसे काहीच वाचलेले/ऎकलेले नाही. त्यांनी मी संपादित केलेले बाबासाहेबांचे रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचे खंड १७ ते २२ बघितलेलेही नाहीत. जे खुद्द बाबासाहेबांचेही वाचत नाहीत त्यांनी माझी इतर पुस्तकं वाचली असण्याची सुतराम शक्यता नाही. एकुण ते मला ओळखतच नाहीत.

२. ज्यांनी मला अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना बोलावलं, पण मी त्यांना एकदाही वेळ देऊ शकलो नाही म्हणून ते माझ्यावर नाराज आहेत. गेली ४० वर्षे, वर्षाकाठी मला ५५० ते ६०० निमंत्रणं येतात. त्यातली वेळेअभावी ९० टक्के निमंत्रण मी स्विकारू शकत नाही. मी वर्षाकाठी अवघी ५० ते ५२ निमंत्रणं स्विकारू शकतो. उरलेले नाराज होतात. त्याला माझा नाईलाज आहे.

३. जे लोक मला स्पर्धक समजतात, याला कार्यक्रमला बोलावू नका, आम्हाला बोलवा, असं समाजाला सांगसांगून ते दमलेत. पण समाज त्यांचं ऎकतच नाही. त्यामुळे ते समाजावर संतापून आहेत. माझ्यावर डुख धरून आहेत. असो.

ही सारी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली दु:खी माणसं आहेत. चिडखोर माणसांसारखीच ती वागतात ह्यात आश्चर्यकारक असं काहीही नाही. शिवाय कशीही वागली तरी ती सारीच माझी भावंडं असल्याने मला त्यांचा राग नाही. त्यांना मी सांगू इच्छितो, दोस्तहो, आपण सोबत प्रवासाला सुरूवात केली होती, तुम्ही मागे पडलात हा माझा दोष नाही. तुमचे अपयश हा माझा गुन्हा नाही. तुमची म्हैस भाकड आहे म्हणून माझ्या दुभत्या म्हशीला शिव्या देऊन काय साध्य होणार? तुम्हाला परीक्षेत कधीही सेकंड क्लाससुद्धा मिळवता आला नाही म्हणून तुम्ही माझ्या सुवर्णपदकांवर जळता हे मला माहित आहे. तुमचा माझ्यावरचा जळफळाट मी अगदीच समजू शकतो. पण, मत्सराने प्रगती होत नाही, उलट मन आणि शरीर अधिक रोगट बनत जाते. मला तुमच्याबद्दल अपार कणव आहे. करूणा-मैत्रीभाव आहे. लवकर बरे व्हा भावंडांनो. Get Well Soon..


मी सम्यक सम्बुद्धांच्या मध्यम मार्गाचा प्रवासी आहे. आज जरी ते माझा रागराग करीत असले तरी उद्या तेही माझ्यावर प्रेम करतील असा मला विश्वास आहे. अनित्यता सिद्धांतावर माझा विश्वास आहे. मी माझ्याबाजूने त्यांच्यावर प्रेमच करतो.


माझं पहिलं पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक बाळ गांगल यांच्यावर होतं. त्यांच्या महात्मा फुल्यांवरील गलिच्छ टिकेचा २२५ संदर्भांसह सप्रमाण प्रतिवाद करणारं ते पुस्तक आहे. १९८९ च्या मार्चमध्ये ते पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते चंद्रपूरला प्रकाशित झालं. तेव्हा मी टेल्कोची रात्रपाळी करून विद्यापीठात एम.फिल. करीत होतो. त्यावेळी माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, नामवंत आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ, उषाताई वाघ, दया पवार, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पु.लं.च्या भाषणाची जादू अशी की पुस्तकाच्या ५०० प्रती या कार्यक्रमातच संपल्या. महिनाभरात तीन हजार प्रतींची आवृत्ती संपली. पुस्तकाला अनेक नामवंत पुरस्कार मिळाले. अनेक मान्यवरांनी त्या पुस्तकावर लिहिले. त्यावर्षीचे ते सर्वाधिक लोकप्रिय व विद्वतमान्य पुस्तक ठरले.


तेव्हापासून आजवर सातत्याने मी संघाचं पोलखोल करणारं सर्वाधिक लेखन केलेलं आहे. अगदी परवा १४ एप्रिल २०२० ला जेव्हा रा.स्व.संघाने बाबासाहेब आमचेच असा दावा केला तेव्हासुद्धा दि प्रिंटमध्ये मी २ लेख लिहून संघाला उत्तर दिलंय. एप्रिल ते मे २०२० मध्ये मी संघाविरूद्ध सुमारे २५ लेख लिहिलेत. आणि संघाच्या बाबतीत संपुर्ण निष्क्रीय असलेले माझे काही मित्र मी संघाचा असल्याची आवई उठवतायत. सामान्य माणसं त्यांच्यावर कसा विश्वास ठेवतील? मग त्यांचा अधिकाधिक चडफडाट, तिळपापड होतो.


मी संघाचा असतो तर वर मोदींचे आणि खाली फडण२० यांचे  सरकार असताना त्यांनी मला
" १. महात्मा फुले ग्रंथ समिती,
२. राज्य मागासवर्ग आयोग,
३. महात्मा फुले अध्यासन,
४. बालभारती,
५. मराठी भाषा सल्लागार समिती,
६. अभिजात मराठी समिती,
या सर्वच शासकीय आस्थापनांवरून काढून का टाकलं असतं?


मी त्यांचा असतो तर उलट मला प्रमोशन, पदोन्नती मिळायला हवी होती.


आणि त्यांचं सरकार असताना मी त्यांचे " दि टाइम्स ऑफ इंडीया, डि.एन.ए, लोकसत्ता, म.टा. लोकमत, सकाळ, पुढारी, बेळगाव त.भा, दिव्य मराठी, आय.बी.एन.लोकमत, ए.बी.पी.माझा, झी २४ तास, दिव्य मराठी, साम टिव्हीवर तसेच माझ्या फेसबुक, ट्विटर, ब्लॉगवर अनेकवार वाभाडे काढले असते का?
तेव्हा तुम्ही कुठे होतात राजेहो? ऎन लढाईच्या वेळी जे कायम झोपी गेलेले असतात, होते, त्यांना जनता आणि जाणते मोजत नसतात.


मी महात्मा फुले समता परिषदेचा संस्थापक सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी आहे. १९९२ पासून अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून श्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लक्षावधी ओबीसींच्या अनंत चळवळी केल्या. " ओबीसी बजेट,"  "ओबीसी जनगणना" असे प्रश्न आम्ही देशपातळीवर प्रथमच ऎरणीवर आणले. त्यावर सर्वथरात रान उठवले. ओबीसी जनगणनेवरचं माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे. माझ्या ओबीसी आरक्षण विषयक एका पुस्तकाचे प्रकाशक कॉ. गोविंद पानसरे होते, तर दुसर्‍याचे मकरंद सावे. माझी अनेक पुस्तकं मुंबईला कम्युनिस्टांच्या कॉ. भुपेश गुप्ता भवनमध्ये छापली गेलेली आहेत.


महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आम्ही ओबीसींचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेतलेत. आजही नियमितपणे घेत असतो. मुंबई, अमरावती, नागपूर, दिल्ली, पाटना, जयपूर, गोवा, हैद्राबाद, हजारीबाग अशा कितीतरी ओबीसी मेळाव्यांना ५ - ५ लाख इतर मागासवर्गीय बांधव उपस्थित होते. ओबीसी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही गेल्या २५ वर्षात शंभराहून अधिक शिबिरं घेतलेली आहेत. माझे काही मित्र  "तुम्ही ओबीसीत का काम करीत नाही? तिकडे जा, आमच्याकडे येऊ नका." असा सल्ला मला देत असतात. त्यांच्या या मौलिक सल्ल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली तर त्यांना ओबीसींच्या प्रबोधनाशी संबंधित माझे किमान २०० लेख ब्लॉगवर दिसतील. इंग्रजी पेपर " दि हिंदू " पासून मराठी, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये माझे ओबीसीविषयक लेखन प्रकाशित होत असते. झालेले आहे. माझा ब्लॉग वाचणारांची संख्या आज आठ लाख इतकी आहे.


ओबीसींच्या प्रबोधनावर मी जितके लिहिलेय, लिहितोय, बोललोय, बोलतोय त्यापेक्षा जास्त काम या मित्रांनी केलेले असणार! असे मी समजतो. तेव्हा त्यांचा प्रत्येक सल्ला मला शिरसावंद्य मानयलाच हवा! माझ्या मित्रांनो, तुमचा हा सल्ला मी नक्कीच अंमलात आणीन.


१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.
कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. बाळकृष्ण रेणके युक्रांदमधला माझा जुना सहकारी. त्याची पथारी माझ्या दुसर्‍या बाजूला. हरी नरके नंतर रेणक्यांचा जावई झाला. ठाणे तुरूंगामध्ये हरीने सासरा आगाऊ बुक केला. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. ते या पुस्तकातून मुळातूनच वाचण्याजोगं आहे.


तुरूंगांत मला ३ आठवड्यात माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ/जन्माने नाही तर बाय चॉईस बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.


कोणाला हे उद्धटपणाचे वाटले तरी हरकत नाही, पण देशाच्या कानाकोपर्‍यात मी ओबीसी, भटके, विमुक्त, अनु. जाती, जमाती, बहुजनांवर जितकी भाषणं केलीत तितकी करणारा माझ्या पिढीतला दुसरा माणूस मला माहित नाही.


ज्या मूठभरांना माझ्याबद्दल तीव्र नफरत, विरोधीभक्ती आहे, माझा वर्षानुवर्षे द्वेश वाटत आलेला आहे, त्यांनी लाखो सामान्य लोक आणि तळमळीचे कार्यकर्ते माझ्यावर का जिवापाड प्रेम करतात, मला पुन्हापुन्हा भाषणाला का बोलावतात? माझी भाषणं का ऎकतात याचा शोध घ्यावा. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आपोआप मिळून जातील.


ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या होत्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.
तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली,  " हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना/क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.
त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. इतकी वर्षे उलटली तरी आजही त्या भेटी ताज्या टवटवीत आहेत.


मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, "  तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. हे भारी आहे ना?


जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला बावन्नपत्ती म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबा एव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.


दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची.


जेलच्या खूप भन्नाट आठवणी आहेत. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे  माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. आणि तसाच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे. म्हणून तर कुमार सप्तर्षी त्या दिवसांना "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा अनुभव घेणे मस्ट आहे.


१९६३ मध्ये किंवा त्याआधी जन्मलेल्या, ज्यांनी ज्यांनी नामांतर आंदोलनात प्रदीर्घ तुरूंगवास भोगलेला आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये आपण कोणत्या जेलमध्ये होतात, त्याबद्दल लिहावे, म्हणजे त्यातून समविचारी मित्रमैत्रिणींची नवी/जुनी यादी तयार होऊ शकेल.

(भाग - २ रा समाप्त. क्रमश:)


- प्रा. हरी नरके,

१४/७/२०२०

संदर्भासाठी पाहा- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१, पृ. ३९० ते ३९२


पुर्ण लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2Q2U1HDiUbfHv42gYKYcIvZZIV7YSDRiUolGSuJUXlGxqi3_nlTb3DoEo  या लिंकवर क्लीक करा.



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी पदवीचे शिक्षण घेत असताना ३ वर्षात आंतर राज्य, आंतर विद्यापीठीय पातळीवरील १३३ वादविवाद-वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. देशाचे उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना-



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी रेग्युलर बी.ए. केलं. पुणे विद्यापीठात पहिला आलो. तेव्हा राज्यपाल न्या. एस. के. देसाई यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि २५ पुरस्कार स्विकारताना- (१६/१०/१९८७)


सामाजिक-सांस्कृतिक कार्याबद्दलचा राज्यव्यापी महानगर पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राम जोशी यांच्या हस्ते स्विकारताना, शेजारी गो.रा.खैरनार व इतर मान्यवर


रतन टाटा यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार स्विकारताना, शेजारी जे. ई. तळौलीकर

Tuesday, July 7, 2020

नामांतर आंदोलनातले वयाच्या विशीच्या आतले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध  करण्यासाठी मराठवाड्यात भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी ती मागणी फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित होती. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळण्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा/देशाचा बनला. मी त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये सहभागी होऊ लागलो. लॉन्ग मार्च मध्येही मी सामील होतो. तेव्हापासून माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली.

त्यापुर्वी महाराष्ट्रात शिक्षकांचा ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप झाला होता. तेव्हा मी " पुणे दर्शन" हा २०० पृष्ठांचा प्रबंध लिहित होतो. पुढे १९८० साली गुजरातमध्ये राखीव जागा विरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या " दर्पण ग्रुपतर्फे" आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, सुनंदन, वर्षा, वंदना, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही दर्पणचं काम करायचो. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर अभिरूप न्यायालय नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता. आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्य शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही प्रत्येकजण त्या त्या शाळेत प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर वादविवाद/ चर्चा करायचो.

तेव्हा आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या "आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना" ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची.


कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. १९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्य बाजूने बोललो. आम्ही अधिक पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. "भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे" हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. जाणत्यांना ते आजही बघता येतील. मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती नामक झोपडपट्टीत राहात होतो. तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा किर्लोस्कर मासिकात लिहिलेले होते. इतक्या लहान वयात एव्हढे उद्योग आम्ही कसे करीत असू याचेच आज मला नवल वाटते.


१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं. आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती. तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने माझे बरेच तुरूंग बघून झाले.)


बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि वकीली बाण्याचे. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी २२ दिवस तुरुंगात ठेवले. हे २२ दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक श्रीमंतीचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर हा मुंबईचा ग्रुप माझा दोस्त झाला.

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी लेखाच्या सुरूवातीला ज्यांचा उल्लेख केलाय त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षि, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.


या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. होय माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. (भाग - १ ला, क्रमश:)



- प्रा. हरी नरके,
७/७/२०२०

संदर्भासाठी पाह- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१







Sunday, July 5, 2020

अमेरिका, दिल्ली, मुंबईहून आंबेडकरी विचारवंत, स्कॉलर्स, अधिकारी, नेते लिहितात-








सर , जयभीम !

आपली चूक नसतानाही चळवळीच्या भल्याचा विचार करुन आपण समंजसपणाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही आणखी मोठे व्हाल व तुमची विश्वासार्हतादेखील वाढेल.
तथाकथित आपल्या जातीची माणसे ब्राह्मण्यग्रस्त संघटना तसेच गैर फुले - आंबेडकरवादी संघटनांसोबत असताना त्यांबाबत सोईस्कर मौन बाळगणारे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला उत्साहाने पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.


आमच्या नात्यांत तसेच परिचितांमध्ये व्यसनाधीन पती व त्यांचा कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. मुंबईत आम्ही आदर्श जयंती अभियान चालवताना प्रत्येक वस्तीत व्यसनाचा मुद्दा हमखास चर्चेला येतो. काही मंडळांना तर ‘दारु पिणाऱ्यांना जयंती मिरवणुकीत स्थान नाही ‘ असे जाहिर करावे लागते ! यांवरुन हा दारुचा रोग व त्याचे दुष्परिणाम यांची तीव्रता समजून येते.  रोगाचे अस्तित्व नाकारणे वेगळे व रोगावर उपाय करणे वेगळे ! जे रोगाचे अस्तित्वच नाकारतात त्यांच्याकडून उपायांची अपेक्षा ती काय करणार ? असो.


शेवटी प्रामाणिक प्रश्नांना सहज उत्तरे देता येतात. परंतु हितसंबंधी व्यक्तींचे प्रश्न वेगळे असतात व कितीही तर्कशुद्ध उत्तर दिले तरी त्यांचे समाधान होत नसते !

भविष्यात अशा व्यक्तींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे उचित राहिल, असे वाटते.

एकाच वेळेस आपण सर्वांचे समाधान करु शकत नाही.

शेवटी तथागत सम्यक संबुद्ध यांची अनित्यता आपणांस देखील लागू आहेच !

आम्ही आपल्या सोबत आहोत.

आपले,

१- शुद्धोदन आहेर.

२- संजय गायधनी.

३ - वैशाली गेडाम (पीएच.डी. स्कॉलर, अमेरिका)

४ - अशोक अंकुश.

५ - डॉ. हेमलता माहिश्वर, नवी दिल्ली.

६- उपाली जी उर्फ एस एस धवराळ.

७- संदीप हिरे.

८- दिपक गांगुर्डे.


Wednesday, June 24, 2020

एवढा 'आकस' कसा काय रुजत जातो माणसांत?

Pi Vitthal यांची खालील पोस्ट पाहावी.
" काही लोकांचे आपल्याविषयीचे पूर्वग्रह इतके पक्के असतात की, आपल्या कोणत्याच दखलपात्र कृतीला, सर्जनशील निर्मितीला प्रतिसाद देण्याची त्यांची इच्छा नसते. म्हणजे फेसबुकच्याच भाषेत सांगायचं तर 'कॉमेंट' वगैरे तर सोडाच ; पण साधं 'लाईक' करण्याचं सौजन्यही ते दाखवत नाहीत. आणि आपण तर त्यांना वर्षानुवर्ष जवळचं समजत राहतो. (इतरांविषयीचा एवढा 'आकस' कसा काय रुजत जातो माणसांत? )
दुर्दैवाने अशी माणसं आपल्या भोवतालात खूप असतात. त्यात आपल्या जवळचे 'मित्र' असतात. काही 'आदरणीय' ज्येष्ठ असतात. काही तथाकथित 'थोर' असतात.
तर असो. सर्वांचं भलं होवो. !
तुमचं मत यापेक्षा वेगळं आहे? 😊 - पी. विठ्ठल "

.......

मी त्यांच्या भिंतीवर दिलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
पि.विठ्ठल: तुमची पोस्ट आणि त्यावरच्या बहुतेक सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या.
दोनतीन वर्षांपुर्वी मीही अशीच खंत मांडणारी पोस्ट केली होती, तेव्हा असे लक्षात आले की * एकुणच दाद देण्याच्या बाबतीत पंजाबी लोक, उत्तरेतले लोक आघाडीवर आहेत. मराठी फारच कद्रू आणि कंजूष लेकाचे.


१) काही अभिरूचीसंपन्न मित्रमैत्रिणी जरी लाईक/कमेंट देत नसले तरी ते वाचत असतात. त्यांच्या लक्षातही असते. भेटल्यावर सांगतातही.

२) तुमच्या पोस्टवर व्यक्त झालेले, या भावनेशी सहमत असलेले यांची संख्या कितीतरी मोठी आहे. ( ४९३ लाईक/३१४ कमेंट ) मग त्यांची हीच तक्रार असूनही ते तरी एरवी का बरं इतरांना लाईक/कमेंट देत नसतील?


३) वाचलेले आवडले की उत्स्फुर्तपणे दाद देणे हा माणसाचा सहज भाव आहे. ती दाबणारे मला तरी निरामय/निकोप मनाचे वाटत नाहीत. अशी दाद दाबून ठेवण्यासाठी या मंडळींना फार मोठी मानसिक तयारी करावी लागत असेल. दाद देण्याची कळ दाबून ठेवायचा त्रासही होत असेल. त्यांच्या या त्रासाचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा.

४) माझे पुस्तक प्रकाशित झाल्यावर माझ्या एका मित्राने त्याच्या शंभर प्रती विविध नामवंतांना पाठवल्या होत्या. ज्यांना हे भेट पुस्तक मिळाले त्यातल्या पाचदहा जणांनीही दाद सोडा साधी पोचही दिली नाव्हती. पण पुढे हे पुस्तक गाजले.त्याला अनेक पुरस्कार मिळाले, नामवंतांनी लिहिलेली परीक्षणे आली, त्यानंतर मात्र त्याच्याकडे बघण्याचा याच लोकांचा दृष्टीकोन बदलला.


५) मात्र दुसरीकडे माझा लेख वाचून तू यावर पुस्तक लिही असे कळवणारे पु.ल.होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुस्तकावर इतकं भरभरून बोलले की त्या कार्यक्रमात पुस्तकाच्या पाचशे प्रती विकल्या गेल्या. पुढे पुरस्कार आणि परीक्षणांमुळे महिनादीड महिन्यात तीन हजारांची आवृत्ती संपली. मी जयवंत दळवींना पुस्तक द्यायला गेलो तर त्यांनी ते आधीच विकत घेऊन वाचलेले होते, असेही सुखद अनुभव आहेतच.


६) विश्राम बेडेकरांची रणांगण प्रकाशित झाल्यानंतर ती बरी आहे असे म्हणणारा कोणीही नव्हता. अशी २०/२५ वर्षे गेली. मग पहिला निघाला. दुसरा..तिसरा.. निघत गेले. आज रणांगण किती उंचीवर आहे बघा.


७)सार्वजनिक जीवनातली बधीरता,संवेदनहिनता खरंच वाढतेय की तशी फक्त तक्रार वाढतेय, शोधावं लागेल.


८) आणखी खूप लिहिता येईल. पण त्यातले बरेच मुद्दे येऊन गेलेत. खरंच चांगलं लिहिलंय अनेकांनी. ते मुद्दे रिपिट न करता त्यांना पाठींबा देतो.


* उलट मी फारच जास्त लोकांना भरभरून दाद देतो अशी तक्रार माझे काही मित्र करत असत. आजही करतात. मी म्हणे सर्वांनाच चांगले म्हणतो, त्यामुळे तुझी दाद सवंग आहे असं एक जवळचा समीक्षक-ग्रंथविक्रेतामित्र मला म्हणतो. असेलही.


मित्रवर्य अशोक नायगावकरांच्या एका किश्याने समारोप करतो. रस्त्यावर एकजण पकडा पकडा असं ओरडत असतो. पळणाराला लोक पकडतात. कायरे काय चोरलंस म्हणुन विचारतात. तो म्हणतो, मी काहीच चोरलं नाहीय, मागचा धापा टाकत पोचतो. लोक म्हणतात, हा तर चोरी केलीच नाही म्हणतोय. धापा टाकणारा म्हणाला खरंय. चोरलं नाही पण त्याची कविता ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता लेकाचा! कविमित्रांनो, किस्सा माझा नाही,कवी अशोक नायगावकरांचा आहे. तेव्हा रागावू नका.

-प्रा. हरी नरके,
२४/६/२०२०

Tuesday, June 9, 2020

मानधनाची गोष्ट - प्रा. हरी नरके









तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित करता तेव्हा तुम्हाला सदर कार्यक्रमासाठी १. हॉलभाडे, २. लाऊडस्पीकर, ३. हारतुरे, ४. निमंत्रणपत्रिका, ५. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी ठिकठिकाणी लावायचे बॅनर्स, ६. स्टेजवरील बॅनर, ७. पाहुण्यांना चहापाणी, ८. फोटोग्राफर,  असा बराच खर्च करावा लागतो. आता हा सगळा खर्च करावाच लागतो. त्यात क्वचितच सूट मिळते.

मग मुद्दा येतो वक्त्याचा, प्रवासखर्च आणि मानधन यांचा. वरिल खर्च ज्यांच्या भाषणासाठी करायचा त्याने मात्र फुकटात यावे अशी अपेक्षा का? काही संयोजक निमंत्रण देताना सुरूवातच अशी करतात, "तुमचे मानधन किती असेल?" त्यावर बोलवायचे की नाही ते ठरणार. मी उलटे करतो. संयोजकांचा हेतू, तारीख, वेळ, विषय जुळला तरच पुढची बोलणी. आधी कशाला ना? बहुतांश संयोजक ठरलेले मानधन देतात. काही संस्था गरिब असतात, त्यांची विषयाबद्दलची कळकळ आणि आस्था बघून वक्तेही मानधनात भरिव सूट देतात किंवा कार्यक्रमाचे मानधन घेत नाहीत. निदान मी तरी असे करतो. किंवा दिलेले मानधन त्याच संस्थेला देणगी म्हणून परत करतो.

पण काही आयोजक मात्र मानधनाचा बाऊ करताना दिसतात. त्यावर आक्षेप घेतला जातो, टिकेची झोड उठवली जाते. (काही व्यावसायिक वक्ते मानधनाच्या नावाखाली संयोजकांची लूट करतात हेही वाईटच.) संयोजकांची ऎपत व कार्यक्रमाचा हेतू बघून मानधन घ्यावे किंवा नाही हे ठरवावे. मात्र हा कायम टिकेचा विषय कशाला?

आम्ही तुम्हाला स्टेज देतो, प्रसिद्धी देतो, मग कशाला हवे मानधन? असाही काहीजण प्रश्न विचारतात. तुम्ही आमच्या जीवावर मोठे झालात असेही ऎकवले जाते. प्रसंगी वक्त्याची हेटाळणीही केली जाते. अर्थात माझे कार्यक्रमांचे बहुतांश अनुभव चांगलेच आहेत. काही आंबटगोड तर काही सालटी काढणारे. काही वक्ते पिण्याखाण्यासाठी संयोजकांना अतोनात खर्चात पाडतात, हेही निषेधार्हच होय...माझ्यापुरते सांगायचे तर मला चहा व मिळेल ते जेवन यावर माझे भागते. राहायची व्यवस्था हॉटेलातच हवी असेही नसते. कार्यकर्त्याच्या घरीही माझे छान जुळते.

वर्षातले निम्मे कार्यक्रम मी विनामानधन करतो. ज्या संस्था खूपच गरिब आहेत त्यांच्याकडून प्रवासखर्चही घेत नाही. ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत त्यांनी प्रवासखर्च व मानधन द्यायला हवे असे मला वाटते. काही संस्था किंवा संयोजक पदरमोड करून कार्यक्रम घेतात, ते जे देतील ते मी स्विकारतो. काहीजण ठरलेले नसतानाही देतात हेही खरे आहे. मात्र कोणाला अर्धी वा १००% सूट द्यायची आणि कोणाकडून पुर्ण मानधन घ्यायचे हा माझा निर्णय असतो. संयोजकांनी ते ठरवू नये असे मला वाटते.. " हे वक्ते मानधन घेत नाहीत म्हणूनच ह्यांना बोलावले किंवा खूप कमी मानधनात येतात म्हणून तर यांची निवड केली" असेही काही संयोजक जाहीरपणे स्वागतभाषणात सांगतात. ते निमुटपणे ऎकून घ्यावे लागते.

मानधन तुम्ही ठरवा असे म्हटले की दहा टक्के लोक सन्मानपुर्वक मानधन देतात मात्र साधारणपणे नव्वद टक्के संयोजकांचे लगेच रडगाणे सुरू होते. फुकट काही मिळते म्हटले की त्याची किंमत राहात नाही. काही संयोजक तर पाचदहा रूपयाचेही बार्गेनिंग करायला बघतात.


काही संयोजक इतर वक्त्यांना दुप्पटतिप्पट मानधन देतात, आम्हाला मात्र परवडत नाही असे ऎकवतात. संयोजकही वक्त्यांचा ब्रॅण्ड /प्रसिद्धी/ कंटॆण्ट बघूनच बोलावतात.

निदान मी तरी आयुष्यात एकदाही मला बोलवा असे कोणालाही सांगायला गेलेलो नाही. श्रीमंत राजकारणी आयोजक कबुल केलेल्या मानधनात फसवणूक करणारात अग्रेसर असतात. ९९% श्रीमंत राजकारणी आयोजक फसवणारे असतात असा माझा तरी अनुभव आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हे प्रमाण कमी आहे. मात्र आहे.

वक्त्यांनाही घरदार, संसार, तहानभुक असते. त्यांनी विनामानधन बेघर होऊन, लाचार होऊन दारोदार भीक मागत फिरावं का? म्हणजे मग तुम्ही त्यांना क्रांतिकारक प्रबोधनकार म्हणणार का?
असल्या लाचार, परावलंबी त्यागाचं कवतिक करणारे दांभिक नाहीत? वक्त्यांनी फुकट घसा ताणून जगण्यासाठी धुणंभांडी करावीत अशी अपेक्षा आहे का या त्यागी मंडळींची? बरं पटत नाही, तर बोलवूच नये, हा पर्याय आहे ना तुमच्याकडे!... वक्त्यांवर उठसूठ चिखलफेक कशाला? वक्ते, कलाकार, कार्यकर्ते सन्मानाने जगले पाहिजेत! ते चळवळीचं बळ वाढवतात असं तुम्हाला वाटत नाही काय?

माझे त्यातलेच काही कडूगोड अनुभव यानिमित्ताने नमूद करतो.

१. फार जुनी गोष्टय. औरंगाबादला विद्यापीठाने मला बोलावले होते. विद्यापीठाचा प्रमुख कार्यक्रम होता. मी मानधनाबद्दल काही बोललो नाही. तरिही आयोजकांनी आम्ही विद्यापीठ नियमाप्रमाणे प्रवासखर्च व अमूकइतके मानधन देऊ असे सांगितले. मी होकार दिला. कार्यक्रम फारच उत्तम झाला. संयोजकांनी व्यवस्था चांगलीच ठेवली होती.

त्यांनी मानधनाचे पाकीट दिले. व्हॉऊचरवर सही करताना माझ्या लक्षात आले की त्यांनी जेव्हढे मानधन देऊ म्हणुन मला फोनवर सांगितले होते त्याच्या दुप्पट रक्कम त्यांनी मला दिलेली होती. ठरलेले गाडीभाडेही अदा केलेले होते. मी सदर रक्कम ठरल्यापेक्षा जास्त आहे, असे त्यांच्या निदर्शनाला आणले तेव्हा संयोजक मला म्हणाले, " आम्ही विद्यापीठाचे मागील रेकॉर्ड चेक केले तेव्हा असे आढळले की आमची पद्धत आहे त्याच्या निम्मीच रक्कम तुम्हाला सांगितली गेलीय, म्हणुन नियमाप्रमाणे जी रक्कम याआधीच्या वक्त्यांना दिलीय तीच तुम्हालाही दिलीय." ठरल्याच्या दुप्पट मानधन मिळाल्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिला आणि आजवर तरी शेवटचा अनुभव होता हा. संयोजक होते, प्रा. डॉ. सुधीर गव्हाणेसर.

२. जुनीच गोष्टय. मला सांगलीच्या एका संस्थेचे निमंत्रण आले. तारिख, विषय, वेळ सगळे ठरले. तुम्ही रेल्वेचे तिकीट काढून मला पाठवा असे मी म्हटल्यावर संयोजक, जे एक नामांकित डॉक्टर होते, मला म्हणाले, आम्ही यावर बैठक घेतो आणि जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवतो. चार दिवसांनी त्यांचा फोन आला. म्हणाले, " याविषयावर आमच्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची तीन तास मिटींग झाली. आम्ही सगळे नामांकित वकील, डॉक्टर्स, सी.ए. पत्रकार, उद्योगपती आहोत.

तेव्हा असे ठरले की वक्त्याला कळवावे, आम्ही कार्यक्रम घेऊन तुम्हाला स्टेज, प्रसिद्धी, भाषणाची संधी देतोय, मात्र प्रवासखर्च द्यायला आमचा तात्विक विरोध आहे."

मी त्यांना म्हणालो की "तुमच्या संस्थेची आर्थिक कुवत नाही, किंवा काही अडचण आहे म्हणून प्रवासखर्च न देणं मी समजू शकतो. पण आर्थिक सुबत्ता असूनही मानधन नाहीच, प्रवासखर्चालाही तात्विक विरोध असेल तर माझा निर्णय ऎका, असे फुकट कार्यक्रम करायला माझाही तात्विक विरोध आहे." मी त्यांचे आभार मानले आणि फोन ठेवला.

३. मुंबईला माटुंगा लेबर कॅंपमध्ये कार्यक्रम होता. प्रवासखर्च, मानधनाचे स्पष्ट बोलणे झालेले होते. मी पुण्याहून कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रम चांगला झाला. स्टेजवरून खाली येताच चहाही न विचारता आयोजकांनी टॅक्सी मागवली. मला टॅक्सीत कोंबले. हातात एक पाकीट दिले आणि निरोप दिला. टॅक्सीचे बिल देताना दादर रेल्वे स्टेशनजवळील एशियाडच्या स्थानकावर मी पाकीट फोडले.

त्यात एक चिठ्ठी होती. " वर्गणी कमी जमल्यामुळे तुम्हाला प्रवासखर्च मानधन काहीही देता येत नाहीये. क्षमस्व."  टॅक्सीचे बिल दिल्यावर माझ्याकडे परतीच्या तिकीटाइतकेही पैसे नव्हते. विनातिकीट रेल्वेने पुण्याला जाण्याची हिम्मतही नव्हती. बसने वरळीला गेलो. ओळखींच्याकडून उसने पैसे घेतले आणि पुण्याला आलो.

अगदी असेच नाहीत पण याच्या कमीअधिक किंवा जवळपासचे म्हणता येतील असे किमान दहाबारा तरी अनुभव पुढे यायचे होते. चालायचेच. संयोजकही माणसे आहेत, माणसांसारखेच वागणार!

४. एका शैक्षणिक संस्थेने कार्यक्रमाला दादरला बोलावले. माझा दुसर्‍या दिवशी सकाळी नाशिकला दिव्य मराठीचा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम असल्याने दादरचा कार्यक्रम संपताच मला नाशिकला लगेच निघावे लागणार होते. मी एशियाडने पुण्याहून दादरला गेलो. फ्रेश होण्यासाठी काही व्यवस्था आहे का असे मी विचारल्यावर ( संयोजक जे माझ्या ओळखीचे होते, त्यांनी सांगितले ) दोन तासांनी थेट हॉलवरच या, तिकडे बेस्ट कॉमन टॉयलेट आहे, तिकडेच फ्रेश व्हा.

मी दोन तास प्लाझा सिनेमाच्या समोरच्या बागेत वाचत बसलो. दोन तासांनी संध्याकळी ६ वाजता सभागृहावर पोचलो. कॉमन टॉयलेटमध्ये तोंड धुवून कपडे बदलले आणि सभागृहात गेलो. उपस्थिती खूपच लिंबूटिंबू होती. माझ्याबरोबरच बरेच वक्ते/पाहुणे बोलावलेले होते, ते मुंबईतलेच असल्याने कुणीही आलेले नव्हते. त्यामुळे ठरल्याच्या तीन तास उशीरा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान संयोजकांनी मी आल्यापासून तीनतासात साधा चहाही विचारलेला नव्हता. कार्यक्रम दोन अडीच तास चालला. बरा झाला. मी निघतो म्हणालो, तर संयोजक ठीकाय म्हणाले.

हॉलच्या बाहेर एक जुना मित्र भेटला. त्याने हॉटेलात नेले आस्थेने वडापाव खाऊ घातला. मी गाडी पकडली आणि नाशिकला निघालो. मध्यरात्र असल्याने रस्त्यावर खायला काहीही मिळाले नाही. नाशिकला पहाटे पोचलो. राहण्याचे हॉटेल चांगले होते पण पहाटे किचन बंद होते.

सकाळीच नास्ता मिळेल असे सांगण्यात आले. मी घड्याळावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले की मी पुण्यावरून मुंबईला निघालो त्याला आता १८ तास झालेले होते. दादरला मित्राने वडापाव खाऊ घातला नसता तर एक मस्त निर्जळी उपवास तरी घडला असता. तब्बेतीसाठी तो बरा असतो म्हणतात.

५. तेव्हा मोबाईल फोन नव्हते. महाडजवळ कार्यक्रम होता. लॅंडलाईनवरून निमंत्रण मिळाले. मी स्विकारले. मी एसटीने पुण्याहून महाडला जायचे तिकडे संयोजक बसस्टॅंडवर मला घ्यायला येणार होते. तेच कार्यक्रमस्थळी घेऊन जाणार व परत बसस्टॅंडवर सोडणार होते. तसा मी महाडला पोचलो. संयोजक आलेले नव्हते.

तासभर वाट बघून त्यांच्या घरी फोन केला तर त्यांची बायको म्हणाली, सकाळी नऊ वाजताच ते कार्यक्रमाच्या गावी गेलेत. आता उद्याच परत येतील. कार्यक्रमाच्या गावचा कुणाचाही फोननंबर त्यांच्याकडे नव्हता. गावाचे नाव तेव्हढे त्यांना माहित होते ही मेहरबानीच म्हणायची... ते गाव महाडपासून अठरा किलोमीटरवर होते.

वडापवाला मला मुख्य रस्त्यावर सोडतो म्हणाला. साधारण ज्या प्रवाशीगाडीत सहा प्रवासी बसतात, त्या गाडीत त्याने माझ्यासह १६ प्रवाशी कोंबले होते. जिथे त्याने मला उतरवले तिकडून चालत अवघे नऊ किलोमीटरवर डोंगरात खाली गाव होते. जायला फक्त पायवाट होती.

मी जंगलातून चालत साधारणपणे चार तासांनी त्या गावात पोचलो. तर मला घ्यायला येणार होते तेच गृहस्थ एकदम पुढे आले व मी विसरलोच तुम्हाला न्यायला यायला असं म्हणू लागले. यावर काय बोलणार? संयोजक माझी वाटच बघत होते. चहा झाल्यावर लगेच कार्यक्रम सुरू झाला. उपस्थिती मोठी होती.

कार्यक्रम बेस्ट झाला. आग्रहाचे जेवन दिल्यावर त्यांनी मला महाडला बसस्टॅंडवर सोडायला एक मोटर सायकलवाला बरोबर दिला. आम्ही रात्री साडॆबाराला तिकडे पोचलो तेव्हा शेवटची पुणेगाडी गेलेली होती. पुढची एसटी उद्या सकाळीच होती. बसस्टॅंडवर झोपू नका असे तिकडचा वहातूकनियंत्रक म्हणाला.

महाडच्या रेस्ट हाऊसला गेलो तर ते फुल्ल होते. किचनमध्ये डायनिंग टेबलवर बॅगेतील लुंगी अंथरली आणि पडलो. तर मच्छरांचा हल्ला झाला. सरकारी पंखा फक्त आवाज करीत होता. फिरत मात्र नव्हता.
सकाळी तीनतास आधीच महाड बसस्टॅंडवर पोचलो.

६. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना नाशिकच्या द्राक्षे व वाईन उत्पादकांनी मला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या एका कार्यक्रमाला बोलावले. मला निमंत्रण द्यायला विसेकजण नाशिकहून पाचसहा मर्सिडिजने माझ्या कोथरूडच्या घरी आलेले. कालिदासमध्ये कार्यक्रम होता.

राहायची व्यवस्था एका मोठ्या हॉटेलात होती. वर्तमानपत्रातील जाहीरातींवर, मंत्र्यांचे व संयोजकांचे फोटो यावर किमान चार लाख रूपये खर्च केलेले अतिश्रीमंत संयोजक होते. कार्यक्रम स्थळाची सजावट, कमानी, बॅनर्स, बॅंड यावर दोनेक लाख खर्च झाला असावा. स्वागत गीतवाल्यानेच पंधरा हजार घेतलेले होते.

कार्यक्रमात माझे मुख्य भाषण होते. बरेच मंत्री उपस्थित असले तरी ते मोजकेच बोलले. कार्यक्रमानंतर आता उद्या सकाळी भेटू असे सांगून संयोजक मला हॉटेलवर सोडून निघुन गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी माझ्या एस.टी.ची वेळ होत आली तरी संयोजकांचा पत्ता नव्हता. मी त्यांच्या घरी फोन केला तर ते दमल्याने झोपलेले होते. उठल्यावर मला म्हणाले, " खूप दमलोय. आता मी येत नाही निरोप द्यायला. तेव्हढे हॉटेलचे बिल द्या आणि तुम्ही जा, आम्ही तुम्हाला तो खर्च, मानधन व प्रवासखर्च पाठवतो."

माझ्या रूममध्ये जे दुसरे एक निमंत्रित उद्योगपती होते ते स्वत:च्या कारने पहाटेच फलटणला निघून गेलेले होते. मात्र त्यांच्या ट्रंककॉलचे बिल दोनेक हजार रुपये झालेले होते. रुमचे भाडे, दोघांचे जेवन, नास्ता, चहा यांचेही तितकेच झालेले. एव्हढे सगळे पेमेंट करण्याएव्हढे पैसे माझ्याकडे नव्हते. मी संयोजकांना पुन्हा फोन केला व माझी अडचण सांगितली. मग ते हॉटेल मॅनेजरशी बोलले. तेव्हा कुठे माझी सुटका झाली.

मी पुण्याला परत आलो. संयोजकांना मी नंतर मानधन-प्रवासखर्चासाठी खुपदा फोन केले, पत्रे लिहिली, निरोप दिले. त्यांनी दादच दिली नाही. त्यांचे म्हणणे असे की, " मी दुसर्‍याही एका शैक्षणिक कार्यक्रमाला वेळ दिलेला होता, त्या संस्थेने पुणे-नाशिक-पुणे साध्या एसटीचे भाडे मला दिलेले होते. सामाजिक कार्यक्रमाचे मानधन कसले मागता?"

मग मी तक्रार दाखल करतो म्हणालो. तेव्हा कुठे ते नरमले. शेवटी मी सुचवलेल्या एका सामाजिक संस्थेला त्यांनी अगदी अल्पशी देणगी दिली व फुल ना फुलाची पाकळी गोड मानून घ्या असं मला म्हणाले. असे हे कोट्याधिश की कोत्याधिश!!

७. पुण्याच्या एका प्राध्यापक मित्राच्या आग्रहावरून संगमनेरचा कार्यक्रम घेतलेला. तेव्हा मी टेल्कोत नोकरी करायचो. शिफ्ट करून लाल डब्याने रात्री अकरा वाजता संगमनेरला बसस्टँडवर आम्ही दोघे पोचलो. माझ्यासोबत पुण्याचे प्राध्यापकमित्र होते. त्यांची बहिण संगमनेरला राहत असल्याने ते तिच्याकडे राहायला गेले.

माझी सोय रेस्ट हाऊसमध्ये केल्याचे समजले. रेस्ट हाऊस बसस्टॅंडला लागूनच आहे. तिकडे गेलो तर संयोजकांनी रूम बुक केली होती, मात्र नुकतेच एक तासापुर्वी त्यांनी स्वत: येऊन रिझर्व्हेशन कॅन्सल केले होते. कारण अज्ञात होते. दरम्यान रात्रीचे बारा वाजलेले होते.

मी शेवटचा पर्याय म्हणून प्रा. रावसाहेब कसब्यांच्या घरी फोन केला. दुसर्‍याच बेलला फोन उचलला गेला. वहिनी म्हणाल्या, " कसबेसर एका कार्यक्रमाला बाहेरगावी गेलेत. आत्ता पोचतीलच घरी. तुम्ही राहायलाच घरी या."

गेलो. सर आले. आयोजक कसबे सरांच्या परिचयाचे होते. सर म्हणाले, "झोप आता. सकाळी बघू."

सकाळी कसबेसरांनी संयोजकांच्या घरी फोन केला तर ते बाहेरगावी गेल्याचे समजले. कार्यक्रमाचे काय तर, पुरेशी वर्गणी न जमल्याने तो रद्द झाल्याचे संयोजकपत्नी म्हणाल्या. रेस्ट हाऊसचे रिझर्व्हेशन का रद्द केले, कार्यक्रम रद्द झाल्याचे वक्त्यांना पुण्याला का कळवले नाही?" यावर बाईंचे उत्तर होते, " कळवायचे काय त्यात, तसेही आल्यावर कळेलच की.

राहण्याच्या रूमचे रिझर्व्हेशन अशासाठी रद्द केले की वक्ते संगमनेरला आल्यापावली पुण्याला परत जाऊ शकतील! त्यांचा वेळ फुकट जायला नको....."
घ्या कपाळावर मारून!

८. दापोली माझे आवडते गाव आहे. तिथल्या संयोजकांचा कार्यक्रमासाठी माझ्या घरी पुण्याला फोन आला तेव्हा मी मुंबईत के.ई.एम. हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट होतो. खूप आजारी होतो. अंगात ताप होता. खूप अशक्तपणाही होता. डॉक्टरांनी नकार दिला तरी संयोजकांनी घ्यायला गाडीसह माणूसच पाठवला. सोबत माझ्या पत्नीला व मुलीलाही यायचा त्यांनी आग्रह केला.

शेवटी आग्रहाला बळी पडून आम्ही तिघे त्यांच्यासोबत दापोलीला गेलो. कार्यक्रमाला मंत्री रामदास आठवलेसाहेब आलेले होते. कार्यक्रम जोरदार झाला. आमची राहायची व्यवस्था कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसवर होती. मुक्काम करून सकाळी पुण्याला निघायचे ठरले होते. घ्यायला आलेल्यांच्या घरी सकाळी मी फोन केला तर ते थकून झोपलेले होते. त्यांच्या पत्नी म्हणाल्या, " साह्येब झोपलेत. उठवू नका असा मला दम दिलेला आहे त्यांनी. गाडी तिकडेच आहे, तिने जा तुम्ही पुण्याला!"

गाडी व ड्रायव्हरची मी चौकशी केली तेव्हा समजले कारवाला पुण्याचा होता. रात्रीच त्याला संयोजकांनी पेमेंट केले व तो न थांबता पुण्याला परत एमप्टी निघुन गेलाय. परत मुख्य संयोजकांकडे फोन केला तर ते मुंबईला गेल्याचे समजले.

सगळेच्या सगळे आयोजक नॉट रिचेबल होते. शेवटी फणफणत्या तापात बायको-मुलीसह बसस्टॅंडवर गेलो. सगळ्या गाड्या फुल्ल होत्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे उभे राहायलाही गाडीत जागा नव्हती. शेवटी दोनतीन तास वाट बघून डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे जावई अनीस पटवर्धन यांना  फोन केला. त्यांनी धावपळ करून कुठून तरी एक कार मॅनेज केली. अनीसमुळे निदान पुण्याला तरी कसेबसे पोचलो.

वर्षभरात संयोजकांनी कधीही माझे फोन घेतले नाहीत.

मात्र पुढच्यावर्षी त्यांचा पुन्हा मला निमंत्रणाचा फोन आला. म्हणतात कसे, " तुमचे भाषण लोकांना खूप आवडलेय. तुमची खूप डिमांड आहे. यावेळी मागच्यासारखा त्रास होणार नाही. माझा शब्दाय. तुम्ही आलेच पाहिजे. माणूस पाठवतो घ्यायला. आठवलेसाहेबांचा फार आग्रह आहे....!"

असे किंवा यापेक्षाही चित्रशैलीतील अनुभव!!! भरमसाठ आहेत. पुन्हा कधी त्यांच्याबद्दल.... पुण्यातल्या एक नामवंत महाविद्यालयाने मला व्याख्यानाला बोलावले. तिथल्या प्राध्यापक मित्राच्या लुनावरून डबलसीट खडकवासल्याला भाषणाला गेलो. तिकडे महाविद्यालयाचा कॅंप गेलेला होता. मजा आली. परतल्यावर संयोजकांनी मानधनाचे पाकीट दिले. पाहिले तर त्यात पाच रूपये होते! अर्थात वीस वर्षांपुर्वीचे ५ रुपये म्हणजे आजचे निदान ५० रूपये झाले. भरपुर झाले ना?

९. हो, तारखा शिल्लक नाहीत किंवा तारखा जुळत नाहीत म्हणून मला शेकडो कार्यक्रम घेता आले नाहीत, त्यामुळे असंख्य लोक नाराजही झाले. चिडले. संतापले. कायमचे तुटलेही.

मात्र मानधन कमीय म्हणून मी आजवर कार्यक्रम नाकारलेला नाही. पस्तीस वर्षे मी एस.टी. बसने वा एशियाडने प्रवास केला. अलिकडे स्पॉन्डीलिसिसमुळे एसटीच्या लाल डब्याने जाण्याऎवजी रेल्वेने, कारने, सुमोने, जीपने जावे लागते. त्याचा संयोजकांवर भार पडतो याचाही मला गिल्ट वाटतो....

संयोजकांनी वक्त्यांचा प्रवासखर्च करायला हवा. आमच्यासारख्या ज्यांनी टेल्कोसारखी नोकरी फुले-आंबेडकर साहित्याच्या प्रकाशनासाठी स्वेच्छेने सोडली व ज्यांना उदरनिर्वाहाचे दुसरे काहीच साधन नाही त्यांना शक्य असेल तेव्हढे मानधनही संयोजकांनी द्यावे, असे मला तरी वाटते.

मी ठरलेली तारीख देऊन गेलो नाही असे कधीही झालेले नाही. अधिक मानधनाचे आमिष असतानाही आधी ज्यांना शब्द दिलाय त्यांच्या तारखेत वा कार्यक्रमात मी कधीही बदल केलेला नाही, वा त्यांच्याकडून ऎनवेळी मानधनही वाढवून मागितलेले नाही. अनेकांनी कमी दिले तरी ते स्विकारले. नंतर पाठवले तेही मान्य केले.
अर्थात ही माझी बाजू झाली.

संयोजकांचीही काही एक बाजू असेलच.

कार्यक्रमाचे फोटो, बातम्यांची कात्रणे पाठवा असे विनवूनही २ ते ३ टक्के संयोजकच फोटो,कात्रणे पाठवतात. अनेकांचा कार्यक्रम संपला की गरज सरो, वैद्य मरो असाच अनुभव असतो.

चालायचेच. माणसेच ती. अशीच वागणार!

१०. मला आज सुमारे ४० वर्षांच्या अनुभवानंतरही मानधन याविषयावर बोलताना खुप संकोच वाटतो.
मला निदान २५ संस्था/व्यक्ती अशाही माहित आहेत ज्यांनी मला न विचारताच माझे नाव छापले. वर्गण्या जमा केल्या. रेल्वे स्टेशनवर पोस्टरमध्ये माझे नाव वाचून मी स्वत: त्यांना संपर्क केला
तेव्हा त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळले. काहीजण थेटच म्हणतात, " तुमची फक्त संमती द्या, आम्ही तुमचं नाव छापतो. तुम्ही येऊ नका." काही संमती घेतात आणि नंतर काहीच कळवत नाहीत. आपण तरिही गेलो तर त्यांना अवघडल्यासारखे होते. आम्हाला वाटलं, ज्याअर्थी आम्ही नंतर तुम्हाला काही कळवलं नाही त्याअर्थी तुम्ही येणार नाही. ठीकाय. आता आलाच आहात  तर जेवा आणि परत जा. आणि असे सांगणारे कोणी सामान्य नाहीत, द. महाराष्ट्रातील एका मोठ्या साखर कारखान्याचे संस्थापक-चेयरमन, स्वातंत्र्य चळवळीतले थोर नेते, प्रचंड आदरणीय सामाजिक नेते. मोठाच माणूस. असो. शेवटी कोणीही असला तरी माणूसच तो.

पण असे असले तरी माझा एकुण अनुभव जास्तकरून चांगलाच आहे. त्याच्याबद्दलही पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहितो. हजारो भल्या संयोजकांना मन:पुर्वक धन्यवाद.
सामान्य लोक खूप जीव लावतात. अमाप प्रेम करतात. आणखी काय हवे?

-प्रा. हरी नरके, ९/६/२०२०

Monday, June 1, 2020

मागे वळून बघताना- प्रा. हरी नरके

















लहान वयातला माझा सगळ्यात आवडता वाड्मय प्रकार "चरित्र - आत्मचरित्र" हा होता. वेगवेगळ्या भन्नाट लोकांचे अनुभव, आत्मकथन वाचताना आपणच जणु ते आयुष्य जगतोय असा फिल यायचा. आजही माझा सगळ्यात आवडता विभाग "चरित्र - आत्मचरित्र" हाच आहे. माझ्या व्यक्तीगत ग्रंथसंग्रहात किमान ५००० तरी चरित्रं आत्मचरित्रांची पुस्तकं आहेत. शाळकरी वयात मला अल्पायुषी ठरलेल्या प्रतिभावंत साहित्यिक, योद्धे, विविध क्षेत्रातील कर्तबगार लोक आदींचं भारी आकर्षण होतं. त्यावेळी मला असं वाटायचं की माणसाला चांगलं, समृद्ध जगण्यासाठी लांबलचक आयुष्याची गरज नसते. शारिरिक, बौद्धिक परिश्रमाचं रसरशीत जगलेलं ३० ते ३५ वर्षांचं आयुष्य भरपूर झालं. तेव्हा आपल्या हातात तेव्हढाच वेळ आहे असं मानून मी चालत असे. पुढे जगण्यातली रंगत, गंमत, गुंतागुंत आणि विविधता आकळत गेली तेव्हा असं वाटायला लागलं की नाही ३५ फार कमी होतात ५० वर्षे ही लिमिट हवी.


पन्नाशी जवळ आली तेव्हा मी ठरवलं आणखी थोडी वाढ वाजवी ठरावी. मात्र साठी पुरे म्हणजे पुरेच.

आज कागदोपत्री वयाची ५७ वर्षे पुर्ण झाली. म्हणजे अजून उणीपुरी तीन वर्षे हातात आहेत. ३ वर्षे हा बक्कळ वेळ आहे!


( १ जून ही शिक्षकांनी नोंदवलेली कागदोपत्री जन्मतारीख आहे. पुढे आईने सांगितलेल्या आठवणींच्या आधारे मी खर्‍या जन्मतारखेचा शोध घेतला. ती सापडलीही. ती दोन महिने पुढची सापडली. मात्र कागदोपत्री बदल करायची मला आवश्यकता वाटली नाही. )


वाचनाच्या जबरी व्यसनाचा एक तोटा म्हणजे माणूस फार रोमॅंटिक बनतो. एक कविता आवडली होती, "मला दु:ख हवे." अर्थात तोवर दु:ख म्हणजे काय हे फारसं माहितही नव्हतं. तेव्हा वाटायचं आपल्यालाही दु:ख हवं. किती भारी ना! नंतर जसजसे दु:खाचे जबरी आघात होत गेले तेव्हा लक्षात आलं, दु:ख असतंच. ते मागायची काहीच गरज नसते. तुकोबा म्हणूनच गेलेत ना, " सुख जवापाडे, दु:ख पर्वताएव्हढे!" तथागतांनी सांगितलेला दु:ख निवारणाचा मार्ग आणि फुले-आंबेडकरांनी सांगितलेली जगण्याची रित हीच आपली वाट! या वाटॆवर चालत राहिलो. खूप मानसन्मान, आपुलकी, लोकप्रेम मिळत गेलं.


जात, वर्ग, लिंगभाव यांनी नाडलेल्या दुबळ्यांसाठी काम करायचं असं मनोमन ठरवलं होतं. त्यादिशेने धडपडत राहिलो. झटत राहिलो. अनेक चळवळींमध्ये विशेषत: भटक्याविमुक्तांच्या चळवळीत झोकून देऊन, जीव ओतून राबत राहिलो. स्वातंत्र्याच्या एव्हढ्या वर्षांनंतरही अपार दैन्य, अभाव आणि वंचितता यांचं जितंजागतं साम्राज्य म्हणजे हे पालावरचे समुह. या चळवळीतल्या सर्व गटातटांशी स्नेहबंध जुळले. सगळ्या नेत्यांना फार जवळून बघता आलं. अनुभवता आलं. काम एव्हढं मोठं होतं की नोकरी सोडून पुर्णवेळ कार्यकर्ता व्हावं असं वाटलं. प्रा. भा. ल. भोळेसर माझे सुहृद. त्यांच्याशी बोललो. ते नागपूरहून मुद्दाम पुण्याला धावत घरी आले. म्हणाले, " हरी, उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेली नोकरी सोडू नकोस.


पुर्णवेळ कार्यकर्त्यांचे हाल कुत्रंही खात नाहीत. विशेषत: आर्थिक परावलंबन फार वाईट. लाचारीचं आणि मानहानीचं जिणं पदोपदी वाट्याला येतं."  त्यांचं म्हणणं पटलं. नोकरी करीत काम करीत राहिलो. गरजा अतिशय मर्यादित ठेवल्या. बिडी-काडी-दारू-सिगारेट यांना गेल्या ५७ वर्षात कधीही हात लावला नाही. साधनशुचिता, वखवखमुक्त जगणं आणि लोकशाही जीवनमार्ग यांनी खूप समाधान दिलं. आंतरजातीय विवाह आणि एकच मुल पुरे हा बाबासाहेबांचा आदेश मानला आणि कडवा विरोध झाला तरी जातीबाहेर लग्न केलं, पहिलं अपत्य झाल्यानंतर स्वत:चं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलं.


पुढे वसंत मून यांच्या निधनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचं काम बंद पडणार होतं. सरकारच्या अवघ्या दोन हजार रूपये दरमहा मानधनावर हे काम करायला एकही फुले-आंबेडकरी विद्वान, प्राध्यापक तयार नव्हता. तेव्हा टेल्कोची नोकरी सोडली. आमच्या विभागाच्या प्रधान सचिव चंद्रा अय्यंगार म्हणाल्या, " हरी, टेल्कोची असली नोकरी सोडणारा माणूस मुर्ख असला पाहिजे. अरे ही नोकरी मला मिळणार असेल तर मी माझा आय.ए.एस.चा जॉब सोडायला तयार आहे." तरिही मी त्यांचं ऎकलं नाही.


त्या काळात उत्तमोत्तम खंड प्रकाशित करता आले याचं समाधान आहे. फुले-आंबेडकरांची ही पुस्तकं पुढील शेकडो वर्षे टिकणार आहेत. सरकारने संपादक पदाचं मानधन स्वत:हून वाढवलं आणि जादूची कांडी फिरली. अनेक विद्वान, प्राध्यापक हे काम मिळवण्यासाठी मंत्र्यांचे उंबरे झिजवू लागले. जातीचे दाखले सादर करू लागले. मी तयार केलेल्या पुस्तकांवर खोटेनाटे लेख लिहिले जायला लागले. कुभांडं रचली जायला लागली. बदनामीचं अभियान गतिमान झालं. दुसरीही एक छळछावणी कामाला लागली.


वामन मेश्राम यांच्या बामसेफची. मी या संघटनेचा कधीही सदस्य नव्हतो. पदाधिकारी असण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यांच्या संघटनात्मक कामात मी कधीही रस दाखवला नाही. ते मला कार्यक्रमाला वक्ता म्हणून बोलवायचे. मी जमत असेल तर जायचो. फार पुर्वी वामन मेश्राम जेव्हा पोस्टमनची नोकरी करीत होते, तेव्हाच माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. ते चळवळीत फार उशीरा आले. चळवळीतले कितीतरी टक्केटोणपे खाण्यात मी त्यांना सिनियर आहे. त्यांनी मला फुले-आंबेडकर शिकवलेले नाहीत. मी बामसेफकडे गेलो नव्हतो. ते बोलवायचे म्हणून त्यांच्या स्टेजवर जायचो. मी मला बोलवा असं सांगायला कधीही गेलो नव्हतो.


जेव्हा मेश्राम चळवळीत एकटे पडले होते तेव्हा त्यांना पुन्हा उभे राहायला माझ्या भाषणांचा फायदा झाला. त्यांनी मला मोठं केलं हा त्यांच्या गटाचा प्रचार संपुर्ण निराधार आणि बिनबुडाचा आहे. मेश्रामांची कार्यपद्धती न पटल्याने मी त्यांच्या कार्यक्रमांना जायचे बंद केले. तर त्यांनी माझ्याविरूद्ध अतिशय गलिच्छ अभियान छेडलं. भयंकर!

हो, तरिही सामान्य कार्यकर्त्यांनी मात्र मला अपार प्रेम दिलं. विश्वास दिला.


प्रस्थापित व्यवस्था तुम्हाला खतम करायला टपलेलीच असते. एकदा इस्लामपूरला माझे भाषण होते. खूप मोठी उपस्थिती होती. ना. जयंत पाटील अध्यक्ष होते. भारतीय संविधानावर व्याख्यान होतं. कार्यक्रम जंक्षान झाला.


एक युवक येऊन भेटला. भाषण आवडल्याचे सांगत होता. निघताना त्यानं खिश्यातून एक पुडी काढली. म्हणाला, " सर, आवाजासाठी तुम्ही गुंजेचा पाला खात जा. माझं पानाचं दुकान आहे. तुमच्यासाठी मी पान आणलंय. नक्की खा. आवडेल तुम्हाला. मी ते खिश्यात ठेवलं. रात्रीचं जेवन संयोजकांच्या घरीच होतं. ते डॉक्टर होते. त्यांचा दवाखाना घराशेजारीच होता. जेवन झालं नी मला त्या पानाची आठवण झाली. डॉक्टर म्हणाले, " सर, नका खाऊ, अनोळखी माणसाने दिलेलं पान आहे. त्यात काहीही असू शकतं." तोवर मी कट्यार काळजात घुसली बघितलेलं नव्हतं. पानात शेंदूर किंवा इतर विषारी केमिकल्स घालून लोक कायकाय उद्योग करतात हे मला माहित नव्हतं.


त्याकाळात माझा सार्‍या जगावर अफाट विश्वास होता. मी पान तोंडात टाकलं आणि तोंडाची आग व्हायला लागली. डॉक्टर बाजूलाच उभे होते, त्यांनी तातडीने पान थुंकायला लावलं. ताबडतोब आवश्यक ती मेडीकल ट्रीटमेंट दिली. म्हणूनच घसा वाचला. नाही तर तेव्हाच माझी भाषणं बंद पडली असती! संयोजक मुलांनी त्या पान देणाराला हुडकून काढला. बोलता केला. त्याला काही रक्कम देऊन सुपारीवर पाठवलेलं होतं एका प्रतिगामी संघटनेनं. "संस्कृतीच्या गप्पा मारणारे सनातनी" अशा पद्धतीनं माझा आवाज बंद करू पाहत होते तर!


ख्यातनाम संशोधक डॉ. रा.चिं. ढेरेअण्णा मला सांगायचे, " हरी, जसजसे आपले काम वाढत जाते, त्याला समाजमान्यता मिळू लागते, तसतसे आपल्या जवळचे लोक त्या मान्यतेचे वाटेकरी व्हायचा प्रयत्न करतात. श्रेय नाही मिळाले की दूर जायला लागतात. स्पर्धकभावनेने पेटू लागतात. आपण एकटे पडतो. त्यासाठी मनाची तयारी हवी!" ते अगदी खरे निघाले.


ज्या भटक्यांच्या चळवळीसाठी कोणतीही अपेक्षा न करता मी आयुष्यातील अनेक वर्षे दिली, तिथल्या काही नेत्यांची असलीयत भयंकर होती. आहे. क्रिमीनल. गुन्हेगारी स्वरूपाची. सराईत दरोडेखोरीची. ही चळवळ म्हणजे त्यांची रोजगार हमी योजना होती. आहे. कोणताही कामधंदा न करता ऎशोआरामात जगण्याचा किफायतशीर धंदा. वरून अगदी ऋषीमुनी वाटणारे हे नेते आतून इतके सडके, विकृत आणि पॉकेटमार आहेत की सटपटायला होते. झाले. चळवळीतली सर्वात जवळची माणसंच जेव्हा आपला विश्वासघात करतात, आयुष्यातून उठवायला निघतात तेव्हा फार खचायला होतं.


जगण्यातला रसच आटतो. त्या संकटकाळात प्रा. रंगनाथ पठारे, सन्मित्र संजय सोनवणी, संजय आवटे, डॉ. धनंजय चव्हाण, डॉ. हिरेन निरगुडकर, शुद्धोधन आहेर, आनंद उबाळे  आणि अ‍ॅड. बी.एल. सगर- किल्लारीकर हे मान्यवर माझ्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यांचे आणि माझ्यावर अपार प्रेम करणार्‍या सामान्य माणसांचे हे ॠण कधी आणि कसे फेडणार? सगळ्याच जातीधर्मातील सामान्य माणसांनी माझ्यावर एव्हढी वर्षे केलेलं अपार प्रेम हा तर माझा फार मोठा ठेवा! ही आपुलकी, ही विश्वासार्हता, ही सोयरिक हीच माझी आयुष्यातली सर्वात मोठी जमापुंजी. खरा बॅंक बॅलन्स! माझ्यावर संस्कार करणारी माझी आई, मोठे बंधू, माझे शिक्षक, ज्यांचं वाचून आजवरची वाट सुकर झाले ते सारे आणि मला घडवणारे सगळे मान्यवर यांच्याविषयीची कृतज्ञता काळीजतळापासून व्यक्त करतो. जयभीम! जय भारत!

- प्रा. हरी नरके, १/६/२०२०

Saturday, May 30, 2020

रसाळ आणि लोभस ग. प्र. प्रधान --प्रा. हरी नरके


महाराष्ट्र विद्यालयात शिकत असताना लिहिलेला पुणे दर्शन हा प्रबंध दाखवायला मी प्रा. ग. प्र. प्रधान यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. तेव्हा ते विधान परिषदेवर आमदार होते. त्यांनी व त्यांच्या पत्नीने अतिशय मायेनं स्वागत केलं. पाणी, सरबत आणि सोबत एक केळी त्यांनी माझ्या समोर आणून ठेवली. माझा प्रबंध आस्थेवाईकपणे चाळला. २ दिवसांसाठी माझ्याकडे ठेव मी वाचून त्यावर तुला अभिप्राय देतो असं म्हणाले.


मी २ दिवसांनी गेलो तेव्हा त्यांनी २०० पृष्ठांचा प्रबंध वाचून त्याच्यावर अभिप्राय लिहून ठेवलेला होता. एका शाळकरी विद्यार्थ्याने केलेल्या या संशोधनपर लेखनाचे त्यांनी अभिप्रायात मनापासून कौतुक केलेले होते.


त्यांचे हाजीपूर हे युद्धकथांचे पुस्तक त्यांनी मला भेट दिले. माझी माहिती घेतली आणि मी एका कबरस्थानात काम करुन शाळा शिकतो हे ऎकल्यावर ते म्हणाले, "कसलीही मदत लागली तर संकोच न करता मला सांगायला ये. तुला दरवर्षी वह्या-पुस्तकांची मदत करायला मी माझ्या घराशेजारच्या मंडई मंडळाला सांगतो." त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना माझ्यासमोरच तसा फोनही केला.


त्यानंतर अधूनमधून त्यांच्याकडे जात असे. त्यांचे बोलणे अतिशय रसाळ आणि लोभस होते. दरवेळी एक नविन पुस्तक ते मला द्यायचेच.


नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत तुरूंगात मला राहायला मिळाले. सगळेच त्यांना मास्तर म्हणायचे. मास्तर चहाचे शौकीन होते. मात्र इतर कसलेही व्यसन त्यांना नव्हते. आजकाल कार्पोरेटरसुद्धा किती भाव खातात. मास्तर मात्र आमदार असूनसुद्धा इतके साधे, प्रेमळ आणि विनयी होते की ते आमदार आहेत यावर विश्वासच बसू नये. ते साधनेचे संपादक असताना त्यांनी माझ्याकडून काही लेख लिहून घेतले. ते ठळकपणे छापले. ‘मी भोळाभाबडा, प्रसंगी काहीसा बावळट आहे असे लोकांना वाटते. खरं तर त्यांचा हा समज कायम ठेवण्यात फायदा समजलेला मी एक धूर्त माणूस आहे’ असे ते म्हणत. वाचन, लेखन आणि वाचलेल्यातील जे आवडले ते इतरांना सांगणे, हा मास्तरांचा परिपाठ होता.


त्यांना मी महात्मा फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करायला सांगितले. त्यांनी त्या कविता (अखंड) परत वाचल्या आणि मला भेटायला बोलावले. मला म्हणाले, " अरे ह्या कविता म्हणजे आग आहे आग. मला त्यांचा अनुवाद करायला मिळणे हा माझा सन्मान आहे. मात्र माझा पिंड मवाळ आहे. समन्वयवादी आहे. मी या जहाल कवितांना न्याय देऊ शकणार नाही. मुळात मला ही आग झेपणार नाही. त्यासाठी तसाच कणखर माणूस हवा." त्यांनी मला त्यासाठी एक नावही सुचवले. मी त्यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांना वेळ नसल्याने ते अनुवाद करू शकले नाहीत. त्यानंतर मी भालचंद्र नेमाडे सरांना ह्याकामी विनंती केली.


आपल्या भाषांतरविषयक मर्यादा इतक्या नेमकेपणाने समजलेले किती लोक असतात? प्रधानमास्तर म्हणजे नितांत सोज्वळ, पवित्र आणि सौम्य प्रकृती. साक्षात शुचिता, आस्था आणि करूणेचं प्रतिकच! दहा वर्षांपुर्वी मास्तर गेले. २९ मे २०१० रोजी त्यांचे निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते.






-प्रा. हरी नरके, ३०/५/२०२०